बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग १२

१२
     मारुति मंदिरातिल सभामंडपात एक मोठी सतरंजी अंथरली होती. त्यावर सरपंच हंबीरराव, दिनकरराव, शेळके गुरुजी, लक्ष्मण गोरिवले, पांडुरंग यादव, हेमंत, गणेश, हेरंब, जितेंद्र आणि महाराज बसले होते. काल ठरल्याप्रमाणे हंबीररावांनी आज सगळ्यांना येथे बोलावले होते. विषय होता अर्थातच देवीच्या डोंगरावर सुधारणा करुन त्यावर परवा स्वाध्याय केंद्रात सांगितलेली वृक्ष मंदिर ही संकल्पना राबवण्याची. थोडावेळ इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर सरपंचांनी मुख्य विषयाला हात घातला. ते म्हणाले आज आपण येथे कशा करिता जमलो आहोत हे आपणा सर्वांना माहित आहे कां?
            सरपंच आपण हा वृक्ष मंदिराचा प्रयोग करायच्या दृष्टीने विचार करण्यासाठी येथे जमलो आहोत हे आमच्या लक्षांत आले आहे. त्याकरिता सोमजाई मंदिराची जागा वापरायला आपल्या गोविंदरावांनी संमती दिली आहे हे देखिल आपण आता जाहिर करुयात. परंतु या प्रयोगाची सखोल माहिती काढणे जरुर आहे. त्यात सगळ्यांत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या सर्व कामाकरिता लागणारा पैसा आपण कसा उभा करणार आहोत? देवीच्या भक्तांनी या प्रकल्पात श्रमदान केले तरी भरपुर खर्च येणार आहे. त्याची आपण काय तरतूद करणार आहोत?  याचे उत्तरही आपण या बैठकीत शोधणार आहोत. बरोबर नां, मी म्हणतोच ते? शेळके गुरुजींनी मुद्यालाच हात घातला.
     काय काय कामे करावी लागतिल याचा आधी आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. त्यातिल किती कामे श्रमदानाने करणे शक्य होईल? याचा सखोल अभ्यास करावा लागेल. हेरंबने आपले मत मांडले.
     माझ्या मते सर्वात प्रथम आपल्याला. त्या जागेचे टप्या टप्याने लेव्हलिंग करावे लागेल. त्याकरीता लागणारे दगड आणि माती आपल्याला त्या जागेतुनच मिळु शकेल. गणेशने आपले कृषी विषयक ज्ञान वापरुन सांगितले.
     आपल्याला माती आणि दगड तिथेच कसे काय मिळतिल? सरपंचांनी आपली शंका विचारली.
महाराज आणि आम्ही चौघेजण चैत्र पोर्णिमे पूर्वी देवीचा डोंगर फिरुन पाहिला होता. तेव्हा आम्हाला एका ठिकाणी जमिन ओलसर असल्याचे लक्षांत आले होते. त्या ठिकाणी जर आपण एक प्रशस्त पाझर तलाव बांधला तर आपल्याला लेव्हलींग करण्या करीता लागणारे मटेरियल मिळेल. शिवाय त्या पूर्ण जागेला गडगा बांधायलाही दगड मिळतिल. पण तिथे खोदण्यासाठी कदाचित सुरुंग लावावे लागतील. जर जांभा दगड मिळाला तर तो फोडायला त्यातली तज्ञ माणसे घ्यावी लागतील. गणेशने माहिती दिली.
या शिवाय आणखी काय काय खर्च लागेल. आपण ढोबळ अंदाज काढुया. दिनकरराव बोलले.
आपल्याला मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या प्रकारची रोपे लागतिल. साधारण आठ हजार झाडे  आपल्याला लावता येतिल. त्याकरिता पाण्याची व्यवस्था करायला लागेल. तेवढे खड्डे खणायला लागतील. सर्व जागेला ढोरा गुरांपासुन रक्षण करण्या करीता कुंपण किंवा गडगा बांधावा लागेल. माझ्या अंदाजाने आपल्याला आठ ते दहा लाख रुपये कमीत कमी खर्च येईल. यातील बरेचसे काम श्रमदानाने केले तरचा हा अंदाज आहे. हेरंबने आपला अंदाज सांगितला.
आतापर्यंत गप्प राहुन सर्व संवाद ऐकणाऱ्या महाराजांनी आता बोलायला सुरवात केली. ते म्हणाले, सरपंच, गुरुजी, दिनकरराव आपण आतापर्यंत आपले अंदाज बांधलेत ते बरोबरच आहे. यावर माझा असा विचार आहे. आपल्या पैकी कोणितरी त्या नवनितभाईंच्या गावाला जाऊन प्रत्यक्ष  तिथे काम कसे चालते ते प्रत्यक्ष पाहून यावे. दरम्यानच्या काळात एखाद्या तज्ञ माणसाला बोलावुन या वृक्ष मंदिर प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन घ्यावा. त्यात कोणकोणती कामे करायला हवीत. त्याची खर्चासह सविस्तर यादी. प्रकल्पाचा आराखडाही करुन घेता येईल. ती तज्ञ व्यक्ति कोणती झाडे कुठे लावावित याचीही तपशिलवार माहिती देईल. त्यामुळे आपल्याला नेमकी किती रक्कम उभी करावी लागेल याचाही अंदाज येईल.
महाराज म्हणतात ते बरोबर आहे. माझ्या माहितीत असा एक माणूस आहे. ते फॉरेस्ट खात्यातुन रिटायर्ड झाले आहेत त्यांना असल्या कामाचा बराच अनुभव आहे. देवीचे काम आहे म्हटल्यावर ते पैसेही घेणार नाही. फक्त आपल्याला त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना एक दोन वेळा ती पूर्ण जागा दाखवावी लागेल. दिनकरराव म्हणाले.
मग दिनकरराव लागा कामाला! तुमच्या त्या माणसाला बोलावुन घ्या आणि सविस्तर माहिती गोळा करा. आता राहिला प्रश्न गुजराथ मध्ये कोण जाणार? सरपंचांनी निर्णय घेऊन टाकला.
सरपंच काका, माझी गणेशची आणि लक्ष्मणची गुजराथला जाण्याच्या विषयावर चर्चा झाली आहे. मी पुढच्या आठवड्यांत जामनगरला म्हणजेच सौराष्ट्रात आमच्या कंपनीतर्फे ट्रेनिंगला जाणार आहे. नवनितभाईंचे गाव तिथुन जवळच आहे. तेव्हा माझ्याबरोबर गणेशही तिकडे येणार आहे. आम्ही दोघेही तिथे जाऊन तो वृक्षमंदिराचा प्रयोग पाहून येऊ. त्यानंतर गणेश तुम्हाला सविस्तर माहिती देईल. पांडुरंगने सांगितले.
हे सगळे ठरले तर मग! हेरंबने विचारले.
तरीही लागणा-या एवढ्या पैशाची व्यवस्था आपण कशी करणार आहोत? हेरंबने विचारले.
हे बघ हेरंब! आपल्यापुढे आता पैशाचा प्रश्न घेण्याचे कारण नाही. सर्वप्रथम आपल्याला या प्रकल्पासंबंधी परिपूर्ण माहिती गोळा करायला हवी. म्हणजेच आपल्याला नेमकी किती रक्कम लागेल याचा अंदाज येईल. आत्ता आपण जे ८-१० लाखाचा आकडा काढला तो एकतर ढोबळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही रक्कम काही एकरकमी लागणार नाही. बरोबर आहे नां मी म्हणतो ते? महाराजांनी विचारले.
बरोबर आहे! सगळ्यात आधी गणेश गुजराथ मध्ये जाऊन तो प्रकल्प पाहून येईल. तो येईपर्यंत दिनकररावांचे स्नेही आपल्याला सविस्तर प्रकल्प अहवाल देतील. या गोष्टीला जवळपास १०-१२ दिवस जातिल. तेवढ्या काळांत आपल्याला सोमजाईच्या भक्तांची गावोगावी जाऊन भेट घ्यायला पाहिजे. हा प्रकल्प आपण ज्या भक्तांच्या सहकार्यांने करणार आहोत. तेव्हा आधी त्यांनाही मनाने तयार करायला हवे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पात महिलांचाही सहभाग असायला हवा तरच हा प्रकल्प यशस्वी होईल, तेव्हा गावोगावी होणाऱ्या बैठकांना महिलांनाही बोलवायला हवे. तेव्हा गावोगावी जाऊन बैठका घेऊन लोकांना ही गोष्ट समजाऊन सांगायची जबाबदारी कोण घेतोय? सरपंचांनी विचारले.
काका आम्ही ही जबाबदारी घेतली असती पण आमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तेव्हा आमच्या जोडीला आपल्यापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्ती आली  तर मी आणि हेमंत गावोगावी जाऊन बैठका आयोजित करु. हेरंबने जबाबदारी स्विकारली.
ठिक आहे! मी या दोघांबरोबर जाईन. फक्त बैठका संध्याकाळी घ्यायच्या कारण मला दिवसा वेळ मिळणार नाही. लोकांनाही संध्याकाळची किंवा रात्रीची वेळ सोईस्कर होईल. दिनकररावांनी सांगितले.
मी देखिल येईन! शेळके गुरुजींनी सांगितले.
मग ठरलं तर! सगळ्या आघाड्यांवर एकाचवेळी काम सुरु करायचे. सरपंचांनी आजच्या बैठकीचा समारोप करण्याच्या हेतूने सांगितले.
बरं कां मंडळी! आपली ही तयारी पाहून माझा असा विचार आहे की, मी आता माझा मुक्काम मारुती मंदिरातुन सोमजाई मंदिराकडे हलवावा. जेणे करुन मी माझा फावला वेळ या कार्यात माझा खारीचा वाटा उचलण्याकरिता उपयोगी आणू शकेन. या गोष्टीला आपली कोणाची हरकत नाही नां! महाराजांनी आपला मनोदय जाहिर केला.
पण महाराज आपण गाव सोडुन तिकडे त्या उजाड जागेत कसे रहाल? सरपंच आणि शेळके गुरुजींनी एकदमच विचारले.
अहो माझ्या सारख्या फकिराला गांव काय आणि डोंगर काय सगळे सारखेच! तेव्हा माझी चिंता नको. तेव्हा आता ही प्राथमिक तयारी झाली की, साधारण पंधरा दिवसांनी देवीच्या पंचक्रोशीतिल सर्व भक्तांची एक सभा सोमजाई मंदिरातच आयोजित करा. म्हणजे तुम्ही गावोगावी जाल तेव्हा तुम्हाला तसे सांगता येईल. माझ्या मते तिथपर्यंत अक्षय तृतिया येईल. अक्षय तृतियेला केलेला संकल्प अक्षय टिकेल. महाराजांनी संकल्पदिनाचा मुहूर्तच सांगुन टाकला.
महाराजांचे म्हणणे बरोबरच आहे! तिथपर्यंत आपण आपली तयारी पूर्ण करुन अक्षय तृतियेला वृक्ष मंदिराचा संकल्प जाहिर करुया! आणि लगेचच एखादा चांगला दिवस पाहून कामाला सुरवातही करुया! सरपंचांनी जाहीर करुन टाकले.
बाकीच्या सगळ्यांनी त्याला आपले अनुमोदन दिले आणि आजची ही नियोजन बैठक संपन्न झाली.

**************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा