बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग १७

१७
संध्याकाळचे सात वाजले होते. सोमजाई मंदिराच्या सभामंडपामध्ये नवीनच बसवलेल्या एल्. ई. डी. दिव्यांचा प्रकाश पसरलेला होता. मंदिरात येण्याचा रस्ताही अशाच  एल्. ई. डी. दिव्यांच्या प्रकाशात उजळला होता. रस्त्याच्या दुतर्फा नवीनच लावलेल्या रोपांनी आता बाळसे धरलेले दिसत होते. सभामंडपामध्ये सतरंजीवर गोविंदराव, हंबीरराव, शेळके गुरुजी, दिनकरराव, फॉरेस्टर श्री मारुति माने, हेरंब, खेर्डीचे सरपंच श्री दत्तात्रेय सावंत, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे, मारुती माने, जितेंद्र, गणेश आणि हेमंत ही सगळी वृक्ष मंदिराची विश्वस्थ आणि संचालक मंडळी बसली होती. दर पंधरा दिवसांनी ही लोक कामाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढिल योजना ठरविण्यासाठी संध्याकाळी देवीच्या आरतिच्या वेळी जमत असत. आजही त्याप्रमाणेच ही मंडळी जमली होती.
सर्वप्रथम हेमंतने झालेल्या कामांचा अहवाल द्यायला सुरवात केली. तो म्हणाला आतापर्यंत आपले सौरशक्ती पॅनेल आणि पवनचक्कीचे काम पूर्ण झाले आहे. आपण ठरविल्याप्रमाणे मंदिराच्या पूर्ण रस्त्याच्या आणि मंदिराच्या परिसरातील पथदिपांचेही काम पूर्ण झाले आहे. आपल्या कार्यालय आणि मंदिरातिल इलेक्ट्रीक वायरींगचेही काम बरेचसे पूर्ण झाले आहे. अजुन प्रसाद बनविण्याच्या पाकगृहाचे थोडे वायरींग बाकी आहे पण ते दोन दिवसांत पूर्ण होईल.
आपण ठरविल्या प्रमाणे दोन हजार बालतरुंच्या रोपणाकरिता खड्डे खणण्याचे काम जोरात सुरु आहे. आतापर्यंत अठराशे खड्डे पूर्ण झाले आहेत. दोनशे खड्डे येत्या पाच सहा दिवसात पूर्ण होतील. या खड्यांमध्ये रोपण करण्याकरिता बालतरुंची आपण निरनिराळ्या ठिकाणी ऑर्डर दिली आहे. त्याचा तपशिल जितू देईल.
आपण आपल्याच देवी भक्तांकडुन एक हजार बालतरु घेणार आहोत. त्या मध्ये मुख्यत: आंब्याची आणि काजुची कलमे आपण घेणार आहोत. याशिवाय जांभुळ पांचशे, औषधी वृक्षांची पाचशे बालतरु आपण निरनिराळ्या नर्सरी मधुन खरेदी करणार आहोत. हे सर्व बालतरु येत्या चार पांच दिवसात आपल्या ताब्यात येतिल. जितूने सांगितले.
सगळ्यांना आपण योग्य मोबदला देत आहोत नां? हंबिररावांनी विचारले.
हो! आपण बाजारभावाप्रमाणे रक्कम अदा केली आहे! जितूने उत्तर दिले.
अवजारे पुरेशी खरेदी केली आहेत नां? त्याची कमतरता पडायला नको! मानेसाहेब आपण आखुन दिलेल्या पद्धतीने सगळे व्यवस्थित चालले आहे नां? दिनकररावांनी शंका उपस्थित केली.
अवजारे पुरेशी आहेत आणि कामही ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे व्यवस्थित चालू आहे. उलट माझ्या अपेक्षेपेक्षा कामाची गती खूपच जास्त आहे. मात्र पावसाळा संपल्यावर आपल्याला पाईपलाईन टाकुन पाझर तलावातिल पाणी वरती टाकी बांधुन किंवा तयार प्लॅस्टीक टाक्या बसवनुन चढवावे लागेल म्हणजे सर्व झाडांना व्यवस्थित पाणी देता येईल. मानेसाहेबांनी सांगितले.
टाक्या, पाईप, मोटार वगैरे सामान थेट मुंबईहूनच मागवावे म्हणजे चांगले होईल. नाहितर कोल्हापुरहून सुद्धा चालेल. नारायण शिंदे यांनी आपले मत दिले.
या दोन हजार बालतरुंचे रोपण कधी पर्यंत पूर्ण होईल? त्यानंतर आपण किती लागवड करु शकतो? गोविंदरावांनी विचारले.
आपली ही दोन हजार झाडे जुलै अखेर पर्यंत लावुन पूर्ण होतील. त्यानंतर महिन्याभरात ती व्यवस्थित जीव धरतिल असे वाटते. गणेशने सांगितले.
आतापर्यंत आपण जवळपास सातशे झाडे लावली आहेत. ही दोन हजार म्हणजे सरासरी तिन हजार होतील. आपण या पूर्ण जागेत सात ते साडेसात हजार झाडे लावु शकतो. म्हणजे त्यांना वाढायला पुरेशी जागा मिळेल. म्हणजेच आपण अजुन साडे चार हजार झाडे लावु शकतो. व्यवस्थित हिशेब करुन हेरंबने उत्तर दिले.
बरोबर आहे हेरंबने सांगितले ते! माने साहेबांनी हेरंबला दुजोरा दिला.
आपल्या कामाच्या आजच्या गतीने पूर्ण डोंगर हिरवा करायला आणि या आपल्या कामातुन काही उत्पन्न सुरु व्हायला किती कालावधी लागेल? आपण सध्या नुसता खर्चच करतो आहोत. आपल्याकडे दाता आहे म्हणून त्याचा आपण गैरफायदा घेतो असे व्हायला नको! हंबीररावांनी चर्चेला व्यावहारीक पातळीवर आणले.
आपल्याला जर आपला खर्च या लागवडीतुनच काढायचा असेल तर नगदी आणि कमी कालावधीत उत्पन्न देणारी झाडे लावायला लागतिल. गणेशने सांगितले. याकरिता आपण शेवगा, अननस लागलेचतर आपण अगदी भातासारखे पीक सुद्धा आता थोड्याफार प्रमाणात घेऊ शकतो.
कोणती झाडे लावायची याचा विचार गणेश, हेरंब आणि माने साहेब आपण तिघांनी मिळुन घ्यावा. मात्र आपल्याला शक्यतो लवकर आपला दैनंदिन खर्च भागु शकेल एवढे उत्पन्न होईल अशी योजनाही करायला हवी. आपण भांडवली रक्कम दानाच्या स्वरुपात घेतली इथपर्यंत ठिक आहे. परंतु आपला दैनंदिन खर्च आपणच भागवायला हवा असे मला वाटते. हंबीररावांनी आपले मत दिले.
पुढल्या अक्षय तृतियेला आपण आपले नियमित उत्पन्न चालू केलेले असेल याची ग्वाही आम्ही देतो. आम्ही त्यादृष्टीने नियोजन करु. हेरंब आणि गणेशने एकदम सांगितले.
अशाप्रकारे भविष्यातिल नियोजन करुन आजची बैठक बरखास्त करण्यांत आली. त्यानंतर आरती होऊन सर्व मंडळी आपापल्या घरी निघुन गेली.

************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा