बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

हिमालयाच्या सहवासात भाग २

२) बडोदा ते कटरा (माता वैष्णोदेवी)



            मातेच्या इच्छेनुसार आज सकाळी बांद्र्याहुन सुटलेल्या आणि दुपारी एकच्या सुमारास बडोद्यात दाखल झालेल्या स्वराज एक्सप्रेसमध्ये सौ वर्षासह दाखल झालो. गाडीमध्ये आमच्या स्वागता करीता आमच्या या सहलीमधले सहप्रवासी १) श्री सुरेश व सौ केतकी, २) श्री नंदकुमार व सौ संध्या, ३) श्री नारायण उर्फ नाना व सौ नंदिनी(माधुरी) आणि ४) श्री विकास व सौ विप्रा उपस्थित होते.
गाडीमध्ये मला मिळालेला स्लिपर पांच बोगी पुढे होता. परंतु मी केवळ रात्री झोपण्यापुरताच त्या बोगीमध्ये गेलो होतो. आमच्या बोगीमध्ये जवळपास सर्वच महाराष्ट्रीयन लोक होते. त्यापैकी एक कुटूंब दरवर्षी वैष्णोदेवीला जाणारे होते. त्यांचे देखिल असेच म्हणणे होते की आई वैष्णोदेवीने बोलावल्या वाचुन कोणिही तिला भेटायला जाऊ शकत नाही. चर्चा करता करता अनेक राज्य पार होत होती. आमची गाडी अनेक राज्यामधुन जाणार होती. ती अशी १) महाराष्ट्र, २) गुजरात३) राजस्थान, ४) मध्य प्रदेश, ५) दिल्ली, ६) हरीयाणा७) हिमाचल प्रदेश, ८) पंजाब, ९) जम्मु आणि काश्मिर.
आमचा ग्रुप पूर्ण तयारीने आलेला होता. आमच्या बरोबर तयार नाश्ता तर होताच परंतु आयत्यावेळी झटपट तयार करता येईल असे नाश्त्याचे साहित्य देखिल हजर होते. त्या शिवाय गरमा गरम चहा कॉफी तयार करण्याची सामुग्री देखिल होती. आम्ही गाडीमध्ये स्थिरस्थावर होताच सर्वप्रथम जेवणाचा कार्यक्रम झाला. लवकरची गाडी असल्यामुळे सगळेचजणच पहाटे लवकर उठले होते त्यामुळे पोटात भर पडताच प्रत्येकजण डुलक्या घ्यायला लागला.
संध्याकाळी पांच साडेपांचच्या सुमारास सगळे जरा ताजे तवाने झाल्यावर चहा कॉफीचा कार्यक्रम झाला. मग मात्र पत्यांचा कॅट बाहेर पडला. मेंडिकोट, बदाम सातचा डाव सुरु झाला.
गाडीने गुजराथ सोडल्यानंतर राजस्थान सुरु झाले. सगळीकडे रखरखाट होता,  मैलोन मैल हिरवळीचे नांव नव्हते. नद्यांवर पुल होते पण पाण्याचा पत्ताच नव्हता. तरीही अशा भीषण वाळवंटात लोक आपल्या शेतात काम करीत होते. एवढ्या कडक उन्हात बाजुलाच रेल्वेचा ट्रॅक वाढवायचे काम चालु होते अनेक लोकं तिथे काम करत होती. खरोखरच या सर्व विश्वकर्म्याच्या वंशजाना दिलसे सलाम.
बघता बघता दिवस मावळला काळोख झाला. गाडीतले फेरीवाले फिरायचे कमी झाले. गाडीतल्या पँट्री मधुन जेवणाच्या ऑर्डर पोचवण्याचे काम सुरु झाले. आम्हीही यथावकाश बरोबर आणलेल्या जेवणाचा समाचार घेतला. थोडावेळ पत्ते खेळुन मग मी माझ्या बोगीत जाऊन झोपलो. इकडे नानांनी यांनी रात्रीचा पहारा मी करणार असे सांगितले म्हणून बाकीचे देखिल थोडावेळ जागे तर थोडी झोप अशी झोप घेत राहिले.  दरम्यान रात्री काही लोक दादागिरी करीत होते त्यांना हुसकवुन लावल्याचे नाना सोहनींनी सकाळी सांगितले. थोड्या वेळाने असे समजले की काही हत्यारी लोकांना रात्री दोनच्या सुमारास नवी दिल्लीच्या अगोदर रेल्वे पोलिसांनी याच गाडितुन पकडले होते. क्षणभर मनात आले आपल्या पाठिशी माता होती म्हणून ही घटना दोन बोगी पुढे घडली.
आज दिनांक १५ मार्च नवीन दिवस नविन प्रांत समोर घेऊन आला होता. आता पंजाब राज्य सुरु झाले होते. मोबाईल वरील मेसेज मुळे नविन राज्य सुरु झाल्याचे कळत होते. पंजाब हा प्रांत तसा संपन्न, आसपास गव्हाची, उसाची शेती दिसायला सुरवात झाली. डोळ्यांना सुखद हिरवळ दिसायला लागली होती. बराचसा गहू कापायला तयार झालेला दिसत होता. मधुन मधुन उसाने भरलेले ट्रॅक्टर दिसायला लागले होते. दुकानांच्या पाट्या मात्र पंजाबीत होत्या त्यामुळे आपण निरक्षर असल्या सारखे वाटायला लागले होते.
अनेक स्टेशन्स पास होत होती. बऱ्याच शहरांची नांवे ओळखिची होती. गाडीत अनेक प्रकारचे फेरीवाले येत होते. कोणी बँगांची चेन रीपेर करणारे, तर कोणी बँगांना बांधायच्या साखळ्या विकणारे. खाद्य पदार्थ, चहा, कॉफी विकणारे तर होतेच. परंतु चंदिगढ नंतर मात्र विशेष महिला विक्रेत्या मोठ्या प्रमाणात गाडीत दिसु लागल्या. अनेक प्रकारचे कपडे, विशेषत: जम्मु काश्मिर मध्ये आवश्यक असणारे स्वेटर, कान टोप्या, मफलर, शाली, हातमोजे, पायमोजे विकणा-यांचे प्रमाण जास्त होते.
आमच्या ग्रुपमधल्या लोकांनी फारशी खरेदी केली नाही, कारण आम्हाला अजुन १३-१४ दिवस प्रवास करायचा होता. आणि हे जास्तीचे ओझे आम्हाला परवडणारे नव्हते. आमच्याकडे आधिच प्रत्येकी साधारण दोन दोन बँगा होत्या. शिवाय  खाण्या पिण्याच्या पदार्थांची ओझी वेगळीच.
बघता बघता दिवस उताराला लागला. साधारण तिन साडेतिनच्या सुमारास आमच्या गाडीने जम्मु काश्मिरची बॉर्डर पार केली आणि आम्हा सर्वांच्याच प्रीपेड मोबाईलची नेटवर्क बंद झाली. मी नेटवर वाचले होते त्याप्रमाणे आमच्या गाडी मधुन काश्मिर मधला पहिला टोलनाका दिसु लागताच सर्वांची प्रीपेड सिम बंद पडली. आमच्या ग्रुप मध्ये आता माझ्याकडे एक आणि सुरेशराव यांच्या कडे दोन असे तिन पोस्टपेड मोबाईल चालू होते.
जम्मु काश्मिर मध्ये प्रवेश करताच सिमा सुरक्षा दलाच्या हत्यारबंद जवानांचा वाढलेला वावर जाणवु लागला. आपण आता एका वेगळ्या वातावरणांत आलो आहोत हे प्रकर्षाने जाणवायला लागले. आता कोठेही काहीही होऊ शकते या शंकेने मन थोडे अस्वस्थ झाले. पूर्वी वैष्णोदेवीला जाण्याकरीता जम्मु पर्यंत रेल्वेने आणि नंतर रस्त्याने जावे लागायचे. परंतु आता रेल्वे थेट कत्रा पर्यंत जाते. आमच्या बोगीतील काही लोकांना हे माहिती नसल्याने त्यांनी जम्मु पर्यंतच तिकीटे काढली होती. त्यामुळे ते जम्मुलाच उतरले.
सुमारे अर्धातास जम्मुला थांबुन आमची गाडी कत्र्याच्या दिशेने निघाली. जम्मु ते कत्रा ही रेल्वे लाईन उभारणे मोठे आव्हानात्मक काम होते. खडतर निसर्ग तर होताच, पण अतिरेकी हमला कधीही होईल ही भिती रेल्वे उभारताना कायम होतीच. आपल्याला कोंकण रेल्वेचे काम बघुन निसर्गाच्या आव्हानाची कल्पना आहेच. परंतु कोंकणामधिल कातळ पक्के तरी होते. इकडे कातळ किंवा खडक दिसतच नाही. रेल्वे लाईनच्या बाजुच्या दरडी वरुन लक्षांत येते की, ही दरड म्हणजे अतिशय भुसभुशीत माती आणि छोटे छोटे गोटे यांचे हे मिश्रण आहे. यामधुन मोठ मोठाले बोगदे, उंचच उंच पुल बांधुन ही रेल्वे लाईन बांधलेली आहे. खरोखरच अशी सर्व आव्हाने पेलुन ही रेल्वे लाईन उभारणाऱ्या त्या सर्व निर्मात्यांचे आम्ही शतश: ऋणी आहोत.
कत्रा रेल्वे स्टेशन

अशा प्रकारे संध्याकाळी सुमारे सात वाजता त्या माता वैष्णोदेवीच्या पुण्यभूमीत कत्र्यामध्ये आमची गाडी पोचली आणि आम्ही त्या पवित्र भूमीला वंदन करण्याकरीता गाडीतुन खाली उतरलो.

।। जय मातादी! जय मातादी! जय मातादी! ।।

हिमालयाच्या सहवासात भाग १

१) माताने बुलाया है।

Image result for himalaya

माझा काश्मिर सहली मधिल सहभाग हा तसा अचानकच झाला. वास्तविक ही सहल पूर्व नियोजित होती. मी त्यात सहभागी होणार नाही हे माझ्या बाजुने अगदी पक्के होते. याचे मुख्य कारण आर्थिक तर होतेच, त्याच्याही पेक्षा  मला माझ्या शारिरीक क्षमतेची खात्री वाटत नव्हती. या सहलीची सुरवातच माता वैष्णोदेवी पासुन होणार होती. माता वैष्णोदेवीला जाण्याकरीता १२ किलोमिटर चढण चढल्या शिवाय पर्याय नाही हे मला पक्के माहित होते. गेले सुमारे २-३ वर्षे माझे गुडघे दुखत आहेत, त्यातच जामनगरच्या थंडीत माझ्या पायांना भेगा पडुन रक्त येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काश्मिरची थंडी आणि वैष्णोदेवीची चढण आपल्याला झेपायची नाही ही माझी ठाम समजुत होती. चालण्याला पर्याय पालखीतुन जाणे किंवा घोड्यावरुन जाणे. दुस-या माणसांच्या खांद्यावर जिवंतपणी बसुन देवदर्शन करणे हे मला पटत नाही. राहिला प्रश्न घोड्यावरुन जाण्याचा, हा प्रकारही फार त्रासदायक असतो असे मला समजले होते. आणखी दोन पर्याय होते हेलिकॉप्टर किंवा बॅटरी कारने जाणे परंतु या पर्यायात जाऊन येऊन कमीत कमी ७-८ किलोमिटर चढण चढावी किंवा उतरावी लागणार होतीच.
म्हणून एकट्या सौ. वर्षाचेच बुकिंग केले होते. त्यातच ह्या सहलीचे कोणतेही नियोजन नव्हते. म्हणजे फक्त रेल्वेचे बुकींग केलेले होते. मुक्कामा करीता अथवा पुढील प्रवासाकरीता बसचे बुकींग न करता आयत्यावेळी हॉटेल आणि प्रवासाकरीता वाहन ठरवायचे असे धोरण होते. जम्मु काश्मिर आणि पंजाबची सध्याची परीस्थिती पहाता मला ते रिस्की वाटत होते.
परंतु साधारण २०-२५ दिवस आधी आमच्या सहलीच्या टीम लिडर सौ. केतकी यांचा फोन आला की त्यांनी आणि त्यांचा मुलगा नचिकेत यांनी त्यांच्या फॅमिली फ्रेंड श्री राजेश यांच्या मदतीने सहलीचे पूर्ण नियोजन केले आहे. सहलीचे तपशिलासह नियोजन करणे अतिशय मेहनतीचे आणि चिकाटीचे काम आहे. परंतु या सहलीचा माझा अनुभव असे सांगतो की, या तिघांनी या नियोजना करीता खूपच मेहेनत घेतली होती. कारण प्रत्येक ठिकाणाच्या हवामानाचा, भौगोलीक परिस्थितीचा, प्रत्येक ठिकाणा मधिल अंतराचा, प्रवासाला लागणा-या वेळाचा तपशिलवार अभ्यास करुन त्यांनी प्रवासाचे वेळापत्रक तयार केले होते. आणि काश्मिरच्या लहरी हवामानामुळे करावा लागणारा थोडाफार फरक वगळता आमची सहल नियोजीत कार्यक्रमानुमार पार पडली.
आता प्रश्न निर्माण होतो की माझा ठाम नकार होकारामध्ये कसा परिवर्तित झाला? याचे उत्तर माझ्या मते त्या वैष्णोदेवी मातेनेच मला तिच्या दर्शनाला बोलावुन घेतले असावे. कारण सौ वर्षाला बडोद्याला सोडण्याकरीता जामनगर ते बडोदा रेल्वेचे बुकींग करण्याकरिता रेल्वेची वेबसाईट उघडली आणि ध्यानी मनी नसताना बडोदा ते वैष्णोदेवी असे आमच्या दोघांचे बुकिंगच करुन टाकले. ते तिकिट वेटिंग मध्ये होते त्यामुळे नंतर सौ वर्षाचे तिकीट रद्द करुन टाकले.
तिकिट कन्फर्म झाले तर जायचे असे ठरवल्यानंतर जवळपास २० दिवसांच्या प्रवासाच्या दृष्टीने तयारी करणे जरुरी होते. सौ वर्षाची तयारी गेले जवळपास ४-५ महिने चालु होती. परंतु माझी काहीच तयारी नव्हती. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासुन तयारी करावी लागते तशी माझी परिस्थिती होती. कारण आमचे असे ठरले होते की, प्रवासात कपडे धुणे शक्य होणार नाही त्यामुळे २० दिवस पुरतील इतका कपड्यांचा स्टॉक घेणे आवश्यक होते. आम्ही जेव्हा सोमनाथला गेलो होतो तेव्हा सोमनाथ देवस्थानच्या भक्तनिवास मध्ये कपडे धुण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे हाच नियम सगळीकडे असणार हे उघडच होते.
जायचे की नाही जायचे या द्विधा मनस्थितीत असतानाच जाण्याच्या द्ष्टीने खरेदीला सुरवात झाली. सर्वप्रथम बर्फात आणि थंड वातावरणात वावरण्याच्या दृष्टीने बुटांची खरेदी झाली, कपड्यांचे जास्तिचे सेट घेऊन झाले. मोबाईल करीता पॉवर बँकची ऑनलाईन खरेदी केली. दरम्यान जामनगर ते बडोदा दोघांची रेल्वे तिकीटे काढुन झाली. ही तिकीटे मात्र कन्फर्म मिळाली.  नंतर रोज दिवसातुन कमीतकमी  दोनदा तरी वैष्णोदेवीच्या तिकीटांची ताजी पोझिशन चेक करणे सुरु झाले. बुकिंग करताना वेटींगचा २८ नंबर होता. शेवटच्या दिवशी तो १८ वर आला. त्यामुळे मग अखेरचा उपाय म्हणून तात्काळ मधे बुकींग करायचे ठरले. त्याकरिता केदारने ड्युटी बदलुन घेतली.
दिनांक १३ मार्चची सकाळ उजाडली, उद्या दिनांक १४ मार्च ला सोमवारी दुपारी एक वाजता स्वराज एक्सप्रेसबडोद्याला येणार होती. त्या गाडीची वेळ साधण्याकरीता आम्हाला जामनगरहुन दिनांक १३ मार्चला रात्री १२ वाजता ट्रेन पकडायची होती. आज ११ वाजता तात्काळचे बुकींग करायचे होते. त्या करिता केदार आणि मी १०.३० पासुन अगदी तयारीत बसलो होतो. हाताशी सर्व माहिती तयार होती फक्त कॉपी पेस्ट करायचे होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, बँकेचा व्यवहार पूर्ण होईर्यंत ४० सेकंदात सर्व सिट बुक झाल्या. खात्यातुन पैसे वजा होऊन देखिल तिकीट मिळाले नाही. त्यामुळे परत प्रश्न उत्पन्न झाला आता काय करायचे. (या विषयात हल्लीच मला एक माहिती मिळाली ती म्हणजे तात्काळ बुकींग करण्याकरीता ‘Tatkal now” नावाचे एक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. त्यामध्ये बुकींगचा पूर्ण फॉर्म आधिच भरुन आयत्यावेळी काही सेकंदात बुकिंगची प्रोसिजर पूर्ण होते.)
शेवटी त्या वैष्णोदेवीने बुद्धी दिली की, काही नाही तू तुझे सामान घेऊन बडोद्याला चल. तिच्या इच्छेप्रमाणे आम्ही दोघांनी जामनगर सोडले. दरम्यान बडोद्याच्या प्रवासात देखिल तिकीट कन्फर्म झाले का ते चेक करत होतो परंतु वेटींग लिस्टचा नंबर १६ वर आला होता, पण तिकीट कन्फर्म होत नव्हते अगदी RAC गेले असते तरी गाडीत चढता आले असते. बडोद्याला उतरल्यावर १० वाजले तरी तिकीट कन्फर्म झाल्याचा किंवा रद्द झाल्याचा मेसेज येईना. शेवटी १०.१० ला जेव्हा पोझिशन चेक केली तेव्हा समजले की तिकीट कन्फर्म झाले आहे. मी माता वैष्णोदेवीच्या अधिकृत वेबसाईटवर वाचले होते की, लोकांची अशी ठाम श्रद्धा आहे की, तुमच्या मनात काहीही असो, मातेची इच्छा असेल तर तिचा भक्त तिच्यापर्यंत पोचतोच. (Hindus believe that one cannot possibly have Darshan of Mata, unless she herself calls the devotees.) अखेर मातेचा बुलावा आला म्हणूनच हो नाही करता करता दुपारी एक वाजता स्वराज एक्सप्रेस मध्ये दाखल झालो.
।। जय मातादी! जय मातादी! जय मातादी! ।।


वृक्ष मंदिर भाग १९

१९
            सोमजाई मंदिराच्या भव्य प्रांगणात श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या कार्यालयाला लागुनच असलेल्या व्यासपीठावर खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. खुर्च्यांच्या पाठीमागे उच्चासनावर श्री सोमजाईचा मोठा फोटो ठेवलेला होता. त्याला वृक्ष मंदिरातिलच फुलांचा हार घातला होता. हे व्यासपीठ गेल्याच वर्षी बांधण्यात आले होते. एरवी याचा उपयोग कोल्हापुरला पाठवायच्या मालाचे पॅकींग आणि सॉर्टींग करण्याकरिता केला जायचा. व्यासपीठाच्या समोरच्या बऱ्याच भागावर आता सावल्या आलेल्या होत्या. तिन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांनी आता सावली द्यायला सुरवात केली होती. तरीही व्यासपीठासह त्याच्या समोरच्या भागावर हिरव्या जाळीची शेड तयार करण्यांत आली होती.
     व्यासपीठावरील खुर्च्यांवर महाराज, श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी बसले आहेत. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडीचाच्या शाखा व्यवस्थापक आचार्य मॅडम आणि शेजारच्या पाच गावांमधिल सरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य बसले आहेत. व्यासपीठाच्या मागे श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचा तिसरा वर्धापन दिन असा मजकूर असलेला रंगित फ्लेक्स बोर्ड लावलेला आहे. व्यासपीठासमोरील मैदान सोमजाईच्या सक्रीय भक्तांनी भरलेले आहे. आम्ही करुन दाखवले याचा सार्थ अभिमान प्रत्येकाच्या चेह-यावर आत्ता दिसत होता.
बरोबर साडेतीन वाजता सर्व अपेक्षीत पाहूणे उपस्थित झाले आहेत याची खात्री झाल्यावर हेमंतने माईक आपल्या हातात घेऊन सगळ्या देवीभक्तांचे हार्दिक स्वागत केले. व्यासपीठावर बसलेले आमच्या संस्थानचे सर्व पदाधिकारी, आमचे आवडते काका म्हणजेच महाराज, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आचार्य मॅडम, सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचे श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माहितच आहे की तिनवर्षांपूर्वी या देवीच्या डोंगराची काय अवस्था होती. आई सोमजाईच्या आशिर्वादाने आणि तिच्या भक्तांच्या सक्रीय सहभागामुळे तिन वर्षात आपली संस्था हा कायापालट करु शकली. आता आपण प्रथम शेळके गुरुजींच्या हस्ते आपल्या महाराजांचे या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुया. त्यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्या आचार्य मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आमच्या राधाकाकु करतिल. त्याच प्रमाणे सर्व सरपंचांचे स्वागत हंबीरराव काका करतील. ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत आमचे दिनकरकाका करतिल. अशा प्रकारे सर्वांचे स्वागत करुन झाल्यावर हेमंतने हंबीररावांना आजच्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करण्याची विनंती केली.
हंबीररावांनी सर्वांना नमस्कार करुन आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले,  तिन वर्षांपूर्वीच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वाध्याय केंद्रातर्फे गुजराथमध्ये चालु असलेल्या वृक्ष मंदिराच्या कल्पनेने प्रभावित होऊन आपण या सोमजाईच्या डोंगरावर तशाच प्रकारचे परंतु आपल्या संस्कृतीला रुचेल असे वृक्ष मंदिर उभे करण्याचा संकल्प केला. त्या संकल्पाला आई सोमजाईचा आशिर्वाद तर होताच. शिवाय अशा एका व्यक्तीचा भक्कम आणि सक्रिय पाठींबा होता, की ज्यांनी या प्रकल्पाच्या कार्यात प्रत्यक्ष अंगमेहेनत तर केलीच परंतु या संकल्पनेच्या नियोजनात देखिल सहभाग दिला. ती व्यक्ती एवढ्यावरच थांबली नाही तर संस्थानला त्यांनी भक्कम आर्थिक पाठबळही दिले आहे.
गेल्या तिन वर्षात त्यांनी संस्थानला एकुण अठरा लाख रुपयांची रोख मदत केली आहे. त्यांनी घातलेल्या बंधनामुळे मी यापूर्वी त्यांचे नांव जाहिर करु शकलो नाही. ती व्यक्ती आज आपल्या मध्ये बसली आहे. आपली म्हण आहे वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. तशी परिस्थिती आपली झाली होती. साधा लेंगा शर्ट आणि टोपी असा वेश असलेले महाराज म्हणजे ती व्यक्ती आहे. हे जाहिर करायला मला खूप आनंद होत आहे. मगाशी हेमंतने सांगितल्या प्रमाणे या डोंगराचा खरोखरच काय पालट झाला आहे. त्याचे फार मोठे श्रेय आपल्या या प्रकल्पाचे प्रेरणास्थान श्री महाराज यांच्या कडे जाते.
अशा या आपल्या महाराजांच्या या ऋणांतुन आम्ही उतराई होऊ इच्छीत नाही. परंतु त्यांचा आदर सत्कार करण्याची संधी आम्ही घेऊ इच्छीतो. मी आपल्या संस्थानचे अध्यक्ष श्री गोविंदराव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. मी या ठिकाणी विशेष उल्लेख करतो की हे श्रीफळ याच वृक्ष मंदिरातिल कल्पवृक्षाला आलेले आहे. पहिली पाच फळे आपण सोमजाईला अर्पण केली. त्यानंतरच्या सहाव्या फळाने आपण आज महाराजांचा सत्कार करीत आहोत.
त्यानंतर गोविंदराव आपल्या जागेवरुन उठले महाराजांच्या जवळ जाऊन त्यांना शाल पांघरली. त्यानंतर हातात पुष्पगुच्छ आणि श्रीफळही दिले. दोघांचेही मन भरुन आले होते. त्यामुळे महाराजांनीही काही न बोलता सगळ्यांना हाताने नमस्कार करुन आपल्या जागेवर बसले.
त्यानंतर परत हंबीरराव उभे राहिले त्यांनी आपले बोलणे पुढे चालू केले. आता आम्ही अशा व्यक्तीचा सत्कार करणार आहोत ती व्यक्ती आपल्या संस्थानची मार्गदर्शक आहे. त्यांनी आम्हाला आपले बहूमोल मार्गदर्शन दिले नसते तर हा प्रकल्प भरकटत राहिला असता. असे ते आमचे मार्गदर्शक श्री मारुती माने रिटायर्ड फॉरेस्टर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतिल शेळके गुरुजी.
माने साहेबांचा सत्कार झाल्यानंतर हेरंबने दिनकररावांना झालेल्या कामाचा आढावा घेण्याची सूचना केली. दिनकररावांनी देवीच्या डोंगराची तिन वर्षांपूर्वीची स्थिती विशद केली. त्यानंतर त्यांनी तिन वर्षापुर्वी केलेल्या संकल्पाची सर्वांना आठवण करुन दिली. त्या संकल्पापैकी आपला पाझर तलाव सध्या भरपुर भरलेला आहे. सोलर आणि पवनचक्की यांच्या सहाय्याने आपण त्यावर मोटर बसवुन पाझर तलावातील पाणी आपण पूर्ण डोंगरावर पाईपलाईनने फिरवले आहे. आपण पहात आहाच देवीला यायच्या रस्त्याच्या दुतर्फा आणि देवीमंदिर परिसरात आपण  या उपलब्ध झालेल्या उर्जेच्या सहाय्याने पथदिवे लावले आहेत. देवीचे मंदिर, संस्थानचे ऑफिस प्रसाद बनविण्याचे पाकगृह येथेही आपण या उर्जेचा वापर केला आहे. संपुर्ण देवीचा डोंगर आज आपण हिरवागार केलेला आहे. जवळपास आठ हजार झाडे आपण या डोंगरावर लावली आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून हनुमान वाडीतील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आज आपले संस्थान आपला दररोजचा खर्च भागवुन चार पैसे शिल्लक टाकायच्या परिस्थितीत आले आहे. आपल्या उत्पादनांचा टेंपो दररोज कोल्हापुर बाजारात जात असतो. हा आहे आपल्या एकजुटीचा, आई सोमजाईच्या भक्तीचा आणि श्रमशक्तीचा प्रभाव.
यानंतर आजच्या आपल्या प्रुमुख पाहुण्या स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापक आचार्य मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतिल. हेमंतने जाहिर केले आणि मॅडम बसल्या होत्या तिथे त्यांना बोलायला माईक नेऊन दिला.
आई सोमजाईच्या सर्व भक्तांना माझा दंडवत. आतापर्यंत मी आपल्या संस्थान बद्दल बरेच काही ऐकले होते. व्यासपीठावर येण्यापूर्वी देवीच्या डोंगराचा सर्व परिसर मी फिरुन आले. तीन वर्षापूर्वीही मी नवरात्रीमध्ये आई सोमजाईच्या दर्शनाला आले होते. तीन वर्षापुर्वीचा देवीचा डोंगर आणि आज मी पहात असलेला डोंगर याची तुलना मी स्वर्ग आणि पाताळ या कल्पनेशी करीन. खरोखरच नितांत रमणीय असे हे स्थळ आपण बनविले आहे. विशेषत: आपण पाझर तलावाला ज्या पद्धतीने सजवले आहे ते पाहून आपल्या रसिकतेची दाद द्यावीशी वाटते. भविष्यात हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येईल यात संशय नाही. इथला प्रयोग बघायला गावोगावाहून लोक येतिल याची मला खात्री आहे. अशाप्रकारची देवीची सेवा केल्यावर ती का प्रसन्न होणार नाही? अर्थात होणारचं! तिचा पूर्ण आशिर्वाद आपणा सर्वांच्या पाठीशी राहिल असे मला वाटते.
आता मी थोडेसे वेगळ्या विषयावर बोलणार आहे. आताच आपल्या संस्थान तर्फे ज्यांचा सत्कार केला, त्यांच्याबद्दल त्यांची परवानगी न घेता मी चार गोष्टी सांगणार आहे. कारण त्यांना परवानगी विचारली तर ते ती कधीही देणार नाहीत याची मला खात्री आहे. आपण ज्यांना महाराज म्हणता ते एक मोठे बँक ऑफिसर आहेत. माझ्या बँकेतल्या नोकरीची सुरवात मी त्यांच्या हाताखाली काम करुन केली आहे. खेडसारख्या मोठ्या शहरातिल स्टेट बँकेच्या शाखेचे ते मॅनेजर होते. त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या गावावर येऊन कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांनी ही फकिरी पत्करली आहे. त्याच्या आताच्या रुपावरुन त्यांची जर पारख कराल तर फसाल. मी पाहिलेले आमचे हे साहेब नेहमी कडक इस्त्रीमध्ये आणि सुटा बुटात असत. त्यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वाला भले भले घाबरत असत. परवा ते बँकेत आले तेव्हा मी देखिल प्रथम ओळखले नाही. त्यांनी मलाही त्यांची खरी ओळख प्रकट करण्यास बंदी घातली आहे. परंतु आता सरपंच हंबीररावांनी त्यांची जाहिर ओळख करुन दिली म्हणून मी बोलण्याचे धाडस केले आहे.
मला आपल्या या वर्धानपन दिनाच्या कार्यक्रमाला बोलावुन एक वेगळीच अनुभूती घेण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देऊन मी माझे चार शब्द पूर्ण करते.
आता मी आमच्या काकांना म्हणजेच महाराजांना आम्हाला मार्गदर्शन करायला सांगणार आहे. आमच्या चौघा मित्रांकरीता हे काका परिसासारखेच आहेत. त्यांच्या पवित्र स्पर्शाने आमच्यात जाग्या होणा-या वाल्याला त्यांनी माणसात आणले. आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी दिली. ते जर आमच्या गावात आले नसते तर आमचे काय झाले असते ही कल्पनाच आता आम्हाला हवालदिल करते. मी आता आपल्या महाराजांना आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. असे म्हणून हेमंतने आपल्या हातातला माईक महाराजांकडे दिला.
माझ्या सोमजाई आईच्या भगतांनो आपल्याला माझा दंडवत. आपण केलेल्या भगतगिरीने सगळ्यांनाच थक्क करुन सोडले आहे. तुम्ही किमयागार आहात. अक्षरश: शून्यातुन हे हिरवे वैभव आपण उभे केले आहे. या बद्दल आपल्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. परंतु आता खरा धोका निर्माण होणार आहे. या केलेल्या कामाचा अहंकार आता निर्माण होऊ शकतो. तेव्हा त्या पासुन सावधान रहा. आता आपला सर्वांचा कसोटीचा काळ सुरु होणार आहे. जे निर्माण केले आहे ते टिकवणे महत्वाचे आहे. नाहीतर मागच्या पिढीमध्ये देखिल हे वैभव येथे उभे होतेच. पण आपणच त्याला भस्म केले होते. आता आपल्याला हे उभारण्याकरिता लागलेल्या कष्टाची जाण आहे. म्हणूनच ते कोणीही ओरबाडुन नेणार नाही याची दक्षता घ्या.
त्याहुनही महत्वाचे म्हणजे तुम्ही आता जागे झाला आहात. पण तुमच्या शेजा-यांचे काय? तुम्ही पोहायला शिकलात तर तुमचे हे कर्तव्य आहे की जो निसर्गाचा ऱ्हास करुन स्वत:बरोबर दुसऱ्यालाही बुडवितो आहे. त्याला बुडू न देता तारले पाहिजे. समर्थांनी म्हटलेच आहे,
आपण येथेष्ट जेवणें| उरलें तें अन्न वाटणें |
परंतु वाया दवडणें| हा धर्म नव्हे ||
तैसें ज्ञानें तृप्त व्हावें| तेंचि ज्ञान जनास सांगावें |
तरतेन बुडों नेदावें| बुडतयासी ||
उत्तम गुण स्वयें घ्यावे| ते बहुतांस सांगावे |
वर्तल्याविण बोलावे| ते शब्द मिथ्या ||
आपण पोटभरुन जेवल्यावर जर काही उरले तर ते दुसऱ्यांना वाटावे. माज आल्यासारखे ते वाया घालवु नये. आता तुम्हाला एक चांगला मार्ग सापडला आहे. आता तुमची जबाबदारी वाढली आहे. जे पथभ्रष्ट झाले आहेत त्यांना योग्य मार्गावर आणायचे काम आता तुम्हाला करायचे आहे. तेव्हा हा प्रयोग इतरांनाही दाखवा त्यातिल फायदे त्यांना समजाऊन सांगा. त्यांना या मार्गानी जाण्यास मदत करा. म्हणजे सोमजाईचा प्रसाद सर्वांनाच मिळेल.
असो. आता उपदेश पुरा करतो. आता माझी ओळख आपल्याला झाली आहेच. तेव्हा त्याबद्दल मी काही बोलत नाही. मी या प्रकल्पाकरिता जो निधी दिला त्यातला एकही पैसा मी माझ्या कष्टाने मिळविलेला नाही. तो पैसा समाजाचा होता तो मी या निमित्ताने समाजाला परत केला आहे इतकेच. आपण काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये वाचले असेल रायगड जिल्ह्यामध्ये जाई नावाचे एक गाव होते ते निसर्गाच्या एका तडाख्यात जगाच्या नकाशावरुन पुसले गेले.ते गाव माझे होते. त्याची भरपाई म्हणून मला सरकारने जी काही रक्कम दिली होती ती रक्कम मी या ठिकाणी सोमजाईच्या चरणी अर्पण केली इतकेच.
सज्जनगडावरुन मी काही निश्चय करुन निघालो होतो. त्या निश्चयालाच आपल्या गावाने गेले काही दिवस मायेच्या जाळ्यात अडकवले आहे. ते जाळे तोडायचा मी अनेक वेळा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. परंतु आज मला एक समाधान आहे, जो यज्ञ आपण येथे केलात त्यात मलाही चार समिधा टाकायची संधी मिळाली. परंतु आता आपण मला नारळ दिला आहे त्याने मला समाधान वाटले. आपल्या संस्कृतीत नारळ देण्याला एक वेगळा अर्थ आहे. मी आपल्याला आई सोमजाईच्या साक्षीने जो शब्द दिला होता त्यातुन मी आता मुक्त झालो आहे. वृक्ष मंदिराचा हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे. तेव्हा आपण मला आता निरोप द्यावा ही विनंती आहे. आई सोमजाईला प्रणिपात करुन मी आपली रजा घेतो. रजा घेताना प्रार्थना करतो.
सर्वेपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामय:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दु:ख माप्नुयाSSत् ।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
महाराजांचे बोलणे संपल्यावर हेमंतने लगेचच कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपल्याला एक महत्वाचे काम करायचे आहे. आता आपण आपल्या पाझर तलावाचे नामकरण करणार आहोत. मी आपल्या संस्थानचे अध्यक्ष श्री गोविंदकाका जोशी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरच ठेवलेल्या फलकाचे अनावरण करुन नांव जाहिर करावे. असे बोलुन हेमंतने गोविंदराव काकांना फलकाचे अनावरण करण्यासाठी त्या फलकापर्यंत नेले.
त्यानंतर गोविंदरावांनी भगव्या कापडामध्ये ठेवलेल्या फलकाचे अनावरण केले आणि माईकवरुन नांव वाचुन दाखवले. ते म्हणाले आपण आपला तलावाचे सोमजाई स्मृती सागर असे नामकरण केले आहे. या नावातिल रहस्य महाराजांच्या सगेचच लक्षांत आले. ते नांव ऐकुन त्यांच्या मनाला समाधान वाटले.
आता आजच्या कार्यक्रमाचा समारोप आपले शेळके गुरुजी करतिल. असे म्हणून हेमंतने आपल्या हातातला माईक गुरुजींकडे दिला.
शेळके गुरुजींनी समारोप करताना सांगितले. आताच आपल्याला महाराजांनी सांगितल्या प्रमाणे आमचे पोट आता जरी भरलेले आहे. तरी या झालेल्या कामाने संतोष न मानता आम्ही या संस्थानचे कार्य चालूच ठेवणार आहोत. संस्थानतर्फे आम्ही एक रोपवाटीका तयार करतोय. त्या रोपवाटीकेमध्ये तयार होणारी रोपे आम्ही गावागावात जाऊन पोचवणार आहोत. तेथिल सेवाभावी व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या मार्फत त्या रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल करण्याची व्यवस्था  करुन वृक्ष मंदिराची ही संकल्पना जास्तित जास्त गावात पोचवण्याची मोहिम राबवणार आहोत. जेणे करुन सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास न होता पर्यावरण समृद्धीच होईल.
आता माझी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी प्रसाद घेऊनच आपल्या घरी जायचे आहे. आता मी आपला आजचा कार्यक्रम समाप्त झाल्याचे जाहिर करतो. आता लगेचच आधी आई सोमजाईची आरति होईल. नंतर प्रसाद वाटपाला सुरवात होईल.
***********
अक्षयतृतीयेचा दुसऱ्या दिवशी मोरांच्या केकांनीच महाराजांना जाग आली. देवळातले घड्याळ पहाटेचे तीन वाजल्याचे दाखवत होते. महाराजांनी आपले प्रातर्विधी आवरले. स्नान झाल्यानंतर प्रात:स्मरण करुन त्यांनी देवीची मनोभावे पूजा केली. काल सत्कारामध्ये मिळालेला नारळ देवीपुढे ठेवला. ते सध्या रहात असलेल्या संस्थानच्या ऑफिस जवळील खोलीतील आपली झोळी उचलली. झोळीमध्ये दैनंदिन पारायणची दासबोधाची छोटी प्रत आणि रोजचे कपडे या व्यतिरिक्त काही नाही याची खात्री केली. त्यामध्ये असलेली शाल काढुन देवीच्या पायाजवळ ठेवली. देवीला मनोभावे सर्वांच्या कल्याणाचे साकडे घातले. देवीचा निरोप घेऊन ते परत न येण्यासाठी निघाले. त्यांचा इथला ऋणानुबंध आता त्यांच्या दृष्टीने संपला होता.
आता ते कुठे जाणार होते हे त्यांनाही माहित नव्हते. फक्त त्यांना या स्थानापासुन जास्तीत जास्त लांब जिथे त्यांना कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जायचे होते. त्यांना आपली ओळख पुसून टाकायची होती. त्यांना फक्त एवढेच माहित होते. आपण एक प्रतिज्ञा केली आहे. कोणाच्या घरी रहायचे नाही. जिथे जायचे तिथे रामदासी भिक्षेकरी म्हणूनच जायचे. जे अन्न मिळेल त्याच्या बदली अन्नदात्याचे कल्याण चिंतायचे. त्या अन्नदात्याकडे नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करायचे.
**********
दोन दिवसांनी औरंगाबाद जिल्ह्यातिल चिखली नावाच्या दुष्काळी गावात दुपारच्या वेळेला भर उन्हात एका भिक्षेक-याची आरोळी ऐकु आली.
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्टापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।।
Sय जSSय रघुवीSर समर्थ।।
माई भिक्षा वाढा!! असा खणखणित पुकारा करीत तो दारात उभा राहिला होता. स्वच्छ पांढरा लेंगा, त्यावर स्वच्छ पांढरा नेहरु शर्ट, डोक्यावर स्वच्छ पांढरी टोपी, काखेत शबनम सारखी पिशवी अडकवलेल्या त्या भिक्षेकऱ्याने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले. साधारण पन्नास वयाचा वाटणारा तो भिक्षेकरी चेहऱ्यावरुन तरी चांगल्या सुखवस्तु घरातला वाटत होता. जरी त्याची दाढी वाढलेली होती तरी ती  अस्ताव्यस्त दिसत नव्हती. अशा व्यक्तिमत्वाचा माणूस भिक्षा मागतोय हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते.
***********
समाप्त


वृक्ष मंदिर भाग १८

१८
रोजच्या सवयी प्रमाणे महाराज पहाटे साडे तिन वाजता उठले. आपले दैनंदिन प्रात:स्मरण स्नान वगैर उरकल्यावर त्यांनी नित्याप्रमाणे आजुबाजुला फिरुन १०-१२ प्रकारची फुले गोळा केली. सोमजाईची पंचोपचारी पूजा केली. त्यांच्या पुजेला मोरांच्या केकांची साथ होती. आतापर्यंत सहा वाजले होते. चैत्र महिना असल्याने चांगले फटफटीत उजाडले होते. देवळाजवळ असलेल्या नळाला पाईप जोडुन नित्याप्रमाणे त्यांनी तेथिल फुलझाडांना पाणी घालणे सुरु केले.
            महाराज पाईपने फुलझाडांना पाणी घालत असतानाच त्यांना मंदिराकडे येणारे हंबीरराव आणि शेळके गुरुजी दिसले. दोघेजण मंदिरापाशी पोचेपर्यंत महाराज त्यांना सामोरे गेले. त्यांनी गुरुजींना विचारले, नमस्कार गुरुजी! आज सकाळीच कसे काय?
            काही विशेष नाही! रोजच्या सवयी प्रमाणे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलो होतो. वाटेत हंबीरराव भेटले ते म्हणाले चला आज सोमजाई मंदिरात जाऊ. म्हणून आलो झाले. हंबीररावांचाही काही खास उद्देश असेल असे वाटत नाही. शेळके गुरुजी म्हणाले. त्यानंतर ते आणि हंबीरराव दोघेही सोमजाईच्या दर्शनाला गेले.
काल रात्री महाराजांनी दासबोधा मधला महंत लक्षण हा समास वाचला. त्या समासातल्या पुढिल ओव्या त्यांच्या समोर सारख्या फेर धरुन नाचत होत्या.
जयास येत्नचि आवडे| नाना प्रसंगीं पवाडे |
धीटपणें प्रगटे दडे| ऐसा नव्हे ||१२|| श्रीराम ||
सांकडीमधें वर्तों जाणे| उपाधीमधें मिळों जाणे |
अलिप्तपणें राखों जाणे| आपणासी ||१३|| श्रीराम ||
आहे तरी सर्वां ठाईं| पाहों जातां कोठेंचि नाहीं |
जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाईं| गुप्त जाला ||१४|| श्रीराम ||
त्तेव्हापासुन त्यांचे सतत विचार चक्र सुरु झाले होते. आपण या गावात आलो त्याला आता तीन वर्षे होऊन गेली. आपण सज्जनगड सोडताना समर्थांच्या समाधीसमोर जो निश्चय केला तो आपण पाळतोय कां? आपण तर या गावाच्या लोभात अडकतच चाललोय. आपण सोमजाई समोर सगळ्यांना काय वचन दिले आहे ते आता ते आठवु लागले. आपण खरोखरच अलिप्तपणाने येथे राहिलो आहोत कां? का आपल्यालाच हे महाराजपण आवडु लागले आहे? आपल्याला जे कार्य येथे व्हावेसे वाटत होते ते आता मार्गी लागले आहे. ज्या चौघा दुर्लक्षीत मुलांचे आयुष्य मार्गी लागावे ही आपली अंतर्यामी इच्छा होती ती आता जवळपास पुरी झाली आहे. वृक्ष मंदिराचा प्रकल्पही आता जवळपास पूर्ण झाला आहे. दोन दिवसांनी अक्षय तृतियेला हा प्रकल्प सुरु केल्याला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. तो समारंभ झाला की गुपचुप येथुन प्रस्थान करावे हे बरे. जर याची वाच्यता केली तर कोणी आपल्याला जाऊन देणार नाही. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर हा गाव सोडण्याचा निश्चय झाल्यावर त्यांच्या मनाला समाधान वाटले. एकीकडे डोक्यात विचार चालू असताना ते फुलझाडांना पाणी घालण्याचे कामही करित होते. तेवढ्यात त्यांच्या बाजुला सरपंच येऊन उभे राहीले. परंतु महाराजांच्या काही ते लक्षात आले नाही.
महाराज! आज कुठल्या विचारात गढले आहात? हंबिररावांनी त्यांच्या खांद्याला हात लावत विचारले.
नाही काही विशेष नाही! पण गुरुजी कुठे गेले आहेत? महाराजांनी विचारले. त्यानंतर ते हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव! मनात विचार चालू होता की, आता आपला वृक्ष मंदिराचा प्रकल्प मार्गी लागला. आपण नियोजित वृक्ष मंदिराचे जे स्वप्न बघितले होते ते आता प्रत्यक्षात उतरलेले दिसत आहे. मी आई सोमजाईच्या साक्षीने जे वचन आपल्याला दिले होते ते आता पूर्ण झाले आहे.
महाराज मलाही एक मनावरचे ओझे हलके करावे असे वाटते. मी आपल्याला एक वचन दिले होते. त्या वचनांतुन आपण मला मुक्त करावे ही आपल्याला प्रार्थना आहे. हंबीररावांनी महाराजांना विनंती केली.
कसले वचन हंबीरराव? महाराजांनी विचारले.
कसले काय विचारता महाराज. आपण या गावात आलेत त्याच्या दुस-याच दिवशी तुम्ही मला आपली खरी ओळख सांगितलीत. त्यानंतर जेव्हा वृक्ष मंदिर ही संकल्पना जेव्हा प्रत्यक्षात आणायचा विचार झाला तेव्हा आपण या प्रकल्पाच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिलात. आतापर्यंत जवळपास अठरा लाख रुपये आपण या प्रकल्पाला दिलेत. या गोष्टीची मला सोडुन कोणालाच माहिती नाही. आपले नांव गुप्त ठेवावे असे आपण माझ्या कडुन वचन घेतलेत. त्या वचनाचाच मला हल्ली रोज त्रास होतोय.
अहो हजारभर रुपये कोणी दान दिले तर तो आपल्या नांवाची पाटी लावायला पाहिजे ही अट घालतोय. त्या पार्श्वभूमीवर आपण आपले नांव लपवुन ठेवताय हे मनाला पटत नाही. शिवाय आपला उद्देश आपल्या गावाचा आणि आपल्या कुंटुंबातिल व्यक्तींचे स्मारक असावे हा होता. तर त्यांची नावे तरी जाहिर व्हायला पाहिजेत असे मला वाटते. तेव्हा आज रात्री होणा-या विश्वस्थांच्या बैठकीत मला आपले नांव जाहिर करण्याची मला परवानगी द्यावी हा माझा आपल्याजवळ हट्ट आहे.
महाराजांनी क्षणभर मनाशी विचार केला. नाहीतरी उद्या आपल्याला हे स्थान सोडुन जायचे आहेच. तेव्हा नांव जाहिर झाले तरी काही फरक पडणार नाही. आपण या जागेपासुन खूप लांब जाऊयात म्हणजे झाले. प्रत्यक्षात ते हंबिररावांना बोलले, हंबीरराव तुम्ही मला अडचणीत टाकलेत. बर ठिक आहे उद्याच्या कार्यक्रमांत माझे नांव जाहिर करा. पण कुठेही ही गोष्ट कागदावर यायला नको.  कोठेही माझ्या नावाचा बोर्ड लावायचा नाही. म्हणजे उद्याच्या कार्यक्रमानंतर काही दिवसांनी लोक ही गोष्ट विसरुन जातील. लोकांच्या मनांत माझे नांव न रहाता श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान हेच नांव लक्षांत रहायला हवे.
चालेल महाराज आपण माझ्या मनावरचे फार मोठे ओझे हलके केलेत. हंबिरराव आनंदाने बोलले.
***********
देवीच्या डोंगरावरील दैनंदिन कार्यक्रमाला आता सुरवात झाली होती. दररोज कढीपत्ता, भाजीपाला, शेवग्याच्या शेंगा, फळभाज्या घेऊन जाणारा श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानचा  टेंपो भरुन कोल्हापुरला जायला निघाला. निरनिराळ्या प्लॉटमध्ये जाणा-या ठिबक सिंचनाच्या पाईपलाईनचे व्हॉल्ह चालू करणारे सेवेकरी आले व त्यांनी आपले काम सुरु केले.
आतापर्यंत डोंगराचा सर्वभाग लागवडीखाली आला होता. साधारण आठ हजार लहानमोठी झाडे लावण्यांत आली होती. त्या मध्ये आवळा, हरडा, बेहडा, दशमुळामधिल सर्व वनस्पती, आंबा, चिंच, जांभुळ, अगस्ती, कडुनिंब, कढीपत्ता, नारळ, चंदन, रक्तचंदन, बदाम, मसाल्याची झाडे अशी अनेक प्रकारची झाडे होती. कमीत कमी पाचशे जातीची झाडे येथे लावली होती. मात्र सगळी झाडे देशी होती. त्यामध्ये परदेशी झाडे लावणे जाणुन बुजुन टाळले होत.
या निर्माण झालेल्या झाडीमध्ये खास गुजराथमधुन पांच मोर लांडोरींच्या जोड्या आणल्या होत्या. याशिवाय अनेक प्रकारच्या पक्षांनी आता आपला मुक्काम या वृक्ष मंदिरात हलविला होता. सध्या चैत्र महिना चालू असल्याने सतत कोकिळांची कुहू कुहू या सर्व परिसरांत ऐकु यायला लागली आहे.
शेळके गुरुजी पाझर तलावाकडे गेले होते. तेथे त्यांना आमराईमध्ये झाडांवर बसलेले मोर दिसले. सगळा परिसर हिरवागार दिसत होता. त्यांना तिन वर्षापूर्वीचा देवीचा डोंगर आठवला, किती उजाड होता हा परिसर तेव्हा. विचार करत करत ते पाझर तलावापाशी आले. त्या तलावाला आता छान घाटही बांधण्यात आला होता. तलावामध्ये निरनिराळ्या प्रकारचे मासे सोडण्यांत आले होते. तसेच अलिबाग आणि मुंबईहून खास कमळाचे गड्डे आणून या तलावात सोडले होते. तलावाचा पृष्टभाग लाल, पांढ-या आणि सहसा न आढळणा-या नीळ्या कमळांनी भरुन गेला होता. तलावाच्या पाण्यामध्ये १५-२० बदकेही डुंबताना दिसत होती. या सर्व प्रसन्न करणा-या वातावरणाने त्यांचे मन एकदम प्रफुल्लीत झाले. तलावाच्या पाय-या उतरुन त्यांनी प्रत्येक प्रकारची पांच पांच कमळे काढली आणि ते सोमजाईला, मारुतीला वहाण्याकरिता सोमजाई मंदिराकडे निघाले. तेथे सरपंच त्यांची वाटच बघत होते. दोघांनीही परत मंदिरात जाऊन देवीला कमल पुष्पे वाहिली.
*************
रात्रीचे नऊ वाजले होते. गोविंदरावांचे नुकतेच जेवण झाले होते. जेवण झाल्यावर आत्ता ते अंगणात शतपावली करीत होते. शतपावली करताना त्यांचे लक्ष देवीच्या डोंगराकडे गेले. देवीचा डोंगर आणि डोंगरावर जाण्याचा रस्ता पथ दिव्यांनी उजळुन गेलेला दिसत होता. दोन दिवसांनी अक्षय तृतीयेला वृक्ष मंदिर प्रकल्प सुरु केल्याला तिन वर्ष पूर्ण होणार होती. तिन वर्षापूर्वी केलेला संकल्प समोर पथदिव्यांच्या माळेच्या रुपाने साकार झाल्याचे जाणवत होते. शतपावली करताना त्यांच्या डोळ्यासमोर तिन वर्षांपूर्वींच्या देवीच्या डोंगराचे स्वरुप आले. आताच्या समोर दिसणा-या चित्राशी तुलना करता त्यांच्या मनाला समाधान झाले. आता थोड्याच वेळात त्यांच्या घरी श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक होणार होती. दोन दिवसांनी होणा-या संस्थानच्या तृतिय वर्धावनदिनाच्या कार्यक्रमा संबंधी चर्चा करण्याकरीता सगळे आज येथे जमणार होते.
साडेनऊ वाजेपर्यंत सर्व विश्वस्त गोविंदरावांच्या माजघरांत जमा झाले. आतापर्यंतच्या प्रथेप्रमाणे बैठकीची सुरवात सोमजाईच्या प्रार्थनेने करण्यांत आला. सर्वप्रथम गोविंदरावांनी सर्व विश्वस्थाचे आपल्या घरी स्वागत केले. ते म्हणाले तिनवर्षांपूर्वी आपण एक संकल्प केला. त्या संकल्पाची बहुतांश पूर्ती गेल्या तिन वर्षांत आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाली आहे असे मला वाटते. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन. यापुढेही आपण आई सोमजाईच्या आशिर्वादाने उरलेले कार्य पूर्ण करुयात.
माझ्याकडे असलेल्या ताम्रपटामधिल मजकूराप्रमाणे आपण देवीच्या भक्तांचे कल्याण व्हावे या उद्देशाने वृक्ष मंदिराचे काम चालवले आहे. आपण केलेल्या या प्रयोगाचा साईड इफेक्ट काय झालाय हे आपल्या लक्षांत आले आहे का ते मला माहित नाही. परंतु आमच्या परसातल्या विहिरीला यंदा या चैत्र महिन्यांत देखिल भरपुर पाणी आहे. या शिवाय गावात आता निरनिराळ्या पक्षांचे दर्शन व्हायला लागले आहे. गेल्या काही वर्षांत मी कोकीळेचा आवाज आपल्या गावात ऐकला नव्हता तो यंदापासुन ऐकायला येतो आहे. गोविंदरावांनी प्रदिर्घ प्रस्तावना केली.
आपले म्हणणे बरोबर आहे गोविंदराव! गावातल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत गेले दोन वर्षात झालेली वाढ मलाही जाणवली आहे. त्यामुळे गावातही थोडीफार हिरवळ आता दिसायला लागली आहे. हंबीरराव म्हणाले.
पण हा आपला प्रयोग आपण विस्तारला पाहिजे. आजुबाजुच्या गावांना वाड्यांना अशाप्रकारचा प्रयोग करायला आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. शेळके गुरुजी म्हणाले.
बरोबर आहे गुरुजी तुमचे. जे जे आपणासी ठावे। ते दुस-यासी सांगावे। शहाणे करुनी सोडावे। सकल जन।।असे समर्थांनी म्हटलेच आहे. आपण अक्षय तृतीयेला होणा-या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आजुबाजुच्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलवुया त्यांना आपला प्रयोग दाखवुया म्हणजे त्यांना आपणही असे काहितरी करायला पाहिजे याची जाणिव होईल. दिनकरराव म्हणाले. परंतु आता आपण त्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवुयात.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आपण स्टेट बँकेच्या आचार्य मॅडम यांना बोलावुया. त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केले आहे. शेळके गुरुजी बोलले.
आज मी आपल्या पाझर तलावावर गेलो होतो. तिथले वातावरण पाहून मन खूप प्रसन्न झाले. तेव्हाच मला एक कल्पना सुचली. आपण या सरोवराला काहितरी चांगले नांव द्यायला हवे. कोणाला काही सुचत असल्यास सांगावे.शेळके गुरुजींनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला.
या बाबतित मला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. हंबीरराव म्हणाले. कोणती गोष्ट? त्याचा या पाझर तलावाशी काय संबंध? गणेशने विचारले.
 सांगतो! सगळे सांगतो! आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण वृक्ष मंदिराचा प्रकल्प करण्याचे ठरवित होतो. पण आपली गाडी अडकत होती एकाच ठिकाणी! आपण सगळे म्हणत होतो, सगळे सोंग आणता येईल पण पैशाचे सोंग आणता येणार नाही! त्यावेळी आपल्या पाठीशी उभा राहिला एक दानशूर माणूस. त्या माणसाने आपल्या या प्रकल्पाला एकुण अठरा लाख रुपये अर्थसहाय्य केले आहे.
त्या व्यक्तीची एकच अट होती ती म्हणजे त्या व्यक्तीचे नांव गुप्त ठेवायचे. परंतु आजच मी त्या व्यक्तीला मनवण्यांत यशस्वी झालो आहे. त्यांना दिलेल्या गुप्ततेच्या वचनातुन त्यांनी आज मला मुक्त केले आहे. त्यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य करताना अशी कल्पना केली होती की हा प्रकल्प म्हणजे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे ते एक स्मारकच आहे. तेव्हा त्या व्यक्तीच्या जवळच्या त्या नातेवाईकाचे नांवच आपण त्या पाझर तलावाला देऊया. सरपंचांनी गौप्यस्पोट केला.
पण काका तुम्हीतर अर्थसहाय्य करणारी एक संस्था आहे असे सांगितले होतेत. गणेशने आपली शंका उपस्थित केली.
तुझे म्हणणे बरोबर आहे गणेश पण त्या व्यक्तीची तशी अटच होती. मग मी आयत्यावेळी एक खोटी संस्था उत्पन्न केली झाले. हंबीररावांनी स्पष्टीकरण दिले.
पण काका अजुनही आपण त्या दानशूर व्यक्तीचे नांव काही सांगितले नाही. हेमंतने विचारले.
बरोबर आहे, अहो हंबीरराव! सगळे सांगितलेत पण त्या दानशूर व्यक्तीचे नांव अजुनही आपण सांगितले नाही! गोविंदरावांनी उत्सुकतेने विचारले.
सांगतो ती व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. आपल्या सर्व नियोजनात त्यांचाही सक्रीय सहभाग होता. हंबीरराव बोलले.
म्हणजे? कोणss महाराज? पण त्यांच्याकडे एवढी रक्कम कशी काय? हेरंबने आश्चर्याने विचारले.
बरोबर आहे! महाराजच त्यांनीच आपल्या या प्रकल्पाला एक रकमी अठरा लाख रुपये दिले आहेत. त्यांचा इतिहास फार मोठा आहे. त्यांनी त्यांच्या गत आयुष्यात फार मोठा आघात सोसला आहे. असे म्हणून त्यांनी महाराजांचा सर्व इतिहास सगळ्यांना सांगितला.
हंबीररावांनी सांगितलेला महाराजांचा इतिहास ऐकुन सगळेच हळहळले. इतका मोठा आघात सोसुनही महाराजांनी गावाच्या कल्याणासाठी जे कष्ट घेतले त्याचे ऋण फेडता येणे शक्य नाही हे प्रत्येकाला मनांतुन जाणवले. हे सर्व ऐकून प्रत्येकाचाच मुड एकदम बदलुन गेला.
पण आपला पाझर तलावाला काय नांव द्यायचे हे राहुनच गेले. शेळके गुरुजींनी सगळ्यांना परत जमिनीवर आणले.
महाराजांच्या वडिलांचे नांव होते सोमनाथ आणि गावाचे नांव होते जाई. महाराजांची इच्छा आपल्या गावाचे आणि गावक-यांचे एकत्रीत स्मारक व्हावे ही होती. तेव्हा आपण त्या तलावाचे नांव सोमजाई स्मृती सागर”  असे ठेवुया. हंबीररावांनी आपली इच्छा व्यक्त केली.
या नावाला माझे अनुमोदन आहे! हेरंबने अनुमोदन दिले. सर्वानुमताने  सोमजाई स्मृती सागर हे नांव कायम करण्यांत आले.
शेळके गुरुजींनी हेमंतला कोल्हापुरला जाणा-या गाडीबरोबर जाऊन अशा मजकुराचा फ्लेक्स बोर्ड उद्याच तयार करुन आणायला सांगितले. हेमंतने ते लगेचच मान्य केले.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपण महाराजांची जाहिर कृतज्ञता व्यक्त करुया आणि त्यांचा श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थान तर्फे सत्कारही करुया. गोविंदरावांनी अध्यक्ष म्हणून आपले मत व्यक्त केले त्याला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली.
पण सत्कार कोणाच्या हस्ते करायचा? जितूने विचारले.
आपण स्टेट बँकेच्या मॅनेजर आचार्य मॅडम यांच्या हस्ते  महाराजांचा सत्कार करावा असे मला वाटते. दिनकररावांनी सूचवले.
यावर माझी अशी सूचना आहे की, आपण हा सत्कार आपल्या संस्थेतर्फे कृतज्ञता म्हणून करणार आहोत तेव्हा तो संस्थेच्या अध्यक्षांच्या म्हणजेच गोविंदरावांच्या हस्त व्हावा. शेळके गुरुजींनी आपला प्रस्ताव मांडला त्याला सर्वांनी संमती दिली.
वर्धापन दिनाची आजुबाजुच्या गावामध्ये जाऊन निमंत्रण देण्याची जबाबदारी जितूवर सोपवण्यांत आली. ती त्याने मान्य केली. परंतु स्टेट बँकेच्या मॅनेजर आचार्य मॅडम यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावण्याची जबाबदारी हंबिररावांनी स्विकारावी असे मात्र त्याने सुचविले. सरपंचांनीही ते लगेचच मान्य केले आणि उद्याच बँकेत जाऊन ते काम करीन असेही सांगितले.
आता वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा आपण ठरवुया. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन हेमंत करेल. प्रास्ताविक हंबीरराव करतिल. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा दिनकरराव घेतील. संस्थानच्या भावी योजनां संबंधी शेळके गुरुजी सांगतिल आणि समारोप करतिल. गोविंदरावांनी सुचवले आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. त्यानंतर चहापान होऊन आजची बैठक समाप्त झाली.
*************