हैदराबाद सहल भाग १
दिनांक
१४ नोव्हेंबर २०१७ माझ्या आयुष्यातील एक अनोखा दिवस होता. कारण आज मी पहिल्यांदाच विमानाने
प्रवास करणार होतो. कालच आम्ही सहलीला जाण्याकरीता बोरीवली येथे डेरे दाखल झालो होतो.
सकाळी ६.३० ची फ्लाईट होती. त्याकरीता जवळपास पाच वाजताच आम्ही घरुन निघालो. विमानतळावर
जाण्याकरीता मीनी बस ठरविली होती. त्याबसने आम्ही साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज
आंतर राष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनल वर हजर झालो. समोरच असलेल्या एअर इंडीयाच्या
बोर्डींग पास मिळण्याच्या काऊंटरवरुन प्रत्येकाचे बोर्डींग पास घेतले. बोर्डींग पास
घेतल्यावर सिक्युरीटी चेकअप करीता मोठी रांग होती. त्यावेळी सहज मनांत आले, आपण म्हणतो
भारत गरीबांचा देश आहे परंतु येथे असलेल्या रांगा काही वेगळेच सांगत आहेत.
विमानाचा
प्रवास हा प्रवासाचा वेळ वाचवतो हे खरेच आहे. ज्याचे दिवसातले प्रत्येक मिनीट किमती
आहे त्याला विमानप्रवास हे वरदानच आहे. मुंबई ते हैदराबाद रेल्वेने प्रवास करायचा झाला
तर कमीत कमी १६ तास तरी लागतात. तेच अंतर विमानाने अवघ्या एका तासात पार करता येते.
माझी विमान प्रवासाची उत्सुकता उतू जात होती. त्यामुळे कधी एकदा विमानात चढेन असे मला
झाले होते. यथावकाश आमचा सर्वांचा सिक्युरीटी चेकींगला नंबर लागला आणि आम्ही विमानाच्या
दिशेने चालायला सुरवात केली. हे चालणे मात्र खूपच होते. माझ्या अंदाजाने आम्ही टर्मिनलच्या
गेटपासुन जी चालायला सुरवात केली होती. ते चालणे विमानात प्रवेश करे पर्यंत चालूच होते.
हे अंतर जवळपास दिड किलोमिटर तरी होतेच.
माझा
आतापर्यंतचा प्रवास बस अथवा रेल्वेने झालेला होता. प्रत्येक ठिकाणी बसच्या किंवा रेल्वे
बोगीच्या जवळ जायला फार कमी चालावे लागत असे. त्यामुळे विमानसारख्या श्रीमंत प्रवासी
वाहनापर्यंत जायला एवढे चालावे लागते हे पाहून जरा आश्चर्यच वाटले. अर्थांत आमचे लगेज परस्पर जाणार होते त्यामुळे ओझेमुक्त
चालणे होते. असो, आम्ही विमानामध्ये आपापल्या सिटवर बसलो. मला खिडकीची
सिट मिळाली होती. पहिला विमान प्रवास म्हणून भरपुर सेल्फी काढुन झाल्या. दरम्यान एअर
होस्टेसने सिट बेल्ट बांधायच्या सूचना केल्या. एअर इंडीयाच्या एका कर्मचाऱ्याने सिट
बेल्ट कसा बांधायचा आणि आपत्कालीन स्थिती मध्ये काय करायचे याचा हिंदी आणि इंग्रजीमध्ये
डेमो केला. तेव्हा मात्र विमान प्रवास हा सोपा नाही, त्यात धोका पुरेपुर भरलेला आहे
याची जाणिव झाली. आमच्या विमानाने बरोबर साडे सहाला आपली जागा सोडली. रनवेवर
बराच प्रवास करीत असताने ते दोनदा थांबले होते. त्यानंतर मात्र विमानाने नाक वर करुन
वर वर जायला सुरवात केली जवळपास पाच मिनिटे वर वर गेल्यानंतर ते सरळ झाले आणि वेगात
जायला लागले.
विमानप्रवासाबाबत
खूपच उत्त्सुकता
होती परंतु प्रत्यक्ष प्रवासात काहीच थ्रिलींग वाटले नाही. सुरवातीला थोडावेळ आजुबाजुला
काहीतरी दिसत होते. परंतु जेव्हा ते ठराविक उंचीवर स्थिर झाले तेव्हा ढगांशिवाय काहीच
दिसेना. त्यामुळे खिडकीतुन बाहेर बघण्याची गरजच नव्हती. दरम्यान विमान स्थिर झाल्यावर
एअर होस्टेस आपल्या मदतनिसांसह चहा आणि नाश्ता घेऊन आली. सर्वांचा चहा नाश्ता होईपर्यंत
विमानाची खाली उतरण्याची वेळ आली. परत सर्वांनी सिट बेल्ट बांधले. हळू हळू विमान कमी
उंचीवर खाली आले. आता हैदराबाद मधील दृष्ये दिसु लागली. उंचावरुन दिसणारे ते हैदराबाद
गुगलचा सेटेलाईच मॅप (उपग्रह नकाशा) पहावा तसे दिसत होते. अशाप्रकारे
विमान जमिनीवर टेकले. त्यानंतर मुंबई सारखेच चालत चालत बेल्टवरुन
येणारे सामान ताब्यात घेण्याकरीता गेलो. सामान ताब्यात घेताच आम्हाला हैदराबाद मध्ये
हॉटेल मध्ये घेऊन जाणाऱ्या मिनीबसच्या ड्रायव्हरशी संपर्क साधणे सुरु केले.
विमानतळावर
आलेल्या मिनीबसने आम्ही हॉटेल हर्षा इंटर नॅशनलमध्ये दाखल झालो. आम्हा सर्वांना एकाच
मजल्यावर रुम मिळाल्या होत्या. अशातऱ्हेन पहिला विमान प्रवास संपून सहलीचा पहिला दिवस
सुरु झाला.
हर्षा
हॉटेल मध्ये रुम ताब्यात घेतल्यावर सर्वजण आंघोळ वगैरे करुन फ्रेश झाले. बरोबर
आणलेल्या पदार्थांचा नाश्ता केल्यानंतर हॉटेलच्या समोरच असणाऱ्या टपरीवजा चहाच्या
दुकानावर चहा कॉफी घेतली आणि त्यानंतर अकराच्या सुमारास हैदराबाद दर्शनाचा
कार्यक्रम सुरु झाला. सर्वप्रथम आम्ही हैदराबादच्या प्रसिद्ध असणाऱ्या “चाऊमहाला पॅलेसमध्ये”
दाखल झालो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच नुसतीच चाळवजा इमारत दिसली. सगळ्या
खोल्या रिकाम्या होत्या. तिथुन पुढे गेल्यावर एक मध्यवर्ती बाग होती. त्यामध्ये
काही तोफा ठेवलेल्या होत्या. त्यापैकी एका तोफेच्या जवळ उभे राहून सगळ्यांनी फोटो
काढले.
तसेच
चालत चालत पुढे गेल्यावर त्या राजवाड्याचे खरे वैभव दिसायला सुरवात झाली. हा राजवाडा
म्हणजे निजामशाहीची शान होती. वास्तुकलेचा उत्तम नमुना येथे आपल्याला पहायला मिळतो.
दक्षिणी आणि उत्तरेकडील वास्तुकलेचा सुरेख मिलाप येथे केलेला आढळतो. या राजवाड्यात
चार प्रमुख महाल आहेत. आफताब महाल, अफजल महाल, मेहताब महाल आणि तहनियात महाल अशी त्यांची
नावे आहेत.
आता
आम्ही या राजवाड्याची शान असलेल्या खिलावत मुबारक नावाच्या दरबार हॉल मध्ये उभे होतो.
दरबाराला अत्यंत आकर्षक अशा झुंबरांनी सजवलेले होते. या दरबारातील सिंहासनावर नबाब
असफ जही बसत असत. या सिंहासनावर बसुन ते परदेशी पाहूण्यांना आणि महत्वाच्या व्यक्तींना
भेटत असत. या महालाच्या चारही बाजुंनी फिरल्यावर त्याच्या सौदर्यांची कल्पना येते.
सिंहासनाच्या मागिल बाजुला बेगमांना आणि स्त्रीयांना बसण्याची जागा आहे तेथिल खिडक्यांना
पडदे लावलेले होते.
या
राजवाड्यात अनेक प्रकारच्या वस्तुंचे प्रदर्शन मांडलेले आहे. त्यामध्ये क्रोकरीचे निरनिराळे
प्रकार पहायला मिळतात. अनेक आकाराच्या, कलाकुसरीच्या क्रोकरीच्या वस्तु एका मोठ्या
दालनात सुबकपणाने मांडुन ठेवलेल्या होत्या.
दोन तिन दालनांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे आकर्षक फर्निचर मांडुन ठेवलेले होते.
अस्सल जरीच्या कपड्यांचे देखिल प्रदर्शन तेथे पहायला मिळाले.
या
राजवाड्याचे आकर्षण म्हणजे नबाबांच्या सेवेत असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या गाड्यांचे
आणि बग्गींचे प्रदर्शन. येथे जुन्या आणि नव्या दोन्हीप्रकारच्या गाड्यांचे नमुने पहायला
मिळाले. एकुणच हा राजवाडा हा चांगल्या रितीने जतन केलेला आढळला. नबाबी ऐश्वर्याचा नमुना
आपल्याला येथे पहायला मिळतो.
*******
चाऊमहाला
पॅलेसमधुन बाहेर पडल्यावर सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून आमच्या
मिनी बसच्या चालकाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्युअर व्हेज असणाऱ्या धाबा कम हॉटेल
मध्ये पोटपूजेकरीता गेलो. जेवणाची क्वालिटी चांगली होती. सहलीला सुरवात करण्यापूर्वी
पिण्याकरीता मिनरल वॉटरच वापरायचे असे ठरविले होते. त्याप्रमाणे त्याच धाब्यावर पंधरा
बाटल्यांचे दोन बॉक्सच खरेदी केले. पोटपूजा झाल्यावर आम्ही हैदराबाद दर्शनच्या दुसऱ्या
आणि हैदराबादची शान असणाऱ्या “सालारजंग म्युझियमला” भेट द्यायला गेलो.
सालारजंग
म्युझीयम हे मुसी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर प्रशस्त जागेत असलेले भारतातिल प्रसिद्ध
असणाऱ्या म्युझियमपैकी एक आहे. या मुझियममध्ये उत्कृष्ट पेंटींग, पॉटरी, क्रोकरी, घड्याळे,
हस्तीदंती वस्तु, मोती, निरनिराळ्या प्रकारच्या तिजोऱ्या यांचे प्रदर्शन मांडलेले आहे.
या
संग्रहालयामध्ये निरनिराळया प्रकारची शस्त्रे देखिल प्रदर्शनाकरीता ठेवलेली होती. अनेक
प्रकारच्या तलवारी तर मी प्रथमच बघत होतो. हस्तीदंत इतका आकर्षक असू शकतो हे येथिल
वस्तु बघुन लक्षांत येते. या म्युझियम मधिल एक खास आकर्षण आहे ते म्हणजे तेथिल घड्याळ.
या घड्याळाचे वैशिष्ट म्हणजे या घड्याळातुन दर तासाला ठोके पडतात आणि ते देण्याकरीता
एक आकर्षक पोषाखातल्या माणसाची आकृती बाहेर येते आणि ती टोले देते. याच घड्याळात दर सेकंदाला जी टिक
टिक होते ती करणारी देखिल
एका माणसाची आकृती सतत लोहारा
सारखे ठोके मारत असते.
या
घड्याळातुन दर तासाला दिले जाणारे ठोके पहाण्याकरीता तिथे सतत गर्दी झालेली दिसते.
अनेक जण त्या क्षणांचा व्हीडीओ करुन घेत असतात. पूर्वी म्हणे या घड्याळात सध्या दिसत
असलेल्या ठोके देणाऱ्या माणसा ऐवजी चिमणी येत असे. त्यामुळेच आम्ही सगळेजण ठोके द्यायला
चिमणी येईल या अपेक्षेने बसलो होतो.
सालारजंग
म्युझियम मनसोक्त पाहून झाल्यावर आम्ही सरळ हॉटेलवर आलो. रात्री आठच्या सुमारास हॉटेलच्याच
कॅफेटेरीया मध्ये जेवणाकरीता गेलो. जेवण तिन कोर्स मध्ये होते. स्टार्टरला सुप, नंतर
मुख्य जेवण आणि शेवटी आइसक्रिम अशी पद्धत होती. जेवणाची क्वांटिटी खूपच होती. त्यामुळे
अन्न वाया जाण्याचा प्रमाण जास्त होते. ताटातल्या वाट्या काढुन दिल्या तरी वेटर त्या
शेवटी उष्ट्या खरकट्या सोबतच नेत होते. त्यामुळे खूप वाईट वाटले. समर्थांचा उपदेश मानणारे
आम्ही त्यांनी केलेल्या “आपण येथेष्ट जेवणें| उरलें तें अन्न वाटणें | परंतु वाया दवडणें| हा धर्म नव्हे ||” या उपदेशा विरुद्ध येथे वागावे लागत होते.
आता या हॉटेलमध्ये मुक्काम होता तिथपर्यंत अशाच पद्धतीने जेवण येणार होते. शेवटी आम्ही
त्यावर तोडगा काढला. जेवणाची ताटेच कमी मागवायची. त्यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण
कमी झाले.
जेवण
झाल्यावर थोडावेळ बदाम सातचा डाव झाला. त्याच्या जोडीला गप्पा चालूच होत्या. सुमारे
साडेदहाच्या सुमारास सर्वजण एकमेकांना गुड नाईट करुन झोपायला गेलो. अशा तऱ्हेन सहलीचा
पहिला दिवस संपला.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा