सोमवार, २५ जून, २०१८

ब्रह्मणस्पती विनायक भाग ४

                  ब्रह्मणस्पती विनायक
लेखक अनिल वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड.

     गणपतीबाप्पाची आरती झाल्या नंतर सर्व गावकरी आपापल्या घरी गेले. बाप्पाच्या मंडपात अनिल आणि नाना परांजपे, सोनावणे साहेब, थोरात गुरुजी, अमोल यादव, विठुकाका एवढी लोकच शिल्लक राहीले. सर्व गावकरी जाताच थोरात गुरुजींनी सोनावणे साहेब आणि अमोल यांना अनिल आणि नानांच्या जवळ घेऊन गेले. ते म्हणाले नाना आणि अनिल हे सोनावणे साहेब आपल्या दापोली तालुक्यातलेच आहेत मुळचे सध्या मुंबईला वास्तव्यास असतात. ते एका मोठ्या दैनिकात काम करतात. काल ते दापोलीला विद्यापिठात कामानिमित्त आले होते. तेव्हा दापोली एस्. टी. स्टॅंडमध्ये आपल्या बाप्पाच्या आगमनाची बातमी समजली म्हणून आज ते मुद्दाम आपल्या गावाला बाप्पाच्या दर्शनाला आलेत. हा अमोल यादव माझा विद्यार्थिच आहे. आज तो आपल्या वस्तीच्या एस्.टी.वर कंडक्टर म्हणून आला आहे. सोनावणे साहेबांना तोच येथे घेऊन आलाय.
     नमस्कार सोनावणे साहेब आणि अमोल आपले बाप्पाच्या चरणापाशी स्वागत आहे. मी अनिल परांजपे आणि हे माझे वडिल नाना. आपण मुद्दाम बाप्पाच्या दर्शनाला आलात हे ऐकुन आनंद झाला. त्यानिमित्ताने आपल्या सारख्यांचे पाय या गावाला लागले.
     नमस्कार! माझा परिचय थोरात गुरुजींनी करुन दिलाच आहे. आम्ही मुळचे कोळथऱ्याचे. माझे वडिल नोकरी धंद्या निमित्ताने मुंबईला गेलो ते तिकडेच स्थाईक झाले. तरीही आम्ही दरवर्षी न चुकता गणपतीला येत असतो. अंजर्ले येथिल कड्यावरच्या गणपतिला देखिल दरवर्षी माघी चतुर्थीला आम्ही येत असतो. आमचे घराणे तसे गणेश भक्त आहे. आपल्या बाप्पाचे वर्णन दापोलीला ऐकल्यावर राहवले नाही म्हणून इकडे आलो. आपण मला या गणपतिच्या आगमनाची सविस्तर माहिती सांगाल काय? मला खूप उत्सुकता आहे.
     नक्कीच सांगतो! परंतु आता आपण या थोरात गुरुजींना देखिल बरोबर घेऊन माझ्या घरी जाऊ तिथे बाप्पाचा प्रसाद म्हणून चार घास खाऊ. त्यानंतर निवांत बोलत बसु. काय गुरुजी चालेल नां?
     अहो नाना मीच या दोघांना माझ्या घरी जेवणाकरीता नेणार होतो. परंतु ठिक आहे. आपण बाप्पाचा प्रसाद म्हटल्यावर मी नाही म्हणू शकत नाही. चला तर मगं! पण इथे मंडपात कोणीतरी थांबायला पाहिजे नां? थोरात गुरुजी बोलले.
     गुर्जी! त्याची कालजी नको! मी हाय इथं. विठुकाका स्वत:हून  बोलले.  

*******
            रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यावर नाना, अनिल, थोरात गुरुजी, सोनावणे साहेब, अमोल यादव, विठुकाका सगळेजण बाप्पाच्या मंडपात सतरंजीवर बसले होते. अनिलने बाप्पाच्या आगमनाची सुरवातिपासुनची हकीगत सांगायला सुरवात केली.
     सोनावणे साहेब मी दापोली येथे शिक्षणाकरीता रहात असे तेथेच मी  अगदी प्रथम श्रेणीत बि. कॉम् झालो. त्यानंतर काही दिवस नोकरी धंदा शोधण्याकरीता राहिलो होतो. माझ्या बरोबरीच्या सगळ्यांना काहीना काही काम मिळाले परंतु मी एकटाच बेकार राहिलो होतो. माझ्याकडे ना वशिला होता! ना पैसा! त्यामुळे माझे तेथे नोकरीचे काही जमले नाही. मला दापोली येथे बेकार बसुन रहाणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते. म्हणून मी विचार केला नानांना शेतीत काही मदत करुया. घरी थोडीफार जमिन आहे. परंतु त्यातली बरीचशी डोंगराळ जांभ्या दगडांची आहे. त्यामध्ये आंब्याची कलमे लाऊन शेतीच्या उत्पन्नाला जोड मिळवु असा विचार केला. परंतु त्या झाडांना देण्याकरीता पाण्याची काहीतरी तजबिज करायला पाहिजे होती. म्हणून मी आमच्या परसांत म्हणजे आता आपण बसलोय त्या भागात एक डवरा काढावा असा विचार करुन मी सहदेवच्या मदतीने खणायला सुरवात केली. आठ दिवसात आम्ही जवळपास पांच फुट खणले असेल. त्यानंतर एके दिवशी दिवसभर खणाखणी करुन दमल्यावर जेवण झाल्याबरोबर झोपलो. पहाटे मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात आता आपण बघत आहोत तशी गणेश मूर्ती दिसायला लागली आणि मला बाहेर काढ असे म्हणू लागली. जागा होऊन बघितले तर घड्याळात पहाटेचे साडे तीन वाजले होते. मग मी बाबांना उठवले. त्यांना मी मला पडलेले स्वप्न सांगितले.
     आमचे बाबाही गणेशभक्त आहेत. किंबहूना आमच्या घराण्यातच गणेश भक्तीचा वारसा आहे. दर महिन्यातल्या दोन्ही चतुर्थीला आमच्या पंजोबांपासुन ब्रह्मणस्पती सूक्त पठण करण्याची प्रथा आहे.
अनिलचे बोलणे मध्येच थांबवुन नाना म्हणाले, मला अनिलने साडेतीनच्या नंतर उठवले आणि त्याला पडलेले स्वप्न सांगितले. त्यावर माझ्या मनांत विचार आला कदाचित त्या बाप्पाला आमची भक्ती मान्य झाली असेल म्हणून त्याने आमच्याकडे यायचे ठरविले असेल. म्हणूनच अनिलला हा डवरा खणण्याची बुद्धी सुचली असेल. म्हणून मी त्याला म्हटले अरे तू जो डवरा खणतोयस तिथेच बाप्पाची मूर्ती असण्याची शक्यता आहे. तेव्हा आता उद्या खणशिल तेव्हा सावकाश काळजीपूर्वक खण.
बाबांनी असे सांगितल्यानंतर माझी झोप पळाली. जरा दिसायला लागल्यावर मी सहदेवला बोलवायला त्याच्या घरी गेलो. तो देखिल स्वप्नाची हकीगत ऐकल्यावर ताबडतोब आमच्या परसात हजर झाला. दरम्यान रेडिओवरील सकाळच्या भक्ती संगितात सगळी गणपतिचीच गाणी लागली होती. ती गाणी ऐकतच आम्ही खणायला सुरवात केली. जेमतेस सहा इंच खणले नसेल तोच आमची कुदळ अडायला लागली. बाबांनी हळुवारपणाने खणायला सांगितलेले माझ्या लक्षांत होते म्हणून मग आम्ही कुदळीने खणायचे थांबवुन कोयतीने हळु हळु माती सैल करुन बाजुला करायला सुरवात केली. थोड्याच वेळात आम्हाला आता दिसतेय ती गणेशाची धुळीत माखलेली मूर्ती दिसली. त्यानंतर मी बाबांना बोलावुन आणले. बाबा आल्यावर त्यांनी त्या गणेशाची तशीच धुळीने माखलेल्या अवस्थेतच पूजा केली.  
आमच्या घराण्यांत अनेक पिढयांपासुन ब्रह्मणस्पतीसूक्ताचे पठण केले जाते. त्यामुळे त्या उपासनेच्या परंपरेचे फलस्वरुप म्हणून हा ब्रह्मणस्पती विनायक आमच्या परसात प्रकट झाला अशी माझी भावना आहे. म्हणून या बाप्पाला आम्ही ब्रह्मणस्पती विनायक असे नांव ठेवले आहे. या बाप्पाची पूजा करताना गणपती सूक्त आणि ब्रह्मणस्पती सूक्त यांचे अनुष्ठान केल्यास विशेष फलप्राप्ती होईल अशी माझी धारणा आहे. मधेच अनिलला थांबवुन नांनांनी आपली भावना व्यक्त केली.
थोड्याच वेळांत गावात सगळीकडे ही बातमी पसरली आणि सगळे गांव गोळा झाले. काहीवेळाने थोरात गुरुजी आले त्यांनी आज अंगारिका संकष्टी असल्याचे सांगितल्यावर आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. थोरात गुरुजींच्या पुढाकाराने आम्ही मग ती मूर्ती खड्याच्या बाहेर काढली. स्वच्छ पाण्याने धुतल्यावर तिचे दिव्य स्वरुप आमच्या दृष्टीस पडले. बाबांना आपल्या कुळातिल गणेश भक्ती फळाला आल्याचे जाणवुन धन्यता वाटली.
त्यादिवशी तेथे जमलेल्या सर्व गावकऱ्यांनी मिळुन सध्या दिसतोय तो मंडप आणि बाप्पाला ठेवायचा ओटा बांधुन काढला. कारण आमच्याकडे सर्व साहित्य उपलब्ध नव्हते परंतु आमच्या गावकऱ्यांनी ती उणिव भासु दिली नाही. बाप्पाची स्थापना झाल्यावर माझ्या बाबांनी ब्रह्मणस्पती सूक्ताच्या आणि गणपति सूक्ताच्या पठनाने बाप्पाची षोडशोपचारे पूजा केली. त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मिळुन आरती केली. रात्री चंद्रोदय झाल्यावर सर्वांच्या सहकार्याने बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवुन सर्वानी याच ठिकाणी महाप्रसाद घेतला.
बाप्पाच्या आगमनाची बातमी जस जशी पसरते आहे तशी रोजच बाप्पांच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली आहे. वास्तविक या ठिकाणी चांगले मंदिर बांधायला पाहिजे परंतु आमची आणि आमच्या गावकऱ्यांची देखिल आर्थिक परिस्थिती बेताचिच असल्याने सध्या तरी ते शक्य होईल असे वाटत नाही. सध्या गावकऱ्यांच्या सहकार्याने पूजा आरति होते आहे. गावकऱ्यांपैकी रोज कोणी ना कोणी येथे वस्तीला रहातात. पाहू बाप्पाच्या मनांत पुढे काय आहे ते. एवढे दिर्घ भाषण संपवुन अनिलने जवळच असलेल्या तांब्यातुन पाण्याचा घोट घेतला.
अनिलभाऊ तुमची ही अद्भूत हकिगत ऐकुन मी तर मंत्रमुग्ध झालो आहे. मलाही या बाप्पाने ओढ लावली आहे. आता रात्र झाली आहे, सकाळ झाल्यावर मी तुमच्या त्या डवऱ्याचा, ब्रह्मणस्पती विनायकाचा आणि तुमचा सगळ्यांचा असे फोटो काढणार आहे. त्यानंतर मुंबईला गेल्यावर ही सर्व हकिगत माझ्या आणि इतरही काही दैनिकांमध्ये देणार आहे. यापुढे मीही जेव्हा जेव्हा दापोली परिसरात येईन तेव्हा तेव्हा येथे नक्की येईन.   

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा