रविवार, २० सप्टेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस १०

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस १० वा

     सगळे अगदी वेळेवर आले. मारुतीरायाला वंदन केले. सारे स्थानापन्न झाले. विलासने सुरवात केली. आजी! आज एक गंमत झाली.

     काय झालं?’ आजींनी विचारले.

     मी सकाळी मावशीकडे गेलो होतो. विलास सांगू लागला, मावशी दासबोध वाचणार म्हणून नुकतीच आसन घालून बसली. मी काल झालं त्याच्या पुढचं आत्मज्ञान प्रकरण पहावे म्हणून दासबोध उघडला.....

     त्यात गंमत कसली?’ गणपतीने हटकले.

     त्याच्या मांडीवर चापट मारुन विलास म्हणाला, जरा ऐक तर खरं. आजी! मी तुम्हाला सांगतोय. पहिलीच ओवी वाचली. ऐक ज्ञानाचें लक्षण | ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान | पाहावें आपणासि आपण | या नाव ज्ञान ||५-६-||श्रीराम||

     जवळच कपाटाला आरसा होता. मी त्यात निरखून निरखून पाहीले. आपण आरशात रोजच पहातो. हेच का आत्मज्ञान?’

     मावशीने हटकलेच. काय पहातो आहेस एवढा! काही नाही म्हणत वेळ मारून नेली. काम उरकून घरी आलो. आजी, बस्स आपण आपल्याला पाहिलं....

     आरशांत नव्हे!’ आजी म्हणाल्या. आरशात देहाचे प्रतिबिंब दिसते. ते तरी आहे तसे दिसते कां? उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे असे दिसते. हा तुझा सदऱ्याचा खिसा कोणत्या बाजूला दिसतो. असे देहाचे प्रतिबिंब पहाणे म्हणजे आत्मज्ञान नव्हे. आपणासि म्हणजे खऱ्या मी ला पहाणे. आपल्या मूळस्वरुपाला पहाणे. म्हणजेच शोधणे. तात्पुरते नाशिवंत आहे ते सोडणे. टिकावू निश्चित आहे ते ह्रदयातच आहे. त्या अनुसंधानांत अखंड रहाणे म्हणजे आत्मज्ञान.

     विलासने कपाळावर हात मारला.

     त्यालाचे शुध्द ज्ञान म्हणतात, आजी म्हणाल्या.

     सुधा म्हणाली, आजी ही पहा शुध्द ज्ञानाची ओवी. ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण| शुद्ध स्वरूपचि आपण | या नाव शुद्ध  स्वरूपज्ञान | जाणिजे श्रोतीं  ||५-६-१०||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, आपण ज्याला परमात्मा, भगवंत म्हणतो त्याचेच आपण अंश आहोत. म्हणजे त्या चैतन्याचाच एक कण. तो आपल्या ह्रदयांत आहे. तेच बुध्दीला उजाळा देते. देहाकरवी कार्य करवते. तेच आपण आहोत हा अनुभव सदैव घेत रहावे. त्या अनुभवांतच डुंबणे याला स्वरुप ज्ञान म्हणतात.

     आजी!’ मधुकरने शंका विचारली, हा परमात्म रुप ज्ञानाचा झरा जर ह्रदयांतच आहे तर आपण आनंदात न रहाता दु:खी कष्टी अपयशी वैतागलेले असे कां रहातो?’

     छान विचारलेस!’ आजी म्हणाल्या, मधुकर! आपण त्या रूपाला विसरतो. विस्मरण हे अगदी विचित्र असते. कां विसरतो? कसे विसरतो?’

     जया म्हणाली, या विसरण्याची गंमत सांगते. परवा आजोबा तासभर काहीतरी शोधत होते. काय हवं हे कोणाला सांगतच नव्हते. पण शोधतच होते. शेवटी बाबांनीच विचारले, काय शोधत आहांत? ते म्हणाले, मी चष्मा शोधतोय. कुठे ठेवला आठवत नाही. तेव्हा छोटी आजोबांच्या जवळ जाऊन म्हणाली, तो ताय तुमत्या तपालापलच आहे! आजोबा खळखळून हसले. त्यांना सवय आहे, वाचायच नसेल तेव्हा कपाळावर चष्मा सरकवतात. स्वत:च्याच कपाळावरचा चष्मा आणि शोधत होते घरभर. छोटीने सांगितल्यावर हात कपाळाकडे गेला नी चष्मा मिळाला. म्हणजे हरवला नव्हताच.

           


            आजी म्हणाल्या, अगदी तस्संच आपलं होतं. ती दिव्य शक्ती, आत्मा जवळच ह्रदयांत जन्मापासून मरेपर्यंत असतो. पण ओळख पटत नाही. सद्गुरु ती ओळख करुन देतात. तेच आत्मस्वरुप सगळ्या जगाचे, विश्वाचे मूळ आहे. हा विश्वास पक्का होणे म्हणजे ज्ञान.

     गणपती म्हणाला, या ज्ञानाने काय होते?’

     तूच वाच नं! ही पन्नासावी ओवी. आजी म्हणाल्या. आणि गणपतीने ओवी वाचली. ज्ञानवन्ही प्रगटे | तेणें दृश्य केर आटे | तदाकारें  मूळ  तुटे | भिन्नत्वाचें ||५-६-५०||श्रीराम||

     दृष्य केर आटे म्हणजे काय?’ विलासने विचारले.

     सांगते!’ आजींना आनंदच वाटला. दृष्य म्हणजे डोळ्यांना जे दिसते ते. अगदी तू मी सुध्दा. हे सगळे आज ना उद्या नाहीसे होणारच. त्यांनाच आपण चांगले, माझे माझे म्हणून कवटाळून बसतो. म्हणून या शुध्द कैवल्य ज्ञानाला विसरतो. पण एकदा का स्वस्वरुपाचे ज्ञान झाले की, कचरा कसा अग्नीत जळून जातो तसे असूनही दृष्य जळल्यागत नाहीसे होते. सगळ्या विश्वाची राख व्हावी लागत नाही. परमात्मा व आपण म्हणजे खरा मी यात जे जे आड येते ते नष्ट होते. मनातून नाहीसे होते. व आत्ता आपणास देव वेगळा व मी वेगळा असं वाटतंयते वाटणं बंद होऊन मीच तो असा अनुभव येतो.

     जया म्हणाली, हा अनुभव लवकर यावा म्हणून काय करायचं?’

     हे बघ, आजी म्हणाल्या, ही ओवी तूच वाच.

     जयाने ओवी वाचली, अखंड घडे श्रवणमनन | तरीच पाविजे समाधान | पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान | वैराग्य भरे आंगीं  ||५-६-५९||श्रीराम||   

     तिचे वाचून झाल्याबरोबर गणपती म्हणाला, श्रवणाचे मनन घडते हा अनुभव हळू हळू येतोय. त्याने आनंद वाटतो. पुढचं पुढचं ऐकू अशी ओढ वाटते. हा आनंद म्हणजेच समाधान कां?’

     होय!’ आजी म्हणाल्या, या समाधानाने फक्त आनंद हवा, बाकी काही नकोसे वाटते. जगातील वस्तू नाहीशाच व्हाव्या असे नाही. त्यांच्या बद्दलचा हव्यास नाहीसा होतो. हे एकाएकी जमत नाही. यासाठी साधना हवी. म्हणजेच अभ्यास करावा लागतो. सुधा, साधना केली नाही तर? वाच तू..’

     साधन न मने जयाला | तो सिद्धपणे बद्ध जाला| त्याहूनि  मुमुक्ष  भला|  ज्ञानाधिकारी  ||५-६-७३||श्रीराम||  

     विलास म्हणाला, हे बध्द, मुमुक्षु, सिध्द ही काय भानगड आहे?’

     विलास! भानगड बिनगड काही नाही. मधुकर म्हणाला. आजी छान समजाऊन सांगतील. सांगा आजी.

     बाळांनो!’ आजी म्हणाल्या, आधी बध्द कोणाला म्हणतात हे दासबोधातूनच पाहू या. कोण वाचणार बरं!’

            मीच वाचतो, विलास म्हणाला. जयासि नाहीं आत्मज्ञान | हें मुख्य बद्धाचें लक्षण | तीर्थ व्रत  दान पुण्य | कांहींच  नाहीं ||५-७-१८||श्रीराम||  

     छान! कळल ना आता?’ आजी म्हणाल्या, परमार्थ नको वाटतो, पैसा खर्च होऊ नये म्हणु  कुठे यात्रेला जातच नाही. देवधर्म दान काहीच करीत नाही. सत्संग नको. सारासार विचार नाही. अशा माणसाला बध्द म्हणतात. जया तू पुढचे वाच.

जागृति स्वप्न रात्रि दिवस | ऐसा  लागला  विषये ध्यास | नाहीं क्षणाचा अवकाश| या नाव बद्ध ||५-७-४८||श्रीराम||  

     मी सांगू का अर्थ?’ जया म्हणाली, जो माणूस जागेपणी, स्वप्नात, दिवसा रात्री सारख्या इंद्रियांना आवडते तेच देत रहातो. त्याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही. पण परमेश्वराचे नांव घ्यायला त्याला वेळ नसतो. अशा माणसाला बध्द म्हणतात. खाऊन पिऊन टामटूम. हसणे फिरणे धामधूम. परोपकार सामसूम.

     आजी म्हणाल्या, हा आनंद टिकाऊ नसतो. सुखा पाठोपाठ दु:ख टपलेलेच असते. पशुसारखे जीवन न जगता देव होण्याचा प्रयत्न करावा.

     विलासने विचारले, असा प्रयत्न करणारास काय म्हणतात?’

     समर्थ तेच सांगत आहेत. आजी म्हणाल्या, दु:खाच्या खाईत सापडला की त्याला पश्चाताप होतो. मी काहीच चांगले केले नाही. ज्या मूर्ती पूजेत ठेवल्या, पूजा केली त्याच विकून कर्ज भागवयाचा प्रयत्न केला. कथा कीर्तने केली तरी पैसा मिळवण्यासाठी. आता? आता आयुष्य संपत आले. वाच. सुधा आता तू वाच.

     कोण उपाये करावा | कैसा परलोक पावावा | कोण्या  गुणें  देवाधिदेवा | पाविजेल ||५-८-१७||श्रीराम||    

     सुधा म्हणाली, आजी हे कसं झालं? शाळेत बरीच मुले पास झाली. व आपण नापास झालो की कळतं. मी खेळण्यात वेळ घालवला. मी वेळेवर अभ्यास नाही केला. आता काय करू? रडा दुसर काय करणार?’

     आजी म्हणाल्या, जर मनापासून चूक पटली तर सहामाहीची भर वार्षीकला भरून निघते. मात्र खेळातला स्वार्थ सोडावा लागतो. सारखा अभ्यासाचा ध्यास लावावा लागतो. तसेच....... स्वार्थ सांडून प्रपंचाचा | हव्यास धरिला परमार्थाचा| अंकित होईन सज्जनाचा | म्हणे तो मुमुक्ष ||५-८-४३||श्रीराम||   

     मुक्त होण्याची इच्छा करणारा असे करतोच. प्रपंचातले म्हणजे मुलाबाळावरचे प्रेम ओसरते, घरादारावरचे प्रेम ओसरते. सज्जनांची संगत धरली की तो मुमुक्षु. पण त्यासाठी काय करावे?’

            गणपती म्हणाला, मला सांगा, मी वाचतो. अवगुण त्यागी दिवसेंदिवस | करी उत्तम गुणाचा अभ्यास | स्वरूपीं  लावी  निजध्यास  |  या  नाव  साधक  ||५-९-१४|| श्रीराम||  

     छान!’ आजी म्हणाल्या, आधी दुर्गुण आहेत हे कळावे लागते. मग ते टाकावेत हा प्रयत्न करावा लागतो. एक दुर्गुण गेला की दोन सद्गुण जमा होतात, त्यामुळे मन आत्मज्ञानाकडे वळते. मग त्या मुमुक्षुचा साधक होतो. साधकाला जगाचे खोटेपण लक्षांत आले की, त्याच्या मनाचा निश्चय पक्का होतो. तो मोठेपणाला दूर झुगारून देतो. लौकीक वैभवाला तुच्छ मानतो. .......

     म्हणजे त्यालाखरे वैभव समजते म्हणा ना! मी सांगंतो खरे वैभव. विलास म्हणाला. पूर्ण समाधान, परम शांती, अखंड आनंद. बरोबर नां?’

     अगदी बरोबर!’ आजी म्हणाल्या. तो साधक साधना करता करता मान सन्मान सर्व बाजूलाच सारतो.

     गणपती टाळी वाजवून म्हणाला, आजी ही बघा ओवी... थोरपणासि पाडिलें| वैभवासि लिथाडिलें | महत्वासि झिंजाडिलें | विरक्तिबळें ||५-९-३८||श्रीराम||  

     छान! छान! झिंजाडिले किती योग्य शब्द वापरला समर्थांनी. अंगावरून झुरळ चढले तर ते जसे चटकन आपण दूर करतो व्यवहारातच नव्हे तर परमार्थातही अतिशय सावध न तत्पर असतो. चूक होऊ देत नाही. शाश्वत अशाश्वताचा विचार करतो. .......

     थांबा आजी मी काढली ओवी. विलास म्हणाला. सावध दक्ष तो साधक | पाहे नित्यानित्य विवेक | संग  त्यागूनि  येक |  सत्संग  धरी||५-९-५६|| श्रीराम||  

     आता विलासने बाजी मारली हं!’ आजी म्हणाल्या. मी ही ओवी सांगणारच होते. एकदा का दुर्गुणाचा, विषयांचा संग सुटला की सत्संग लाभायला वेळ लागत नाही.  

     मधुने शंका विचारली, सत्संग लाभला की दुर्गुणाचा संग सुटतो, की दुर्गुण गेल्यावार सत्संग घडतो?’

     छान शंका विचारली!’ आजी म्हणाल्या, मला सांग सूर्य उगवल्यावर अंधार जातो की, अंधार गेल्यावर सूर्य उगवतो?’

     गणपती म्हणाला, दोन्ही एकदमच होणार की! जेथे प्रकाश तेथे अंधार राहीलच कसा?’

     हो नां? तस्संच आहे हे! आजी म्हणाल्या. एकदा का संतांची आदर्श व्यक्तीची संगत घडली की एकेक दुर्गुण काढता पाय घेतो. चांगले गुण आपोआप चिकटतात. अंगी बाणतात. त्याला प्रत्यक्ष प्रमाण येथेच नाही कां? दासबोध श्रवण हा आपला सत्संग चालू आहे. उशीर होतोय कुणाला यायला? चपला बघा कशा ओळीने ठेवल्या आहेत न? न बोलताच पाण्याची सोय केल्यावर पाय धुवून बसा सांगावे लागते कां? मारुतीरायाचे वंदन घडतच नां, आपोआप. मी सांगायच्या आधीच ओव्या सापडू लागल्या. म्हणजे माझ्या मनातले ओळखता येऊ लागले तुम्हाला!

     बध्दाचा कोण होतो?’ आजींनी विचारले.

     मुमुक्षु!’ सर्वांनी एकदमच उत्तर दिले.

     मुमुक्षुचा साधक होतो. विलासने सांगितले.

     शाब्बास! साधक उत्कृष्ट साधना करू लागला की सिध्द होतो. सिध्द म्हणजे जे साध्य करून घ्यायचे ते परमात्मस्वरुप आपणच आहोत. हा पूर्ण अनुभव घेणारा. त्यालाच समर्थ साधु म्हणतात. सुधा वाच ओवी. आजी म्हणाल्या.

     सुधाने ओवी वाचली, साधु वस्तु होऊन ठेला | संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला | निश्चयें  चळेना  ऐसा झाला | या नाव सिद्ध ||१०||श्रीराम||

     बाळांनो! वस्तू म्हणजे परब्रह्म. सिध्द पुरूष ब्रह्मरूपच होतो. मी देह आहे हा भ्रम उडतोच व निश्चयात्मक मी ब्रह्म आहे असा त्याला अनुभव येतो.आत्मबुद्धि निश्चयाची | तेचि दशा मोक्षश्रीची | अहमात्मा  हें कधींचि | विसरों  नये  ||५-१०-३८||श्रीराम||

     विलास अगदी हुरळून गेला. आजी मी पक्क लक्षांत ठेवीन. मी आत्मा आहे. विलास म्हणाला, नव्हे मी आत्माच आहे. तुम्ही केव्हाही विचारा. झोपेत, म्हणजे मी झोपलो असेन तेव्हाही विचारलेत तरी मी सांगेन मी आत्माच आहे. मग आपण सिध्दाच्या टप्प्यापर्यं गेलो हे वेगळे सांगायला नको.

     इतक्यांत वा! वा! विल्या सिध्द झाला. गणपती हळूच म्हणाला.

     आजी! बघा हा मला विल्या म्हणाला. विलासची तक्रार.

     म्हणजे आपण अजून देहबुध्दीत आहोत. विलासराव, सुधा म्हणाली.

     झोपेत कशाला? मी विल्या नाही. विलास या देहाचे नाव आहे. माझे नांव विलास हेच आधी विसरायला हवे. मला नावच नाही. मी आत्मरूप आहे. हे अंतर्यामी जाणायला अभ्यास हवा. तो पर्यंत चार नांव तरी लक्षांत ठेवू या!

     हा थांब. मी नक्की सांगतो. १) बध्द, २) मुमुक्षु, ३) साधक, ४) सिध्द विलास म्हणाला.

            शाब्बास विलासराव!” गणपतीने पाठीवर शाबासकी जरा जोरातच दिली.

     टाळ्या वाजवीत सर्व म्हणाले,

।। जय  जय रघूवीर समर्थ ।।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा