शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग ७

     दुपारची वेळ होती. साडेबारा एक वाजला असेल. उन्ह मी म्हणतं होती. दोन दिवसांवर हनुमान जयंती आली होती. चैत्र महिन्यातल्या या दिवसात हवेत उष्मा खूपच वाढलेला होता. जो तो गारव्यामध्ये जाऊन बसायला बघत होता. त्यामुळे रस्ता जवळ जवळ निर्मनुष्यच होता. त्या धुळीने भरलेल्या रस्त्यावर सर्वत्र रखरखाट जाणवत होता. जरा जोरात वारा आला की सगळीकडे धुळ पसरत होती. त्यातही मधुनच गार वा-याची झुळुक आली की तेवढीच जीवाची तल्खली कमी होई.
     अशा त्या निर्मनुष्य आणि तापलेल्या रस्त्यावर महाराज अनवाणी पायांनी झपाझप पावले टाकीत कुठेतरी जात होते.  आज सकाळपासुन त्यांचा वेळ खूप धावपळीत गेला होता. त्यांना हनुमानवाडीत येऊन आता दहा बारा दिवस झाले होते. त्यांच्या रोजच्या निरनिराळ्या घरी माधुकरी मागण्याच्या पद्धतीमुळे ते गावातल्या सगळ्या लोकांना आता ते परिचीत झालेले होते.
सकाळपासुनचा त्यांचा दिनक्रम आता ठरल्यासारखाच झाला होता. ते रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठत असत. उठल्या उठल्या प्रथम ते देवाचा गाभारा स्वच्छ झाडायचे. त्यानंतर एक तास ते ध्यानाला बसत. तिथपर्यंत त्यांच्या बरोबर तिथेच झोपायला येणारे गणा वगैरे चौघेजण देखिल उठत असत. मग सगळे मिळुन देवालयाचे आवार स्वच्छ करित असत. लगेचच ते नदीवर जाऊन स्वच्छ आंघोळी करीत असत. आंघोळी नंतर महाराज काकड आरति करीत असत. त्यानंतर प्रात:स्मरण, व्यायाम झाल्यावर हे चौघेही आपापल्या घरी जात असत. सकाळी साडेसात वाजता गावातली १०-१२ मुले महाराजां जवळ मनाचे श्लोक, छोटी स्तोत्रे शिकण्यासाठी येत असत. येत्या हनुमान जयंती पर्यंत मारुति स्तोत्र पाठ करण्याचा त्या मुलांचा निर्धार होता.
काल रात्री बोलता बोलता हेमंत म्हणाला होता, त्याची मोठी भावजय गेले अनेक दिवस आजारी आहे. अन्नावर वासना नाही, खूप अशक्तपणा आला आहे. त्वचा देखिल पांढुरकी झाली आहे. त्यामुळे घरातले सगळे वातावरणच बिघडले आहे. त्याच्या या भावजयीचा स्वभाव खूप चांगला होता. त्याच्या घरातील सर्वजण त्याची हेटाळणी करित असले तरी ती नेहमी त्याचीच बाजू घेत असे. त्यामुळे हेमंतचा तिच्यावर खूप जीव होता. हेमंतने महाराजांना रात्री हे सर्व सांगितले होते. तेव्हा महाराजांनी त्याला दिलासा दिला होता. त्याचवेळी उद्या दुपारी भिक्षेला जाताना त्याच्या घरी येऊन त्याच्या भावजईला भेटण्याचे त्यांनी कबुलही केले होते. आता ते झप झप त्याच्याच घरी चालले होते.
हनुमानवाडीतील मुख्य रस्त्यावरचे धुमाळांचे साधे घर कौलारु होते. घराच्या पुढे मागे अंगण होते. घराच्या मागे परसबाग होती. त्या परसबागेत घराच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची झाडे, पारिजातकाचे, पांढ-या चाफ्याचे, थोडाफार भाजीपाला, थोडीफार औषधी झाडे लावलेली होती. पुढच्या अंगणात शेवंती, गुलबाक्षी, गुलाब अशी फुलझाडे लावलेली होती. त्या झाडांना सकाळीच पाणी घातले होते तरीही ती कडक उन्हाने कोमेजली होती. हेमंत हा धुमाळांचा धाकटा मुलगा होता. त्या घरांत हेमंत आणि त्याचे लग्न झालेल्या भावांसह रहात होता. हेमंत त्याच्या मोठ्या भावाजवळ रहात होता.
महाराज झपझप पावले टाकीत हेमंतच्या वेशीतुन आत शिरले. दारात हेमंत आणि त्याचा मोठा भाऊ त्याची वाटच बघत होते. महाराज आत शिरताच हेमंत त्यांना अंगणाच्या कोपऱ्यातील सिमेंटने बांधलेल्या पाण्याच्या टाकीजवळ नेले. त्या टाकीच्या गार पाण्याने आपले हात पाय स्वच्छ धुतले. थोडे पाणी  आपल्या चेहऱ्यावर देखिल मारले.
ते म्हणाले, पाणी खूप छान आहे! थंडगार पाण्याने खूप बरे वाटले! या उन्हाने अंगाची लाही लाही होते, नाही?
हो आणि अशा भयंकर उन्हात तुम्ही अनवाणी पायाने चालत आलांत! खरंच धन्य आहे तुमची! हेमंत म्हणाला. बोलत बोलत दोघजणं घरात शिरली. तेथे हेमंतचा मोठा भाऊ दिनकर त्यांची वाट बघत होता.
या महाराज! बसा असे निवांत! आमच्या गरीबांच्या घराला आपले पाय लागले, आनंद झाला! अरे हेमंता, महाराजांना गुळ पाणी आणं! हेमंतचा भाऊ महाराजांचे स्वागत करीत म्हणाला.
होय दादा! आत्ता आणतो! हेमंत असे म्हणून गुळ पाणी आणायला आत गेला आणि घरातुन ताटलीत गुळाचा खडा आणि तांब्यात पाणी घेऊन आला. ती ताटली आणि पाण्याचा तांब्या महाराजांना देत तो म्हणाला घ्या महाराज! गुळ पाणी घ्या!
त्यानंतर त्याने आपल्या भावाची महाराजांशी ओळख करुन देत तो म्हणाला, काका! हा माझा मोठा भाऊ दिनकर. आपल्या आणि शेजारच्या दोन गावाचा तो तलाठी आहे.
नमस्कार महाराज! परवा मला शेळके गुरुजी भेटले होते, ते आपल्या बद्दल बरच सांगत होते. आमच्या हेमंतला तर तुम्ही पारच बदलुन टाकलेत. त्याची वहिनीतर तुमच्यावर खूपच खुष आहे. कारण हेमंत तिचा जीव की प्राण आहे. आमचे लग्न झाले तेव्हा हेमंत जेमतेम दहा वर्षाचा होता. तो तिला धाकट्या भावासारखा आहे.
हो हेमंतने रात्री सांगितले मलात्या आजारी आहेत असेही तो म्हणाला होता! काय होतय त्यांना? महाराजांनी आस्थेने विचारले.
काय सांगु गेले गेले पंधरा वीस दिवस आजारीच आहे. अंग नुसत फिक्कट पडले आहे, अन्नावर वासना नाही तालुक्यातल्या डॉक्टरांकडे नेले होते. त्यांच्या औषधाने चार दिवस बरे वाटले परत पहिल्यासारखे सुरु झाले. कोण काय म्हणतय! कोण काय! दिनकर दादांनी सांगितले.
बरं! बरं! आपण बघुया त्यांना! येतील का त्या बाहेर ? महाराजांनी विचारले.
काका, तिला कशाला त्रास द्यायचा? आपणच आत जाऊया! हेमंत बोलला.
ठिक आहे, चला! असे म्हणून महाराज हेमंत आणि दिनकर दादांच्या पाठोपाठ वहिनींच्या रुममध्ये गेले.
आत जाताच हेमंतने वहिनींला हाक मारली, वहीनी उठं! बघं कोण आलेय तें!
हेमंतचा आवाज आल्यावर कॉटवर झोपलेली हेमंतची वहिनी ज्योत्स्ना उठुन बसु लागली. ते पाहिल्यावर महाराज पुढे झाले आणि ते म्हणाले, वहिनी उठायची काही जरुरी नाही! त्यानी आपल्याला त्रास होईल आणि घाबरु नका तुम्हाला काही झाले नाही.
हेमंतनी महाराजांना बसायला खुर्ची दिली. त्यावर बसता बसता महाराजांनी विचारले, हं! आता मला सांगा तुम्हाला काय होतयं?
काही नाही हो! खूप अशक्तपणा वाटतोय आणि ही नख बघा कशी पिवळसर झाली आहेत! ज्योत्स्ना वहिनींनी सांगितले.
बघु! असे म्हणून महाराजांनी ज्योत्स्ना वहिनिंची नखे नीट निरखुन पाहिली. नंतर त्यांनी त्यांचे डोळेही पाहिले डोळ्यातही त्यांना पिवळसर झाक दिसुन आली. नंतर ते हेमंतच्या दादांना म्हणाले, हे बघा दिनकरराव यांचे डोळे आणि नखेही पिवळी दिसायला लागली आहेत. माझ्या मते यांना काविळीचा त्रास होतोय. आता पाणी आटत चालले आहे त्यामुळे ते प्रदुषित होते आहे. तेव्हा आता सगळ्यांनीच पाणी उकळुन गाळुन प्या. या काविळीवर मला एक झाडपाल्याचे औषध माहित आहे. आपण म्हणत असाल तर ते मी हेमंतबरोबर पाठवुन देईन. मात्र त्याला कडक पथ्य पाळायला लागेल.
हो कृपा करुन पाठवुन द्या. आणि काय पथ्य पाळायचे तेही सांगा. दिनकरदादा म्हणाले.
तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ एकदम वर्ज्य, वातुळही खायचे नाही. एकदम सात्विक आहार घ्यायचा. हेच पथ्य आहे असे महाराजांनी सांगितले.
काही हरकत नाही! दुखण्यातुन बरे व्हायला पथ्य पाळायलाच पाहिजे. दिनकरदादांनी वहिनींकडे बघत सांगितले. त्यावर ज्योत्स्ना वहिनींनी संमतीदर्शक मान हलवली.
महाराज, आपण आता आपण येथुन जेऊनच जां! आता एवढ्या उन्हाचे भिक्षा मागायला कुठे जाणार? अरे हेमंत! महाराज आता आपल्या बरोबरच जेवतिल! दिनकरदादांनी महाराजांना काही बोलु दिलेच नाही.
ठिक आहे! जशी समर्थांची इच्छा! पण एक करा मला आग्रह करायचा नाही. एकदाच पानात अथवा पत्रावळीत थोडेसे अन्न वाढा, मला  आवश्यक तेवढेच मी घेईन. महाराजांनी निक्षुन सांगितले.
मग दिनकरदादांनी महाराजांच्या इच्छेनुसार त्यांना पत्रावळीत वाढले. त्यांनी रोजच्या प्रथे प्रमाणे काकबली आणि माशांचा भाग त्यातुन काढला आणि उरलेले अन्न त्यांनी सेवन केले. जेवण होताच महाराज आपल्या स्वस्थानी मारुति मंदिरात निघुन गेले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा