सोमवार, २५ जून, २०१८

ब्रह्मणस्पती विनायक भाग ६

ब्रह्मणस्पती विनायक

अनिल वाकणकर,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड.

११
कांतीभाईंनी आपल्या पत्नी आणि मुलीसह त्या मंडपात प्रवेश केला तेव्हा त्यांना            समोरच गणपती बाप्पाचे साजरे रुप दिसले. बाप्पाच्या डोक्यावर एका आडव्या वाशाला बांधलेल्या अभिषेक पात्रातुन थेंब थेंब दूध पडताना दिसत होते. “ब्रह्मणस्पती विनायका” समोर एका चौरंगावर कुसुंबी रंगाचे रेशमी सोवळे नेसलेला एक गृहस्थ हातामधल्या चांदीच्या फुलपात्रामधुन बाप्पावर दुर्वांच्या सहाय्याने पाणी वहात होता. मंडपात दोहोबाजुला एकमेकांकडे तोंड करुन एकवीस पुरोहित बसले होते. त्यांनी सर्वांनी करवती काठाचे पांढरे शुभ्र धोतर नेसले होते आणि तसेच उपरणे खांद्यावरुन घेतले होते.
आज बाप्पावर ब्रह्मणस्पती सूक्ताच्या एकवीस आवर्तनांचा अभिषेक आयोजीत केलेला होता. त्या करीता हे एकवीस पुरोहित दापोली आणि खेडमधुन आलेले होते. आता त्यांची ब्रह्मणस्पती सूक्ताची एकसष्टावी ऋचा म्हणणे चालू होते. एकसष्टावी ऋचा संपल्यावर सर्व पुरोहितांनी एकसुरात बासष्टावी ऋचा म्हणायाला सुरवात केली.
अग्निर्येन विराजति सूर्यो येन विराजति         
विराज्येन विराजति तेनास्मन् ब्रह्मणस्पते विराSSजसमिधं कुरु।।
ॐ शांती: शांती: शांती:।।
या ऋचेचा स्वर सर्वत्र आसमंतात भरुन राहीला. पुरोहितांच्या या स्वराने सूर्याचे, अग्नीचे तेजच जणू या मंडपात प्रगट झाले. मंडपात उपस्थित असणारे सर्वच या वातावरणाने भारुन गेले. दरम्यान ब्रह्मणस्पती सूक्ताची आवृत्ती पूर्ण झाल्यावर पुरोहितांनी गणपतीसूक्ताचे पठण सुरु केले.
ॐ आतून इंद्र क्षुमतं चित्रं ग्रामं संगृभाय। महाहस्ती दक्षिणेन।।
विद्माहित्वा तुविकुर्मिं तुविदेष्णं तुविमघं। तुविमात्रमवोभि:।।
गणपतीसूक्ताच्या पठणाचे स्वर सर्वत्र भरुन राहिले होते. तिथे हजर असणारे सर्वजण या वैदिक सूक्ताच्या पठणाने भारावुन गेले. सर्वचजण गणपतिसूक्ताच्या ऋचा श्रवण करताना समोरच असलेल्या बाप्पाच्या सगुण साकार रुपाकडे पहात होते. त्या रुपाकडे बघता बघता आणि कानांनी दिव्य गणपती सूक्त ऐकता ऐकता समाधी अवस्थेत गेले.  
यथावकाश चालू असलेली विशेषपूजेचे विधी समाप्त झाले. सर्वांनी मिळुन बाप्पाची आरती केली. आरती झाल्यावर सर्वांनी मिळुन “ब्रह्मणस्पती विनायक बाप्पा मोरयाSS” असा गजर केला. सर्वांनी एक एक करुन बाप्पाचे दर्शन घेतले.
सर्वांचे दर्शन झाल्यावर नाना परांजपे यांनी सर्वांना महाप्रसाद घेऊनच मंडप सोडावा असे सांगितले. सर्वांचा महाप्रसाद ग्रहण करुन झाल्यानंतर त्या मंडपात मोजकेच लोक उरले. त्यामध्ये कांतीभाई, गोविंद, उमाबेन, दिव्या, आजची पूजा ज्यांनी आयोजित केली होती ते दापोलीचे विनायक जोशी, थोरात गुरुजी आणि दापोलीचे दोन आणि खेडचे दोन भक्त हजर होते.
ज्यांनी आजच्या ब्रह्मणस्पती सूक्ताचे अनुष्ठान आयोजीत केले होते ते विनायक जोशी कांतीभाईंच्या जवळ जाऊन त्यांना आपली ओळख करुन दिली. ते म्हणाले मी विनायक जोशी दापोलीला माझे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान आहे. आपण या भागातले दिसत नाही म्हणून मुद्दाम आपली ओळख करुन घ्यावी असे मनांत आले म्हणून आपल्या जवळ आलो आहे. महिन्याभरापूर्वी मी येथे दर्शनाला आलो होतो. त्यानंतर लगेचच माझी एक दिर्घकाल कोर्टात चालू असलेली केस माझ्याबाजुने झाली. हा कदाचित योगायोग असेल परंतु मला आपले वाटले की, हे सर्व या “ब्रह्मणस्पती विनायक” कृपेने झाले. म्हणूनच आजच्या विनायकीच्या दिवशी मी ब्रह्मणस्पती सूक्ताचे अनुष्ठान आयोजित केले.
नमस्कार! मी कांतीभाई जडेजा! मूळचा गुजराथमधल्या सौराष्ट्र विभागातील जामनगरचा आहे. परंतु गेली अनेक वर्षे मी मुंबईला दादरमध्ये रहातो. माझा देखिल एक व्यवहार या बाप्पाच्या कृपाशिर्वादाने यशस्वी झाला. मी माझी पत्नी आणि मुलीसह आज बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे. परंतु आपण आज जो विशेष सूक्ताने अभिषेक केलात तो काय प्रकार आहे. मला देवीवर अभिषेक करतात ते श्रीसूक्त माहीत आहे. शिवाय गणपति अथर्वशिर्ष देखील मी नेहमी म्हणतो. आपण मला त्याची सविस्तर माहिती द्याल कां?
हो! हो! का नांही! मी आपल्याला सर्व सविस्तर सांगतो. आज आम्ही ज्या सूक्ताने अभिषेक केला त्या सूक्ताचे नांव आहे श्री ब्रह्मणस्पतिसूक्त. या सूक्ताचे संपादन दापोली जवळच्या अंजर्ले येथिल विद्याविनोद या पदवीने सन्मानित केलेल्या नारायणशास्त्री जोशी यांनी केले आहे. धन, विद्या, संतती प्राप्तीकरीता शिवाय निरनिराळ्या संकटापासुन मुक्ती मिळण्याकरीता या सूक्ताने गणपतिला अभिषेक करतात. यामध्ये सकृदावर्तन म्हणजे एकवेळा पठण करणे, एकवीसवेळा पठण करणे, मंडल म्हणजे(२१x२१)४४१ वेळा पठण करणे आणि महामंडल म्हणजे (२१x२१ x२१) ९२६१ वेळा पठण असे प्रकार आहेत. यातिल पहिल्या दोन प्रकारांकरीता कोणताही दिवस चालतो. परंतु मंडल आणि महामंडल अनुष्ठान करण्याकरीता शक्यतो चतुर्थी तिथी पहावी. विनायक जोशी यांनी सविस्तर माहिती दिली.
विनायकदादा आपण मला या अनुष्ठानाची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला जर यातले एखादे अनुष्ठान करायचे असेल तर या भोस्ते गावांत काही व्यवस्था करता येईल कां? आपण दापोलीचेच रहाणारे असल्याने आपल्याला ते सहज शक्य झाले. परंतु माझी येथे कोणाशीच ओळख नाही. तेव्हा आपण मला या बाबतित सहकार्य कराल याची मला खात्री आहे.
नक्कीच मी आपल्याला मदत करीन कांतीभाई आपल्याला जर ब्रह्मणस्पतीसूक्ताचे या ठिकाणी भोस्त्याला करायचे असेल तर मी आज आणलेली सर्व टिम परत आपल्याला उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीन. फक्त मला पुरेसा अवधी मिळाला पाहिजे कारण आज येथे  ब्रह्मणस्पती सूक्त म्हणणारे पुरोहित निरनिराळ्या गावातुन आले आहेत. एका ठिकाणी २१ जण मिळू शकणार नाहीत. जर आपल्याला मंडल अनुष्ठान करायचे असेल तर त्याला २१ पुरोहितांना किमान चार ते पांच तास लागतिल.
विनायकदादा मला या “ब्रह्मणस्पती विनायक” बाप्पाची संपूर्ण माहिती हवी आहे. शिवाय मला ज्यांच्याकडे ही बाप्पाची मूर्ती सापडली त्यांना देखिल भेटायचे आहे. आपण त्यांची भेट घालुन देऊ शकाल काय? मला या बाप्पाला असे उघड्यावर बघुन खूप दु:ख होते आहे. बाप्पाकरीता मंदिर बांधण्याचा काही विचार चालू असेल तर मला त्यात माझेही योगदान द्यायचे आहे. कांतीभाईंनी आपला मनोदय सांगितला.
अहो कांतीभाई माझाही असाच काहीसा विचार आहे. तेव्हा आपण दोघे मिळुन यात पुढाकार घेऊया त्यामुळे माझ्याही मनाला समाधान मिळेल. त्याकरीता आपल्याला नाना आणि अनिल परांजपे यांना भेटायला लागेल. मी नानांना अनेक वर्षा पासुन ओळखतो खूप साधी माणसे आहेत ती.
इतक्यात त्यांना थोरात गुरुजी दिसले त्यांना पाहून ते म्हणाले, हे बघा थोरातगुरुजी समोर दिसताहेत. त्यांना मी आपला विचार सांगतो. तेही गणेशभक्त आहेत. तसे नाना परांजपे देखिल गाणपत्य आहेत. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासुन गणेशाची उपासना केली जाते. बोलता बोलता विनायकदादांनी थोरात गुरुजींना आपल्या जवळ येण्याकरीता खूण केली.
थोरातगुरुजी जवळ येताच विनायकदादांनी कांतीभाईंची त्यांच्याशी ओळख करुन दिली. थोरातगुरुजींनी कांतीभाईंना नमस्कार केला आणि  मी थोरातगुरुजी या भोस्ते गावातच शिक्षक आहे. आपले या गावात मी स्वागत करतो अशी आपली ओळख करुन दिली.
एकमेकांची ओळख होताच कांतीभाईंनी मला या “ब्रह्मणस्पती विनायक” बाप्पाची मूर्ती ज्यांना सापडली त्यांना भेटायची इच्छा असे सांगितले. तसेच बाप्पाचे मंदिर बांधायची काही योजना असेल तर त्यात योगदान देण्याची माझी इच्छा आहे, तेव्हा आपण माझी नाना परांजपे यांची भेट घालुन द्यावी ही विनंती.
कांतीभाई आणि विनायक दादा सध्यातरी मंदिर बांधायची काही योजना नाही. कारण या गावातले गावकरी भाविक असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. काहीजण खाऊन पिऊन सुखी आहेत परंतु एक मुठीने पैसे खर्च करु शकतिल असे कोणीच नाही. ज्यांना बाप्पा सापडला त्या नानांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. त्यांचा आशेचा किरण असणारा अनिल सध्या बेकारच आहे. त्यांची जमिन देखिल जेमतेम रोजचा ताक भाताला पुरेल एवढीच आहे. सध्या आपल्याला जो झापांचा मंडप दिसतो आहे तो देखिल याच्या त्याच्याकडून  चार चार झाप आणि वासे जमवुन गावकऱ्यांनी तयार केला आहे. आता पाऊस आला की, तो देखिल निकामी होईल. थोरात गुरुजींनी सत्य परिस्थिती कथन केली.
गुरुजी मंदिर बांधण्याकरीता पैसा हा विषय दुय्यम आहे. त्या नानांची परवानगी असेल तर मी मंदिराचा सर्व खर्च करु शकतो. तेव्हा आपल्याला आधी नानांना आणि अनिल परांजपे यांना भेटायला पाहीजे. त्यानंतर सर्व गोष्टीतुन मार्ग काढता येईल. कांतीभाईंनी आपली भूमिका सांगितली. 
चला तर मगं! आत्ताच आपण परांजप्यांच्या घरी जाऊ या. आता ते जरा निवांत असतिल. असे म्हणून थोरातगुरुजी उठले, त्यांच्याबरोबर कांतीभाई, त्याची मुलगी, पत्नी आणि विनायकदादा परांजप्यांच्या घराकडे निघाले.

*******
१२
 थोरात गुरुजी सर्वांना घेऊन परांजपे यांच्या घरात गेले. नाना परांजपे आणि अनिल आणि त्याची आई त्यांच्या माजघरात बसले होते. आत आल्यावर गुरुजींनी नाना परांजपे यांना कांतीभाई, उमाबेन आणि दिव्या यांची ओळख करुन दिली. त्यानंतर सर्वजण तिथेच एका सतरंजीवर बसले. विनायक दादांनी नानांना आपण मला ओळखताच असे म्हणून आपली उपस्थिती जाहिर केली.
 अनिलभाऊ! या कांतीभाईंना आणि मला आपल्याकडून बाप्पाच्या प्रकट होण्याची सर्व हकिगत ऐकायची आहे. त्याचप्रमाणे मंदिर बांधण्याची काय योजना आहे कां याविषयी देखिल समजाऊन घ्यायचे आहे. विनायक दादांनी अनिलभाऊंकडे विचारणा केली.
कांतीभाईंची आणि विनायक दादांची उत्सुकता ऐकुन अनिलने “ब्रह्मणस्पती विनायक” बाप्पाच्या आगमनाची सविस्तर हकीगत सांगितली. त्यानंतर त्याने मंदिर बांधण्याच्या बाबतीत काहीच योजना ठरवलेली नाही असे सांगितले. कारण मंदिर बांधायचे म्हटले तर फार मोठ्या प्रमाणात पैसा लागेल. येथे आमची आणि आमच्या गावकऱ्यांची देखील आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने आम्ही फारतर ज्याला आमच्याकडे घुमटी म्हणतात त्या पध्दतीने छोटेसे मंदिर आम्ही बांधु त्यामुळे बाप्पावर उन्हापावसात सावली होईल आणि जागाही फारशी अडकून रहाणार नाही. आत्ताची मंडपाची सोय देखिल गावकऱ्यांनी मिळुन केलेली आहे. परंतु ती पावसात काही उपयोगाची नाही.
हे पहा अनिल भाऊ! माझा मुंबईत मोठा व्यवसाय आहे. आज मी येथे गणपतीबाप्पाच्या दर्शनाला येण्याचे कारण देखिल या बाप्पाच्या आशिर्वादाने माझे मोठ्ठे डिल यशस्वी झाले हे आहे. त्या व्यवहारात मला लाखो रुपयांचा नफा झाला आहे. माझी अशी इच्छा आहे की, या “ब्रह्मणस्पती विनायकाचे” मंदिर बांधण्याचा पूर्ण खर्च मी करावा. त्याकरीता आपण मला परवानगी द्यावी.
शिवाय दापोलीला जाणाऱ्या मुख्य रस्त्या पासुन भोस्ते गावातील या मंदिरापर्यंत येणाराही रस्ता मी बांधु इच्छीतो. तेव्हा अनिलभाऊ आणि नाना आपण माझ्या या विनंतीला आपली संमती द्यावी अशी आपणाकडे प्रार्थना आहे. 
 कांतीभाईं जर आर्थिक भार सोसणार असतिल तर मंदिराच्या आणि रस्त्याच्या बांधकामाची व्यवस्था करणे, त्यावर देखरेख करणे वेळच्यावेळी मटेरीयल पुरवणे या बाबींकडे मी जातीने लक्ष देईन. या शिवाय माझ्याकडून शक्य होईल तितका आर्थिक भार देखिल मी स्विकारायला तयार आहे. विनायक दादांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या दोघांच्या मनोगता नंतर आता  नानांनी बोलायला सुरवात केली. कांतीभाई आणि विनायकदादा आपण मंदिर बांधण्याच्या कामी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था करायला तयार झालात त्याबद्दल मी आपला मनापासुन आभारी आहे. परंतु माझी अडचण अशी आहे की, माझ्या या सध्याच्या जागेत भव्य मंदिर बांधले तर ती जवळपास सगळी जमिन मंदिराकरीता वापरायला लागेल.
माझ्याकडे कुटुंबाच्या चरितार्थ चालवण्याकरीता ही जमिन हाच एकमेव आधार आहे. तोच जर मंदिर बांधण्याकरीता मी नाहिसा केला तर माझ्या कुटूंबाचा चरितार्थ कसा चालवायचा याची मला चिंता निर्माण होईल. आपण म्हणाल मंदिरात भाविक जे अर्पण करतील त्यावर चालू शकेल. परंतु ते तर अळवावरचे पाणी. आज येथे गर्दी दिसतेय तशीच कायम राहिल असे खात्रीने सांगता येणार नाही.
नाना आपण म्हणताय ते बरोबरच आहे. परंतु आपण त्याची चिंता करु नका. आपल्या जमिनीच्या सर्व भागात काही मंदिर बनणार नाही. मंदिर बांधुन जी जमिन उरेल तेथे आपण आपल्या कुटूंबाला कोणतिही आर्थिक चिंता उरणार नाही असा व्यवसाय निर्माण करुया. त्यासाठी लागेल ते अर्थ सहाय्य मी करेनच. असा काही व्यवसाय केला तर आपल्या बरोबर आपल्या गावकऱ्यांच्याही रोजगाराची सोय करता येईल. कांतीभाईंनी एक प्रस्ताव समोर ठेवला.
नाना! मंदार! कांतीभाईंचा हा प्रस्ताव मात्र मला योग्य वाटतो. सध्या जो जांभ्या दगडाच्या कातळाचा भाग आहे तेथे मंदिर उभे राहू शकते. उरलेल्या जागेत काजू बीवर प्रक्रिया करणे, आंब्याचे केनिंग करणे, करवंदे, जांभळे यांचे निरनिराळे पदार्थ बनविणे हा व्यवसाय तेथे चालू कराता येईल. त्या करीता लागणारा कच्चा माल आपल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांत मुबलक आहे. तेव्हा हा प्रस्ताव स्विकारायला हरकत नाही असे माझे मत आहे. थोरात गुरुजीनी व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न देखिल सोडवुन टाकला.
या सर्वांची ही चर्चा चालू असताना अनिल मात्र मनाने कोसळत होता. त्याची सद्सद्विवेक बुध्दी त्याला गप्प बसुन देत नव्हती. ही चर्चा ऐकताना त्याच्या मनाला पिळ पडत होता. मनावर मोठा ताण आल्याने त्याच्या डोळ्यांतुन घळा घळा अश्रू वहायला सुरवात झाली. सर्वजण  चर्चेत इतके मग्न होते की, अनिलच्या बदललेल्या मनस्थितीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. परंतु बाहेर पडवीत बसलेल्या गोविंदाचे अनिलकडे लक्ष गेले. अनिलच्या डोळ्यांतुन वहाणारे अश्रु पाहून तो आत आला आणि त्याने अनिलला विचारले, अनिलभाऊ काय झाले? तुमच्या डोळ्यातुन अश्रुंची धार लागली आहे! चेहरा देखिल पार कोमेजुन गेला आहे!  
चाललेल्या चर्चेत मध्येच गोविंदाचा आवाज ऐकुन सर्वांचेच लक्ष आता अनिलकडे गेले. सतरंजीवर बसलेले थोरात गुरुजी उठुन अनिलकडे गेले. त्यांनी अनिलला जवळ घेतले त्याचे डोळे पुसत त्याला विचारले अरे अनिलबाळा! काय झाले तुझा चेहरा कां असा झालाय? इथे चालू असलेली चर्चातर योग्य दिशेने चालू आहे. मग तुला दु:ख कशाचे होतेय?
गुरुजी! नाना! आई! मी तुम्हाला सगळ्यांना फसवले. तुमच्या श्रध्देचा गैरफायदा घेतला. सुरुवातीपासुनच मी तुम्हाला फसवत आलो आहे. आपण आत्ता पूजा करतोय ती बाप्पाची मूर्ती मला लाटवणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडली. ती तिथे तशीच सोडून यायला मन घेईना. म्हणू माझ्या मित्रांनी आणि मी ही मूर्ती इकडे भोस्त्याला आणायची ठरवली. त्याकरीता एक जुनी ट्रंक घेतली त्या ट्रंकेत घालून एस्. टी.ने ती मूर्ती मी इकडे भोस्त्याला आणली. त्यानंतर माझ्या मनात कपट आले. मी बाबांनासुध्दा मी अशाप्रकारची मूर्ती घेऊन आलो आहे असे सांगितले नाही. नंतर मी डवरा खणायचे नाटक करुन अंगारिका संकष्टीच्या आदल्या रात्री त्या मूर्तीला त्या खड्यात ठेवली  आणि वरुन माती लोटली.
नंतर पहाटे बाबांना स्वप्न पडल्याचे खोटे सांगुन सहदेवला बोलावुन आणले आणि ती मूर्ती बाहेर काढली. त्यानंतरचे सर्व आपल्याला माहित आहेच. आत्ता या ठिकाणी मोठे मंदिर बांधण्याच्या आणि व्यवसाय सुरु करण्याची चर्चा सुरु झाली आणि माझे संस्कार जागे झाले. मी केलेल्या खोट्या कर्माचा मला पश्चाताप झाला. आता या खोट्याच्या आधारावर प्रकट झालेल्या मूर्ती करीता मंदिर बांधायचे किंवा नाही हे आता तुम्ही लोकांनी ठरवावे.
अनिल! मला तुझी लाज वाटते. अरे! आपले घराणे गाणपत्य! त्या घराण्याच्या दैवताचीच तू चेष्टा केलीस. गणपतीची उपासना काय साधी वाटली तुला? कितीही दारिद्र्य आले तरी त्याची तमा न बाळगता आपल्या पूर्वजांनी गणेशभक्ती टिकवुन ठेवली. त्या श्रध्देचा तू तुझ्या वागण्याने अपमान केला आहेस. नाना सात्विक संतापाने बोलले आणि स्वत:च स्वत:ला दोष देत राहिले  आणि ते मान खाली घालुन बसुन राहिले.
आता विनायक दादा पुढे झाले. त्यांनी नानांच्या पाठिवर हात ठेवुन त्यांना शांत व्हायला सांगितले.  नाना! अहो अशा किरकोळ गोष्टीने कोणाच्याही श्रध्देला तडा जायला ती काय इतकी कमकुवत कां आहे? माझी, या कांतीभाईंची श्रध्दा काय तो देव तुमच्या डवऱ्यात सापडला म्हणून  आहे? आज मी जे ब्रह्मणस्पती सूक्ताचे अनुष्ठान केले ते काय तो डवऱ्यांत सापडला म्हणून केले होते.  आणि असे बघा ही परमेश्वराचीच योजनाच नाही कां? नाहीतर त्या लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनिलच्या आधी कित्येकजण गेले असतिल. परंतु अनिलच्याच पायाला ठेच कां लागली? त्याच्या मित्रांच्या पायाला का लागली नाही? अहो गाणपत्य घराण्याचा वारसा त्याच्याकडे आहे. म्हणूनच बाप्पाने त्याला आपले वाहन केले. नाहीतर तो देखिल एवढी अवजड मूर्ती उरापोटावर घेऊन इकडे भोस्त्याला कशाला आला असता?
अनिलभाऊ! आता तुम्हाला पश्चाताप झाला आहे नां? ह्रदयापासुन झालेल्या पश्चातापाने सर्व पापे नष्ट होतात, येथे तुम्ही कोणाचे नुकासनही केले नाही. तेव्हा तुम्ही आता स्वत:ला अपराधी मानायचे सोडून द्या. तुमची चुक काय आहे तर, तुम्ही ती मूर्ती त्या डवऱ्यात लपवुन नंतर बाहेर काढलीत. नाहीतरी तुमचा उद्देश ती मूर्ती परत सागरार्पण न होता तिची पूजा व्हावी हाच होताना? तुम्ही फक्त घास सरळ न घेता त्याला थोडेसे वळण दिलेत. अहो बाप्पाची इच्छा नसती तर तुमची काय हिमंत होती ती लपवायची आणि परत बाहेर काढायची. अशाप्रकारे त्या डवऱ्यातुन प्रकट होण्याची त्याचीच इच्छा होती. तसे नसते तर मी काय किंवा हे विनायक भाऊ काय या भोस्ते गावात दर्शनाला आणि अनुष्ठानाला आलो असतो काय? त्या बाप्पाने तुमच्यामार्फत ही लिला केली एवढेच. तेव्हा नाना तुम्ही आणि अनिल तूही कोणतीही अपराधी भावना मनांत ठेवु नको. कांतीभाईंनी आपली भूमिका मांडली.
नाना कांतीभाई म्हणतात ते खरं आहे. तुमच्या घराण्याने आतापर्यंत केलेल्या उपासनेचे फळ म्हणून हा बाप्पा अनिलच्या मार्फत तुमच्याकडे चालून आला हीच तुमची भावना आहे नां! मग ती बरोबरच आहे. त्यानेच अनिलला डवऱ्यात लपविण्याची बुध्दी दिली. असे जर झाले नसते, तर ते पत्रकार येथे आले असते काय? त्यांनी दिलेल्या बातमीमुळे नुसत्या महाराष्ट्रात नाहीतर सर्वत्र ही बातमी पसरली. त्यामुळेच या कांतीभाईंना तो पेपर सापडला, त्यांचा व्यवहार यशस्वी झाला. अहो ही सर्व त्या बाप्पाचीच योजना होती. तेव्हा तुम्हाला अनिलची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटला पाहिजे. थोरात गुरुंजीनी आपले परखड मत व्यक्त केले.
*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा