११
संध्याकाळचे
सात वाजले होते. हंबीरराव आणि राधाकाकू देवघरात बसुन आपली दैनंदिन सायंप्रार्थना
म्हणत होते. तेवढ्यात त्यांच्या घरात कामाला असलेली सुमन त्यांना बोलवायला
देवघरांत आली. ती आल्यावर राधाकाकूंनी विचारले, सुमन काही काम होते कां?
त्यावर तिने सांगितले, काकू बाहेर दिनकरराव आले
आहेत. काकांकडे काहीतरी काम आहे असे म्हणत होते!
ठिक
आहे! आमचं झालेच आहे! त्यांना बसायला सांग मी आलोच
इतक्यात. हंबीररावांनी सुमनला सांगितले.
आपली प्रार्थना संपवुन हंबीरराव बाहेर ओसरीवर
आले. त्यांनी दिनकररावांना विचारले, फार वेळ बसायला नाही नां लागले?
नाही! नाही! मला फार वेळ नाही झालां! काय
देवाचे काही चालले होते कां? मी त्यात अडथळा नाही नां आणलां? ते असो, मी आलो होतो अशाकरिता, काल
आपले गोविंदरावांच्या घरी बोलणे झाल्या प्रमाणे मी आज त्या जागेचे उतारे पाहिले.
ती सर्व जागा सोमजाई देवीच्याच नांवे आहे आणि वहिवाटदार म्हणून सध्या
गोविंदरावांचे नांव आहे. दिनकररावांनी सरपंचांना सांगितले.
किती जागा आहे ती? सरपंचांनी विचारले.
एकुण दोनशे एक एकर जागा आहे. त्यात देवीच्या
देवळाच्या आजुबाजुची आठ एकर जागाही येते. सगळी जमीन वरकस म्हणून नोंदली आहे.
तेव्हा त्या जागेत काही पक्के बांधकाम करता येणार नाही. दिनकररावांनी सविस्तर
उत्तर दिले.
ठिक आहे! उद्या रात्री आपण नेमकी सात आठं जणं
मारुतिच्या मंदिरात बसुया आणि पुढील बेत ठरवुया! सरपंचांनी पुढचा बेत सांगितला.
***************
लक्ष्मण गोरिवले, गणेश जोशी आणि पांडुरंग यादव हे
तिघेजण अगदी जिवश्च कंठश्च मित्र होते. त्यातला लक्ष्मण गोरिवले आणि पांडुरंग यादव
हे कायम मुंबईला रहाणारे होते. लक्ष्मण आणि पांडुरंग हे दोघे एकाच चाळीत रहातात.
दोघेही एकाच कंपनीत कामाला आहेत. दोघेही सध्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने रजेवर
गावाला आले आहेत. आता तिघे मित्र गणेशच्या घरी गप्पा मारीत बसले होते. गणेश उर्फ
गण्या डिग्री असुनही बेकारच होता. जेव्हा ते मित्र एकत्र जमत तेव्हा त्यांच्या
तासनतास गप्पा चालत. तिघेही एस्. एस्. सी. पर्यंत एकत्रच गोवेल्याच्या हायस्कूल
मध्ये जात असत. लक्ष्मणने सावंतवाडी येथिल आय्. टि. आय्. मध्ये मेकॅनिकल चा डिप्लोमा केला
होता. पांडुरंगनेही त्याच आय्. टि. आय्. मध्ये ईलेक्ट्रीकलचा डिप्लोमा केला होता.
आज
त्यांचा गप्पांचा विषय होता काल गोवेले येथे झालेला स्वाध्यायींचा भावमिलन सोहळा
आणि त्या आधी हनुमानवाडीमध्ये झालेला भावफेरीचा कार्यक्रम. मारुति मंदिरात मुक्काम
केलेले गुजराथमधील स्वाध्यायी बंधू आणि भगिनी दोन दिवस घरोघर जाऊन लोकांना भेटत
होते. त्यांच्या मारुती मंदिरात होणा-या प्रवचनालाही हे तिघेजण आवर्जुन गेले होते.
त्या गुजराथ मधिल स्वाध्यायी बंधूच्या आग्रहामुळे हनुमानवाडीतिल लोकांबरोबर हे
देखिल गोवेल्याला गेले होते.
ते
तिघेही गोवेल्याला झालेल्या कार्यक्रमात सांगितलेल्या स्वाध्यायाच्या विचाराने,
तेथिल शिस्तबद्ध कार्यक्रमाने प्रभावित झाले होते. विशेषत: डॉ. नवनीत शहा यांच्या प्रवचनाने
त्यांना विचार करायला लावले होते. हे तिघेही कार्यक्रम संपल्यावर डॉ. शहांना खास
भेटले होते. तेव्हा त्यांनी वृक्ष मंदिरा बद्दल थोडीफार माहिती घेतली होती.
त्यामुळे त्यांचे स्वाध्याय आणि वृक्ष मंदिर या बद्दलचे औत्सुक्य वाढले होते.
परंतु डॉ. शहा यांना लगेचच जायचे असल्याने त्यांची ती उत्सुकता तशीच राहिली होती.
म्हणूनच डॉ. शहांनी त्यांना आपला पत्ता आणि फोन नंबर दिला होता त्यांना वृक्ष मंदिर
प्रत्यक्ष बघायला यायचे निमंत्रण दिले होते. आज या तिघांची चर्चा वृक्ष मंदिर या
विषयाभोवतीच फिरत होती.
काय
रे पांडुरंग!
वृक्ष मंदिर म्हणजे आपण तुळशीची पूजा करतो तशी झाडांची पूजा करीत असतिल काय? गणेशने आपली शंका उपस्थित केली.
अरे
पण झाडांचे मंदिर कसे बांधणार? झाडावर जर मंदिर बांधले तर झाड मरेल नाही कां? पांडुरंगने उत्तरादाखल आपली शंका
प्रकट केली.
आणि
झाडांची जर पूजा केली तर ते तोडता कसे येणार? आणि मग त्या झाडाचा काय उपयोग? लक्ष्मणने आपले मत दिले.
अरे
देवाने ही झाडे निर्माण केलीत प्राण्यांच्या आणि माणसांच्या उपयोग करिताच नां!
झाडांची फळे, फुले, पाने लाकूड याचा उपभोग आपण घेतलाच पाहिजे. परंतु त्यात तारतम्य
बाळगले पाहिजे. म्हणजे लाकडं वापरायची पण ती वाळलेल्या झाडाची. निसर्गाच्या कलाने
घेऊन त्याचा उपभोग घ्यायचा. ओरबाडुन नाही घ्यायचे. गरजे इतकेच घ्यायचे उगाच हावरटा
सारखे केले तर आपल्या देवीच्या डोंगरा सारखे होईल. देवीचा डोंगर म्हणे पूर्वी
हिरवागार असायचा. परंतु आताची त्याची अवस्था बघ. हे माणसाच्या हावरटपणामुळेच झाले
आहे. गणेश पोटतिडकीने म्हणाला.
अरे
लक्ष्मण! आपला गणेश हल्ली एकदम साधु झाल्यासारखा दिसतोय. त्या महाराजांनी
त्याच्यावर चांगलीच जादू केलेली दिसते. पण काय रे गणेश! हे महाराज कोण? कुठले? अरे आपल्या सरपंचाना पण त्यांनी भुरळ
पाडली आहे, म्हणजे काम जबरदस्त दिसतयं! पांडुरंगाने आपले निरिक्षण बोलुन दाखवले.
अरे
खरचं ते अगदी साधे आणि सरळ माणूस आहेत. त्यांना सगळे महाराज म्हणतात पण त्यांना ते
अजिबात आवडत नाही. उलट त्यांना या महाराज आणि बुवा या गोष्टीचा अगदी तिटकारा आहे.
ते रोज गावात फक्त पांच घरी भिक्षा मागुन आणतात. मिळालेल्या भिक्षेतील एक भाग
माशांना, एक भाग कावळ्याला देऊन उरलेल्या अन्नाचा नैवद्य दाखवुन ते जेवतात. रात्री
काहीही खात नाहित.
त्यांच्या
पूर्वायुष्यात त्यांच्यावर कसलीतरी मोठी आपत्ती आलेली होती. त्यातुन ते मनाने
सैरभैर अवस्थेत सज्जनगडावर गेले. तिथे त्यांची मनस्थिती सुधारल्यावर ते बाहेर पडले
ते प्रवास करता करता आपल्या गावात आले. ते मारुतिच्या मंदिरात मुक्कामाला होते.
तुला माहित आहेच आमची चौकडीने त्या मंदिराची अवस्था काय करुन ठेवली होती. ती सर्व
घाण त्यांनी एकट्याने साफ केली. त्याच दिवशी रात्री ते मारुतीसमोर करुणाष्टके
म्हणत होते. त्यांच्या स्वरातिल आर्ततेने आमच्या मनाला कुठेतरी अपराधी पणाची जाणिव
झाली. तोच क्षण आमच्या जीवनातील परिवर्तनाचा क्षण होता. नाहीतर तुम्हाला माहित
आहेच आम्ही कोणालाच जुमानत नव्हतो. गणेशने सर्व वृतांत सविस्तर सांगितला.
तू
सांगितलेल्या हकीगती वरुन खरंच त्या महाराजांच्यात काहितरी सत्व असेल असे वाटते.
ज्यांनी तुम्हाला एका क्षणांत बदलले म्हणजे ते खरोखरचं कोणितरी साधु पुरुष असतिल
यात संशय नाही. त्यातच हंबिररावांसारखा कडक आणि संधीसाधुंच्या बाबतित सदैव जागृत
असलेला माणूस त्यांना मानतो म्हणजे प्रश्नच नाही. लक्ष्मणने आपले मत दिले.
पण
आपला मूळ विषय बाजुलाच राहिला. आपण ते वृक्ष मंदिर बघायला जायचे का? मला आमच्या कंपनीतर्फे एक महिना
गुजराथमधील जामनगरला ट्रेनींगला जायचे आहे. हे जामनगर सौराष्ट्रातच आहे. मग आपण एक
दोन दिवस तिकडे जाऊन येऊ. पांडुरंगने त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला.
मी
नक्की येईन, कारण आपल्या गावातच वृक्ष मंदिरासारखा प्रकल्प राबवायचा विचार चालू
आहे. गणेशने माहिती दिली.
पण
आपल्या कडे अशी कोणती जागा आहे, जिथे आपण हे वृक्ष मंदिर स्थापन करु शकु? लक्ष्मणने आपली शंका विचारली.
त्यानंतर
गणेशने त्यांना ताम्रपटा विषयी माहिती दिली. त्यानंतर तो म्हणाला काल आमच्या घरी
सरपंचकाका, महाराज, आपले दिनकरकाका आले होते. त्यानंतर आज दिनकरकाकांनी त्यांच्या
ऑफिसमधील रेकॉर्डही चेक केले. देवीच्या डोंगराची सर्व जागा सोमजाईच्या मालकीची
आहे. त्याला वहिवाटदार म्हणून आमच्या बाबांचे नांव आहे. त्यामुळे देवीच्या
डोंगरावर हा प्रकल्प होऊ शकतो. पण त्याला पैसा खूप लागणार आहे. त्याची काही
व्यवस्था झाली तर हे नक्की होईल. पाहूया सोमजाईची काय इच्छा आहे ती! गणेशने नवीन
माहिती पुरवली.
अरे
पण गणेश! याला तुमच्या घराण्यातल्या लोकांची परवानगी घ्यावी लागेल. लक्ष्मणने शंका
उपस्थित केली.
तो
काही प्रश्न नाही, बाबांनी याला कालच संमती दिली आहे. उद्या रात्री मारुतिच्या
देवळात या संबधी निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली आहे. तुम्हाला त्यात खरंच
रस असेल तर तुम्हीही तिथे या! मी तुम्हाला आमंत्रण देतो. गणेशने सांगितले.
त्यानंतर
त्यांची बैठक बरखास्त झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा