लेखक-अनिल अनंत वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड
१
अनिल, सुरेश आणि प्रदिप तिघेजण लाटवणच्या
समुद्राकिनाऱ्यावर पुळणीत गप्पा मारीत बसले होते. समुद्राचा घन गंभिर आवाज सर्वत्र
निनादत होता. नुकताच सूर्यास्त झाला होता त्यामुळे क्षितिजावर आकाशात सर्वदूर
गुलालाची उधळण झालेली दिसत होती. वातावरण धुसर झाले होते. धड उजेड नाही आणि धड
काळोख नाही असे विलक्षण वातावरण होते.
हे तिघेही अगदी जिवश्च कंठश्च मित्र होते.
त्यातला अनिल हा बेकार होता. सुरेश आणि प्रदिप दोघे छोटी मोठी नोकरी करीत होते.
तिघांचेही शिक्षण एकाच कॉलेज मध्ये झाले. तिघांनाही बि. कॉम् मध्ये सारखेच मार्क
मिळाले होते. सुरेश लाटवणमध्ये बदली शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कामाला
लागला होता. त्यालाच भेटायला आज अनिल आणि प्रदिप आले होते. प्रदिप दापोली येथिल
एका खाजगी फार्म हाऊस मध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होता. सांगायला अकाउंटंट
परंतु तेथे त्याला अनेक प्रकारची कामे करावी लागत होती.
अनिलचेही नोकरीकरीता प्रयत्न चालू होते. परंतु त्याला अद्याप नोकरी
धंदा मिळाला नव्हता. सतत अर्ज विनंत्या करुन तो कंटाळला होता. त्याची घरची आर्थिक
परिस्थिती देखिल बेताचीच होती. त्याचे आई वडिल आता वृध्द झाले आहेत. जवळ होते
नव्हते ते किडूक मिडूक विकुन त्यांनी अनिलचे बी. कॉम् पर्यंतचे शिक्षण केले होते.
त्यांची थोडीफार शेती होती, त्यातुन पोटापुरते भात यायचे. परंतु ती शेती देखिल पावसावर
अवलंबुन. शेतीच्या जोडीला आजुबाजुच्या गावातिल पूजा, लग्न या सारखी पौराहित्याची
थोडीफार कामे करुन ते प्रपंचाचा गाडा रेटत होते.
सध्या अनिल आणि प्रदिप दापोलीला एकाच खोलीत रहात होते. दापोलीतिल एका
चाळवजा घरात एका खोलीत दोघांचा ब्रह्मचाऱ्यांचा संसार मांडलेला होता. त्या तिघा
मित्रांनी आज लाटवणला
एकत्र जमण्याचे ठरविले होते. लाटवणला फिरायला
जाण्यासारखे एकच ठिकाण होते, ते म्हणजे समुद्र किनारा. सुर्यास्ताची वेळ साधुन आज
ते समुद्रावर फिरायला व त्या निमित्ताने एकमेकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी शेअर करायला आले होते.
आज अनिलची मनस्थिती ठिक नव्हती. सूर्यास्ताच्या त्या धुसर वातावरणात
तर त्याची खिन्नता आणखिनच वाढली होती. बरेच दिवसाच्या बेकारीने त्याला खूपच निराश
केले होते. त्या तिघांपैकी दोघे नोकरीला लागल्याने आता त्यांचे एक वेगळे विश्व
निर्माण झाले होते. त्यामुळे तो सध्या तो एकटा पडला होता. आता दापोलीला मित्राच्या
जिवावर रहाणे त्याला मिंध्यासारखे वाटत होते. त्या विचारातच तो सुरेशला म्हणाला,
सुरेश! मला वाटते आता गावाला जाऊन रहावे. उगाचच बाबांकडे आणखी पैसे मागणे नको. घरी गेलो
तर कमीतकमी बाबांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत तरी करता येईल.
खरंय तुझे! दापोलीला राहून आतापर्यंत फारसा काही फायदा झाला
नाही. अर्थात तू कितीही राहिलास तरी माझी काहीच हरकत नाही. परंतु तू दिवसभर एकटा
असल्याने तुझी मनस्थिती जास्त निराशाजनक व्हायला लागली आहे. प्रदिप म्हणाला.
तरी पण अनिल! तू धीर सोडू नकोस. तो परमेश्वर काही झोपलेला
नाही, ज्याने चोच दिली तो चारा देणारच नां! अरे हेही दिवस जातिल, तो देव आपली परिक्षा बघत
असतो. सुरेश म्हणाला.
मला कधी कधी वाटतं की, देव वगैरे सगळ झूट आहे. सगळ थोतांड आहे. निराश
सुरात अनिल बोलला.
चला! काळोख वाढत चालला आहे आता आपण निघुया! या चर्चेतुन काहीच निष्पन्न होणार नाही. शिवाय
रुमवर जाऊन आपल्याला आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायची आहे. हे काही दापोली
नाही, खाणावळीत गेल्यावर आयत
ताट समोर यायला. असे म्हणून सुरेश लगेच उठलाच.
त्यानंतर प्रदिप देखिल लगेचच उठला. सुरेशच्या
बोलण्यातला अर्थ तो समजला. सुरेशला ही चर्चा आणखी वाढवुन अनिलच्या नैराश्यात भर
घालायची नव्हती. त्यानंतर तिघेजण समुद्राच्या किनाऱ्या किनाऱ्याने सुरेशच्या रुमकडे जायला लागले.
वाटेल अनिलला ठेच लागली आणि तो जोरात आSS आईSS गं असे ओरडला. त्याचा आवाज ऐकुन
प्रदिपने विचारले, काय रे काय झाले? त्यावर अनिलने काही नाही रे जोरात ठेच
लागली.
त्यावर सुरेशने इथे समुद्र किनाऱ्यावरील पुळणीत
आणि ठेच कसे काय शक्य आहे? असे विचारले आणि आपल्या हातातल्या बॅटरीचा प्रकाश अनिलच्या पायावर
पाडला. बघतोय तो अनिलच्या पायाच्या करंगळीतुन रक्त येत होते. ते रक्त बघुन सुरेशने
पायाच्या बाजुला बॅटरीचा प्रकाश पाडला.
अरे हे काय! इथे पुळणीत गणपतिची मूर्ती कशी काय? अनिल आश्चर्याने बोलला.
अरे मागे याच किनाऱ्यावर अशिच एक शंकराची पिंडी
देखिल सापडली होती. सुरेशने सागितले.
त्यानंतर त्या तिघांनी ती वाळुत रुतलेली
गणपतिची मूर्ती बाहेर काढली. तिला समुद्राच्याच पाण्याने स्वच्छ धुतली. त्यानंतर
तिचे स्वरुप प्रकट झाले. गणपति अथर्वशिर्षामध्ये वर्णन केलेल्या “एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुश धारणं रदंच
वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजम्” प्रमाणे ती गणेशाची मूर्ती होती.
आता त्या तिघांपुढे प्रश्न पडला या मूर्तीचे
काय करायचे?
तिथेच ती मूर्ती टाकून जाणे त्यांच्या श्रद्धाळु मनाला पटेना. दापोलीच्या किंवा
लाटवणमधल्या खोलीत एवढी मोठी मूर्ती ठेवणे शक्य नव्हते. कारण तिथे जेमतेम त्यांना झोपण्यापूर्ती
जागा होती.
मी माझ्या गावी ही मूर्ती नेली तर? नाहीतरी माझ्या गावांत गणपतिचे मंदिर
नाहीये. अनिलने आपले मत मांडले.
काहीच हरकत नाही! कारण मागे अशीच सापडलेली
शंकराची पिंडी लाटवणच्या लोकांनी परत समुद्रात सोडली होती. ही मूर्ती देखिल अशीच
परत सागरार्पण करतिल.
*******
२
“कोंकण दरिद्री बोलते
कोण, छे छे ती सोन्याची सुंदर खाण” या कवितिल उक्ती प्रमाणे
सर्व कोंकण प्रदेशच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हिरवेगार डोंगर, जांभ्या
दगडाच्या पाखाड्या, जांभ्या दगडाचीच घरे हे तर कोंकणचे वैशिष्ट. रत्नागिरी जिल्हा
हा त्या कोंकणाचाच एक भाग. त्या रत्नागिरी जिल्ह्यातिल महत्वाचा तालुका आहे दापोली
तालुका. दापोली तालुक्यातिल मंडणगडहून दापोलीला जाणाऱ्या रस्त्यावर असणारे भोस्ते
हे गांव देखिल कोंकणाच्या वर्णनाला साजेसेच आहे. येथिल जांभ्या दगडाच्या पाखाड्या,
घनदाट जंगल, उंच डोंगर आणि खोल दऱ्या हे या गावाचे वैशिष्ट. येथिल जंगलात, साग,
ऐन, किंजळ, असाणा ही झाडे विपुल प्रमाणात आढळतात. घरांजवळच्या परसात आंब्याची
कलमे, रातांब्याची, जांभळाची, फणसाची, काजुची झाडे हे या गावाचे वैभव.
डोंगर उतारावर टप्या टप्यावर सुपारीची झाडे त्या झाडांना पाणी
देण्याकरीता बांधलेले पाट
हे इथले वैशिष्ट आहे. डोंगर उतारावर
भात, नागली, वरी लागवडीकराता बारीक बारीक चोंढे पाडलेले सर्वत्र दिसतात. अशा या
भोस्ते गांवात दिवसातुन दोन वेळा एस्. टी. ची बस येते. दापोली मंडणगड हा रस्ता हा
डांबरी आहे. परंतु त्या रस्त्यापासुन भोस्ते गावापर्यंत येणारा रस्ता लाल मातीचा
आहे. कोणतेही वाहन त्या रस्त्यावरुन गेले की, सर्वत्र धुळीचे लोटच्या लोट उठतात.
त्यात एस्. टी. ची बस आल्यावर तर उडणारी लाल धुळ जवळपास असणाऱ्या सर्वांना लालेलाल
करुन टाकते. मग ती माणसे असोत, जनावरे असोत किंवा झाडे असोत. रस्त्याच्या कडेला
असणाऱ्या झाडांची सर्व पाने लाले लाल झालेली असतात.
दापोलीहून संध्याकाळी सहा वाजता सुटणारी दापोली भोस्ते बस नेहमी प्रमाणे
उशीरा सुटली. तिला भोस्ते गाव गाठे पर्यंत
काळोख पडायला आला होता. ही बस भोस्ते येथे वस्तीला असते. गावाच्या तिठ्यावर
असणाऱ्या पिंपळाच्या पारावर नेहमीप्रमाणे रिकामटेकड्या लोकांची बैठक बसलेली होती.
त्यातच आता शेतीचा हंगाम संपला होता. त्यामुळे शेतावर जाण्याचे काही काम उरले
नव्हते.
एस्. टी. बसच्या ड्रायव्हरने
गाडी रिव्हर्समध्ये घेऊन तिचे तोंड परत दापोली कडे जाणाऱ्या रस्त्याकडे केले आणि
तो उडी मारुन खाली उतरला. दरम्यान पारावरच्या मंडळींचे गाडीत कोण कोण दिसतेय याचे
निरीक्षण चालू होते. गाडीमध्ये ड्रायव्हर कंडक्टर आणि एकच प्रवासी दिसत होता.
तिघेही लालमातीने पुरे माखले होते. गाडी थांबताच गाडीतल्या प्रवाशाने पारावर
बसलेल्या विठुकाका उर्फ विठ्ठल शिंदे यांना हाक मारली.
अहोS विठुकाका! मला ही ट्रंक
उतरायला मदत करा नां.
त्याची हाक ऐकुन पारावर आपल्याच विचारात दंग असलेले विठुकाका दचकुन
उभे राहिले. त्यांनी हाक मारणाऱ्या प्रवाशाकडे निरखुन पाहिले आणि ते म्हणाले, कोण
अनिल बाळं! अरे एवढ्या उशिरा कसा काय आलासं? आणि ट्रंकेत एवढे जड काय आणले आहेस? असे
म्हणून त्यांनी अनिलला ट्रंक उतरायला मदत केली.
काही नाही काका! दापोलीचे बिऱ्हाड गुंडाळुन सर्व सामान आणले आहे. अनिलने विठु
काकांना उत्तर दिले. त्यानंतर पारावरच बसलेल्या तुकाराम अण्णांना मदतीला घेऊन तो
ती ट्रंक घेऊन आपल्या घराकडे गेला.
इकडे पारावर लगेच चर्चा सुरु झाली. काय हो
विठुकाका हा परांजप्यांचा अनिल नां? एकाने विचारले.
काय हो एवढा बॅलिस्तर झाला आणि परत गावाला कसा
काय आलाय?
दुसऱ्याने आपली पिंक टाकली.
अहो! असे बॅलिस्तर हल्ली गल्लो गल्ली असतात.
त्यांना विचारतय कोण? परत पहिल्याने आपले मत टाकले.
नायSहो आपला अनिल बाळं कुठबी सापडणारा
बॅलिस्टर नाय! तो खराचं डोकेबाजं पोर हाय! पण परत का आला काय जाणं? पण पोर लयं वाळलाय ह्या बाकी खरां!
विठूकाकांनी आपले मत सांगितले आणि ते गावाच्या रस्त्याला लागले.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा