बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग १८

१८
रोजच्या सवयी प्रमाणे महाराज पहाटे साडे तिन वाजता उठले. आपले दैनंदिन प्रात:स्मरण स्नान वगैर उरकल्यावर त्यांनी नित्याप्रमाणे आजुबाजुला फिरुन १०-१२ प्रकारची फुले गोळा केली. सोमजाईची पंचोपचारी पूजा केली. त्यांच्या पुजेला मोरांच्या केकांची साथ होती. आतापर्यंत सहा वाजले होते. चैत्र महिना असल्याने चांगले फटफटीत उजाडले होते. देवळाजवळ असलेल्या नळाला पाईप जोडुन नित्याप्रमाणे त्यांनी तेथिल फुलझाडांना पाणी घालणे सुरु केले.
            महाराज पाईपने फुलझाडांना पाणी घालत असतानाच त्यांना मंदिराकडे येणारे हंबीरराव आणि शेळके गुरुजी दिसले. दोघेजण मंदिरापाशी पोचेपर्यंत महाराज त्यांना सामोरे गेले. त्यांनी गुरुजींना विचारले, नमस्कार गुरुजी! आज सकाळीच कसे काय?
            काही विशेष नाही! रोजच्या सवयी प्रमाणे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो होतो. वाटेत हंबीरराव भेटले ते म्हणाले चला आज सोमजाई मंदिरात जाऊ. म्हणून आलो झाले. हंबीररावांचाही काही खास उद्देश असेल असे वाटत नाही. शेळके गुरुजी म्हणाले. त्यानंतर ते आणि हंबीरराव दोघेही सोमजाईच्या दर्शनाला गेले.
काल रात्री महाराजांनी दासबोधा मधला महंत लक्षण हा समास वाचला. त्या समासातल्या पुढिल ओव्या त्यांच्या समोर सारख्या फेर धरुन नाचत होत्या.
जयास येत्नचि आवडे| नाना प्रसंगीं पवाडे |
धीटपणें प्रगटे दडे| ऐसा नव्हे ||१२|| श्रीराम ||
सांकडीमधें वर्तों जाणे| उपाधीमधें मिळों जाणे |
अलिप्तपणें राखों जाणे| आपणासी ||१३|| श्रीराम ||
आहे तरी सर्वां ठाईं| पाहों जातां कोठेंचि नाहीं |
जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाईं| गुप्त जाला ||१४|| श्रीराम ||
त्तेव्हापासुन त्यांचे सतत विचार चक्र सुरु झाले होते. आपण या गावात आलो त्याला आता तीन वर्षे होऊन गेली. आपण सज्जनगड सोडताना समर्थांच्या समाधीसमोर जो निश्चय केला तो आपण पाळतोय कां? आपण तर या गावाच्या लोभात अडकतच चाललोय. आपण सोमजाई समोर सगळ्यांना काय वचन दिले आहे ते आता ते आठवु लागले. आपण खरोखरच अलिप्तपणाने येथे राहिलो आहोत कां? का आपल्यालाच हे महाराजपण आवडु लागले आहे? आपल्याला जे कार्य येथे व्हावेसे वाटत होते ते आता मार्गी लागले आहे. ज्या चौघा दुर्लक्षीत मुलांचे आयुष्य मार्गी लागावे ही आपली अंतर्यामी इच्छा होती ती आता जवळपास पुरी झाली आहे. वृक्ष मंदिराचा प्रकल्पही आता जवळपास पूर्ण झाला आहे. दोन दिवसांनी अक्षय तृतियेला हा प्रकल्प सुरु केल्याला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. तो समारंभ झाला की गुपचुप येथुन प्रस्थान करावे हे बरे. जर याची वाच्यता केली तर कोणी आपल्याला जाऊन देणार नाही. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर हा गाव सोडण्याचा निश्चय झाल्यावर त्यांच्या मनाला समाधान वाटले. एकीकडे डोक्यात विचार चालू असताना ते फुलझाडांना पाणी घालण्याचे कामही करित होते. तेवढ्यात त्यांच्या बाजुला सरपंच येऊन उभे राहीले. परंतु महाराजांच्या काही ते लक्षात आले नाही.
महाराज! आज कुठल्या विचारात गढले आहात? हंबिररावांनी त्यांच्या खांद्याला हात लावत विचारले.
नाही काही विशेष नाही! पण गुरुजी कुठे गेले आहेत? महाराजांनी विचारले. त्यानंतर ते हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव! मनात विचार चालू होता की, आता आपला वृक्ष मंदिराचा प्रकल्प मार्गी लागला. आपण नियोजित वृक्ष मंदिराचे जे स्वप्न बघितले होते ते आता प्रत्यक्षात उतरलेले दिसत आहे. मी आई सोमजाईच्या साक्षीने जे वचन आपल्याला दिले होते ते आता पूर्ण झाले आहे.
महाराज मलाही एक मनावरचे ओझे हलके करावे असे वाटते. मी आपल्याला एक वचन दिले होते. त्या वचनांतुन आपण मला मुक्त करावे ही आपल्याला प्रार्थना आहे. हंबीररावांनी महाराजांना विनंती केली.
कसले वचन हंबीरराव? महाराजांनी विचारले.
कसले काय विचारता महाराज. आपण या गावात आलेत त्याच्या दुस-याच दिवशी तुम्ही मला आपली खरी ओळख सांगितलीत. त्यानंतर जेव्हा वृक्ष मंदिर ही संकल्पना जेव्हा प्रत्यक्षात आणायचा विचार झाला तेव्हा आपण या प्रकल्पाच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिलात. आतापर्यंत जवळपास अठरा लाख रुपये आपण या प्रकल्पाला दिलेत. या गोष्टीची मला सोडुन कोणालाच माहिती नाही. आपले नांव गुप्त ठेवावे असे आपण माझ्या कडुन वचन घेतलेत. त्या वचनाचाच मला हल्ली रोज त्रास होतोय.
अहो हजारभर रुपये कोणी दान दिले तर तो आपल्या नांवाची पाटी लावायला पाहिजे ही अट घालतोय. त्या पार्श्वभूमीवर आपण आपले नांव लपवुन ठेवताय हे मनाला पटत नाही. शिवाय आपला उद्देश आपल्या गावाचा आणि आपल्या कुंटुंबातिल व्यक्तींचे स्मारक असावे हा होता. तर त्यांची नावे तरी जाहिर व्हायला पाहिजेत असे मला वाटते. तेव्हा आज रात्री होणा-या विश्वस्थांच्या बैठकीत मला आपले नांव जाहिर करण्याची मला परवानगी द्यावी हा माझा आपल्याजवळ हट्ट आहे.
महाराजांनी क्षणभर मनाशी विचार केला. नाहीतरी उद्या आपल्याला हे स्थान सोडुन जायचे आहेच. तेव्हा नांव जाहिर झाले तरी काही फरक पडणार नाही. आपण या जागेपासुन खूप लांब जाऊयात म्हणजे झाले. प्रत्यक्षात ते हंबिररावांना बोलले, हंबीरराव तुम्ही मला अडचणीत टाकलेत. बर ठिक आहे उद्याच्या कार्यक्रमांत माझे नांव जाहिर करा. पण कुठेही ही गोष्ट कागदावर यायला नको.  कोठेही माझ्या नावाचा बोर्ड लावायचा नाही. म्हणजे उद्याच्या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी लोक ही गोष्ट विसरुन जातील. लोकांच्या मनांत माझे नांव न रहाता श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान हेच नांव लक्षांत रहायला हवे.
चालेल महाराज आपण माझ्या मनावरचे फार मोठे ओझे हलके केलेत. हंबिरराव आनंदाने बोलले.
***********
देवीच्या डोंगरावरील दैनंदिन कार्यक्रमाला आता सुरवात झाली होती. दररोज कढीपत्ता, भाजीपाला, शेवग्याच्या शेंगा, फळभाज्या घेऊन जाणारा श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचा  टेंपो भरुन कोल्हापुरला जायला निघाला. निरनिराळ्या प्लॉटमध्ये जाणा-या ठिबक सिंचनाच्या पाईपलाईनचे व्हॉल्ह चालू करणारे सेवेकरी आले व त्यांनी आपले काम सुरु केले.
आतापर्यंत डोंगराचा सर्वभाग लागवडीखाली आला होता. साधारण आठ हजार लहानमोठी झाडे लावण्यांत आली होती. त्या मध्ये आवळा, हरडा, बेहडा, दशमुळामधिल सर्व वनस्पती, आंबा, चिंच, जांभुळ, अगस्ती, कडुनिंब, कढीपत्ता, नारळ, चंदन, रक्तचंदन, बदाम, मसाल्याची झाडे अशी अनेक प्रकारची झाडे होती. कमीत कमी पाचशे जातीची झाडे येथे लावली होती. मात्र सगळी झाडे देशी होती. त्यामध्ये परदेशी झाडे लावणे जाणुन बुजुन टाळले होत.
या निर्माण झालेल्या झाडीमध्ये खास गुजराथमधुन पांच मोर लांडोरींच्या जोड्या आणल्या होत्या. याशिवाय अनेक प्रकारच्या पक्षांनी आता आपला मुक्काम या वृक्ष मंदिरात हलविला होता. सध्या चैत्र महिना चालू असल्याने सतत कोकिळांची कुहू कुहू या सर्व परिसरांत ऐकु यायला लागली आहे.
शेळके गुरुजी पाझर तलावाकडे गेले होते. तेथे त्यांना आमराईमध्ये झाडांवर बसलेले मोर दिसले. सगळा परिसर हिरवागार दिसत होता. त्यांना तिन वर्षापूर्वीचा देवीचा डोंगर आठवला, किती उजाड होता हा परिसर तेव्हा. विचार करत करत ते पाझर तलावापाशी आले. त्या तलावाला आता छान घाटही बांधण्यात आला होता. तलावामध्ये निरनिराळ्या प्रकारचे मासे सोडण्यांत आले होते. तसेच अलिबाग आणि मुंबईहून खास कमळाचे गड्डे आणून या तलावात सोडले होते. तलावाचा पृष्टभाग लाल, पांढ-या आणि सहसा न आढळणा-या नीळ्या कमळांनी भरुन गेला होता. तलावाच्या पाण्यामध्ये १५-२० बदकेही डुंबताना दिसत होती. या सर्व प्रसन्न करणा-या वातावरणाने त्यांचे मन एकदम प्रफुल्लीत झाले. तलावाच्या पाय-या उतरुन त्यांनी प्रत्येक प्रकारची पांच पांच कमळे काढली आणि ते सोमजाईला, मारुतीला वहाण्याकरिता सोमजाई मंदिराकडे निघाले. तेथे सरपंच त्यांची वाटच बघत होते. दोघांनीही परत मंदिरात जाऊन देवीला कमल पुष्पे वाहिली.
*************
रात्रीचे नऊ वाजले होते. गोविंदरावांचे नुकतेच जेवण झाले होते. जेवण झाल्यावर आत्ता ते अंगणात शतपावली करीत होते. शतपावली करताना त्यांचे लक्ष देवीच्या डोंगराकडे गेले. देवीचा डोंगर आणि डोंगरावर जाण्याचा रस्ता पथ दिव्यांनी उजळुन गेलेला दिसत होता. दोन दिवसांनी अक्षय तृतीयेला वृक्ष मंदिर प्रकल्प सुरु केल्याला तिन वर्ष पूर्ण होणार होती. तिन वर्षापूर्वी केलेला संकल्प समोर पथदिव्यांच्या माळेच्या रुपाने साकार झाल्याचे जाणवत होते. शतपावली करताना त्यांच्या डोळ्यासमोर तिन वर्षांपूर्वींच्या देवीच्या डोंगराचे स्वरुप आले. आताच्या समोर दिसणा-या चित्राशी तुलना करता त्यांच्या मनाला समाधान झाले. आता थोड्याच वेळात त्यांच्या घरी श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक होणार होती. दोन दिवसांनी होणा-या संस्थानच्या तृतिय वर्धावनदिनाच्या कार्यक्रमा संबंधी चर्चा करण्याकरीता सगळे आज येथे जमणार होते.
साडेनऊ वाजेपर्यंत सर्व विश्वस्त गोविंदरावांच्या माजघरांत जमा झाले. आतापर्यंतच्या प्रथेप्रमाणे बैठकीची सुरवात सोमजाईच्या प्रार्थनेने करण्यांत आला. सर्वप्रथम गोविंदरावांनी सर्व विश्वस्थाचे आपल्या घरी स्वागत केले. ते म्हणाले तिनवर्षांपूर्वी आपण एक संकल्प केला. त्या संकल्पाची बहुतांश पूर्ती गेल्या तिन वर्षांत आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाली आहे असे मला वाटते. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन. यापुढेही आपण आई सोमजाईच्या आशिर्वादाने उरलेले कार्य पूर्ण करुयात.
माझ्याकडे असलेल्या ताम्रपटामधिल मजकूराप्रमाणे आपण देवीच्या भक्तांचे कल्याण व्हावे या उद्देशाने वृक्ष मंदिराचे काम चालवले आहे. आपण केलेल्या या प्रयोगाचा साईड इफेक्ट काय झालाय हे आपल्या लक्षांत आले आहे का ते मला माहित नाही. परंतु आमच्या परसातल्या विहिरीला यंदा या चैत्र महिन्यांत देखिल भरपुर पाणी आहे. या शिवाय गावात आता निरनिराळ्या पक्षांचे दर्शन व्हायला लागले आहे. गेल्या काही वर्षांत मी कोकीळेचा आवाज आपल्या गावात ऐकला नव्हता तो यंदापासुन ऐकायला येतो आहे. गोविंदरावांनी प्रदिर्घ प्रस्तावना केली.
आपले म्हणणे बरोबर आहे गोविंदराव! गावातल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत गेले दोन वर्षात झालेली वाढ मलाही जाणवली आहे. त्यामुळे गावातही थोडीफार हिरवळ आता दिसायला लागली आहे. हंबीरराव म्हणाले.
पण हा आपला प्रयोग आपण विस्तारला पाहिजे. आजुबाजुच्या गावांना वाड्यांना अशाप्रकारचा प्रयोग करायला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. शेळके गुरुजी म्हणाले.
बरोबर आहे गुरुजी तुमचे. जे जे आपणासी ठावे। ते दुस-यासी सांगावे। शहाणे करुनी सोडावे। सकल जन।।असे समर्थांनी म्हटलेच आहे. आपण अक्षय तृतीयेला होणा-या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आजुबाजुच्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलवुया त्यांना आपला प्रयोग दाखवुया म्हणजे त्यांना आपणही असे काहितरी करायला पाहिजे याची जाणिव होईल. दिनकरराव म्हणाले. परंतु आता आपण त्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवुयात.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आपण स्टेट बँकेच्या आचार्य मॅडम यांना बोलावुया. त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केले आहे. शेळके गुरुजी बोलले.
आज मी आपल्या पाझर तलावावर गेलो होतो. तिथले वातावरण पाहून मन खूप प्रसन्न झाले. तेव्हाच मला एक कल्पना सुचली. आपण या सरोवराला काहितरी चांगले नांव द्यायला हवे. कोणाला काही सुचत असल्यास सांगावे.शेळके गुरुजींनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला.
या बाबतित मला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. हंबीरराव म्हणाले. कोणती गोष्ट? त्याचा या पाझर तलावाशी काय संबंध? गणेशने विचारले.
 सांगतो! सगळे सांगतो! आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण वृक्ष मंदिराचा प्रकल्प करण्याचे ठरवित होतो. पण आपली गाडी अडकत होती एकाच ठिकाणी! आपण सगळे म्हणत होतो, सगळे सोंग आणता येईल पण पैशाचे सोंग आणता येणार नाही! त्यावेळी आपल्या पाठीशी उभा राहिला एक दानशूर माणूस. त्या माणसाने आपल्या या प्रकल्पाला एकुण अठरा लाख रुपये अर्थसहाय्य केले आहे.
त्या व्यक्तीची एकच अट होती ती म्हणजे त्या व्यक्तीचे नांव गुप्त ठेवायचे. परंतु आजच मी त्या व्यक्तीला मनवण्यांत यशस्वी झालो आहे. त्यांना दिलेल्या गुप्ततेच्या वचनातुन त्यांनी आज मला मुक्त केले आहे. त्यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य करताना अशी कल्पना केली होती की हा प्रकल्प म्हणजे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे ते एक स्मारकच आहे. तेव्हा त्या व्यक्तीच्या जवळच्या त्या नातेवाईकाचे नांवच आपण त्या पाझर तलावाला देऊया. सरपंचांनी गौप्यस्पोट केला.
पण काका तुम्हीतर अर्थसहाय्य करणारी एक संस्था आहे असे सांगितले होतेत. गणेशने आपली शंका उपस्थित केली.
तुझे म्हणणे बरोबर आहे गणेश पण त्या व्यक्तीची तशी अटच होती. मग मी आयत्यावेळी एक खोटी संस्था उत्पन्न केली झाले. हंबीररावांनी स्पष्टीकरण दिले.
पण काका अजुनही आपण त्या दानशूर व्यक्तीचे नांव काही सांगितले नाही. हेमंतने विचारले.
बरोबर आहे, अहो हंबीरराव! सगळे सांगितलेत पण त्या दानशूर व्यक्तीचे नांव अजुनही आपण सांगितले नाही! गोविंदरावांनी उत्सुकतेने विचारले.
सांगतो ती व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. आपल्या सर्व नियोजनात त्यांचाही सक्रीय सहभाग होता. हंबीरराव बोलले.
म्हणजे? कोणss महाराज? पण त्यांच्याकडे एवढी रक्कम कशी काय? हेरंबने आश्चर्याने विचारले.
बरोबर आहे! महाराजच त्यांनीच आपल्या या प्रकल्पाला एक रकमी अठरा लाख रुपये दिले आहेत. त्यांचा इतिहास फार मोठा आहे. त्यांनी त्यांच्या गत आयुष्यात फार मोठा आघात सोसला आहे. असे म्हणून त्यांनी महाराजांचा सर्व इतिहास सगळ्यांना सांगितला.
हंबीररावांनी सांगितलेला महाराजांचा इतिहास ऐकुन सगळेच हळहळले. इतका मोठा आघात सोसुनही महाराजांनी गावाच्या कल्याणासाठी जे कष्ट घेतले त्याचे ऋण फेडता येणे शक्य नाही हे प्रत्येकाला मनांतुन जाणवले. हे सर्व ऐकून प्रत्येकाचाच मुड एकदम बदलुन गेला.
पण आपला पाझर तलावाला काय नांव द्यायचे हे राहुनच गेले. शेळके गुरुजींनी सगळ्यांना परत जमिनीवर आणले.
महाराजांच्या वडिलांचे नांव होते सोमनाथ आणि गावाचे नांव होते जाई. महाराजांची इच्छा आपल्या गावाचे आणि गावक-यांचे एकत्रीत स्मारक व्हावे ही होती. तेव्हा आपण त्या तलावाचे नांव सोमजाई स्मृती सागर”  असे ठेवुया. हंबीररावांनी आपली इच्छा व्यक्त केली.
या नावाला माझे अनुमोदन आहे! हेरंबने अनुमोदन दिले. सर्वानुमताने  सोमजाई स्मृती सागर हे नांव कायम करण्यांत आले.
शेळके गुरुजींनी हेमंतला कोल्हापुरला जाणा-या गाडीबरोबर जाऊन अशा मजकुराचा फ्लेक्स बोर्ड उद्याच तयार करुन आणायला सांगितले. हेमंतने ते लगेचच मान्य केले.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपण महाराजांची जाहिर कृतज्ञता व्यक्त करुया आणि त्यांचा श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान तर्फे सत्कारही करुया. गोविंदरावांनी अध्यक्ष म्हणून आपले मत व्यक्त केले त्याला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली.
पण सत्कार कोणाच्या हस्ते करायचा? जितूने विचारले.
आपण स्टेट बँकेच्या मॅनेजर आचार्य मॅडम यांच्या हस्ते  महाराजांचा सत्कार करावा असे मला वाटते. दिनकररावांनी सूचवले.
यावर माझी अशी सूचना आहे की, आपण हा सत्कार आपल्या संस्थेतर्फे कृतज्ञता म्हणून करणार आहोत तेव्हा तो संस्थेच्या अध्यक्षांच्या म्हणजेच गोविंदरावांच्या हस्त व्हावा. शेळके गुरुजींनी आपला प्रस्ताव मांडला त्याला सर्वांनी संमती दिली.
वर्धापन दिनाची आजुबाजुच्या गावामध्ये जाऊन निमंत्रण देण्याची जबाबदारी जितूवर सोपवण्यांत आली. ती त्याने मान्य केली. परंतु स्टेट बँकेच्या मॅनेजर आचार्य मॅडम यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावण्याची जबाबदारी हंबिररावांनी स्विकारावी असे मात्र त्याने सुचविले. सरपंचांनीही ते लगेचच मान्य केले आणि उद्याच बँकेत जाऊन ते काम करीन असेही सांगितले.
आता वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा आपण ठरवुया. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हेमंत करेल. प्रास्ताविक हंबीरराव करतिल. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा दिनकरराव घेतील. संस्थानच्या भावी योजनां संबंधी शेळके गुरुजी सांगतिल आणि समारोप करतिल. गोविंदरावांनी सुचवले आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. त्यानंतर चहापान होऊन आजची बैठक समाप्त झाली.
*************


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा