१
शुकासारिखे
पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्टापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी
वाल्मिकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ।।
जSय जSSय रघुवीSर समर्थ।।
माई
भिक्षा वाढा!! असा
खणखणित पुकारा करित तो दारात उभा राहिला. स्वच्छ पांढरा लेंगा, त्यावर स्वच्छ
पांढरा नेहरु शर्ट, डोक्यावर स्वच्छ पांढरी टोपी, काखेत शबनम सारखी पिशवी
अडकवलेल्या त्या भिक्षेकऱ्याने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले. साधारण ४५ ते ५० वयाचा
वाटणारा तो भिक्षेकरी चेहऱ्यावरुन तरी चांगल्या सुखवस्तु घरातला वाटत होता. जरी
त्याची दाढी वाढलेली होती तरी ती
अस्ताव्यस्त दिसत नव्हती. अशा व्यक्तिमत्वाचा माणूस भिक्षा मागतोय हे पाहून
सर्वांनाच आश्चर्य वाटत होते.
त्याच्याकडे बघुन लोक चर्चा करत होती. कोणी
म्हणत होते नवस म्हणून भिक्षा मागत असेल! कोणी म्हणत होते कुठल्यातरी संस्थेच्या मदती करीता
भिक्षा मागत असेल! परंतु तो मात्र या कोणत्याही कोलाहलाकडे
लक्ष न देता नि:संकोचपणाने घरातल्या गृहीणीला भिक्षा
वाढण्याचे आवाहन करत होता. तेवढ्यांत त्या घरांतील गृहिणी सुपात भिक्षा म्हणून
धान्य घेऊन आली. तेव्हा त्याने माई मला धान्य नको काही शिळपाकं असले तरी शिजवलेले
अन्न द्या म्हणून विनवणी केली. नंतर तिने आणलेल्या भिक्षेतली थोडीशीच स्विकारुन उरलेली
नम्रपणाने परत केली. अशा तऱ्हेने पांच घरी भिक्षा मागुन गोळा झालेले अन्न घेऊन तो
गावाबाहेर असलेल्या मारुतिच्या देवळाकडे निघाला. त्याच्या पाठोपाठ गावातली बच्चे
कंपनी देखिल तो काय करतोय ते बघायला धावली. मात्र तो मारुतिच्या देवळात शिरताच दूर
उभी राहून तो काय करतोय याचे निरीक्षण करु लागली.
मारुतिच्या देवळात शिरताच त्याने आपल्या
खांद्यावरची शबनम तेथिल ओवरीत असलेल्या खुंटीला अडकवली आणि आजुबाजुचे निरिक्षण करु
लागला. मारुतिच्या देवळाच्या परिसरांत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले होते.
तिथेच एका कोप-यांत सिगारेट विड्यांची थोटके, काड्यापेटीच्या अर्धवट जळालेल्या
काड्यांचा ढीग पडला होता. लगेचच त्याने मंदिराच्या परिसरांतच असलेल्या
निर्गुडीच्या झुडुपांच्या फांद्या मोडून घेतल्या आणि त्यांच्या सहाय्याने मंदिराचे
सर्व आवार लख्ख करुन टाकले. या सर्व कामाला त्याला जवळ जवळ दिड तास लागला.
नंतर
त्याने स्वत:कडे
बघितले. आपला अगदी अवतार झाला आहे हे त्याच्या लक्षांत आले, सगळे कपडे घुळीने
माखले होते. क्षणभर विचार करुन त्याने आपला झब्बा, लेंगा आणि टोपी काढुन आपल्या
शबनम मध्ये ठेवले आणि आतल्या हापपँट आणि बनियनवर तो नदीवर गेला. तेथे नदीत बुडी
मारुन स्वच्छ आंघोळ केली. येताना ओलेत्यानेच आपल्या हातात नेलेला तांब्या भरुन
आणला. येता येताच कुंपणीला असलेल्या पांढ-या चाफ्याची फुले काढुन आणली. आणि त्यांच्या सहाय्याने मारुतिची
मनोभावे पूजा केली.
मारुतिची
पूजा करुन झाल्यावर आपल्या शबनम मधुन आणलेली भिक्षा बाहेर काढली. त्या अन्नाचा
मारुतिला नैवेद्य दाखवला. नंतर त्यातला थोडा भाग नदीमध्ये माशांना खायला घातला,
थोडा भाग कावळ्यांना काढुन ठेवला आणि उरलेल्या अन्न घेऊन आपले भोजन केले. भोजन
होताच भोजन केलेली जागा साफ केली. त्यानंतर आपल्या बरोबर आणलेली सतरंजी अंथरली आणि थोडावेळ वामकुक्षी करु
लागला.
***********
रोजच्या
सवयीप्रमाणे गणा, हेरंब, जितू आणि हेमंत या चौकडीने दिवस मावळताच आपला मोर्चा
मारुतिच्या देवळाकडे वळवला. मारुतिच्या देवळाच्या कोपऱ्यामध्ये पत्ते कुटत बसणे हा
त्या चौकडीचा रोजचा उद्योग होता. खरं म्हणजे दिवसातले १०-१२ तास त्यांचा वेळ या
मंदिरात सिगारेटी आणि विड्या फुंकत रमी
खेळत बसणे यात जायचा. आज गणाच्या मामाचे वर्षश्राद्ध होते म्हणून ते सर्वजण
शेजारच्या वडवली गावात गेले होते. त्यामुळे आज त्यांच्या या कार्यक्रमात खंड पडला
होता. तरीपण संध्याकाळी घरी येताच घरचे ढोरा गुरांचे काम मार्गी लाऊन त्यांनी आपला
मोर्चा मारुति मंदिराकडे वळविला होता.
आत्ता संध्याकाळचे
सहा साडेसहा वाजले असतिल. नुकताच सूर्य मावळला होता. अजुन थोडा संधीप्रकाश बाकी
होता. ते चौघेजण नेहमीच्या सवयीप्रमाणे विड्या ओढत गप्पा मारत देवळाकडे येत होते.
देवळापासुन १००-२०० फुटावर आल्यावर तिथे त्यांना काहितरी चुकतेय असे जाणवत होते.
जितू
गणाला म्हणाला, काय रे गणा! आपण आज जागा चुकलोय काय? आपल्या देवळाचा परिसर एवढा
चकाचक कसा काय दिसतोय ?
खरचं की
रे गड्या! आपण गेली दोन चार वर्ष इथं येतोय पण मंदिर एवढे लख्ख फक्त मारुतीच्या
जत्रेलाच बघतो! हे काहीतरी वेगळंच झालंय!!, गणाने आपला रिप्लाय दिला.
बोलत
बोलत ते चौघजण पुढे आले तो त्यांना दिसले की, एक माणूस जागोजागी गोळा केलेल्या
पाला पाचोळ्याच्या ढीगांना पेटवीत आहे. तिथे असे सात आठ कचऱ्याचे ढीग केलेले दिसत
होते. ते बघुन अचंब्याने ते चौघेजण जागेवरच थांबले. सर्व ढीग जवळ जवळ जळालेच होते,
ते बघीतल्यावर तो माणूस मागे वळला आणि देवळात निघुन गेला. देवळातुन हातात काहीतरी
घेऊन तो माणूस परत बाहेर पडला आणि नदीकडे निघुन गेला. त्यानंतर ते चौघेजण देवळात आपल्या नेहमीच्या कोपऱ्याकडे गेले.
त्यांनी देवळात सगळीकडे पाहीले तो तेथेही सर्व लखलखित केलेले दिसत होते. कुठेही
धुळ आणि काडी कचऱ्याचे नामोनिशाण दिसत नव्हते. तिथेच खुंटीला शबनम लावलेली दिसत
होती. जवळच खिडकीमध्ये सतरंजीची घडी ठेवलेली दिसत होती.
एकंदरित असे
सगळे वातावरण पाहून त्यांना आपल्या तोंडात असलेल्या विडीची लाज वाटायला लागली आणि
त्यांनी आपल्या तोंडातली विडी जवळच जळत असलेल्या कचऱ्याच्या ढिगात टाकुन दिली.
एकंदरीतच या बदललेल्या वातावरणाने त्यांची विचारशक्ती कुंठीत झालेली होती. आपण
येथे कशाला आलो आहोत याचाच त्यांना विसर पडला होता.
त्यातुन
पहिला भानावर आला तो हेमंत, तो म्हणाला चला! असे विचार करत काय राहिलात!
आपली रोजची वेळ झाली आहे! रमीचे चार डाव टाकू आणि मग घरी
जाऊ. असे म्हणून त्याने खिशातुन पत्याचा कॅट काढला आणि कोपऱ्यातल्या ट्यूब लाईटचे
बटण दाबले. लगेचच खाली बसुन त्याने पत्ते पिसुन चौघांना वाटले. मग बाकीचे तिघेपण
पत्ते खेळायला बसले. बोलता बोलता हेरंबने आपल्या खिशातुन विडीचे बंडल काढले,
त्यातली विडी काढुन तोंडात धरली आणि गणाकडे माचीसकरता हात पुढे केला. गणाने आपल्या
खिशातली माचीस काढली आणि त्यातली काडी ओढुन हेरंबची विडी पेटवली. हेरंब पाठोपाठ
सर्वांनी आपापल्या विड्या शिलगावल्या आणि आपापले पत्ते उचलुन रमीचा डाव खेळायला
सुरवात केली.
त्यांचा
जेमतेम एक डाव पुरा होतोय तो मघाचाच माणूस मंदिराच्या दारातुन आत येताना दिसला.
त्याच्या खांद्यावर धुतलेल्या कपड्यांचे पिळे आणि हातात पाण्याने भरलेला तांब्या
दिसत होता. आत आल्या आल्या त्याने देवळातले स्विचबोर्ड शोधुन गाभा-यातली ट्यूब
लाईट लावली. नंतर आपल्या शबनम मधुन धुपाची पुडी काढली आणि बाहेर जाऊन मघाशी
पेटवलेल्या पाचोळ्याच्या ढिगातुन जे थोडे निखारे होते ते तिथल्याच एका खापरामध्ये
गोळा करुन घेतले. ते निखारे घेऊन तो
देवळात परत आला आणि त्या धगधगत्या निखाऱ्यांवर हातातल्या पुडीतला धुप
घातला. धुप घातल्याबरोबर तो गाभारा त्या धुपाच्या सुगंधित धुराने भरुन गेला. मग
त्याने गाभाऱ्यातल्या कोनाड्यामध्ये असणा-या दगडी समईमधिल वात सरशी केली आणि तिची
काजळी झटकली. त्यामुळे ती समईची ज्योत चांगला प्रकाश द्यायला लागली.
अशाप्रकारे देवळातली दिवा बत्ती होताच त्याने मारुतिच्या मूर्ती समोरच
बैठक मारली आणि तोंडाने आपल्या खणखणित आणि स्वच्छ सुरात मारुति स्तोत्र म्हणायला
सुरवात केली.
भिमरुपी
महारुद्रा, वज्र हनुमान मारुती
वनारी
अंजनीसुता रामदूता प्रभंजना............
भिमरुपी
म्हणून झाल्यावर त्याने रामरक्षा स्तोत्र असेच खणखणित आणि स्पष्ट शब्दात म्हणायला
सुरवात केली. लांबुन ऐकणारालाही त्यातला शब्द अन् शब्द अगदी स्पष्ट ऐकायला येत
होता.
देवासमोर
पद्मासन घालुन बसलेल्या त्या गृहस्थाचे धीर गंभीर आवाजातील ते पठण ऐकुन देवळाच्या
कोपऱ्यांत बसुन रमी खेळणारी चौकडी एकदम स्तब्ध झाली. त्यांच्या नकळत त्यांच्या
हातातले पत्ते गळुन पडले. झटका बसल्या प्रमाणे आपल्या तोंडातल्या विड्या त्यांनी मघाचच्या शेकोटीत फेकुन दिल्या आणि हात
जोडून त्या अनोळखी गृहस्थाचे पठण ऐकू लागले.
रामरक्षेचे
पठण संपताच त्याने रामदासांची करुणाष्टके म्हणायला सुरवात केली.
अनुदिनी
अनुतापे तापलो रामराया ।
परमदीनदयाळा
नीरसी मोहमाया ।।
अचपळ मन
माझे नावरे आवरीता ।
तुजवीण
सीण होSतो धावSSरे धावSS आताSS......
अतिशय
करुण आणि आर्त अशा कंपायमान होणा-या आवाजात म्हटल्या जाणाऱ्या त्या करुणाष्टकांचे
स्वर कानावर पडताच त्या चौघांना आपले सगळे अपराध आपल्याच भोवती फेर धरुन नाचतायत
असा भास व्हायला लागला. समर्थ रामदासस्वामींच्या या प्रासादिक रचना आणि त्या
म्हणणाऱ्याचा अतिशय करुणामय आवाज यामुळे ते चौघेही पाण्यातल्या ढेकळासारखे विरघळु
लागले.
इकडे
करुणामय आवाजात ते गृहस्थ म्हणत होते ..........
जळत
ह्रदय माझे जन्म कोट्यानुकोटी ।
मजवरी
करुणेचा राघवा पुर लोटी।।
शेवटी
त्यांनी देवा जवळ आपले मागणे सुरु केले ........
युक्ति नाsही बुद्धि नाsही । विद्या नाsही विवेकिता ।
नेणता भक्त मी तुझा
। बुद्धि देsss
रघुनायका ॥१॥
मन हे आवरेना
की । वासना वावडे सदा ।
कल्पना धावते सैरा ।
बुद्धि देsss
रघुनायका ॥२॥
अन्न नाही वस्त्र
नाही । सौख्य नाही जनांमध्ये ।
आश्रयो पाहतां नाही
। बुद्धि देsss
रघुनायका ॥३॥
अशाप्रकारे परमेश्वराकडे दीन होऊन मागणे मागुन शेवटी
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे ........... हे आठही श्लोक म्हणून त्यांनी बसल्या
जागेवरच क्षणभर ध्यान लावले.
त्या
गृहस्थांच्या या सर्व कृतींचे साक्षीदार असलेले ते चौघे एव्हाना पश्चाताप दग्ध अशा
अवस्थेत हात जोटुन त्यांच्या पाठीमागे गाभाऱ्यात येऊन ऊभे राहिले होते. त्या
गृहस्थांनी डोळे उघडताच त्या चौघांनीही त्याच्या पायावर आपले डोके टेकले आणि एकदम
म्हणाले, “बुवाss आम्हाला क्षमा करा!”
अरेssरे आपण कोण? आणि माझी क्षमा मागण्यासारखे तुम्ही काही केले आहे असे मला वाटत नाही.
कदाचित माझ्याच मोठ्या आवाजातिल पठणाने आपल्याला त्रास झाला असेल, त्याबद्दल आपण
लोकांनीच मला क्षमा केली पाहीजे.
बुवाss! असे बोलुन तुम्ही
आम्हाला आणखी लाजवु नका. चौघेही एका सुरात म्हणाले. आम्हीच पापी आहोत, देवाच्या
दारात बसुन चार चांगल्या गोष्टी करायच्या सोडून आम्ही जुगार खेळत, विड्या फुंकत
बसतो. त्याबद्दल देव देखिल आम्हाला क्षमा करणार नाही. एका दमात गणा एवढे बोलला.
त्यानंतर त्याला इतके गदगदुन आले की, त्याचे डोळे पाण्याने भरुन आले आणि चेहरा
सद्गदित झाला.
अरे! तुम्ही असे कां म्हणता!!
ईश्वर हा तर पतितांना पावन करणारा आहे. ज्याला ज्याला आपल्या वाईट वर्तनाबद्दल
पश्चाताप वाटतो आणि ज्याला आपल्या कडुन झालेल्या दुर्वर्तनाचे परिमार्जन आपल्या
वर्तणूकीने करायचे आहे, त्याला देव क्षमा तर करतोच परंतु त्याला त्याच्या चांगल्या
कार्यामध्ये मदत सुद्धा करतो.
बुवा! तुमच्या रुपाने देवच
आम्हाला आशिर्वाद देतोय, आश्वासन देतोय असे वाटते, जितू म्हणाला.
हे बघा
पहिली गोष्ट म्हणजे मी कोणी बुवा वगैरे नाही. किंबहूना बुवा आणि बुवाबाजीची मला अतिशय
चीड आहे. मी साधा माणूस आहे. निसर्गाच्या चमत्काराचा फार मोठा फटका बसल्याने मी
मनाने खचुन भरकटलेल्या अवस्थेत फिरत होतो. ईश्वराची कृपा म्हणून मी त्या अवस्थेत
सज्जनगडावर पोचलो. समर्थांच्या सहवासात राहिल्याने माझ्यावर झालेल्या जीवघेण्या
घावाची वेदना कमी झाली. माझे मन स्थिर झाले. माझ्या मनाला तेथे विश्रांती मिळाली.
परंतु तेथेही नुसते बसुन रहाणे मनाला पटले नाही. म्हणून काही काळ तेथे वास्तव्य
केल्यावर समर्थांची आज्ञा घेऊन सज्जनगड सोडला. पाठीमागे कोणताही पाश राहिला नाही
म्हणून सध्या निर्हेतुक गावोगाव फिरतो आहे.
आज सकाळी
या रस्त्याने जात होतो. गाव बरा वाटला म्हणून विचार केला चार दिवस या गावात काढु.
अर्थात तुमच्या गावातील लोकांनी परवानगी दिली तरच ते शक्य आहे.
असं का
म्हणता बुवा! अहो आम्ही गावातले लोक पैशाने गरीब असु पण मनाने श्रीमंत आहोत.
तुम्ही आमच्या घरी रहायला चला! असे म्हणून हेमंतने त्यांचे पाय धरले.
हे बघ,
काय तुझे नांव ?
त्या बुवांनी विचारले.
जी, माझे
नांव हेमंत आहे.
तर हे बघ
हेमंत, तुम्ही लोक परत परत बुवा म्हणू नका. खरोखरच मला त्या शब्दाची अतिशय चीड
आहे. या बुवाबाजीनेच आपल्या समाजाचे वाटोळे केले आहे. ही बुवाबाजीची किड जेव्हा
आपल्या देशांतुन जाईल तेव्हाच आपला देश, आपला समाज सुखी होईल. आणि सगळ्या
क्षेत्रांत अग्रेसर होईल. तेव्हा तुम्ही मला फारतर काका म्हणा.
बरं ठिक
आहे, आम्ही तुम्हाला काकाच म्हणू. तेव्हा आता अनमान न करता आमच्या घरी रहायला चला.
हे बघ
हेमंत! मी जेव्हा सज्जनगडावरुन
बाहेर पडलो तेव्हा समर्थांच्या पायाजवळ एक निश्चय केला आहे. आता यापुढे कोणाच्या
घरी रहायचे नाही, भिक्षा मागुन त्यावरच उदरनिर्वाह करायचा. आजच्या काळात हे विसंगत
आहे पण तरीही समर्थचरणाजवळ मी जो निश्चय केलाय तो कायम आहे. तेव्हा मी कोणाच्याही
घरी येणार नाही हे माझे वज्रवाक्य आहे.
अहो काका!
पण भिक्षा तर दिवसातुन एकदाच मागतात. मग दिवसभर तुमचे कसे होईल? दिवसातुन एकदा भिक्षा
मागुन मिळालेल्या अन्नावर पुरा दिवस काढायचा या नुसत्या कल्पनेनेच कासाविस
झालेल्या हेरंबने विचारले. आम्ही सकाळी चहा, नंतर नाश्ता, दुपारी नाश्ता, दोनवेळा
जेवण शिवाय दिवसातुन असंख्यवेळा चहा पितो तरीही आमची केव्हाही कुठेही खायची तयारी
असते.
अरे! नांव काय तुझे? तुमचे वय खाण्याचे आणि बलवान होण्याचे आहे. तेव्हा
तुम्हाला भूक लागणारचं. परंतु माझे तसे नाही. माझे आता अर्धे आयुष्य संपले आहे.
त्यातच गेली अनेक वर्षे अनेक प्रकारची संकटे सोसल्याने माझी जगण्याची इच्छाच नाहीशी
झालेली आहे. त्यामुळे देहधारणे पुरते अन्न मिळाले म्हणजे पुरते. तसाही माझ्या
वयाच्या माणसांना मिताहारच योग्य आहे.
काका! आता आम्ही आमची ओळखच करुन देतो. मी हेरंब, मी १२वी
पर्यंत शिक्षण झाल्यावर दापोलीच्या कोंकण कृषी विद्यापिठातुन डिग्री घेतली आहे.
माझ्या घरी माझे आई वडील, धाकटी बहिण, आणि मोठा भाऊ असतो. माझा भाऊ शेजारच्या
गावांत शिक्षक आहे. घरी पोटापुरती शेती आहे.
काका! मी गणा, माझे नांव गणेश
असे आहे. परंतु सर्वजण मला गणा असेच म्हणतात. मी पण १२वी झाल्यावर ती तिकडे लांब भंडा-याला जाऊन
माझ्या आवडीचा सोशल फॉरेस्ट्रीचा कोर्स केलाय. त्यात मी पण डिग्री केली आहे. परंतु
त्या कोर्सला बाजारात कोठे किंमत नाही म्हणून सध्या बेकार आहे. घरी आई वडिल आणि
धाकटा भाऊ असतो. मोठ्या बहिणीचे लग्न होऊन ती इथुन थोड्या अंतरावर असलेल्या गावात
असते. घरी थोडीफार शेती आहे. वडील पौराहित्य करतात. आमच्याकडे या गावची ग्रामदेवता
सोमजाई उपाध्येपण आहे.
काका! मी जितू
म्हणजेच जितेंद्र. मी बारावी पर्यंत शिकलो. नंतर घरीच असतो. गावात आमचे कपड्याचे
दुकान आहे. माझ्या घरी माझे आई वडिल, मोठा भाऊ असतात. माझे वडिल आणि भाऊ दुकान बघतात, त्यांचे आणि माझे पटत नाही
म्हणून ते मला दुकानात येऊन देत नाहित.
काका! मी
हेमंत मी देखिल १२वी नंतर बी. कॉम केले परंतु कुठे नोकरी मिळत नाही म्हणून बेकार
आहे. आमच्या घरांत मी मधलाच आहे. माझा मोठा भाऊ तलाठी आहे आणि लहान भाऊ ग्रामसेवक
आहे. बहिण लग्न होऊन सासरी गेली आहे.
अशाप्रकारे
आम्ही चौघेही शिक्षण असूनही बेकार आहोत. काही कमवत नसल्याने गावाच्या दृष्टीने
उडाणटप्पु आहोत. त्यामुळे आम्हाला घरांतही फारशी किंमत नाही. त्यामुळेच आम्ही
टाईमपास म्हणून दिवसभर गावापासुन लांब असलेल्या या मारुति मंदिरात रमी खेळत बसतो.
तुम्हाला पाहिले आणि आम्ही काहितरी चुकीचे वागत आहोत हे आमच्या लक्षांत आले.
आमच्या घरी आम्ही कधीही आलो गेलो तरी कोणी आम्हाला विचारत नाही. सगळ्यांनी आम्हाला
वाळीत टाकल्यासारखे केलेले आहे.
तुम्ही
सर्वांनी मला आपली ओळख करुन दिलीत, माझ्यासारख्या अनोळखी माणसाजवळ आपले मन मोकळे
केलेत, माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल खरोखरच धन्यवाद. तुम्ही प्रत्येकाने
मला आपापल्या घरी रहायला यायचे मनापासुन निमंत्रण दिलेत याचे मला खूप कौतुक वाटते.
तुमचे निमंत्रण मी स्विकारले आहे. मी जरी तुमच्या घरी रहायला आलो नाही तरी तुमच्या
घरी भिक्षेला नक्की येईन.
तुम्हाला
तुमच्या वाईट कृत्याबद्दल झालेला पश्चाताप या मारुतिरायाने ऐकला आहे. तो तुम्हाला
क्षमा करुन योग्य तो मार्ग निश्चितच दाखविल. आता इथुन पुढे तुम्ही घरच्या
लोकांबद्दल कटुता न बाळगता त्यांना जास्तित जास्त मदत करण्याचे धोरण ठेवा.
त्याचप्रमाणे जास्तित जास्त सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करा. तो राम तुम्हाला
सहाय्य करेल. समर्थांनी म्हटलेच आहे, “केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे!”
बरे आता
बोलता बोलता खूप वेळ गेला आहे. रात्र होऊ लागली आहे, तेव्हा तुम्ही आपापल्या घरी
जा पाहू.
पण काका
तुम्ही आता रात्री खाणार काय? भिक्षा तर सकाळीच संपली असेल! हेरंब म्हणाला.
नाही, माझा
काही खाण्या पिण्याचा प्रश्नच नाही, मी दिवसातुन एकदाच खातो. त्यामुळे त्याची
तुम्हाला चिंता नको.
मग काका
मी घरनं ग्लासभर दूध आणतो, ते तरी घ्या. आणि आम्ही चौघेही रात्री झोपायला इथेच
येतो, येताना तुम्हाला अंथरुण पांघरुण आणतो.
ठिक आह!, दूध वगैरे काही आणू नको,
मी ते घेणार नाही. तुम्ही झोपायला येत असलात तर या. मंदिर तुमचेच आहे. अंथरुण
पांघरुण वगैरे काही नको. एखादी जुनी घोंगडी आणली तरी चालेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा