शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग ४

     पहाटेचे पांच वाजले होते. महाराज नेहमी प्रमाणे नदीवर जाऊन आपले प्रातर्विधी आणि स्नान उरकुन आले. तिथपर्यंत रात्री मंदिरात झोपायला आलेल्या गणा, हेरंब, जितू आणि हेमंत यांनी आपले अंथरुण आवरुन घेतले होते. महाराज नदीवरुन येण्याच्या आधीच त्यांनी मंदिराचे आवार आणि मंदिर झाडुन लखलखित केले होते. महाराजांना हनुमानवाडीला येऊन आता आठ दिवस झाले होते. या चौघांच्या आणि हंबीररावांच्या प्रेमळ आग्रहाला मान देऊन त्यांनी अजुन आपला येथिल मुक्काम हलवला नव्हता.
     महाराज नदीवरुन मंदिरात  आल्यावर त्यांनी या चौघांनी केलेली साफसफाई पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. मंदिरात आल्यावर त्यांनी दररोजच्या प्रमाणे मारुतिची पूजा केली. तिथपर्यंत आपले चौघे मित्र घरी गेले होते. तासाभराने ते चौघेही आपले प्रातर्विधी आणि स्नान उरकुन परत मंदिरात आले. तो पर्यंत सहा वाजले होते. महाराजांनी आपले नित्य प्रात:स्मरण सुरु केले होते.
त्यांचे नित्याचे पठण पूर्ण होताच महाराजांनी सूर्यनमस्कार घालायला सुरवात केली. या पांचही जणांचे आधी ठरले होते त्याप्रमाणे या चौघांनीही महाराजांच्या बरोबर सूर्यनमस्कार घालायला सुरवात केली. महाराजांनी त्यांच्या रोजच्या रिवाजाप्रमाणे १०१ नमस्कार घालुन पूर्ण केले. गणाने आणि हेमंतने २१ सूर्यनमस्कार घातले, तर हेरंबने २५ घातले आणि जितूने ३० नमस्कार पूर्ण केले.
आज  वर्षप्रतिपदा होती. नवीन वर्षाची सुरवात होती. या नवीन वर्षाची सुरवात आपल्या चौघा मित्रांनी नविन संकल्प करुन केली होती. त्याची सुरवात त्यांनी सूर्यनमस्काराने केली होती. सूर्यनमस्कार घालुन झाल्यावर मारुति मंदिराच्या समोरील रस्ताही ही पांच जणांनी साफ केला. त्यानंतर जितूने आणि गणाने नदीवरुन पाणी आणून दिले आणि महाराज, हेमंत आणि हेरंब यांनी सर्व मंदिर स्वच्छ धुवुन काढले. त्यानंतर चौघेही आपापल्या घरातली साफसफाई करण्यासाठी आणि गुढी उभारण्या साठी गेले. 
**************
चैत्र महिन्यातली प्रतिपदा असल्याने वातावरण एकदम प्रफुल्लीत होते. आंब्याच्या झाडांना मोहोर आलेला होता. मधुनच कोकिळा आपल्या मधुर गुंजनाने त्या प्रफुल्ल वातावरणात भर घालीत होत्या. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. हनुमानवाडीतल्या प्रत्येक घरी आज गुढी उभारलेली दिसत होती. प्रत्येक घरातिल गुढीला वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे वापरली होती. त्या निरनिराळ्या रंगाच्या गुढ्या पहात पहात महाराज रस्त्याने जात होते. तो त्यांना गावातल्या शाळेत देखिल गुढी उभारलेली दिसली. ते पाहुन त्यांना खूप आश्चर्य वाटले. म्हणून ते तडक शाळेच्या आवारात गेले.
शाळेच्या आवारात जाऊन पहातात तो तिथे एकदम उत्सवाचे वातावरण होते. शाळेचे सर्व आवार झाडून लख्ख केलेले होते. सर्वत्र रंगी बेरंगी पताका लावलेल्या होत्या. सर्व शाळेला आम्रपल्लव आणि झेंडूच्या फुलांच्या माळा लाऊन सजवले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर एक फळा ठेवलेला होता. त्यावर सर्व ग्रामस्थांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणारा संदेश लिहिलेला होता. त्यावर सालाबाद प्रमाणे आजच्या बालक पालक मेळाव्यामध्ये सर्वांचे स्वागतही केले होते.
 शाळेच्या ऑफिस समोर छोटे स्टेज तयार केलेले दिसत होते. त्यावर सरपंच हंबीरराव, ग्रामसेवक, तलाठी, रेव्हेन्यू खात्याचे सर्कल इन्स्पेक्टर, सर्व ग्रामपंचायत सदस्य बसले होते. समोर पटांगणात शाळेतिल सर्व मुले एका बाजुला आणि दुस-या बाजुला त्या मुलांचे पालकही बसले होते. स्टेजवर बसलेल्या सरपंचानी महाराजांना शाळेच्या आवारात शिरताना पाहिले आणि त्यांनी शाळेच्या शिपायाला जवळ बोलावले व ते त्याला म्हणाले, अरे, विश्राम! समोरुन ते महाराज येताना दिसत आहेत त्यांना मी बोलावलय असे  सांग आणि त्यांना इकडे घेऊनच ये.
विश्रामच्या बरोबर महाराजांना येताना पाहुन सरपंच पुढे झाले. त्यांना हाताला धरुन स्टेजवर घेऊन येत सरपंच म्हणाले, या महाराज आपल्याला या सर्वांची ओळख करुन देतो. हे आपले ग्रामसेवक पंडित साहेब, हे या शाळेचे मुख्याद्यापक शेळके गुरुजी, हे आपल्या आणि बाजुच्या दोन गावचे तलाठी धुमाळ साहेब, हे आपल्या भागाचे सर्कल इन्सपेक्टर आपटे साहेब आणि या गोवेले येथिल स्टेट बँकेच्या मॅनेजर आचार्य मॅडम. आणि बरं का मंडळी हे महाराज आपल्या गावात पाव्हणे आले आहेत मोठे सत्पुरुष आहेत.
 महाराज! आमच्या शाळेतर्फे आपले हार्दिक स्वागत! महाराजांच्या हातात पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत शेळके गुरुजी म्हणाले. आज आमच्या शाळेचा विद्यार्थी पालक मेळावा आणि मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
नमस्कार! सरपंचांनी मला जरी महाराज ही उपाधी दिली असली तरी, मी समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर दृढ विश्वास असलेला त्यांचा भक्त आहे. मी बुवा महाराज वगैरे कोणी नसुन अतिशय सामान्य गृहस्थ आहे. स्टेजवरिल सर्वांना नमस्कार करित महाराज म्हणाले.
हे बघा महाराज! आमचे सरपंच जेव्हा एखाद्याचा आदराने उल्लेख करतात, तेव्हा तो माणूस त्यांच्या कसोटीला पूर्णपणे उतरलेला असतो हे नक्की. सर्कल इन्स्पेक्टर आपटे म्हणाले.
थोड्याच वेळात सरपंचांच्या हस्ते नारळ वाढवुन कार्यक्रमाची सुरवात करण्यांत आली. त्यानंतर व्यासपीठावरील सर्वांची समयोचीत भाषणे झाली. त्या सर्वांच्या भाषणा नंतर शेळके गुरुजींनी महाराजांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेव्हा महाराज उठले आणि माईक समोर येऊन उभे राहिले, आणि त्यांनी बोलायला सुरवात केली.
उपस्थित सर्व सज्जनहो, मी खरं म्हणजे या गावात नवखा आहे. या गावातुन जाणारा एक वाटसरु आहे. समर्थ रामदास स्वामींनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा ध्यास घेतलेला त्यांचा एक भक्त आहे आणि इतकीच माझी ओळख आहे. गेले आठ दिवस आपणच वाढलेल्या भिक्षेने माझा उदर निर्वाह चालू आहे. तेव्हा असा फाटका माणूस मी काय बोलणार? तरीही आपली इच्छा आहे, आपण मला बोलायची संधी दिली आहेच तर समर्थांचे विचार आपल्या पर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
आज येथे विद्यार्थी आणि पालक असा दोघांचाही मेळावा आहे. तेव्हा आजचे श्रोते बालक पण आहेत आणि पालकही आहेत. समर्थांना बालके खूप आवडायची. ते मुलांबरोबर मुल व्हायचे. समर्थ रामदास स्वामी जेव्हा नाशिकजवळच्या टाकळी येथे गायत्री पुर:चरण करत होते. तेव्हा तिथल्या मुलांबरोबर त्या काळात खेळले जाणारे खेळ खेळायचे. समर्थांनी दासबोधात मुलांना अक्षर कसे काढावे, वेलाट्या कशा द्याव्यात, अकार उकार मकार कसे द्यावेत, दोन शब्दांमध्ये किती अंतर असावे, दोन ओळी मध्ये किती अंतर असावे या सगळ्या गोष्टी लेखन क्रिया या आपल्या समासात सांगितल्या आहेत. त्याचबरोवर आपली दिनचर्या कशी असावी हे देखिल सांगितले आहे. त्यांनी नेहमीच प्रयत्नवादाला प्रोत्साहन दिले आहे.
आळसाने काय दुष्परिणाम होतात याचे सविस्तर वर्णन त्यांनी दासबोधामध्य केलेले आहे. संसारी माणसांकरिता त्यांनी आदर्श व्यक्तिचे व्यक्तिचित्रच या महान ग्रंथात दाखवले आहे. चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते, उद्योगी पणाचे फायदे कोणते या सर्व गोष्टींचे त्यांनी त्यात व्यवस्थित विवेचन केले आहे. आज आपल्यासमोर अनेक प्रलोभने आहेत. टिव्ही व्हीडीओ यांचे आकर्षण आहे. हल्ली तर मोबाईलचे युग आहे. पूर्वी टि व्ही ला इडीयट बॉक्स म्हणायचे. हल्ली त्याची जागा मोबाईलने घेतली आहे. कदाचित इकडे खेडेगावात ते लोण आले नसेल. पण ते यायला वेळ लागणार नाही.
आपण म्हणतो मुले ऐकत नाही. मुले म्हणतात आमच्या आई वडिलांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मुले शाळेत पाच सहा तास असतात परंतु आपल्या पालकांजवळ उरलेले पंधरा सोळा तास असतात. मुलांवर जर चांगले संस्कार झाले तरच ते पुढे चांगले सुजाण नागरिक होतिल. त्यामुळे पालकांनीही आपल्यावर संयम ठेवायला हवा. मुलांपुढे चांगला आदर्श ठेवायला हवा.
आज आपल्याकडे साधन सामुग्री आहे, शिक्षण आहे, मनुष्यबळ आहे सगळेकाही आहे. एवढे सगळे असुनही, जवळ योग्य क्षमता असुनही आपले तरुण बेकार आहेत. मग ते वाममार्गाला लागतात. त्याची जबाबदारी कोणाची, पालकांची? त्या बेकार तरुणांची? का समाजाची? त्या वाट चुकलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करुन, त्यांच्यातल्या गुणांना वाव मिळेल असे कार्य त्यांच्यावर विश्वासाने सोपवले तर ते अशा कामाला खात्रीने यशस्वी करतिल यात शंकाच नाही.
आज परिस्थिती अशी आहे. आपल्या कडील नद्या कोरड्या पडल्या आहेत, पाऊस पडला तर इतका पडतो की त्यामुळे ओला दुष्काळ निर्माण होतो. तर कधी पाच पाच वर्षे  अजिबात  पाऊस पडतच नाही. त्यामुळे अशी परिस्थिती येते की खायला अन्न नाही, जनावरांना वैरण नाही. हे सगळे कशामुळे घडते तर आपण राक्षसासारखे सगळे खात सुटलोय. निसर्गाकडुन नुसते घ्यायचेच आपल्याला माहीत आहे. आपण निसर्गाचेही काही देणे लागतो हेच विसरुन गेलोय. आजच्या गुढीपाडव्याला आपण आज असा संकल्प करुया की, निसर्गाला मी काय देणे लागतो आहे हे मी शोधिन आणि ते त्याचे त्याला परत करीन.
मंडळी मी भावनेच्या भरांत जरा जास्तच बोललो असे मला वाटतय. त्यामध्ये आपला अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. तरीही मोठ्या  मनाने आपण मला क्षमा करावी ही विनंती. आपले दोन्ही हात कोपरा पासुन जोडून त्यांनी सर्वांची क्षमा मागितली आणि कोणाला काही समजायच्या आंत ते तडक स्टेजवरवरुन खाली उतरले आणि मंदिराकडे निघुन गेले.


***********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा