२
पहाटेचे चार वाजताच आपले काका म्हणजेत काल
मारुति मंदिरात उतरलेला तो पांथस्त आपल्या अंथरुणातुन ऊठले. अंथरुण म्हणजे अर्थातच
गणाने आपल्या घरुन आणलेली जुनी घोंगडी त्यावर काकांनी आपली सतरंजी पसरली होती.
अंथरुणातुन उठताच त्यांनी आपल्या अंथरुणाची व्यवस्थित घडी करुन ठेवली. अंथरुणात
बसुनच कराग्रे वसते लक्ष्मी.... आणि समुद्र वसने देवी ही प्रार्थना म्हटली.
त्यांनी बाहेर पाहिले तर फारसा उजेड नव्हता पण काळोखही नव्हता. तसेच ते मंदिरा
बाहेर पडले आणि नदीच्या दिशेने निघाले. नदीवर आपले मुखमार्जन करुन तेथेच आडोशाला
आपले प्रातर्विधी उरकुन ते परत मारुती मंदिरात आले. मंदिरात आल्या आल्या त्यांनी
काल तोडलेल्या निर्गुडीच्या फांद्याचा छोटासा झाडु बनवला. त्या झाडुच्या सहाय्याने
त्यांनी मंदिराचे सर्व आवार लख्ख झाडुन काढले.
तिथपर्यंत बऱ्यापैकी दिसायला लागले होते. मग
त्यांनी मंदिरामधिल केरकचरा काढायला सुरवात केली. त्यांच्या या वावराने आपल्या
चौकडीला जाग आली. बघतात तो काकांनी मंदिराचे आवार पूर्णपणे स्वच्छ केले होते. आता
त्यांनी मंदिरातिल साफसफाईला सुरवात केलेली होती. ते बघुन गणा पुढे झाला व
काकांच्या हातातला झाडू घ्यायला लागला. तेव्हा त्यांनी त्याला सांगितले तुम्ही आता
इथे थांबण्याच्या ऐवजी आपापल्या घरी जाऊन घरातल्या मंडळींना मदत करा.
काकांच्या सांगण्याप्रमाणे ते चौघे आपापल्या
घरी गेले. इकडे आपल्या काकांनी मंदिराची झाडझुड पुरी होताच नदीवर जाऊन स्नान केले.
येताना कालच्या प्रमाणेच पाण्याचा तांब्या भरुन आणला. मग मारुतिरायाची पूजा करुन
ते सभामंडपात आले. तेथे घोंगडीची घडी अंथरुन त्यावर पद्मासन घालुन ते बसले. मग
सज्जनगडा वरील प्रथे प्रमाणे काकड आरति केली.
तिथपर्यंत सूर्योदय झाला होता. आजुबाजुचे
वातावरण एकदम प्रसन्न झालेले दिसत होते. त्यांनी मग प्रभात समयी म्हणावयाचे मनाचे
श्लोक म्हणायला सुरवात केली.
गणाधीश जो ईश सर्वां
गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ
चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
मना सज्जना
भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें
सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
प्रभाते मनी राम
चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर
सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
ते प्रासादिक आवाजात म्हणत असलेल्या या
श्लोकांनी त्या परिसरातले वातावरण एकदम भक्तिमय झाले. शिवाय सूर्योदयाची वेळ
असल्याने वातावरणही एकदम शांत होते. त्या शांत वातावरणांत त्यांचा खडा पण
भक्तिपूर्ण आवाज खूप दूर पर्यंत ऐकायला येत होता.
सुर्योदयाच्या
वेळी स्वच्छ, प्रासादिक आणि धीर गंभीर सुरांमध्ये ऐकायला येणाऱ्या मनाच्या
श्लोकांच्या आवाजाने सकाळीच प्रभात फेरीला बाहेर पडलेल्या हंबीररावांचे कान तृप्त
झाले. इतका सुरेल आणि प्रासादिक स्वर त्यांनी यापूर्वी फक्त एकदाच ऐकला होता. पांच
वर्षापूर्वी ते आपल्या पत्नीसह सज्जनगडावर गेले होते. तिथे त्यांनी गडावर होणा-या
काकड आरति पासुन रात्री शेजारति पर्यंत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या
भक्ति भावाने हजेरी लावली होती. त्यावेळचे तिथले प्रत्येक कार्यक्रमातले पठण
त्यांनी आपल्या मनांत साठवुन ठेवले होते. तिथे ऐकलेला आणि तसाच स्वर आपल्या गावांत
ऐकुन त्यांना खूपच आनंद झाला.
रोज
सकाळी चार मैल पायी फिरण्याचा त्यांचा नित्यक्रम होता. त्यानिमित्ताने गावाच्या
परिसरांत घडणारे बदल त्यांच्या लक्षांत येत असत. आता ते आपला फेरफटका मारुन परत
फिरले होते. आपल्या गावाच्या वेशीत शिरताच त्यांना हे मनाच्या श्लोकांचे स्वर
ऐकायला आले होते. त्या स्वरांची त्यांना एवढी मोहिनी पडली की, ते त्या स्वराचा
मागोवा घेत घेत मारुति मंदिरात कसे आले ते त्यांनाच कळले नाही.
आत येऊन
बघतात तो कमरेभोवती पंचा गुंडाळलेला उघडाबंब असा एक गृहस्थ, साध्यासुध्या जुन्या
घोंगडीवर पद्मासन घालुन डोळे बंद करुन बसलेला आहे. तोंडाने “प्रभाते मनी राम चिंतीत
जावा” या श्लोकांचे पठण चालले आहे. त्या माणसाला आजुबाजुला
काय चालले आहे याची काहीही फिकीर दिसत नव्हती आणि त्याला त्याची शुद्ध आहे असेही जाणवत
नव्हते. त्याचे आपले चालूच होते .....
घनश्याम हा राम
लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥
करी संकटीं सेवकांचा
कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥
त्या अनोळखी गृहस्थाचे चाललेले अखंड पठण ऐकत हंबीररावही
त्यात तल्लीन होऊन तिथेच जमिनीवर बसुन राहिले. त्यांचीही ते श्लोक ऐकता ऐकता जणू समाधी लागली होती. मनाच्या श्लोकांचे पठण
संपल्यावर देखिल काहीवेळ जणू तेच स्वर वातावरणांत भरुन राहिले होते. क्षणभराने
प्रथम भानावर आले ते हंबीरराव.
मग ते
हात जोडून त्या गृहस्थांच्या समोर उभे राहिले व म्हणाले, राम राम महाराज! सकाळच्या रामप्रहरी
आपल्या या श्लोकांच्या श्रवणाने कान आणि मन अगदी तृप्त झाले. अशाप्रकारचे श्रवण
मला एकदाच झाले होते. आपल्या या स्वरांनी मला येथे खेचुन आणले. आपले मनापासुन
धन्यवाद. आपल्यामुळे मला एक दिव्य अनुभव मिळाला.
आपण या
गावात नविन दिसता. आपली पाय माझ्या झोपडीला लागावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा
महाराज आपण माझ्या कडे याल कां?
त्यावर
त्या गृहस्थांनी म्हणजे आपल्या काकांनी, जशी समर्थांची इच्छा! असे म्हणून संमती
दर्शवली.
***********
हंबीरराव
हे हनुमानवाडीचे सरपंच आहेत. हनुमानवाडी हे गांव शहरवजा खेडे आहे. हे गांव
सिंधुदुर्ग आणि कोल्हापुर जिल्हा यांच्या सिमेवर परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये
आहे. हनुमानवाडी ही खेर्डी या मुख्य गावाची एक वाडी आहे. हनुमानवाडीची वस्ती
सुमारे पांच हजार आहे. ही वाडी आजुबाजुच्या पंचक्रोशी करिता बाझारपेठेचे गांव आहे.
गावात सर्व जाती जमातिचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत. अर्थात येथे व्यसनी लोकही
बरेच आहेत. तरीही गावात कुठलीही तेढ नाही. गावतले सगळेच लोक हंबीररावांना मानतात.
अर्थात हंबीररावांचे व्यक्तिमत्वच तसे आहे. त्यांच्या तरुणपणी त्यांनी कुस्त्यांचे
फड गाजवले होते. हंबीरराव हे दिसायला गोरेपान आणि रुबाबदार आहेत. ते स्वभावानेही दिलदार आहेत. कोणी अडला
नडला तर त्याला ते सदैव आपलेपणाने मदत करीत असतात.
हंबीरराव
जसे उदार, दिलदार होते तसेच धार्मिक देखिल आहेत. गावात येणाऱ्या सच्च्या
हरिभक्ताचा आदर करणारे, त्याला आधार देणारेही आहेत. परंतु त्यांना ढोंगी
बुबाबाजीचा अतिशय राग आहे. अशाप्रकारचे बुवाबाजीचे ढोंग करणा-याला ते चांगलाच धडा
शिकवतात. त्यांच्या अनुभवी नजरेला खरा संत कोण आणि भगवे कपडे घालुन लोकांना
ठकवणारा ढोंगी कोण हे बरोबर जाणवते.
म्हणूनच
आता त्यांनी मारुतिच्या देवळात “प्रभाते मनी” म्हणत असलेल्या महाराजांची प्रासादीक
वाणी ऐकुनच ओळखले की, हे पाणी वेगळेच आहे. म्हणूनच त्यांनी ते नको नको म्हणत असताही
त्यांना आग्रहाने आपल्या घरी आणले होते.
आपल्या
घरांत शिरताच हंबीररावांनी त्यांचे स्वागत करत म्हटले, “या महाराज ! ही माझी गरीबाची मठी!!“ आपण रामप्रहारी माझ्या घरी आलात त्याचा मला खूपच
आनंद झाला आहे. या असे आसन ग्रहण करावे. असे म्हणून त्यांनी घरांत हाक दिली.
अहोss ऐकलं कां! आपल्या कडे
बघा मोठे महाराज आले आहेत! जरा बाहेर या आणि येताना त्यांना
दूधही घेऊन या.
बरं का
महाराज पांच वर्ष झाली असतिल आम्ही दोघेही सज्जनगडावर गेलो होतो. आपला आजचा
देवळातला आवाज ऐकला आणि माझ्या सज्जनगडावरच्या आठवणी जाग्या झाल्या. क्षणभर आपण
गडावरच आहोत असा भास झाला.
तेवढ्यात
आतुन राधाकाकू हातात दूधाचे पितळेचे चकचकीत ग्लास असलेली ताटली घेऊन आल्या. आपल्या
हातातली ताटली त्यांनी बाजुच्या स्टुलावर ठेवली आणि त्या महाराजांच्या पाया पडायला
पुढे झाल्या.
त्या
आपल्या पाया पडतायत असे बघुन महाराज आपले पाय मागे घेत म्हणाले, अहो माझ्या पाया
पडायला मी काही कोणी महाराज वगैरे नाही किंवा कोणता बुवाही नाही. उलट मला या
बुवाबाजीची अतिशय चीड आहे. मी आपला साधा माणूस आहे. या गावाच्या वाटेने जात होतो,
गाव चांगला वाटला म्हणून विचार केला या गावात दोन दिवस काढावेत आणि पुढे जावे.
अर्थात आपल्या गावकऱ्यांनी रहायची परवानगी दिली तरच ते शक्य आहे.
तरीही
राधाकाकूंनी त्यांना नमस्कार केला आणि त्या म्हणाल्या, हे बघा महाराज! तुम्ही कोण
आहात? काय आहात? हे काही आम्ही तुम्हाला विचारले नाही. परंतु आपल्या आवाजात जो भाव आहे,
आपल्या हावभावात जे शुचित्व आहे, ते पाहूनच माझ्या धन्यांनी आपल्याला आज घरी आणले
आहे. आपण जर बुवाबाजी करणारे असता तर माझे धनी आपले असे स्वागतच न करते. कारण
त्यांनाही बुवाबाजीची भयंकर चीड आहे. अहो ते म्हणतात, गावामध्ये अंधश्रद्धा
पसरवणारा बुवा आढळला तर त्याला उघडा पाडुन पोलीसांच्या ताब्यात देणे हे सरपंच
म्हणून माझे कर्तव्यच आहे.
हंबीरराव
या गावाचे सरपंच आहेत हे समजताच मात्र महाराज हंबीररावांच्या समोर गेले आणि आपले
हात जोडुन त्यांना म्हणाले आपण या गावचे सरपंच आहात हे ऐकुन खूप आनंद झाला.
आपल्याला म्हणजे गावच्या प्रमुखाला भेटून दोन दिवस गावात रहाण्याची परवानगी
मागायची हे मी ठरवले होतेच. कारण समर्थांनीच दासबोधात म्हटले आहे.
कोणी एके
ग्रामीं अथवा देशीं| राहणें आहे आपणासी |
न भेटतां
तेथिल्या प्रभूसी| सौख्य कैंचें ||
योगा
योगाने आपली भेट झाली बरे झाले. आता मी आपल्याला माझी माहिती सांगतो. त्याची
आपणाला जरुरी वाटो अथवा न वाटो. परंतु ती आपणाला सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. एक
अनोळखी वाटसरु ज्याचा गावात कोणाशी काही संबध नाही आणि तो आपल्या गावात चार दिवस रहायच
म्हणतोय म्हणजे तो कोणी चोर लफंगा असू शकतो ही शंका आपल्याला येणे वाजवी आहे.
अहो
महाराज, असं काय म्हणता? आम्हाला काय माणसाची ओळख नाही? आपण कोणीही असाल पण चोर लफंगे निश्चितच नाही, हे माझी अनुभवी नजर मला
सांगत आहे. असे सरपंच हंबीरराव म्हणाले.
त्यावर
महाराज म्हणाले, तरीही तुमची इच्छा असो अथवा नसो मला माझी ओळख सांगणे माझे कर्तव्य
वाटते. आणि ते सर्व आपण ऐकुन मगच मला आपल्या गावात रहायची अनुमती द्यावी ही आपणाला
विनंती आहे.
ठिक आहे
महाराज, आम्ही तुमची सर्व हकीगत निश्चितपणाने ऐकु. पण त्या आधी आमच्या मंडळींनी आणलेल्या
या दूधाचा आपण स्विकार करावा. मग निवांतपणाने आपली हकीगत आपण आम्हाला सांगावी.
त्यानंतर
राधाकाकूंनी गार झालेले दूध परत गरम करुन आणले. त्यानंतर हंबीरराव आणि महाराज
यांनी दुग्धप्राशन केले. त्यानंतर राधाकाकूही तेथिल खुर्चीवर बसल्या आणि
महाराजांनी आपली हकीगत सांगायला सुरवात केली.
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा