९
गोवेले
स्वाध्याय केंद्राचा आज वर्धापन दिन होता. त्या निमित्ताने सिंधुदर्ग जिल्ह्याच्या
स्वाध्यायींचा भावमिलन सोहळा आज साजरा केला जात होता. त्या
निमित्ताने गोवेले गांव आज गजबजले होते. या सोहळ्याकरिता गुजराथ, गोवा, दिल्ली,
केरळ या राज्यामधुन स्वाध्यायी आलेले होते. ते गेले चार दिवस गोवेले परिसरातिल
गावांमध्ये भक्ति फेरी करिता गेलेले होते. त्यांच्या भक्तिफेरीची सांगता देखिल आज
येथे होणार होती.
या
कार्यक्रमाकरिता हनुमानवाडीहून सरपंच हंबीरराव, त्यांच्या पत्नी राधाकाकू, शेळके
गुरुजी, महाराज, हेमंत, गणेश, हेरंब, जितेंद्र यांच्या व्यतिरिक्त पांडुरंग
यादव, लक्ष्मण गोरिवले, हेमंतचे भाऊ
दिनकरदादा, शिवाय ग्रामसेवक पंडित साहेब आणि सर्कल इन्स्पेक्टर
आपटे साहेब एवढी लोक आली होती.
गोवेले
येथिल स्वाध्याय केंद्र नेहमी गावातिल मारुति मंदिरात भरत असे. आज भावमिलन
सोहळ्याकरिता दोन अडिच हजार लोक उपस्थित रहातिल अशी अपेक्षा होती. त्यामुळे
गावातिल शाळेच्या क्रिडांगणात हा सोहळा आयोजित केला होता. शाळेच्या
क्रिडांगणामध्ये सुसज्ज मांडव घातलेला होता. तो फुलांनी सजवलेला होता. स्टेजवर
योगेश्वर श्रीकृष्णाची आकर्षक अशी शाडुची मुर्ती सजवलेल्या टेबलावर ठेवलेली होती.
त्या टेबलाच्या खालीच एका कोचावर प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा फोटो
ठेवलेला होता. योगेश्वराच्या मूर्तीला आणि दादांच्या फोटोला गेंदेदार लाल
गुलाबपुष्पांचा हार घातलेला होता. योगेश्वराच्या बाजुला टेबलावर पांच ज्योतींची
समई ठेवलेली होती. समईलादेखिल फुलांच्या हाराने सजवले होते. योगेश्वरांच्या समोर
पाण्याने भरलेला तांब्याचा चकचकित कलश ठेवलेला होता, त्यावर आंब्याचे पंचपल्लव आणि श्रीफळही होते.
वातावरणांत एक वेगळाच सुगंध दरवळत होता.
सर्वप्रथम
गोवेल्यातिल वयोवृद्ध स्वाध्यायी गोविंद शिर्के यांना हाताला धरुन स्टेजवर नेले.
त्यांच्या हस्ते समईच्या पांचही ज्योतींचे प्रज्वलन करण्यांत आले. त्यानंतर
त्यांना मानाने पहिल्या रांगेत नेऊन बसविण्यांत आले. आता आजच्या सोहळ्याचे
सूत्रसंचालन गोवेल्याचे केंद्र प्रमुख अर्जुन शिर्के यांनी आपल्या हातात घेतले. उपस्थित
असलेल्या सर्व स्वाध्यायींसह त्यांनी वसुदेव सुतं देवं .............. ही
प्रार्थना म्हटली. या प्रार्थनेने आजच्या सोहळ्याचा प्रारंभ झाला. प्रार्थना होताच
एकेका गावच्या स्वाध्यायींनी अगोदरच ठरवुन ठेवलेली भावगीते सादर केली.
भावगीत
गायना नंतर गुजराथमधिल साबर येथुन आलेल्या युवा बंधु भगिनिंनी दिप नृत्य सादर
केले. ते बघुन मंडपात उपस्थित असलेले सर्वचजण अतिशय प्रभावित झाले. कारण त्या
नृत्याचे सादरीकरणच विलक्षण होते. डोक्यावर घेतलेल्या प्रज्वलित समया जराही न
हलवता वाद्यांच्या ठेक्यात निरनिराळ्या पोज ती मुले मुली घेत होती. त्यांचे ते
सादरीकरण संपताच टाळ्यांचा अक्षरश: गजर झाला.
अशाप्रकारे
सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्या नंतर अर्जुन शिर्के स्टेजवर गेले. योगेश्वर
श्रीकृष्णाला आणि दादांनावंदन केल्यावर ते तेथिल आसनावर बसले. प्रथम त्यांनी
सर्वांचे जय योगेश्वर असे म्हणून सर्वांचे स्वागत केले. मग त्यांनी वाङ्पुष्प
फुलवायला सुरवात केली.
या
मंडपात उपस्थित सर्वांचे गोवेले स्वाध्याय केंद्राकडुन हार्दिक स्वागत. आज आमच्या
गावाचे आमच्या केंद्राचे भाग्य थोर म्हणून या भावमिलन सोहळ्याचे यजमानपद
गोवेल्याला मिळाले. गोवेले गांव अतिशय दुर्गम आणि पहाडी भागात वसलेले आहे. या अशा
मागास आणि दुर्गम भागात जिथे जवळ कोणतेही शहर नाही, दळणवळणाची साधनेही पुरेशी
नाहित तिथे स्वत:ची शिदोरी बरोबर घेऊन निरनिराळ्या ठिकाणाहून आपला
भाव घेऊन स्वाध्यायी बंधू येथे आलेले आहेत. त्यांचे सर्वांचे मी स्वागत करतो आणि
त्यांना हे आश्वासन देतो की आम्ही देखिल असेच आपल्या भागांत आमचा बंधूभाव घेऊन
येऊ.
आता
मी श्री नवनीत भाईंना विनंती करतो की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. विशेषत: त्यांच्या कडे सुरु असलेल्या वृक्षमंदिरा बाबत
आम्हाला फार उत्सुकता आहे.
********
नवनितभाईंनी आसनावर बसण्यापूर्वी योगेश्वर
श्रीकृष्णाला आणि दादांच्या प्रतिमेला नमस्कार केला. त्यानंतर उपस्थित सर्वांनाही
नमस्कार करुन आपले विचार मांडायला सुरवात केली. सर्व स्वाध्यायी बंधू आणि भगिनिंनो
प्रथमच मी आपणास सांगतो की मी कोणी परका नाही. तर आपला भाऊच आहे. त्यामुळे मगाशी
अर्जुनभाऊंनी सांगितलेल्या दुर्गम भाग वगैरे गोष्टी बंधू प्रेमापुढे दुय्यम आहेत
त्यांना महत्व देण्याची काहीच गरज नाही. आपण त्या एका योगेश्वराचीच लेकरे आहोत.
असो, भगवद्गीतेमध्ये भगवंताने आपले अस्तित्व कशात आहे हे दहाव्या अध्यायात सांगितले
आहे.
यच्चापि
सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न
तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥
आपण स्वाध्यायी भगवद्गीतेतिल विचारांचे आचरण
करणारे आहोत. भगवद्गीतेमधिल मी आत्ता सांगितलेल्या श्लोकांत भगवंतांनी आपले
अस्तित्व या विश्वात कुठे कुठे आहे ते सांगितले आहे. ते म्हणतात ज्या पदार्थामध्ये
मी नाही अशी वस्तुच या विश्वात अस्तित्वात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे परमेश्वर
जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे. त्यामुळे देवाला शोधायला आपल्याला कुठेच जायची जरुरी
नाही.
आपण तुळशीची पूजा करतो, वडाच्या झाडाची पूजा
करतो, तेरड्याच्या झाडांची गौरी म्हणून पूजा करतो. आघाड्याच्या झाडाची ऋषी
पंचमीच्या दिवशी पूजा करतो. उंबराच्या झाडाला गुरुदेव दत्तांच्या जागी मानतो. ज्या
गवताला आपण पायदळी तुडवतो त्या दुर्वांनाही आपण पवित्र मानुन गणपतिला वाहतो.
अशाप्रकारे आपण वनस्पतिंना देवत्व बहाल केलेले आहे. भगवद्गीतेमध्येच “अश्वत्थं सर्ववृक्षाणां” या श्लोकामध्ये माझे अस्तित्व सर्व
वृक्षांमध्ये आहेच परंतु विशेषकरुन पिंपळवृक्षामध्ये आहे असे वचन दिले आहे.
तात्पर्य आपल्या आजुबाजुच्या प्रत्येक गोष्टींत परमेश्वर आहे. त्याला शोधायला
कुठेही जायची जरुरी नाही.
हाच विचार घेऊन प. पू. दादांनी अनेक प्रयोग
केले आहेत. योगेश्वर कृषी, योगेश्वर नौका हे त्यांचे प्रयोग तर महाराष्ट्रात ब-याच
ठिकाणी यशस्वी झाले आहेत. आमच्या कडे आमच्या गावात दादांचा “वृक्ष मंदिर” हा प्रकल्प चालू आहे. त्यामागे उद्देश
“स्थानिक
परिस्थितीनुरुप युवांच्या मदतीने सन्मार्गाने, अभिमानाने, आणि आत्मसन्मानाने
त्यांच्यातील कौशल्य वापरुन त्यांचा स्वत:चा, त्याच बरोबर कुटुंबाचा, समाजाचा,
गावाचा उत्कर्ष घडवुन आणणे हा आहे”.
आपल्या परंपरे नुसार आपण एकादशीचा उपवास
करतो. एकादशीचा उपवास म्हणजे दैनंदिन आहारात बदल हे आपले समिकरण असते. परंतु
स्वाध्याय परंपरेनुसार एकादशीचा उपवास म्हणजे काय, तर महिन्यातले दोन दिवस आपण
परमेश्वराला त्याच्या कार्याकरीता देणे. उपवास म्हणजे त्या दिवशी आपला दैनंदिन
व्यवहार बाजुला ठेवुन देवाच्या सानिध्यात रहाणे. वृक्षमंदिरात हीच संकल्पना
वापरलेली आहे. आमचे स्वाध्यायीबंधू भगिनी महिन्यातिल दोन दिवस सोडून उरलेले दिवस
आपापल्या प्रपंचाकरिता कष्ट करतात तर महिन्यातले फक्त दोनच दिवस वृक्षमंदिरातिल
पूजेकरिता देतात.
अशा या अनोख्या मंदिराला भेट द्यायला
आपणापैकी कोणिही कधीही आले तर आपले आम्ही स्वागतच करु. त्याच्या करीता तुम्ही
नियमित स्वाध्याय केंद्रात जात असलात तर उत्तमच. पण जात नसलात तरीही आपले तेवढ्याच
आपुलकीने स्वागत होईल.
एवढे बोलुन मी माझे चार शब्द पूर्ण करतो. जय
योगेश्वर. शेवटी त्यांनी प्रार्थना म्हटली. “सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि
पश्यन्तु माSकश्चित
दु:ख माप्नुयाSत।।“
नवनीतभाईंच्या चिन्तनिके नंतर आणखी
दोघांनी आपले विचार व्यक्त केल्यानंतर. आरती होऊन कार्यक्रम समाप्त झाल्याचे जाहिर
करण्यांत आले.
गोवेल्याहून हनुमानवाडीला जाताना
सर्वांचा वृक्ष मंदिर हाच चर्चेचा विषय होता. सर्वांच्या मनांत ही संकल्पना
आपल्याकडे कशी काय राबवता येईल याबद्दल विचारचक्र सुरु होते.
*************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा