शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

समर्थ रामदास स्वामी विरचित करूणा स्तोत्रे

 


समर्थ रामदासस्वामी विरचित 

करूणास्तोत्रे 

।। श्रीराम समर्थ ।।

प्रास्ताविक

     समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या साहित्याचा आपण आस्वाद घेत आहोत. समर्थांनी उदंड साहित्य निर्माण केले आहे. त्यातिल अल्पस्वल्प साहित्याचा आपण परिचय करून घेत आहोत. समर्थांच्या साहित्याचे नुसते वाचन करायचे म्हटले तरी एक जन्म पुरणार नाही. त्यांनी अनेक विषयांत अनेक प्रकारचे लेखन केले आहे.

      या भागात आपण समर्थांनी लिहिलेल्या करूणा स्तोत्रांचा आस्वाद घेणार आहोत. वास्तविक या प्रकाराला करूणाष्टके असे संबोधले जाते. परंतु या लेखात समाविष्ट केलेली करूणाष्टके ही अष्टक या प्रकारांत मोडणारी नाहीत. अष्टक म्हणजे आठ श्लोक असलेली फारतर नववा फलश्रुती श्लोक इतकेच मोठे असते. म्हणून आपण या प्रकाराला करूणास्तोत्रे असे म्हणूया.

      समर्थ हृदय नानासाहेब देवांनी करूणास्तोत्रांची व्याख्या अशी केली आहे. ते म्हणतात, करूणाष्टके म्हणजे करूणाघन परमेश्वरास, आपल्या उपास्य दैवतास, अथवा आपल्या सद्गुरूंस परोपरीने प्रेमभराने आळवीणारी कविता. आपल्यामधिल दुर्गुणांची जाणिव झाल्यावर जो पश्चाताप किंवा अनुताप होतो, तो व्यक्त करण्यासाठी जे काव्य स्फुरते ते म्हणजे करूणाष्टक. पश्चाताप दग्ध भावनेने जर करूणा स्तोत्रे आळवली तर आपल्या मना मधिल किल्मिश येणाऱ्या अश्रूंबरोब वाहून जाते. स्वत:मधिल कमतरतेची कबुली परमेश्वराजवळ देऊन त्या कमरतेची परिपूर्ती करण्याची बुध्दी आणि त्या परमेश्वराजवळ मागणे म्हणजे करूणागान. ते गाताना परमेश्वराशी अनन्यता साधली तर साधकाची आर्त हाक  परमेश्वराजवळ नक्की पोचते.

      या करूणास्तोत्रांमध्ये मला भावलेली स्तोत्रे घेतली आहेत. करूणास्तोत्रे नेमकी कीती आहेत या संबंधी अनेक मते आहेत. मी निवडलेल्या स्तोत्रांमधली काही स्तोत्रे करूणास्तोत्राच्या व्याख्येत बसत नाहीत परंतु ही सर्व स्तोत्रे समर्थहृदय नानासाहेब देवांनी संकलीत केलेल्या करूणाष्टके, धाट्या सवाया या ग्रंथामधुन घेतली आहेत.

 

                                          अनिल अनंत वाकणकर, श्रीमंत पेशवे मार्ग

श्रीवर्धन, जिल्हा- रायगड.

aawakankar@gmail.com

 

    

 

१. नमन.

 

नमूं फर्शपाणी नमूं यंत्रपाणी । नमूं मोक्षपाणी नमूं चापपाणी ।

नमूं चक्रपाणी नमूं शूळपाणी । नमूं दंडपाणी हरिमूलपाणी ।।१।।

नमूं आदिमाता नमूं योगमाता । नमूं वेदमाता नमूं विश्वमाता ।

नमूं भक्तिमाता नमूं मुक्तिमाता । नमूं सज्जनाची कृपा ज्ञानमाता ।।२।।

नमूं योगरूपी नमूं ज्ञानरूपी । नमूं संतरूपी नमूं ध्यानरूपी ।

नमूं दिव्यरूपी नमूं विश्वरूपी । नमूं येकरूपी गुरु सस्वरूपी ।।३।।

नमूं संतयोगी नमूं सिध्दयोगी । नमू भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।

नमूं आत्मनिष्ठा नमूं योगनिष्ठां । नमूं सर्वश्रेष्ठां वरिष्ठां वरिष्ठां ।।४।।

मनी चिंतितां राम विश्राम वाटे । जगज्जाळ जंजाळ हे सर्व तूटे ।

तुटे काळजी काळ जिंकावयाची । फुटे वृत्ति अर्थांतरी जावयाची ।।५।।

 

२. गणेशाची प्रार्थना

 

गणपती मति दे मज लाघवी । जनकजा पतिचा लघुसा कवी ।

विनवितों करुणाळय कारणा । परम सुंदर दे मज धारणा ।।१।।

सबळ रामकथा वदतां नये । म्हणुनि वांछितसे तुझिये दये ।

विधिसुते स्वहिते करुणालये । हरिजना विजयो तुजला जये ।।२।।

बहुत वाड पवाड वदों कसे । कवित जाडकळा हृदई नसे ।

बहुत हीण कठीण सुलक्षणु । रघुविराकरितां चि सुलक्षणु ।।३।।

बहुत सेवक त्याहुनि हीण मी । बहुत सेवक त्याहुनि दीन मी ।

बहुत काय वदों गुण आपुले । पतित ते मजहूनि भले भले ।।४।।

पतित दास जनीं तुमचे खरे । पतितपावन नाम कसें उरे ।

वचन लागतसे पाहातां धुरे । नुधरितां ब्रिद हे तुमचे नुरे ।।५।।

 

. गणेश वंदन

विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळपाहे ।

विनांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरीन साहे ।।१।।

गंडस्थळे झिरपती बहु वास जेथें । सुवासमस्त रिझले अळिकूळ तेथें ।

शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा । तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा ।।२।।

फर्सा पुसूनि सरसावतसे अघाला । भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला ।

साठीसहस्र गण त्यांसरिसा निघाला । मूषकवाहन करी दुरितासि हाला ।।३।।

वीतंडसा बलयंड गिरितुल्य धांवे । भक्तांसि रक्षित रिपूवरि तो उठावे ।

अंदूस तोडरगुणे करितो चपेटा । गर्जिनल्या घणघणाट प्रचंड घंटा ।।४।।

ध्यानीं धरील नरकुंजर बुध्दिदाता । त्याची फिटे अबलिळा सकढक चिंता ।

आधीं गणेश सकळांपुजणेंचि लागे । दासां मनीं तजविजा ओवजा न लागे ।।५।।

 

४. गणेश शारदा सद्‌गुरु.

 

गजवदन विराजे रंगसाहित्य माजे ।

रतिपतिगति लाजे लुब्ध कैळासराजे ।

फरश कमळ साजे तोडरीं बीद गाजे ।

सिध्दि बुध्दि अबळा जेपावती विश्वबीजें ।।१।।

नटवर नटनाट्ये नाट्यनटांगसंगी ।

गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी ।

अभिनव नटलीळा रंगणी रंग माजे ।

चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ।।२।।

हरिसुतदुहिता ते मुख्य आधीं नमावी ।

मग सुगमपथीं हे सीघ्र काळे गावी ।

मतिकमळ विकासे सर्व साहित्यभासे ।

दुरित सकळ नासे स्वस्वरूपी विळासे ।।३।।

तुजविण मति माझी मंदली शारदांबे ।

लमंचग जगदंबे तूं करीं वो विलंबें ।

प्रगट रुप करावें वैखरीमाजि आतां ।

अगणित गुण गातां तोषवीं बुध्दिमंता ।।४।।

अगणित सुखदाता त्यासि वंदीन आतां ।

शुभ लिखित विधाता शीकवी धातमाता ।

गुरुवचनबळे हा साधका मोक्ष लाभे ।

विमळ भजनलीळा अंतरामाजि शोभे ।।५।।

 

५. विमळ विवेक.

 

गजमुख सुखदाता मानसीं आठवावा ।

मग विमळमतीचा योग पुढे करावा ।

सुरवर मुनि योगी वंदिती धुंडिराजा ।

सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ।।१।।

खळखळ खळयोगें वाउगी होत आहे ।

तळमळ मळ पोटीं सज्जनांते न साहे ।

मळमळ करिताहे तें कदाही न राहे ।

परि विमळविवेकें कल्पना स्थीर राहे ।।२।।

चटपट विषयांची सर्व सोडूनि द्यावी ।

वटवट न करावी भक्ति भावें कराबी ।

खटपट हटयोगें कामना ते नसावी ।

झटपट श्रवणाची सार चित्तीं वसावी ।।३।।

जपतजपत काचा मेळ त्या मातृकांचा ।

निगमगुज फुकाचा योग सी सुखाचा ।

सकलभुवनवासी चूकलासी तयासी ।

हर हर हर कासी सर्वदा तूजपासी ।।४।।

 

६. रघुपति तनुरंगें रंगली नीळशोभा

 

रघुपति तनुरंगें रंगली नीळशोभा । रघुपतिरुप योगें सर्वलावण्य गाभा ।

रघुपतिगुण गंधे धैर्य गांभीर्य लोकीं । रघुपति मम चित्तीं बैसला येकनेकीं ।।१।।

त्रैलोक्यनाथ रघुनाथ अनाथबंधू । त्रैलोक्यनाथ रघुनाथ करुणासिंधू ।

त्रैलोक्यनाथ रघुनाथ कोदंडधारी । त्रैलोक्यनाथ रघुनाथ लीळावतारी ।।२।।

रघुपति पदयुग्मीं लीन भावे असावें । रविकुळ टिळकाचें नाम वाचे वसावें ।

श्रवणमनन भावें आदरेसीं करावें । परम सुख समाधी संतसंगें तरावें ।।३।।

तुजविण सिण जाला धांव रे रामराया । कठिण दिवस जातो तापली सर्व काया ।

सकळ विकळ गात्र अवस्था लागली रे।तुजविण जगदीशा बुध्दि हे भंगली रे ।।४।।

 

७. गूज हें सज्जनाचें.

 

वदनिं मदन इंदू तूळितांही तुळेना ।

अगणितगुण सिंधू बिंदु तो वर्णवेना ।

सकळ भुवन पाळी ऊपमा काय द्यावी ।

विकळ शरिरभावे भावितां चित्त गोवी ।।१।।

दशशतवदनाचा धीर मेरू बळाचा ।

परम कुशळ वाचा शेष सर्वोत्तमाचा ।

अगणित गुणमुद्रा शोधितां त्या नरेंद्रा ।

अकळ विकळभावे जाहला गुणनिद्रा ।।२।।

स्मरण स्मररिपूचें वीषहर्ते वपूचें ।

निजबिज निगमाचे सार सर्वागमांचें ।

मन त्रिभुवनाचे गूज योगीजनाचें ।

जिवन जड जिवांचें नाम या राघवाचें ।।३।।

हरिजन भजनाचा होय साक्षी मनाचा ।

सकळ त्रिभुवनाचा प्राण साधूजनांचा ।

परिहरिभजनाचा आखिलासे दिनाचा ।

घननिळ गगनाचा रंग सर्वोत्तमाचा ।।४।।

विधिकुळ भुषणाचे धाम सर्वांगुणांचें ।

भरण अभरणाचें सर्वलावण्य साचें ।

सुख परमसुखाचे ध्येय ब्रह्मादिकांचें ।

भजन हरिजनाचें गूज हें सज्जनाचें ।।५।।

 

८. शीतल छाया.

 

रघुविर भजनाची मानसीं प्रीति लागो ।

रघुविर स्मरणाची अंतरीं वृत्ति जागो ।

रघुविरचरणाची वासना वास मागो ।

रघुविरगुण गातां वाणि हे नित्य रंगो ।।१।।

चतुरपण जनी हे पाहता आडळेना ।

निकट रघुविराचें रूप कैसे कळेना ।

चपळमन वळेना गर्वताठा गळेना ।

तुजविण जगदीशा कर्मरेखा टळेना ।।२।।

तरुणपण देहाचें लापता वेळ नाहीं ।

तनमनधन अंतीं वोसरे सर्वकाहीं ।

सकळ जन बुडाले, व्यर्थ मायाप्रवाहीं ।

झडकरि सुमना रे हीत शोधूनि पाही ।।३।।

पळपळ चळताहे बाळ तारुण्य देहीं ।

तळमळ विषयांची नेणवे हीत काहीं ।

लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे ।

जळजळ शितळा हे भक्तिसेउनि राहे ।।४।।

दिनकरकुळवल्ली लोटली अंगभारें ।

रघुविरअवतार दाटली थोरथोरें ।

सुखरूप सुखवासी राहिले योगरासी ।

सफळ सितळ छाया फावली रामदासी ।।५।।

 

९. श्रीरामाचे उपकार.

 

हिणाहून मी हीण जैसे भिकारी । दिनाहून मी दीन नाना विकारी ।

पतीतांसि रे आणि हातीं धरावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ।।१।।

जनीं भक्ति नाहीं मनीं भाव नाहीं । मला युक्ति ना बुध्दि काहींच नाहीं ।

कृपाळूपणे राज्य रंकासि द्यावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ।।२।।

बहुसाल अन्याय कोट्यानकोटी । रघूनायके घातलें सर्व पोटीं ।

किती काय गूणांसि म्यां आठवावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ।।३।।

समर्थे दिल्हें सौख्य नानापरीचें । सदा सर्वदा जाणसी अंतरीचें ।

लळे पाळिले तूं कृपाळू स्वभावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ।।४।।

दिनानाथ हे ब्रीद त्वां साच केलें । म्हणे दास भक्तांसि रे उध्दरीलें ।

सुखें सांडणे या देह्याचें करावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ।।५।।

 

१०. प्रभु दर्शन.

नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी । उदासीन जो वीतरागी विरागी ।

जनस्थान गोदातटीं वास केला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ।।१।।

लिळाविग्रही देव ब्रह्मादिकांचा । सदा बोलणे चालणे सत्य वाचा ।

जया चिंतितां चंद्रमौळी निवाला । प्रभु देखिला दास संतुष्ट जाला ।।२।।

दिनानाथ विख्यात हे नाम साजे । प्रजापाळकू रामराजा विराजे ।

बहू सुकृताचा बरा काळ आला । प्रभु देखिला दास संतुष्ट जाला ।।३।।

जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा । सुखें चालती स्वर्गिच्या स्वर्गवाटा ।

प्रतापें चि त्रैलोक्य आनंदवीला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ।।४।।

ऋषी तापसी योगरासी विळासी । मनीं चिंतिती राम लावण्यरासी ।

असंभाव्य त्या कीर्तिच्या कीर्तिढाला । प्रभू देखिला दास संतुष्ट जाला ।।५।।

 

११. जगज्जोति

वसे मुख्य नेत्री तथा शब्दश्रोत्री । सदा सर्व गात्री दिसे प्राणिमात्री ।

पहा येकतंत्री फिरे देहयंत्री । जगज्जोति हिंडे कुपात्री सुपात्री ।।१।।

पहा तर्कशास्त्री पहा न्यायशास्त्रीं । पहा शिल्पिशास्त्रीं पहा सर्व शास्त्रीं  

पहा मंत्रयंत्री पहा सूत्रमात्रीं । पहा मूळमंत्री अरत्री परत्रीं ।।२।।

पहा वेदशास्त्रीं पहा शास्त्रमात्रीं । पहा कीर्तिमात्री पहा काव्यमात्री ।

पहा ग्रंथमात्रीं पहा लोकमात्रीं । पहा शब्दमात्रीं सुचित्रीं विचित्रीं ।।३।।

कुवर्णी सुवर्णी पहा वर्णवर्णी । अकर्णी विकर्णी च कर्णोपकर्णी ।

कितीयेक धर्णी किती वृक्षपर्णी । बहू जीव ते दाटले व्योमकर्णी ।।४।।

समस्तांसि कर्णे समस्तासि धर्णें । समस्तासि हर्णे समस्ता विवर्णे ।

जगज्जोतिने राखिले आपणासी । म्हणे दास हे सौख्यरासी विळासी ।।५।।

 

१२. परमार्थाचे भोजन

 

सुखे वाढिती ते मुखे संत साधु । असंभाव्य हा ज्ञानबोधु अगाधु ।

रुची भोजनाची मिठी प्राप्त जाली । भले जेविले वृत्ति त्यांची निवाली ।।१।।

कितीयेक ते स्वाद नाना प्रकारें । महांयोग्य ते जेविती श्रोत्रद्वारे ।

मनामाजि संतोष त्या भोजनाचा । गळाल्या महांमौन्य चत्वार वाचा ।।२।।

कितीयेक ते सारिली स्थळ भक्षें । बहुतांपरीची बहूतें सलक्षें ।

बरा वेळिला भात तो सूक्षमाचा । सुवासें चबाबीतसे साधनाथा ।।३।।

बहूतां व्रतांच्या कितीयेक शाखा । कितीयेक मंत्रावळी लौण शाखा ।

वरान्नें क्षिरी वाढिती कामनेच्या । कितीयेक तीर्थावळी रायत्यांच्या ।।४।।

रुचीची कथी सद्य दध्योदनें तें । सुवासें जळें निर्मळें घेति शांतें।

बहू भोजनें पालटे सर्व काया । म्हणे दास कल्याण हो रामराया ।।५।।

 

१३. खरा देव

जनीं लोचनीं पाहतां दीसताहे । तया नाश काळांतरी होत आहे ।

अवीनाश तो कोण आधीं पहावा । खरा देव तो आदरें वोळखावा ।।१।।

जनीं धुंडितां देव नाना परीचे । बहू धातु पाषाण कां मृत्तिकेचे ।

जया खेव तो देव कैसा म्हणावा। खरा देव तो आदरें वोळखावा ।।२।।

बहू देव ते जन्मले आणि मेले । असंख्यात होणार होऊनि गेले।

जया नाश तो जाण मिथ्या म्हणावा। खरा देव तो आदरें वोळखावा ।।३।।

जगीं धुंडितां पंडितां आडळेना । कदा सद्गुरूवीण ठाई पडेना।

सदा सर्वदा तो चि धुंडीत जावा । खरा देव तो आदरें बोळखावा ।।४।।

जयावीण कोठें रिता ठाव नाहीं । तया शोधितां तो चि होऊनि राही ।

म्हणे दास विश्वास भावें धरावा । खरा देव तो आदरें वोळखावा ।।५।।

 

१४. समर्थांची इच्छा

सीवणा मनाचा विपरीतवाणा । उदास वाटे बहुसाल प्राणा ।

मग राघवा रे तुज बाहिलों रे । कृपाळुवें सत्वर पाहिलों रे ।।१।।

देवें दयाळे करुणा करावी। भक्ताभिमानें भरणी भरावी ।

हे रामनौमी तरणी तरावी । दासां समस्तां वरणी वरावी ।।२।।

रघुनाथदासा कल्याण व्हावें। अती सौख्य व्हावें आनंदवावें ।

उद्वेग नासो वर शत्रु नासो। नानाविळासें मग तो विळासो ।।३।।

कोडें' नको रे कळहो नको रे । कापट्य कर्मी सहसा नको रे ।

निर्वाणचिंता निरसीं अनंता । शरणागतां दे बहु घातमाता ।।४।।

अजयो न हो रे जयवंत हो रे । आपदा नको रे बहु भाग्य हो रे ।

श्रीमंतकारी जनहीतकारी । परऊपकारी हरि दास तारीं ।।५।।

 

१५. श्रीसमर्थांची निष्ठा.

 

तुज वर्णितों भाट मी देवराया । सदा सर्वदा गाय ब्रीदें सवाया ।

महाराज दे आंगिचे वस्त्र आतां । बहू जीर्ण जाली देहेबुध्दिकंथा ।।१।।

तुझा भिक्षकू दातया रामचंद्रा । सदा स्वस्थ चिंतीतसे गा महींद्रा ।

राजाधीश देशा उरपूर्ण द्यावें । भवदैन्य हें देशधाडी करावें ।।२।।

तुझा भृत्य मी भार्गवादर्पजीता । जीवित्व असे अपिलें तूज आतां ।

भवा जिंकितां जीव देईन पाहें । तुज सन्मुख पाठिसी स्थीर राहे ।।३।।

रघुनायेका नीकट दास तूझा । तुला वीकिलासे स्वयें देह माझा ।

सदा सर्वभावें करी दास्य तूझें । देई आपुलें वेसवेतन माझें ।।४।।

तुझे मारुतीसारिखें दास देवा । मज मानवा किंकरा कोण केवा ।

दिनानाथ विख्यात हे ब्रीद गाजे । तेणें मानसी थोर आनंद माजे ।।५।।

 

१६. चाफळी श्रीरामांचे आगमन.

 

लवे नेत्रपातें स्फुरे आजि बाहे । दिनानाथ हा राम येणार आहे ।

जयाचेनि योगें सुखानंद लोटे । तया देखतां अंतरीं वाष्प दाटे ।।१।।

लळे पाळितो राम आम्हां दिनांचे । कृपासागरू भाव जाणे मनाचे ।

नुपेक्षी कदा संकटीं धांव घाली । तया देखतां मानसें तें निवालीं ।।२।।

लगा पाहतां राघवेंवीण नाहीं । निराधार हे पाहतां सर्व कांहीं ।

चळेना जनीं तोचि आश्रो धरावा । रघूराज आधार याचा करावा ।।३।।

लपावें अती आदरें रामरूपीं । भयातीत निश्चींत ये स्वस्वरूपीं ।

कदा तो जनीं पाहतां ही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्न भावें वसेना ।।४।।

लघूलाघवी राम कोदंडधारी । मनी चिंतितां शोक संताप हारी ।

महां संकटें नाम घेतां निवारी । भवसागरीं मूढ पाषाणतारी ।।५।।

 

१७. श्रीरामाचे ब्रीद.

 

चकोरासि चंद्रोदईं सूख जैसें । रघूनायका देखता सूख तैसें ।

सगूणासि लांचावलें स्थीर राहे । रघूनंदनेंवीण कांहीं न राहे ।।१।।

चळेना समरंगणी ठाण मागें । चळेना मुखें बोलतां वाक्य यूगें ।

चळेना कृपासिंधु कल्पांतकाळीं । रघूराज हा आदरें दास पाळी ।।२।।

चमत्कारलें चित्त हे रामगूणीं । उठे कीर्ति वाखाणितां प्रीति दूणी ।

रघूनायकासारिखा देव नाहीं । क्रिया पाहतां चोखडी सर्व कांहीं ।।३।।

चळेना कदा राज्य बीभीषणाचें । चळेना देहे चालतां मारुतीचें ।

चळेना गती राहतां नामछंदीं । चळेना सिमा घातली श्वेतुबंदीं ।।४।।

चपेटा विझे काळमाथां जयाचा । धरीं रे मना पंथ या राघवाचा ।

विवेकी जनें राजपंथें चि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।।५।।

विवेकी जने राजपंथें चि जावें । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।।५।।

 

१८. रामरूप.

 

परमसुंदर रूपश्यामळ । इंद्रनीळकिळकांति कोमळ ।

भयनिवारण भक्तवत्सळ । चरपराक्रम कीर्तिवीमळ ।।१।।

भुवनकंटकदैत्यमारक । अमरमोचन दैन्यहारक ।

दुरितनाशन पुण्यकारक । हरितसंकट दासतारक ।।२।।

विकटविषमताळछेदक । बरअनावदैत्यभेदक ।

वशमुखांतकसीरच्छेदक । ऋषिमुनीजनचित्तवेधक ।।३।।

अमरभूषण उत्तमोत्तम । भुवनपाळक हा रघूत्तम ।

विरवीरांतक हा वीरोत्तम । असुर अंतक हा वरोत्तम ।।४।।

बहुतपीडकदैत्यभंजन । ऋषिमुनीजनयोगिरंजन ।

दुरितदानवदुष्टभंजन । अतुळकीर्तन व्यस्तव्यंजन ।।५।।

 

१९. परशुरामाची प्रार्थना

 

महांकोप अग्नी ऋसी जामदग्नी । समर्था तया जाणिजे सर्वसूज्ञी ।

सदा सर्वदा घेतसे नाम तूझें । वरिष्ठा स्वभावेंचि हे गोत्र माझें ।।१।।

वसे सागराचें तिरी सूत तूझा । समाचार तो घेत नाहीं च माझा ।

तयाला बहुतांपरी सीकवावें । स्वभावें चि वाढेंल ऐसें करावें ।।२।।

किती येक मागें बहू युध्द केलें । कितीवेळ या ब्राह्मणा राज्य दिल्हें ।

अकस्मात सामर्थ्य तें काय जालें । युगासारिखें काय नेणों विझालें ।।३।।

चिरंजीव आहेसि ऐसी वदंती । समर्था तुझें चित्तकाठिण्य कीती ।

तुझें नामधारी तुला हे कळेना । कृपाळूपणे चित्त कैसे वळेना ।।४।।

नको रे उदासीन हे वाक्य मानी । समर्था असावें बहू साभिमानी ।

करावी दिनानाथ हे सत्य वाचा । तुला चिंतितों दास मी राघवाचा ।।५।।

 

२०. उदासीन हा काळ कोठे न कंठे.

 

समाधान साधुजनाचेनि योगें । परी मागुतें दुःख होतें वियोगें ।

घडीने घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ।।१।।

घरें सुंदरें सौख्य नाना परीचें । परी कोण जाणेल तें अंतरीचें ।

मनी आठवीतां चि तो कंठ दाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ।।२।।

बळें लावितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहि केल्या घडेना ।

नव्हे धीर नैनीं सदा नीर लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।।३।।

अवस्था मनी लागली काय सांगों । गुणी गुंतला हेत कोण्हासि मागों ।

बहुसाल भेटावया प्राण फूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।।४।।

कृपाळूपणे भेट रे रामराया । वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया ।

जनामाजि लौकीक हा ही न सूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।।५।।

अहा रे विधी त्वां असें काय केलें । पराधेनता पाप माझें उदेलें ।

बहुतांमधे चूकतां तूक तूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ६ ।।

समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी ।

घडेना तुझा योग हा प्राप्त खोटें । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ७ ।।

अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझी भेटि काया पडावी ।

दिसेंदीस आयुष्य हे वेर्थ आटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ८ ।।

भजों काय सर्वोपरी हीण देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा ।

म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ९ ।।

म्हणे दास मी वास पाहें दयाळा । रघुनायका भक्तपाळा भुपाळा ।

पहावें तुला हे जिवीं आर्त मोठे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। १० ।।

 

२१. तुजवीण रामा मज कंठवेना.

 

तुझिया वियोगें जीवित्व आलें । शरीरंपांगें बहु दुःख जालें ।

अज्ञान दारिद्य माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।।१।।

परतंत्र जीणें कंठू किती रे । उच्चाट माझे मनीं वाटतो रे ।

ललाटरेखा जपीं पालटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।।२।।

जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाहीं बहुसाल बाधी ।

स्वामी वियोगें पळही गमेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।।३।।

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं ।

स्वहीत माझें होतां दिसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।।४।।

विषई जनानं मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें ।

समईं बहुक्रोध शांती घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।।५।।

सदृढ जाली देहेबुधि देहीं । वैराग्य काही होणार नाहीं ।

अपूर्ण कामीं मन हे विटेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।। ६ ।।

निरूपणीं हे सदवृत्ति होते । स्थळत्याग होतां सवेंचि जाते ।

काये करूं रे किया घडेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।। ७ ।।

संसारसंगें बहु पीडलों रे । कारुण्यसिंधु मज सोडवीं रे ।

कृपाकटाक्षे सांभाळी दीना । तुजवीण रामा मज कंठवेना ।। ८ ।।

जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा । भवसिंधु हा रे मज तारि हेळा ।

धारिष्ट माझे हृदई वसेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।। ९ ।।

आम्हां अनाथां तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ।

दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ।। १० ।।

 

२२. रघुनायका मागणे हेचि आता.

 

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी ।

सदा प्रीति लागो तुझे गूण गातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ।।१।।

तुझें रूपडे लोचनीं म्यां पहावें । तुझे गुण गातां मनासी रहावें ।

उठो आवडी भक्तिपंथेंचि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ।।२।।

मनी वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवें पूरवावी ।

वसावें मज अंतरीं नाम घेतां । रघुनायका मागणें हेंचि आतां ।।३।।

सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।

नुपेक्षीं मज गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आतां ।।४।।

नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ।

सगुणी मज लावि रे भक्तिपंथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ।।५।।

भवें व्यापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्वचिता हराबी ।

मज संकटीं सोडवावें समर्था । रघुनायका मागणें हेंचि आतां ।। ६ ।।

मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुध्दी कुडी वासना नीरसाबी ।

नको संशयो तोडिं संसारव्यथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ।। ७ ।।

समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।

पुढे संशयो नीरसी सर्व चिंता । रघुनायका मागणें हेंचि आतां ।। ८ ।।

ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उध्दरावें ।

सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां । रघुनायका मागणें हेंचि आता ।। ९ ।।

 

२३. रामपंचायतन.

 

देवालये परम सुंदर दीपमाळा । वृंदावनें रमणिय वरधर्मशाळा ।

राजांगणे समघनें भुमिका सुढाळा । पुंजाळ ते झळकती बहु रत्न माळा ।।१।।

सुवर्णवर्ण बहुवर्ण किरणें अपारें । मिश्रीत ते तळपती घन थोरथोरें ।

उंचावले गगन त्याहुनि उंच भासे । मुक्ताफळी जडित मंडप तो विळासे ।।२।।

सिंहासनावरि रघूत्तस मध्यभागीं । बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागीं ।

वन्हीसुता निकट शोभत वाममार्गी । वीलासतो भिम भयानक पूर्वभागीं ।।३।।

मार्तडमंडप उर्दडचि सौख्यकारी । त्रैलोक्यपावन प्रभू दुरितें निवारी ।

ध्यातो सदाशिव अखंडित चापपाणी । ऊदंड कीर्ति निगमी महिमा पुराणीं ।।४।।

आनंदकंद रघुनंदन शोभताहे । कंवर्पकोटि वदनीं उपमा न साहे ।

आकर्ण पूर्णनयनीं रमणीय शोभा । विस्तीर्ण कीर्ण भुषणी जगदीश उभा ।।५।।

 

२४. रविकुळटिळक.

रविकुळटिळकाचे रूपलावण्य पाहे ।

रविकुळटिळकाचे चिंतनी चित्त रहे ।

रविकुळटिळकाची कीर्ति जीवीं भरावी ।

रविकुळटिळकाची मूर्ति ध्यानीं धरावी ।।१।।

कमळनयनरामे वेधिले पूर्णकामें ।

सकळभयविरामे राम विश्रामधामे ।

घननिळतनुश्यामें चित्ततोर्षे आरामें ।

भुवनभजननेमें तारिले दास रामें ।।२।।

बहुविध भजनाची दैवतें पाहिली हो ।

सकळ त्यजुनि रामी वृत्ति हेराहिली हो ।

विमळगुणशिळाची लागली प्रीति मोठी ।

विमळ हृदय होतां उध्दरे कूळकोटी ।।३।।

विमळगुणशिळाचे आदरें गुण गावे ।

विमळगुणशिळाचे दास वाचे वदावे ।

विमळगुणशिळाचा अंतरीं वेध लागो ।

विमळगुणशिळाचा रंगणीं रंग गाजो ।।४।।

सकळगुणनिधीचा राम लावण्यसिंधू ।

अगणित गणवेना शक्तिरूपें अगाधू ।

प्रबळ बळ चळेना वाउगें व्यर्थ कामीं ।

झणउनि मन रामी लागले पूणेकामीं ।।५।।

परमसुखनदीचा मानसीं पूर लोटे ।

घननिळतनु जेव्हां अंतरी राम भेटे ।

सुख परमसुखाचे सर्व लावण्य साचें ।

स्वरुप जगदिशाचें ध्यान त्या ईश्वराचें ।। ६ ।।

मधुकर मन माझें रामपादांबुजी हो ।

सगुण गुण निजांगें नित्य रंगोनि राहो ।

अचपळ गुणगुणी बैसली प्रीति दूणी ।

शरणचरणभावें जाहला राम ऋणी ।। ७ ।।

रघुपति गुणरंगें पाविजे भक्तिसंगें ।

भजन जनतरंगें सर्व सांडुनि मागें ।

अनुदिन वितरागें योगयागे विरागें ।

प्रगट तरत संगें सर्वदासानुरागें ।। ८ ।।

रघुवरपर आतां कीर्तनीं गूण गावे ।

मथन त्रिभुवनाचे सर्व साहित्य फावे ।

सकळ जन तरावे वंश ही उध्दरावे ।

स्वजन जन करावें रामरूपी भरावें ।। ९ ।।

सकळ भुवन तारी राम लीळावतारी ।

भवभय अपहारी राम कोदंडधारी ।

मनन करि मना रे धीर हे वासना रे ।

रघुविरभजनाची हे धरीं कामना रे ।। १० ।।

 

२५. अनुदिनि अनुतापे तापलो रामराया

 

अनुदिनिं अनुतापे तापलो रामराया ।

परम दिनदयाळा नीरसी मोहमाया ।

चपळ मन माझे नावरे आवरीतां ।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ।।१।।

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।

स्वजनजनधनाचा व्यर्थं म्यां स्वार्थ केला ।

रघुपति मति माझी आपलीसी करावी ।

सकळ त्यजुनि भावें कास तुझी धरावी ।।२।।

विषयजनिसूखें सूख होणार नाहीं ।

तुजविण रघुनाथा वोखटे सर्व कांहीं ।

रघुकुळटिळका रे हीत माझे करावें ।

दुरित दुरि हरावें स्वस्वरूपीं भरावें ।।३।।

तनु मन धन माझें राघवा रूप तूझें ।

तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें ।

प्रचलित न करावी सर्वथा बुध्दि माझी ।

अचळ भजनलीला लागली आस तूझी ।।४।।

चपळपण मनाचे मोडितां मोडवेना |

सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना ।

घडि घडि विघडेहा निश्चयो अंतरींचा ।

म्हणवुनि करुणा हे बोलतो दीनवाचा ।।५।।

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी ।

मजवरि करुणेच्चा राघवा पूर छोटी ।

तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू ।

षडरिपुकुळ माझें तोडिं यांचा समंधू ।। ६ ।।

तुजविण करूणा हे कोण जाणल माझी ।

शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी ।

झडकरि झडघाली धांव पंचाननारे |

तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ।।७ ।।

सबळ जनक माझा राम लावण्यपेटी ।

म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी ।

दिवस गणित बोटी ठेवुनि प्राण कंठी ।

अवचट मज भेटी होत घालीन मीठी ।। ८ ।।

जननिजनकमाया लेकरूं काय जाणे ।

पय न लगत मूखी हाणितां वत्स नेणे ।

जलधरकण आशा लागली चातकासी ।

दिनकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ।। ९ ।।

तुजविण मज तैसे जाहले रामराया।

विलग विषमकाळी सांडिती सर्व माया ।

सकळजनसखा तूं स्वामि आणिक नाहीं ।

विषय वमन जैसे त्यागिले सर्व कांहीं ।। १० ।।

स्वजनजन धनाचा कोण संतोष आहे।

रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे।

जिवलग जिव घेती येत सांडून जाती।

विषय सकळ नेती मागुता जन्म देती ।। ११ ।।

सकळ जन भवाचे अखिले वैभवाचे ।

जिवलग मज कैचे चालते हेचि साचे ।

विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी ।

रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ।। १२ ।।

सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले ।

भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले ।

भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना ।

परम कठिण देही देहबुध्दी गळेना ।। १३ ।।

उपरति मज रामीं जाहली पूर्ण कामीं ।

सकळजनविरामी राम विश्रामधामी ।

घडि घडि मन आतां रामरूपी भरावें ।

रघुकुळटिळका रे आपुलेसें करावें ।। १४ ।।

जळचर जळवासी नेणती त्या जळासी ।

निशिदिनि तुजपासीं चूकलो गुणराशी ।

भूमिधरनिगमांसी वर्णवेना तयांसी ।

सकळभुवनवासी भेटि दे रामदासीं ।।१५।।

 

२६. झडकरि मज रामा सोडवीं

वरुण वदन वापीमाजि जिव्हास्वरूपी ।

मुख वसत तदापी वैखरी कोकिळापी ।

मधुर मधुर कुंजे नाम या राघवाचें ।

निववी वसत संती श्रोतयां सज्जनाचें ।।१।।

ममवदनसरोजी षटपदें शारदांबे ।

रघुपतिगुण रुंझे तूं न गुंते विलंबे ।

तंववरि करि लाहो प्राण जै अर्क आहे ।

प्रचलित समयीं आकर्षणे स्थीर राहे ।।२।।

वणवण विषयांची सर्वथा ही शमेना ।

अनुदिन मोहमाया लागली हे तुटेना ।

झडकरि मज रामा सोडवीं पूर्णकामा ।

तुजविण गुणधामा कोण रक्षील आम्हां ।।३।।

विषयविष वमा कल्पनेला दमावें ।

निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावें ।

भवभय निरसावें साधुसंगी वसावें ।

सगुणभजन द्यावें स्वामि देवाधिदेवें ।।४।।

विगळित मन माझे तूं करीं देवराया ।

हरिभजन कराया पाहिजे दृढ काया ।

निरुपण विवराया तर्कपंथेचि जाया ।

रघुपतिगुणछाया चित्त माझे निवाया ।।५।।

 

२७. नाथलोकत्रयाचा.

 

हरि हरि दुरितें तो स्वामि वैकुंठराजा । सुरवर नर पाळीं शोभती चारी भूजा ।

झळफटित किळा हे हेमरत्नांबरांचा । परम कुशळ शोभे नाथ लोकत्रयाचा ।।१।।

शमशम विषयांची काहि केल्यां शमेना । आचपळ मन माझें साजणी हे दमेना ।

अनुदिन मज पोटीं दुःख तेही वमेना । तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना ।।२।।

विषम गति मनाची ते मला आवरेना। शरिर विकळ कामें तें कदा सावरेना ।

सुख दुःख मज माझें वाढिलें तेंचि जेऊं । रघुपति! तुजला रे कासया बोल ठेऊं।।३।।

नवस हरिकथेचे राम भक्ती करावे । कठिण विषम काळीं मम जीवीं धरावे । विविध सकळ कांहीं दोष नासोनि जाती । रघुविरभजने हो कामना पूर्ण होती ।।४।।

 

२८. तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलो.

 

असंख्यात रे भक्त होऊनि गेले । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ।

नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों।।१।।

बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरीं भेटि नाहीं जनांसी ।

स्थिती ऐकतां थोर विस्मीत जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ।।२।।

सदा प्रेमरासी तयां भेटलासी । तुझ्या दर्शनं स्पर्शने सौख्यराशी ।

अहंतामनी शब्दज्ञाने बुडालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ।।३।।

तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ।

बहु धारणा थोर चक्कीत जाला । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ।।४।।

बहूसाल देवालय हाटकाची । रसाळा कळा लाघवें नाटकाचीं ।

पुजा देखतां जाड जीवीं गळाला । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ।।५।।

कितेकी देहे त्यागिले तूजलागीं । पुढें जाहले संगतीचे विभागी ।

देहेदुःख होतांचि वेगीं पळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला ।। ६ ।।

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती ।

परस्तावलों कावलों तप्त जालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आला ।। ७ ।।

सदासर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझे दास आम्ही निकामी ।

बहु स्वार्थबुध्दीन रे कष्टवीलों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ।। ८ ।।

 

२९. श्रीरामावर भार.

 

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांहीं । नसे प्रेम हे राम विश्राम नाहीं ।

असा दीन अज्ञान मी दास तुझा । समर्था जनी घेतला भार माझा ।।१।।

रघुनायका जन्मजन्मांतरीचा । अहंभाव छेदानि टाकी दिनाचा ।

जनीं बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लेश नाहीं तयाचा ।।२।।

दिनाचे उणे दीसता लाज कोणा । जगीं दास दीसे तुझा दन्यवाणा ।

शिरी स्वामि तूं राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाहीं सदा शीघ्र कोपी ।।३।।

रघुनायका दीन हातीं धरावें । अहंभाव छेदोनियां उध्दरावें ।

अगूणी तयालागि गूणी करावें । समर्थे भवसागरी ऊतरावें ।।४।।

किती भार घालू रघूनायकाला । मजकारणे शीण होतील त्याला ।

दिनानाथ हा संकटीं धाव घाली । तयाचेचि हे सर्व काया निवाली ।।५।।

मला कोवसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिंता ।

समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदासर्वदा नाम वाचे वदावें ।। ६ ।।

 

३०. बुध्दि दे रघुनायका

 

युक्ति नाहीं बुध्दि नाहीं विद्या नाहीं विवंचितां ।

नेणता भक्त मी तूझा बुध्दि दे रघुनायका ।।१।।

मन हे आवरेना कीं । वासना वावडे सदा ।

कल्पना धावतें सैरा । बुध्दि दे रघुनायाका ।।२।।

अन्न नाहीं वस्त्र नाही । सौख्य नाहीं जनांमध्ये ।

आश्रयो पाहतां नाही । बुध्दि दे रघुनायाका ।।३।।

बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना ।

बहु मी पीडिलों लोकीं । बुध्दि दे रघुनायका ।। ४।।

तुझा मी टोणपा झालों । कष्टलों बहुतां परी।

सौख्य तें पाहतां नाहीं । बुध्दि दे रघुनायका ।।५।।

नेटकें लिहितां येना वाचितां चूकतों सदा ।

अर्थ तो सांगतां येना बुध्दि दे रघुनायका ।। ।।

प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घसूचना |

मैत्रिकी राखितां येना बुध्दि दे रघुनायका ।। ।।

कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू ।

प्रत्यहीं पोट सोडीना । बुध्दि दे रघुनायका ।। ८ ।।

संसार नेटका नाहीं उद्वेग वाटतो जिवीं ।

परमार्थू कळेना की बुध्दि दे रघुनायका ।। ।।

देईना पूरविना कोणी । उगेचि जन हांसती ।

विसरू पडेना पोटीं । बुध्दि दे रघुनायका ।। १० ।।

पिशनें वाटती सर्वै । कोणीही मजला नसे ।

समर्था तूं दयासिंधू । बुध्दि दे रघुनायका ।। ११ ।।

उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे ।

तूं भक्तवत्सला देवा बुध्दि दे रघुनायका ।। १२ ।।

काया वाचा मनोभावें तुझा मी म्हणवीतसें ।

हे लाज तुजला माझी बुध्दि दे रघुनायका ।। १३ ।।

मुक्त केल्या देवकोटि भूभार फेडिला बळें ।

भक्तासि आश्रयो मोठा बुध्दि दे रघुनायका ।। १४ ।।

भक्त उदंड तुम्हाला आम्हांला कोण पूसतें।

ब्रीद हैं राखर्णे आधीं बुध्दि दे रघुनायका ।। १ ।।

उदंड ऐकिली कीर्ती पतीतपावना प्रभो

मी एक रंक दुर्बुद्धी बुध्दि दे रघुनायका ।। १ ।।

आशा हे लागली मोठी दयाळूत्रा दया करी।

आणखी न गे कांहीं बुध्दि दे रघुना यका ।। १ ।।

रामदास म्हणे माझा संसार तुज लागला

संशयो वाटतो पोटी बुध्दि दे रघुनायका ।। १ ।।

 

३१. रघूनायका काय कैसे करावें.

 

उदासीन हा काळ जातो गमेना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना ।

उठे मानसीं सर्व सोडोनि जावें । रघूनायका काय कैसे करावें ।।१।।

जनीं बोलता बोलतां वीट बाटे । नसे अंतरीं सूख कोठे न कंठे ।

घडीने घडी चित्त कीती धरावें । रघुनायका काय कैसे करावें ।।२।।

बहू पाहता अंतरी कोंड होतो । शरीरास तो हेत सांडोनि जातो ।

उपाधीस देखोनि वाटे सरावें । रघूनायका काय कैसें करावें ।।३।।

अवस्था मनीं होय नानापरीची । किती काय सांगूं गती अंतरींची ।

विवेकेंचि या मानसा आवरावें । रघुनायका काय कैसें करावें ।।४।।

म्हणे दास ऊदास जालों दयाळा । जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा ।

तुझा मी तुला पूसतों प्रेमभावें । रघुनायका काय कैसें करावें ।।५।।

 

३२. प्रपंचाचें वेड

 

बाबा काका माउसा मित्र मामा । दादा नाना मेहुणा पुत्र शामा ।

ताता जीजी गोत ज्यामात साडु । नातू भाचे पूतणे हा पवाडु ।।१।।

आया बाया माउशा पूतणीया । काक्या माम्या सासुवा मेहुणीया ।

आज्या आता भाचिया आणि सूता । सूना कांता गोत्रजी त्या बहुता।।२।।

ऐसीयांचीं सोइरीये प्रपंचीं । नांवें घेती सर्व नानापरीचीं ।

लोभें लोभे गुंतलें चीत येथें । कोण्ही नाहीं राघवेंवीण तेथें ।।३।।

छेत्र्या घोडी वैभवे फार जालीं । त्यांचे मेटी सोइरी सर्व आलीं ।

साली धाली कैचपैची मिळालीं । वाखा होतां सर्व सेखीं पळालीं ।।४।।

येका पोटाकारणे सर्व काहीं । ये संसारी पाहतां सूख नाहीं ।

देवा देवा काय होईल कैसें । ऐसें तेसे लागले हें चि पीसें ।।५।।

 

३३. देहकर्म

 

जिवा जाळितां पोळितां काय होतें । मतीमंद ते चर्फडीतें पिडीतें।

भला तो बरा सार वीचार सांगे । खुणे पावतां पोर संसार भंगे ।।१।।

देहे आटितां पीटितां सीण होतो । दिसेंदीस तो काळ ही वेर्थ जातो।

न पाहेशि तूं सर्व शोधूनि सत्या । करीतोसि कां रे बळे आत्महत्या ।।२।।

देहे दंडितां कोण खंडील कर्मा । चुके वर्म तो कोण धर्मा अधर्मा ।

कळेना जया देव तो पापरूपीं । अमें भूलला पाप संताप कोपी ।।३।।

भले सांगती संतसंगें चि जावें । विवेकें देहे देवकाजीं झिजावें ।

जनीं वाउगा भार आभार कोण्हा । नव्हे मान्य संसार हा दैन्यवाणा।।४।।

म्हणे दास लोकांस कां वोसणावें । चुके वर्म रे कर्ममार्गें सिणावें ।

देहेकर्म देवासि पावेल कैसें । नव्हे कीं भले लागलें सर्व पीसें ।।५।।

 

३३. सर्वोत्तमा कै मज भेटि देसी.

 

दुःखानळें मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं ।

आधार तुझा मज मी विदेसी । सर्वोत्तमा कै मज भेटि देसी ।।१।।

प्रारब्ध खोटें अभिमान आला । स्वामीसमर्था वियोग जाला ।

तेणें बहु क्षीति वाटे मनासी । सर्वोत्तमा कै मज भेटि देसी ।।२।।

तुझिया वियोगें बहु वेदना रे । विवेक नाहीं आम्हां दिनारे ।

पडिला समंधु या दुर्जनेसीं । सर्वोत्तमा कै मज भेटि देसी ।।३।।

संसारचिंता मज वाटते रे । रामा प्रपची मन जातसे रे ।

संसर्ग आहे इतरां जनासीं । सर्वोत्तमा कै मज भेटि देसी ।।४।।

३४. उदासीन हे वृत्ति कोठे न लागे.

रघुनायेकावीण हा शीण आहे । सदा सर्वदा रंग वोरंगताहे ।

निशिदीन या राघवाच्या वियोगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।।१।।

गुणी गुंतलें चित्त हे आवरेना । तयावीण आणीक कांहीं स्मरेना ।

समाधान हे होय त्याचेंनि संगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।।२।।

मनी प्रीति हे लागली राघवाची । सदानंद हे राम मूर्ती सुखाची ।

पदार्थी बळें लावितां चित्त भंगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।।३।।

मनीं आठवीतां समाधान वाटे । तया देखतां संशयो सर्व तूटे ।

न लिंपे कदा चित्त दुश्चित भंगे । उदासीन हे वृत्ति कोठें न लागे ।।४।।

मनीं तुंत अनंत या राघवाचा । तट किंत तो नावडे या भवाचा ।

सदा सर्वदा अंतरी राम जागे । उदासीन हे वृत्ति कोठं न लागे ।।५।।

मनी नावडे द्रव्य दारा पसारा । मनीं नावडे मायिकांचा उबारा ।

मनी नावडे भोग हा राजयोगें । उदासीन हे वृत्ति कोठं न लागे ।। ६ ।।

जनी पाहतां भेदबुद्धी अनेका । मदमत्सरे निंदिती येकमेकां ।

घडे त्याग याकारणें  लागवेगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।। ७ ।।

बहुसाल हे बोलणें आवडेना । जनीं वासना शब्दज्ञानें पडेना ।

क्रियेवीण ते बोलतां चित्त भंगे । उदासीन हे वृत्तिं कोठे न लागे ।। ८ ।।

मनीं सर्वथा सत्य तें सांडवेना । मनीं सर्वथा मिथ्य ते मांडवेना ।

समाधान ते योगसंगे निसंगें । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।। ९ ।।

जनासारिखें बोलणें ही घडेना । म्हणोनी जनीं सर्वथा ही पडेना ।

अहंतागुणें बुध्दि वीवाद लागे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।। १० ।।

उपाधीगु्णें सत्य तें मिथ्य होतें । उपाधीगुण मिथ्य तें सत्य होते ।

उपाधीगुणें येक रंगे विरंग । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।। ११ ।।

उपाधीगुणें लागतो पक्ष घेणें । उपाधीगुण सत्य सोडून देणें ।

उपाधीगुणें वीषयीं जीव रंगे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।। १२ ।।

उपाधीगुणें सर्व सोसीत जावें । उपाधीगुणे मानवाधेन व्हावें ।

उपाधीगुणें वेर्थ हा स्वार्थ लागे । उदासीन हे वृत्ति कोठे न लागे ।। १३ ।।

मनी सांडितां संगव्याधी उपाधी । पुढे सांपडे राम कारुण्यनीधी ।

विवेके मनींचा अहंभाव भंगे । उदासीन हे वृत्ति कोठें न लागे ।। १४ ।।

पराधीनता राम-दासी घडेना । देहे चालतां रामभक्ति उडेना ।

उभा राम सांभाळितो पृष्ठभागें । उदासीन हे वृत्ति को न लागे ।। १५ ।।

 

३५. श्रीराम राम हे म्हणा.

सुरेंद्र चंद्रशेखरु । अखंड ध्यातसे हरु ।

जनांसि सांगतो खुणा । श्री राम राम हे म्हणा ।।१।।

महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।

सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हे म्हणा ।।२।।

विषें बहूत जाळिलें । विशेष अंग पोळलें ।

प्रचीत माझिया मना । श्री राम राम हे म्हणा ।।३।।

विशाळ व्याळं व्यस्त की । नदी खळाळ मस्तकीं ।

ऋषीभविष्यकारणा । श्री राम राम हे म्हणा ।।४।।

बहुत प्रेत्न पाहिलं । परंतु सर्व राहिले ।

विबूधपक्षरक्षणा । श्री राम राम हे म्हणा ।।५।।

अपाय होत चूकला । उपाय हा भला भला ।

नसे जयासि तूळणा । श्री राम राम हें म्हणा ।। ६ ।।

विरांमधे विरोत्तमु । विशेष हा रघूत्तमु ।

सकाम काळ आंकणा । श्री राम राम हे म्हणा ।। ७ ।।

बहूत पाहिलें खरें । परंतु दोनि आक्षरें ।

चुकेल यमयातना । श्री राम राम हे म्हणा ।। ८ ।।

मनी धरुनि साक्षपें । अखंड नाम हे जप ।

मनांतरी क्षणक्षणा । श्री राम राम हें म्हणा ।। ९ ।।

देहे धरूनि वानरी । अखंड दास्य मी करीं ।

विमुक्त राज्य रावणा । श्री राम राम हें म्हणा ।। १० ।।

 

३६. रामभक्ताची योग्यता.

 

श्रीराम भक्तमूळ रे । प्रसन्न सानुकूळ रे ।

समर्थ तो तयागुणें । समस्त होय ठेंगणें ।। १।।

प्रपंच संचितां हरी। विसंचितां बरोबरीं ।

दयाळ तो परोपर्री । विशाळ सेवकां करी ।।२।।

समस्त ही पदें पदें। प्रभूपदेचि वीशदें ।

विचार सार जोडला । सदृश्यभास मोडला ।।३।।

तदूपरी विवंचना | विचार आणितां मना ।

मनास ठाव नाडळे । विशेष हेतही गळे ।।४।।

विवेक हा भला मला । उदंड राम देखिला ।

पदीं अनन्य मीळणी । उरी नसे दुजेपणीं ।।५।।

विचार सार सारसा ।  करील कोण फारसा।

बळें बळेंचि नीवळे । कळे कळेचि आकळे ।। ६ ।।

 

३७. रडका संसार

नसे आंथराया नसे पांघराया । नसे धाम ना दृढ छ्याया निजाया।

नसे अन्न खाया नसे रम्य जाया । वृथा सीण संसार कर्ती रडाया ।।१।।

नसे द्रव्य कांहीं घरीं धान्य नाहीं । बहू वेष्टिला कामक्रोधादि देहीं ।

पराधेनता वेळ नाहीं मराया । वृथा सीण संसार कर्ती रडाया ।।२।।

मनासारिखा मित्र तो ही मिळेना । परत्रीक तें ज्ञान पोटीं वसेना।

सदा कोप आरोप संतप्त काया । वृथा सीण संसार कर्ती रडाया ।।३।।

मनासारिखा सोइरा ही मिळेना । मनीं पाहतां चित्तशुद्धी असेना ।

उणें बोलती सर्व काहीं छळाया। वृथा सीण संसार कर्ती रडाया ।।४।।

म्हणे दास हे आस कैसी पहा हो । सुखाची बहू होतसे श्लाघ्यता हो ।

पुढें जाहली सर्व काया पडाया। वृथा सीण संसार कर्ती रडाया ।।५।।

 

३८. देहावस्था

 

निमाले किती शास्त्रिचा शोध घेतां । जनीं मूर्ख हो कायसा बोल आतां ।

वृथा वाढवीती देद्याची अहंता । रुदंती करी लागतां देहचिंता ।।१।।

देहे चालतां सर्व ही सूख आहे । देहे खंगतां कोण संनीध राहे ।

मिळालीं सखीं चोरटीं वैभवाचीं । भले जाणती दायकें हीं भवाचीं ।।२।।

जयाकारणें सर्व चिंता करावी । सदा संगती दुर्जनाची धरावी ।

जयाकारणें भोगणें दुःख देहीं । तथा वैभव गेलियां चाड नाहीं ।।३।।

न पाहे कदा देव तारुण्यकाळीं । देहे खंगतां सर्व जाती उमाळी ।

बराडी दिसे वापुडे दैन्यवाणें । तयालागि सांभाळिजे काय कोणें ।।४।।

उठे गर्व हा सर्व तारुण्यकाळीं । मदें मातलें चित्त है काममेळीं ।

विकारें मनीं देव तो आठवेना । पुढे अंतकाळी स्मरेना स्मरेना ।।५।।

 

३९. गर्व

 

बहु थोर मी शूर मी शाहणा मी। बहु दक्ष मी धूर्त मी जाणता नी।

बहु नाटकु नेटकु चाळकु मी। बहुतांमध्ये मान्यसौजन्य तो मी।।१।।

बहु बोलणे नीट नेमस्त माझें । वहु चालणे सत्य नेमस्त माझें ।

बहुसाल संगीत कर्तुत्व माझे।  बहुतांमधे गोड हें सर्व माझे ।।२।।

बहू चांगली वांगली नेटकी मी। बहु जाणती जाण च्यातुर्य ते नी ।

बहु बोलकी चालकी सुग्रिणी मी। बहु भाग्य सौभाग्य लावण्य ते मी ।।३।।

बहुसाल हें गोजिरें मूल माझें । बहु सासुरें थोर माहेर माझें ।

बहुतांमधें उंच तें कूळ माझें । बहु गोत माझें बरें सर्व माझें ।।४।।

मी माझें मी माझें चि हें सौख्य वाटे। विटे गर्व काळांतरीं सौख्य आटे।

म्हणे दास विश्वास हा कासयाचा। जनीं सार तें काय ऐसें विवंचा ।।५।।

 

४०. सेखीं जिवे सांडुनि सर्व जावे ।

 

अनेक दिव्यांवर रत्नमाळा । सिंह्यासनीं फांकति रम्य कीळा ।

शरीर तें ही लागे तजावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।१।।

सर्वत्र हें वैभव ईश्वराचें । अनुमात्र तें ही नाहीं जिवाचें ।

जन्मासि येतां उघडें चि यावें। सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।२।।

मधे चि हे सर्व निर्माण जालें । रुणानुबंधें सकळै मिळालें ।

अज्ञानयोगें ममता भ्रमावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।३।।

जितां जिवातें बहुसाल चित्तीं । करणें घडे हो धन हांव कीर्ती ।

कटीसूत्र तें ही तोडूनि द्यावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।४।।

माता पिता ईतर थोरथोरें । देह्यांतकाळीं मिळती अपारें ।

कौतुक तेहीं सकळै पहावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।५।।

शरीरपांगें बहु सीण जाला । सखीं म्हणोनी बहुसाल केला ।

तेहीं समस्तीं सुखें रहावें। सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।। ६ ।।

तारुण्यकाळी मद आवरेना । वृद्धाप्यकाळीं कांहीं स्मरेना ।

स्वहित तें ही लोभें चुकावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।। ७ ।।

सांडूनियां वोळखी ईश्वराची । जन्मूनि चिंता केली जयाची ।

निष्ठूर तेही सकळै फिरावें । सेखी जिवें सांडुनि सर्व जावें ।। ८ ।।

संसारचिंता ऐसीं कराया । दुःखानळें व्याकुळ सर्व काया ।

दुजयासि जातां दुःखें रडावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।९।।

ऐकोन हे दास उदास चित्तीं । सीतापतीवांचुनि कोण अंतीं ।

वायां प्रपंचीं वृथा सिणावें । सेखीं जिवें सांडुनि सर्व जावें ।।१०।।

 

४१. परनिंदा

 

बहुतां दिसांच्या वयोवृध मूला । जनीं बायकोच्या गुणें जन्म तुला ।

तये जन्ननीच्या कुळा निंदितोसी । वृथापुष्ट तूं मानवांमाजि होसी ।।१।।

किती दींस तें वाइले पोटवोझें । पुढें जन्मतां खंडिलें नाळ तूझें ।

जिवीं दीस मागील ते आठवावे । जनीं कष्ट कुचीळ कैसे करावे ।।२।।

मळीं लोळतां घोळतां कष्टलासी । किती हागसी मूतसी वोकिलासी ।

खतें खांडकें दुख उदंड जालें । बहुतां प्रकारें तुला वाढवीलें ।।३।।

बहू जन्ननीनें तुझे कष्ट केले । बरें वोखटें सर्व साहोनि नेलें ।

मनामाजि मागील कां आठवेना। देहे पुष्ट हा वेर्थ तुझा झिजेना।।१४।।

मुढा वोंगळा वोंगळी जन्मलासी । तुझी जननी ते तुझे कष्ट सोसी ।

जनीं पाळिती सर्व नारी नरांला । तया निंदिती शुधि नाहीं खराला ।।५।।

स्वयें निंद्य तूं निंदिसी कोणकोणां । जनीं सर्व संसार हा दैन्यवाणा ।

देहे मोघळा कोथळा वांति विष्टा। किती येक दुर्गंधि वर्ती प्रतिष्टा ।।६।।

देहमात्र हा निंद्य तुला कळेना । सदा सर्वदा ताठ तुझा गळेना ।

देह्यातीत होतां बरें सूख आहे। मनामाजि हें तूं विचारूनि पाहें ।।७।।

म्हणे वंद्य मी निंद्य सर्वे परावे । तया कस्मळालागि रे काय ठावें ।

भल्यानें जनीं आपनिंदा करावी। नको रे नको वेर्थ निंदा परावी ।।८।।

पहा मास हाडे देहे कातड्याचे । भले निंदिती वंद्य कैचें मढ्याचें ।

मिळालीं मडीं बापुडीं दैन्यवाणीं। जनीं बाळ तारुण्य होती पुराणीं ।।९।।

देहेबुधि तो ज्ञान कांही पहावें । देहे नीरसावें नसावें नसावें ।

देह्यातीत आनंत शोधीत जावा। वृथा गर्व हा सर्व मागें तजावा ।। १०।।

 

 

 

४२.  निरूपणे मानस आवरावें ।

संसार माया ममता नसावी । नैराशता दुम से असावी ।

आनंदरूपी भजनी भरावें । निरूपणें मानस आवरावें ।।१।।

कल्याणकारी भवशोकहारी । सत्संगती मानव मूढ तारी।

ग्रंथांतरी अंतर वीवरावें । निरूपणे मानस आवरावें ।।२।।

परत्रिचें साधन सार आहे। नाना प्रकारीं तुळणा न साहे ।

अव्दैतबोधें श्रवणें तरावे। निरूपणे मानस आवरावें ।।३।।

सदा फिरे चंचळ वेशधारी। मनासवें आसन हें थरारी ।

निरंजनी माइक ते पहावें । निरूपणें मानस आवरावें ।।४।।

पाहावयातें नयनी दिसेना । येतः प्रसंगी पळ ही वसेना ।

तया विवेकें करी पालटावें । निरूपणें मानस आवरावें ।।५।।

नानापरी हें धरितां घरेना । कल्पीतसे तें सरतां सरेना ।

दृष्टेपणें आपण ही नुरावें । निरूपणें मानस आवरावें ।। ६ ।।

नामाथिलें साधन साधिताहे । कडाकपाटीहुन जात आहे।

ज्ञातेपणें मीपण वोसरावें । निरूपणे मानस आवरावें ।। ७ ।। 

ब्रह्मादिकां मानस आवरेना । नाना उपाई मरतां मरेना ।

तें निर्गुणीं पांगुळतां मरावें । निरूपणें मानस आवरावें ।। ८ ।।

जाले तिन्ही देव तिहीं गुणांचे । निसंग होती तरि निर्गुणाचे ।

निरावलंबीं मज मी हरावें । निरूपणे मानस आवरावें ।। ९ ।।

जनीं मनावांचुनि सूख नाहीं । मनें चि लाभे गुज सर्व कांहीं ।

परंतु तें स्वाधेन हो करावें । निरूपणे मानस आवरावें ।। १० ।।

 

४३. परम सुंदर ते पद पावसी ।

 

बहुत सार विचार करीं मना । दृढ घरी रघुनाथउपासना ।

रघुविरा भजतां चि सुखावसी । परम सुंदर तें पद पावसी ।।१।।

तनु मनु धनु वा रघुनायेका । निरवणें धरणें सुखदायका |

भवभयासि बळें मडकाविसी । परम सुंदर ते पद पावसी ।।२।।

न करितां करितां करणें घडे । न धरितां धरितां धरणें पढे ।

विवरतां सरतां सरसावसी । परम सुंदर ते पद पावसी ।।३।।

बहुत आठवलें जिविचा जिवीं । परि कदापि नये सुखपालवी |

वरदराम तरी बळकावसी । परम सुंदर तें पद पावसी ।।४।।

सुख बहुविध हें मन मागतें । झडकरी करितें हरि सांगते ।

मग मनी उगला चि उकावसी । परम सुंदर तें पद पावसी ।।५।।

अभय दे हरि बोलत बोलतां । अभय दे हरि चालत चालतां ।

अभय सूख विकास विळाससी । परम सुंदर ते पद पावसी ।।६।।

सपनिचें मनिचें जनिचें घटे । अवचितें दुचितें सुख सांपढे ।

हुडकितां बहुतांसि न फावसी । परम सुंदर तें पद पावसी ।। ७ ।।

न घडते घडवी रघुनंदनु । नुपरतें पुरवी भवकंदनु ।

निच नवा सकळां मनिं भावसी । परम सुंदर तें पद पावसी ।। ८ ।।

न तरते उदकीं जड तारिले । वनचरीं रजनीचर मारिले ।

विभिषणासरिसा च नवाजसी । परम सुंदर तें पद पावसी ।। ९ ।।

सुरपती सुरबंदविमोचना | भज मना भजतां सुख सज्जना ।

न हेसगुण दास म्हणे मग धांवसी । परम सुंदर तें पद पावसी ।। १० ।।

 

४४. दीनवत्सल देव

दीनवछल देव खरा हरी । शरणागत दीन करीं धरी ।

निजरूप स्वरूप बराबरी । करुणाघन पावन तो करी ।।१।। 

रघुनाथ सनाथ करीतसे । भवकाळ विषाळ हरीतसे ।

भवसीण कठीण कदा नसे । निजधाम दया भजकां विलसे ।।२।।

घननीळ तनू अति सांवळें । जघनिचें चिर सुंदर पींवळें ।

कटिं किंकिणि नागर वाजती । पद नेपुर बांकि झणाणिती ।।३।।

सुरभूषण राम रणांगणीं । रणकर्कश देव शिरोमणी ।

रिपु काळ कराळ विदारितो।  रणशूर रणीं मद वारितो ।।४।। 

सुरसंकटमोचन पावला । शरमार करीत उठावला ।

दशमूखकुरंग विदारिला । अमेरा पदवास विळासला ।।५।।

 

४५. संचित

 

जनीं संचितें पिंड निर्माण जाला । मनीं तें चि भोगावया जीव आला ।

शुभाशूभ होणार कांहीं कळेना । पुढें प्राप्त ब्रह्मादिकां ही टळेना ।।१।।

जिवा ऊगमीं देहनिर्माणकाळीं । विधी वोळि लेहोनि गेला कपोळीं ।

शुभाशूभ होणार कांहीं कळेना । पुढे प्राप्त ब्रह्मादिकां ही टळेना ।।२।।

समुद्रासि लंघून पैलाड गेले । परी भोगणें तें पुढें सीध ठेलें ।

शुभाशूभ होणार कांहीं कळेना । पुढें प्राप्त ब्रह्मादिकां ही टळेना ।।३।।

जनीं वैभवें थोर सायास केले । परी जीव हे मृत्यमार्गी च गेले ।

शुभाशूभ होणार कांहीं कळेना । पुढें प्राप्त ब्रह्मादिकां ही टळेना ।।४।।

म्हणे दास विश्वास नामीं धरावा । मनीं शोक अत्यंत तो ही नसावा ।

शुभाशूभ होणार कांहीं कळेना । पुढें प्राप्त ब्रह्मादिकां ही टळेना ।।५।।

 

४६. निराकार

 

निराकार आकार नाहीं जयाला । विवेकें विवंचूनि पाहें तयाला ।

तया पाहतां ऊरि नाहीं भयाला । भजावें तया मोक्षपाणी दयाळा ।।१।।

रचे तें खचे हो रचेना खचेना । असे तें नसे हो असेना नसेना ।

असे दृश्य मिथ्या नसे भास मिथ्या । मनोभास तो दृश्य हो सर्व मिथ्या ।।२।।

म्हणों साच आहे तरी नासताहे | विचारूनि पाहे दिसे तें न राहे।

किती येक होते किती येक जाते । पुढें पंचभूतें चि जाती लयातें ।।३।।

लयातीत आनंद शोधूनि पाहे । जया कल्पनालेश तो ही न साहे ।

तया कल्पितां तूं चि तद्रूप होसी । सद्रूप चिद्रूप होऊनि जासी ।।४।।

मिळाला तरी भीतरी बोध जैसा । सदा पूर्ण ब्रह्मीं मना मीळ तैसा ।

विवेकें विरावें अणू ही नुरावें । म्हणे दास भावें विभक्ती न यावे ।।५।।

 

४७. अनादि अनंत काळ

सदा सर्वदा होतसे दीनरात्री । किती येक मन्वंतरे होत जाती ।

बहू काळ गेला न ये मागुता तो । पुढे बोलतां चालतां सर्व जाते ।।१।।

पहातों जनाला किती येक जाती । तनू टाकिताहे पुढे ते पहाती ।

गताच्या कथा काढितों अल्प कांहीं । पुढे लोक ते काढिती आमुच्या ही ।।२।।

जितां तो किती घालमेली करावी । बहूतांपरी कल्पना ते धरावी ।

किती येक तें आपुलें तें परावें । जनीं सर्व सांडूनि सेखीं मरावें ।।३।।

अहा रे मना हें तुला कां कळेना । वृथा सीणसी लोभ तूझा ढळेना ।

जिणें सर्व जाईजणें दों दिसांचें । विचारी जनीं आपुलें काय कैचें ।।४।।

म्हणे दास ऊदास होई मना रे । बहूसाल चिंता नको कामना रे ।

स्वभावें चि होणार तें होइना कां । अकस्मात जाणार ते जाइना कां ।।५।।

 

४८. गेलेली घडी

 

सतीला पती दूसरा शोधवेना । दुजा जन्नकू बोलणें हें घडेना ।

जनीं सद्गुरूसारिखा कोण आहे । मनीं मानवा तूंचि शोधूनि पाहे ।।१।।

पहा तूटला तंत तो मंद वाजे । मनीं शोधितां चोरटें चित्त लाजे ।

पुन्हा सांदितां वेगळा सर्व सांदा । मुखें बोलणं वेर्थ वादा वेवादा ।।२।।

स्नेहे तूटला तो कदा ही जडेना । पुढे भेटि कल्पांतकाळी घडेना ।

मनीं तूटला तंत कैसा जडावा | पुन्हा मागुता योग कैसा घडावा ।।३।।

सुखाकारणे थोर अन्याय केला । महां लाभ तो लालचीनें बुडाला ।

बरें स्वप्नसूखासि वायां सिणावें । मनीं वेर्थ मागील कां वोसणावें ।।४।।

बहू सोसितां सोसितां सीण जाला । महां मूर्ख मी कष्टवीले तुम्हाला ।

म्हणे दास मानेल तैसे करावें । वरें वोखटें सर्व ही वीसरावें ।।५।।

 

४९. म्हणा रे म्हणा राम लीळावतारी

 

नव्हे मछ ना कूर्म वाराहरूपी । नव्हे खुजटु ना नव्हे सीघ्रकोपी ।

नव्हे मातृहंता नव्हे खर्गधारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।१।।

नव्हे बोध्य ना गोवळू कूळहंता । नव्हे दत्त दीगंवरु नग्न फिर्ता ।

नव्हे येकदंतु नव्हे त्रीपुरारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।२।।

नव्हे ईश्वरु सर्वविराटरूपी । नव्हे ज्ञान विज्ञान ध्यानस्वरूपी ।

जयो होतसे सत्वरा तत्ववारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।३।।

नव्हे सीव ना शक्ति ना वेक्ति कांहीं । नव्हे संग नीसंग ना वेंग नाहीं ।

नव्हे वाच्य ना वाचकु पै विकारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।४।।

नव्हे अंत आनंत ब्रह्मांडमाळा । नव्हे व्दैत अव्दैत अतर्क्यलीळा ।

माहां साधनें संकटें जो निवारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।५।।

नव्हे शून्य ना अन्य चैतन्यधर्ता | नव्हे उत्पतीस्छीतिसंव्हारकर्ता ।

मनीं चिंतितां शोक संताप हारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।६।।

नव्हे लक्ष आलक्ष ना पक्ष दोन्ही । नव्हे खूण निर्गुण ना गूण तीन्ही ।

नव्हे बुध्द ना मुक्त ना ना विकारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।७।।

नव्हे व्याप्य ना व्यापकु ज्ञेय ज्ञाता । नव्हे दृश्य आदृश्य ना धेय ध्याता ।

नव्हे निर्विकारी नव्हे वेशधारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।८।।

जया वर्णितां सीणली वेदश्रृती | जया दर्शनें संत आनंत होती ।

जया जाणतां जाणिवे होत हारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।९।।

असो सांगतां राम गूणासि येतो । परी गूण निर्गुण यातीत जो तो ।

जनीं सद्गुरु सेवितां दास तारी । म्हणा रे म्हणा राम लीळावतारी ।।१०।।

५०. कर्ता कोण ?

 

निराकार तें ब्रह्म आकार माया । निराभास तें ब्रह्म रे भास माया ।

परब्रह्म तें पाहतां ही दिसेना । दिसे सर्व माया चि हे नीरसेना ।।१।।

दिसे सर्व माया परी कोण कर्ता । करी सृष्टि रे कोण तो विश्वभर्ता ।

निराकार आकार होणार नाहीं । खचे दृश्य तें ब्रह्म जाणार नाहीं ।।२।।

अकर्ते कदा ब्रह्म कांहीं करीना । सदोदीत निर्धूत कांहीं धरीना ।

अविकार वीकार तेथें घडेना । करी सर्व हें कोण ठाई पडेना ।।३।।

जनीं दीसतें भासतें सत्य केलें । तिन्ही देव सामर्थ्ये ही त्यांत आलें ।

दिसे सर्व माया परी कोण कर्ता । उगी वाउगी सांगती सर्व वार्ता ।।४।।

करी सर्व माया तरी सर्व माया । तये वेगळी कोण ते सांग माया ।

दिसे सर्व माया तिनें काय केलें | वरें शोधितां वाउगें वेर्थ गेलें ।।५।।

करी सर्व ही कोण कर्ता दिसेना । मनीं बैसला संशयो नीरसेना ।

म्हणों सर्व निर्माण पांचा भुतांचें । तरी पाहतां साहवें कोण कैचें ।।६।।

अहा रे आहा रे पाहा काय कैसें । दिसे भ्रांतिचें सर्व आभाळ जैसें ।

कळाकौतुकें सर्व विस्तार केला । गमे काय कर्तार तो गुप्त जाला ।।७।।

जनीं बोलती बाळ बागूल वाचा | विचारी मनीं कोण कर्ता तयाचा ।

निराकार कीं देव कीं काय माया | वरेंसें विवंचूनि पाहे कळाया ।।८।।

कळे त्या कळे काय सांगोनि आतां । विवंचील त्या निश्चयो जातजातां ।

मनीचें मनीं सज्जनीं वोळखावें । जिवीचें जिवीं सर्व शोधूनि घ्यावें ।।९।।

म्हणे दास लोकांसि मी काय सांगों । तराया जनीं मीच कासेसि लागों ।

बरीं साक्षपें औषधें वाटवावीं । जया लागला रोग तेणें चि घ्यावीं ।।१०।।

 

५१. जनीं जाणिजे योग हा सुकृताचा

मनासारखी सुंदरा ते अनन्या । मनासारिखे पुत्र जामात कन्या ।

सदा सर्वदा बोलती रम्य वाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।१।।

मनासारिखे दीर भर्तार भावे । मनासारिखे सासुर तें असावें ।

सुखें बोलती लेश नाहीं गमाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।२।।

भलीं मायबापें भले मित्र बंधु । भले सोइरे राखती स्नेहवादु ।

मुलें लेकुरें येक मेळा सुनाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।३।।

भले धाकुटे थोरले सर्व कांहीं। भले गोत्रजु भिन्न भावार्थ नाहीं ।

अखंडीत हा काळ जातो सुखाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।४।।

गुरें वांसुरें शिंगुरें दास दासी । गुराखे सुणी मर्जरें गुणरासी ।

समो चालतो लेश नाहीं तमाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।५।।

धनें धान्य पात्रें आळंकार चीरें । विसोरे घरें सुंदरें रम्य सारें ।

देहे चालतो सर्व आरोग्य ज्याचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।६।।

यहलोकिचे लोक ते ही गुणाचे । परत्रीक ते ही बहू लक्षणाचे ।

समुदाव उछाव येका मनाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।७।।

मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी । मनासारिखे लोक शोकापहारी ।

मनासारिखा संग साधुजनाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।८।।

मनासारिखें चिंतिता देव पावे । मनासारिखे भक्त भावें मिळावे ।

सदा बोलती बोल सारांश वाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।९।।

म्हणे दास सायास केल्यां घडेना। विकल्पें जनीं येक ठांई पडेना ।

घडे योग होतां विवेकी जनाचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ।।१०।।

 

५२. अभिमान

 

बरा देह माझा बरा गूण माझा । बरा वेष हो नेटका साज माझा ।

बरा काळ माझा बरा योग माझा । बरा पाहतां सर्व संसार माझा ।।१।।

बरी चीपडें मेकडें सर्व माझीं । खतें खांडकें तें बरीं भव्य माझीं ।

पित्तें फेंपसें चारटें सर्व माझीं । वरीं अंतडी कातडी मंद माझी ।।२।।

बरा धर्म माझा बरा मूत्र माझा | बरा पू बरा वाहतो कान माझा ।

बरा वोक माझा बरा नर्क माझा । बरा खोकला दाट सेंबूड माझा ।।३।।

बरी युक्ति माझी बरी बुधि माझी । बरी वासना पाहतां स्थीति माझी ।

बरी दृष्टि माझी बरी पुष्टि माझी । बरी कांति माझी बरी शांति माझी ।।४।।

बरे हात माझे बरे पाय माझे । बरे दांत माझे बरे कान माझे ।

बरे चक्षु माझे बरे वोठ माझे । बरे शब्द माझे बरे गूण माझे ।।५।।

बरें कूळ माझें बरें गोत माझें । बरें ग्राम माझें बरें गृह माझें ।

बरें सेत माझें बरें वित्त माझें । बरें पाहतां चांगले सर्व माझें ।।६।।

बरें तें बरें दूसरे आडळेना । बरें तें बरें वीवँरें ही कळेना ।

बरें येक ते पाहतां ब्रह्म आहे । तया तूळितां तूळणा ही न साहे ।।७।।

वृथा साभिमानें चि देह्याभिमानें । वृथा थानमानें चि दुराभिमानें ।

मी मोठा मी मोठा चि हा वेर्थ ताठा । विचारेंविणे सर्व खोटा चि खोटा ।।८।।

म्हणे दास उदास आहे कळेना । चळेना ढळेना कदा आकळेना ।

तयावीण कां सीण वांयां करीता । धरेना कदा तें चि कां हो धरीता ।।९।।

 

५३. निंदक

गणनायेका दायका सर्वसिधी । प्रचंडा उदंडा मनोबोध बुधी ।

मज देइं रे नेइं रे संगव्याधी । तुटों दे तुटों दे तुटों दे उपाधी ।।१।।

नमूं येकदंता नमूं वेदमाता । नमूं मुक्तिदाता नमूं त्या अनंता ।

नमूं साधुसंतां नमूं व्यास वक्ता । नमूं सर्व श्रोता विरक्तां महंतां ।।२।।

अती वैभवें मानस रंगताहे । परी रंग वोरंगतां भंगताहे ।

म्हणोनी धरीं अंतरीं रामराणा । नको रे नको वीषई दैन्यवाणा ।।३।।

धरा रे धरा संगती सज्जनाची । जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ।

बळें भाव सद्बुधि सन्मार्ग लागे । माहांक्रूर तो काळ विक्राळ भंगे ।।४।।

करीं संग नीसंग या राघवाचा | धरा उधरा वौंश बेताळिसाचा ।

अरे जन्म जाईल हा दो दिसांचा । स्मरा मानसीं शंकरा वेदं ज्याचा ।।५।।

जया भाव त्या माव माया उपाधी । जया गर्व त्या सर्व संकल्प बाधी ।

जया दंभ स्वयंभ देहीं भुगारा । तया पामरा काळ लावी दरारा ।।६।।

नको रे नको मानवा साधुनिंदा । नको रे नको निंदितां थोर बाधा ।

जितां सीध ची यातना पावसील । अंती रवरव भोगितां जाणवेल ।।७।।

जना सज्जना निंदितां देव कोपे । करी दुर्जना दंड कृदांतरूपें ।

माहाराज तो कोपतां कोण वारी । किती मानव देहधारी भिकारी ।।८।।

केला न्याय अन्याय त्या राजपुत्रे । जन त्यासि दंडावया कोण कुत्रें ।

जरी बोलती लोक नाना विकारी । तरी दंडणा पावती राजद्वारीं ।।९।।

नरें मछरें पामरें पापरूपें । अती कर्कशें जल्पती वागजल्पें ।

तया वाजटा मर्कटा कोण पूसे | सदा सर्वदा भुंकती स्वान जैसे ।।१०।।

अती लंड तैमुंड पापांडज्ञानी । अती बंड ते भंड देह्याभिमानी ।

अती धीट त्या वीट येईल कैचा । अती बोलणें फोल वाचाळ वाचा ।।११।।

जया मानवा लागला हा चि धंदा । सदा सर्वदा मानसीं साधुनिंदा ।

सळें मछरें येति वादा वेवादा । तया जाणत्या लागली थोर बाधा ।।१२।।

कटां वाजटाचा नको संग देवा । धिटा उधटा माजि पाषांडठेवा ।

जेणें वृत्ति हे ढांसळे साधकाची । तजा रे तजा संगती बाधकाची ।।१३।।

जना दुर्जनाचा नको संग रामा । जेणें वृत्ति हे पावताहे विरामा ।

सदा सर्वदा संग दे सज्जनासी । जेणें नित्य आनंद वाटे मनासी ।।१४।।

विखारा मुखीं दुग्ध तें वीष जालें । माहां तीव्र किल्मीप बाहेर आलें ।

तसें सज्जनीं दुर्जना तोषवीलें । परी मछरें सर्व ही वेर्थ गेलें ।।१५।।

जनीं निंदितां सूटला कोण आहे । जन सर्वदा सर्व निंदून राहे ।

जया वर्णितां सीणली वेदवाणी । जनें निंदिला राम कोदंडपाणी।।१६।।

बहुतांपरीं सेवितां त्या वरिष्टा । पाहा आदरें जाति घेऊनि विष्टा ।

जया प्राप्त जें तें चि हातासि आलें । तसें निंदकां दुर्जनांलागि जालें ।।१७।।

देहे निंद्य हा वंद्य होईल कैसा । म्हणोनी नको मान्यतेची दुराशा ।

देहे वंदितां निद्यतां निंद्य आहे। म्हणोनी देह्यातीत होऊनि राहे ।।१८।।

अती क्षार दुर्गुण सिंधूसि आहे । परी गौल्य माधुर्य प्रजेन्य पाहें ।

तया सज्जना माधवाचेनि संगे । माहां तीव्र दुर्गूण तात्काळ भंगे ।।१९।।

नको रे मना संग त्या दुर्जनाचा | तजावा भजावा हरी अंतरींचा ।

तरी उघरी नाथ लोकत्रयाचा । फिरे दास उदास छेदूं तयाचा ।।२०।।

 

५४. आत्मनिवेदन भक्ति

 

आटवे वनीं भूवनीं राम आहे । जनीं वीजनीं राम सर्वत्र पाहे ।

दिशा दाटल्या राम संपूर्ण जाला । विवेकें चि तो दास रामी मिळाला ।।१।।

सदा सर्वदा सेवकेंवीण स्वामी । भले जाणती भक्ति हे मुख्य नौमी ।

स्वरूपीं भरावें बरें वीवरावें । विवेकें नुरावें जना उधरावें ।।२।।

दिसे सर्व माया नसे सत्य कांहीं । विवेकें तुला तूं चि शोधूनि पाहीं ।

किती पाहसी तूजला ठाव नाहीं । देहेभावना सर्व सांडून राहीं ।।३।।

जनीं सांडणे मांडणें या मनाचें । मनीं मूळ शोधी बरें उन्मनाचें ।

परी शोधितां कल्पनारूप होसी । स्वयें संत आनंत सांडूनि जासी ।।४।।

अरे तूजपासीं तुझें तूं नसावें । मनांतील मी सर्व कांहीं पुसावें ।

निराकार तूं मानि रे सत्य भावें । जनीं सर्व ही होत जातें स्वभावें ।।५।।

स्वभावें चि होतें स्वभावें चि जातें | वृथा सीणसी आवरेना तुला तें ।

भले सांगती तुजला गूज कांहीं । तयामाजि तों पाहतां हेत नाहीं ।।६।।

पहावें कसें पावनें पावनाला । उठे हेतुची भावना भावनेला ।

न बोलोनि बोलों किती काये आतां । अनुर्वाच्य तें सत्य निःसंग होतां ।।७।।

अखंडीत खंडीत कैसें करावें । लोहो हेम जालें कसें पालटावें ।

नदीचा मुळीं वोघ वोघीं मिळाला । उपायें करावा कसा वेगळाला ।।८।।

तसा साधकु लागतां संतसंगें । स्वयें संत आनंत जो तो चि आंगे ।

परब्रह्मबोधें परब्रह्म जाला । म्हणे कोण रे देहधारी तयाला ।।९।।

देहधारकाला देहे भासताहे । जसी कल्पना ब्रह्म कल्पूनि पाहे ।

परब्रह्म तें नाकळे कल्पनेसी । तसे संत आनंत हे रामदासी ।।१०।।

 

५५. परी अंतरात्मा चि नाना विकारी

बहुतांपरीं मानवी जीव जोडे । महींमंडळी शकटें हस्ति घोडे ।

किती धाकुटे थोरले देहधारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।१।।

खरें डुकरें म्हैसरे बैल गाई । गउ चीतळें सामरें रानगाई ।

चिते वाग तर्से रिसें कुंजरारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।२।।

कुह्या सेरडें मेंढरें भेंकरें तें । सुणीं मर्कटें वानरें येशरें तें ।

जळीं कासवें दर्दुरें मछ सुश्री । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।३।।

ससे सायळें खोंकडें रानसूणी । मृगें जंबुक मार्जरें कोळसूणी ।

घुसी मुंगसे मार्जरें सरड खारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।४।।

विरोळे कणे दाणवे सर्प नाना । बहुतां प्रकारीं लघु जीव नाना ।

किती दुःखदाते किती सौख्यकारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।५।।

चिड्या चीमण्या काउळे ढोंक होले । किन्हे पारवे साळया शुक बोले ।

किळा कोकिळा बोलतां सौख्य भारी । परी अंतरात्माचि नानाविकारी ।।६।।

हुमे लांवरे तीतरे पाणचोरे । चिड्या भोरड्या चक्रवाकें चकोरें।

वळ्या टिवटिव्या कोंबडीं गीध घारी । परी अंतरात्मा चि नानाविकारी ।।७।।

नुरा पातरा कातरा बुल्बुला त्या । बहु रंगिणी सुग्रिणी रजकिणी त्या ।

किती रूपधारी किती गूणधारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।८।।

मृगे पींगळे उलुकें गारखोरे । वसें सारसें चातकें तें मयोरें ।

क्रिवे पांकळ्या वाघळा पापकारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।९।।

मृगें मखमलें सोनके टोळमाशा । लघु मशकें मुर्कुटीं मौळमाशा ।

लघु संख सिंपीलिव्या भृंग भारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।१०।।

लिखा वासुवा पीसुवा डांस विंचु । सुते नीवळे कांतण्या पाणविंचु ।

बहु पीप्लिका पाली पांचाळकारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।११।।

बहु खेचरें भूचरें कोण जाणे । शाहामृग ते बाजबहिरी ससाणे ।

पाहा हंस तो क्षीरनीरास वारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।१२।।

जुरे तास लङ्गे कुऱ्हाडे बगूळे । किड्या हुंडण्या डोमळ्या गोमचीळे ।

जळा जोगिणी काजिवे ते दिपारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।१३।।

जनीं च्यारिखाणी जनीं च्यारिवाणी । किती कोण प्राणी पाहावे पुराणीं ।

चहु चंचळीं जन्मले देहधारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।१४।।

किती संत साधु भले भक्त ज्ञानी । किती वेषधारी च मत्ताभिमानी ।

रुसी देव गंधर्व सामर्थ्येधारी । परी अंतरात्मा चि नाना विकारी ।।१५।।

नव्हे सार साचार कांहीं विकारी । म्हणे दास रे मुख्य तो निर्विकारी ।

जगी जाणता सत्य मीथ्या विचारी । परी अंतरात्मा चि नानाविकारी ।।१६।।

 

५६. तयाचे परी स्फूर्ति दे देवराया

 

हवाया नळे बाण भांडी अनंतें । बळें सोडितां जाति आकाशपंथे ।

बती लागतां वेळ नाहीं उठाया । तयाचे परी स्फूर्ति दे देवराया ।।१।।

वरी पाहतां दृष्टि हे दूरि धांवे । तयाच्या सवें कल्पना हे उठावे ।

उठे मारुती वेळ नाहीं उडाया । तयाचे परी स्फूर्ति दे देवराया ।।२।।

फिरे वावरे वात सर्वांत जैसा । चळे नीवळे ही कळे पष्ट तैसा ।

घरीतां बळें संधि नाहीं धराया । तयाचे परी स्फूर्ति दे देवराया ।।३।।

विवेकी विवंचूनियां लागवेगें । पळे सर्व ही दृश्य सांडूनि मागें ।

उपायें चि तो जाय लंघून माया । तयाचे परी स्फूर्ति दे देवराया ।।४।।

असावें तरी सर्व कांहीं असावें । नसावें तरी लेश तें ही नसावें ।

परब्रह्म तें वीवराया वराया । तयाचे परी स्फूर्ति दे देवराया ।।५।।

म्हणे दास रे वास भूती भुतांचा । तयाचे परी निर्गुण निर्गुणाचा ।

विचारें चि वीनासती अष्टकाया । तयाचे परी स्फूर्ति दे देवराया ।।६।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा