१५
आज
अक्षय तृतीया! सकाळपासुनच सोमजाई मंदिराच्या परिसरामध्ये धावपळ दिसत होती. रोजची सकाळची उपासना पूर्ण झाल्यावर महाराजांनी
मंदिराच्या प्रांगणाच्या कडेला परंतु मंदिराच्या अगदी नजिक जमिनीत आठ खड्डे खणले होते. त्यांना मदत करायला हेमंत आणि गणेश
आला होता. त्यांचे खड्डे खणून होईपर्यंत सरपंचानी पाठविलेली माणसे प्रसाद
बनविण्याकरिता लागणारे साहित्य घेऊन आले होते. त्यांनी मंदिराच्या मागच्या बाजुला
आडोसा तयार करुन चुली मांडुन ठेवल्या होत्या. त्या लोकांनीच येताना पिण्याचे पाणी
साठवण्याकरिता दोन मोठे मातीचे रांजण आणले होते. त्यांनी ते रांजण स्वच्छ करुन
त्यात पाणी भरुन ठेवले होते. हेरंब आणि जितूने मंदिराच्या सभामंडपाच्या
प्रांगणाच्या बाजुला लागुन असणा-या भागात मोठी सतरंजी अंथरुन तो भाग स्टेजसारखा
तयार केला होता.
आता तिन वाजले होते.
सोमजाई मंदिराच्या प्रांगणात आतापर्यंत बरीच लोकं जमा झाली होती. मंदिराच्या
सभामंडपाच्या बाजुला तयार केलेल्या स्टेजवर हंबीरराव, खेर्डीचे सरपंच श्री
दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे, शेळके गुरुजी, गोविंदराव
जोशी, दिनकरराव, महाराज यांच्याशिवाय हनुमानवाडी, खेर्डी आणि गोवेले ग्रामपंचायत
सदस्य बसले होते.
खाली
प्रांगणात एका बाजुला महिला वर्ग तर दुस-या बाजुला पुरुषवर्ग बसला होता. सर्व
मिळुन १००-१२५ लोकं उपस्थित होती. हजर असलेली सर्व लोकं सोमजाईची निस्सीम भक्त
होती. उपस्थितांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त होते. जमलेल्या लोकांना आजच्या या
विशेष सभेबद्दल खूप औत्सुक्य होते. कारण गेले ८-१० दिवस हनुमानवाडीतील लोकांनी
सगळ्या वाड्यांवर जाऊन सोमजाई भक्तांची भेट घेऊन वातावरण निर्मिती केली होती.
वृक्ष मंदिर संकल्पने बाबत सूतोवाच केले होते. त्यांच्या सोमजाईवरील श्रद्धेला
आवाहन केले होते.
सभेला
पुरेशी उपस्थिती झाली आहे. आता आणखी कोणी येण्याची शक्यता नाही याचा अंदाज आल्यावर सरपंच हंबीरराव बोलायला उभे
राहिले. राम राम मंडळी! येथे उपस्थित असलेल्या सर्व सोमजाई भक्तांचे हार्दिक स्वागत
करतो. मला माहित आहे आपल्याला सगळ्यांना आजच्या या सभेबद्दल खूपच उत्सुकता आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या गावात काही स्वाध्यायी मंडळी आली होती. ती लोक आपल्या
सर्व वाड्यांमध्ये देखिल आली होती. हे आपल्याला माहित आहेच.
हो! हो! माहित आहे आम्हाला! उन्हातान्हातून फिरत आमच्या वाडीवर
देखिल आले होते. येताना स्वत:ची शिदोरी देखील बरोबर घेऊन आले होते. अगदी देवमाणंस बघा! साधा चहा
देखिल घेतला नाही त्यांनी! देवाचे काही बाही सांगत होते. शेजारच्या उंबरवाडीतल्या
पार्वतीकाकूंनी आपला अनुभव सांगितला. त्या उंबरवाडीतील महिला मंडळाचे काम करतात.
हो! हो! तेच स्वाध्यायी! आमच्या गावातिल
मारुति मंदिरात त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्यांच्याच आग्रहावरुन आम्ही
गावातील काही माणसं त्यांच्या गोवेले येथिल भाव मिलन सोहळ्याला गेलो होतो. त्या
भावमिलन सोहळ्यामध्ये गुजराथमधिल डॉ. नवनीत शहा यांनी त्यांच्या गावाला चालू
असलेल्या वृक्ष मंदिराच्या प्रयोगाबाबत सांगितले. ते ऐकुन आम्ही खूप प्रभावित
झालो. तो प्रकल्प आपल्याकडे राबवता येईल काय या दृष्टीने आम्ही विचार सुरु केला.
त्याच संदर्भात आपल्या गोविंदरावांचा मुलगा गणेश तो वृक्ष मंदिराचा प्रयोग पहायला
थेट गुजराथ मध्ये जाऊन आला. त्याने सामाजिक वनिकरण या विषयामध्ये डीग्री घेतली
आहे. त्याच प्रमाणे त्याचा मित्र हेरंब याने देखिल शेतीशास्त्रा मध्ये डीग्री
घेतली आहे. या दोघांनीही या प्रकल्पाबाबत साकल्याने विचार करुन हा प्रकल्प
आपल्याकडे राबवता येईल याची खात्री दिली.
आपल्या दिनकररावांचे एक मित्र फॉरेस्टर आहेत
त्यांनी आपण आता जमलो आहोत हा देवीचा डोंगर या प्रकल्पाकरीता योग्य जागा आहे हे
सांगितले. माझ्या बालपणी हो डोगंर हिरवागार होता. त्यातिल झाडीमध्ये निरनिराळे
प्राणी पक्षी रहात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात त्या देवीच्या डोंगराला आपणच
उघडा बोडका करुन टाकलेला आहे. त्याचा परिणाम आता आपण भोगतो आहोतच. अनियमित पाऊस
आणि पाण्याचा दुष्काळ हा त्याचाच परिणाम आहे. वास्तविक ही देवीच्या डोंगराची जागा
आपण समजतो तशी सरकारी जागा नाही. तर आपल्या सावंतवाडीच्या राजांनी देवीच्या
दैनंदिन पूजेकरिता आणि उत्सवाच्या खर्चाकरीता आपल्या गोविंदरावांच्या पूर्वजांच्या
नावाने दान केलेली आहे. आम्ही विनंती करताच ही सर्व जागा गोविंदरावांनी आपल्याला
म्हणजेच “श्री
सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानला” वापरायला दिली आहे.
कालच आम्ही या “श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान” या संस्थेची स्थापना केली आहे. त्या
संस्थेचे अध्यक्षपद गोविंदरावांनी स्विकारले आहे. या संस्थेच्या विश्वस्त पदी
गोविंदरावांनी खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे, आणि खास महिला प्रतिनिधी म्हणून
उंबरवाडीतिल पार्वती काकूंचीही नेमणूक केली आहे. आपल्याला आता सोमजाईचे भक्त
म्हणून देवीच्या या डोंगराला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार आजच्या
अक्षय तृतियेच्या दिवशी करायचा आहे.
आता आपल्याला गुजराथ मध्ये जाऊन वृक्ष मंदिर
प्रत्यक्ष पाहून आलेला गणेश जोशी वृक्ष मंदिर म्हणजे काय? त्याचे पूजारी आपण कसे व्हायचे? आपल्या सर्वांची यात काय भूमिका राहिल
हे सर्व स्पष्ट करुन सांगेल. त्याच प्रमाणे आपल्या सर्व शंकांचे निरसन देखिल करेल.
आता गणेशने बोलायला सुरवात केली. सोमजाईच्या
सर्व भक्तांचे मी या देवीच्या भूमीवर स्वागत करतो. सर्व प्रथम इतके कडक उन असूनही
इतक्या मोठ्या संख्येने आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आलात त्यावद्दल धन्यवाद.
आताच सरपंचांनी सांगितले त्याप्रमाणे मी आणि सोमजाईचाच भक्त असणारा हनुमानवाडीचा
माझा मित्र पांडुरंग वृक्ष मंदिराला भेट द्यायला गुजरात मध्ये गेलो होतो.
तिथे आम्ही एक वेगळेच देऊळ पाहिले. त्या
देवळाला ना भिंत होती, ना छप्पर. तिथे कोणतीही मूर्ती बसवलेली नव्हती की घंटा
लावलेल्या असे विलक्षण मंदिर होते ते.
देवळात जर मूर्तीच नसेल तर त्याला देऊळ कसे
म्हणायचे?
गोवेल्याच्या विष्णू कांबळेनी विचारले.
कसं तेच मी आता सांगतोय! आपण पोथी पुराणांत वाचले आहे. नरसिंह
अवतारात एका निर्जीव खांबातुन देव बाहे पडला. तो निर्जीव खांब काय देव आहे कां!
देव सगळीकडे आहे. तो दगडांत आहे, सोन्यात आहे, रुप्यात आहे. आपण गाईला देव मानतो
म्हणजे गाईमध्ये देव आहे! म्हणजेच प्रत्येक वस्तूत देव आहे! बरोबर नां? गणेशने लोकांनाच प्रश्न विचारला.
बरोबरच आहे! आम्ही बायका तुळशीची पूजा करतो
म्हणजे तुळसही देवच आहे. तुळसाकाकू बोलल्या.
बरोबर आहे काकू तुमचे! गणेशने परत आपले बोलणे
चालू केले. आपण वड पोर्णिमेला वडाची पूजा करतो. शनिवारी पिंपळाची पूजा करतो.
उंबराला आपण दत्तस्थान म्हणून पूजतो. अशा अनेक प्रकारच्या झाडांमध्ये आपण देव
पहातो. त्याची भक्ती करतो पूजा करतो. बरोबर आहे नां मंडळी. त्यावर सगळ्यांनी
कोरसमध्ये होकार दिला.
तर त्या वृक्ष मंदिरात मी नेमके हेच पाहिले.
आपल्या देवीच्या या डोंगरा सारखाच डोंगर तिथे आहे. त्या सर्व जागेवर आखिव रेखीव
पद्धतीने वृक्षाची लागवड केलेली आहे. एक एक स्वाध्यायीनी एक एक झाड पूजेकरिता स्विकारले आहे. त्या रम्य
परिसरांत सर्वत्र एक वेगळेच पावित्र्य भरलेले आहे. मोर, हरणे मुक्त पणाने कोणालाही
न घाबरते तिथे फिरत होती. देवळाच्या घंटेच्या मधुर नादासारखा तेथे अनेक प्रकारचे
पक्ष्यांचे आवाज तिथे ऐकू येत होते. तर अशाचप्रकारचे वृक्ष मंदिर या आपल्या
देवीच्या डोंगरावर निर्माण करायचा आम्ही संकल्प केला आहे. त्याला आपल्या सर्वांची
साथ हवी आहे. आपण आम्हाला आपली साथ देणार नां? गणेशने सर्वांना साद घालत विचारले.
होSSSS! आम्ही नक्की साथ देऊ! पण त्या पूर्वी
आमच्या काही शंका आहेत. खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत
बोलले.
काका, आपल्या कोणत्याही शंकेचे आम्ही निरसन
करायचा प्रयत्न करु! विचारा आपली काय शंका आहे ती. गणेशने शंका निरसन करण्याची
तयारी दाखवली.
यात आम्ही नेमके काय करायचे? या सर्व गोष्टीकरिता किती वेळ द्यावा
लागेल?
आम्हाला काही पैसे खर्च करावे लागतिल कां? आपण म्हणता ती पूजा कशी करायची? सरपंच सावंतांनी आपल्या शंका
विचारल्या.
आपल्या शंकांचे उत्तर देण्यापूर्वी आपण या
जागेत नेमके काय करणार आहोत ते आधी सांगतो. आपण आत्ता पहात आहात हा डोंगर उघडा
बोडका झालेला आहे. त्यावरील जागा ही कुठे खड्डे तर कुठे टेकाडं अशा स्वरुपात आहे.
आता चैत्रमहिना चालू आहे. तरीही आपल्या या पोखरणी मध्ये एवढ्या उंचीवर असून देखिल आत्ता
भरपुर पाणी आहे. त्याच प्रमाणे आजु बाजुला देखिल ब-याच ठिकाणी ओलावा आहे. तेव्हा
आपण या जागेला लागवड करण्यायोग्य असे उतारात मोठे मोठे प्लॉट करणार आहोत.
त्याकरिता आपल्याला माती आणि दगड लागतिल ते मिळविण्याकरिता आणि भविष्यात आपली
पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकरिता एक विस्तिर्ण पाझर तलाव तयार करणार आहोत.
त्या पाझर तलावामुळे आजुबाजुच्या सर्व विहीरींची आणि तळ्यांच्या पाणी पातळीत वाढ
होईल.
हा झाला प्राथमिक भाग. त्यानंतर लागवडी साठी
आवश्यक असणारे बालतरु म्हणजेच रोपे एकतर येथेच तयार करायची आहेत, किंवा जिथे
उपलब्ध होतील तिथुन आणायची आहेत. ती रोपे लावण्याकरीता खड्डे खणून तयार ठेवायचे
आहेत. पावसाळा सुरु झाला की चांगला मूहूर्त पाहुन आपल्याला लागवड करायची आहे. पुढे
प्रत्येक भक्ताला रोपे वाटुन दिली जातिल. त्या रोपांची काळजी त्या भक्ताने घ्यायची
आहे. आपण लागवड करित असलेल्या रोपाला ईश्वर मानुन त्याची पूजा करायची आहे.
आपण सर्व सोमजाईचे भक्त आहोत. आपण येथे करित
असलेले प्रत्येक काम हे तिची सेवा म्हणून करायचे आहे. त्या भावनेने हे काम
केल्याने ते देवीला पोचेल. आता आपले प्रश्नांची उत्तरे बघुयात.
आपला
पहिला प्रश्न आहे. आपल्याला नेमके काय करायचे आहे? तर याचे उत्तर असे आहे आपणच देवीला
कोणती सेवा देऊ शकतो याचा विचार स्वत:च करायचा. आपल्या प्रकृतिला झेपेल ते
आणि तेवढे आपण देवीला अर्पण करायचे. आपण या ठिकाणी जी कामे करणार आहोत त्यात आपला
सहभाग द्यायचा. मग तो जमिन लेव्हल करण्याचा असूदे, तलाव खोदण्याचा असूदे, खड्डे
खणण्याचा असूदे किंवा रोपे तयार करण्यापासुन रोपे वाढवण्या पर्यंत प्रत्येक कामात
सेवा म्हणून आपला सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे.
आता दुसरा प्रश्न आहे, किती वेळ द्यायचा? या प्रश्नाचे उत्तर मी जरा सविस्तर
देतो. आपण एकादशीचा उपवास करतो. म्हणजे काय करतो फक्त खाण्या पिण्यात वेगळे पदार्थ
सेवन करतो. स्वाध्याय परिवारात एकादशीची व्याख्या वेगळी आहे. महिन्यातुन येणारे हे
दोन दिवस आपल्या प्रपंचाला न देता ते परमेश्वराला द्यायचे. म्हणजे वर्षभरातले
चोवीस दिवस आपण भगवंताची सेवा करायची. तेव्हा हे एकादशी व्रत आचरायचे. आपण
आपल्याला शक्य असेल तेवढा वेळ सोमजाईकरिता द्यायचा. तिची सेवा म्हणून आपल्या
प्रकृतीला झेपेल त्या कामात आपला सहभाग द्यायचा. कोणाला आठवड्यांतुन एक दिवस देता
येईल तर कोणाला महिन्यांतुन एक दिवस देता येईल. एखाद्याला दररोज काही तास आपली
सेवा देता येईल.
आपण सर्व सोमजाईचे भक्त आहोत. शुक्रवाराला
आपण देवीचा वार मानतो. त्या दिवशी आपण देवीच्या नावाने उपवास करतो. हा उपवास
म्हणजे काय? फक्त
आहारात बदल म्हणजे उपवास होतो कां? असे कसे असेल? तेव्हा उपवास म्हणजे देवीच्या साठी
काही काम करणे!
तिच्या सान्निध्यात रहाणे म्हणजे उपवास! ! महिन्यांतुन चार किंवा पाच शुक्रवार
येतात. आपण जर सोमजाईच्या नावाने हे चार पांच दिवस देवीच्या या वृक्ष मंदिरात आपली
सेवा दिली तरी खूप झाले.
आता आपला पुढचा प्रश्न आपल्याला काही पैसे
खर्च करावे लागतिल का? हा सहभाग ऐच्छीक आहे. जर कोणाला शक्य असेल तर तर तो पैशाच्या रुपात,
वस्तूच्या रुपात आपला सहभाग देऊ शकतो. सध्यातरी आवश्यक तेवढी आर्थिक मदत देणारा
सोमजाईचा भक्त आपल्याला मिळाला आहे. तरीही कोणी ती बाजू सावरणार असेल तर त्याचे
स्वागतच असेल. मात्र मी देणगी दिली म्हणून
माझ्या नावाचा बोर्ड लावा अशी अट असेल तर अशी मदत आपल्याला नको. आपल्याला या
प्रकल्पासाठी आर्थिक मदत करण्या-याने माझे नांव कुठे येऊ द्यायचे नाही या अटीवरच
मदत दिली आहे.
आपला शेवटचा प्रश्न असा आहे आपण म्हणता ती पूजा कशी करायची? याचे उत्तर असे आहे. आपण देवाची पूजा
कशी करतो त्याला न्हाऊ घालतो, त्याला निरनिराळे उपचार अर्पण करतो. त्याला आवडते ते
ते त्याला अर्पण करतो. आपल्या या मंदिरातला देव आहे बालतरु. त्या बालतरुचे संगोपन
करायचे, संरक्षण करायचे, त्याला पोषक आहार द्यायचा, त्याचे लाड करायचे हीच आपली
पूजा. भगवान श्रीकृष्णांनी गीते मध्ये सांगितले आहे मी सर्व जींवांच्या ठिकाणी आहे.
त्यामुळे आपण झाडामध्ये असणाऱ्या त्या भगवंताची पूजा करुया. आपण केलेल्या या
सेवेने आई सोमजाई आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपली, आपल्या परिसराची, आपल्या
पर्यावराणाची भरभराट करेल. एवढे बोलुन मी आपली रजा घेतो. आपल्या अजुनही काही शंका
असल्यास नि:संकोचपणाने
विचारा.
आता आपल्याला आमच्या गावातिल महाराज चार शब्द
सांगतिल. आमच्या या निर्णय प्रक्रियेत त्यांचाही मोठा सहभाग आहे. अतिशय निरीच्छ
असणारी ही व्यक्ती योगायोगाने आपल्याला लाभलेली आहे. तेव्हा महाराज आपण आता
आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती. सरपंचांनी महाराजांना विनंती केली.
हंबीररावांच्या विनंतीला मान देऊन महाराज उभे
राहीले. सोमजाईला नमस्कार करुन त्यांनी तिचे ध्यान केले आणि बोलायला सुरवात केली.
आई सोमजाईच्या सर्व उपासकांना माझा दंडवत. मी
कोणी महाराज वगैरे कोणी नाही परंतु माझ्या
नकळत मला न आवडणारी ही उपाधी मला चिकटली आहे. गेले काही दिवस मी अनेक गावे भटकत
भटकत या गावात आलो. आपल्या लोकांनी घातलेल्या भिक्षेवर जगणारा मी आपल्याला काय
मार्गदर्शन करणार पण आता सरपंचांना मी नाही म्हणू शकत नाही.
असो.
मी आताच सांगितल्या प्रमाणे माझी गेले अनेक दिवस भटकंती चालू आहे. या ठिकाणी आहे
तशीच परिस्थिती जवळपास सगळीकडे दिसते आहे. दिवसें दिवस हवेतील उष्णता वाढत चालली आहे.
प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. सगळीकडे उघडे बोडके डोंगर. या गावातल्या
जुन्या लोकांनी मला सांगितले हा देवीचा डोंगर एके काळी हिरवागार होता. त्यामध्ये
अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी रहात होते. आज काय परिस्थिती आहे? सगळीकडे रखरखाट आहे. देवीचा डोंगर चढताना दम लागल्यावर बसायचे म्हटले
तर सावली नाही. पूर्वी माकडांचे दर्शन गावात कधी व्हायचे नाही. परंतु रानात खायला
नाही म्हणून त्यांना माणसाच्या वस्तीमध्ये अतिक्रमण करावे लागले.
पण हे सगळे का झाले? कसे झाले? याला जबाबदार कोण आहे? सरकार का देवी? पाण्याचा दुष्काळ झाला. पावसाचे
प्रमाण कमी झाले. जनावरांना खायला चारा नाही. या सगळ्या प्रश्नांना काही उत्तर आहे
कां? या
सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे! पूर्वी एक प्रश्नांची मालीका विचारली जायची. घोडा का अडला? भाकरी का करपली? असे प्रश्न त्याचे एकच उत्तर होते न
फिरवल्या मुळे! त्याचप्रमाणे आपल्याला सध्या सतावणा-या या सर्व गंभीर प्रश्नांचे
उत्तर एकच आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्या मुळे.
पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याला कारण आपणचे
आहोत. आपण काय करतो! चुलीला जळवण पाहीजे, तोड झाड. घर बांधायचय, तोड झाडं. फर्निचर
करायचय तोड झाड. रस्ता बांधायचाय, निरनिराळे प्रकल्प उभे करायचेत लाव झाडाला
कु-हाड. पूर्वीपण लोक झाड तोडायचे पण त्या एका झाडाच्या बदल्यात बागा उभ्या
करायचे. तात्पर्य काय आता आपल्याला सोमजाईने जागे केले आहे. तेव्हा या संधीचा
फायदा घ्या. देवीचा डोंगर तर हिरवा कराच, पण आपल्या परसात, रस्त्याच्या कडेला जिथे
मोकळी जागा मिळेल तिथे झाडे लावा आणि ती जगवा. त्यानंतर देवीचा प्रसाद आपोआपच
मिळेल. आई सोमजाई आपल्या सर्वांना सुबुद्धी देवो आपले कल्याण करो हीच तिच्या चरणी
प्रार्थना करुन माझे चार शब्द पुरे करतो. काही कमी अधिक बोललो असेन तर माफ करा.
आता आपले गोविंदराव जोशी चार शब्द सांगतिल.
सरपंचांनी जाहिर केले.
त्यानंतर
गोविंदरावांनी उभे राहून देवीचे आशिर्वाद घेऊन बोलायला सुरवात केली. आई सोमजाईच्या
भक्तगणांना माझा नमस्कार. मी या देवीचा आपल्या प्रमाणेच एक अज्ञानी भक्त आहे. आता
महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे या डोंगराची दुर्दशा होण्याला मी देखिल तेवढाच
जबाबदार आहे. आता आपण येथे एक यज्ञ करत आहोत. त्या मध्ये प्रत्येकाने आपली समिधा
अर्पण करावी असे मी आपल्याला आवाहन करतो.
ही
एवढी मोठी जागा देवीची आहे आणि मी तिचा विश्वस्त आहे ही गोष्टच आठ पंधरा
दिवसापूर्वीपर्यंत मला माहीत नव्हती. आपल्या प्रमाणे मीही ही रिकामी जागा सरकारी
आहे असे समजत होतो. माझे वडिल माझ्या लहानपणीच वारले. माझ्या विधवा आत्याने मला
वाढविले त्यामुळे या विश्वस्तपणाची परंपरा मला ज्ञात नव्हती. काही दिवसापुर्वी
वृक्ष मंदिराची कल्पना निघाल्यामुळे आमच्या पूजेत असलेल्या पेटीतील ताम्रपट
वाचण्याची बुद्धी देवीने आम्हाला दिली.
त्या
ताम्रपटात असलेल्या उल्लेखानुसार आमचे घराणे या जागेचे फक्त विश्वस्त आहे. या
जमिनीचा उपयोग देवीच्या पूजेकरीता, उत्सवाकरीता आणि देवीच्या भक्तांच्या
कल्याणाकरिता करायचा आहे. त्यामुळे ही जमिन वापरायला परवानगी दिली म्हणजे मी काही
विशेष केलेले नाही. फक्त तीचा दुरुपयोग होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया.
आपली सभा संपल्यानंतर येथे सर्वांना देवीचा प्रसाद देण्यांत येणार आहे तो घेऊनच
सर्वांनी परत जावे ही विनंती आहे.
आता
शेळके गुरुजी पुढील नियोजन काय आहे ते सांगतिल. हंबीररावांनी परत सूत्र आपल्या
हाती घेत जाहीर केले.
लगेचच शेळके गुरुजी उभे राहीले त्यांनी
देवीभक्तांचे स्वागत करुन थेट विषयाला हात घातला. ते म्हणाले, तर मंडळी आता मला
सांगा आपला काय विचार ठरलाय? कोण कोण या वृक्ष मंदिराचे पूजारी होणार आहे?
गुरुजींनी
विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून जवळ जवळ सर्वांनीच आपला हात वर करुन आपली
संमती दर्शवली.
जे
कोणी यामध्ये आपला सहभाग देऊ इच्छीतात त्यांनी आपली नांवे सभा संपल्याबरोबर आमचा
एक सहकारी हेरंब याच्याकडे नोंदवावित. ती नोंदवताना आपण आपला किती वेळ देऊ शकाल
तेही सांगावे म्हणजे त्या प्रमाणे नियोजन करता येईल. सुरवातिला आपल्याला जास्त काम
आहे परंतु एकदा आपली लागवड झाली की फक्त देखभालीचीच सेवा आपल्याला करायची आहे. एक
गोष्ट मी येथे स्पष्ट करतो की येथे जे कोणी सेवेला येतिल त्यांनी आपला दुपारचा जेवणाचा
डबा आणण्याची आवश्यकता नाही. देवीचा महाप्रसाद त्यांना दुपारी देण्यांत येणार आहे.
आपण उद्या पासुनच आपल्या कामाला सुरवात करीत आहोत. तेव्हा जास्तित जास्त भक्तांनी
सहभाग नोंदवावा ही विनंती आहे. पहिले दोन दिवस ज्यांना शक्य होईल त्यांनी आपली
अवजारे आणावित त्यानंतर आपण ती खरेदीच करुन टाकु.
आता
आपण आपल्या विश्वस्तांच्या हस्ते देवीला प्रिय असणाऱ्या फुलझाडांची नऊ रोपे
देवीच्या परिसरात लावुन आपल्या श्री सोमजाई वृक्षमंदिर संस्थानच्या कार्यास
प्रारंभ करणार आहोत. ही एकप्रकारे आपण नवदुर्गांची स्थापनाच करीत आहोत. तेव्हा आता
आपण आहोत त्या जागेवरच बसुन हा वृक्षारोपण सोहळा बघुया.
मी
सर्वप्रथम गोविंदरावांना विनंती करतो की त्यांनी येथे असलेले सोनचाफ्याच्या
वृक्षाचे पहिल्या खड्यात रोपण करुन आपल्या या शुभ कार्याचा शुभारंभ करावा.
वृक्षारोपण झाले की आपण सगळे आई सोमजाईची उदो उदो अशी मोठ्याने गर्जना करुन तीचा
जागर करुया.
त्यानंतर
गोविंदरावांनी आपल्या दोन्ही हातात सोन चाफ्याचे बालतरु घेऊन पुढील ध्यानमंत्र
म्हणून त्रिगुणात्मक सोमजाईचे ध्यान केले.
खड्गं
चक्र गदेषु चाप परिघान् छूलं भुशुंडीं शिरः।
शंखं
संदधतीं करैस्ञिनयनां सर्वांग भूषावृतिम्।।
नीलाश्म
द्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकाम्।
याम्स्तौत्
स्वपिते हरौ कमलजो हंतुं मधुं कैटभम्।।1।।
अक्षस्रक
परशू गदेषु कुलिशं पद्मं धनुः कुंडिकां।
दण्डं
शक्तिमसिं च चर्म जलजं घंटां सुराभाजनम्।।
शूलं
पाश सुदर्शनेच दधतीं हस्तैः प्रवालप्रभाम्।
सेवे
सैरिभ मर्दिनी मिह महालक्ष्मीं सरोजस्थितिम्।।2।।
घंटाशूल
हलानि शंख मुसले चक्रं धनुः सायकम्।
हस्ताब्जैरदधतीं
धनांत विलसच्छीतांशु तुल्यप्रभाम्।
गौरीदेह
समुद्भवां ञिजगतां आधारभूतां महा
पूर्वामञ
सरस्वती मनुभजे शुंभादि दैत्यार्दिनीम्।।3।।
त्यानंतर
त्यांनी त्या बालतरुचे रोपण केले, त्याला जलसंजीवन दिले. त्यानंतर सर्वांनी
ठरल्याप्रमाणे आई सोमजाईचा उदोSSउदो म्हणून गर्जना केली. त्यानंतर हंबीररावांनी मोग-याच्या, शेळके
गुरुजींनी जाईच्या, दिनकररावांनी जुईच्या, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत
यांनी शेवंतीच्या, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे यांनी तुळशीच्या, हेमंतने
जास्वंदीच्या, गणेशने चाफ्याच्या आणि हंबीररावांच्या खास आग्रहाखातर महाराजांनी
जास्वंदीच्या बालतरुंचे रोपण केले. प्रत्येक खेपेला आई सोमजाईचा जागर केला गेला.
वृक्ष
मंदिराच्या शुभकार्याचा रितसर प्रारंभ केल्यानंतर सर्वांनी मिळुन आई सोमजाईची
महाआरती केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला द्रोणातुन देवीचा प्रसाद म्हणून
शिरा देण्यांत आला त्यानंतर कोकम सरबतही देण्यांत आले.
एकीकडे
प्रसाद आणि सरबताचे वाटप चालू असतानाचे दुसरीकडे हेरंब आणि हेमंत दोघेजण एक
रजिस्टर घेऊन सहभागी होऊ इच्छीणा-या भक्तांची नांवे नोंदवत होते. हेमंत
प्रत्येकाला विचारुन तो नक्की किती वेळ देऊ शकेल याची खात्री करुन घेत होता.
तासाभरात
बाहेरगावाहून आलेली सर्व लोक निघुन गेली. मोजकीच लोक पुढील नियोजना करिता थांबली
होती. प्रत्येकाला कामे वाटुन दिली जात होती. संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही गडबड
चालू होती. उद्या पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार होती. सरते शेवटी सगळे गेले
देवीजवळ फक्त महाराज राहिले.
रोजच्या
प्रथे प्रमाणे महाराजांनी देवीजवळ दिवा लावला. त्यानंतर त्यांनी सभामंडपात बसुन
आपला दैनंदिन सायंप्रार्थना आणि दासबोध वाचनाचा कार्यक्रम सुरु केला.
***************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा