श्रीवर्धनचे चितळे मास्तर
अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा
रायगड.
परवा
पु.लं.ची चितळे मास्तर ही कथा ऐकली आणि मला आमच्या गावांतिल व्ही.सी. जोशी सरांची
आठवण आली. माझी त्यांची पहिली भेट झाली तेव्हा त्यांचे वय ६५ ते ७० च्या दरम्यान
होते. ते जवळच असणाऱ्या दिवेआगर येथिल हायस्कूलला इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांचे
लहानपण अतिशय कष्टात गेले. कोकणातिल ब्राह्मण समाजातिल बहुसंख्य कुटुंबे पूर्वी
जेमतेम खाऊन पिऊन सुखी या वर्णनात बसतिल अशीच असायची. त्यामुळे मुलांना शिकवायला
उचलुन पैसे देणे शक्य नसायचे. गावात जिथपर्यंत शाळा असेल तिथपर्यत शिक्षण घ्यायचे
आणि थांबायचे किंवा जर पुढील शिक्षण घ्यायची दुर्दम्य इच्छा असेल तर कष्ट करायची
तयारी हवी. श्रीवर्धनमध्ये पूर्वी अगदी प्राथमिक स्तरावरचे शिक्षण मिळत असे.
आतासुद्धा शिक्षणाची फार चांगली सोय आहे अशातला भाग नाही. परंतु सध्या हायस्कूल
मुबलक आहेत आणि हल्ली कॉलेजचीही सोय झाली आहे.
श्रीवर्धन
हे तेव्हा जंजिरा संस्थानात होते. जर माध्यमिक किंवा इंग्रजी शिक्षण घ्यायचे असेल
तर जंजिरा मुरुड येथे सोय होती. सध्या दळणवळणाची साधने खूप झाली आहेत परंतु व्ही.
सी. सरांच्या काळात तशी काही सोय नव्हती. श्रीवर्धन ते दिघी हे तिस किलोमिटर अंतर चालत
जायचे. त्यानंतर खाडीतुन पलिकडे जाण्याकरीता तर(होडी) असायची. त्या तरीतुन खोऱ्यात
जायचे खोऱ्यातुन जंजिरा मुरुडला जायला परत पैची तर असायची. त्या तरीचे भाडे एक पै
होते म्हणून तिला पैची तर असे म्हटले जायचे. जर श्रीवर्धनहून किंवा मुरुडहून
निघायला उशिर झाला तर बोर्ली पंचतन येथे मुक्काम करावा लागायचा. कारण पुढे जंगल
होते त्यात सर्वप्रकारची श्वापदे असायची.
जंजिरा
मुरुडला शिक्षणाला जाणाऱ्यांकरीता तिथे बोर्डींग असायचे. परंतु ब्राह्मण समाजाच्या
मुलांना ती सोय उपलब्ध नव्हती. मुरुडला इंग्रजी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
समोर दोनच पर्याय होते. एकतर नातेवाईकांकडे रहायचे किंवा वारावर शिक्षण घ्यायचे.
जे पैसेवाले विद्यार्थी असायचे त्यांची सोय सहज व्हायची कारण ते पैसे मोजु शकायचे
परंतु गरिबांना त्यांचे नातेवाईकही कायमचे ठेवायला तयार नसायचे. त्यात त्यांचा दोष
होता असा भाग नाही परंतु त्यांची देखिल परिस्थिती त्याला कारण असे. अशा मुलांना
नातेवाईकांकडे मुक्कामाला रहायच्या बदल्यात त्यांच्याकडची पडेल ते काम करायचे आणि
रहायचे हाच पर्याय स्विकारावा लागे. रोजच्या जेवणाची सोय रोज वेगळ्या घरी करायची.
ज्याच्याकडे जेवायला जायचे त्याला सकाळी जाऊन सांगायचे आज माझा वार तुमच्याकडे
आहे. त्या बदल्यात त्यांच्याकडची पूजा करायची किंवा काही काम असेल तर करायचे.
सगळेच वारवाले कनवाळु असायचेच असे नाही. कोणी शिळेपाके वाढायचे किंवा कोणी उरले
सुरले वाढायचे. त्यामुळे पोट भरेलच याची खात्री नाही. कधी कधी एखादा वारवाला अचानक
परगावी जायचा त्यामुळे बदली कोणीतरी शोधायचा. कोणी नाहीच मिळाला तर तो दिवस उपाशीच
काढायचा.
व्ही.सी
सरांनी अशा प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण घेतले. त्यांना जरी स्वत:ला शिक्षणाकरीता कष्ट घ्यावे लागले असले तरी
त्यांनी त्याचा परिणाम आपल्या अध्यापनावर पडुन दिला नाही. त्यांचे असंख्य
विद्यार्थी त्यांचे नांव मोठ्या आदराने घेतात. माणसाचे मोठेपण त्याच्या
अंत्यदर्शनाला कितीजण आले यावर मोजण्याची पद्धत आहे. जेव्हा व्ही.सी.सर वारले
तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला सगळ्या स्तरांतुन त्यांचे विद्यार्थी आले होते
माझ्या मते हेच त्यांचे वैभव होते.
व्ही.सी.
सरांचा मी काही शाळेतला विद्यार्थी नव्हे. कारण मी जेव्हा इंग्रजी शिकायला सुरवात
केली तेव्हा ते सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे जाली होती. माझ्या सारख्या अनेक गरजु
विद्यार्थ्यांना त्यांनी विनामोबदला शिकवले. सेवानिवृत्त झाले होते तरी
त्यांच्याकडे इंग्रजी शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची गर्दी असायची. त्यांची
शिकवण्याची पद्धत मोठी विलक्षण असायची. ते शाळेतल्या पुस्तकातील फार कमी शिकवायचे.
त्यांचा भर तडखर्कर पाठमाला या पुस्तकांवर असायचा. त्यांची तडखर्करांची तिनही
पुस्तके पाठ होती. कोणत्या पानावर कोणता शब्द आहे. कोणता काळ कुठल्या पुस्तकात
किती पानावर आहे हे ते अचूक सांगत असत.
ते
व्याकरण शिकवायचे ते फार मजेशिर असायचे. त्यांचा भर प्रॅक्टीकलवर जास्त असायचा. I am walking हे वाक्य ते चालुन दाखवायचे. I am crawling हे वाक्य शिकवताना ते चक्क रांगुन दाखवायचे. हाच
प्रकार प्रत्येक क्रियापदाकरीता असायचा. रोज दहा शब्द पाठ करायला लावणे हे तर
रोजचेच असायचे. जेव्हा ते दिलेली वाक्ये किंवा शब्द तपासत तेव्हा जर चुकले तर वही
अक्षरश: फेकून द्यायचे. परंतु नंतर वह्यांच्या किमती
वाढल्या आणि त्यांनी वह्या फेकून देणे सोडून दिले. त्यांच्याकडे मी तडखर्करांच्या
तिनही पाठमाला शिकलो. आज मी जे काही चार शब्द इंग्रजीमध्ये लिहू शकतोय ती त्यांचीच
कृपा आहे.
त्यांच्या
बद्दल एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते. शिकवणीच्या वेळा सोडून जेव्हा जेव्हा मी
त्यांना बघत असे तेव्हा त्यांच्या हातात झाडू असायचा. त्याचे अंगण कधीही पहा लख्ख
असायचे. अंगणाच्या कुंपणीचे पान पिवळे झाले की, ते लगेचच ते काढुन टाकायचे.
त्यांचे अंगण आणि रस्त्याच्या कडेच नगरपालीकेचे गटार ते नेहमी अगदी स्वच्छ
ठेवायचे. जरा जरी घाण पडली तरी ते तत्परतेने उचलायचे. असा प्रकार मी हल्ली शेगावला
गजानन महाराज संस्थानमध्ये पाहिला.
अशा
या आमच्या व्ही. सी सरांना माझे त्रिवार वंदन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा