३
महाराजांनी हंबीरराव आणि राधाकाकू यांच्या समोर आपली हकीगत सांगायला
सुरवात केली. हकीगत सांगता सांगता ते पार आपल्या जुन्या काळांत गेले.
सरपंच! माझे नांव मंगेश सोमनाथ आंबेकर असे आहे. माझे गांव
रायगड किल्याच्या जवळच असलेल्या दासगांव या जुन्या प्रसिद्ध बंदराच्या जवळच होता.
सध्याच्या मुंबई गोवा हायवेवर दासगांव हे बंदर असलेले गांव आहे. जुन्या काळात
मालाची वाहतूक रस्त्याने न होता जलमार्गाने व्हायची. कारण तेव्हा रस्ते फारसे नव्हतेच.
दासगांवच्या बंदरात उतरलेला माल घाटावर पाठविला जायचा. दासगांव ही जुन्या काळची
मोठी बाजारपेठ होती. सगळी सरकारी कार्यालये, हॉस्पीटल, शाळा, हायस्कूल या प्रमुख
गोष्टी दासगांवमध्ये उपलब्ध आहेत. एक सुसज्ज सरकारी गेस्टहाऊस देखिल तेथे आहे.
अशा या दासगांव बंदराच्या खाडीच्या पलीकडील
बाजुला डोंगर दऱ्यांच्या मधोमध आमचे “जाई” नावाचे गांव होते. दासगांव
पासुन साधारण पांच किलोमिटर अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या जवळपास पाचशे
इतकी होती. गावात एकुण ७०-७५ घरे होती. गावात सर्व समाजाची घरे होती. गावाचा मुख्य
व्यवसाय शेती होता. तरीही गावात अनेक कसबी कारागीर होते. पूर्वापार गलबते म्हणजे
मालवाहतूकीच्या होड्या बांधण्याचे काम करणारे बरेच जण होते. त्यांच्याच पुढच्या
पिढीतिल मुलांनी फर्निचर तयार करण्याचे
कसबही आपलेसे केलेले होते.
अशाच एका कसबी सुतारकाम करणा-या घरात माझा
जन्म झाला. वास्तवीक आम्ही त्या गावची पुरोहीत आहोत. परंतु याज्ञीकीच्या जोडीला
आमच्या घरामध्ये कसबी सुतारकामाचीही परंपरा होती. बालपणापासुन आम्ही जसे वेदमंत्र
शिकलो तसेच सुतारकामही शिकलो. आमच्या गावांत पूर्वप्राथमिक शाळा होती. त्या शाळेंत
मी इयत्ता चौथी पर्यंत शिकलो. नंतर दासगांवला हायस्कूलमध्ये जाऊन मॅट्रीक पर्यंतचे
शिक्षण घेतले. हायस्कूलला बऱ्याच वेळा चालतच जायला लागायचे. आमच्या गावापासुन पांच
किलोमिटर पर्यंतचे अंतर चालत, नंतर छोट्या होडीतुन रोज मी दासगावला हायस्कूल करता
जात असे. वर्गामध्ये मी सतत पहिल्या पाचात असायचो. हायस्कूलमधिल शिक्षण पूर्ण
झाल्यावर पुढील शिक्षण घ्यायचे तर महाडला किंवा मुंबईला जायला पाहिजे होते. आमच्या
घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी होती. खलाटीत शेत होते आणि गावांत घर हीच आमची
इस्टेट. त्यातुन काबाड कष्ट करुन वर्षभर पुरेल इतके भात व्हायचे. भाताचे पिक
काढल्यानंतर त्याच शेतात उत्तम वाल व्हायचा. थोडेफार
याक्षीकीचे उत्पन्न होते. जोडीला वडील आणि भाऊ सुतारकामही करीत. परंतु हातात रोख रक्कम फारशी नसायची.
त्यामुळे मला कुठे शिक्षणाला पाठवायचे तर कॉलेजची फी, रहाण्याचा जेवण्याचा खर्च
याकरिता लागणारी रोकड आमच्याकडे नव्हती.
परंतु हायस्कूलमधिल आमचे मुख्याध्यापक
कुलकर्णी सरांनी मनावर घेतल्याने हा प्रश्न सुटला होता. त्यांच घर महाड मध्ये
होते. तिथे त्यांचे आई वडिल आणि भाऊ रहात होते. त्या त्यांच्या घरी त्यांनी माझी
रहाण्याची खाण्यापिण्याची सोय केली होती. त्यांनीच विशेष प्रयत्न करुन मला फी माफी
मिळवुन दिली होती. माझ्या घरच्या लोकांनी कुलकर्णी सरांच्या घराला वर्षभर पुरेल
इतके धान्य मला त्यांच्याकडे सोडायला जाताना पोचवले होते. तरीही एका अनोळखी आणि
वेगळ्या संस्कारात वाढलेल्या परक्या मुलाला आपल्या घरात रहायला आणणे ही मोठीच
जबाबदारी कुलकर्णीसरांनी घेतली होती. त्यांना माझ्याबद्दल एक विश्वास होता की, मी
त्यांचे नांव खराब तर करणार नाहीच पण जोमाने अभ्यास करुन
त्यांनी दिलेल्या संधीचे मी सोने करुन दाखवीन.
कुलकर्णी सरांनी दिलेल्या संधीचा मी पुरेपुर
उपयोग करुन घेतला. त्यांच्या घरातच राहिल्यामुळे माझ्या नकळत अनेक प्रकारची
स्तोत्रे मी शिकलो. कुलकर्णी सरांच्या घरी त्यांचे वडील आणि भाऊ समर्थ रामदासांचे
भक्त होते त्यांच्यामुळेच समर्थ साहित्याचाही परिचय झाला. महाडच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर महाविद्यालयांत मी दरवर्षी मेरीट मध्ये येत असे. शेवटच्या म्हणजे बी.
कॉम्. च्या अंतीम परिक्षेत मी इकॉनॉमीक्स या विषयामध्ये सुवर्णपदक मिळवुन कुलकर्णी
सरांनी दाखवलेल्या विश्वासाला सत्यात उतरवले. माझ्या घरच्या लोकांनीही मला शिक्षण
घेता यावे म्हणून खूप कष्ट घेतले होते. आतापर्यंत माझ्या मोठ्या भावंडांचे विवाह
झाले होते. त्यांना मुले बाळे झाली होती.
शिक्षण पूर्ण होताच मला स्टेट बँक ऑफ इंडीया
मध्ये अकाउंटंट म्हणून नोकरी लागली. त्यानंतर माझेही एका अनुरुप मुली बरोबर लग्न
झाले. आम्हालाही एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये झाली. आमचा आणि आमच्या घरातिल
माझ्या भावंडांचे संसार मार्गी लागले. नंतर आम्ही आमचे रहाते घर लहान होते म्हणून जाई गावाच्या एका बाजुला डोंगराच्या
पायथ्याजवळ असलेल्या आमच्या मालकीच्या माळरानावर एक सुंदर दोन मजली घरही बांधले.
असे आमचे सगळे छान चालले होते. काही वर्षांनी माझी रत्नागिरी जिल्ह्यातिल खेड येथे
ब्रँच मॅनेजर म्हणून माझी बदली झाली. मग मी तेथे माझ्या पत्नी मुलांसह रहायला
गेलो.
दरम्यान माझ्या वडिलांच्या वयाची पंचाहत्तर
वर्षे दिनांक
२८ जुलै २००५ ला पूर्ण
होणार होती. त्यानिमित्ताने आम्ही आमच्या गावाला साई येथे एक कार्यक्रम आयोजित
केला होता. त्याची तयारी करायला म्हणून माझी पत्नी मुलांसह जाई येथे दिनांक २४
जुलैला गेली होती. म्हणजे मीच तिला व मुलांना सोडायला आमची कार घेऊन गेलो होतो. २५
तारखेला सोमवार होता मला बँकेत जाणे भाग होते त्यामुळे मी त्यांना घरी सोडुन २४
तारखेला संध्याकाळीच परत खेडला आलो होतो.
*************
त्यानंतर
तो काळा सोमवारचा दिवस उगवला होता. “२५ जुलै २००५” या दिवसाने माझे सारे विश्वच अस्ताव्यस्त करुन टाकले. महाड तालुक्याच्या
त्या परिसरांत अहोरात्र धुंवाधार पाउस कोसळत होता. जणू ढगफुटीच झाली होती. तालुक्यातल्या
सर्व नद्या दुथडी भरुन वहात होत्या. रायगड जिल्ह्यातिल महाड, दासगांव, गोरेगांव,
नागोठणे, रोहा, पाली सर्व गावे पाण्याखाली गेली होती.
आमचा
गावाची समुद्रसपाटी पासुनची उंची भरपुर होती. त्यामुळे सगळीकडच्या पुराच्या
बातम्या ऐकल्यातरी मी निश्चिंत होतो. कारण आमच्या गावाला पुर येणे शक्यच नव्हते.
सगळ्याच गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला होता. तरीही दासगावच्या खाडीपलीकडुन
रहदारी सुरु होती. म्हसळा तालुक्यातल्या आंबेत गावाहून महाडकडे जाणारी एस्. टी. बस
आमच्या गावाच्या खालुन जाणा-या रस्त्याने जात असे आणि तो रस्ता एवढा पाऊस होऊनही
चालूच होता. त्या रस्त्यावरुन जाणा-या वाहनातुन आमच्या गावातिल घरे स्पष्ट दिसत
असत. त्या दिवशी नेहमी प्रमाणे ती बस आमच्या गावाखालिल रस्त्याने गेली. त्या
बसमधुन महाडला जाणारा एकही प्रवासी आज त्या रस्त्यावर नव्हता याचे ड्रायव्हरला
आश्चर्य वाटले. पण पावसामुळे आज कोणी घराबाहेर पडले नसेल असे समजुन तो पुढे
निघाला. परंतु जाता जाता त्याच्या लक्षांत आले, रोज दिसणारी या गावातली घरेही आज
दिसत नाहित. तेव्हा काहीतरी गडबड आहे हे त्याला जाणवले. म्हणून त्याने लगेचच
येणा-या गावात गाडी थांबवली आणि त्या गावातल्या पोलीस पाटलांना आपली शंका
सांगितली.
त्यावर
त्या पोलीस पाटलांनी ड्रायव्हरला सांगितले, “तुम्ही आता महाड पर्यंत जातच आहात तर तिथल्या
पोलीसांनाही कृपया ही खबर द्या!” तोवर मी आमच्या गावातिल
लोकांना घेऊन काय प्रकार आहे तो बघतो.
त्यानंतर
तो ड्रायव्हर महाडला गेला त्याने तेथिल पोलिस स्टेशनला आपली शंका बोलुन दाखवली.
दरम्यान आमच्या गावाच्या शेजारील गावातिल पोलिस पाटलांनी गावातिल चार पांच जणांना
बरोबर घेतले आणि तेही काय प्रकार आहे तो बघायला आमच्या गावाकड निघाले. ते पांच
सहाजण जागेवर जाऊन बघतात तो त्यांना धक्काच बसला अहो आमचे गाव ज्या ठिकाणी होते
तिथे मातीचा प्रचंड डोंगर तयार झाला होता. गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेला गुरांचा
गोठा तेवढा त्या मातीच्या ढीगाच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला दिसत होता.
आलेली
लोक त्या मातीच्या ढीगा-याला वळसा घालुन लांब जवळपास दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या त्या गोठ्यात
पोचले. तिथे पांच सहा गायी आणि दोन बैल एवढी जनावरे बांधलेली होती. गोठ्याच्या एका
कोप-यांत एक वृद्ध गृहस्थ बेशुद्ध अवस्थेत झोपलेला आढळला. त्याला हलवुन जागे
केल्यावर त्याला काहीच सांगता येईना. आलेल्या लोकांनी त्याला प्रथम तेथील माठातुन
पाणी प्यायला दिले.
त्यानंतर
तो भानावर आला व त्याने सांगितले रात्रभर विजा चमकत होत्या. वीजांचे मोठ्ठे आवाज
होत होते. प्रचंड पाऊस पडत होता. रात्री कधीतरी मोठ्ठा स्पोट झाल्या सारखा आवाज
आला. तो आवाज कसला म्हणून मी बघायला गेलो तर समोर गावातले दिवे दिसेनात की काहीच
दिसेना. सगळीकडे मातिच माती दिसत होती. हे सगळे बघितल्यावर मला घेरी यायला लागली
आणि मग मी या कोप-यांत आडवा झालो. तो आता तुम्ही उठवलेत तेव्हाच जागा झालो. कोण
तुम्ही माणसे? आणि
इथे कसे काय आलात? माझ्या अंगातले अवसान एकदम निघुन गेल्या
सारखे झाले आहे. तेव्हा आता आलाच आहात तर जरा मला माझ्या घरापर्यंत सोडा. इथे समोर
दिसते ते साई माझे गांव आहे.
यथावकाश
सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली. मातीचा ढिगारा बनलेल्या गावाला शोधण्याचा
प्रयत्न केला गेला. त्यातुन चारशे साडे चारशे माणसांचे मृत देह बाहेर काढले.
जवळपास तेवढ्याच गुराढोरांची देखिल मृत शरिरे बाहेर काढली होती. आमच्या गावातले
त्या गुरांच्या गोठ्यात झोपायला गेलेले आमचे चुलते, मी आणि मुंबई येथे नोकरी
धंद्या निमित्त गेलेल्या १०-१२ जणांव्यतीरिक्त कोणीही शिल्लक राहिले नाही.
माझ्यावर
तर आकाशच कोसळले होते. आमच्या घरातले माझी पत्नी, दोन मुले, माझे आई-वडील, दोन
भाऊ, त्यांच्या बायका, दोघांचीही दोन दोन मुले अशी आमच्याच घरातली एकुण तेरा माणसे
त्या काळ्या रात्रीने आपल्या पोटात घेतली होती. या आघाताने मी पूर्ण खचुन गेलो
होतो. मी काय करतोय याचे मला भान नव्हते. या घटनेचे वृत्त समजताच प्रथम कुलकर्णी
सरांच्या घरातले सर्वजण धावुन आले होते. त्यांना मी घरातला असल्यासारखाचा होतो.
त्यानंतर
काही काळ मी त्यांच्याच कडे राहिलो होतो. परंतु माझे चित्त कशातच लागत नव्हते.
गावातल्या जवळपास २५-३० लोकांचे उत्तरकार्य माझ्या या हाताने मी एकाचवेळी केले
होते. उत्तर कार्य आटोपताच मी खेडला गेलो. परंतु तेथेही मी सावरु शकलो नाही. बँकेतिल
सहका-याच्या मदतीने जरासा सावरल्यावर मी माझ्या नोकरीचा राजिनामा दिला. बँकेचा
चार्ज दिल्यावर मी निरुद्देश भटकत होतो. अनेक तिर्थक्षेत्रांना भेटी दिल्या तरीही
माझे मन स्थिर होईना. अखेरीस मी सज्जनगडावर गेलो तिथे गेल्यावर मात्र माझे मन
स्थिर झाले. हे जग नश्वर आहे याची खात्री पटली.
त्यानंतर
मात्र मला सज्जनगडावरील माझ्या ऐतखाऊपणाचा कंटाळा आला. वाटू लागले हा देह नश्वर
आहे तर त्याचे चोचले पुरवण्यांत काय अर्थ आहे? त्यामुळे या नश्वर देहाचा समाजाकरिता जास्तीत जास्त
उपयोग करायचा. त्याचे लाड करायचे नाहित. त्याच उद्देशाने सध्या मी भटकत आहे.
गेली तिन
चार वर्षे मी सज्जनगडावर होतो. तिथे मला समर्थांचा सहवास लाभला. रामदासी संप्रदाय
जवळुन पहाता आला. त्यामुळे आता उरलेले आयुष्य संसाराच्या व्यापात न पडता भिक्षा
मागुन देह जगवायचा. कोणाच्याही घरी रहायचे नाही असे समर्थांच्या चरणी वचन देऊन मी
सज्जनगड सोडला आहे. पुढचा मार्ग आता समर्थच दाखवतिल. एवढे लांबलचक संभाषण करुन
महाराज थांबले.
त्यांच्याकडे
पाण्याचा पेला देत सरपंच म्हणाले, महाराज आपण बराच वेळ बोलत आहात आधी पाणी प्या.
आपल्याला जेवढे दिवस या गावात रहायचे आहे तेवढे आपण निश्चिंत मनाने रहा. आपल्याला
जर योग्य वाटले तर आपण कायम येथे राहिलेत तर आम्हाला आनंदच होईल. आपण जे काही
कार्य करायचे ठरवाल त्यात सरपंच म्हणून आणि समर्थांचा एक भक्त म्हणून माझे पूर्ण
सहकार्य आपल्याला मिळेल याची खात्री बाळगा.
महाराज! पण आपण रहाणार कुठे? नाहीतर असे करा, आमच्याकडेच रहा! राधाकाकू मनापासून बोलल्या.
बरोबर
महाराज खरचं येथे रहा! वाटलं तरं भिक्षा मागुन आणा आणि येथे जेवा, नाहीतर आमच्या
बरोबर जेवा! हंबीरराव बोलले.
नाही
जेवायला अथवा रहायला आता कोणाकडेच जायचे नाही! हा माझा निश्चय कायम आहे. या गावात आल्यावर माझी झोळी
कम् शबनम मी मारुतिच्या देवळात लावली आहे. तेच ठिकाण माझ्या सारख्या रामदासांच्या
अनुयायाला योग्य आहे. पोटापाण्याचा प्रश्नतर समर्थांनीच सोडविला आहे. भीक्षा मागणे
हा तर समर्थ संप्रदायाचा आत्माच आहे.
महाराज! आपल्याला भिक्षा मागायला
लावणे आम्हाला कसेसेच वाटते. समर्थांचा काळ वेगळा होता. आताच्या काळात भिक्षा
मागायला गेल्यावर टर उडवणारेच जास्त आहेत. त्यात कदाचीत आपल्याला अपमानही सहन
करायला लागेल. सरपंचांनी आपले मत मांडले.
अहो
हंबीरराव, काळ बदलला हे बरोबरच आहे. पण माणसांचे स्वभावधर्म तसेच राहीलेत नां !
समर्थांनी म्हटलेच आहे.
भिक्षाहारी
निराहारी| भिक्षा नैव प्रतिग्रहः |
असंतो
वापि संतो वा| सोमपानं
दिने दिने ||
भिक्षा
म्हणिजे कामधेनु| सदा फळ नव्हे सामान्यु |
भिक्षेस
करी जो अमान्यु| तो
करंटा जोगी ||
तेव्हा पोटापाण्याटची चिंता करण्याचे कारण
नाही. मगाशी मी माझ्या पूर्वायुष्याबद्दल जे काही सांगितले ते कृपया आपल्या
तिघांतच ठेवावे ही विंनती आहे. कारण मला आता ते ओझे वाहण्याची इच्छा नाही. महाराज
म्हणाले.
त्याबद्दल आपण निश्चिंत रहा. आपण सांगितल्या
शिवाय याबद्दल आम्ही कोणाजवळ शब्दही काढणार नाही. हंबीररावानी खात्री दिली. त्याबद्दल
खात्री होतीच, तरीही धन्यवाद. येतो मी. जय जय रघुवीर समर्थ!
*********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा