।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका-
आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस चौथा
‘पैज........ पैज,’ गणपती
म्हणाला.
‘हो, हो, पैज! पण कशाची?’ ते बोल आधी. विलास
म्हणाला.
‘पण पैजेपर्यंत का आलात?’ मधुकर दोघांच्यात मिसळला.
विलास म्हणाला, ‘मी आजींना आत्ता अर्ध्या तासापूर्वी टांग्यातून
उतरताना पाहिले. नुकत्याच गावाहून आल्या. मग आज दासबोधाला सुट्टीच सांगतील.’
गणपती मी पैजेवर सांगतो. ‘आजींना आळस नाही. कंटाळा नाही. थकवा नाही.
त्यांना ज्ञानदान म्हणजे आनंद वाटतो. त्या नक्की नेहमी सारख्याच पडवीवर येणारच मला
खात्री आहे. म्हणून पैजेवर बोलत होतो.’
तिघे अंगणातच बोलत आहेत
तोपर्यंत आजी हात पुसत बाहेर आल्याच. ‘या बाळांनो, अंगणातच
कां घोटाळलात?’
विलास म्हणाला, ‘मला वाटलं आज सुट्टी मिळेल. गणपती पैज लावून बोलत
होता. आजींचा उत्साह दांडगा, त्या सुट्टी घेणार नाहीत. त्याचं खरं झालं.’
‘बसा! सुट्टी कशाला?’ आजी म्हणाल्या. ‘आत्ताच
गावाहून आले म्हणून? त्यात काय झालं? थकवा
कसला? मी कां पायी आले?
गाडीतले कपडे बदलायचे, म्हणून हातपाय धुतले आणि कपडे बदलले. आज एकादशीच आहे.
जेवणाचा प्रश्नच नाही. बसा, सुधा सापडला कां दासबोध?
वरच्याच पिशवीत आहे.’
‘म्हणजे? सुधा आमच्या आधी
आली की, काय? जया सुध्दा आली? आजी
तुम्ही गावाला जातांना पण दासबोध बरोबर नेता?’ विलास एका दमात
सारे बोलला.
आजी म्हणाल्या, ‘विलास, दासबोध माझा मित्रच. आनंद मिळतो वाचतांना.
समर्थांशीच बोलत आहोत असे वाटतं. हे पहा एकदा निश्चय केला की तो कधीही मोडायचा
नसतो’.
मधुकर म्हणाला, ‘ते खरं, पण थोडी विश्रांती म्हणून झोप तरी!’
‘झोप आणि दुपारी? ‘ते तर पक्के आळसाचे लक्षण.’ आजी म्हणाल्या. आलीच सुधा. ‘सापडला नं! आण इकडे. समर्थ काय म्हणतात
ते दाखवते.’
आजींनी चटकन दासबोध उघडला आणि नेमके पान काढले. ‘बघं मधू, समर्थ काय म्हणतात, आजींनी दासबोध
त्याच्या हातात दिला.’
मधूने
ओवी वाचली, अखंड भ्रांती पडे | केला निश्चय विघडे | अत्यंत निद्रा आवडे | तो तमोगुण ||२-६-८||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘आलं लक्षांत? केलेला निश्चय
बिघडला, मोडला, झोपेच्या आधीन झाला, सारखा संशयात गुरफटला की समजावं तो माणूस
पक्का तमोगुणांत सापडला. तमोगुण जीवाला देहसुखाकडे सारखा खेचत असतो. मग
सत्वगुणामुळे होणारी चांगली कामे बारगळतात.’ पुढे पुढे तर
....... मधू तूच वाच पुढची ही ओवी.
मधूने ओवी वाचली. सत्कर्में ते नावडती | नाना दोष ते आवडती | पापभय
नाहीं चित्ती | तो तमोगुण ||२-६-१८|| श्रीराम||
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘चांगली कर्मे हातून होता होता करु नये असे
तिव्रतेने वाटले की समजावे या आळसाने शरीराला घेरलय. मग मनुष्य शुध्द-अशुध्द, योग्य-अयोग्य
याचा विचारच करीत नाही. हवे तसे वागतो. गैरकर्म हातून घडणे म्हणजे पापच.’
‘पण आजी,’ त्यांना थांबवत
विलास म्हणाला, ‘अशी माणसे तर आनंदात राहतात. रहायला बंगले असतात.
दाराशी मोटारी असतात. पैशाची लयलूट असते.’
‘बरोबर आहे तुझ म्हणणं.’ आजी म्हणाल्या. ‘पण तो बेगडी
आनंद क्रोधाला पोसत असतो. संताची शिकवण तर सोडच, जगाच सोडच पण प्रत्यक्ष आई वडिल,
भाऊ बहिण, कोणाचीच शिकवण त्याला हिताची वाटत नाही. कोणाचेच चांगले वागणे त्याला
पटत नाही. फट्ट म्हटले की तट्ट होतो. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. समर्थ
म्हणतात,........’
आजींचे वाक्य पुरे होण्या
आधी गणपती पुढे सरसावला, ‘मी सांगतो म्हणजे वाचतो समर्थ काय म्हणतात ते!’
‘वाच वाच.’ आजी म्हणाल्या. ‘ज्येष्ठ बंधू’’ अशी सुरवात बघ. गणपतीने ओवी वाचली. जेष्ठ
बंधु बाप माये | त्यांचीं वचनें न साहे | सीघ्रकोपी निघोन जाये | तो तमोगुण ||२-६-२६||श्रीराम||
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या. ‘ऐसा हा तमोगुण पतनास कारण म्हणून त्याच्या पासून
लांबच रहावे हे बरे.’
जया म्हणाली, ‘तमोगुणापासून लांब रहायचं, रजोगुणाला फार थारा
द्यायचा नाही. मग आपोआपच काय होईल?’
सुधा म्हणाली, ‘चांगला असलेला सत्वगुण वाढीस लागेल. सत्वगुणाचे
लक्षण कोणते आजी?’
आजी म्हणाल्या, सांगते... ‘संसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी | भजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||२-७-१०||श्रीराम|| या सत्वगुणाने जीवनातल्या सर्व दु:खांचा शेवट होतो.’
गणपती भीत भीत म्हणाला, ‘म्हणजे समजा आपण नापास झालो तर सत्वगुणामुळे दु:ख होणार नाही कां?’
‘नापासच काय?’ आजी म्हणाल्या, ‘चोरी होणं, आग लागणं, काही वस्तू हरवणं,
जवळचं प्रेमाचं माणूस मरणं या सगळ्या दु:खी घटनांकडे तो सत्वगुणी माणूस वेगळ्या
नजरेने पहातो. दु:ख कमी होते. कारण दु:ख करणारे त्याचे मन भगवंताचे भक्तीकडे
वळलेले असते. दु:खाच्या प्रसंगात पण त्याचे भजन रहात नाही. आपणही भजन करतो व
दुसऱ्याला करायला लावतो. असा असतो सत्वगुण. विलास, तो सत्वगुणी माणूस बोलतो, चालतो
कसा?
वाचतोस?’
‘वाचतोस कां म्हणून का विचारता? वाच असेच म्हणा.’ आणा तो दासबोध. विलासने दासबोधाचे पान
उलटवले. घसा खाकरला. ‘शब्द कठीण न बोले... हं. म्हणजे मी रागवून कधी कधी फटकन बोलतो म्हणून
आजींनी ही ओवी मला दाखवली हं!’
सगळेच मोकळेपणी हसले. विलासही मोकळेपणी
हसला आणि ओवी वाचली. शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले | योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||२-७-३७||श्रीराम||
‘आलं लक्षांत. सत्वगुणी व्हायचं म्हणजे
कठोर शब्द, दुसऱ्याला लागेल असा शब्द कधी बोलायचा नाही. केलेला नेम म्हणजे नियम
चुकवायचा नाही.’ मग
हे ‘योगी
तोषविले म्हणजे काय?’
आजी
म्हणाल्या, ‘कोणी
संत महात्मे, आदर्श व्यक्ती, वडिल, ज्येष्ठ ज्येष्ठ माणसे, भक्ती भावाने वागणारे या साऱ्यांनी संतोष
होईल, आनंद वाटेल असे वागणारा तो सत्वगुणी समजावा. त्याच्याजवळ आणखी कोणते चांगले
गुण असतात माहीत आहे?’
गणपतीने
विलासकडून दासबोध घेतला, ‘सांगा मी वाचतो. बावन्न कां? अं.. हं... सापडली.’ शांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |सत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||२-७-५२|| श्रीराम|| पणं हे ‘क्ष्मा’ काय भानगड आहे?
‘क्ष्मा म्हणजे क्षमा.’ आजींनी उलगडा केला. ‘शांत रहाणे, क्षमा करणे, दयाळू
वृत्तीने वागणे जमले की तो सत्वगुणी झालाच. सोपे आहे हे. अशा सत्वगुणाने आत्मज्ञान
लवकर होते.’
आजींनी अजून एक ओवी वाचली. श्रवण
आणी मनन | निजध्यासें समाधान| शुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||२-७-६१|| श्रीराम||
संतांची शिकवण ऐकावीशी वाटते. त्यावर
विचार करावासा वाटतो. स्वस्वरुपाचे, आतल्या दिव्य चैतन्याचे ज्ञान होते. असा आहे
हा सत्वगुण.
विलास
म्हणाला, ‘आजी
हे दिव्य चैतन्य मला काहीच कळलं नाही. पण एक विचारतो. काल आमच्या घरा समोर ५-६
मुले गोट्या खेळत होती. त्यांच्यात भांडण झाले. एका लहान मुलाला आळीपाळीने दुसरी
मुले मारीत होती. मी सोडवायला निघालो आई म्हणाली, “जाऊ दे. रानवट मुले ती. झोपडपट्टीतील
मुले. तुलाही मारायला कमी करणार नाहीत. नको जाऊस बाहेर.” पण मला रहावलं नाही. मी हळूच बाहेर
पडलो. त्यांचे भांडण सोडवले. त्या लहान मुलाला आनंद वाटला. मी त्यांना गोट्यांचा
खेळ समजावून दिला. मग मी चांगलं केलं की वाईट?’
आजी
म्हणाल्या, ‘दासबोधातच याचे उत्तर आहे बघ,’ कोणी येकास मारी | तयास जाऊन वारी | जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||२-७-७५|| श्रीराम||
‘बाळांनो!’ आजी म्हणाल्या, ‘वारी म्हणजे निवारण करतो, भांडण
मिटवतो. समर्थांनी किती बारीक बारीक लक्षणे सांगितली. विलास अशी भांडणे केव्हा
मिटवता येतात माहीत आहे? दुसऱ्यावर आपली छाप केव्हा बसते? सुधा आठवा समास काढ.’
सुधाने
ओवी वाचली, सत्यवचनी शुभवचनी | कोमळवचनी येकवचनी | निश्चयवचनी सौख्यवचनी
| सर्वकाळ ||२-८-१७|| श्रीराम||
‘छान!’ आजी म्हणाल्या. ‘तो नेहमी खरे बोलतो. शुभ चांगले
प्रसन्न वाटेल असेच बोलतो. तो चांगल्या गुणांची खाणच जणू!’
सुधा
म्हणाली, ‘असा
मनुष्य सगळ्यांचाच मित्र होईल. त्यांत काय नवल?’
आजी
म्हणाल्या, ‘खरं
आहे तुझं म्हणणं.’ पुढचीच ‘चौथी ओवी वाच.
सुधाने
ओवी वाचली, मित्रपणें परहितकारी | वाग्माधुर्य परशोकहारी | सामर्थ्यपणें वेत्रधारी | पुरूषार्थें जगमित्र ||२-८-२१|| श्रीराम||
सुधाने ओवी वाचून झाल्या बरोबर मधुकर
म्हणाला, ‘मी
सांगतो अर्थ. असा चांगल्या गुणांचा मनुष्य सगळ्यांशी मित्रभावाने वागतो. हा मित्र
तो शत्रू असा भेद नाहीच. मित्रभावामुळे दुसऱ्याचे दु:ख निवारण करावे हीच त्याची तळमळ असते.
तो अतिशय गोड बोलतो व दुसऱ्याचा शोक, दु:ख दूर करतो.’
‘आजींच्या सारखंच म्हण की!’ जया मध्येच म्हणाली.
‘हो! हो! तस्संच.’ बरोबर आहे. ‘असा मनुष्य आपल्या सत्तेमुळे,
सामर्थ्यामुळे सर्वांवर प्रेम करुन आपली शक्ती प्रस्थापित करतो.सज्जन, अनाथ
सगळ्यांनाच तो प्रेमाने वागवतो. हाच त्याचा पुरुषार्थ. लहानपणापासून शिवाजीराजेंना
हे जसलं म्हणून ते महाराष्ट्राचे राजे म्हणून मान्यता पावले. होय ना आजी?’
‘मधू! बरोबर आहे तुझं म्हणणे!’ आजी म्हणाल्या. रूपलावण्य अभ्यासितां
न ये | सहजगुणास
नचले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||२-८-३१||श्रीराम||
आजींची
ओवी पुर्ण झाल्याबरोबर मधू म्हणाला, ‘आजी ही ३१वी ओवी तुमची पाठच आहे की! न
वाचताच म्हणालांत.’
‘मधू, नुसती ओवीच नव्हे. त्याचा अर्थ
रोजच लक्षांत ठेवावा व तसे वागावे हाच तर दासबोधाचा हेतू. मी अर्थ सांगू?’ आजी म्हणाल्या.
‘नको! नको! आम्ही उद्या लिहून आणू. तो पर्यंत ओवी
पण पाठ करु.’
मधू म्हणाला.
विलास
हळूच म्हणाला, ‘पण
ते अगांतुक ते नाही मला कळलं.’
सुधा
म्हणाली, ‘मी
सांगु आजी? जे
गुण, अर्थात चांगले गुण हं, ते आज आपल्यांत नाहीत ते. त्यांना अगांतुक गुण
म्हणतात. असा एकेक तरी चांगला गुण अर्थ लिहितांना ठरवू व आत्मसात पण करू या.’
‘संकल्प छान सोडलांत हं. असंच अभ्यास करत
पुढे जाण्यासाठी काय कराव माहीत आहे?’ आजींनी जयाच्या हाती दासबोध दिला. ‘वाच ही ओवी!’
जयाने
ओवी वाचली. स्नान संध्या जप ध्यान | तीर्थयात्रा भगवद्भजन | नित्यनेम पवित्रपण | अंतरशुद्ध असावें
||२-९-२०||श्रीराम||
विलासने
शंका विचारली, ‘हे
सगळे शाळा करता करता कसे जमावे?’
आजी
हसल्या, ‘स्नान
करतोसच नां?
तेव्हा अथर्वशिर्ष म्हणतोस नां? ते संपल्यावर देवाला २ मिनीटे शांत चित्तपणे नमस्कार हेच संध्या
ध्यान. संध्याकाळी रामरक्षा म्हणतोस नां? नियमाने वागायचे असे आता आपण ठरवतोच
आहोत. अशा वागण्याने आपले अंत:करण शुध्द पवित्र होतेच होते. मग काय होते? विरक्तता आपोआपच येते.’ विरक्तें समय जाणावा | विरक्तें प्रसंग वोळखावा | विरक्त चतुर
असावा | सर्वप्रकारें ||२-९-२८||श्रीराम|| ‘समर्थांनी इशारा देऊन ठेवलाय.
प्रसंगमान पाहून वागावे. वेळ कशी आहे ते पाहून चातुर्याने, शहाणपणाने, विचारपूर्वक
वागावे.’
गणपती
म्हणाला, ‘पण
हे विरक्ते विरक्ते काय आहे?’
आजी हसल्या, ‘गणपती! प्रांजलपणे भगवंताची भक्ती करता करता
थोड्या प्रमाणांत का होईना पण जगातलं बेगडी नकोच वाटतं. तो वागतो इतरां सारखाच. पण आतून सतत भगवंताचे स्मरण
चालू असते. याला “विरक्त” म्हणतात. असा विरक्त कीर्तीमान होतोच होतो. चातुर्याने वागल्यामुळे
कोठेही फसत नाही.’
मधुकर
म्हणाला, ‘पण
आपल्याला तर अनुभव असा येतो की, बरीचशी माणसे व्यवहारांत फसतातच. ते कां?’
आजी म्हणाल्या, ‘सांगते! कांही माणसे दुसऱ्याची पारख न करता
बुध्दी चातुर्य न वापरता वागतात म्हणून फसतात. व काही पढतमूर्खाप्रमाणे वागतात
म्हणून फसतात. पढतमूर्ख म्हणजे स्वत:ला फार शहाणे समजणारे, पण शहाणपणाने न
वागणारे, त्यांना “पढतमूर्ख” म्हणतात. अंगी गुण नसतानाही समाजात प्रतिष्ठा वाढवायता प्रयत्न
करतात ते पढत मूर्ख.’ त्यांच्याबद्दल समर्थ म्हणतात..... नाहीं भक्तीचें साधन |
नाहीं वैराग्य ना भजन | क्रियेविण ब्रह्मज्ञान | बोले, तो येक पढतमूर्ख ||२-१०-२३||श्रीराम।। असा पढतमूर्खपणा अंगी केव्हा चिकटतो
माहित आहे..... रात्रंदिवस करी
श्रवण |
न संडी आपले अवगुण| स्वहित आपलें आपण | नेणे तो येक पढतमूर्ख ||२-१०-३०|| श्रीराम।।
चांगलं चांगलं वाचून,
चांगलं चांगलं शिकून, चांगलं चांगलं ऐकून सुध्दा जो अवगुण सोडत नाही तो पढतमूर्ख,
आपले कल्याण कशांत आहे हे जो जाणून घेत नाही, तो एक पढतमूर्ख. असं पढतमूर्ख
आपल्याला व्हायचं आहे कां?
“नाही! नाही!! नाही!!!”
सगळ्यांचा एक आवाज आला.
आजींना आनंद वाटला.
त्यांनी दासबोध मिटला.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा