६
हनुमानवाडीच्या पूर्वला असलेले सोमजाई मंदीर
गावापासुन जवळपास पांच सहा किलोमिटर अंतरावर आहे. हे सोमजाई मंदिर ज्या टेकडीवर
आहे त्या टेकडीला देवीचा डोंगर असेच म्हटले जाते. दरवर्षी चैत्र पोर्णीमेला येथे
जत्रा भरते. या जत्रेला हनुमानवाडीच्या पंचक्रोशीतिल लोक मोठ्या भक्तीभावाने
येतात. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी पायथ्यापासुन मोठी चढण चढावी लागते.
सर्वसामान्य माणसाला ती चढण चढुन जाण्यास एक तास तरी लागतो.
चढण चढुन
गेल्यावर मात्र आपण एवढा डोंगर चढल्याचे सार्थक झाल्याची भावना निर्माण होते.
देवीच्या डोगरावर सोमजाई मंदिरचा परिसर खूप मोठा आहे. जवळपास आठ एकराच्या
मैदानसदृष्य पठाराच्या मधोमध हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर अतिशय साधे कौलारु
छपराचे आहे. मंदिराच्या समोरच पोखरण किंवा पुष्करिणी आहे. मंदिराच्या परिसराच्या
पलिकडे एक मोठी रिकामी जागा आहे. ती जागा म्हणजे ओसाडवाडीच आहे. सगळीकडे खुरटे गवत
उगवुन वाळुन गेलेले आहे. कुठे बोरी बाभळीची झुडपे उगवलेली दिसतात. मंदिराचा परिसर आणि ही जागा याच्या मध्ये
पावसाळी वहाणारा ओढा आहे. त्याला आक्टोबर पर्यंत पाणी असते. एरवी तो कोरडाच असतो.
सोमजाईच्या
मंदिराचीही एक आख्यायिका होती. गणेशच्या पूर्वजांच्या स्वप्नात देवी आली आणि तिने
मी डोंगरावर रहायला आले आहे असे त्यांना सांगितले होते. मी मातीच्या आड दबुन
राहिले आहे. मला बाहेर काढ आणि माझे मंदिर बांध. म्हणून देवीने कुठे खोदायचे ती
जागा त्यांना स्वप्नात सांगितली होती. आपल्या स्वप्नाची कथा त्यांनी गावकऱ्यांना
सांगितली. मग सर्वांनी मिळुन खूणेचे झाड शोधुन काढले. त्या झाडाखाली चार पाच फुट
खणल्यावर त्यांच्या पहारी कशावर तरी आपटल्या. मघ त्यांनी सावकाश खणायला सुरवात
केली असता तीन देवींचा आकार असलेली ओबड धोबड मूर्ती मिळाली. त्याच जागेवर सध्याचे
मंदिर बांधले गेले. काही वर्षांनी देवीला कौल लावुन नवीन तीन मूर्ती स्थापन
करण्याची परवानगी घेऊन सध्याच्या सरपंचांच्या आजोबांनी देवीची संगमरवरी दगडाच्या महाकाली,
महासस्वती आणि महालक्ष्मीच्या मूर्ती खास जयपुरहून तयार करुन घेतल्या होत्या. त्या
मूर्तींची विधिवत स्थापना करण्यांत आली होती. सध्या मंदिरात त्याच मूर्ती पूजेमध्ये
आहेत. जुन्या मूर्तीचे विसर्जन न करता ती देखील गाभा-यात एका बाजुला स्थापन करुन ठेवलेली
होती.
आता
दुपारचे तीन वाजले होते. हवेत खूप उष्मा होता. उनही भरपुर होते. या अशा प्रखर
उन्हात महाराज आणि आपले चौघे मित्र देवीचा डोंगर चढत होते. महाराज भराभरा चालत
होते. त्यामानाने हे चौघे जरा हळू चालत होते. डोक्यावर तापत असलेल्या उन्हामुळे
अंगातुन वहाणारा घाम तसाच सुकुन जात होता. सर्वांच्याच घशाला कोरड पडली होती.
शेवटी धापा टाकत टाकत ते पांचहीजण देवीच्या समोरच असलेल्या पोखरणी जवळ आले. पोखरणी
जवळ आल्यावर जी वा-याची झुळुक आली इतकी सुंदर होती की तिने आतापर्यंत केलेले
चढण्याचे श्रम कुठल्या कुठे पळुन गेले ते समजलेच नाही. पोखरणीच्या मधोमध
विहीरीसारखा एक चौकोनी हौद होता. तिथे जायला पोखरणीच्या मधोमध दगडी रस्ता तयार
केलेला होता. पांचही जणांनी पोखरणीमध्ये जाऊन आपले पाय त्या थंडगार पाण्यात
बुडवले. पाण्यांत पाय बुडवताच त्यांचा उरला सुरला शिणही दूर पळाला.
पाय
धुतल्यावर सगळे मधल्या विहिरीवर गेले. हेमंतने तिथेच असलेल्या हात रहाटाने पाणी
काढुन सर्वांना प्यायला दिले. त्या मधुर आणि थंड पाण्याने त्यांचा उत्साह
द्विगुणित झाला.
इतक्या
उंचावर असुनही विहिरीला पाणी भरपूर दिसते! शिवाय चवही मधुर आहे! महाराज
त्या चौघांना बोलले.
परवा
शनिवारी शेळके गुरुजी आणि सरपंच मंदिरात आले होते तेव्हा त्यांच्या चर्चेत या
देवळाचा उल्लेख झाला होता. म्हणून महाराजांना या सोमजाई मंदिरात जायचे होते. आज
मंगळवार होता भीक्षा मागुन आल्यानंतर जेवण होताच त्यांनी या मंदिरात जायचे ठरवले.
ते मंदिरात जायला निघाले तेव्हा गणा, जितू, हेरंब आणि हरेश तेथे आले होते. मग तेही
महाराजांच्या बरोबर मंदिरात आले होते.
पाणी
पिऊन आणि चेहऱ्यावर पाणी मारल्यावर ते पांचहीजण मंदिरात देवीच्या दर्शनाला गेले.
देवीच्या गाभाऱ्यात संगमरवराच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तिन मूर्ती होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर
लगेचच मन प्रसन्न होत असे. सोमजाई देवी ही महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या
त्रिगुणात्मक रुपांत आहे. महाराजांच्या सह सर्वांनी देवीला दंडवत घातला. त्यानंतर
महाराजांनी तिच्या तिनही रुपांचे ध्यान मंत्र म्हटले. देवीच्या सभामंडपात बसुन मग
त्यांनी श्रीसूक्त आणि देवीसूक्ताचेही पठण केले. सभामंडप तसा प्रशस्त होता. चारही
बाजुन ओपन असल्यामुळे छान हवा आत येत होती.
गणेश,
तुझ्या पूर्वजांच्या स्वप्नांत ही देवी आली होती असे मी ऐकले आहे. म्हणजेच तिचा
वरदहस्त तुमच्या घराण्यावर नक्कीच आहे. तू जर योग्य प्रयत्न केलेस तर तुला ही आई
सोमजाई देवी तुला खात्रीने यश देईल. महाराज गणेशला म्हणाले.
होय काका! मी प्रयत्नात कुठे कमी
पडणार नाही. फक्त मला संधी मिळायला पाहिजे. मी सामाजिक वनीकरणामध्ये डिग्री केली
आहे. त्यामुळे मला जरी एखादी ओसाड जमिन
जरी मिळाली तरी मी तिचे नंदनवन करुन दाखविन. वनिकरणाकरीता बागाईतीसारखे भरपुर
पाण्याचीही गरज नाही आणि जागाही अगदी सखलच हवी असेही नाही. गणेशने आपल्यावतीने
खात्री दिली.
काका,
गणेश म्हणतो ते बरोबर आहे, आम्ही कष्टाला मागेपुढे बघणार नाही. फक्त आम्हाला संधी
मिळायला पाहिजे. मी ही शेतीशास्त्रामध्ये डिग्री केली आहे. त्यामुळे मलाही जर
एखादी ओबड धोबड जमिन मिळाली तर मी ती लेव्हल करुन तिथे पाणी मुरवुन तिला सुजलाम
सुफलाम करुन दाखविन. हेरंबने देखिल आत्मविश्वासाने सांगितले.
हरेश आणि
जितूनेही आम्हाला योग्य संधी मिळाली तर आम्ही तिचे सोने करुन दाखवु असे प्रतिपादन
केले. त्यानंतर सगळेजण देवीच्या मंदिराचा परिसर पहायला गेले. तिथपर्यंत उन्हही जरा
सौम्य झाले होते. फिरत फिरत ते मंदिराच्या बाजुला असलेल्या ओसाड जागेत गेले. खूप
मोठी जागा दिसत होती. मात्र त्या जागेत कुठे उंचवटे तर कुठे खड्डे दिसत होते.
मध्येच एका ठिकाणी ओलसर जागा दिसत होती. नुकतेच तिथले पाणी आटलेले होते. त्या
जागेमध्ये सर्वत्र बोरीची आणि बाभळीची झुडुपे दिसत होती. पायाखालचे गवत सुखलेले
दिसत होते.
काय रे
गणेश! किती होईल ही जागा आणि या
जागेत काय काय होऊ शकते? महाराजांनी कुतुहलाने विचारले.
काका, ही
जागा १००-१५० एकरांपेक्षा जास्त वाटते! आपण आता ज्या ओलसर जागेवर उभे होतो ना, तिथे जर पाझर
तलाव बांधला तर या सगळ्या जागेला त्याचे पाणी पुरेल. ही जागा म्हणजे सोने आहे. यात
फळबाग होऊ शकते. आपल्या पूजेला जी पत्री लागते त्या पत्रीमध्ये जी जी झाडे
सांगितली आहेत त्यातली बरीचशी झाडे येथे होऊ शकतील. हल्ली औषधी वनस्पतींचे उद्यान
जर तयार केले तर त्याला मोठे मार्केट आहे. गणेश आणि हेरंबने एकदम सांगितले.
पण काय
रे! ही जागा कोणाच्या मालकीची
आहे काय? महाराजांनी विचारले.
ही
मंदिराची जागा देवस्थानची असेल! बाजुची ही ओसाड जागा आहे ती नक्की कोणाची आहे माहित नाही. कदाचित फॉरेस्ट
खात्याची असेल. सरपंचाना माहीत असेल. गणेशने सांगितले.
अशीच चर्चा
करत करत ते देवीचा डोंगर उतरुन परत मारुति मंदिरात आले. मंदिरात पोचे पर्यंत
संध्याकाळ झाली. चौघे मित्र आपापल्या घरी गेले. महाराज सरळ नदीवर गेले, तिथे स्नान
करुन परत देवळात आल्यावर त्यांनी आपले दैनंदिन पठण सुरु केले. त्यांचे पठण संपते
आहे तोच गावातुन सात आठ मुले मंदिरात आली. हल्ली ही मुले महाराजांकडे
सायंप्रार्थना शिकायला यायला लागली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा