सोमवार, २५ जून, २०१८

ब्रह्मणस्पती विनायक भाग ५

ब्रह्मणस्पती विनायक
लेखक अनिल वाकणकर,
श्रीवर्धन, रायगड.

            कांतीभाई जडेजा हे शेअर मार्केट मधिल बडे प्रस्थ आहे. त्यांचा दादर चौपाटीला बंगला आहे. घरी नोकरचाकर, गाड्या यांना तोटा नाही. कांतीभाई एकदम देवभोळा माणूस. मूळचे सौराष्ट्रातिल जामनगरचे असणारे कांतीभाई वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईला आपले नशिब आजमावण्याकरीता आले होते. तयार कपड्याचा व्यापार करता करता ते शेअरबाजाराचा देखिल अभ्यास करीत होते. काही काळाने त्यांनी स्वत:चे ब्रोकींगचे लायसन्स घेतले. शेअर बाजारात आज त्यांच्या शब्दाला मान होता. मार्केटच्या टिप घेण्याकरीता अनेकांचे त्यांना फोन येतात. त्यांनी कोणालाही कधीही चुकीचा सल्ला दिला नाही. त्यांची जामनगरच्या सिद्धीविनायकावर खूप श्रद्धा होती. मुंबईमध्येही गणेश उत्सवात त्यांची सगळ्यात जास्त वर्गणी असते. दर संकष्टी आणि विनायकी चतुर्थीला ते प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाला न चुकता जातात.
     आजचा दिवस त्यांच्याकरीता फार महत्वाचा होता. फार मोठा व्यवहार त्यांना आज करायचा होता. झाला तर करोडो रुपयांचा फायदा होणार होता. परंतु अंदाज चुकले तर लाखाचे बारा हजार होण्याची पाळी होती. नेहमीप्रमाणे देवाची साग्रसंगित पूजा केल्यानंतर ते नाश्त्याकरीता डायनिंग टेबलकडे निघाले. तिथे त्यांची पत्नी उमाबेन आणि मुलगी दिव्या नाश्त्याची तयारी करुन त्यांची वाट बघत होत्या. जवळच त्यांचा नोकर कम ड्रायव्हर गोविंदा देखिल साहेबांची वाट बघत उभा होता. जडेजा कुटूंब अनेक वर्षे मुंबईत असल्याने ते सर्वजण चांगले मराठी बोलत असत. शेटजींचा दंडकच असा होता, ज्या ठिकाणी रहायचे तिथली भाषा चांगली अवगत झालीच पाहीजे. त्यामुळे त्यांचे मुंबईमध्ये असताना बोलणे मराठीतच चालत असे.
     कांतिभाई नाश्त्याकरीता आल्यानंतर गोविंदाने त्यांना आजचे ताजे पेपर दिले. त्या पेपर वरुन नजर फिरवता फिरवता त्यांनी गोविंदाला विचारले, काय रे गोविंदा तू तयार आहेस नां? आपल्याला आज गडबड आहे. तुझा नाश्ता झाला काय?
     नाही, तुमचा झाला की करतोच साहेब! तुमचे पेपर बघुन होईपर्यंत माझा नाश्ता होईल. गोविंदाने उत्तर दिले.
     तसं नको! अरे दिव्या त्या गोविंदाला आधी नाश्ता दे! कांतीभाईंनी लेकीला फर्मावले. आणि हे बघं गोविंदा! इथे टेबलवर बसुन नाश्ता कर लाजायचे काही काम नाही. तू आम्हाला घरातलाच आहेस.
     बरोबर आहे, गोविंदा चल कर सुरु. उमाबेननी गोविंदाला नाश्त्याची प्लेट देत सांगितले. त्यानंतर गोविंदा आणि कांतीभाई नाश्ता करु लागले. नाश्ता करता करता कांतीभाई पेपरच्या हेडलाईन वाचत होते. अरे! हे काय? वाचता वाचता कांतीभाई एका बातमीवर अडकले. ती बातमी सविस्तर वाचु लागले. अरे गोविंदा! तुझा गांव रत्नागिरी जिल्ह्यातच कुठेतरी आहे नां? अचानक कांतीभाईंनी गोविंदाला प्रश्न विचारला.
     हो साहेब! दापोली तालुक्यात आहे माझा गांव. का बरं तिकडची काही बातमी आली आहे कां? गोविंदाने उत्सुकतेने विचारले.
     अरे त्या दापोली तालुक्यातच भोस्ते नावांच्या गावांत ब्रह्मणस्पती विनायक या नावाचा गणपतीबाप्पा प्रकट झाला आहे. अनेकांच्या नवसाला म्हणे तो पावला आहे. आजच माझा महत्वाचा व्यवहार व्हायचा आहे. तो जर निर्विघ्नपणाने पार पडला तर आपणही त्या बाप्पाच्या दर्शनाला जाऊयां! तुला ते भोस्ते गांव माहित आहे नां? कांतीभाईंनी विचारले.
     हो, माझ्या गावाकडे जाताना भोस्ते गावाचा फाटा लागतो. गोविंदाने उत्तर दिले.
     आता आपण निघुया! गोविंदा गाडी काढ तिथपर्यंत मी येतोच. असे म्हणून कांतीभाईंनी आपला नाश्ता आवरता घेतला. निघताना देवांना नमस्कार करुन आजच्या व्यवहारात यश मिळु दे म्हणून प्रार्थना केली. पेपर मध्ये छापुन आलेल्या बाप्पाच्या फोटोला देखिल नमस्कार करुन त्यांनी त्याच्याकडे देखिल आजच्या व्यवहारातिल सर्व विघ्ने दूर करुन यश दे. अशी प्रार्थना केली. हातातल्या पेपरची घडी करुन तो पेपर त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगेत टाकला. घरापासुन ऑफिसला पोचेपर्यंतच्या प्रवासात त्यांनी भोस्त्याच्या गणपतिची पूर्ण माहिती वाचुन काढली. मनातल्या मनांत जर आजच्या व्यवहारात यश मिळाले तर या “ब्रह्मणस्पती विनायकाचे” चांगले मंदिर बांधुया असा संकल्पही केला.

*******
१०
    आज विनायकी चतुर्थी आहे. मंडणगड दापोली रस्त्यावरील भोस्ते फाट्यावर आज बरीच गर्दी दिसत आहे. नेहमी या ठिकाणी शुकशुकाटच असतो. परंतु आज तेथे वीस पंचवीसजण दापोलीला जाणाऱ्या बसची वाट बघत उभे होते. त्याचप्रमाणे मंडणगड, मुंबई बाजुकडे जाणारे लोकही बरेच दिसत होते. दोन्ही बाजुला उभ्या असलेल्या लोकांकडे एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे प्रत्येकाच्या हातात भोस्त्याच्या “ब्रह्मणस्पती विनायका” प्रसाद होता
     भोस्त्याला गणपती बाप्पा प्रकट झाल्याला आता दिड महिना झाला होता. गणपती बाप्पा प्रगट झाल्यापासुन भोस्त्याला भेट देणाऱ्या भक्तांची गर्दी वाढतच होती. भोस्ते फाट्यावर सध्या भोस्त्यातल्याच एकाने चहाची टपरी चालू केली होती. त्याठिकाणी त्याने चहा, वडापाव, शेवचिवडा असे खाद्य पदार्थ विकायला ठेवले होते. भाविकांकरीता पिण्याचे पाणीमात्र विनामूल्य होते. दोन मोठ्ठे मातीचे रांजण त्याने तेथे भरुन ठेवलेले होते. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ते थंडगार पाणी जीवाची तल्खली कमी करीत असे.
     मंडणगड कडून येणाऱ्या रस्त्यावरुन एक आलिशान कार आली आणि फाट्यावर थांबली. त्या गाडीच्या ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तो चालत त्या चहाच्या टपरीवर गेला आणि त्याने त्या टपरीवरच्या माणसाला भोस्त्याच्या “ब्रह्मणस्पती विनायकाला” जाणारा रस्ता कुठला असे विचारले. तेव्हा त्याने हाच रस्ता भोस्ते गावांत जातो, आपल्याला तिथल्या गणपतीचे दर्शन घ्यायचे असेल तर गाडी गावाच्या बाहेर उभी करावी लागेल. तिथुन जांभ्या दगडाची पाखाडी चढुन गेल्यावर आपल्याला परांजप्याच्या कडे प्रकट झालेल्या बाप्पाचे दर्शन घेता येईल असे सांगितले.
     त्यावर त्या ड्रायव्हरने धन्यवाद असे म्हणून आपला मोर्चा रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आपल्या कार कडे वळवला. आपल्या जागेवर बसुन त्याने पाठीमागे बसलेल्या कांतीभाईंना भोस्त्याचा रस्ता हाच आहे असे सांगुन गाडी त्या रस्त्यावर घेतली.
कांतीभाई आज खूप खुष होते. त्यांना स्वप्नवत वाटणारा व्यवहार त्या दिवशी यशस्वी रीतीने पूर्ण झाला होता. हे सर्व त्या भोस्त्याच्या “ब्रह्मणस्पती विनायकाच्या कृपेनेच अशी त्यांची पूर्ण श्रध्दा होती. त्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी लगेचच भोस्त्याच्या बाप्पाच्या  दर्शनाला जाण्याचा निश्चय केला होता.  त्यादृष्टीने आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करायला सुरवात केली होती. ठरवल्या प्रमाणे ते आज विनायकी चतुर्थीचा मुहूर्त साधुन आपली मुलगी, पत्नीसह भोस्त्याच्या बाप्पाच्या दर्शनाला आले होते.
बघता बघता त्यांची कार भोस्ते गावाच्या एस्. टी. स्टॉपजवळ आली. तेथे आधीपासुनच काही रिक्षा आणि सहा आसनी रिक्षा उभ्या होत्या. त्यापैकी काही रिक्षा दापोलीहून तर काही मंडणगडहून आलेल्या होत्या. तिथेच खेडहून आलेली एक खाजगी स्पेशल बस देखिल उभी होती.
त्या खेडहून आलेल्या बसच्या ड्रायव्हरला कांतीभाईंचा ड्रायव्हर गोविंदाने गणपती मंदिरात कसे जायचे ते विचारले. त्यावर त्याने आपण आपली गाडी येथेच उभी करा. “ब्रह्मणस्पती विनायक” मंदिरापर्यंत गाडीचा रस्ता नाही असे सांगितले. समोर दिसते त्या पाखाडीने चालत गेल्यावर आपल्याला गणपती मंदीरात जाता येईल. त्याचे म्हणणे ऐकुन गोविंदाने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन व्यवस्थित पार्क केली. गाडी थांबल्याबरोबर तिच्यामधुन कांतीभाई, उमाबेन आणि दिव्या बाहेर पडले. गोविंदा म्हणाला शेट ही जागा अनोळखी आहे मी गाडीतच थांबतो.
त्यावर शेट म्हणाले, अरे आपण बाप्पाच्या दर्शनाला आलोय त्यामुळे सर्व चिंता त्या बाप्पावर सोडून आपण त्याला भेटायला जाऊया. गाडी व्यवस्थित लॉक करुन तू पण आमच्या बरोबर चलं.
ठिक आहे तर मगं चला! असे म्हणून गोविंदाने बरोबर असलेले सामान उचलले आणि त्याने पाखाडी चढायला सुरवात केली. नेहमी चालण्याची सवय नसल्याने उमाबेनला चालताना दम लागत होता. त्यांच्या चालीने सर्वजण पाखाडी चढायला लागले. निम्मी पाखाडी चढुन आल्यावर त्यांना डाव्याबाजुला एक नारळाच्या ओल्या झापांची कमान केलेला, सुपारीच्या आणि माडाच्या झावळ्यांनी सजवलेला मंडप दिसला. तेथे असलेली गर्दी पाहून ते सर्वजण त्या मंडपात गेले.  

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा