सोमवार, २५ जून, २०१८

ब्रह्मणस्पती विनायक भाग ३



ब्रह्मणस्पती विनायक
लेखक अनिल वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड.

दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातिल महत्वाचे आणि तालुक्याचे ठिकाण आहे. दापोली येथिल महत्वाचे ठिकाण म्हणजे कोंकण कृषी विद्यापिठ. या शिवाय कोळथरे, आसुद, अंजर्ले या सारखी पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. जवळच्या अनेक गावांची बाजारपेठ दापोलीलाच आहे. येथिल सर्वच ठिकाणांना भेट देण्याकरीता एस्. टी. हे स्वस्त आणि सहज मिळणारे साधन आहे. त्यामुळेच येथिल एस्. टी. स्टॅंडवर सतत गर्दी असते. येथुन पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापुर या लांब पल्ल्याच्या तर हर्णे, मंडणगड, दाभोळ, खेड, केळशी या सारख्या लोकल बस सुटत असतात. त्यामुळे या स्टॅंडवर प्रवासी, पर्यटक आणि एस्.टी. च्या स्टाफची सदैव गर्दी असते. या स्टॅंडच्या परिसरातच कर्मचाऱ्यांनी बांधलेले दत्तात्रेयांचे मंदिर आहे.   
एस्. टी. स्टॅंडवर असणाऱ्या या दत्तमंदिरात आत्ता पांच सहा ड्रायव्हर कंडक्टर गप्पा मारीत बसले आहेत. त्यांच्यापैकी काहींची ड्युटी संपलेली होती. तर काहीजण आपल्या ड्युटीची वेळ होण्याची वाट बघत मंदिरात बसले होते. त्यांच्या मध्ये वेगळी दिसणारी एक व्यक्ती देखिल तिथे दत्ताचे दर्शन घेण्याकरीता आलेली आहे. ड्रायव्हर कंडक्टर आज कोणाला कुठली ड्युटी आहे याची चर्चा करीत बसले होते.
     त्यांच्यात वेगळा दिसणारा तो प्रवासी दापोलीला पर्यटनाकरीता आलेला आहे हे जाणवत होते. त्याच्याजवळ फारसे सामान दिसत नव्हते. बहुदा मुंबईहून आलेला असावा. झोळीसारखी एक पिशवी त्याने आपल्या बाजुला ठेवलेली दिसत होती. तो दत्ताच्या मूर्तीकडे एकटक बघत ध्यान लावल्यासारखा डोळे मिटुन बसला होता. तरीही त्याचे लक्ष तिथे चालणाऱ्या चर्चेकडे देखिल होते.
     त्या मंदिरात बसलेले चव्हाण ड्रायव्हर आणि यादव कंडक्टर हे बरोबरच एस्. टी.त नोकरीला लागले होते. ते दोघेही ड्युटीला जाताना आणि ड्युटीवरुन उतरल्यावर न चुकता या दत्त मंदिरात दर्शनाला येत असत. यादवने चव्हाणांना विचारले, काय रे चव्हाण! काल तू भोस्ते वस्तीला होतास नां? तिथे म्हणे गणपती सापडला आहे! खरे आहे काय?
     हो, मी काल भोस्त्यालाच वस्तीला होतो. आणि तू ऐकलेस ते खरे आहे. आपले परांजपे काका आहेत नां, त्यांच्याच परसात बाप्पाची मूर्ती सापडली आहे. मोठी लोभस मूर्ती आहे. त्या बाप्पाच्या नुसत्या दर्शनानेच मनातल्या इच्छा जणू पूर्ण होतील. मी कालचं तिथे गेलो होतो. परवाच्या अंगारकी चतुर्थीला सापडला म्हणतात. चव्हाणांनी आपला अनुभव सांगितला. पण काय रे, आज तुझी भोस्ते वस्तीचीच ड्युटी आहे नां?
     हो! आज माझी भोस्ते वस्तिचीच ड्यूटी आहे. म्हणूनच मी तुझ्याकडे चौकशी केली. यादव कंटक्टर बोलले.
त्यांची ही चर्चा ऐकून तिथेच बसलेला तो प्रवासी त्यांच्या चर्चेत भाग घेत म्हणाला, काय हो यादव भाऊ! आपली आत्ता चाललेली गणपती संबंधीची चर्चा मी ऐकली आणि ती ऐकुन मलाही त्या गणपतीचे दर्शन घेण्याची इच्छा झाली आहे. आपण आज तिकडेच जात आहात तर आपल्या बरोबर मी देखिल तिकडे आलो चालेल कां?
या की! मला काय प्रॉब्लेम आहे. तुमचे तिकिट तुम्हीच काढणार आहात. पण एक आहे, मी जातोय ती गाडी वस्तीची आहे. तुम्हाला एकदा तिकडे गेलात की, सकाळी आमची गाडी परत निघेल त्याशिवाय दुसरे वाहन मिळणार नाही. कारण भोस्ते गांव एकदम आड बाजुला आहे. अर्थात तुमची झोपायची सोय तिथेच कुठेतरी होईलच. समजा नाहीच झाली तर या गाडीतच आणि बसल्या बसल्या झोप काढा. यादवांनी सविस्तर माहिती दिली.

*******
            संध्याकाळी सहा वाजता दापोलीहून आलेल्या एस्. टी.तुन यादव कंडक्टर, गाडीचे ड्रायव्हर आणि तो दाढीवाला प्रवासी असे तिघेजण भोस्त्याला उतरले. गाडी व्यवस्थित बंद करुन तिघेही गावाच्या दिशेने निघाले तो त्यांना लाऊड स्पीकर मधुन गणपतीची गाणी ऐकायला येऊ लागली. ते तिघेही त्या आवाजाच्या दिशेने निघाले. जवळ जाऊन पहातात तो तिथे एक झापांचा मंडप ऊभारलेला दिसला. त्या मंडपात एक दगड मातीचा बनवलेला ओटा बांधलेला दिसला त्या ओट्याला केळीच्या खांबांच्या आणि हिरव्या झापांच्या सहाय्याने मखर केलेले होते. त्या मखरामध्ये दोन बाजुच्या समयांच्या प्रकाशात त्यांना गणेशाची मूर्ती स्थापन केलेली दिसत होती. गणरायाच्या एका हातात परशु, दुसऱ्या हातात पाश, एक हात भक्तांना आशिर्वाद देत होता तर एका हातात मोदक होता. गणपतीच्या गळ्यात मोत्यांचा हार कोरलेला होता तो अगदी अस्सल वाटत होता. डाव्या खांद्यावरुन खाली आलेले जानवे शोभत होते. कमरेला नागबंद कोरलेला दिसत होता. गणपतिच्या गळ्यांत ताज्या हिरव्यागार दुर्वांचा हार दिसत होता. गणेशाच्या पायावर रक्तवर्ण असलेल्या जास्वंदीची फुले शोभत होती.
     गणेशाचे हे लोभसवाणे आणि मनाला प्रसन्न करणारे रुप पाहून तिघेही त्याच्या समोर नत मस्तक झाले. तिघांनिही त्या दिव्य स्वरुपाला साष्टांग नमस्कार केला. त्या तिघांनाही तिथे असलेल्या एका भक्ताने सुंठवड्याचा प्रसाद दिला. त्यानंतर ते तिघेही तिथेच अंथरलेल्या निळ्या प्लॅस्टीक कापडावर बसले. दर्शन झाल्यावर एस्. टीचे ड्रायव्हर कांबळे म्हणाले, तुम्ही बसा निवांत! मी गाडीत जाऊन बसतो, कारण माझ्यावर गाडीची जबाबदारी आहे.
     काय हो यादवभाऊ! आपल्याला इथे कोणी या गणपतीची बाप्पाची सविस्तर माहिती सांगणार नाही काय? त्या अनोळखी प्रवाशाने विचारले.
     मी ओळखीचे कोणी दिसतय काय ते बघतो! मलाही सगळी माहिती ऐकण्याची उत्सुकता आहेच. अरे वा! ते बघा तिकडुन थोरात गुरुजी येताना दिसतायत, त्यानांच आपण सविस्तर माहिती विचारु. त्यानंतर लगेचच यादव कंडक्टर थोरात गुरुजींकडे गेले आणि त्यांना नमस्कार करुन म्हणाले, गुरुजी मला ओळखले काय?
     नाही हो! पण आपल्या गणवेषावरुन आपण आत्ता वस्तीला आलेल्या एस्. टी. चे कंडक्टर दिसताय. पण क्षमा करा आपले नांव काही माझ्या लक्षांत येत नाही. 
     अहो गुरुजी मी अमोल यादव, आपलाच विद्यार्थी आहे. आपण माझ्या गावाला खेर्डीला शिक्षक होतात. आपण मला तिसरी ते सातवी असे पांच वर्षे शिकविले आहे. आपण मला ओळखले नाही ते बरोबरच आहे आपल्या हाताखाली अनेक विद्यार्थी दरवर्षी जातात. आपण कोणा कोणाची नांव लक्षांत ठेवणार. त्यातच शाळेत असणारा अमोल आणि आताचा मी यात खूपच फरक पडला आहे. बर ते सगळे असुदे! माझ्याबरोबर मुंबईचे एक गृहस्थ खास या गणपतिचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. त्यांना या गणपतिची सविस्तर माहिती हवी आहे. अर्थात मलाही ती ऐकण्याची खूप उत्सुकता आहेच.
     ठिक आहे! मी तुम्हा दोघांची ज्यांच्या परसात हा गणपती सापडला आहे त्यांची म्हणजेच अनिल आणि नाना परांजपे यांची गाठ घालुन देतो. त्यानंतर थोरात गुरुजींना घेऊन अमोल यादव त्या गृहस्थांकडे गेले.
     त्याच्या जवळ येताच थोरात गुरुजींनी त्यांना नमस्कार केला आणि मी थोरात गुरुजी येथिल प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. अशी ओळख करुन दिली.
     त्यानंतर त्या गृहस्थाने देखिल, नमस्कार मी सुभाष सोनावणे, मुळचा मी दापोली तालुक्यातला कोळथऱ्याचा आहे. परंतु माझे वडिल गिरणी कामागार म्हणून मुंबईला गेले ते तिथेच स्थाईक झाले म्हणून मी मुंबईचा. एका नामवंत दैनिकांत मी वार्ताहर म्हणून काम करतो. कालपासुन कोंकण कृषी विद्यापिठात एक सेमिनार होता तो कव्हर करायला आलो होतो. आज परत मुंबईला जाण्याकरीता बस स्टॅंडवर आलो होतो. तेव्हा तिथल्या दत्ताच्या देवळात दर्शनाला गेलो होतो. तेव्हा तिथे इथल्या गणपतिची चर्चा चालू होती. ती ऐकुन उत्सुकता म्हणून इकडे आलो. परंतु मला आता येथिल बाप्पाची सविस्तर माहिती ऐकायची इच्छा आहे. सोनावणे यांनी आपला परिचय करुन दिला आणि आपला इथे येण्याचा उद्देश देखिल सांगितला.
     सोनावणे साहेब! मी आपले या भोस्ते गावात येथिल ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. आता आपण माझ्या घरी चला तेथे फ्रेश व्हा. त्यानंतर श्री गजाननाच्या आरतिला आपण येऊ. आरति झाल्यावर आपण ही बाप्पाची मूर्ती ज्यांच्या परसात सापडली त्या नानांची आणि त्यांचा मुलगा अनिल यांची भेट घेऊ. ते तुम्हाला सविस्तर हकिगत सांगतील. अमोल तुही आमच्याबरोबर चलं, जरा फ्रेश होऊन आरति झाल्यावर प्रसाद वगैरे घेतल्यावर तू वाटल्यास गाडीत झोपायला जा. हे सोनावणे साहेब आज माझ्याकडेच झोपतिल.

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा