८
सरपंच नुकतेच ओसरीवर
येऊन बसले होते. त्यांची दैनंदिन पूजाअर्चा होताच राधाकाकूंनी त्याना नाश्ता आणि
दूध घेण्यासाठी स्वयंपाकघरात बोलावले होते. नाश्ता करता करता त्यांनी आज
संध्याकाळी सात वाजता मारुति मंदिरात विशेष सभा असल्याचे सांगितले. त्या सभेला
त्यांनाही यायला हवे हे त्यांनी आवर्जुन सांगितले. ओसरीवरच्या खुर्चीत बसुन ते आज
आलेले पेपर बघत होते. तेवढ्यांत त्यांनी वेशीतुन पांच सहाजण आत येताना दिसले
त्यांच्या सोबत काही बायकाही दिसत होत्या.
तेवढ्यांत
त्यांच्यापैकी अर्जुन शिर्के पुढे झाले आणि त्यांनी सरपंचाना नमस्कार करुन आपली
ओळख करुन दिली. ते म्हणाले, नमस्कर काका! मी
अर्जुन शिर्के! शेजारच्याच खेर्डी गावात रहातो.
नमस्कार! अर्जुन शिर्के
म्हणजे, गोविंद शिंर्केचा कोण? गोविंद शिर्के आणि
मी एकाच वर्गात शिकायचो!
सरपंच बोलले. पण ही मंडळी कोण? आपल्या भागातली दिसत नाहित.
काका मी त्याच गोविंद शिर्केंचा मुलगा! मला
बाबा बोलले होते तुमच्या बद्दल. ही लोक स्वाध्यायी आहेत. आमच्याकडे खेर्डीला प.
पू. पांडुरंगशास्त्री आठवले प्रेरीत स्वाध्याय केंद्र चालते. पुढच्या आठवड्यामध्ये
आमच्याकडे खेर्डीला जिल्ह्याचे भावमिलन होणार आहे. त्या करिता ही लोक गुजराथ मधुन
आली आहेत. स्वाध्यायाच्या परंपरेप्रमाणे ज्या गावात स्वाध्यायाचे काम नाही त्या
गावात आमचे बंधु भगिनी भक्ती फेरीला जाऊन रहातात. स्वाध्यायाचे विचार लोकांना
सांगतात. त्या करीता हे बंधु आणि भगिनी आपल्या गावात रहाणार आहेत. त्यासाठी आपली
परवानगी घेण्यासाठी आम्ही आपणाकडे आलो आहोत. अर्जुनने सविस्तर माहिती दिली.
ठिक आहे! पण आपण सगळे आत या नां! बाहेर उभे राहुनच का बोलणार आहात? आपण आत या बसा आणि बोला! सरपंचांच्या म्हणण्या प्रमाणे सर्वजण आतमध्ये
येऊन स्थानापन्न झाले.
त्यानंतर
सरपंचानी त्यांचे स्वागत केले. या मंडळी बसा! आमच्या हनुमानवाडीत मी आपले स्वागत
करतो! अरे अर्जुन या मंडळींची ओळख करुन देना! सरपंचांनी अर्जुनला सांगितले.
तेवढ्यात सरपंचांनी आतुन राधाकाकूंनाही बोलावले. राधाकाकू आल्यावर त्यांनी
महिलांची विचारपुस केली. सर्वांना पाणी दिले. लगेचच अर्जुनने आलेल्या लोकांची ओळख
करुन दिली.
काका हे नवनितभाई सौराष्ट्रातिल भावनगर
जवळच्या साबर या गावातुन आले आहेत. हे हरेशभाई, अशोकभाई आणि हे सागरभाई, या
कुमुदताई, वैष्णवी ताई आणि या निर्मलाताई, ही सर्व मंडळी त्या साबर गावातिलच आहेत. अर्जुनने सर्वांची ओळख करुन दिली. त्याचबरोबर आम्हाला आपल्या गावात
चार दिवस भक्ति फेरीला परवानगी द्यावी अशी विनंती ही केली.
काही हरकत नाही! आपण सर्वजण खुषाल रहा गावामध्ये.
चांगल्या कामाकरिता या गावात आला आहात तेव्हा आपले स्वागतच आहे. पण आता ही मंडळी
रहाणार कुठे?
आमच्याकडे रहात असलात तर उत्तमच. यांच्या बरोबर महिला देखिल आहेत तेव्हा, सगळेजणच रहातील आमच्याच घरात! काय? सरपंचांनी आपला विचार सांगितला.
त्यावर नवनितभाई म्हणाले, जय योगेश्वर
सरपंचसाहेब!
आपण आम्हाला आपल्याच घरी रहायला सांगताय याचा आम्हाला आनंद झाला. परंतु
भक्तिफेरीला आल्यावर शक्यतो कोणाचाही घरी राहु नये असा रिवाज आहे. तेव्हा एखाद्या मंदिरात जमले तर ठिक होईल. कृपया आपण नाराज होऊ नका!
मंदिरात म्हणजे गावातल्या मारुति मंदिरात आपण
राहू शकता. पण तिथे महिलांना रहायचे म्हणजे जरा प्रश्न आहे. कारण तिथे आडोसा असा
नाही. तसा महिलांना कपडे वगैरे बदलायला आडोसा करुन देता येईल! त्याचा काही प्रश्न नाही.
दुसरे
म्हणजे तिथे सध्या तिथे आपल्यासारखेच या गावात पाहूणे आलेले रामदासी महाराज
रहातात. म्हणजे ते तिथे जेवण वगैरे नाही बनवत. गावात भिक्षा मागुन ते आपला उदर
निर्वाह करतात. पण दिवसातला बराचवेळ ते तिथेच असतात. पहाटेपासुन त्यांचे तिथे
काहीना काही पठण वाचन चालू असते. गावातली मुलेही तिथे त्यांच्याजवळ काही ना काही
शिकायला येतात. तर असे ठिकाण तुम्हाला चालेल कां? सरपंचांनी विचारले.
त्यावर नवनितभाईंनी उत्तर देण्याअगोदरच
कुमुदताई बोलल्या, सरपंच साहेब! त्या मंदिरात जर असे सत्पुरुष रहात असतिल तर आम्ही तिथेच राहू.
तेवढाच आम्हालाही सत्संग होईल. आणि आम्ही जेव्हा भक्तिफेरीला बाहेर पडतो तेव्हा
उघड्या माळरानावरही रहाण्याची तयारी केलेली असते. तेव्हा कपडे बदलायला आडोसा वगैरे
करुन देण्याचीही जरुरी नाही. आता आम्हाला निरोप द्या. आम्ही मारुति मंदिरात रहायला
जातो.
तेवढ्यांत राधाकाकू पुढे झाल्या आणि
म्हणाल्या, आपण एवढ्या लांबुन आमच्या गावात आलात तेव्हा मी तशीच कशी जाऊ देईन? आता आपण इथेच जेवा मग दुपारी उन्ह
उतरल्यावर तिकडे जावा.
त्यावर निर्मलाताई पुढे झाल्या आणि
म्हणाल्या, ताई आपण जेवायचे निमंत्रण दिलेत आम्हाला खूप आनंद झाला! परंतु भक्तिफेरीचे काही नियम आहेत आणि
त्या नियमाप्रमाणे आम्ही आमचा शिधा बरोबर घेऊन येतो. आम्हाला कोणाकडेही खायला
प्यायला परवानगी नाही. कृपया राग मानु नका. आपण दिलेले पाणी आम्ही प्यायलो त्यात सSSर्व पाहूणचार आला.
मगं निघु का आम्ही सरपंचकाका? अर्जुनने विचारले.
त्यावर
सरपंच बोलले, चला! मीच तुमच्या बरोबर येतो आणि तुमची सोय लाऊन देतो.
************
आज चैत्र पोर्णिमा आणि आज हनुमान जयंती.
हनुमानवाडीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा होता. गेली अनेक वर्षे गावातिल मारुति
मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात असे. आज मारुति मंदिराचा परिसर रंगी
बेरंगी पताकांनी सजवलेला होता. मंदिराचे आवार स्वच्छ करुन जमिनीवर पाणी मारुन धुळ
उडणार नाही याचा बंदोबस्त केला होता. या कामामध्ये गावातल्या तरुण मुलांनी
उत्साहाने भाग घेतला होता. त्यामध्ये हेमंत, गणेश, हेरंब, जितेंद्र यांच्या
व्यतिरिक्त पांडुरंग यादव, लक्ष्मण गोरिवले देखिल मदत करीत होते.
आज
पहाटेच महाराजांनी आपले दैनंदिन कार्यक्रम उरकल्यानंतर खास हनुमान जयंती
निमित्ताने मारुतिरायांना रुद्राचा अभिषेक केला होता. हनुमान जयंती निमित्ताने आज संध्याकाळी सात वाजता येथे गावक-यांची एक विशेष सभा आयोजित केलेली आहे.
सरपंचांनी महाराजांना या सभेत गावक-यांना देवाच्या चार गोष्टी सांगाव्यात अशी
विनंती केली होती.
आता सकाळचे साडेनऊ वाजले होते. नुकतीच सर्व
कार्यकर्ती तरुण मंडळी साफसफाईचे आणि सजावटीचे काम पूर्ण करुन घरी गेली होती.
महाराज झालेल्या सर्व कामांच्यावर नजर टाकीत मंदिराच्या आवारात उभे होते. तेवढ्यात
त्यांना समोरुन सरपंच आणि काही मंडळी येताना दिसत होती.
महाराजांनी त्यांना
सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले. या सरपंच साहेब! आपण
आत्ता या वेळी कसे काय? आपण तर एकदम संध्याकाळीच येणार होतेत नां?
होय महाराज! मी तसेच ठरवले होते. पण ही स्वाध्यायी मंडळी घरी
आली होती, त्यांना घेऊन आलोय! ही लोक गुजराथ मधुन भक्तिफेरी करिता
आपल्या गावात आली आहेत. सरपंच म्हणाले.
मंदिराच्या आवारात
शिरल्यावर आजुबाजुला सर्व चकाचका झालेले पाहून ते म्हणाले, संध्याकाळच्या सभेची
तयारी पूर्ण झालेली दिसते. आवार एकदम झकपक झालेले दिसत आहे. पण चला आपण आतच जाऊ, तिथेच मी तुम्हाला सर्वांची ओळख करुन
देतो.
सगळेजण
या दोघांच्या पाठोपाठ मंदिरात गेले. प्रथम सगळ्यांनी मारुतिरायाचे दर्शन घेतले.
नंतर महाराजांनी तेथेच असलेली मोठी सतरंजी अंथरायला घेतली. ते बघुन सरपंच
त्यांच्या मदतीला गेले. त्या दोघांना काम करताना पाहून अर्जुनने सतरंजी आपल्या
ताब्यात घेतली आणि त्याने ती व्यवस्थित अंथरली. सतरंजी अंथरल्यावर सर्वजण त्यावर
बसली.
सर्वजण
बसताच सरपंचांनी त्यांची महाराजांना ओळख करुन दिली. महाराज
म्हणाले, आपण स्वाध्यायी आहात हे ऐकुन आनंद वाटला. कारण प. पू. दादा ज्या रोह्याचे
आहेत त्या जिल्ह्यातच माझे गाव आहे. मी दादांची अनेक प्रवचने ऐकली आहेत. ठाण्याला
विद्यापिठातही जाऊन आलेला आहे. आमच्या गावात योगेश्वर कृषी हा दादांचा प्रयोग
देखिल केला गेलेला आहे. पण दुर्दैवाने ते आता सगळे संपले आहे.
महाराज
ही लोक आता चार दिवस येथेच रहाणार आहेत! आपल्याला काही
त्रास तर नाही नां होणार?
सरपंचांनी महाराजांना विचारले.
अहो
सरपंच मला कसला त्रास होणार? उलट यांनाच माझा
त्रास होऊ शकतो. मला काय मारुतिचे देऊळ काय आणि देवीच्या डोंगरावरचे सोमजाई मंदिर
काय सर्व सारखेच आहे. उलट यांना जर अडचण होणार असेल तर मीच चार दिवस सोमजाई
मंदिरात राहिन. महाराज म्हणाले.
या
दोघांच्या संवादात हस्तक्षेप करित नवनितभाई म्हणाले, सरपंच आणि महाराज मी आपणा
दोघांनाही सांगतो, महाराजांना कुठेही जायची गरज नाही. उलट त्यांचा सत्संग आम्हाला
मिळतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे.
ठिक
आहे! पण आता आपल्याला या महिलांकरिता काहितरी आडोसा
करायला पाहिजे. सरपंच बोलले.
त्यावर महाराजांनी सरपंचांना सांगितले ती
व्यवस्था मी करुन घेईन. आपली तरुण कार्यकर्ते मंडळी जेवण झाल्यावर येणारच आहेत
त्यांना मी ते काम सांगतो. ते आवडीने करतील.
************
संध्याकाळचे साडेसहा
वाजले होते. मारुति मंदिराच्या आवारात सगळीकडे लाईटिंग केलेली होती. मधुन मधुन
खांब रोवुन त्यावर फ्लडलाईटसही लावले होते. खाली जमिनीवर जाजम अंथरले होते.
मारुतिच्या गाभा-यांत लावलेल्या उदबत्यांचा सुवास बाहेर सुद्धा दरवळत होता.
त्याच्या जोडीला आवारात सर्वत्र मातीच्या घमेल्यामध्ये निखारे घालुन त्यांत धुप
घातलेला होता. त्यामुळे वातावरण एकदम सुगंधित झाले होते.
जाजमावर एका बाजुला
सरपंच हंबीरराव, महाराज, शेळके गुरुजी, गणा, हेरंब, जितू, हेमंत, हेमंतचे मोठे भाऊ
दिनकरदादा, पांडुरंग यादव, लक्ष्मण गोरिवले, गुजराथमधुन आलेले
स्वाध्यायी बंधू शिवाय गावातले इतर १५-२० लोक बसली होती. दुस-या बाजुला राधाकाकू,
निर्मलाताई, कुमुदताई, वैष्णवीताई, हेमंतची वहिनी ज्योत्स्ना शिवाय गावातल्या पांच सहाजणी
बसलेल्या होत्या.
बरोबर सात वाजता
लक्ष्मण गोरिवले उठुन उभे राहीले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी मारुतिरायाला नमस्कार
केला. मग बाहेर येऊन आवारात बसलेल्या सर्व लोकांच्या समोर येऊन सर्व गावकऱ्यांना
नमस्कार केला. सर्व गावक-याचे स्वागत करित त्यांनी बोलायला सुरवात केली.
ते म्हणाले, माझ्या
सर्व गावकऱ्यांनो हनुमान जयंतीच्या शुभ दिवसाला आपली आजची विशेष सभा सुरु होत आहे.
आपल्या आजच्या सभेला गुजराथ मधुन भक्ति फेरीला आलेले स्वाध्यायी बंधू देखिल हजर
आहेत. मी त्यांचे गावकऱ्यांच्यावतिने त्यांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या
गावात गेले १०-१२ दिवसांपासून रहात असलेले रामदासी महाराजही आज आपल्या सोबत येथे
उपस्थित आहेत. आपण सर्वजणांना आता ते परिचीत आहेतच. त्यांचेही आपल्या सर्व गावकऱ्यांच्या
वतीने स्वागत करतो. कालच आपला सोमजाईचा उत्सव देखिल संपन्न झालेला आहे.
सोमजाईमंदिर परिसराची तसेच आपल्या या मारुती मंदिराची अवस्था काय झाली होती ते आपण
सर्व गावकरी जाणताच. पण त्या दोन्ही ठिकाणी आपल्या या महाराजांच्या प्रेरणेने
आपल्या गावातिल तरुणांनी खास सफाई मोहिम राबवली त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी
झालेला कायापालट आपण अनुभवतोच आहोत. आता मी आपल्या सरपंचांना विनंती करतो की
त्यांनी आजच्या ग्रामसभेच्या कामाला सुरवात करावी.
तत्पुर्वी आज आपल्या
या हनुमान जयंतिच्या विशेष सभेमध्ये आपल्या गावातली आपलीच मुले महाराजांनी
शिकवलेले मारुति स्तोत्र म्हणतिल. तेव्हा आता प्रथम आपण आपल्याच मुलांच्या तोंडुन
मारुति स्तोत्र ऐकुया. लक्ष्मणने खूण करताच हेमंतने मारुति स्तोत्र म्हणणा-या अकरा
मुलांना मारुति मंदिराच्या कट्यावर तयार केलेल्या खास बैठकीवर बसविले. तिथे बसुन
त्या मुलांनी स्वच्छ आणि खड्या आवाजात मारुती स्तोत्र म्हणायला सुरवात केली.
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती|
वानरी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना||१||
आपल्याच मुलांच्या
तोंडुन म्हटले जाणारे हे स्वच्छ आणि खड्या आवाजातिल मारुती स्तोत्र ऐकुन गावकऱ्यांना धन्य वाटले. त्या मुलांच्या
पालकांच्या तोंडावर तर स्पष्टपणाने आपल्या मुलांचा अभिमान दिसत होता. ते
महाराजांकडे कृतज्ञतेने बघत होते. मुलांचे मात्र कोणाकडेच लक्ष नव्हते ते डोळे
मिटुन मारुतिस्तोत्र म्हणत होते.
रामदासी
अग्रगण्यु, कपीकुळासी मंडणु|
रामरुपी
अंतरात्मा, दर्शने दोषनासती||
|| इती श्री रामदासकृतं संकटनिरसनं
मारुतीस्तोत्रं सम्पूर्णं ||
असे म्हणून त्यांनी
आपले पठण पूर्ण केले. त्या मुलांचे पठण संपताच तिथे हजर असलेल्या सर्वांनी टाळ्या
वाजवुन त्यांचे कौतुक केले. मारुतिरायाला नमस्कार करुन ती मुले आपल्या जागेवर जाऊन
बसले. मुले जागेवर जाऊन बसताच परत सरपंच उभे राहिले त्यांनी सर्व गावकऱ्यांचे व
पाहुण्यांचे स्वागत केले. सभेचे नेहमीचे विषय संपल्यावर त्यांनी महाराजांना
सांगितले, महाराज आता आपण आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.
महाराज आपल्या
जागेवरुन उठले मारुतिरायाला वंदन केले आणि मंदिराच्या कट्टयावरील आसनावर जाऊन
बसले. तिथे बसुन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधायला सुरवात केली.
माननिय सरपंच साहेब,
दिनकरदादा धुमाळ, गुजराथ मधुन आलेल्या सर्व स्वाध्यायी बंधु भगिनी, हनुमानवाडीच्या
गावकरी बंधु भगिनी आपणा सर्वांना माझा नमस्कार. गेले १०-१२ दिवस मी आपल्या गावात
रहात आहे. आपणच घातलेल्या भिक्षेवर हा देह धारण करतो आहे. आपण सर्वजण मला महाराज
म्हणता आहात. पण खरोखरच मी कोणी महाराज नाही. दुर्दैवाच्या मोठ्या फटक्याने मी
मलाच ओळखत नव्हतो. परमेश्वराच्या कृपेमुळे मला सज्जनगडाचा मार्ग सापडला. तेथे
समर्थांचा सत्संग झाला त्यामुळे मी परत माणसात आलो. तेथिल सत्संगाने मला कळले मी
जो माझा संसार, माझे घर, माझी मुलेबाळे करत होतो. ते सर्व क्षणभंगुर आहे. हा देह
देखिल माझा नाही. त्या देहावर देखिल अनेकजण आपला अधिकार सांगतात.
त्यानंतर
मात्र मला सज्जनगडावरील माझ्या ऐतखाऊपणाचा कंटाळा आला. वाटू लागले हा देह नश्वर
आहे तर त्याचे चोचले पुरवण्यांत काय अर्थ आहे? त्यामुळे या नश्वर देहाचा समाजाकरिता जास्तित जास्त
उपयोग करायचा. त्याचे लाड करायचे नाहित. त्याच उद्देशाने मी सध्या भटकत आहे.
गेली तिन
चार वर्षे मी सज्जनगडावर होतो. समर्थांचा सहवास लाभला. रामदासी संप्रदाय जवळुन
पहाता आला. त्यामुळे आता उरलेले आयुष्य संसाराच्या व्यापात न पडता भिक्षा मागुन
देह जगवायचा. कोणाच्याही घरी रहायचे नाही असे समर्थांच्या चरणी वचन देऊन मी
सज्जनगड सोडला आहे. पुढचा मार्ग आता समर्थच दाखवतिल.
आज आपण
हनुमान जयंतीच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. तेव्हा प्रथम आपण त्याते स्तवन
करुयात.
मनोजवं
मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं
वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
समर्थ
रामदासस्वामींनी गावोगावी हनुमान मंदिराची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेला
मारुती हा शक्तीचा उपासक आहे. त्याच्या एका हातात गदा आहे तर दुस-या हातावर त्याने
द्रोणागिरी पर्वत उचललेला आहे. मारुति हा बुद्धिमतां वरिष्ट आहे. तो अत्यंत
बुद्धिमान होता म्हणूनच त्याला रामरायांनी आपला दूत म्हणून रावणाकडे पाठविले होते.
त्या मारुतिरायांची उपासना म्हणजेच शक्तिची उपासना आपल्याला करायला पाहिजे.
बुद्धिची उपासना आपण करायला पाहीजे. आपल्या युवकांना चांगले मार्गदर्शन देऊन
त्यांना उद्योगी बनवले पाहिजे. आपली युवाशक्ति जर बेकार राहिली तर ती वाईट
मार्गाला लागेल. पण जर त्यांच्यातल्या गुणांना वाव दिला तर ते आपल्या घराचा,
आपल्या गावाचा, आपल्या देशाचा उद्धार करतिल यात शंका नाही. तेव्हा मला आपणाला
एवढेच सांगायचे आहे की त्या युवाशक्तिला वाव द्या. त्यांना उद्योगी बनवा. एवढे
बोलुन मी माझे चार शब्द पुरे करतो.
महाराज
जागेवरुन उठताच सरपंच पुढे झाले व त्यांनी महाराजांच्या भाषणावर आपली प्रतिक्रिया
दिली. ते म्हणाले, महाराज आपण सांगितलेले विचार मला तंतोतंत पटले आहेत. आज मी
हनुमानजयंतीच्या प्रसंगी आपल्याला आश्वासन देतो की, मी गावातल्या तरुणांना
त्यांच्या मध्ये असलेल्या कौशल्यानुसार उद्योग उपलब्ध करुन देण्याचा पूर्ण प्रयत्न
करेन. आता आपली ही हनुमान जयंती निमित्ताने आपण घेतली विशेष सभा मी आटोपती घेतो.
तरीही आपण कोणीही घरी जाऊ नये. आता आपल्या समोर आपल्या गावात गुजराथ मधुन आलेले
आपले स्वाध्यायी बंधु त्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
***********
सरपंचांनी स्वाध्यायी बंधुंना त्यांचा कार्यक्रम
सादर करण्यास सांगितल्यावर अर्जुन शिर्के उठले व त्यांनी प्रथम गावकरी बांधवांना
आपली ओळख करुन दिली. ते म्हणाले, सर्व हनुमानवाडीतील गावक-यांना माझा “जय योगेश्वर”. मी आपल्या जवळच्या खेर्डी येथिल गोविंद शिर्केंचा
मुलगा अर्जुन. आमच्या गावात प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने सुरु
झालेले स्वाध्याय केंद्र आहे. त्या केंद्रात येत्या गुरुवारी पूर्ण सिंधुदुर्ग
जिल्ह्याच्या स्वाध्यायी बंधूंचा भावमिलन कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाचाच
एक भाग म्हणून आपल्या गावात गुजराथच्या सौराष्ट्र भागातिल साबर या गावातुन
नवनीतभाई, हरेशभाई, अशोकभाई, सागरभाई, निर्मलाताई, कुमुदताई आणि वैष्णवीताई
हे स्वाध्यायी बंधू भगिनी भक्ति फेरीला आलेले आहेत. ते दोन दिवस आपल्या गावातिल
घराघरात वाडी वाडीत फिरतिल आणि स्वाध्यायाचे विचार आपल्याला सांगतिल. भक्तिफेरीचा
एक भाग म्हणजे आज आपल्या या मारुति मंदिरात नवनीतभाऊ स्वाध्याय केंद्र घेतिल.
अर्जुन शिर्के स्वाध्यायाची पार्श्वभूमी
सांगत होते तिथपर्यंत अशोकभाई आणि निर्मलाताई यांनी मारुति मंदिराच्या कट्यावरील
विशेष आसनावर त्यांच्या सोबत आणलेला प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले, योगेश्वर
श्रीकृष्ण, शंकर-पार्वती-गणपति यांचा एकत्र असलेला फोटो पाटावर ठेवला. त्या फोटोला
ताज्या फुलांचा हार घातला. तुपाचे निरांजन लावले. चंदनाचा सुगंध असलेल्या उदबत्या
लावल्या. त्यानंतर अर्जुन शिर्के यांनी नवनीत भाऊंना पुढे बोलावले.
नवनीतभाऊ मंदिराच्या कट्यावरील आसनावर गेले
त्यांनी प्रथम मारुतिरायांना नमस्कार केला. पाटावर ठेवलेल्या योगेश्वर, गणपती, आणि
दादांच्या फोटोला नमस्कार केला आणि कट्यावर गावकऱ्याच्या समोर बसले. सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांना माझा जय योगेश्वर! त्यानंतर त्यांनी आपले डोळे मिटले व
प्रगटस्वरांत योगेश्वर श्रीकृष्णाचे ध्यान मंत्र म्हटले.
वसुदेवसुतं
देवं कंस चाणूर मर्दनम् ।
देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ।।
त्यानंतर हनुमान मारुतिचे ध्यान केले,
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥
आज
आम्हाला हनुमान जयंतीच्या शुभदिनी आपल्याशी संवाद साधायची संधी दिल्याबद्दल माननिय
सरपंच व आपणा सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. आपण सर्व त्या एका परमेश्वराची लेकरे
आहोत. आपल्या सर्वांच्या शरिरात एकच लाल रंगाचे रक्त वहाते. एकाच मातीतून निर्माण
होणारे अन्न आपण सेवन करतो. आपणा सर्वांना त्याच एका परमेश्वराने घडवले आहे. रोज
आपण रात्री झोपतो ते सकाळी वेळेवर उठतो, दिवसभर आपली कामे करतो, भूक लागताच भोजन
करतो रात्र होताच परत विश्रांती घेतो ती त्या परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे
म्हणूनच. आपण जे भोजन करतो त्याचे आपल्या शरिराला आवश्यक असणा-या रक्तामध्ये आणि
उर्जेमध्ये योग्य प्रमाणात तोच परिवर्तन करतो. त्याच्या या कृपे बद्दल आपण
कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे स्वाध्याय.
स्वाध्यायामध्ये
त्रिकालसंध्येला फार महत्व आहे. ती त्रिकाल संध्या म्हणजे काय आहे? सकाळी आपण वेळेवर उठतो ही त्याची
आपल्यावर मोठी कृपाच आहे नाही का? उठल्यापासुन आपण आपल्या शरिराचा भार त्या धरतीमातेवर सतत टाकत असतो.
ती देखिल कोणतीही कुरकुर न करता आपला भार वहात असते. या सगळ्या गोष्टीकरीता आपण
त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेतच नां! म्हणूनच आपण सकाळी उठल्या उठल्या
आपल्या हातामधल्या गोविंदाचे दर्शन घेतले पाहिजे.
आपले
शरिर ज्या अन्नाच्या योगाने चालते. ते अन्न आपल्याला जो पुरवतो आणि त्या
अन्नापासुन शरिराच्या चलन वलनासाठी आवश्यक असणारे रक्त आणि उर्जा जो अचूकपणाने
तयार करतो त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. मुख्य म्हणजे
जो भूक निर्माण करतो त्याचे आपण अतिशय ऋणी असायला पाहिजे. आज अनेकांकडे गडगंज
संपत्ती आहे पण त्यांची अन्नावर वासनाच निर्माण होत नाही. तेव्हा त्या परमेश्वराचे
स्मरण आपण अन्न सेवन करण्यापूर्वी करतो. आपण जे अन्न खातो ते त्याचा प्रसाद म्हणून
खाल्ला तर त्याचा कोणताही दोष आपल्याला लागत नाही.
आपण
दिवसभरात केलेली बरी वाईट कर्मे आपण त्याला अर्पण करतो. अनवधानाने आपण काही पाप
कर्मे करतो त्याबद्दल रात्री झोपण्यापूर्वी आपण त्याची क्षमा मागतो. त्यानंतर त्या
परमेश्वराला “त्वमेव
माताच पिता त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव” असे म्हणून अनन्य भावाने त्याला शरण
जातो. त्याची प्रार्थना करून झोपी जातो. अशाप्रकारे दिवसातुन तिनवेळा आपण त्याची
आठवण काढली तरी ती परमेश्वराला पुरेशी होते. हीच आपली त्रिकाल संध्या आहे.
मगाशी
आपल्या महाराजांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले की तरुणांना त्यांच्या योग्यते
प्रमाणे काम दिल्यास, त्यांच्यातल्या गुणांना वाव दिला तर ते आपल्या घराचा, आपल्या गावाचा, आपल्या देशाचा उद्धार करतिल हे बरोबरच
आहे. प. पू. दादांनी म्हणजेच पांडुरंगशास्त्री आठवले यांनी याचाही विचार स्वाध्याय
चळवळीत केलेला आहे. किनारपट्टीवरिल मच्छीमार बांधवांसाठी योगेश्वर नौका, शेतकरी
बंधूंसाठी योगेश्वर कृषी हे त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे. अनेक गावातिल
बेरोजगार तरुणांना काम मिळाले. त्या कामात भक्ति असल्यामुळे ही तरुण मंडळी अतिशय
आस्थेने काम करतात. त्यातुन मिळणारे उत्पन्न प्रसाद म्हणून स्विकारतात. या अनोख्या
त्यांच्या प्रयोगामुळे अनेकजण त्यांच्या नकळत व्यसनांपासुन लांब गेले कारण त्यांना
स्वाध्यायाचे व्यसन लागले.
आमच्याकडे
अश्याच प्रकारचा आणखी एक प्रयोग दादांच्या प्रेरणेने केलेला आहे त्याचे नांव आहे “वृक्ष मंदिर”. ज्या भागात पहाडी आहे, पावसाचे
प्रमाण कमी आहे, पाणी कमी आहे जो भाग दुष्काळी बनला आहे अशा भागात हे प्रयोग सुरु
आहेत. त्यातुन हाताला काम मिळते आहे. पोटाला अन्न मिळते आहे. मात्र हे सगळे
भक्तिभावाने केले जात आहे.
एवढे
बोलुन मी माझे हे वाङपुष्प योगेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि प्रार्थना करतो की
परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव, सर्वांना निरामय आरोग्य दे, सर्वांचे दु:ख दूर कर.
सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दु:ख माप्नुयाSSत् ।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
नवनितभाईंच्या
चिंतनिके नंतर दोन तिन भावगीते झाली. त्यानंतर योगश्वराची आणि मारुतिची आरति होऊन
आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
*************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा