बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग १३

१३
दुपारी साडेबाराचा सुमार होता. हंबीरराव ओसरीवर निवांत बसले होते. त्याच्या रोजच्या दिनक्रमाप्रमाणे १५-२० मिनिटांत घरातुन जेवायला येण्याकरीता निरोप येईल म्हणून ते वाट बघत होते. तेवढ्यात अंगणातुन ताई! भिक्षा वाढा असे शब्द कानावर आले! आवाज ओळखीचा वाटला म्हणून ते बाहेर आले बघतात तर महाराज हातात झोळी घेऊन ऊभे होते.
अहो महाराज! असे काय ते? सरळ आत यायचे नां! असे म्हणून सरपंचांनी महाराजांना हाताला धरुन आत मध्ये आणले. आणि त्यांना जबरदस्तीने खुर्चीत बसायला लावले. त्यानंतर आतमधुन सुमनला बोलावले आणि तिला सांगितले काकूंना बाहेर पाठवं.
काकू बाहेर आल्यावर हंबीरराव त्यांना म्हणाले, अहो ऐकलत कां! महाराज बाहेरुनच भीक्षा मागत होते. त्यांना मी जबरदस्तीने आतमध्ये आणून खुर्चीवर बसवले आहे.
त्यावर काकूंनी महाराजांना सांगितले, महाराज! आता आपण आमच्या बरोबरच जेवायला बसा.
नाही ताई! मी चार घरं मागुन आलेलो आहे. आपले पांचवे घर आहे. तेव्हा मला आपण भीक्षाच वाढा. महाराजांनी सांगितले.
महाराज! मग असं करा! ते अन्न घेऊन आमच्या बरोबरच जेवायला बसा. चालेल नां? हंबीररावांनी विचारले.
मी तुमचा आग्रह आहे म्हणून तुमच्या पंक्तीला जेवेन. पण मला आग्रह करायचा नाही. ताई! जे काय असेल ते एकदाच थोडेसे वाढा. मग मी माझ्या रोजच्या प्रथे प्रमाणे कावळ्यांचा आणि गाईचा भाग काढुन आपल्या पंक्तीला बसेन. महाराजांनी सरपंचांच्या आग्रहाला मान तुकवली.
यथावकाश सरपंचांचे आणि महाराजांचे जेवण झाल्यावर ते दोघेजण ओसरीवर बोलत बसले. महाराज म्हणाले, सरपंच! आपले काल देवळात बोलणे झाल्याप्रमाणे आजपासून मी सोमजाई मंदिरात माझा मुक्काम हलवतोय.
कधी जाणार आहांत? सरपंचांनी विचारले.
आता लगेचचं, इथुन मारुति मंदिरातुन झोळी उचलली की चाललो. महाराजांनी सांगितले.
महाराज, थोडे उनं उतरले की आपण दोघेही जाऊया! मी पणं आपल्या सोबत येतो. कारण बरेच दिवसात मीही तिकडे गेलो नाही. सरपंच म्हणाले.
सरपंच मला आपल्या कडुन एक दोन वस्तु देवीच्या डोंगरावर नेण्यासाठी पाहिजे आहेत. महाराजांनी विनंती केली.
अहो घर आपलेच आहे, काय पाहिजे ते न्या! सरपंचांनी लगेचच अनुमती दिली. त्यापेक्षा असे करुया मी आपल्या बरोबर येतोच आहे. तेव्हा तिथली परिस्थिती पहातो आणि आवश्यक असणा-या वस्तु आमच्या गड्याबरोबर पाठवतो. गणेश आजचं गुजराथला जाण्या साठी पांडुरंग बरोबर मुंबईला गेला माहीत आहे नां तुम्हाला? सरपंचांनी विचारले.
हो! मला सांगुनच गेला तो! हंबीरराव मला अजुन एका विषयावर आपल्या बरोबर बोलायचे आहे. महाराज म्हणाले.
बोला नां! नि:संकोचपणाने बोला. हंबीररावांनी परवानगी दिली.
काल आपले वृक्ष मंदिर या विषयावर बोलणे चालले होते, तेव्हा सर्व चर्चा पैशाच्या विषयावर अडकत होती. त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे. बघा आपल्याला पटतोय कां? महाराजांनी प्रश्न केला.
सांगा ना! आपल्याकडे काय उपाय आहे? या गोष्टीवर रात्रभर विचार करतोय परंतु काही मार्ग दिसत नाही. सरपंच निराशेने बोलले.
सरपंच, अहो निराश नका होऊ! अहो इच्छा आहे तिथे मार्ग आहे. आता मी काय सांगतो ती गोष्ट तुम्हाला मान्य असेल तर हा प्रश्न सुटलाय असे समजा.
तुम्हाला माझा पूर्व इतिहास माहित आहेच. मी बँकेत जवळपास २२ वर्षे नोकरी करत होतो. त्यातली शेवटची चार वर्षे मी मॅनेजर होतो. त्यामुळे मला माझ्या बँकेतुन फंड, ग्रॅज्युएटी मिळुन चांगली रक्कम मिळालेली आहे. त्याचप्रमाणे सरकार कडुन नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्यांचा जवळचा नातेवाईक म्हणूनही मला खूप मोठी रक्कम मिळालेली आहे. त्या सगळ्या रक्कमेतील मी अद्याप एकही पैसा खर्च केलेला नाही. सगळी रक्कम बँकेत पडुन आहे. त्यापैकी एक पैसाही माझ्या वैयक्तिक खर्चाकरीता वापरायचा नाही असा माझा निश्चय आहे. त्या रक्कमेतुन माझ्या दगावलेल्या गाववाल्यांचे आणि माझ्या जवळच्या नातलगांचे एक चांगले स्मारक व्हावे अशी माझी इच्छा आहे.
सज्जनगड सोडल्यानंतर आपल्या गावामध्ये मी चार दिवस राहुन पुढे जाणार होतो. परंतु या गावाने मला माझ्या नकळत एक प्रकारची ओढ लावली आहे. कितीही झाले तरी मी काही संन्यासी नाही. त्यामुळे मला या गावाचा, या गावातिल लोकांचा लोभ  जडला आहे. त्यामुळे मी माझ्या नकळत आपल्या वृक्ष मंदिर प्रकल्पामध्ये मनाने अडकलो आहे. तेव्हा माझी आपणाला विनंती आहे की, आपण या वृक्ष मंदिर प्रकल्पाकरीता लागणारी रक्कम मग ती कितीही असो माझ्याकडुन स्विकारावी.
त्यात माझ्या काही अटी आहेत. त्या म्हणजे १) हा प्रकल्प सरकारी कायद्या प्रमाणे विश्वस्त संस्था म्हणून रजीस्टर करुन घ्यावा. २) गोविंदराव जोशी यांच्याबरोबर रितसर करार करुन जागा वृक्ष मंदिर म्हणून विकसित करायला त्या संस्थेच्या ताब्यात घ्यावी. ३) त्या विश्वस्त संस्थेत गोविंदरावांचा किंवा त्यांच्या वारसाची अध्यक्ष म्हणून कायम स्वरुपी निवड करावी. ४) विश्वस्त म्हणून आपण स्वत: त्यात सामिल होऊन प्रकल्पाच्या कामावर देखरेख करावी. ५) या प्रकल्पाचा उद्देश देवीच्या भक्तांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करुन देवीचे वैभव वाढविणे हा असावा. ६) या प्रकल्पातुन स्थानिक बेकारांना सन्मानाने रोजगार मिळावा हा देखिल त्यातिल मुख्य हेतू असावा. असे म्हणून महाराजांनी आपले प्रदिर्घ भाषण थांबविले.
महाराज आपल्या सर्व अटी आणि म्हणणे मला स्वत:ला मान्य आहे. कारण आपण जे काही सांगितलेत ते रितसरच आहे. आपला त्यातिल उद्देश स्वागत करण्यासारखाच आहे. त्यात फक्त मी एक दुरुस्ती सुचवितो, ती म्हणजे आपणही त्या संस्थेत एक विश्वस्त म्हणून सामिल व्हावे. दुसरी गोष्ट म्हणजे या एवढ्या मोठ्या विषयाचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. तेव्हा या बाबतीत मी गावातल्या प्रमुख व्यक्तिंशी बोलेन आणि मगच अंतिम निर्णय आपल्याला सांगेन. सरपंचांनी जबाबदारीने उत्तर दिले.
सरपंच, आपण मला विश्वस्त म्हणून सामिल व्हा हे सांगितल्या बद्दल मी खरोखरच आपला आभारी आहे. परंतु राग मानु नका! मला आता कोणत्याही गोष्टीत गुंतुन रहायचे नाही. आपल्याला माहित आहेच मी फार मोठा आघात सहन केला आहे त्यामुळे मला आता कशाचीच बांधिलकी स्विकारायची नाही. तेव्हा आपण कोणाशी विचार विनिमय करायचाय तो करा आणि माझी अर्थ सहाय्य करण्याची विनंती मान्य करा. शक्यतो माझे नांव पुढे नाही येईल असे बघा. आपला निर्णय झाला की मी माझी रक्कम इथल्या स्टेट बँकेत आणायची व्यवस्था करेन.
हो मी आज रात्रीच या विषयावर गोविंदरावांच्या घरी महत्वाच्या लोकांची बैठक घेतो आणि शक्यतो उद्याच आपल्याला निर्णय कळवतो. माझ्या अंदाजाने सगळ्यांना हा प्रस्ताव मान्य व्हायला काही हरकत दिसत नाही. तुमच्या नावा ऐवजी एक सामाजिक संस्था आर्थिक सहाय्य करणार आहे असे सांगतो. नाहीतर मग तुम्हाला विश्वस्त म्हणून घेतल्याशिवाय आमची लोक ऐकणार नाहीत. मग तुम्हाला चालेल नां? सरपंचांनी विचारले.
हो! हो! चालेल! चालेल! मला माझे नांव कोठेही यायला नकोच आहे. आणि एक लक्षांत घ्या, रक्कम कितिही लागली तरी त्याची चिंता नको!  महाराजांनी सांगितले.
सरपंचसाहेब, मी आता निघु कां? बराच वेळ झाला आपण बोलत आहोत. आपल्या म्हणण्याप्रमाणे आता उन्हही कमी झालेले आहे. महाराजांनी विचारले.
हो चालेल! मी ही घरात सांगुन येतोच, आपण व्हा पुढे! आपल्या पाठोपाठ मी मारुति मंदिरात येतो.
***********


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा