१०
गोविंदराव
जोशी हे हनुमावाडीतील पौराहित्य करणारे एकमेव व्यक्ती होते. त्यांचे सध्याचे वय ७२
आहे. हनुमानवाडीच्या परिसरांतिल चार पांच गावांत ते पौराहित्य करतात. हनुमानवाडीतील सोमजाई मंदिराचे ते वंश परंपरागत
उपाध्ये आहेत. देवीची दररोजची पूजा देवीचे भोपी गुरव करतात. परंतु आश्विन
महिन्यातिल देवीचे नवरात्र, चैत्रातिल पोर्णिमा अशा उत्सवाच्या प्रसंगी गोविंदरावांच्या घराण्यातील
व्यक्ती कडून देवीला श्रीसूक्ताचा अभिषेक करण्यांत येतो. देवीची चांदीची
उत्सवमूर्ती त्यांच्या आजोबांपासून त्यांच्याच ताब्यात असते. चैत्र पोर्णिमेला
देवीची पालखी निघते तेव्हा ती उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्याचा मानही त्यांच्याकडेच
आहे.
त्यांच्या पूर्वजांच्या
स्वप्नात सोमजाई आली होती. त्यानंतर देवीच्या डोंगरावर खणून देवीची मूर्ती काढली
गेली होती. जोश्यांच्या रोजच्या पूजेत एक तांब्याची पेटी होती. त्यांच्या
आजोबांच्या वेळे पासुन त्या पेटीची रोज पूजा करण्यांत येत होती. दर चैत्री
पोर्णीमेला त्या पेटीला देव्हाऱ्यामधुन बाहेर काढुन ती पेटी चिंच मीठ लाऊन घासुन
लख्ख करण्यांत येत असे.
गोविंदरावांची
तब्येत गेले पंधरा दिवस बरी नव्हती म्हणून सध्या रोजची देवांची पूजा करण्याचे काम
आपल्या गणेश उर्फ गणू याच्याकडे होते. त्याला ती पेटी घासण्याचे माहित नव्हते
त्यामुळे त्याने काही ती पेटी चैत्री पोर्णिमेला घासली नव्हती. चैत्र पोर्णिमेला
सोमजाईचा उत्सव, त्यानंतर हनुमान जयंतीचा उत्सव या मुळे तो त्याकाळात घरी फारसा
नसायचाच. सकाळी मारुती मंदिराजवळ नदीत आंघोळ करुन तो घरी देवांची कशीबशी पूजा
करायचा. दुपारी जेमतेम जेवायला हजर रहायचा. त्यातच त्यानंतर ते गोवेल्याला
स्वाध्यायाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे वडिलांच्या चौकशीला त्याला आजच
वेळ मिळाला होता. आज आपल्या वडीलांशी बोलताना त्यांनी त्याला पेटी घासलीस कां असे
विचारले. तेव्हा त्याने ती पेटी घासली नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी त्याला
उद्याच ती पेटी घासुन स्वच्छ करायला सांगितली.
बाबांशी
बोलुन झाल्यानंतर जेवण झाल्यावर रात्री गणेश नेहमीप्रमाणे झोपायला मारुती मंदिरात
गेला होता. तो मंदिरात गेला तेव्हा बाकी तिघेजण आधिच आलेले होते. त्यांची आपापसात
चर्चा चालू होती. अर्थातच वृक्ष मंदिर हाच त्यांच्या चर्चेचा प्रमुख विषय होता. तेव्हा हे चौघे मित्र आणि महाराज चर्चा
करित होते. तेव्हा हनुमानवाडीत जर वृक्षमंदिरा सारखा प्रयोग करायचा असेल तर योग्य
जागा कोणती यावर विचार चालला होता. तेव्हा सोमजाई मंदिराचा परिसर हीच योग्य जागा
असल्याचे मत गणेश आणि हेरंब यांनी मांडले. त्यावर महाराज म्हणाले देवीचे आवार
त्यामानाने लहान आहे पण त्याच्या बाजुची जी मोकळी ओबड धोबड जागा आहे ती माझ्या मते
जास्त योग्य आहे.
पण
ती सरकारी जागा आहे नां? तिथे कसे हे शक्य आहे? हेमंतने आपली शंका उपस्थित केली.
माझ्या
अंदाजानुसार ती जागा सरकारी नसुन सोमजाईचीच असेल! जितूने
आपले मत मांडले.
माझाही
अंदाज तोच आहे. जर ती जागा सोमजाईची असेल तर त्याचे काहीतरी कागदपत्र या गणेशकडे
असणार. काहीतरी सरकारी दानपत्र, कदाचित एखादा ताम्रपट असू शकतो. महाराजांनी आपला
अंदाज सांगितला.
माझ्या
माहिती प्रमाणे आमच्याकडे काहीही कागदपत्र नाहीत. ताम्रपट वगैरे असल्याचे काही
ऐकले नाही. फक्त माझ्या पूर्वजांपासुन एक तांब्याची पेटी आमच्या देवांत आहे. तिची
आम्ही रोज पूजा करतो. गणेशने सांगितले.
पेटी
केवढी आहे रे? हेमंतने विचारले.
फार
मोठी नाही! छोट्या ब्रिफकेस एवढी आहे! पण आम्ही ती कधी उघडली नाही. आजच मला
बाबांनी ती पेटी चिंच मीठ लाऊन घासायला सांगितली आहे. दरवर्षी ती पेटी चैत्री
पोर्णिमेच्या दिवशी बाबा घासायचे. पण यंदा ते आजारी आहेत त्यामुळे देवांची पूजा
हल्ली मी करतो आणि मला याबद्दल काही माहित नसल्यामुळे मी काही ती पोर्णिमेला घासली
नव्हती. म्हणून मी उद्या ती घासणार आहे. गणेश बोलला.
मग उद्या तू ती पेटी उघडून बघ नां! हेमंतने सांगितले.
ठिक आहे, मग मी उद्या ती उघडुन बघतो. काका
उद्या तुम्ही आमच्या घरी याल का? मग आपण ती पेटी उघडून बघुया. गणेशने आपली तयारी दर्शवली.
मी येईन पण आधी तू बाबांना हा विचार सांग आणि
ते हो म्हणाले तरच आपण ती पेटी उघडून बघु. महाराजांनी महत्वाचा सल्ला दिला.
************
गणेश
आज सकाळीच भेटायला आल्याचे पाहून गोविंदरावांना आश्यर्यच वाटले. त्या बाप लेकांची
भेट दररोज जेवणाच्या वेळीच व्हायची. त्यात सध्या ते आजारी असल्याने जेवणाच्या वेळी
होणारी भेटही व्हायची नाही. काल रात्री झालेल्या चर्चेनुसार गणेशने आज देवाच्या
पूजेमध्ये असणारी तांब्याची पेटी चिंच आणि मीठाने घासुन झाल्यावर उघडण्याचे ठरविले
होते. त्याकरिता तो बाबांची परवानगी मागण्याकरीता आला होता.
बाबा! काल तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे देवांच्या
पूजेतली पेटी घासणार आहे. पण माझा विचार ती पेटी उघडुन त्यात काय आहे ते
बघण्याचा आहे. पण त्याला तुमची परवानगी पाहिजे. असे म्हणून गणेशने रात्री
मारुतीच्या देवळात झालेल्या चर्चेचा सारांश सांगितला.
माझी
काही हरकत नाही!
आम्ही असा कधी विचारच केला नव्हता. तुम्हाला जर त्या पेटीत काही ताम्रपट असेल असे
वाटत असेल तर ती शंका फेडून घेऊ. असे म्हणून गोविंदरावांनी गणेशला ती उघडून बघायला
परवानगी दिली.
बाबांची परवानगी घेतल्यावर मग त्याने आंघोळ
करुन देवांची रोजच्या पद्धतीने पूजा केली. पूजा करताना ती तांब्याची पेटी चैत्री
पोर्णिमेला घासतात त्या पद्धती प्रमाणे घासण्या साठी त्याने देव्हा-यामधुन
बाहेर काढली.
***********
देव्हाऱ्यामधुन घासण्याकरीता बाहेर काढलेली ती
पेटी त्याने मागच्या अंगणात नेली. तिथे त्या पेटीला प्रथम स्वच्छ पाण्याने धुतली.
नंतर त्या पेटीला चिंच आणि मीठ एकत्र करुन ती पेस्ट त्या पेटीवर लावली. पेस्ट
लावल्यावर पंधरा मिनिटाने परत ती स्वच्छ पाण्याने धुतली. त्यानंतर ती पेटी
भाताच्या तुसाच्या राखाडीने परत घासली. घासुन झाल्यावर ती स्वच्छ कापडाने पुसली.
त्यानंतर ती पेटी नवीन असल्या सारखी चमकायला लागली. त्या पेटीच्या झाकणावर
आंब्याचे पान आणि फुल यांची डिझाईन असलेला चौकोन कोरलेला होता. त्या चौकोनामध्ये
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन रुपातील देवीचे चित्र ठळकपण कोरलेले होते.
आतापर्यंत
त्या पेटीचा बाहेरचा भागच दरवर्षी घासुन पुसुन लख्ख केला जायचा. आज प्रथमच गणेशने
ती पेटी उघडण्याचा निर्णय घेतला होता. आता गणेशने ती पेटी अगंणातुन मागच्या पडवीत
आणून तेथे एका पाटावर ठेवली. त्यानंतर त्या पेटीला असलेली पट्टी सारखी कडी काढली.
त्या कडीला धरुन त्याने झाकण उघडायला सुरवात केली. परंतु पहील्या प्रयत्नामध्ये ती
पेटी काही उघडेना. तेव्हा त्याने घरातुन स्क्रू ड्रायव्हर आणून ते झाकण थोडेसे सैल
केले. त्यानंतर मात्र त्या पेटीचे झाकण
उघडले.
पेटीचे
झाकण उघडल्यवर त्यामध्ये एका लाल कापडामध्ये गुंडाळलेला आयताकृती तांब्याचा जाड
पत्रा होता. त्या पत्र्यावर हवेचा परिणाम होऊन तो काळा झालेला दिसत होता. गणेशने
तो पत्रादेखिल मगाच प्रमाणे चिंच मीठ यांच्या पेस्टने घासला. त्यानंतर भाताच्या तुसाच्या राखाडीने परत घासला.
नंतर पाण्याने स्वच्छ धुतल्यावर मात्र तो पत्रा चमकायला लागला. त्यावर अगम्य भाषेत
काहीतरी मजकुर होता.
गणेशने तो मजकूर वाचायचा प्रयत्न केला. परंतु
त्याला काही त्याचा बोध होईना म्हणून तो पत्रा घेऊन तो आपल्या बाबांना दाखवला.
त्यांनी तो मजकूर पाहिल्यावर त्यांच्या तो मजकूर मोडीत असल्याचे लक्षांत आले.
त्यांच्या लहानपणी त्यांनी मोडीचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना तो मजकूर
वाचता आला. परंतु त्यांना त्यातुन काही बोध होईना. कारण ती वाक्यरचना नेहमीची
नव्हती. त्यांना एवढे लक्षांत आले की, सावंतवाडीच्या खेमसावंतांच्या राजे विजयसिंग
यांनी हनुमानवाडीतील देवीचा डोंगर या नावाने असलेली २०१ एकर जमीन सोमजाई मंदीराच्या नावांने देवीच्या दैनंदीन
पूजाअर्चा आणि उत्सवाकरीता त्यांचे पूर्वज त्र्यंबकभट जोसी यांच्या नावाने
वंशपरंपरेने दान केलेली आहे.
थोड्याच वेळात आपला दैनंदिन पठण आणि वाचन
पूर्ण करुन महाराजही त्यांच्या घरी आले. यापूर्वी एक दोन वेळा ते येथे येऊन गेले
होते. त्यामुळे गणेशच्या घरचे सर्वजण त्यांना ओळखत होते. त्यामुळे ते अंगणातुन आत
येताच गणेशचा धाकटा भाऊ अजयने त्यांचे स्वागत केले आणि त्याने गणेशला हाक मारली.
अरे दादा! हे
बघ मारुति मंदिरातले महाराज आले आहेत. बाहेर ये!
गणेशने बाहेर येऊन महाराजांना आपल्या
वडीलांच्या खोलीत गेले. त्यांना बसायला खुर्ची देऊन तो आतमध्ये पाणी आणायला गेला.
तो पाणी आणेपर्यंत महाराजांनी गोविंदरावांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांना आता
बरे वाटत होते. परंतु थोडा अशक्तपणा जाणवत होता. त्यावर महाराजांनी काही औषध
सूचविले.
गणेश आतुन पाणी घेऊन आला आणि त्याने पाण्याचे
तांब्या भांडे महाराजांकडे दिले. त्यांचे पाणी पिऊन होताच त्याने तिथेच टेबलावर
ठेवलेला तो ताम्रपट महाराजांना दाखवला. परंतु तो मजकूर मोडी लिपीत आहे एवढेच
त्यांना त्यातुन समजले. त्यांनी गोविंदरावांना विचारले, गणेशचे बाबा आपण मोडी
शिकला असालच नां?
त्यावर गोविंदराव म्हणाले, होय! हा मजकूर मी वाचला परंतु ही लेखन
पद्धती जुनी आहे. त्यामुळे नेमका अर्थ समजत नाही. एखाद्या ऐतिहासीक कागदपत्रे
वाचणा-या माणसाकडून हे वाचुन घ्यायला पाहिजे.
माझ्या माहिती प्रमाणे आपले शेळके गुरुजी
यांना मोडी वाचण्याचा छंद आहे. त्यांनी मुद्दाम मोडी वर्गाला जाऊन मोडीचे शिक्षण
घेतले आहे. परवा त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला हे सांगितले होते. महाराज
म्हणाले.
पण ते आमच्या घरी वाचायला येतील कां? कारण ही आमच्या रोजच्या पूजेतील वस्तू
आहे. त्यामुळे ती काही घराबाहेर नेता येणार नाही. गोविंदरावांनी आपली अडचण
सांगितली.
येतिल नां! आपण त्यांना विनंती करु! तसं कशाला आज
संध्याकाळी मीच त्यांना घेऊन येतो. फक्त आजच्या दिवस हा ताम्रपट देव्हा-याच्या
बाहेर ठेवा. महाराज बोलले.
काही हरकत नाही! नाहीतरी आज परत देव्हा-यात
ठेवायता म्हणजे परत आंघोळ करायला हवी. तेव्हा संध्याकाळी मात्र शेळके गुरुजींना
घेऊन या. जर हंबीररावांना वेळ असेल तर त्यांना पण बोलावले आहे असा निरोप द्या.
गोविंदरावांनी महाराजांना विनंती केली.
***********
गोविंदरावांच्या घरी माजघरात सतरंजी
अंतरली होती. त्यावर सरपंच, शेळके गुरुजी, महाराज आणि दिनकरदादा धुमाळ बसले होते.
त्यांच्या मधोमध चौरंगावर सकाळी देवाच्या पूजेतील तांब्याच्या पेटीमधुन काढलेला
ताम्रपट होता. शेळके गुरुजींनी नुकताच तो वाचला होता. त्यावरील मजकूराचा अर्थ असा
होता. सावंतवाडीचे राजे खेम सावंत यांनी सोमजाई देवीच्या दैनंदिन पूजा, नैमितिक
उत्सव याच्या खर्चाकरीता देवीचा डोंगर या नावाने असलेली २०१ एकर जमीन या
दानपत्रान्वये गोविंदरावांचे पूर्वज त्र्यंबकभट जोसी यांना वंशपरंपरेने दान केली
होती. त्याबदल्यात त्यांनी खेमसावंतांचे आणि त्यांच्या प्रजेचे कल्याणाची
प्रार्थना देवीकडे करावी. या जमिनिचे उत्पन्न देवीच्या खर्चाकरीताच वापरावे ही
त्यात अट होती.
म्हणजे आम्ही इतके दिवस ऐकत होतो ही जागा
सरकारी आहे ते चुकीचे होते. ही जागा तर देवीच्या मालकीची आहे. त्या जागेशी सरकारचा
काही संबंध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत त्यात काही हस्तक्षेप करु शकत नाही. तुमचे
काय मत आहे दिनकरराव. सरपंचांनी दिनकर रावांना विचारले.
या ताम्रपटावरील मजकूरावरुन असे दिसते खरे.
उद्या मी ऑफिसमध्ये गेल्यावर उतारे बघतो म्हणजे नक्की काय ते समजेल. दिनकररावांनी
आपली सावध प्रतिक्रीया दिली.
सरकारी दप्तरांत काहीही असले तरी सध्याच्या
माझ्या आर्थिक परिस्थितीनुसार त्या जमीनीत मी काहीही सुधारणा करु
शकणार नाही. देवीच्या भक्तांच्या सहकार्याने त्या जमिनीत आपण काही सुधारणा
करण्याचा विचार आपण सर्वजण मिळुन करत असाल तर त्यात मी काही आडकाठी आणणार नाही.
फक्त या ताम्रपटात असलेल्या अटींचा भंग होता कामा नये. हे माझे आपणा सर्वांच्या
आणि सोमजाईच्या साक्षीने दिलेले वचन आहे. तेव्हा त्या करिता काही योजना करायची
असेल आणि त्यामुळे सोमजाईचे वैभव वाढणार असेल तर त्याकरिता मी आपल्याला पूर्ण
सहकार्य करीन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा