बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग १६

१६
          गेले ३०-४० दिवस देवीचा डोंगर गजबजलेला होता. रोज खणाखणी चालू होती. माणसांबरोबरच यंत्राचा वावर देखिल येथे वाढला होता. देवीच्या डोंगराच्या २०१ एकरचे क्षेत्रापैकी मंदिराचा चार पाच एकराचा सपाट भाग वगळता बाकी सगळा भाग उंच सखल होता. पारंपारीक पद्धतीने जमिनीतील पाणी हातात नारळ घेऊन पाण्याचा उगम शोधणा-या पाणक्याने नेमकी पाणी असणारी जागा शोधुन काढली होती. त्याशिवाय आधुनिक तंत्राच्या मदतिनेही त्याच ठिकाणी जमिनीत पाणी असल्याची खात्रीही करुन घेतली होती.
     त्या पाणी लागण्याची खात्री असलेल्या त्या जागेवर तिन एकर एवढ्या विस्तिर्ण क्षेत्रामध्ये पाझर तलाव खोदण्यास सुरवात केली होती. या पाझर तलावाकरीता सुवातीला देवीच्या भक्तांच्या श्रमदानाने जवळपास सात फुटापर्यंत असलेला मातीचा थर कुदळ फावड्यांच्या सहाय्यान खणून काढला होता. त्यातुन निघालेली माती आणि दगड गोटे यांच्या सहाय्याने त्या उंच सखल जागेचे १०-१० एकराचे सलग सपाट प्लॉट तयार करण्यात येत होते. माणसांच्या जोडीला यंत्राची मदत देखिल घेतली गेली होती. उताराप्रमाणे निरनिराळ्या लेव्हलवर असे ५ एकरापासुन १५ एकरांपर्यंत मोठे मोठे प्लॉट तयार करुन घेण्यांत आले होते.
     मातीचा थर संपल्यानंतर सुरुंग लाऊन कातळ फोडण्यात आला. परवाच जवळपास पस्तीस फुटावर पाण्याचे सात मोठ्ठे जोरदार झरे तिथे लागले होते. त्या पाण्याचा जोर एवढा होता की त्या तिन एकर तलावाच्या दहा फुट उंची एवढे पाणी गेल्या दोन दिवसात साठले होते.
     आज जेष्टातली पोर्णिमा म्हणजेच वटपोर्णिमा. महिलावर्गाच्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस. आजच्या दिवशी पुराणकाळातल्या चतुर सावित्रीने यमाला आपल्या चातुर्याने फसवुन आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. एका अर्थाने हा निसर्गाशी जवळीक साधण्याचा दिवस. या निमित्ताने आपल्या मैत्रिणींसह नटुन थटुन मिरवण्याचाही दिवस. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कामाला लागण्याचा दिवस.
 आज वट पोर्णिमेच्या मुहूर्तावर पांच देवी भक्त दांपत्याद्वारे पाझर तलावातिल पाण्याचे जल पूजन करण्यांत येणार आहे. त्याच प्रमाणे त्या पवित्र जलाने सोमजाईला सोळा पुरोहितांद्वारे अभिषेक करण्यांत येणार आहे. त्या नंतर आजच देवीच्या १०१ भक्त दांपत्याच्या हस्ते प्रत्येकी पांच बालतरुंचे रोपणही करण्यांत येणार आहे.
देवी मंदिराच्या बाजुलाच श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानची नवीनच झालेली इमारत आज सजवण्यांत आली आहे. त्याचप्रमाणे सोमजाईचे मंदीरही झेंडूची फुले आणि आम्रपल्लव यांच्या माळांनी सजविण्यांत आले आहे. मंदिराच्या आणि संस्थानच्या इमारतीच्या मधल्या जागेत मोठ्या आकाराची सुरेख रांगोळी काढण्यांत आली आहे. त्या रांगोळीमधुन श्री सोमजाई वृक्ष मंदिराचे संकल्पचित्र रेखाटण्यात आले आहे.
गोविंदराव जोशी, हंबीरराव, शेळके गुरुजी, दिनकरराव, गोवेल्याचे सरपंच श्री नारायण शिंदे हे पांचजण आपापल्या पत्नींसह नुकतेच पाझर तलावाकडे गेलेले आहेत. त्यांच्या बरोबर सावंतवाडीहून खास बोलावलेले पांच पुरोहितही गेलेले आहेत. पाचही दांपत्यांनी बांबुच्या परडीत खण, नारळ, तांदूळ, हळद, कुंकू, फुले ठेवली नतंर त्या परडीची पुरोहितांनी सांगितल्या प्रमाणे विधिवत पूजा केली. पूजा झाल्यावर प्रत्येकाने ती परडी पाझर तलावातिल पाण्यांत सोडली आणि बरोबर आणलेल्या तांब्याच्या लखलखित घागरीने त्या तलावातिल पाणी काढले आणि ते पाणी घेऊन आई सोमजाईच्या मंदिरात गेले.
श्री सोमजाई मंदिराच्या सभामंडपात पांच फुलांच्या माळांनी सजवलेले पाच चौरंग ठेवलेले होते. या पांचही दांपत्यांनी पाझर तलावातुन भरुन आणलेल्या त्या चकचकीत घागरी सजवलेल्या चौरंगांवर ठेवल्या. प्रत्येक चौरंगासमोर दोन दोन पाट या दांपत्यांना बसण्याकरिता मांडले होते. ती पांचही दांपत्ये त्या पाटांवर स्थानापन्न होताच त्यांच्या हस्ते त्या पांचही कलशातिल गंगेचे पुरोहितांच्या मार्गदर्शनाप्रमाणे विधीवत पूजन केले गेले.
देवीचा गाभाराही आज विशेष सजविण्यांत आला होता. देवींच्या तिनही मूर्ती महाराजांनी पहाटेच स्वच्छ केलेल्या होत्या. आज पहाटे तीन वाजताच ते उठले होते. देनंदिन प्रात:स्मरण होताच त्यांनी देवीचा गाभारा आणि सभामंडप पुष्करीणितुन पाणी आणून धुवुन काढला होता. त्यानंतर त्यांनी देवींच्या मूर्तींची पूजा केली होती. आता तिनही मूर्तींच्या डोक्यावर अभिषेक पात्रे टांगण्यात आली होती.
पांचही दांपत्याच्या द्वारे देवीच्या भक्तांच्या कल्याणाकरिता जलाभिषेकाचा संकल्प केल्यावर पांचही घागरी गाभाऱ्यामध्ये नेण्यांत आल्या. सभामंडपामध्ये आठ आठच्या दोन रांगामध्ये सांवतवाडीहून खास बोलावण्यांत आलेले पुरोहित बसले होते. हेरंब आणि जितूकडे अभिषेकपात्रामध्ये पाणी ओतण्याची ड्युटी लावली होती. पुरोहितांनी सूचना देताच पूजन केलेल्या कलशांमधील गंगाजल अभिषेकपात्रांत ओतण्यांत आले.
सोळाही पुरोहित एकाच वेळी श्री सूक्ताचे पठण करित होते. ते त्यांचे पठणाचे स्वर संपूर्ण देवीच्या डोंगरावर लाऊडस्पीकरच्या माध्यमातुन ऐकू येत होते. त्यामुळे वातावरणांत एक वेगळेच पावित्र्य भरुन राहिले. श्रीसूक्ताची सोळा आवर्तने झाल्यावर सोळाही पुरोहितांनी एकाच सुरात श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यमाविधात् शोभमानं महियते । धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥हा आशिर्वाद मंत्र म्हटला.
अशाप्रकारे पाझर तलावाचे जलपूजन आणि त्या पाण्याने देवीला अभिषेक करण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतरचा कार्यक्रम अतिशय भव्य स्वरुपात करण्यांत येणार होता.
***********
सोमजाई मंदिराच्या भव्य प्रांगणात १०-१०च्या रांगामध्ये १०१ जोडपी बसली होती. हे सगळेजण आई सोमजाईचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी अक्षय तृतियेच्या दिवशी श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या कार्यामध्ये सक्रीय भाग घेण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पाप्रमाणे गेले महिना दिडमहिना ते आपली सेवा येथे देत होते. आज वटपोर्णिमेच्या पवित्र दिवशी बालतरुंच्या रोपणाचा मुहूर्त करण्याचे ठरविले होते. त्यानुसार ही एकशे एक दांपत्य आज प्रत्येकी वड, उंबर, बेल, पिंपळ आणि अशोक अशा सावली देणा-या आणि देवाच्या पूजेसाठी लागणा-या पांच वृक्षांच्या बालतरुंची विधिवत पूजा करुन त्यांचे आधीच तयार करुन ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये रोपण करणार आहेत.
या तयारीत बसलेल्या १०१ जोडप्यांच्या समोर वर सांगितलेल्या पांच प्रकारचे बालतरु ठेवलेले आहे. प्रत्येकाच्या डाव्या हाताला पूजेचे साहित्य ठेवलेले आहे. देवीच्या सभामंडपातही दोन रांगामध्ये सर्व विश्वस्थ मंडळी अशाच प्रकारे समोर पांच प्रकारचे बालतरु घेऊन त्यांच्या पूजेकरिता तयारीत बसलेले आहेत. या मंडळींच्या शेजारीच पांच पुरोहित समोर लाऊड स्पिकरचा माईक घेऊन पूजा सांगण्या साठी बसलेले आहेत.
त्या पांचही पुरोहितांनी एकाचवेळी सर्वांना पूजेचा संकल्प सांगण्यास सुरवात केली. पुरोहित सांगत होते त्याप्रमाणे प्रत्येक दांपत्य आपल्या समोरच्या बालतरुंची पंचामृती पूजा करित होते. पूजा संपन्न होताच प्रत्येकजण आपापल्या नेमलेल्या खड्यांमध्ये बालतरुंचे रोपण करण्यास गेले. प्रत्येक पुरुषाच्या एका हातात फावडे  आणि दुस-या हातात बालतरु ठेवलेली पिशवी होती. आपल्या पतीच्या मागोमाग चाललेल्या महिलांच्या डोक्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश होता.
देवीला जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा हे सर्व बालतरु रोपण करण्यासाठी आधीच खड्डे तयार करुन ठेवलेले होते. या शिवाय देवीच्या देवालयासमोरील मोकळ्या मैदानाभोवतीही हे बालतरु लावले जाणार होते. एकाच वेळी साडे पाचशे सावली देणा-या आणि देवपूजेमध्ये मानाचे स्थान असणा-या या वृक्षांचे रोपण करण्यांत येत होते. आता लावण्यात येत असलेल्या प्रत्येक झाडाची देखभाल आज ज्या दांपत्यांनी ती रोपण केली त्यांनी घेतली होती.
ते आपले दैनंदिन कामकाज सांभाळुन या झाडांची काळजी घेणार आहेत. आता पावसाळा सुरु झाला असल्याने या झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नव्हती. देवीच्या डोंगराला पूर्णपणे संरक्षक भिंत बांधण्यात आलेली असल्यामुळे ढोरे गुरे त्रास देतील हा देखिल प्रश्न शिल्लक राहीला नव्हता. फक्त वा-या वादळापासुन त्या बालअवस्थेत असलेल्या वृक्षांची काळजी त्यांना घ्यायची होती. पावसाळा संपल्यावर पाझर तलावातील पाणी डोंगरमाथ्यावर टाक्या बसवुन त्यात साठवण्यांत येणार होते. आणि तेच पाणी ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक झाडाला देण्याची योजनाही कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
देवीच्या डोंगराच्या सर्वात उंच असलेल्या पठारावर पवनचक्की उभारण्याचे काम जोरात सुरु होते. त्याच प्रमाणे देवीच्या मंदिराच्या जवळच सौरउर्जेसाठी पॅनेल बसवण्याचेही काम एकीकडे सुरु होते. या दोनही उर्जा स्त्रोतातुन देवीच्या मंदिरातिल आणि श्री सोमजाई वृक्ष मंदिर संस्थानच्या इमारतिमधील सर्व इलेक्ट्रीकल उपकरणे चालविण्यांत येणार होती. वृक्ष मंदिराच्या दररोज सेवेला येणा-या भक्तांना देण्यांत येणारा खिचडी प्रसाद बनविण्याकरिता तयार केलेल्या पाकगृहातिल शेगड्या देखिल या उर्जेवरच चालविण्यांत येणार आहेत. याशिवाय देवीच्या मंदिरात येण्या करिता असलेल्या रस्त्याच्या कडेला आणि मंदिर परिसरात देखिल या हायब्रीड उर्जेतुन पथदिप लावण्यांत येणार आहेत.
वृक्ष मंदिराच्या सेवेकरिता सध्या सरासरी १०० भक्त रोज हजेरी लावत आहेत. या भक्तांनी आतापर्यंत पाझर तलाव खणणे, संपुर्ण डोगराचे निरनिराळ्या लेव्हलवर निरनिराळ्या आकाराचे प्लॉट पाडणे ही कामे केली आहेत. या त्यांच्या सेवेबद्दल त्यांना मानधन म्हणून सरकारी रोजगार हमी योजनेमध्ये मिळणाऱ्या रोजमजुरीपेक्षा जास्त रक्कम देण्यांत येते आहे. आता उद्यापासुन आणखी दोन हजार बालतरुंचे रोपण करण्याच्या दृष्टीने नियोजन चालू आहे.
या सर्व चालू असलेल्या कामावर सरपंच हंबीरराव जातीने लक्ष देतात. त्यांनी हेमंतला या कामी मॅनेजर म्हणून काम पहाण्यास सांगितले आहे. त्याला मदतनिस म्हणून जितेंद्र काम करित आहे. हेरंब आणि गणेशला त्यांनी सर्व चालू असलेल्या कामांवर  देखरेख करण्यासाठी नियुक्त केले आहे. होत असलेल्या या कामांमध्ये शेतीशास्त्र आणि वनीकरण शास्त्र यांच्या दृष्टीने कामचा दर्जा राखणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यामुळे ते दोघे करायच्या कामाचा आराखडा तयार करित असत त्यावर दिनकररावांचे फॉरेस्टर स्नेही श्री मारुति माने आपल्या अनुभवी नजरेने मार्गदर्शन करित असत.
आतापर्यंत या सर्व चालू असलेल्या कामांचा खर्च दहा लाखांच्या घरात गेला होता. महाराजांनी सरपंचांकडे दोन वेळा आठ आठ लाखांचे चेक दिले होते. सरपंचांनी कबुल केल्याप्रमाणे त्यांनी आणि स्टेट बँकेतिल मॅनेजर आचार्य मॅडम यांनी महाराजांचे नाव गुप्त ठेवले होते. महाराजही त्यांचा दैनंदिन उपासनेचा आणि भिक्षेचा काळ वगळता दिवसातले जवळपास दहा तास वृक्ष मंदिराच्या कामात व्यतित करत होते.
*************


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा