१९
सोमजाई मंदिराच्या भव्य प्रांगणात श्री सोमजाई
वृक्ष मंदिर संस्थानच्या कार्यालयाला लागुनच असलेल्या व्यासपीठावर खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. खुर्च्यांच्या पाठीमागे उच्चासनावर
श्री सोमजाईचा मोठा फोटो ठेवलेला होता. त्याला वृक्ष मंदिरातिलच फुलांचा हार घातला
होता. हे व्यासपीठ गेल्याच वर्षी बांधण्यात आले
होते. एरवी याचा उपयोग कोल्हापुरला पाठवायच्या मालाचे पॅकींग आणि सॉर्टींग
करण्याकरिता केला जायचा. व्यासपीठाच्या समोरच्या बऱ्याच भागावर आता सावल्या
आलेल्या होत्या. तिन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांनी आता सावली द्यायला सुरवात
केली होती. तरीही व्यासपीठासह त्याच्या समोरच्या भागावर हिरव्या जाळीची शेड
तयार करण्यांत आली होती.
व्यासपीठावरील
खुर्च्यांवर महाराज, श्री
सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी बसले आहेत. याशिवाय स्टेट बँक ऑफ
इंडीचाच्या शाखा व्यवस्थापक आचार्य मॅडम आणि शेजारच्या पाच गावांमधिल सरपंच तसेच
ग्राम पंचायत सदस्य बसले आहेत. व्यासपीठाच्या मागे श्री सोमजाई वृक्ष मंदिर
संस्थानचा तिसरा वर्धापन दिन असा मजकूर असलेला रंगित फ्लेक्स बोर्ड लावलेला आहे.
व्यासपीठासमोरील मैदान सोमजाईच्या सक्रीय भक्तांनी भरलेले आहे. आम्ही करुन दाखवले
याचा सार्थ अभिमान प्रत्येकाच्या चेह-यावर आत्ता दिसत होता.
बरोबर
साडेतीन वाजता सर्व अपेक्षीत पाहूणे उपस्थित झाले आहेत याची खात्री झाल्यावर
हेमंतने माईक आपल्या हातात घेऊन सगळ्या देवीभक्तांचे हार्दिक स्वागत केले.
व्यासपीठावर बसलेले आमच्या संस्थानचे सर्व पदाधिकारी, आमचे आवडते काका म्हणजेच
महाराज, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आचार्य मॅडम, सर्व गावांचे सरपंच
आणि ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचे श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानतर्फे मी हार्दिक
स्वागत करतो. आपल्याला माहितच आहे की तिनवर्षांपूर्वी या देवीच्या डोंगराची काय
अवस्था होती. आई सोमजाईच्या आशिर्वादाने आणि तिच्या भक्तांच्या सक्रीय सहभागामुळे
तिन वर्षात आपली संस्था हा कायापालट करु शकली. आता आपण प्रथम शेळके गुरुजींच्या
हस्ते आपल्या महाराजांचे या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुया. त्यानंतर
आजच्या प्रमुख पाहुण्या आचार्य मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आमच्या राधाकाकु
करतिल. त्याच प्रमाणे सर्व सरपंचांचे स्वागत हंबीरराव काका करतील. ग्रामपंचायत
सदस्यांचे स्वागत आमचे दिनकरकाका करतिल. अशा प्रकारे सर्वांचे स्वागत करुन
झाल्यावर हेमंतने हंबीररावांना आजच्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करण्याची विनंती
केली.
हंबीररावांनी
सर्वांना नमस्कार करुन आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन सांगण्यास सुरवात केली. ते
म्हणाले, तिन वर्षांपूर्वीच्या अक्षय
तृतीयेच्या दिवशी स्वाध्याय केंद्रातर्फे गुजराथमध्ये चालु असलेल्या वृक्ष
मंदिराच्या कल्पनेने प्रभावित होऊन आपण या सोमजाईच्या डोंगरावर तशाच प्रकारचे
परंतु आपल्या संस्कृतीला रुचेल असे वृक्ष मंदिर उभे करण्याचा संकल्प केला. त्या
संकल्पाला आई सोमजाईचा आशिर्वाद तर होताच. शिवाय अशा एका व्यक्तीचा भक्कम आणि
सक्रिय पाठींबा होता, की ज्यांनी या प्रकल्पाच्या कार्यात प्रत्यक्ष अंगमेहेनत तर
केलीच परंतु या संकल्पनेच्या नियोजनात देखिल सहभाग दिला. ती व्यक्ती एवढ्यावरच
थांबली नाही तर संस्थानला त्यांनी भक्कम आर्थिक पाठबळही दिले आहे.
गेल्या
तिन वर्षात त्यांनी संस्थानला एकुण अठरा लाख रुपयांची रोख मदत केली आहे. त्यांनी
घातलेल्या बंधनामुळे मी यापूर्वी त्यांचे नांव जाहिर करु शकलो नाही. ती व्यक्ती आज
आपल्या मध्ये बसली आहे. आपली म्हण आहे वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. तशी
परिस्थिती आपली झाली होती. साधा लेंगा शर्ट आणि टोपी असा वेश असलेले महाराज म्हणजे
ती व्यक्ती आहे. हे जाहिर करायला मला खूप आनंद होत आहे. मगाशी हेमंतने सांगितल्या
प्रमाणे या डोंगराचा खरोखरच काय पालट झाला आहे. त्याचे फार मोठे श्रेय आपल्या या
प्रकल्पाचे प्रेरणास्थान श्री महाराज यांच्या कडे जाते.
अशा
या आपल्या महाराजांच्या या ऋणांतुन आम्ही उतराई होऊ इच्छीत नाही. परंतु त्यांचा
आदर सत्कार करण्याची संधी आम्ही घेऊ इच्छीतो. मी आपल्या संस्थानचे अध्यक्ष श्री
गोविंदराव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा शाल आणि श्रीफळ देऊन
सत्कार करावा. मी या ठिकाणी विशेष उल्लेख करतो की हे श्रीफळ याच वृक्ष मंदिरातिल
कल्पवृक्षाला आलेले आहे. पहिली पाच फळे आपण सोमजाईला अर्पण केली. त्यानंतरच्या
सहाव्या फळाने आपण आज महाराजांचा सत्कार करीत आहोत.
त्यानंतर
गोविंदराव आपल्या जागेवरुन उठले महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना शाल पांघरली.
त्यानंतर हातात पुष्पगुच्छ आणि श्रीफळही दिले. दोघांचेही मन भरुन आले होते.
त्यामुळे महाराजांनीही काही न बोलता सगळ्यांना हाताने नमस्कार करुन आपल्या जागेवर
बसले.
त्यानंतर
परत हंबीरराव उभे राहिले त्यांनी आपले बोलणे पुढे चालू केले. आता आम्ही अशा
व्यक्तीचा सत्कार करणार आहोत ती व्यक्ती आपल्या संस्थानची मार्गदर्शक आहे. त्यांनी
आम्हाला आपले बहूमोल मार्गदर्शन दिले नसते तर हा प्रकल्प भरकटत राहिला असता. असे
ते आमचे मार्गदर्शक श्री मारुती माने रिटायर्ड फॉरेस्टर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन
सत्कार करतिल शेळके गुरुजी.
माने
साहेबांचा सत्कार झाल्यानंतर हेरंबने दिनकररावांना झालेल्या कामाचा आढावा घेण्याची
सूचना केली. दिनकररावांनी देवीच्या डोंगराची तिन वर्षांपूर्वीची स्थिती विशद केली.
त्यानंतर त्यांनी तिन वर्षापुर्वी केलेल्या संकल्पाची सर्वांना आठवण करुन दिली.
त्या संकल्पापैकी आपला पाझर तलाव सध्या भरपुर भरलेला आहे. सोलर आणि पवनचक्की
यांच्या सहाय्याने आपण त्यावर मोटर बसवुन पाझर तलावातील पाणी आपण पूर्ण डोंगरावर
पाईपलाईनने फिरवले आहे. आपण पहात आहाच देवीला यायच्या रस्त्याच्या दुतर्फा आणि
देवीमंदिर परिसरात आपण या उपलब्ध झालेल्या
उर्जेच्या सहाय्याने पथदिवे लावले आहेत. देवीचे मंदिर, संस्थानचे ऑफिस प्रसाद
बनविण्याचे पाकगृह येथेही आपण या उर्जेचा वापर केला आहे. संपुर्ण देवीचा डोंगर आज
आपण हिरवागार केलेला आहे. जवळपास आठ हजार झाडे आपण या डोंगरावर लावली आहेत. या
सर्वाचा परिणाम म्हणून हनुमान वाडीतील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या
प्रमाणावर वाढली आहे. आज आपले संस्थान आपला दररोजचा खर्च भागवुन चार पैसे शिल्लक
टाकायच्या परिस्थितीत आले आहे. आपल्या उत्पादनांचा टेंपो दररोज कोल्हापुर बाजारात
जात असतो. हा आहे आपल्या एकजुटीचा, आई सोमजाईच्या भक्तीचा आणि श्रमशक्तीचा प्रभाव.
यानंतर
आजच्या आपल्या प्रुमुख पाहुण्या स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापक आचार्य
मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतिल. हेमंतने जाहिर केले आणि मॅडम बसल्या होत्या तिथे
त्यांना बोलायला माईक नेऊन दिला.
आई सोमजाईच्या
सर्व भक्तांना माझा दंडवत. आतापर्यंत मी आपल्या संस्थान बद्दल बरेच काही ऐकले
होते. व्यासपीठावर येण्यापूर्वी देवीच्या डोंगराचा सर्व परिसर मी फिरुन आले. तीन
वर्षापूर्वीही मी नवरात्रीमध्ये आई सोमजाईच्या दर्शनाला आले होते. तीन वर्षापुर्वीचा
देवीचा डोंगर आणि आज मी पहात असलेला डोंगर याची तुलना मी स्वर्ग आणि पाताळ या
कल्पनेशी करीन. खरोखरच नितांत रमणीय असे हे स्थळ आपण बनविले आहे. विशेषत: आपण पाझर तलावाला ज्या पद्धतीने सजवले
आहे ते पाहून आपल्या रसिकतेची दाद द्यावीशी वाटते. भविष्यात हे स्थळ पर्यटन स्थळ
म्हणून नावारुपाला येईल यात संशय नाही. इथला प्रयोग बघायला गावोगावाहून लोक येतिल
याची मला खात्री आहे. अशाप्रकारची देवीची सेवा केल्यावर ती का प्रसन्न होणार नाही? अर्थात होणारचं! तिचा पूर्ण आशिर्वाद आपणा सर्वांच्या
पाठीशी राहिल असे मला वाटते.
आता
मी थोडेसे वेगळ्या विषयावर बोलणार आहे. आताच आपल्या संस्थान तर्फे ज्यांचा सत्कार
केला, त्यांच्याबद्दल त्यांची परवानगी न घेता मी चार गोष्टी सांगणार आहे. कारण
त्यांना परवानगी विचारली तर ते ती कधीही देणार नाहीत याची मला खात्री आहे. आपण
ज्यांना महाराज म्हणता ते एक मोठे बँक ऑफिसर आहेत. माझ्या बँकेतल्या नोकरीची
सुरवात मी त्यांच्या हाताखाली काम करुन केली आहे. खेडसारख्या मोठ्या शहरातिल स्टेट
बँकेच्या शाखेचे ते मॅनेजर होते. त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या गावावर येऊन
कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांनी ही फकिरी पत्करली आहे. त्याच्या आताच्या
रुपावरुन त्यांची जर पारख कराल तर फसाल. मी पाहिलेले आमचे हे साहेब नेहमी कडक
इस्त्रीमध्ये आणि सुटा बुटात असत. त्यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वाला भले भले घाबरत
असत. परवा ते बँकेत आले तेव्हा मी देखिल प्रथम ओळखले नाही. त्यांनी मलाही त्यांची
खरी ओळख प्रकट करण्यास बंदी घातली आहे. परंतु आता सरपंच हंबीररावांनी त्यांची
जाहिर ओळख करुन दिली म्हणून मी बोलण्याचे धाडस केले आहे.
मला
आपल्या या वर्धानपन दिनाच्या कार्यक्रमाला बोलावुन एक वेगळीच अनुभूती घेण्याची
संधी दिल्याबद्दल धन्यवाद देऊन मी माझे चार शब्द पूर्ण करते.
आता
मी आमच्या काकांना म्हणजेच महाराजांना आम्हाला मार्गदर्शन करायला सांगणार आहे.
आमच्या चौघा मित्रांकरीता हे काका परिसासारखेच आहेत. त्यांच्या पवित्र स्पर्शाने
आमच्यात जाग्या होणा-या वाल्याला त्यांनी माणसात आणले. आम्हाला सन्मानाने जगण्याची
संधी दिली. ते जर आमच्या गावात आले नसते तर आमचे काय झाले असते ही कल्पनाच आता
आम्हाला हवालदिल करते. मी आता आपल्या महाराजांना आम्हाला मार्गदर्शन करण्याची
विनंती करतो. असे म्हणून हेमंतने आपल्या हातातला माईक महाराजांकडे दिला.
माझ्या
सोमजाई आईच्या भगतांनो आपल्याला माझा दंडवत. आपण केलेल्या भगतगिरीने सगळ्यांनाच
थक्क करुन सोडले आहे. तुम्ही किमयागार आहात. अक्षरश: शून्यातुन हे हिरवे वैभव आपण उभे केले
आहे. या बद्दल आपल्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. परंतु आता खरा धोका
निर्माण होणार आहे. या केलेल्या कामाचा अहंकार आता निर्माण होऊ शकतो. तेव्हा त्या
पासुन सावधान रहा. आता आपला सर्वांचा कसोटीचा काळ सुरु होणार आहे. जे निर्माण केले
आहे ते टिकवणे महत्वाचे आहे. नाहीतर मागच्या पिढीमध्ये देखिल हे वैभव येथे उभे
होतेच. पण आपणच त्याला भस्म केले होते. आता आपल्याला हे उभारण्याकरिता लागलेल्या
कष्टाची जाण आहे. म्हणूनच ते कोणीही ओरबाडुन नेणार नाही याची दक्षता घ्या.
त्याहुनही
महत्वाचे म्हणजे तुम्ही आता जागे झाला आहात. पण तुमच्या शेजा-यांचे काय? तुम्ही पोहायला शिकलात तर तुमचे हे
कर्तव्य आहे की जो निसर्गाचा ऱ्हास करुन स्वत:बरोबर दुसऱ्यालाही बुडवितो आहे. त्याला
बुडू न देता तारले पाहिजे. समर्थांनी म्हटलेच आहे,
आपण
येथेष्ट जेवणें| उरलें
तें अन्न वाटणें |
परंतु
वाया दवडणें| हा
धर्म नव्हे ||
तैसें
ज्ञानें तृप्त व्हावें| तेंचि ज्ञान जनास सांगावें |
तरतेन
बुडों नेदावें| बुडतयासी
||
उत्तम
गुण स्वयें घ्यावे| ते बहुतांस सांगावे |
वर्तल्याविण
बोलावे| ते
शब्द मिथ्या ||
आपण
पोटभरुन जेवल्यावर जर काही उरले तर ते दुसऱ्यांना वाटावे. माज आल्यासारखे ते वाया
घालवु नये. आता तुम्हाला एक चांगला मार्ग सापडला आहे. आता तुमची जबाबदारी वाढली
आहे. जे पथभ्रष्ट झाले आहेत त्यांना योग्य मार्गावर आणायचे काम आता तुम्हाला
करायचे आहे. तेव्हा हा प्रयोग इतरांनाही दाखवा त्यातिल फायदे त्यांना समजाऊन
सांगा. त्यांना या मार्गानी जाण्यास मदत करा. म्हणजे सोमजाईचा प्रसाद सर्वांनाच
मिळेल.
असो.
आता उपदेश पुरा करतो. आता माझी ओळख आपल्याला झाली आहेच. तेव्हा त्याबद्दल मी काही
बोलत नाही. मी या प्रकल्पाकरिता जो निधी दिला त्यातला एकही पैसा मी माझ्या कष्टाने
मिळविलेला नाही. तो पैसा समाजाचा होता तो मी या निमित्ताने समाजाला परत केला आहे
इतकेच. आपण काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये वाचले असेल रायगड जिल्ह्यामध्ये जाई
नावाचे एक गाव होते ते निसर्गाच्या एका तडाख्यात जगाच्या नकाशावरुन पुसले गेले.ते
गाव माझे होते. त्याची भरपाई म्हणून मला सरकारने जी काही रक्कम दिली होती ती रक्कम
मी या ठिकाणी सोमजाईच्या चरणी अर्पण केली इतकेच.
सज्जनगडावरुन
मी काही निश्चय करुन निघालो होतो. त्या निश्चयालाच आपल्या गावाने गेले काही दिवस
मायेच्या जाळ्यात अडकवले आहे. ते जाळे तोडायचा मी अनेक वेळा प्रयत्न केला परंतु तो
अयशस्वी ठरला. परंतु आज मला एक समाधान आहे, जो यज्ञ आपण येथे केलात त्यात मलाही
चार समिधा टाकायची संधी मिळाली. परंतु आता आपण मला नारळ दिला आहे त्याने मला
समाधान वाटले. आपल्या संस्कृतीत नारळ देण्याला एक वेगळा अर्थ आहे. मी आपल्याला आई
सोमजाईच्या साक्षीने जो शब्द दिला होता त्यातुन मी आता मुक्त झालो आहे. वृक्ष
मंदिराचा हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे. तेव्हा आपण मला आता निरोप द्यावा ही
विनंती आहे. आई सोमजाईला प्रणिपात करुन मी आपली रजा घेतो. रजा घेताना प्रार्थना
करतो.
सर्वेपि
सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:।
सर्वे
भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दु:ख माप्नुयाSSत् ।।
ॐ
शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
महाराजांचे
बोलणे संपल्यावर हेमंतने लगेचच कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. आजच्या
कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाचे काम करायचे आहे. आता आपण
आपल्या पाझर तलावाचे नामकरण करणार आहोत. मी आपल्या संस्थानचे अध्यक्ष श्री
गोविंदकाका जोशी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरच ठेवलेल्या फलकाचे अनावरण
करुन नांव जाहिर करावे. असे बोलुन हेमंतने गोविंदराव काकांना फलकाचे अनावरण
करण्यासाठी त्या फलकापर्यंत नेले.
त्यानंतर
गोविंदरावांनी भगव्या कापडामध्ये ठेवलेल्या फलकाचे अनावरण केले आणि माईकवरुन नांव
वाचुन दाखवले. ते म्हणाले आपण आपला तलावाचे “सोमजाई स्मृती सागर” असे नामकरण केले आहे. या नावातिल रहस्य महाराजांच्या सगेचच लक्षांत
आले. ते नांव ऐकुन त्यांच्या मनाला समाधान वाटले.
आता
आजच्या कार्यक्रमाचा समारोप आपले शेळके गुरुजी करतिल. असे म्हणून हेमंतने आपल्या
हातातला माईक गुरुजींकडे दिला.
शेळके
गुरुजींनी समारोप करताना सांगितले. आताच आपल्याला महाराजांनी सांगितल्या प्रमाणे
आमचे पोट आता जरी भरलेले आहे. तरी या झालेल्या कामाने संतोष न मानता आम्ही या
संस्थानचे कार्य चालूच ठेवणार आहोत. संस्थानतर्फे आम्ही एक रोपवाटीका तयार करतोय.
त्या रोपवाटीकेमध्ये तयार होणारी रोपे आम्ही गावागावात जाऊन पोचवणार आहोत. तेथिल
सेवाभावी व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या मार्फत त्या रोपांची लागवड आणि त्यांची
देखभाल करण्याची व्यवस्था करुन वृक्ष
मंदिराची ही संकल्पना जास्तित जास्त गावात पोचवण्याची मोहिम राबवणार आहोत. जेणे
करुन सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास न होता पर्यावरण समृद्धीच होईल.
आता
माझी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी प्रसाद घेऊनच आपल्या घरी जायचे आहे. आता मी
आपला आजचा कार्यक्रम समाप्त झाल्याचे जाहिर करतो. आता लगेचच आधी आई सोमजाईची आरति
होईल. नंतर प्रसाद वाटपाला सुरवात होईल.
***********
अक्षयतृतीयेचा
दुसऱ्या दिवशी मोरांच्या केकांनीच महाराजांना जाग आली. देवळातले घड्याळ पहाटेचे
तीन वाजल्याचे दाखवत होते. महाराजांनी आपले प्रातर्विधी आवरले. स्नान झाल्यानंतर प्रात:स्मरण करुन त्यांनी देवीची मनोभावे
पूजा केली. काल सत्कारामध्ये मिळालेला नारळ देवीपुढे ठेवला. ते सध्या रहात
असलेल्या संस्थानच्या ऑफिस जवळील खोलीतील आपली झोळी उचलली. झोळीमध्ये दैनंदिन
पारायणची दासबोधाची छोटी प्रत आणि रोजचे कपडे या व्यतिरिक्त काही नाही याची खात्री
केली. त्यामध्ये असलेली शाल काढुन देवीच्या पायाजवळ ठेवली. देवीला मनोभावे
सर्वांच्या कल्याणाचे साकडे घातले. देवीचा निरोप घेऊन ते परत न येण्यासाठी निघाले. त्यांचा इथला ऋणानुबंध आता त्यांच्या दृष्टीने संपला होता.
आता
ते कुठे जाणार होते हे त्यांनाही माहित नव्हते. फक्त त्यांना या स्थानापासुन
जास्तीत जास्त लांब जिथे त्यांना कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जायचे होते. त्यांना
आपली ओळख पुसून टाकायची होती. त्यांना फक्त एवढेच माहित होते. आपण एक प्रतिज्ञा
केली आहे. कोणाच्या घरी रहायचे नाही. जिथे जायचे तिथे रामदासी भिक्षेकरी म्हणूनच
जायचे. जे अन्न मिळेल त्याच्या बदली अन्नदात्याचे कल्याण चिंतायचे. त्या
अन्नदात्याकडे नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करायचे.
**********
दोन
दिवसांनी औरंगाबाद जिल्ह्यातिल चिखली नावाच्या दुष्काळी गावात दुपारच्या वेळेला भर
उन्हात एका भिक्षेक-याची आरोळी ऐकु आली.
शुकासारिखे
पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्टापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी
वाल्मिकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।।
जSय जSSय रघुवीSर समर्थ।।
माई
भिक्षा वाढा!! असा खणखणित पुकारा करीत तो दारात उभा राहिला होता. स्वच्छ पांढरा
लेंगा, त्यावर
स्वच्छ पांढरा नेहरु शर्ट, डोक्यावर स्वच्छ पांढरी टोपी, काखेत शबनम सारखी पिशवी अडकवलेल्या
त्या भिक्षेकऱ्याने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले. साधारण पन्नास वयाचा वाटणारा तो
भिक्षेकरी चेहऱ्यावरुन तरी चांगल्या सुखवस्तु घरातला वाटत होता. जरी त्याची दाढी
वाढलेली होती तरी ती अस्ताव्यस्त दिसत
नव्हती. अशा व्यक्तिमत्वाचा माणूस भिक्षा मागतोय हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत
होते.
***********
समाप्त
APRATIM
उत्तर द्याहटवा