शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

वृक्ष मंदिर भाग ५

     चैत्र महिना चालू झालेला असल्याने त्यामुळे हवेत उष्मा खूपच वाढलेला आहे. दोन दिवसापुर्वीच गुढी पाडवा झालेला होता. नदीतल्या पाण्याची पातळी आता कमी कमी होत चालली होती. गावातल्या डोंगराकडील बाजूच्या घरांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आता जाणवायला लागले होते. त्या भागात असलेल्या विहिरींचे पाणी आता  पूर्णपणे आटले होते. त्यामुळे तिकडची लोक पाण्यासाठी मारुति मंदिराच्या जवळ असलेल्या नदिच्या डोहामध्ये पाणी न्यायला येऊ लागले होते.
     आज शनिवार असल्याने पहाटे उठल्यावर महाराजांनी आपले प्रातर्विधी उरकताच काल ठरविल्याप्रमाणे, गणा आणि जितुला उठवले होते. नंतर त्या दोघांनी हेमंत आणि हेरंब यांना उठवले होते. त्यांनीही नदीवर जाऊन आपले प्रातर्विधी उरकले आणि येतानाच दोन दोन बादल्या भरुन पाणी घेऊन आले. तिथपर्यंत महाराजांनी मंदिराचे आवार साफ केले होते.
     त्यानंतर सर्वांनी मिळुन मारुति मंदिर पाण्याने धुऊन काढले. चौघाही मुलांनी आज महाराजांच्या बरोबर नदीवरच आंघोळ केली. त्यांच्याही घरी आता पाण्याची चणचण जाणवायला लागली होती. नेहमी प्रमाणे आंघोळ करुन येताना महाराजांनी पाण्याचा तांब्या भरुन आणला होता. मुलांनी रुईच्या झाडाची पाने आणि फुले मारुतिच्या पूजेसाठी आणली होती. त्या पानाफुलांच्या सहाय्याने महाराजांनी मारुतिची पूजा केली. त्यानंतर ते त्या महारुद्र हनुमानावर रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करायला मारुतिच्या पुढे बसले. त्यांनी आपल्या संथ परंतु स्पष्ट आवाजात सुरवात केली....
     हरी ॐ इडादेवहुर मनरयज्ञनीर.......
     त्यानी आपल्या खड्या आणि सुस्पष्ट आवाजात रुद्राचे पठण सुरु केले. चौघेही मुले मंदिराच्या सभामंडपात बसुन ते ऐकु लागले. महाराजांचा रुद्राभिषेक झाल्यावर त्यांनी पांच जणांनी मिळुन आरति केली. तिथपर्यंत नऊ वाजले होते. त्यानंतर मुले आपापल्या घरी गेली. महाराज आपले नित्याचे दासबोध वाचन करायला बसले. मंगलाचरण झाल्यावर महाजांनी आपल्या रोजच्या समासाचे वाचन सुरु केले.
     महाराजांचे एकासुरात वाचन सुरु होते. इतक्यात हंबीरराव आणि शेळके गुरुजींनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. ते दोघेही दर शनिवारी मारुतिच्या मंदिरात दर्शनाला येत असत. आवारात प्रवेश करताच शेळके गुरुजींना मोठे आश्चर्य वाटले. ते हंबीररावांना म्हणाले, सरपंच आपण आपल्या नेहमीच्या मारुति मंदिरातच आलो आहोत नां?
     का हो! अस कां म्हणता? सरपंच म्हणाले. मग त्यांचे आजुबाजुला लक्ष गेले आणि ते म्हणाले, अरे खरचं की! आधी माझ्या लक्षांतच आले नाही. आवार एकदम लख्खं झालेलं दिसत आहे!  
बोलत बोलत दोघे पुढे जात होते तो त्यांना मंदिरातुन दासबोध पठणाचा महाराजांच्या संथ परंतु सुस्पष्ट आवाज ऐकु यायला लागला. ते दोघेही आतमध्ये जाऊन महाराज वाचत असलेल्या ओव्या ऐकु लागले.
कित्येक राजे नांदती| कित्येक दरिद्र भोगिती |
कितीयेकांची उत्तम स्थिती| कित्येक अधमोद्धम |||| श्रीराम ||
वडिल समर्थ धाकुटा भिकारी| ऐका याची कैसी परी |
वडिला ऐसा व्याप न करी| म्हणोनियां ||१२|| श्रीराम ||
जैसी विद्या तैसी हांव| जैसा व्याप तैसें वैभव |
तोलासारिखा हावभाव| लोक करिती ||१३|| श्रीराम ||
विद्या नसे वैभव नसे| तेथें निर्मळ कैंचा असे |
करंटेपणें वोखटा दिसे| वोंगळ आणी विकारी ||१४|| श्रीराम ||
      महाराजांचे लक्ष वाचता वाचता सहजच समोर गेले तो त्यांना तेथे शेळके गुरुजी आणि सरपंच उभे असलेले दिसले म्हणून त्यांनी ग्रंथामध्ये खूण घालुन तो बाजुला ठेवला.
त्या दोघांना सामोरे जात ते म्हणाले, या! सरपंच साहेब, या! शेळके गुरुजी आपणही या! एवढ्या उन्हाचे कसे काय आलेत?
आम्ही दर शनिवारी मारुतिच्या देवळात येतो. बऱ्याचवेळा मी आणि सरपंच एकत्रच येतो. कारण आम्ही एकमेकांच्या शेजारीच रहातो. पण महाराज आपण कमालच केलीत. मागच्या वेळी एका शनिवारी आम्ही चर्चा करत होतो, आता हनुमान जयंती जवळ आली आहे तेव्हा सगळी साफसफाई करायला हवी. पण आज आम्ही बघतो तो काय, सगळीकडे चकचकाट दिसतो आहे. एवढेच नाही मंदिरही अगदी धुवुन लख्खं केलेले आहे. शेळके गुरुजी बोलले.
काय सांगु महाराज आमच दुर्दैव, आमच्याच गावातली उनाड मुले येथे पत्ते खेळत बसतात आणि विड्या ओढत या मंदिरात घाण करुन ठेवतात. मी किती सांगितले अगदी दम पण दिला तरी चार दिवस बंद होतात. पण परत आपले ये रे माझ्या मागल्या असं होतय. सरपंच म्हणाले.
त्या हेमंत, हेरंब, गणा आणि जितू यांच्या घरची लोक देखिल परवा माझ्या कडे तक्रार करित होती! शेळके गुरुजी म्हणाले.
पण महाराज आपल्याला मात्र खूप त्रास झालेला दिसतोय, आमच्या पोरांनी केलेली घाण निस्तरायला. खूप मेहनत पडली असेल. एवढी सर्व सफाई केलीत तरी कधी? सरपंच म्हणाले.
सरपंच, गुरुजी आपला खूप मोठा गैरसमज झाला आहे. देवळाची आणि आवाराची साफसफाई मी काही एकट्याने केली नाही. तुम्ही आता ज्यांना उनाड आणि बिघडलेली मुले म्हणालात नां, त्या चौघांच्या मदतीने मी हे आवार आणि मंदिर साफ केले आहे. पोरांनी मला जास्त काम करु दिलेच नाही. महाराज म्हणाले.
पण महाराज, ही किमया झाली कशी काय? अहो! गावात कोणाचेही न ऐकणारी, सतत उद्धटपणाने आम्ही आमच्या मनाला वाटेल ते करु अशी दुरुत्तरे करणारी मुले एकदम सुतासारखी सरळ आलीच कशी? नक्कीच तुमच्याकडे काहितरी जादुची कांडी असली पाहिजे. शेळके गुरुजी म्हणाले.
आपण समजता तशी ही मुले वाईट नक्कीच नाहित! आता ती उद्धटपणा वगैरे करित होती ती परिस्थितीने गांजल्यामुळे. चहू बाजुने त्यांची कोंडी झाल्याने ती बिथरली आहेत,  परंतु मनाने खूप चांगली आहेत. त्यांच्या या दुखण्याचे औषध आहे त्यांना योग्य मार्ग दाखवणे! चांगली शिकली सवरलेली मुले जेव्हा उपेक्षीत होतात तेव्हा हा असा जगावेगळा मार्ग धरतात. परवा त्या मुलांनी अक्षरश: माझे पाय धरले. आतापर्यंत केलेल्या दुर्वतनाबद्दल झालेल्या पश्चातापाने बिचारी धाय मोकलुन रडत होती. त्यांच्या त्या वर्तनानेच खरेतर माझा पाय या गावात अडकला आहे. त्यांना काही योग्य मार्ग दाखवता आला तर मला खूप आनंद होईल. महाराजांनी खुलासा केला.
बरोबर आहे आपण म्हणता ते! ती चौघेही चांगली शिकलेली आहेत. शाळेत असताना देखिल ते अभ्यासात सतत पुढे असायचे. पण शिक्षण संपल्यावर त्यांना योग्य काम मिळाले नाही, म्हणून त्यांना निराशेने घेरले आणि ती एकलकोंड्या सारखी वागायला लागली! शेळके गुरुजी म्हणाले.
खरं आहे आपले म्हणणं! पण आता याला उपाय काय? पोरांना लायनीला तर लावलच पाहिजे! काय करावे सुचत नाही! सरपंच म्हणाले.
सरपंच! अहो एवढे निराश होऊ नका! अहो इच्छा आहे तिथे मार्ग आहेच! हे निश्चित! सरकार निरनिराळ्या योजना तयार करते. निरनिराळे रोजगार उपलब्ध करुन देते. या योजनांचा फायदा मात्र गरजुंच्या ऐवजी भलतीच लोकं घेतात. हे चौघे आणि गावातली इतर मंडळी यांच्या हाताला योग्य काम मिळेल अशी एखादी सरकारी योजना असेलच. अर्थात कष्ट करायची तयारी हवी, आणि ती या चौघांची आहेच, महाराज म्हणाले.
बरे तुम्ही दोघे असे उभ्या उभ्या बोलण्यापेक्षा आधी दर्शन घेऊन या! मग आपण बोलुया.
खरंच की! आपण बोलतच राहिलो, दर्शन घ्यायचे राहूनच गेले! सरपंच म्हणाले.
आपण दर्शन घेऊन येई पर्यंत मी माझा राहिलेला समास वाचुन पुरा करतो. असे बोलुन महाराज राहिलेले वाचन पुरे करायला गेले.
सरपंच आणि शेळके गुरुजी दर्शन घेऊन आले आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासंबंधी बोलत बसले होते. तोच महाराज आपले वाचन संपवुन त्यांच्यात सामिल झाले.
काय कसली चर्चा चालली होती? महाराजांनी सहजच विचारले.
त्यावर शेळके गुरुजी म्हणाले, आता चार दिवसावर हनुमान जयंती आली. तेव्हा त्या उत्सवासंबंधी बोलत होतो. हनुमान जयंती झाली की, देवीच्या डोंगरावर चैत्री पोर्णिमेला सोमजाई देवीचा उत्सव असतो.
किती लांब आहे देवीचे देऊळ? महाराजांनी विचारले.
फार लांब नाही, समोर डोंगर दिसतोय नां! तोच देवीचा डोंगर. गावापासुन पांच किलोमिटर अंतरावर देवीचा डोंगर आहे. मंदिरापर्यंत जायला मात्र खडी चढण आहे. पण वर गेल्यावर मात्र अगदी माथेरान महाबळेश्वरला गेल्यासारखे वातावरण आहे. वरती छान पाण्याची पोखरण आहे. ऐन उन्हाळ्यात थंड आणि मधुर पाणी तिथे उपलब्ध असते. शेळके गुरुजींनी माहिती दिली.
पण महाराज, ते पोखरणीच्या पाण्याचे सोडले तर मात्र सगळा रखखाट आहे. सावलीला एकही झाड नाही. पूर्ण डोंगर बोडका झाला आहे. या पंचक्राशीतल्या लोकांचे ते श्रद्धास्थान आहे. शेकडो लोक जत्रेला येतात. पण या ऐन उन्हाळ्यांत त्यांना बसायला सावली नाही. आजुबाजुला जवळपास २०० एकर पडीक सरकारी जागा आहे. पण सगळी जागा खड्या खड्यांनी भरलेली आहे. सरपंचांनी आपली व्यथा मांडली.
पण काय हो सरपंच! ती २०० एकर जागा लागवडीखाली नाही आणता येत? देवीच्या जवळ ज्याअर्थी पाणी आहे त्याअर्थी आजुबाजुला पण पाणी असू शकते. शिवाय ती जागा चांगली लेव्हल करुन जर तिथे पाणी मुरवले तर ते पाणी पाझरुन आपल्या गावच्या नदीचे पाणी पण वाढेल! तुम्हाला काय वाटते? महाराजांनी आपली कल्पना मांडली.

बरोबर आहे तुमचे, पण एवढा खर्च कोण करणार? शिवाय ती जागा सरकारी आहे, कोणी खर्च करणारा भेटलाच तर तो आपला खर्च वसुल करण्याकरीता काहीतरी मागणारच नां! सरपंच म्हणाले.
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा