बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

हिमालयाच्या सहवासात भाग १

१) माताने बुलाया है।

Image result for himalaya

माझा काश्मिर सहली मधिल सहभाग हा तसा अचानकच झाला. वास्तविक ही सहल पूर्व नियोजित होती. मी त्यात सहभागी होणार नाही हे माझ्या बाजुने अगदी पक्के होते. याचे मुख्य कारण आर्थिक तर होतेच, त्याच्याही पेक्षा  मला माझ्या शारिरीक क्षमतेची खात्री वाटत नव्हती. या सहलीची सुरवातच माता वैष्णोदेवी पासुन होणार होती. माता वैष्णोदेवीला जाण्याकरीता १२ किलोमिटर चढण चढल्या शिवाय पर्याय नाही हे मला पक्के माहित होते. गेले सुमारे २-३ वर्षे माझे गुडघे दुखत आहेत, त्यातच जामनगरच्या थंडीत माझ्या पायांना भेगा पडुन रक्त येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काश्मिरची थंडी आणि वैष्णोदेवीची चढण आपल्याला झेपायची नाही ही माझी ठाम समजुत होती. चालण्याला पर्याय पालखीतुन जाणे किंवा घोड्यावरुन जाणे. दुस-या माणसांच्या खांद्यावर जिवंतपणी बसुन देवदर्शन करणे हे मला पटत नाही. राहिला प्रश्न घोड्यावरुन जाण्याचा, हा प्रकारही फार त्रासदायक असतो असे मला समजले होते. आणखी दोन पर्याय होते हेलिकॉप्टर किंवा बॅटरी कारने जाणे परंतु या पर्यायात जाऊन येऊन कमीत कमी ७-८ किलोमिटर चढण चढावी किंवा उतरावी लागणार होतीच.
म्हणून एकट्या सौ. वर्षाचेच बुकिंग केले होते. त्यातच ह्या सहलीचे कोणतेही नियोजन नव्हते. म्हणजे फक्त रेल्वेचे बुकींग केलेले होते. मुक्कामा करीता अथवा पुढील प्रवासाकरीता बसचे बुकींग न करता आयत्यावेळी हॉटेल आणि प्रवासाकरीता वाहन ठरवायचे असे धोरण होते. जम्मु काश्मिर आणि पंजाबची सध्याची परीस्थिती पहाता मला ते रिस्की वाटत होते.
परंतु साधारण २०-२५ दिवस आधी आमच्या सहलीच्या टीम लिडर सौ. केतकी यांचा फोन आला की त्यांनी आणि त्यांचा मुलगा नचिकेत यांनी त्यांच्या फॅमिली फ्रेंड श्री राजेश यांच्या मदतीने सहलीचे पूर्ण नियोजन केले आहे. सहलीचे तपशिलासह नियोजन करणे अतिशय मेहनतीचे आणि चिकाटीचे काम आहे. परंतु या सहलीचा माझा अनुभव असे सांगतो की, या तिघांनी या नियोजना करीता खूपच मेहेनत घेतली होती. कारण प्रत्येक ठिकाणाच्या हवामानाचा, भौगोलीक परिस्थितीचा, प्रत्येक ठिकाणा मधिल अंतराचा, प्रवासाला लागणा-या वेळाचा तपशिलवार अभ्यास करुन त्यांनी प्रवासाचे वेळापत्रक तयार केले होते. आणि काश्मिरच्या लहरी हवामानामुळे करावा लागणारा थोडाफार फरक वगळता आमची सहल नियोजीत कार्यक्रमानुमार पार पडली.
आता प्रश्न निर्माण होतो की माझा ठाम नकार होकारामध्ये कसा परिवर्तित झाला? याचे उत्तर माझ्या मते त्या वैष्णोदेवी मातेनेच मला तिच्या दर्शनाला बोलावुन घेतले असावे. कारण सौ वर्षाला बडोद्याला सोडण्याकरीता जामनगर ते बडोदा रेल्वेचे बुकींग करण्याकरिता रेल्वेची वेबसाईट उघडली आणि ध्यानी मनी नसताना बडोदा ते वैष्णोदेवी असे आमच्या दोघांचे बुकिंगच करुन टाकले. ते तिकिट वेटिंग मध्ये होते त्यामुळे नंतर सौ वर्षाचे तिकीट रद्द करुन टाकले.
तिकिट कन्फर्म झाले तर जायचे असे ठरवल्यानंतर जवळपास २० दिवसांच्या प्रवासाच्या दृष्टीने तयारी करणे जरुरी होते. सौ वर्षाची तयारी गेले जवळपास ४-५ महिने चालु होती. परंतु माझी काहीच तयारी नव्हती. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासुन तयारी करावी लागते तशी माझी परिस्थिती होती. कारण आमचे असे ठरले होते की, प्रवासात कपडे धुणे शक्य होणार नाही त्यामुळे २० दिवस पुरतील इतका कपड्यांचा स्टॉक घेणे आवश्यक होते. आम्ही जेव्हा सोमनाथला गेलो होतो तेव्हा सोमनाथ देवस्थानच्या भक्तनिवास मध्ये कपडे धुण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे हाच नियम सगळीकडे असणार हे उघडच होते.
जायचे की नाही जायचे या द्विधा मनस्थितीत असतानाच जाण्याच्या द्ष्टीने खरेदीला सुरवात झाली. सर्वप्रथम बर्फात आणि थंड वातावरणात वावरण्याच्या दृष्टीने बुटांची खरेदी झाली, कपड्यांचे जास्तिचे सेट घेऊन झाले. मोबाईल करीता पॉवर बँकची ऑनलाईन खरेदी केली. दरम्यान जामनगर ते बडोदा दोघांची रेल्वे तिकीटे काढुन झाली. ही तिकीटे मात्र कन्फर्म मिळाली.  नंतर रोज दिवसातुन कमीतकमी  दोनदा तरी वैष्णोदेवीच्या तिकीटांची ताजी पोझिशन चेक करणे सुरु झाले. बुकिंग करताना वेटींगचा २८ नंबर होता. शेवटच्या दिवशी तो १८ वर आला. त्यामुळे मग अखेरचा उपाय म्हणून तात्काळ मधे बुकींग करायचे ठरले. त्याकरिता केदारने ड्युटी बदलुन घेतली.
दिनांक १३ मार्चची सकाळ उजाडली, उद्या दिनांक १४ मार्च ला सोमवारी दुपारी एक वाजता स्वराज एक्सप्रेसबडोद्याला येणार होती. त्या गाडीची वेळ साधण्याकरीता आम्हाला जामनगरहुन दिनांक १३ मार्चला रात्री १२ वाजता ट्रेन पकडायची होती. आज ११ वाजता तात्काळचे बुकींग करायचे होते. त्या करिता केदार आणि मी १०.३० पासुन अगदी तयारीत बसलो होतो. हाताशी सर्व माहिती तयार होती फक्त कॉपी पेस्ट करायचे होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, बँकेचा व्यवहार पूर्ण होईर्यंत ४० सेकंदात सर्व सिट बुक झाल्या. खात्यातुन पैसे वजा होऊन देखिल तिकीट मिळाले नाही. त्यामुळे परत प्रश्न उत्पन्न झाला आता काय करायचे. (या विषयात हल्लीच मला एक माहिती मिळाली ती म्हणजे तात्काळ बुकींग करण्याकरीता ‘Tatkal now” नावाचे एक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. त्यामध्ये बुकींगचा पूर्ण फॉर्म आधिच भरुन आयत्यावेळी काही सेकंदात बुकिंगची प्रोसिजर पूर्ण होते.)
शेवटी त्या वैष्णोदेवीने बुद्धी दिली की, काही नाही तू तुझे सामान घेऊन बडोद्याला चल. तिच्या इच्छेप्रमाणे आम्ही दोघांनी जामनगर सोडले. दरम्यान बडोद्याच्या प्रवासात देखिल तिकीट कन्फर्म झाले का ते चेक करत होतो परंतु वेटींग लिस्टचा नंबर १६ वर आला होता, पण तिकीट कन्फर्म होत नव्हते अगदी RAC गेले असते तरी गाडीत चढता आले असते. बडोद्याला उतरल्यावर १० वाजले तरी तिकीट कन्फर्म झाल्याचा किंवा रद्द झाल्याचा मेसेज येईना. शेवटी १०.१० ला जेव्हा पोझिशन चेक केली तेव्हा समजले की तिकीट कन्फर्म झाले आहे. मी माता वैष्णोदेवीच्या अधिकृत वेबसाईटवर वाचले होते की, लोकांची अशी ठाम श्रद्धा आहे की, तुमच्या मनात काहीही असो, मातेची इच्छा असेल तर तिचा भक्त तिच्यापर्यंत पोचतोच. (Hindus believe that one cannot possibly have Darshan of Mata, unless she herself calls the devotees.) अखेर मातेचा बुलावा आला म्हणूनच हो नाही करता करता दुपारी एक वाजता स्वराज एक्सप्रेस मध्ये दाखल झालो.
।। जय मातादी! जय मातादी! जय मातादी! ।।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा