मंगळवार, २७ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ९


९. पहलगावपासुन जम्मु पर्यंत
            आज २२ मार्च २०१६! पहाटे ठिक पाच वाजुन दहा मिनिटांनी सर्वजण बसपाशी उभे होतो. काल अगदी जरुरी पुरते सामान गाडीतुन उतरवले होते. त्यामुळे सामान चढवण्याचा प्रश्नच नव्हता. गब्बुने गाडीचे इंजिन चालू केले होते. तापमान शून्य अंशापेक्षा कमी असावे कारण गाडीच्या काचेवर बर्फ साचला होता. १५-२० मिनिटे इंजिन गरम झाल्यावर प्रवासाला सुरवात झाली. वातावरण अतिशय थंड असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. त्यामुळे श्रीनगर जम्मु हायवे येईपर्यंत विना अडथळा प्रवास झाला. हायवे सुरु झाल्यावर मात्र गाडी दर दहा मिनिटांनी थांबत होती. वाहतूकीचे नियंत्रण सिमा सुरक्षा दलाचे जवान करीत होते. त्यामुळे प्रवास धिमा असला तरी चालू होता. कोणतेही वाहन मधे घुसत नव्हते.
     रामबन गेल्यावर श्रीनगरला येताना जिथे जेवण केले होते त्याच्या जवळपासच्या एका वैष्णो धाब्यावर मागच्यासारखाच राजमा राईस आणि राजम रोटीची ऑर्डर दिली परंतु आज चव मात्र पूर्वीसारखी नव्हती. त्या हॉटेलच्या मागच्या बाजुला एक धरण दिसत होते. त्या धरणाचे दृष्य मात्र मनमोहक होते.
     जाताना पावसामुळे रहित झालेल्या पटणी टॉप येथिल नाग मंदिरात आज गेलो. हे नाग मंदिर क्रिमची येथे मंतालाई जवळ आहे. येथे शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते. पटणी टॉप येथिल हे सर्वात जुने मंदिर आहे. पटणी टॉप येथिल सर्वांत उंच टेकडीवर असलेले हे मंदिर ६०० वर्षे जुने आहे. नाग पंचमीच्या दिवशी येथे हजारो भक्त दर्शनाला येतात.
तावी नदी, जम्मु
     पटणी टॉपनंतर मात्र प्रवास विना अडथळा आणि पूर्ण वेगात सुरु झाला. जम्मुमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तावी नदीचे दर्शन झाले. या नदीच्या नांवावरुनच जम्मु शहराचे नांव जम्मु तावी असे पडले आहे. जम्मुमध्ये पोचायला रात्रीचे आठ वाजले. जम्मुमध्ये आम्ही हॉटेल इंटरनॅशनल मध्ये उतरलो होतो. हॉटेल ए.सी. होते परंतु रिनोव्हेशनचे काम चालू असल्याने आकर्षक वाटत नव्हते. रुम मात्र प्रशस्त होत्या. हॉटेलपासुन रेल्वे स्टेशन आणि रघुनाथ मंदिर जवळच होते. आता शहरात आल्यामुळे की काय उकाडा खूपच जाणवत होता.

     हॉटेल मध्ये चेकइन करुन, फ्रेश व्हायला पावणे दहा वाजले होते. जेवण्याकरीता वैष्णोधाबा शोधुन काढी पर्यंत त्या धाब्याची बंद करण्याची वेळ झाली होती. त्या हॉटेल वाल्याला रिक्वेस्ट करुन दहा माणसांची जेवणाची सोय करायला सांगितली. जेवण झाल्यावर जवळच असणाऱ्या रघुनाथ मंदिरापर्यंत चक्कर मारुन आलो. झोपेपर्यंत अकरा साडे अकरा वाजले होते. काश्मिरमध्ये दाखल झाल्यापासुन आज पहिल्यांदा रात्रभर पंखा लाऊन झोपलो. आता उद्या जरा निवांत होते. थोडे उशिरा उठले तर चालणार होते.
*******

हिमालयाच्या सहवासात भाग ८


८. पहलगाम दर्शन
    आज दिनांक २१ मार्च २०१६! आता थोड्याच वेळात ही हाऊसबोट सोडायची होती. काल रात्री उशिरा फारुकभाई हॉस्पिटल मधुन आले होते. त्या गुजराथी माणसाच्या जिवाला असलेला धोका टळला होता. परंतु तो स्वत:च्या पायावर ऊभा रहाण्याची शक्यता कमी होती. याचा अर्थ एकच अनोळखी प्रांतात भलतेच साहस करण्याच्या भरीस पडू नये. बर्फातुन गाड्या चालवण्याचा सराव असणाऱ्या आणि सुरक्षेसाठी गाडीच्या चाकांना लोखंडी साखळीचा बेल्ट लावलेल्या गाडीमधुन प्रवास करण्याची सक्ती ही पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच होती हे आता मनात पक्के झाले. आमच्याकडे देखिल हरिहरेश्वर येथे येणारे पर्यटक असेच वेडे धाडस करुन समुद्रात उतरतात आणि आपल्या जिवाला मुकतात. त्यानंतर बोंबाबोंब मात्र शासनाच्या नावाने करतात. पर्यटनाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या बरोबर सगळ्यांचाच जीव धोक्यात घालू नये.
            चहा नाश्ता करुन फारुकभाईंचा सर्व हिशेब करुन आम्ही शागु पॅलेस सोडला. जाताना फारुकभाईंच्या फॅमिलीला काही गिफ्ट दिले, कारण गेले तिन चार दिवस त्यांनी आमच्यासाठी चांगली व्यवस्था ठेवली होती. सर्वांच्या बॅगा परत शिकाऱ्यामध्ये ठेवण्यात आल्या. जाता जाताच लेकला मोठी प्रदक्षिणा घालुन रस्त्यावर आलो. शिकारेवाले देखिल टीप द्या म्हणून पाठिशी लागले होते. त्यांना टिप देऊन झाल्यावर त्यांनीच रस्त्यावर हजर असलेल्या आमच्या बसमध्ये आमचे सामान चढवुन दिले. आम्हाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर फारुकभाई आले होते. आम्ही गब्बुला वाटेत सफरचंदाची बाग आणि केशराची शेती दाखवायला सांगितली. काश्मिर मध्ये येऊन सफरचंदाची बाग आणि केशराची शेतं पाहिली नाहित तर काश्मिर दर्शन पूर्णच होणार नाही. साधारण दहाच्या सुमारास आम्ही श्रीनगर सोडले.


केशराची शेती
    श्रीनगरपासुन साधारण सोळ सतरा किलोमिटर आल्यावर पॅंपोर हे केशराकरीता प्रसिद्ध असणारे गांव आले. येथे रस्त्याच्या कडेला केशराचीच शेते होती. सध्या केशराला फुले वगैरे येण्याचा हंगाम नसल्यामुळे केशराची शेती म्हणजे गवताने भरलेले माळरान भासत होते. केशराच्या झुडुपांना छान निळी फुले आलेली असली की, ते एक विलोभनिय दृष्य असते. परंतु ते आता शक्य नव्हते. फक्त केशराची शेती पाहिली असे सांगता येईल एवढा अनुभव घेतला.

उध्वस्त अवंती स्वामी मंदिर
     पॅंपोर नंतर दहा बारा किलोमिटर गेल्यावर अवंतीपुर हे शहरवजा गांव लागले. येथे काश्मिर मधिल दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यातले अवंती स्वामी मंदिर पहलगावच्या रस्त्यावरच आहे. हे मंदिर भारत सरकारच्या पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून जाहिर केले आहे. मंदिर पहाण्यासाठी आम्ही गाडीतुन खाली उतरलो. समोर भग्नावस्तेतिल मंदिर होते. त्याचे अवशेष इतस्तत: विखुरलेल्या अवस्थेत होते. भग्नावस्तेतिल हे मंदिर पाहून मन विषण्ण झाले.
     भगवान विष्णूंचे हे मंदिर नवव्या शतकातिल आहे. हे मंदिर इसविसन पूर्व ८५३ ते ८८८ या काळात या राज्याचा शासक असणाऱ्या अवंती वर्मन या राजाने बांधले होते. हे मंदिर, अवंतीपूर येथेच जिर्णोद्धार केलेले अवतेश्वर(शिव) मंदिर आणि काश्मिर मध्येच असणारे मार्तंड(सूर्य) मंदिर ही तिनही मंदिरे ग्रीक स्थापत्य शैलीतिल आहेत. या उद्धवस्त असणाऱ्या अवंती स्वामी मंदिराचे अवशेषांवरील कोरीव काम पाहून त्यावेळच्या स्थापत्यकलेच्या भव्यतेची कल्पना येते.
     पहलगामच्या दिशेने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला सफरचंदाच्या बागा होत्या. आपल्याकडे कोंकणात आंब्याच्या बागा असतात तशाच पद्धतिच्या त्या बागा मला वाटल्या. सध्या पाऊस, स्नो फॉल आणि पानगळीचा ऋतु चालू असल्यामुळे सफरचंदाची झाडे म्हणजे खराटे झालेले होते. नुकतिच झाडांना पालवी यायला सुरवात झाली होती. अपवाद म्हणून एक दोन झाडांवर हिरवी सफरचंदे पहायला मिळाली.  बागा मात्र मोठ्या मोठ्या होत्या. आपल्याकडे कोंकणात माझी पांचशे कलमांची, हजार कलमांची आंब्याची बाग आहे असे म्हणतात, तसे इथे पाचशे हजार झाडांची सफरचंदाची बाग आहे असे म्हणत असावेत.
     दुपारी दोनच्या सुमारास आम्ही पहलगामला पोचलो. पहलगाम येथिल मुख्य आकर्षण होते फ्लॉवर व्हॅली. त्याकरीता घोडेस्वारी करणे आवश्यक होते. पहलगाम हे अनंतनाग जिल्ह्यातिल एक शहर आहे. हे शहर लिड्डर नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. हे पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. या शहराची समुद्र सपाटीपासुनची उंची ७२०० फुट आहे. येथे अनेक सिनेमांचे चित्रिकरण झाले आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेला जाणारे लोक प्रथम येथे येतात. येथुन पुढे अमरनाथ लिंगापर्यंत घोड्यावरुन अथवा पायी जावे लागते. येथिल मुख्य व्यवसाय पर्यटन हाच असावा. कारण हा सर्व पहाडी भाग आहे. किंबहूना सर्व काश्मिर खोरेच पर्यटन व्यवसायावर अवलंबुन आहे.
     पहेलगाम येथे आमच्या स्वागताला तेथिल आमचे बुकींग असलेल्या हॉटेलचे मालक गफुरभाई हजर होते. त्यांच्या सल्यानुसार आम्ही आधी हॉटेलवर न जाता साईट सीइंग करुन जायचे ठरवले. त्यांच्याच मध्यस्थिने घोडे ठरवले.
     पहलगाम येथिल घोडेस्वारी हा एक वेगळाच अनुभव होता. येथे एक घोडेवाला दोन दोन घोडे मॅनेज करत होता. घोडेस्वारीची वाट अतिशय अवघड होती. कालच भरपुर पाऊस आणि बर्फ पडला होता त्यामुळे डोंगरात सर्वत्र त्या वितळलेल्या बर्फाचे झरे वहात होते. त्या वाहत्या पाण्यांतुन दगड, गोटे, चिखल यातुन वाट काढीत घोडे आपला मार्ग आक्रमत होते. अतिशय तिव्र चढण आणि उतरण असलेला हा रस्ता होता. अशा प्रकारच्या वाटेला आपल्याकडे ढोरवाट म्हणतात. आमचे घोडे त्यातुनच आमचे ओझे घेऊन जात होते कमाल त्या घोड्यांची आणि घोडेवाल्यांची. घोडेवाले आमच्याबरोबर पायी चालत त्या दगडाळ सरपटणाऱ्या रस्त्याने चालत होते. घोडेवाले जसे अगदी वृद्ध होते तसेच पोरगेले देखिल होते. तरुण मात्र फार कमी होते.
     घोडेवाल्यांनी आम्हाला कारगिल पॉईंट, पहलगाम लिड्डर रिव्हर पॉईंट, चंदनवारी, आरु व्हॅली, शिकार पॉईंट एवढे पॉईंट दाखवले. हवामान स्वच्छ असल्यास या ठिकाणाहून श्रीनगर परिसर दिसतो असे एका पॉईंटवर आम्हाला त्यांनी सांगितले.  कारगिल पॉईंटवरुन ज्या ठिकाणी कारगिल युद्ध झाले ते शिखर दिसत होते. दुसऱ्या एका पॉईंटवरुन लिड्डर नदीचे विहंगम दृष्य दिसत होते.
     पूर्ण चढण चढुन गेल्यावर एक छान पठार होते. मस्त हिरवळीला चिनार, पाईन, देवदार या वृक्षांच्या गर्द झाडीची कुंपण घातल्यासारखी भिंतच होती. त्या पार्श्वभूमिवर जमिनीवर सगळीकडे बर्फच बर्फ पसला होता. थोडे उंचवटे सोडून सर्व जमिन बर्फाने झाकलेली होती. उन्हाच्या कवडशांनी बर्फ सोन्यासारखा चकाकत होता. या पठाराला बैसरन(Baisaran) पठार असे म्हणतात. या बैसरन पठारावरील बर्फावरुन फिरायला खूपच मजा येत होती. हे पठार खूपच मोठे असल्याने तेथे असलेली गर्दी जाणवत नव्हती. या पठारावर एक झाड होते त्या झाडाला दिड दोन फुटांवर एक फांदी फुटून ती दोन झाडे झाल्यासारखी दिसत होती. खाली असलेल्या बर्फाच्या पार्श्वभूमीवर त्या बेचकीत उभे राहून  फोटो खूपच छान येत होत. त्यामुळे त्या पॉईंटवर बरेच फोटो काढुन झाले.
     आतापर्यंत कुठे बघण्यात न आलेला एक गेम तिथे पहायला मिळाला. चेंडूच्या आकाराच्या एका मोठ्या फुग्यामध्ये हायड्रोजन गॅस भरुन त्यात दोन माणसांना बसवुन ते फुगे उतारावरुन सोडून दिले जात होते. या गेमला झोर्बिंग असे म्हणतात. बैसरन पठारावर बराच वेळ घालवुन त्यानंतर तिथेच असलेल्या टपरीवजा हॉटेलमध्ये पोटपूजा केली. त्यानंतर आमचा पहेलगामकडे परतिचा प्रवास सुरु झाला.
     पहलगामकडे परत जाताना सर्व प्रवास तिव्र उताराचा होता. त्यामुळे तोल सावरणे कठीण जात होते. एकाबाजुला अतिशय खोल दरी त्यातच दगड, गोटे राडा, रोडा याने भरलेली अति चिंचोळी वाट यामुळे अक्षरश: जीव मुठीत नाही तर घोड्याच्या लगामात धरुन आम्ही जात होतो. घोड्यावर एकाबाजुलाच वजन पडणार नाही याची दक्षता घेत आमची घोडेस्वारी चालू होती. अखेर एकदाचा आमचा घोड्यावरचा प्रवास संपला आणि आम्ही आमची गाडी जेथे पार्क केली होती तेथे आलो.
     संध्याकाळी सहा वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. हे हॉटेल आमच्या पूर्ण सहलीच्या मुक्कामाच्या ठिकाणांचा विचार करता एक नंबरचे हॉटेल होते. रुमच्या खिडकीतुन बाहेरील निसर्ग सौंदर्य खूपच छान दिसत होते. रुमचे इंटीरिअरही खूप चांगले होते. बेडवर पातळ गादी होईल एवढ्या जाडीची रजई, शिवाय रग आणि इलेक्ट्रीक हिटींग रग देखिल होता. अर्थात आताचे तापमान देखिल तिन अंश सेल्सिएस होते.
     आजच्या घोडेस्वारीने अंगाचा खुर्दा झाला होता त्यामुळे कढत कढत पाण्याने आंघोळी केल्या. सकाळपासुन फारसे खाणे झाले नसल्याने आणि वातावरणाचा परिणाम म्हणून असेल् कडकडून भूक लागली होती. त्यामुळे बरोबर आणलेल्या पदार्थांचा नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर येथे जवळच मामलेश्वराचे मंदिर आहे असे समजले. तेथे दर्शनाला जाण्याकरीता म्हणून निघालो तो अचानक सगळीकडचे लाईट गेले आणि पूर्ण काळोख झाला. त्यामुळे अनोळखी प्रदेशात उगाच भटकण्यापेक्षा परत हॉटेलात परत आलो. एकूणच श्रीनगरच्या परिसरात असताना देवदर्शनाचा योग काही आला नाही.
     वास्तविक मामलेश्वराचे मंदिर आमच्या हॉटेलपासून अगदी जवळ होते परंतु नेमकी जागा दाखवणारा कोणी नसल्यामुळे आम्हाला देवळात जाता आले नव्हते. त्या मामलेश्वराच्या मनांत आम्हाला दर्शन द्यायचे नव्हते. हॉटेलात आल्यावर या मंदिराची माहिती मिळाली ती फार महत्वाची होती. या मंदिराला पौराणिक संदर्भ आहे. हे मंदिर इसवीसन पूर्व ४०० वर्षांपूर्वीचे असण्याची शक्यता आहे. पार्वतीने आपल्या मळा पासुन बनविलेल्या गणपतिला स्नानाला जाताना द्वारपाल म्हणून बसविले. त्यावेळी त्याने प्रत्यक्ष शंकारांना अडविले होते तो प्रसंग येथे घडला असे म्हणतात. मा मल याचा अर्थ जाऊ नका असा होतो. म्हणून या महादेवाचे नांव मामलेश्वर असे पडले.
     हॉटेलात परत आल्यावर तासाभराने लाईट आले त्याकाळात बेडवर पडुन रहाणेच पसंत केले. कारण घोडेस्वारीचे परिणाम जाणवायला लागले होते. लाईट आल्यावर नऊच्या सुमारास सर्वांनी एकत्र डायनिंग हॉलमध्ये जेवण केले आणि जास्त टाईमपास न करता लगेचच झोपायला गेलो. उद्या जम्मुला जायचे होते. येतानाचा श्रीनगर जम्मु हायवेचा अनुभव चांगला नव्हता त्यामुळे प्रवासाला किती वेळ लागेल याचा भरवसा नव्हता. सावधगीरी म्हणून उद्या पहाटे पांच वाजताच मार्गाला लागायचे असे ठरवले होते.

*******


सोमवार, २६ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ७


७) गुलमर्ग आणि श्रीनगर दर्शन
            आज दिनांक २० मार्च. आज सकाळी सात वाजताच तयार होऊन डेकवर आलो. आज मुद्दामच कोणतेही गरम कपडे घातले नव्हते. आजचे तापमान ८ अंश सेल्सिएस एवढे होते. त्यामुळे थंडी होतीच परंतु ती बोचरी वाटत नव्हती. रेग्युलर टि शर्ट आणि जीन्सची पॅंट घातली होती तरी बेअरेबल वाटत होती.
     काल ठरल्याप्रमाणे फोटोग्राफर हजर झालेला होता. सर्वप्रथम आठवले दांपत्याचे फोटो सेशन झाले. आज सुरेश आठवले यांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे दोघांचे त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढुन दिले. त्यानंतर छोट्या शिकाऱ्यामध्ये काश्मिरी ड्रेसमध्ये बसुन आमचे दोघांचे फोटो सेशन करुन झाले. आम्ही फक्त चार पाच फोटो काढायचे असे ठरवले होते. परंतु प्रत्यक्ष पंधरा फोटो काढुन झाले. त्यानंतर एकेकाचे करत सर्वांचेच फोटो सेशन झाले. एकीकडे कापड खरेदी सुरु होती. सगळ्यांनीच श्रीनगरची आठवण म्हणून ड्रेसपिसची खरेदी केली. दरम्यान नाश्ता आला. आज आलु पराठा आणि लोणचे असा नाश्त्याचा बेत होता.
     आज आमचा श्रीनगर दर्शनाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने फारुकभाईंनी आम्हाला श्रीनगरच्या इतिहासाची आणि प्रेक्षणिय स्थळांची माहिती दिली. श्रीनगर हे जम्मु आणि काश्मिर या राज्याचे राजधानीचे शहर समुद्रसपाटी पासुन १७०० मिटर उंचीवर आहे. हे शहर हाऊस बोट आणि सरोवरांकरीता प्रसिद्ध तर आहेच. या व्यतिरिक्त पारंपारीक हस्तकला आणि सुक्यामेव्याकरीताही हे शहर प्रसिद्ध आहे. या शहराचा इतिहास तसा खूप प्राचीन आहे.
     या शहराचे मूळनांव सूर्यनगरी असे होते. श्रीनगर या शहराच्या नांवातच खरं म्हणजे त्याचा अर्थ सामावला आहे. श्री म्हणजे लक्ष्मी याचाच अर्थ हे शहर लक्ष्मीचेच नगर आहे. राजा प्रवरसेन दुसरा याने या नगरीची स्थापना २००० वर्षांपूर्वी केली  असावी याचे काही पुरावे उत्खननात सापडले होते असे म्हणतात. काही इतिहासकारांच्या मते हे शहर सम्राट अशोकाने स्थापन केले. श्रीनगर येथे अनेक सिनेमांचे शूटींग केले जात असे. जुन्या जवळ जवळ प्रत्येक सिनेमात काश्मिरचे दृष्य असणारे कमीत कमी एखादे तरी गाणे असायचेच. अगदी मराठी सिनेमातही हे चिंचेचे झाड या गाण्यात काश्मिर मधिल दृष्ये आहेत.
     श्रीनगरमध्ये निशात गार्डन, चश्मेशाही गार्डन, शालिमार गार्डन, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. हल्लीच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नावाने तुलिप गार्डन तयार करण्यांत आले आहे. येथे असणाऱ्या हजरत बल मस्जिदमध्ये हजरत मोहमंद पैगंबराच्या दाढीचा केस जपुन ठेवला आहे.
     श्रीनगर शहरामध्ये शंकराचार्य पर्वतावर शंकराचार्यांचे मंदिर आहे. याला तख्त ए सुलेमान असेही म्हटले जाते. या मंदिराची निर्मिती राजा गोपादित्याने इसवीसन पूर्व ३७१ मध्ये केली होती.  आमच्या दुर्दैवाने आम्ही येथे जाऊ शकलो नाही.
     आमच्या सर्व मेंबरची खरेदी, फोटोसेशन उरकल्यावर आजचे उत्सवमूर्ती श्री आठवले यांचे औक्षण करण्यात आले. औक्षणाची तयारी केतकीताईंनी मुंबईहून येतानाच आणलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये पांच सुवासिनी होत्याच त्यांनी त्यांना औक्षण केले. त्यानंतर फारुकभाईंच्या मिसेसनीपण त्यांना औक्षण केले. औक्षण झाल्यावर श्री आठवले यांनी आमच्यात ज्येष्ठ असणाऱ्या नानांना आणि फारुकभाईंच्या आईला नमस्कार केला. केतकीताईंनी खास वाढदिवसाकरीता आणलेल्या बेसनाच्या लाडवांनी सर्वांचे तोंड गोड केले. मात्र काश्मिरच्या कडक थंडीने त्या लाडवांना देखिल कडक केले होते.
     एवढे सगळे होईपर्यंत दोन शिकारे दाल सरोवराच्या किनाऱ्यावर जाण्याकरीता हजर झाले होते. त्या शिकाऱ्यांमध्ये बसुन दाल सरोवराच्या किनाऱ्यावर आलो तेथे आमची बस हजरच होती. परंतु तेवढ्यात काही गरम टोप्या, जर्कीन असे गरम कपडे विकणाऱ्या लोकांनी आम्हाला गराडा घातला. आमच्यापैकी काही जणांनी त्यातले गरम कपडे खरेदी केले. आजचा बिझी शेड्युल विचारात घेऊन गब्बु आमचा ड्रायव्हर निघण्याची घाई करीत होता.
     आता आम्ही गुलमर्गच्या रस्त्याला लागलो होतो. हा रस्तादेखिल निसर्गसौंदर्याने नटलेला होता. दोन्ही बाजुला घनदाट झाडी, मधुन मधुन धबधबे कोसळत होते. त्यातच रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा वाढला होता. एकुणच वातावरण आल्हाददायक होते.
     काश्मिरच्या खोऱ्यामध्ये श्रीनगर पासुन कोणत्याही दिशेला गेले तरी निसर्गाची इतकी लोभसवाणी दृष्ये दिसतात की, ती पाहून असे वाटते परमेश्वराने आपले सर्व वैभव येथे उधळुन टाकले आहे. या राजमार्गावरुन निघाल्यावर पर्यटक रस्त्यावर लिहिलेल्या गावांची नावे वाचुनच आकर्षित होतात आणि गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम येथे फिरायला जातात.
     गुलमर्गच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली छोटी छोटी गावे आणि शेती मनाला मोहून टाकते. सरळ लांबच लाब रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंचच उंच झाडांच्या भव्य रांगा हिरव्या हिरव्या भिंतींप्रमाणे भासतात. जुन्या काळातिल अनेक चित्रपटामधली गाणी या रस्त्यावर चित्रित केली गेली आहेत. चढणीचा रस्ता सुरु झाल्यावर या झाडांची घनता आणखिनच वाढते. गुलमर्गला पोचल्यावर सगळीकडे गवताने भरलेली सुंदर सुंदर मैदाने दिसायला लागतात. या मैदानांना काश्मिरी भाषेत मर्ग असे म्हणतात. गुलमर्ग याचा अर्थ आहे फुलांनी भरलेली मैदाने. गुलमर्ग समुद्रसपाटी पासुन २६८० मिटर उंचीवर आहे. येथुन घोड्यावरुन खिलनमर्ग, सेवन स्पिंग आणि अलपथ्थर येथे जाता येते.
     गुलमर्ग येथे जगात सगळ्यात उंचीवर असणारा गोल्फकोर्स आहे. हिवाळ्यात येथिल धरतीने बर्फाची जणू चादरच पांघरलेली असते. त्यावेळी आईस स्केटींगचा आणि बर्फात खेळण्याची हौस असणाऱ्यांसाठी हा जणू स्वर्गच असतो. गुलमर्ग येथिल वैशिष्ट म्हणजे येथे चालवली जाणारा गंडोला. गंडोला म्हणजे बर्फाने भरलेल्या दरीची दृष्ये पहाण्याकरीता आकाशातुन केलेले भ्रमण. येथे असणाऱ्या या रोप वे किंवा केबल कारमधुन  आकाशातुन विहार करणे. येथे असणाऱ्या वृक्षराजीवर साचुन राहिलेला बर्फ पहाण्यात एक वेगळीच मजा आहे. अशा या बर्फाच्छादित शिखरांवर जर सोनेरी सूर्याची किरणे पडली तर सोनेपे सुहागा. परंतु आम्ही या गंडोला सफारीचा आनंद घेऊ शकलो नाही.
     आम्ही गुलमर्गमध्ये प्रवेश केला आणि स्नो फॉल व्हायला सुरवात झाली. आम्ही आणलेली मिनी बस आता पार्क करण्यात आली होती. याच्या पुढचा प्रवास सोनमर्ग प्रमाणे स्पेशल चेनवाल्या गाडीने करावा लागणार होता. तेथे हजर असणारे गाडीवाले भरमसाट दर सांगत होते. आम्ही आमच्या गाडीतुन उतरुन चौकशी केली तेव्हा समजले की, गंडोल्यापर्यंत कोणालाच जाऊन देत नाहित. तेव्हा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला येथिल लोकल गाडिवाल्यांच्या थापांना बळी न पडता येथेच मोकळ्या जागेत स्नो फॉलचा आनंद घ्यायचा.
     सिनेमातला स्नो फॉल बघणे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे यात खूपच अंतर आहे.  येथे बर्फात मनसोक्त खेळून त्याचे व्हीडीओ करुन झाल्यावर तेथे जवळच असणाऱ्या हॉटेलात पोटपूजा करुन घेतली. गरमा गरम कांदाभजी, त्यासोबत गरमा गरम चहा आणि बरोबर घरुन आणलेल्या पदार्थांनी पोटभरुन घेतले. त्या हॉटेलात असलेल्या फायर प्लेस जवळ बसुन बर्फात खेळून आखडलेले हात शेकून घेतले. त्या हॉटेलच्या परिसरांतच एक काश्मिरी कपड्यांचे दुकान होते. महिलांनी तेथे काही खरेदी केली. तेथे असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या टोप्या घालुन फोटो काढले.
     दुपारी तिनच्या सुमारास परत श्रीनगर शहरांत आलो. सर्वप्रथम आम्ही निशाद गार्डनला भेट दिली. निशात गार्डन नंतर आम्ही शालिमार गार्डनला भेट दिली. या बागेला पौराणिक संदर्भ देखिल आहे. सध्याच्या इतिहासानुसार शालिमार गार्डनच्या विस्तारिकरणाचे आणि मोगल गार्डनच्या सध्याच्या स्वरुपामध्ये ही बाग परिवर्तित करण्याचे श्रेय मुगल बादशहा जहांगिर याच्याकडे जाते. परंतु प्राचिन इतिहास पाहिला तर दुसऱ्या शतकात ज्या प्रवरसेन द्वितिय याने श्रीनगर शहर वसविले त्यानेच या बागेचे निर्माण केले असावे असा संदर्भ मिळतो.
     प्रवरसेन राजाने दाल सरोवराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात एक झोपडीवजा घर उभारले होते. त्या घराचे नाव त्याने शालिमार असे ठेवले. संस्कृतमध्ये शालिमार या शब्दाचा  अर्थ प्रेम निवास अथवा प्रीती घर असा होतो.  जेव्हा प्रवरसेन राजा त्यावेळचे संत सुकर्मास्वामी यांना भेटायला येत असे तेव्हा तो या झोपडीत रहात असे. कालांतराने ती झोपडी राहिली नाही परंतु शालिमार हे या जागेचे नांव कायम राहिले.
     शालिमार गार्डन नंतर आम्ही चश्म ए शाही गार्डन बघायला गेलो. या बागेत जाण्याकरीता ५०-६० पायऱ्या चढुन जावे लागते. बागेमधुन दाल सरोवराचे आणि परिसराचे दृष्य विलोभनिय दिसते. या जागेचा शोध घेण्याचे श्रेय काश्मिर मधिल काश्मिरी पंडितांच्या कुळातिल महिला संत रुपा भवान यांच्याकडे जाते. रुपा भवानी यांच्या कुटूंबाचे आडनाव साहिब असे होते. त्यावरुन या झऱ्याला चश्मे साहिब असे संबोधले जायचे. काही कालानंतर त्याचा अपभ्रंश होऊन त्याला चश्मेशाही अथवा चश्म ए शाही या नांवाने ओळखले जायला लागले. कालांतराने मोगल शासकांनी त्याचा मुगल गार्डन स्वरुपात विस्तार केला.
     सध्या या गार्डनमध्ये जाण्याकरीता सिमा सुरक्षा दलाच्या क़डक पहाऱ्यातुन जावे लागते. सुरक्षा चौकीच्या गेटमधुन आधी आमची रिकामी गाडी पुढे गेली. नंतर आम्ही सर्वजण मेटल डिटेक्टर सारख्या मशिनमधुन पलिकडे गेलो. तेथिल सुरक्षा जवानांनी आमची आस्थेन चौकशी केली. विशेष म्हणजे चौकशी करणारा जवान मराठी बोलणारा होता.
            चश्म ए शाही बागेला भेट दिल्यानंतर आम्ही श्रीनगरचे वैभव मानल्या गेलेल्या तुलिप गार्डनला भेट द्यायला गेलो. हे गार्डन श्रीमति इंदिरा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्माण करण्यांत आले आहे. हे आशिया खंडातिल सर्वात मोठे तुलिप गार्डन आहे. १२ हेक्टर एवढ्या प्रचंड जागेत निर्माण करण्यांत आलेले हे गार्डन पहाणे म्हणजे डोळ्यांना मेजवानीच आहे. निरनिराळ्या रंगाच्या तुलिप फुलाचे हे गार्डन आखिव रेखिव आहे. या ठिकाणी देखिल अनेक फोटो काढले व्हीडीओ केला. श्रीनगरमध्ये आल्याचे सार्थक झाले असा भाव हे गार्डन पाहून मनात आले.
     तुलिप गार्डन एवढे भव्य होते की, ते बघता बघता वेळ कसा निघुन गेला ते कळलेच नाही. त्यामुळे आमची बघायची अनेक ठिकाणे मिस झाली. शंकराचार्य मंदिर तरी बघायला पाहिजे होते कारण शंकराचार्यांचे मंदिर कुठे असलेले ऐकले नव्हते. आज आमचा श्रीनगरचा शेवटचा मुक्काम  होता त्यामुळे इलाज नव्हता.
            संध्याकाळी हाऊस बोटीवर आलो तेव्हा एक धक्कादायक बातमी समजली. बडोदा येथिल एक फॅमिली फारुकभाईंच्या बहिणीच्या हाऊसबोटवर उतरली होती. ते एकूण तिघेजण स्वत:ची कार घेऊन आले होते. गाडी ते स्वत: चालवत होते. आज ते फारुकभाई यांच्या भाच्याला रस्ता दाखवायला घेऊन सोनमर्ग येथे गेले होते. सोनमर्ग येथे ती कार बर्फावरुन स्लिप होऊन खोल दरीत कोसळली होती. गाडी चालवणारा तो गेस्ट जिवंत होता परंतु त्याच्या शरिराची इतकी मोडतोड झाली होती की, त्याला अतिदक्षता विभागात दाखल होते. त्याची पत्नी देखिल गंभिर जखमी होती. फक्त त्याचा मुलगा आणि फारुकभाई यांचा भाचा सही सलामत होते. या घटनेमुळे फारुक भाई तिकडे हॉस्पिटल मध्ये गेले होते. 
     आज आठवले यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सकाळी त्यांना औक्षण करुन झाले होते. आता संध्याकाळी कापण्यासाठी केक आला होता. परंतु घडलेल्या प्रसंगाचे त्यावर सावट आले होते. रात्री जेवण्यापूर्वी केक कापण्याचा कार्यक्रम झाला. जेवणात स्विट देखिल केले होते. रात्री आम्ही झोपेपर्यंत फारुकभाई हॉस्पिटल मधुन आले नव्हते. वास्तविक आज आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते हाऊसबोटला लाईटिंग करणार होते. स्वत: गिटार वाजवुन बर्थ डे गीत गाणार होते. परंतु तो योग नव्हता.
     आधी ऑर्डर दिल्याप्रमाणे सुकामेव्याची पार्सल आलेली होती त्याचा हिशेब पूर्ण केला गेला. सकाळी काढलेल्या फोटोच्यादेखिल प्रिंट आलेल्या होत्या. काहीजणांनी कपडे धुण्यासाठी आणि इस्त्री करीता दिले होते ते देखिल आले होते. या सगळ्याचा हिशेब पूर्ण करुन रात्री झोपायला साडे दहा वाजले. आज श्रीनगर येथिल मुक्कामाची अखेरची रात्र होती. उद्या पहलगाम गाठायचे होते.
*******
    


रविवार, २५ मार्च, २०१८

हिमालयाच्या सहवासात भाग ६


              ६) सोनमर्ग दर्शन                 
     आज दिनांक १९ मार्च. आज सकाळी सहा वाजताच जाग आली. थंडी प्रचंड होती. काल रात्री श्रीनगरला पोचल्याचा केदारला फोन केला तेव्हा मी नेट चालू केले होते. तेव्हा तापमान आठ अंश सेल्सीएस एवढे होते. आज सकाळी बघितले तेव्हा ४ अंश सेल्सिएस होते. बाहेर बघितले तो रिमझिम पाऊस चालू झालेला होता. सात वाजता गरम पाणी चालू झाल्यावर सर्व प्रातर्विधी उरकले. आंघोळ दाढी झाल्यावर बाहेर डेकवर आलो.
      डेकवर गुडमार्निंग करायला फारुकभाई हजर होते. त्यांनी काश्मिरी स्पेशल घोंगडीसारखा दिसणार डगला घातला होता. त्या डगल्याच्या आतमध्ये काश्मिरी कांग्री (शेगडी) घेतली होती. एकुणच त्यांनी थंडीचा पुरता बंदोबस्त केला होता. त्यांच्या बरोबरच गप्पा मारत गरमा गरम चहा घेतला.
      रात्री हाऊस बोटवर आलो तेव्हा एकतर काळोख होता आणि दिवसभराच्या प्रवासाने आलेल्या थकव्यामुळे आजुबाजुला काही बघितले नव्हते. आता वातावरण आल्हाद दायक होते. फारुकभाईंशी चर्चा करता करता त्यांनी आम्ही रहात असलल्या दाल सरोवराची माहिती दिली. सरोवराची लांबी ७.४४ किलोमिटर तर रुंदी ३.५ किलोमिटर एवढी आहे. त्याचे क्षेत्रफळ २२ किलोमिटर एवढे होते. हे सरोवर कमित कमी ४.७ फुट तर जास्तित जास्त २० फुट एवढे खोल आहे. या सरोवरातिल पाण्याचा साठा ८७३ दशलक्ष घन मिटर एवढा असतो.
      या सरोवरात दोन बेटे असुन त्यांची नांवे सोना आणि रुपा अशी आहेत. जेव्हा तापमान उणे अकरा सेल्सिएस होते तेव्ह सर्व सरोवर गोठलेल्या अवस्थेत असते. या सरोवरा मधिल पाण पृष्टभागावर जरी स्थिर दिसत असले तरी त्याच्या अंतर्गत प्रवाह आहेत. दाल सरोवराचे मूळ नांव महासरित असे होते. पौराणिक कथेनुसार दाल सरोवराच्या पूर्व भागात असलेल्या इसबार या गावात माता दुर्गादेवीचा निवास होता. दाल सरोवराच्या किनाऱ्यावरील त्या जागेला सूरेश्वरी असे संबोधले जायचे.
     ब्रिटीश साम्राज्याच्या काळात त्या काळातिल डोग्रा महाराजांनी काश्मिर घाटीमध्ये घरे बांधण्यासाठी आणि मालमत्ता बनविण्यासाठी बंदी घातली होती. त्या नियमाला पळवाट म्हणून ब्रिटिशांनी दाल सरोवरात हाऊस बोटी बांधल्या. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ती तरंगती घरे काश्मिरी हाजी लोकांनी आपल्या मालकीच्या करुन घेतली. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करुन त्यावर बागा, दुकाने आणि घरे तयार केली.
      सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर कांदा पोहे, ब्रेड बटर जाम असा नाश्ता झाला. त्यावर चहा कॉफी झाल्यावर दाल सरोवराच्या किनाऱ्यावर जाण्याकरीता दोन छोटे शिकारे आले. त्यात बसुन सर्वजण परत सात नंबरच्या गेटवर आलो. तेथे बस तयारच होती. त्यात बसुन सर्वजण सोनमर्गच्या दिशेने निघालो.
     सोनमर्ग याचा अर्थ सोनेरी गवताचे मैदान. काश्मिरी भाषेत मर्ग या शब्दाचा अर्थ आहे, गवताचे मैदान. हे स्थळ श्रीनगरच्या उत्तर पूर्वेला ८७ किलोमिटर अंतरावर आहे. सोनमर्ग मधिल सिंध घाटी काश्मिर मधिल सर्वात मोठी घाटी आहे. सोनमर्ग हे समुद्रसपाटी पासून सुमारे तिन हजार मिटर उंचीवर असणारे एक रमणिय स्थान आहे. सिंधु नदीच्या दोन्ही बाजुच्या किनाऱ्यावर पसरलेले हे मर्ग सोन्यापेक्षाही सुंदर दिसते.
     सोनमर्गला जायच्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती. घाटी चढायला सुरवात केल्यावर जिकडे तिकडे बर्फच बर्फ दिसत होता. सोनमर्ग मध्ये पोचल्यावर तेथिल स्थळे पहाण्याकरीता आम्ही नेलेली गाडी उपयोगी नव्हती. त्याचप्रमाणे बर्फात फिरण्याकरीता आमचे रेग्युलर शूज देखिल उपयोगी नव्हते. त्यामुळे बर्फात चालता येईल असे गमबुट भाड्याने घेतले. त्याचप्रमाणे बर्फात चालू शकेल अशी चेन लावलेली फोरव्हीलरही भाड्याने ठरवली. प्रत्येक ठिकाणी बार्गेनिंग कंपलसरी होते. या बाबतित तेथिल लोकांचे म्हणणे असे की, आम्हाला आमचा वर्षभराचा गुजारा याच्यावरच करावा लागतो त्यामुळे जास्तित जास्त पैसे कसे मिळतिल हे आम्ही बघतो. कारण पर्यटनाचा सिझन काही वर्षभर नसतो.
     येथे आम्ही पब्लिक पार्क, राम तेरी गंगा मैली हो गयी या सिनेमाचे शूटींग जेथे झाले तो स्पॉट, पाकीस्थान मध्ये उगम पाऊन सोनमर्ग मधून वहात जाणारी निलम नदी ही ठिकाणे पाहिली. ही नदी गोठलेल्या स्वरुपात पहायला मिळाली. या शिवाय गडसर लेक, विशनसर लेक, बालतल व्हॅली, कृष्णसर लेक ही प्रेक्षणिय स्थळे आहेत. परंतु कालच झालेल्या स्नो फॉल मुळे सगळीकडे बर्फाचे साम्राज्य होते. त्यामुळे काही ठिकाणी जाणे आम्हीच रद्द केले, तर अर्थ स्लायडींग झालेले असल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी जाऊ दिले नाही.
     सोनमर्गमध्ये सगळ्यात जास्त वेळ आम्ही पब्लिक पार्क मध्ये घालवला. गाडीतुन उतरल्यापासुन फोटो आणि व्हीडिओ काढायचा प्रत्येकाने सपाटाच लावला.  या ठिकाणचे वातावरणच असे आल्हाददायक होते की, प्रत्येकातले लहान मुल जागे झाले होते. एकमेकांच्या अंगावर बर्फ उडवणे, बर्फात लोळणे अशा खेळात प्रत्येकजण आपले वय विसरुन बर्फात रमु लागला. श्रीवर्धनला येणारे जसे समुद्र पाहिल्यावर वेडे होतात तसेच आमचे झाले होते. समुद्र आम्हाला रोजचाच असल्याने त्याचे आम्हाला अप्रुप नव्हते परंतु ज्यांनी कधी समुद्रच पाहिला नाही त्याला त्याचे वेड लागणारच. हे आम्हाला आत्ता जाणवले, कारण बर्फ पाहून आम्ही देखिल असेच वेड्यासारखे वागत होतो.
     सोनमर्ग येथे अक्रोड, चिड, देवदार, चिनार आणि विलो या झाडांची गर्दी दिसत होती. काही काही झाडे तर प्रचंड मोठे वृक्ष झालेले दिसत होते. येथे देखिल विलो लागडांचे बॅट बनविण्याकरीता ठराविक आकाराचे तुकडे रचुन ठेवलेले आढळले. त्या रचुन ठेवलेल्या लाकडांवर बर्फाचे थरावर थर पसरलेले दिसत होते.
     बर्फामध्ये भरपुर वेळ घालवल्यावर श्रीनगरच्या दिशेने परतिचा प्रवास सुरु केला. परत जाताना श्रीनगर मध्ये थोडे मार्केटिंग करायचे होते. त्याचप्रमाणे येथिल प्रसिद्ध शकराचार्य मंदिरालाही भेट द्यायची होती. परंतु गाडीचे काम निघाल्याने त्यातच वेळ गेला. नंतर काळोख पडला. त्यामुळे दुसऱ्या कुठेही न जाता परत मुक्कामी हाऊस बोटवर गेलो.
     हाऊस बोटीत आल्यावर चहा कॉफी झाली. दरम्यान हवेतिल गारवा वाढायला लागला होता. तापमान सहा अंश सेल्सिएस एवढे खाली आले होते. गॅस हिटरच्या उबेत उद्याचा कार्यक्रम ठरवणे सुरु होते. उद्या आमचे एक सहप्रवासी सुरेश आठवले यांचा वाढदिवस होता. त्यामुळे उद्याचा मेनू आणि  वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजनही करणे चालू होते. 
            दरम्यान एक फोटोग्राफर काश्मिरी ड्रेस घेऊन फोटो काढायला आला होता. सर्वांनाच काश्मिरी ड्रेस मध्ये फोटो काढायचे होते. परंतु तो फोटोग्राफर अव्वाच्या सव्वा पैसे सांगत होता. त्यामुळे येथेही बार्गेनिंग करुन पन्नास रुपये एका फोटाचा दर ठरवुन त्याला सकाळी यायला सांगितले. त्यानंतर एक विक्रेता हार, बांगड्या वगैरे प्रसाधन साहित्य घेऊन विक्रीकरीता आला होता. मग सर्व महिला मंडळ त्याच्या भोवती बसुन निरनिराळ्या वस्तू पाहून त्याचे बार्गेनिंग करुन खरेदी करु लागले.
     काश्मिर मध्ये आल्यावर प्रत्येकालाच येथिल अक्रोड, केशर, जर्दाळु, बदाम यासारखा येथिल प्रसिद्ध सुकामेवा खरेदी करायचा होता. परंतु खात्रीलायक आणि वाजवी किंमतीत कसा मिळणार याचा प्रश्न होता. परंतु हा प्रश्न फारुकभाईंच्या मिसेसनी सोडवला. त्यांच्या भावाचा या सर्व वस्तुंचा बिझिनेस होता. त्यांनी एक दिवस आधी ऑर्डर दिली तर या सर्व वस्तू वाजवी दरात आणि उत्तम दर्जाच्या आपल्या हाऊसबोटवरच उपलब्ध करुन देईन असे आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो.
     रात्री जेवण झाल्यावर उद्याचा कार्यक्रमाबद्दल चर्चा करुन आणि तो निश्चित करुन सगळेजण झोपायला निघाले. उद्या गुलमर्गला जायचे होते. शिवाय उद्या काश्मिरी ड्रेसमधले फोटो काढायला फोटो ग्राफर येणार होता. त्याचप्रमाणे काश्मिरी साड्या घेऊन एक विक्रेताही हाऊसबोटवर येणार होता. श्रीनगर दर्शनाचा कार्यक्रमही उद्याच होता. असा भरगच्च कार्यक्रम उद्याकरीता ठरवला होता. त्यामुळे उद्या लवकरात लवकर तयार होणे गरजेचे होते. त्याकरता वेळेवर झोपणे जरुरी होते. एकमेकांना गुड नाईटकरुन सर्वजण आपापल्या रुममध्ये गेले.

*******

हिमालयाच्या सहवासात भाग १७


१७) सहलीकरीता केलेला प्रवास
प्रवासाची तारीख
प्रवासाचा टप्पा
अंतर
प्रवासाचे वाहन
१३/३
जांनगर ते बडोदा
४२६
भारतिय रेल्वे
१४/३
बडोदा ते कत्रा
१६४८
भारतिय रेल्बे
१६/३
कत्रा ते वैष्णोदेवी आणि परत
३२
मिनी बस
१७/३
कत्रा ते पटणी टॉप
८०
मिनी बस
१८/३
पटणी टॉप ते श्रीनगर
१८५
मिनी बस
१९/३
श्रीनगर ते सोनमर्ग
८०
मिनी बस
सोनमर्ग ते श्रीनगर
८०
२०/३
श्रीनगर ते गुलमर्ग
५०
मिनी बस
गुलमर्ग ते श्रीनगर
५०
२१/३
श्रीनगर ते पहलगाम
९०
मिनी बस
२२/३
पहलगाम ते जम्मु
२८३
मिनी बस
२३/३
जम्मु ते डलहौसी



१७१
मिनी बस
२४/३
डलहौसी ते खज्जर लेक
खज्जर लेक ते काला टॉप
२१
३३
मिनी बस

काला टॉप ते भालेई माता
५५

भालेई माता ते पठाणकोट
११०
२५/३
पठाणकोट ते पंचफुला, धरमशाला
८८

मिनी बस
पंचफुला ते भगसु नाग
१०
भगसु नाग ते छिलगारी
छिलगारी ते चामुंडा
१३
२६/३
चामुंडा ते बज्रेश्वरी
१९
मिनी बस
बज्रेश्वरी ते ज्वालामुखी
२५
२७/३
ज्वालामुखी ते चितपूर्णी
३५
मिनी बस
चितपूर्णी ते वाघा बॉर्डर
१९२
वाघा बॉर्डर ते अमृतसर
३५
२८/३
अमृतसर दर्शन
१५
मिनी बस
२९/३
अमृतसर ते कुरुक्षेत्र
३००
मिनी बस
कुरुक्षेत्र ते पानिपत कालाआम
८०
३०/३
पानिपत ते अहमदाबाद
१६९
भारतिय रेल्वे
३१/३
अहमदाबाद ते जामनगर
९४८
भारतिय रेल्वे