ब्रह्मणस्पती विनायक
लेखक अनिल वाकणकर,
श्रीवर्धन, रायगड
३
सकाळचे सहा वाजले
होते. रेडीओवर सकाळचा भक्ती संगिताचा कार्यक्रम लागलेला होता. लता मंगेशकर यांच्या
सुमधुर आवाजात “गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया” हे गणेशाला वंदन करणारे गीत लागले होते. अजुन
सुर्योदय झाला नव्हता. आता कोणत्याही क्षणी सुर्योदय होईल आणि पूर्व दिशेला लाल
रंगाची उधळण होईल असे वातावरण होते. हवेत हलकासा गारवा होता. लतादिदिंच्या भावमधुर
आवाजाने वातावरण भक्तीमय झाले होते.
रोज
पहाटे पांचाच्या ठोक्याला उठणारे थोरात गुरुजी आज जरा उशिरा उठले होते. रात्री
अंगात थोडी कण कण असल्याने जाग आली तरी अंथरुणात पडुन राहिले होते. परंतु
रेडिओवरच्या लता दिदिंच्या गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया या गाण्याने त्यांची
मरगळ कुठल्या कुठे पळुन गेली. थोरात गुरुजी पक्के गणेश भक्त आहेत. दर संकष्टी
चतुर्थीला ते उपवास करतात. नित्यनेमाने रोज आंघोळ झाल्यावर ते गणपति अथर्वशिर्ष
म्हणतात. आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रभात समयाला गणेश वंदना ऐकुन त्यांचे
मन प्रसन्न झाले. लगेचच अंथरुण सोडून ते आपल्या दैनंदिन व्यवहाराला लागले.
ते अंथरुणातुन उठतात नाही तोच त्यांच्याकडे
भांडी घासायला
येणारी सगुणा मोठ्या मोठ्याने गुरुजींना हाक मारत त्यांच्या घराकडे आली. “अहो गुरुजी! तुम्हाला समजला काय, परांजप्यांच्या वावरात म्हणं गणपति बाप्पा गावलाय!”
काय सांगतेस काय सगुणे! अगो आज पौष महिन्यातली संकष्टी
चतुर्थी आहे आणि साधी नाही अंगारीका संकष्टी आहे आज! काय समजलीस! !
आज गणपति सापडणे म्हणजे फार चांगला योगायोग आहे. पण काय गं सगुणे तुला ही बातमी कोणी
दिली? तू
स्वत: पाहिलेस
काय! थोरात गुरुजी एकदम उत्साहीत सुरात म्हणाले.
नाय वो गुरुजी! आमचं मालकच परांजप्यांच्या
वावरात कामाला हैती! गेले आठ दहा दिवस त्यांच्याच वावरात काम चालू हायं बघा.
नानांचा ल्येक दापोलीस्न आलाय तो बाव पाडतोय म्हणं! सगुणेने उत्तर दिले.
बरं! बरं! मीच बघतो तिकडे जाऊन काय प्रकार
आहे तो. असे म्हणून गुरुजींनी आपले आन्हीक पटापट आवरायला सुरवात केली. तसे ही आज
शाळेत जाणे होणार नव्हतेच. कारण दर संकष्टीला त्यांची शाळा सकाळची असते. त्यांना
ताप आल्याने आज त्यांनी सुट्टीच घेतली होती.
*******
४
नाना परांजपे हे
भोस्ते गावातिल एक शांत आणि समंजस व्यक्ती आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी
बेताचीच आहे. परंतु ते खाऊन पिऊन सुखी आहेत. रोजच्या वरणभाताला तोटा नाही. हां,
रोकड, नसेल फारशी. परंतु खलाटीला पोटापुरते भात पिकणारी शेती आहे. त्यातुन खंडिभर
भात पिकते. जोडीला जवळच्या चार गावांचे पौराहित्य ते करतात. कोणाचा सत्यनारायण,
कोणाची घरभरणी, कोणाचे लग्न, तर कुठे बारसे कधी बारावा देखिल ते करतात. त्यातुन
फारशी कमाई होते असे नाही. कारण ते हे काम सेवा म्हणून करतात. कोण काय देईल ते न
बघता खिशात टाकतात. मिळालेला शिधा, फळे त्यांच्या घरापर्यंत कधीच येत नाहीत. वाटेत
भेटणाऱ्या बाळगोपाळांना ते फळफळावळे वाटुन मोकळ होतात. शिधा देखिल कोणी गरजु भेटला
तर त्याला देऊन मोकळे होतात. त्यामुळे कधी कधी पदरचे पैसे घालुन प्रवास खर्च केला जातो.
त्यामुळेच नाना परांजपे सर्वांना हवेसे वाटतात. सर्वांनाच ते आपल्या घरातलेच वाटतात.
त्यांचे
घर गावाच्या मध्यवर्ती भागातच होते. त्यांच्या घरा समोर जांभ्या दगडाची पाखाडी आहे.
घराच्या पाठीमागेच त्यांची खलाटी आहे. खलाटीच्या बाजुला थोडीशी जांभ्या दगडाचा
कातळ असलेली डोंगराळ जमिनही त्यांचीच आहे. तेथे गवताशिवाय काही पिकत नाही. आज
त्यांच्या घराच्या पाठिमागच्या खलाटीत बरीच गर्दी जमलेली दिसत होती. खलाटीच्या एका
कोपऱ्यात विहिरी सारखे काहीतरी खणलेले दिसत होते. खड्डा साधारण पाच साडेपांच फुट
एवढा खोल दिसत होता. सगळीकडे मातीच माती झालेली होती. एकीकडे मातीचा मोठ्ठा डोंगर
तयार झालेला दिसत होता. खड्याच्या मध्यभागी साधारण दोन फुट उंचीची संगमरवरी मूर्ती
दिसत होती. त्या मूर्तीच्या पायाशी ताजी फुले वाहिलेली दिसत होती.
थोरात गुरुजींनी जमलेल्या गर्दीतुन वाट काढीत
पुढे जायला सुरवात केली. भोस्ते गावातिल जवळ जवळ सर्वच आबालवृद्ध येथे जमा झाले
होते. एवढ्याशा गावांत ही बातमी पसरायला जेमतेम अर्धातासच लागला असेल. जो तो पुढे
पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. सर्वांचा एकच गलका चालू होता. त्यामुळे थोरात
गुरुजींना त्या गर्दीतुन पुढे जायला जरा वेळच लागला. ते पुढे जाऊन पहातात तो काय,
ते रोज पठण करीत असलेल्या गणपति अथर्वशिर्षातिल “एकदंतं
चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणंरदंचवरदं हस्तैर् बिभ्राणं मूषकध्वजम्” या वर्णनाबरहूकुम ती संगमरवरी मूर्ती दिसत होती.
तरीही अजुन त्या मूर्तीला नीट साफ केले नव्हते. बरीच धुळ मूर्तीवर दिसत होती.
त्यामुळे ती मलिन झालेली दिसत होती. गणेशाचे ते देखणे रुप पाहून गुरुजी सद्गदित
झाले आणि त्यांनी त्या धुळीतच त्या अद्भुत रुपासमोर साष्टांग दंडवत घातला. त्यांचे पाहून गर्दीतिल एक एकजण पुढे येऊन
त्या धुळीतच गणेशाला सांष्टांग नमस्कार घालु लागला.
सर्वांचे
दर्शन घेऊन झाल्यावर एक एक जण आपापल्या उद्योग धंद्याला निघुन गेले. तिथे मोजकेच
लोक उरले. त्यात थोरात गुरुजी, अर्जुन शिंदे, अनिल आणि नाना परांजपे आणि एक दोन
गावकरी असे पांच सहाजणच तिथे शिल्लक राहीले.
आता
बोलण्याचा पुढाकार थोरात गुरुजींनी घेतला. नाना! आज अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे आणि
आजच्या या पवित्र दिवशी आपल्या गावांत श्री गजाननाचे आगमन होणे ही फार मोठी घटना
आहे. या घटनेने आपल्या गावाची भरभराट होईल. या आनंददायी प्रसंगी आपण या गणेशाचे
नम्रपणाने स्वागत करुया! बोलता बोलता
गुरुजींचा आवाज कातर झाला. त्यांच्या डोळ्यांतुन घळा घळा पाणी वहायला लागले.
व्हय! व्हय! आक्षी
बराबर हाय तुमचं गुर्जी!
पन आता त्या द्येवाला कवा पास्न धुळीत ठेवलया त्याला आदी भायर काडुया. अर्जुन
शिंदेंनी सुचना केली.
अहो गुरुजी! आमच्या घराण्यांत अनेक
पिढयांपासुन ब्रह्मणस्पतीसूक्ताचे पठण केले जाते. त्यामुळे त्या उपासनेच्या
परंपरेचे फलस्वरुप म्हणून हा “ब्रह्मणस्पती विनायक” आमच्या परसात प्रकट झाला अशी माझी
भावना आहे. म्हणून या बाप्पाला आपण “ब्रह्मणस्पती विनायक” या नांवाने संबोधुया. या
बाप्पाची पूजा करताना गणपती सूक्त आणि ब्रह्मणस्पती सूक्त यांचे अनुष्ठान केल्यास
विशेष फलप्राप्ती होईल अशी माझी धारणा आहे.
पण
नाना! एवढी साजरी मूरत कशी काय गावली? एका गावकऱ्याने सहजच चौकशी केली.
वास्तविक सगळ्यांच्या मनांत हाच प्रश्न होता.
त्याचं काय झाले, बि. कॉम् झाल्यापासुन मी
नोकरीच्या प्रयत्नाकरीता दापोलीत रहात होतो. परंतु या वशिल्याच्या जमान्यात मला अजुन पर्यंत काही नोकरी धंदा मिळाला नाही. तिथे
रिकामे बसण्यापेक्षा नानांना शेतीच्या कामात मदत होईल म्हणुन मी परत गावाला यायचे ठरवले. आता
घरी परत आलो आहेच तर काही आंब्याची,
काजुची कलमे लावावी हा विचार केला. त्या कलमांना पाण्याची सोय व्हावी याकरीता
डवऱ्यासारखी विहिर खोदायची ठरवले. म्हणून गेले आठ दहा दिवस सहदेवच्या मदतीने डवरा
खोदायला सुरवात केली. अनिलने झालेली हकिगत सांगायला सुरवात केली.
अरे
अनिल! थांब हे सगळे नंतरही समजले तरी चालेल. पण
त्याआधी अर्जुन शिंदे यांच्या म्हणण्या प्रमाणे आपण देवाला किती काळ ताटकळत
ठेवणार. आधी आपण बाप्पाला खड्यातुन बाहेर काढु. त्याची विधिवत पूजा अर्चा करु नंतर
सावकाश सगळी हकिगत सांग. कसे काय मंडळी?
आक्षी
बराबर हाय!
सगळ्या गावकऱ्यांनी सामुहीक उत्तर दिले. त्यानंतर सर्वांनी मिळुन गणपती बाप्पाची
मूर्ती बाहेर काढुन तिला स्वच्छ धुतली. खणलेल्या डवऱ्यातुन निघालेले जवळपास पडलेले
जांभे दगड गोळा करुन त्याचा एक ओटा तयार केला. त्यावर मातीचा भराव करुन ती
चोपण्याने व्यवस्थित दाबुन त्यावर गायीच्या शेणाने सारवण काढुन त्यावर गणपती
बाप्पाची तात्पुरती प्रतिष्ठापना केली.
*******