सोमवार, १६ एप्रिल, २०१८

हैदराबाद सहल भाग ५


हैदराबाद सहल भाग ५
            आधी ठरवल्याप्रमाणे सकाळी नाश्त्याला उतरतनाच सर्व बॅगा घेऊन खाली आलो. रोजच्या प्रमाणे भरपेट नाश्ता झाल्यावर आमच्या रोजच्या मिनी बसमध्ये श्रीशैलमला जाण्यासाठी बसलो. आज  आमचा ड्रायव्हर बदलला होता. गेले चार दिवस जो ड्रायव्हर होता तो तसा को ऑपरेशन करणारा होता. मात्र आज जो ड्रायव्हर होता तो थोडासा अँरोगंट होता. वास्तविक आमच्या आजच्या नियोजना प्रमाणे आम्ही सकाळी चारमिनारला भेट देऊन पुढे श्रीशैल्यला जाणार होतो. परंतु रस्ता बंद या सबबीखाली त्याने आम्हाला थेट हैदराबाद शहराच्या बाहेर जवळपास पन्नास किलोमिटर आणले. दरम्यान अनेक फोन करुन झाले. शेवटी त्याने परत शहरात जाण्याची तयारी दाखवली. परंतु तिथपर्यंत खूप उशिर झाला होता म्हणून आम्हीच परत जायला नको सांगितले.
     श्रीशैल्यला जाताना वाटेत घनदाट अरण्यातुन रस्ता आहे. या जंगलात संरक्षित व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे वाटेत फॉरेस्ट खात्याकडुन गाडीची तपासणी झाली. या जंगलात बरेच मोर असतात असे ऐकले होते. परंतु या प्रवासा दरम्यान आम्हाला माकडांच्या शिवाय कोणतेही प्राणी दिसले नाहीत. माकड बाकी खूपच होती. रस्ता सिंगल जरी असला तरी सुस्थितित होता. त्यामुळे प्रवास त्रासदायक वाटला नाही.
     वाटेत कृष्णा नदीवर बांधलेले मोठे धरण आहे. या ठिकाणी कृष्णा नदीला पाताळगंगा असे म्हणतात. या परिसरात कृष्णानदी खूप उंचावरुन खाली कोसळते म्हणून कदाचित तिचे नांव पाताळगंगा पडले असावे. या नदीचे पाणी त्वचारोगावर औषधी आहे असे म्हणतात. या ठिकाणी फोटो काढायला आणि पाण्याचा मोठा प्रवाह पहायला खूप गर्दी झालेली होती. ते ठिकाण जवळुन सुंदर दिसत होतेच परंतु अगदी दूरुन देखिल अतिशय मोहक दिसत होते. पाताळगंगेवरील या धरणाच्या पाण्यावर हैड्रो पॉवर प्रोजेक्ट कार्यरत आहे.
      पाताळगंगा धरणाच्या बाजुन गोल गोल फिरत जाणाऱ्या रस्त्याने गेल्या नंतर आम्ही श्रीशैल्य येथिल प्रसिद्ध असलेल्या साक्षी गणेश मंदिरापाशी पोचलो. मंदिराचा परिसर निसर्ग सौदर्य़ाने समृद्ध अशा परिसरात आहे. मंदिराच्या मागे मोठा हिरवागार डोंगर आहे. गजाननाची मूर्ती काळ्या रंगाची आहे. या परिसरात अतिशय प्रसिद्ध असणारे हे देऊळ आहे. आम्ही तिथे पोचलो त शनिवार होता आणि त्या दिवशी अमावस्याही होती. ही पर्वणी साधण्याकरीता अनेक स्थानिक भक्त तेथे आलेले होते. त्यातिल अनेक तरुणांच्या डोक्यावर एक बोचके होते. गळ्यांत माळा घातलेले हे तरुण आपापल्या मुला बाळांसह यात्रेला आले होते. त्यातिल अनेकांनी काळी वस्त्रे नेसली होती. वस्त्रे म्हणजे फक्त लुंगी आणि उत्तरीय म्हणून पंचा किंवा टॉवेल होता. हिच मंडळी पुढे मल्लिकार्जुन मंदिरात होती. मल्लिकार्जुन मंदिरात हे ग्रुप पुरोहितांना घेऊन आपल्या व्रतांचे उद्यापन करताना दिसत होते.
साक्षी गणपती मंदीर, हैदराबाद

      साक्षी गणपतीचे दर्शन झाल्या नंतर आम्ही सर्वांनी सभागृहात बसुन श्री गणपति अथर्वशिर्षाचे पठण केले. आजच्या शनि अमावस्येचे महत्व म्हणून असेल तिथे येणारा प्रत्येकजण आवळ्याचा दिवा लावत होता. असे आवळ्याचे तयार केलेले दिवे विकायला काही बायका तेथे बसलेल्या होत्या. गणपतीबाप्पाचे दर्शन घेऊन आम्हाला येथे प्रसिद्ध असणाऱ्या शिवस्मारकाचे दर्शन घ्यायचे होते.
आमच्या ड्रायव्हरने आम्हाला एका शंकराच्या मोठ्या पुतळ्यापाशी नेले आणि हेच शिवस्मारक आहे असे सांगितले. आम्हाला वास्तविक शिवाजी महाराजांचा पुतळा असलेले ठिकाण पहायचे होते. कारण त्याबद्दल खूप ऐकले होते. परंतु येथे मुख्य अडचण भाषेची होती. कोणालाही हिंदी समजत नव्हते त्यामुळे संवाद साधला जात नव्हता. शिवाजी महाराजांनी आपले शिरकमल मल्लिकार्जुनाला अर्पण करण्याकरीता हातात तलवार घेतली होती, परंतु त्यांना रघुनाथ पंतानी त्यापासुन रोखले असे श्रीमानयोगीमध्ये वाचले होते.
     श्रीशैलम येथिल आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या गेस्टहाऊस मध्ये आमचे रहाण्याचे बुकींग होते. हैदराबादच्या तुलनेत रुम लहान होत्या. शिवाय सरकारी कारभार असल्याने अनेक प्रकारच्या त्रुटी होत्या तरीही एकच रात्र रहायचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दिवसभराच्या प्रवासाने आलेला थकवा थोडासा आराम करुन व हातपाय धुवुन झाल्यावर दूर झाला त्यानंतर आम्ही मुख्य मंदिराकडे गेलो. गेस्ट हाऊस पासुन मंदिर जवळच होते.
      मंदिराच्या जवळ गेल्यावर असे लक्षांत आले येथे दोन प्रकारच्या दर्शन रांगा होत्या. एक रांग कोणत्याही शुल्काशिवाय दर्शन घेण्याकरीता होती. तर दुसऱ्या रांगेतुन तात्काळ दर्शनाची सोय होती. त्याकरीता तिनशे रुपये शुल्क होते. आम्ही तात्काळ दर्शनाच्या रांगेत गेलो. येथे दोन तिन कंपार्टमेंट केलेली होती. त्यामध्ये बसण्याकरीता सोय केली होती. कमीत कमी एक तास आम्हाला तेथे बसावे लागले. त्या दरम्यान एका द्रोणात सर्वांना प्रसाद म्हणून सांबार भात म्हणजेच खिचडीचाच एक प्रकार दिला गेला. याला बिशी बेली बाथ असे म्हणतात हे नंतर समजले. या शिवाय चहा कॉफी विकणाराही तेथे हजर होता. सुमारे तासा दिडतासाने आम्हाला प्रथम सुवर्ण कळसाचे आणि त्यानंतर प्रत्यक्ष श्री मल्लिकार्जुनाच्या पिंडीचे दर्शन झाले. गाभाऱ्यापासुन काही अंतरावरुनच दर्शन घेता आले.
      दर्शन घेऊन आल्यावर श्री मल्लिकार्जुनावर रुद्राभिषेक करण्याकरीता असलेल्या बुकींग काऊंटरवर जाऊन उद्याकरीता बुकींग केले. रुद्राभिषेक करण्याकरीता एक दांपत्य आणि त्यांची दोन मुले यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते. त्याकरीता पंधराशे रुपये शुल्क आकारले जाते. आमच्यापैकी तिघा दांपत्यांनी हे बुकींग केले. त्याकरीता उद्या सकाळी साडेआठवाजता रुद्राभिषेकाच्या गेटवर हजर रहायचे होते.
      अभिषेक बुकींग झाल्यावर आम्ही थेट गेस्ट हाऊसच्या कँटीनमध्ये गेलो. कारण कँटीन बंद होण्याची वेळ होत आली होती. या कँटीनमध्ये आम्हाला घर सोडल्यापासुन प्रथमच गरमागरम घरगुती जेवणाची बरोबरी गाठणारे जेवण मिळाले होते.
*******

            आज देवदिवाळी आहे, योगायोगाने आम्ही आज या पवित्र दिवशी श्री मल्लिकार्जुनाला रुद्राभिषेक करणार आहोत. त्यासाठी आठ वाजताच पांढरी लुंगी आणि पंचा या पोषाखात तयार झालो. बरोबर साडेआठ वाजता रुद्राभिषेक करणाऱ्यांसाठी असलेल्या वेगळ्या गेट मधुन मंदिर परिसरात प्रवेश केला. आमच्या सारखी सुमारे दोनशे दांपत्ये रुद्राभिषेक विधी करीता तेथे हजर होती. एवढी लोक एकाच वेळी गाभाऱ्यात जाऊन अभिषेक कसा करणार हा प्रश्न पडला. परंतु लगेचच त्याचे उत्तर मिळाले.
     आम्हा सर्वांना एका हॉलमध्ये नेण्यांत आले तेथे मल्लिकार्जुनाची प्रतिकृती असलेले एक स्टेज तयार केलेले होते. त्यावर ओळीने पुरोहित मंडळी बसली होती. अभिषेक करणाऱ्या लोकांकरीता खास आसने मांडुन ठेवलेली होती. प्रत्येका समोर एक परात, त्या परातित एक मोठा कलश होता. याशिवाय नारळाची एक कवड आणि पूजा साहित्य ठेवलेले होते. सर्वजण आसनस्थ झाल्यावर प्रत्येकाला एक पिशवी देण्यांत आली. त्या पिशवीत प्रसादाचे लाडू असलेले बॉक्स, दोन माहिती पुस्तके, अंगारा आणि कुंकुम यांच्या डब्या, सुकामेवा असणारे एक पाकीट, एक विस्कीट पुडा पाण्याची बाटली एवढे सामान होते. माहिती पुस्तके मात्र तेलगुतच होती. त्यामुळे ती माहिती पुस्तके आमच्यासाठी निरुपयोगी होती.
      सर्वप्रथम त्या पुरोहितांपैकी मुख्य पुरोहिताने श्रीशैल्याचे स्थान महात्म्य तेलगुतुन सांगितले. त्यापैकी संस्कृत श्लोक परिचित असल्याने काही संदर्भ समजले. त्यांनीच आता करणार असणाऱ्या विधींची माहिती दिली. मुख्य पुरोहितांनी नंतर संकल्प सांगायला सुरवात केली. त्याबरोबर माहिती मात्र तेलगुतुन देत होते परंतु हे सर्व मंत्र माहित असल्याने काही अडचण भासली नाही. त्या पुरोहितांपैकी चार पाचजण सर्व पूजा करणाऱ्यां कडून प्रत्येकाचे गोत्र आणि नावांचा उच्चार करुन घेत होते. संकल्प पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष अभिषेकाच्या विधीला सुरवात झाली सर्व उपचार समोर दिलेल्या मोठ्या कलशांत करायचे होते. सर्व पुरोहितांनी रुद्राचे एक आवर्तन म्हटले. त्यांच्याबरोबर मीही म्हणत होतो. त्यामुळे मला स्वत:ने अभिषेक करत असल्याचे समाधान मिळाले. येथे फक्त नमकच म्हटले गेले. त्यानंतर आरती प्रार्थना इत्यादि उपचार झाल्यावर प्रत्येकाला श्री मल्लिकार्जुनाच्या गाभाऱ्यात जाऊन त्या कलशातील जलाने मुख्य पिंडीवर अभिषेक करायला सांगण्यात आले. त्याकरीता दर्शनाची रांग थांबविण्यात आली होती. अशा तऱ्हेने बार ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या मल्लिकार्जुनावर प्रत्यक्ष अभिषेक करण्याचा योग आला.
     यथासांग रुद्राभिषेक झाल्यावर सर्वजण रुमवर जायला निघालो. जाता जाता गेटवरच महाप्रसादाची कुपन मिळाली. महाप्रसादाची सुरवात बारा वाजता होणार होती. वाटेतच एका ठिकाणी इडली, वडा, डोसा यांचा स्टॉल होता तेथे प्रत्येकाने आपापल्या रुची प्रमाणे नाश्ता केला. त्यानंतर चहा घेतला. चहाचा स्टॉलची मालकीण पक्की तेलगु होती. तिला आमचे हिंदी समजेना आम्हाला तिचे तेलगु समजेना त्यामुळे हिशेबाचा घोळ व्हायला लागला शेवटी जवळच्या स्टॉलवाल्याने तिला आणि मला हिशेब पटवुन दिला. या प्रसंगावरुन दक्षिणेतील लोक आपल्या मातृभाषेविषयी किती आग्रही आहेत हे पटले. आपण सहजच मराठी सोडून हिंदी अथवा इंग्रजीत बोलायला सुरवात करतो. परंतु असा प्रसंग गुजरात मध्ये गेल्या तिन वर्षात कधीच आला नाही.
     रुमवर जाऊन कपडे चेंज केले सर्व सामान आमच्या मिनी बसमध्ये लोड केले, कारण बारा वाजता रुमचे चेकआऊट टाईम होते. त्यानंतर आम्ही महाप्रसादाकरीता लाईनमध्ये उभे राहीलो. जास्तित जास्त वीस मिनिटे रांगेत उभे रहायला लागले. शिर्डीला किंवा शेगावला ज्याप्रमाणे महाप्रसादाची आसन व्यवस्था आहे त्या प्रमाणेच येथे होती. लोकांना आत सोडण्यापूर्वी ताट आणि पाणी पिण्याचे ग्लास ठेवलेले होते त्याचप्रमाणे येथिल मुख्य प्रसादाचा भाग असणारा गोड पदार्थही वाढलेला होता. येथिल महाप्रसादाचा मेनु भाजी, भात आणि सांबार असा होता. भाताच्या मोठ्या दोन टाक्या असणाऱ्या ढकल गाड्या आणि सांबार आणि भाजी असणाऱ्या गाड्या पंक्तीमधुन फिरत होत्या त्या गाड्यांबरोबर असणारे स्वयंसेवक भाताचा ढीग, सांबार आणि भाजी वाढत होते. पहिल्या वाढपातच पोट तुडुंब भरले.
      महाप्रसाद घेऊन होताच आम्ही थेट बसमध्ये बसलो. ही बस आम्हाला कुर्नुल या रेल्वे स्थानकावर सोडणार होती. श्रीशैल्यहून जाताना वाटेत श्रीशिखरम् या एका ठिकाणाला भेट दिली. तिथुन श्रीशैल्य आणि पातळगंगेचे छान दृष्य दिसत होते. तेथे थोडेसे फोटो काढुन आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता देखिल त्याच व्याघ्र अभयारण्यामधुन जात होता. रात्री आठच्या सुमाराला कुर्नुल रेल्वे स्थानकावर पोचलो. आमची गाडी रात्री अकरा वाजता होती. दरम्यानच्या काळात आम्ही रेल्वे स्थानकासमोर असणाऱ्या एका डोसा सेंटरवरुन पोटपूजा करुन आलो.
      आम्ही एकुण दहाजण आहोत आणि आमच्या प्रत्येकाच्या कमीतकमी दोन बॅगा याप्रमाणे जवळपास पंचवीस बॅगा होत्या. गाडी पकडण्याकरीता जिना चढुन पलिकडील प्लॅटफॉर्म जायचे होते तेही दहा मिनिटाच्या अवधित. त्त्यातच आमच्यातले जवळपास सर्वचजण साठच्या आसपास किंवा त्यापुढचे होते. यावर सोल्युशन म्हणून आम्ही कुली ठरवला होता. त्याने आमचे सर्व सामान त्याच्या गाडीवर चढवले आणि ती गाडी घेऊन तो पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर गेला त्याच्या सोबत मी आणि माझे साडू गेलो होतो. बाकी सगळे जिना चढुन गेले.
      यथावकाश आमची गाडी मार्गस्थ झाली आणि आम्ही तिरुपतीच्या  दिशेने प्रवासाला सुरवात केली. आता उद्याचा मुक्काम तिरुपती.

******

हैदराबाद सहल भाग ४


हैदराबाद सहल भाग ४
आज हैदराबाद मधिल मुक्कामाचा शेवटचा दिवस. सर्वप्रथम आम्ही बिर्ला मंदिरात दर्शनाकरीता गेलो. बिर्ला मंदीरात मुख्य मंदिर बालाजीचे आहे. उंच टेकडीवरील हे मंदिर अतिशय आकर्षक स्वरुपात बांधलेले आहे. सर्व परिसर संगमरवराने मढवलेला आहे. सुरवातीला साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्य बालाजी मंदिरात गेलो. मंदिर असलेल्या टेकडीवरुन हैदराबाद शहराचे सुरेख दर्शन झाले. हे मंदिर टेकडीवर असल्याने तेथे जाण्याकरीता वृद्ध आणि आजारी माणसांकरीता लिफ्टची सोय केलेली आहे.
     दर्शन झाल्यावर महिला मंडळाची खरेदी मोहिम सुरु झाली. येथे मोत्याच्या माळांचे सेट, मोत्यांच्या बांगड्यांची बरीच दुकाने होती. जवळपास दोन तास ही खरेदी चालू होती. ड्रायव्हर सह सर्वजण महिलामंडळाला व्यत्यय आणायला गेले तरीही त्यांनी माघार न घेता त्यांची मोहीम सुरुच ठेवली. कारण हैदराबाद मधिल या वस्तू खरेदी करणे ही त्यांची आवश्यकता होती.
     त्यानंतर आम्ही सर्वजण स्नो वर्ड या हैदराबादमधिल प्रसिद्ध ठिकाणी आलो. येथे बर्फात घालायचे कोट, बुट आणि हातमोजे घेतल्यावर कृत्रिम हिमालयात प्रवेश केला. बंदिस्त हॉलमध्ये सर्वत्र बर्फच बर्फ होते. आईस स्केटींग, डान्सिंग फ्लोअर, आणि फिरते चक्र असे गेम येथे बर्फाची मजा घेण्याकरीता हजर होते. त्यातिल आईस स्केटींग मध्ये आम्ही सर्वांनी भाग घेतला. त्यानंतर कृत्रिम का होईना स्नो फॉलचा वेगळाच अनुभव घेतला. तो घेत असताना सतत गुलमर्गची आठवण होत होती. अर्थात तेथिल वातावरण नैसर्गिक होते. ते येथे येणे शक्यच नव्हते. तरीही ज्यांना गुलमर्गची मजा अनुभवणे शक्य नाही त्यांना येथे दुधाची तहान ताकावर भागवता येते.
     स्नोवर्डचा अनुभव घेतल्यानंतर सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. आज पोटपूजे करीता स्पेशल हैदराबादी बिर्याणी खायची असे ठरवले होते. त्यामुळे खास व्हेज बिर्याणी मिळत असलेल्या ठिकाणाचा शोध घ्यायला सुरवात केली. एका हॉटेलात गेलो हॉटेलच्या स्टाफने अगदी शाही स्वागत वगैरे केले परंतु नंतर लक्षांत आले की, येथे व्हेज आणि नॉन व्हेज एकत्रच आहे. म्हणून शेवटी ड्रायव्हरच्या गाईडन्सने परत बालाजी हॉटेलच गाठले. तेथे स्पेशल हैदराबादी बिर्याणीची ऑर्डर दिली. हॉटेल मधिल वेटरच्या अंदाजाने दहा माणसांकरीता चार बिर्याणीची ऑर्डर दिली परंतु क्वांटिटी इतकी जास्त होती की, जवळपास एक पूर्ण डिश शिल्लक राहिली.
     त्यानंतरचा कार्यक्रम खास महिलांकरीता होता, तो म्हणजे खरेदीचा. तेव्हा त्यांना खरेदीकरीता सोडून बाकी पुरुष मंडळी रुमवर गेली. हैदराबादला सहलीला जायचे असे जेव्हा ठरले तेव्हा तेथिल एका ठिकाणी जायचेच असे ठरवुन मी आलो होतो त्या ठिकाणी जायचे राहीले होते. आमच्या बसचा ड्रायव्हर त्याच परिसरात रहाणारा होता म्हणून त्याच्या सोबत मी तिकडे जायला निघालो.
     शिवथर घळीत साधना सप्ताहाला गेलो होतो तेव्हा समर्थ संप्रदायाशी संबधित असलेल्या भारतातिल सर्व ठिकाणांना शक्य असेल त्याने भेट द्यावी असा विषय झाला होता. हैदराबाद मध्ये असेच एक ठिकाण आहे. समर्थ संप्रदायातिल सद्गुरु नारायण महाराजांचा मठ चारमिनार जवळ असणाऱ्या हूसैनी आलम या विभागात आहे. नारायण महाराज हे समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांच्या शिष्य परंपरेतिल आहेत.
सद्गुरु नारायण महाराज समाधी मंदीर, हैदराबाद.
सद्गुरु नारायणमहाराज समाधी, हैदराबाद

    
या मठामध्ये मुख्य मंदिर प्रभु श्रीरामांचे आहे. सज्जनगड येथे ज्याप्रमाणे समर्थांची समाधी श्रीरामांच्या मूर्तींच्या खाली तळघरात आहेत त्याचप्रमाणे येथेही श्री नारायण महाराजांची समाधी देखिल श्रीरामांच्या मूर्ती
च्या खाली तळघरात बांधलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप आहे. मंदिराच्या उजव्या बाजुला दत्त मंदीर आहे. मागिल बाजुला नारायण महाराजांच्या शिष्य परंपरेतिल अनंतराव रामदासी यांचे निवासस्थान आहे. मी गेलो त्याच्या आधी पंधरा दिवस श्री अनंतरावांचे निधन झाले होते. त्यांचे दोन मुलगे सध्या तेथे रहातात.
     अशातऱ्हेने हैदराबाद येथिल आमची सहल संपन्न झाली. उद्या आम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री शैल्य येथिल मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जाणार आहोत.
*******


गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

वृक्ष मंदिर प्रास्ताविक


वृक्ष मंदिर
प्रास्ताविक
     वृक्ष मंदिर या लघु कादंबरीचा विषय गेले जवळपास १५ ते २० वर्षे माझ्या डोक्यात घोळत होता. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने सामाजिक वनिकरण हे खाते निर्माण केले तेव्हापासुन ही कथा माझ्या मनात आकार घेत होती. गेली अनेक वर्षे मी समर्थ साहित्याचा अभ्यास करीत आहे. त्याचप्रमाणे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले प्रेणित स्वाध्याय परिवाराच्या स्वाध्यायालाही जात असे. स्वाध्याय परिवारा तर्फे योगेश्वर शेती त्याचप्रमाणे मत्स्यगंधा हे प्रयोग राबवले जातात. त्यातला मत्स्यगंधेचा प्रयोग मी प्रत्यक्ष पाहिला आहे. आपल्या पारंपारीक एकादशीव्रताचा समाजाला कसा फायदा करुन देता येईल या  दृष्टीने उपयोगी पडेल असे उपक्रम स्वाध्याय परिवारा तर्फे राबवले जातात.
     समर्थ रामदासस्वामी हे तर निसर्गप्रेमीच होते. ते रानावनात रमणारे योगी होते. त्याचे बागप्रकरण तर प्रसिद्धच आहे. तुकाराम महाराजांचे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा अभंगही प्रसिद्धच आहे. या सर्वामधुन प्रेरणा घेऊन वृक्ष मंदिर ही लघुकादंबरी साकारली आहे. कितपत जमली आहे ते वाचकच ठरवतिल. पर्यावरण रक्षण, बेकारी आणि व्यसनाधिनता यावर उपाय म्हणून वृक्ष मंदिरासारखे उपक्रम निर्माण झाले, तर माझ्या या लेखनाचे सार्थक झाले असे मला वाटेल.
श्रीवर्धन
दिनांक:-१८/०४/२०१८                       अनिल अनंत वाकणकर.
अक्षय तृतिया


शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

हैदराबाद सहल भाग ३


हैदराबाद सहल भाग ३

आजचा दिवस खास रामोजी फिल्म सिटीला भेट देण्याकरीता राखुन ठेवला होता. सकाळचा भरपेट नाश्ता झाल्यावर रामोजी फिल्म सिटीच्या गेटवर पोचलो. प्रवेशाचे पास घेतल्यावर आत गेल्यावर फिल्म सिटीच्या बस वाटच बघत होत्या. त्यामध्ये बसुन सर्वजण प्रत्यक्ष फिल्म सिटीच्या अंतरंगात प्रवेश केला.
     रामोजी फिल्म सिटी ही माया नगरी हैदराबाद पासुन २५ किलोमिटर दूर २०० एकर एवढ्या भव्य जागेत साकार केली आहे. येथे एकाच वेळी १५ ते २५ सिनेमांचे किंवा सिरीयल्सचे शूटींग चालू असते. या मायानगरीला दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक भेट देतात असे म्हणतात. सन १९९६ मध्ये या मायानगरीचे कार्य सुरु झाले.
     मुख्य प्रवेशद्वारातुन आलेल्या बसमधुन उतरुन परत दुसऱ्या खास बस मध्ये बसलो. या बसला एक गाईड होता. तो बसमधुनच रामोजी फिल्म सिटीच्या खासियत दाखवत होता त्याचे वर्णन करीत होता. त्याने निरनिराळ्या जगप्रसिद्ध शहरांच्या रस्त्याच्या प्रतिकृती, निरनिराळ्या फिल्म करीता लागणाऱ्या इमारतींची सफर घडवुन आणली. एकाच विल्डींग मध्ये हॉस्पीटल, रहाण्याचा बंगला, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस अशा अनेक प्रकारच्या करामती त्याने आम्हाला दाखवल्या. निरनिराळ्या जगप्रसिद्ध गार्डनच्या प्रतिकृती येथे साकारलेल्या आहेत. चित्रपटांच्या किंवा दूरदर्शन मालिकांना आवश्यक असणाऱ्या नेहमीची दृष्ये येथे कायमची तयार करुन ठेवलेली आढळली. खेडेगांवाची प्रतिकृतीही आपल्याला येथे पहायला मिळते. अशाप्रकारे ही स्थिर दृष्ये आम्हाला बसमधुनच दाखवुन गाईड आणि ती बस आम्हाला सोडून निघुन गेली.
     आता आमच्यासमोर रामायण आणि महाभारत या प्रसिद्ध दूरदर्शन मालिंकाची कायमची दृष्ये दाखवणारी चित्रे आणि रामायण महाभारतातिल दरबारांचे कायमस्वरुपी साकार केलेली दालने होती. ती दृष्ये पाहून परत त्या मालिकांची दृष्येच डोळ्यापुढे दिसु लागली. त्यानंतर कायमस्वरुपी साकारलेले रेल्वे स्टेशन पहायला मिळाले. या डमी रेल्वे स्टेशनवरुन अनेक चित्रपटांची आणि मालिकांची चित्रिकरणे झालेली असतील. विशेषत: कुली या अभिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे चित्रिकरण येथे झाल्याचे सांगितले गेले.
     या रेल्वे स्टेशनवरुन परत दुसऱ्या बसने आम्ही बाहूबली या हल्लीच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर गेलो. बाहूबली या चित्रपटाच्या चित्रिकरणाकरीता नवीन ग्राफिक्सचे तंत्रज्ञान वापरले गेले होते. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट आणि येथे दिसणारे सेट यात जमिन अस्मानाचे अंतर होते. चित्रपटात भव्य दिसणारी दृष्ये येथे अगदी केविलवाणी दिसत होती. तरीही तेथिल मांडलेल्या दृष्यांवरुन चित्रपटाची कल्पना येते. या सेटवर सगळेजण सेल्फी आणि फोटो काढीत होते. त्यांच्याप्रमाणे आम्हीही आपापले फोटो काढुन हौस भागवुन घेतली.
     तेथुन परत एकदा तिसऱ्या बसमध्ये बसुन तिसऱ्या स्पॉटला आलो. तेथे दोन तिन गार्डन होती. एक देवळाचा सेट होता. तेथेच एक माणूस हातचलाखीची जादू करुन दाखवत होता. संपूर्ण फिल्म सिटीमध्ये स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्यासारखी होती. सर्व झाडे आणि लॉन देखिल हिरवेगार आणि टवटवित दिसत होते. तेथुन चालत चालत गेल्यावर परत एका बसमध्ये बसलो त्या बसने आम्हाला चार पाच बंदिस्त थिएटर असलेल्या भागात आणून सोडले.
      या बंदिस्त थिएटर मध्ये आम्हाला खरी कमाल बघायला मिळाली. येथे फिल्म कशी तयार करतात. शूटिंग कसे करतात आणि त्या झालेल्या शूटींगची तयार होणारी प्रत्यक्ष फिल्म कशी प्रोसेस केली जाते, हे प्रेक्षकांच्या सहभागाने प्रत्यक्ष दाखविले गेले. आमच्याच पैकी एका मुलीला जुजबी मेकअप करुन आणि ड्रेसमध्य अगदी जुजबी बदल करुन शूटींग केले गेले. एक साधा सिन होता म्हणजे घोडे न जोडलेल्या बग्गीवर चालकाच्या जागेवर बसुन तिने फक्त मागे बघायचे आणि घोड्यांना हाकण्याची अँक्शन करायची होती. एक दोघेजण ती बग्गी फक्त हलवत होते. एवढ्या दृष्याचे चित्रण झाल्यावर तेच दृष्य एडीट करुन पडद्यावर दाखविण्यात येत होते. त्या चित्रणाच्या जोडीला ग्राफिक्सच्या मदतिने घोडेस्वार तिचा पाठलाग करत आहेत आणि ती जोरजोरात बग्गी हाकलत आहेत असे दृष्य आता पडद्यावर दिसत होते. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दालनांत नेण्यांत आले तेथे या चित्रपटाला साऊंड इफेक्ट देण्यांत आला. तोही प्रेक्षकांच्या मदतीने. दोन नारळाच्या करवंट्या जमिनीवर आपटल्यावर त्यातुन घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. त्यानंतर तयार झालेला फायनल चित्रपट वेगळ्या दालनांत दाखविण्यांत आला. तेव्हा तो एकदम वेगळाच भासत होता. केलेले शूटींग आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांत फक्त प्रेक्षकांपैकी असलेली मुलगीच खरी होती, बाकी सगळी ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाची कमाल होती.
     चित्रपट तयार होताना प्रत्यक्ष पाहिल्या नंतर आम्ही सर्वजण अवकाश भ्रमणाच्या शो मध्ये सामिल झालो. प्रत्यक्ष जागेवरुन न हालता अवकाश भरारीचे थ्रिल तेव्हा अनुभवायला मिळाले. जबरदस्त व्हायब्रेशन, प्रचंड वेग याचा थरार यातुन दिसणारी आकाशगंगा याचा अनुभव वेगळाच होता.
     मधेच एकदा आम्ही निरनिराळे पक्षी असलेल्या मोठ्या दालनाला भेट दिली. तेथे बटर फ्लाय गार्डन होते. त्या ठिकाणी अनेक प्रकारची फुलपाखरे होती. कृत्रिम धबधबा होता. या प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफी झाली. त्यानंतर कृत्रिमरित्या बनविलेल्या बौद्ध गुंफा पहायला मिळाल्या खरोखरीच प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट या उक्तीचा येथे प्रत्यय आला. 
     एकंदरीतच या मायानगरीत पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक जगाची सफर करता आली. आजचा दिवस एक वेगळाच अनुभव देऊन गेला हे निश्चितच. भरपुर सेल्फी आणि फोटो काढुन झाल्यावर आम्ही परत हॉटेलच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली.
*******

हैदराबद सहल भाग २


हैदराबाद सहल भाग २

     आज सहलीचा दुसरा दिवस. सकाळी सहा वाजता जाग आली. उठल्यावर मुखमार्जन झाल्यावर आंघोळ करुन बाथरुम बाहेर आलो. त्यानंतर चहाची सोय बघायला हॉटेलच्या बाहेर पडलो. जवळच एक चहाची टपरी वजा दुकान होते. तिथे चहा घेतला आणि रुमवर नेण्याकरीता चहा आणि कॉफी पार्सल घेतली. विशेष म्हणजे चहावाला चक्क मराठीत बोलत होता. सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्यावर आम्ही कालच्याच कॅफेटेरीया मध्ये नाश्ता करायला गेलो. नाश्ता मात्र एकदम झकास होता. नाश्त्याला एवढे पदार्थ आपण घरी कधीच खात नाही.
     इथे नाश्त्याला सँडवीच, ब्रेड, बटर, जाम, इडली, मेदू वडा, उपमा किंवा पोहे, डोसे, चटणी, सांबार शिवाय फ्रेश फ्रुट ज्युस एवढे पदार्थ होते तेही अनलिमिटेड. सर्वचजण भरपेट नाश्ता करुन हैदराबाद दर्शनच्या दुसऱ्या टप्याकरीता तयार झालो. कालचीच मिनी बस सेवेकरीता हॉटेल बाहेर हजर होती. सुरवातिला जवळच असलेल्या हरे राम हरे कृष्ण मंदिरात गेलो. तेथिल स्वच्छता टाप टीप बघण्यासारखी होती. अतिशय शांत वातावरण असलेल्या या मंदिरात जाऊन मन प्रसन्न झाले. इस्कॉन या संस्थे तर्फे या मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. मंदिराच्या परिसरातच पूजा साहित्य आणि पुस्तकांचे स्टॉल होते. त्यात तेलगु भाषे बरोबरच हिंदी आणि इंग्रजी पुस्तके विक्री करीता उपलब्ध होती. जवळच एक शुद्ध स्वरुपात (orgnic)मिळणाऱ्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंचे देखिल दुकान होते. तेथे मी व्हीक्स वेपोरब सारख्या डोकेदुखी आणि सर्दीवर उपयोगी असणाऱ्या औषधाची कुपी घेतली.
     त्यानंतर आम्ही हैदराबादचे आकर्षण असणाऱ्या विंटेज कारचे प्रदर्शन पहायला गेलो. सुधा कार म्युझियम असे नांव असणारे हे ठिकाण खरोखरच अद्वितिय आहे. इथे निरनिराळ्या आकाराच्या, निरनिराळ्या मॉडेलच्या, निरनिराळ्या काळातल्या उत्कृष्ट गाड्यांचे प्रदर्शन आहे. विशेष म्हणजे येथे ठेवलेली प्रत्येक गाडी चालू स्थितीत आहे. मोटर सायकल, सायकल यांचे देखिल नमुने येथे बघायला मिळाले.
     येथे केक, पिझा, शंकराची पिंडी, डायनिंग टेबल, क्रिकेटची बॅट, पेन्सिल, खोड रबर, पुस्तक, पोपटाचा पिंजरा, होडी, कोच, आगगाडी, हेल्मेट, कमोड, चहाचा कप, बस, क्रिकेटचा बॉल, कमळाचे फुल अशा अनेक प्रकारच्या आकाराच्या गाड्या तेथे होत्या. त्यामध्ये सिंगल सिट, डबल सिट, चार सिट अशाही गाड्या होत्या. म्यझियमचा सर्व परिसर अत्यंत स्वच्छ होता. प्रत्येक गाडीची माहिती मोजक्या शब्दांत प्रत्येक गाडीवर लावलेली होती. तेथे एकदंर पाच हॉल होते. प्रत्येक हॉलमध्ये गाड्यांची माहिती सांगण्याकरीता मुली हजर होत्या.
     सुमारे दिड ते दोन तास एका वेगळ्याच वातावरणांत गेले. या सर्व गाड्यांचा संग्रह करण्याकरीता आणि त्यांची देखभाल करण्या करीता येणाऱ्या खर्चाचा विचार करता तेथे असलेली प्रवेश फी अगदी जुजबी वाटली. हैदराबाद मध्ये गेल्यावर आवर्जुन पहावे असे हे ठिकाण आहे.
     कार म्युझियम पाहून झाल्यावर पोटात भूक लागल्याची जाणिव झाली. तेथुन जवळच असणाऱ्या कालच्याच बालाजी धाब्यावर जेवायला गेलो. कालच्या प्रमाणेच पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स तेथेच खरेदी केले. त्यानंतर आम्ही हूसैन सागरच्या लगतच असलेल्या एन् टी आर् गार्डन मध्ये गेलो. हे गार्डन खूप मोठ्या परिसरात साकारले आहे. या गार्डन मध्ये अनेक प्रकारचे गेम होते. लहाना पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद मिळेल असे अनेक प्रकार तिथे उपलब्ध होते. आंध्र प्रदेशच्या गळ्यातले ताईत असणाऱ्या एन् टी रामाराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे गार्डन उभारले गेले आहे. येथे आम्ही टॉय ट्रेनमध्ये बसुन परत एकदा बालपण अनुभवले. त्यानंतर डेंजर झोन, wonder la, या शिवाय थ्रीडी शो या मध्ये भाग घेतला.
     एन् टी आर् गार्डन मधिल मजा मस्ती आटोपुन आम्ही हूसैन सागर मधिल भगवान बुद्धांच्या भव्य पुतळ्याच्या दर्शनाला जाणाऱ्या बोटीमध्ये बसलो. हूसैन सागर हा तलाव हैदराबाद आणि त्याचे जुळे शहर सिंकदराबादला जोडणारा दुवा आहे. या तलावामध्ये असणारा १८ मिटर उंच असणारा भगवान बुद्धांचा पुतळा पांढऱ्या संगमरवरा पासुन बनवला आहे. हा पुतळा जागेवर बसविण्याकरीता दिनांक १० मार्च १९९० ला आणला होता परंतु होडीवरुन सुमारे १०० यार्ड गेल्यावर तो पुतळा कलंडला आणि पाण्याखाली गेला. या अपघातात १० मजुर मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर २००६ मध्ये त्याची स्थापना करण्यांत आली होती. त्याच्या स्थापने करीता दलाई लामा आले होते.
     हूसैन सागरच्या लगतच असणाऱ्या लुंबिनी पार्कमध्ये संगित आणि रंगित प्रकाश यांच्या सहाय्याने डान्सिंग फाउंटनचा एक आकर्षक शो आम्ही पाहीला. हल्ली अशाप्रकारचे शो सर्व प्रसिद्ध ठिकाणी दाखवले जातात. जामनगरमध्ये जामनगरचा इतिहास सांगणारा, सोमनाथला सोमनाथचा इतिहास सांगणारा असे शो मी या पूर्वी पाहिले आहेत.
     या शोनंतर आजचा हैदराबाद दर्शनचा भाग संपवुन आम्ही हॉटेलवर परत आलो. रोजच्या प्रमाणे जेवण झाल्यावर थोड्या गप्पा आणि पत्ते असा कार्यक्रम झाला. उद्याचा पूर्ण दिवस रामोजी फिल्म सिटी करीता राखुन ठेवला आहे.
*******

हैदराबाद सहल भाग १


हैदराबाद सहल भाग १

     दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ माझ्या आयुष्यातील एक अनोखा दिवस होता. कारण आज मी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होतो. कालच आम्ही सहलीला जाण्याकरीता बोरीवली येथे डेरे दाखल झालो होतो. सकाळी ६.३० ची फ्लाईट होती. त्याकरीता जवळपास पाच वाजताच आम्ही घरुन निघालो. विमानतळावर जाण्याकरीता मीनी बस ठरविली होती. त्याबसने आम्ही साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनल वर हजर झालो. समोरच असलेल्या एअर इंडीयाच्या बोर्डींग पास मिळण्याच्या काऊंटरवरुन प्रत्येकाचे बोर्डींग पास घेतले. बोर्डींग पास घेतल्यावर सिक्युरीटी चेकअप करीता मोठी रांग होती. त्यावेळी सहज मनांत आले, आपण म्हणतो भारत गरीबांचा देश आहे परंतु येथे असलेल्या रांगा काही वेगळेच सांगत आहेत.
     विमानाचा प्रवास हा प्रवासाचा वेळ वाचवतो हे खरेच आहे. ज्याचे दिवसातले प्रत्येक मिनीट किमती आहे त्याला विमानप्रवास हे वरदानच आहे. मुंबई ते हैदराबाद रेल्वेने प्रवास करायचा झाला तर कमीत कमी १६ तास तरी लागतात. तेच अंतर विमानाने अवघ्या एका तासात पार करता येते. माझी विमान प्रवासाची उत्सुकता उतू जात होती. त्यामुळे कधी एकदा विमानात चढेन असे मला झाले होते. यथावकाश आमचा सर्वांचा सिक्युरीटी चेकींगला नंबर लागला आणि आम्ही विमानाच्या दिशेने चालायला सुरवात केली. हे चालणे मात्र खूपच होते. माझ्या अंदाजाने आम्ही टर्मिनलच्या गेटपासुन जी चालायला सुरवात केली होती. ते चालणे विमानात प्रवेश करे पर्यंत चालूच होते. हे अंतर जवळपास दिड किलोमिटर तरी होतेच.
     माझा आतापर्यंतचा प्रवास बस अथवा रेल्वेने झालेला होता. प्रत्येक ठिकाणी बसच्या किंवा रेल्वे बोगीच्या जवळ जायला फार कमी चालावे लागत असे. त्यामुळे विमानसारख्या श्रीमंत प्रवासी वाहनापर्यंत जायला एवढे चालावे लागते हे पाहून जरा आश्चर्यच वाटले. अर्थांत आमचे लगेज परस्पर जाणार होते त्यामुळे ओझेमुक्त चालणे होते. असो, आम्ही विमानामध्ये आपापल्या सिटवर बसलो. मला खिडकीची सिट मिळाली होती. पहिला विमान प्रवास म्हणून भरपुर सेल्फी काढुन झाल्या. दरम्यान एअर होस्टेसने सिट बेल्ट बांधायच्या सूचना केल्या. एअर इंडीयाच्या एका कर्मचाऱ्याने सिट बेल्ट कसा बांधायचा आणि आपत्कालीन स्थिती मध्ये काय करायचे याचा हिंदी आणि इंग्रजीमध्ये डेमो केला. तेव्हा मात्र विमान प्रवास हा सोपा नाही, त्यात धोका पुरेपुर भरलेला आहे याची जाणिव झाली. आमच्या विमानाने बरोबर साडे सहाला आपली जागा सोडली. रनवेवर बराच प्रवास करीत असताने ते दोनदा थांबले होते. त्यानंतर मात्र विमानाने नाक वर करुन वर वर जायला सुरवात केली जवळपास पाच मिनिटे वर वर गेल्यानंतर ते सरळ झाले आणि वेगात जायला लागले.
     विमानप्रवासाबाबत खूपच उत्त्सुकता होती परंतु प्रत्यक्ष प्रवासात काहीच थ्रिलींग वाटले नाही. सुरवातीला थोडावेळ आजुबाजुला काहीतरी दिसत होते. परंतु जेव्हा ते ठराविक उंचीवर स्थिर झाले तेव्हा ढगांशिवाय काहीच दिसेना. त्यामुळे खिडकीतुन बाहेर बघण्याची गरजच नव्हती. दरम्यान विमान स्थिर झाल्यावर एअर होस्टेस आपल्या मदतनिसांसह चहा आणि नाश्ता घेऊन आली. सर्वांचा चहा नाश्ता होईपर्यंत विमानाची खाली उतरण्याची वेळ आली. परत सर्वांनी सिट बेल्ट बांधले. हळू हळू विमान कमी उंचीवर खाली आले. आता हैदराबाद मधील दृष्ये दिसु लागली. उंचावरुन दिसणारे ते हैदराबाद गुगलचा सेटेलाईच मॅप (उपग्रह नकाशा) पहावा तसे दिसत होते. अशाप्रकारे विमान जमिनीवर टेकले. त्यानंतर मुंबई सारखेच चालत चालत बेल्टवरुन येणारे सामान ताब्यात घेण्याकरीता गेलो. सामान ताब्यात घेताच आम्हाला हैदराबाद मध्ये हॉटेल मध्ये घेऊन जाणाऱ्या मिनीबसच्या ड्रायव्हरशी संपर्क साधणे सुरु केले.
     विमानतळावर आलेल्या मिनीबसने आम्ही हॉटेल हर्षा इंटर नॅशनलमध्ये दाखल झालो. आम्हा सर्वांना एकाच मजल्यावर रुम मिळाल्या होत्या. अशातऱ्हेन पहिला विमान प्रवास संपून सहलीचा पहिला दिवस सुरु झाला.
हर्षा हॉटेल मध्ये रुम ताब्यात घेतल्यावर सर्वजण आंघोळ वगैरे करुन फ्रेश झाले. बरोबर आणलेल्या पदार्थांचा नाश्ता केल्यानंतर हॉटेलच्या समोरच असणाऱ्या टपरीवजा चहाच्या दुकानावर चहा कॉफी घेतली आणि त्यानंतर अकराच्या सुमारास हैदराबाद दर्शनाचा कार्यक्रम सुरु झाला. सर्वप्रथम आम्ही हैदराबादच्या प्रसिद्ध असणाऱ्या चाऊमहाला पॅलेसमध्ये दाखल झालो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच नुसतीच चाळवजा इमारत दिसली. सगळ्या खोल्या रिकाम्या होत्या. तिथुन पुढे गेल्यावर एक मध्यवर्ती बाग होती. त्यामध्ये काही तोफा ठेवलेल्या होत्या. त्यापैकी एका तोफेच्या जवळ उभे राहून सगळ्यांनी फोटो काढले.
     तसेच चालत चालत पुढे गेल्यावर त्या राजवाड्याचे खरे वैभव दिसायला सुरवात झाली. हा राजवाडा म्हणजे निजामशाहीची शान होती. वास्तुकलेचा उत्तम नमुना येथे आपल्याला पहायला मिळतो. दक्षिणी आणि उत्तरेकडील वास्तुकलेचा सुरेख मिलाप येथे केलेला आढळतो. या राजवाड्यात चार प्रमुख महाल आहेत. आफताब महाल, अफजल महाल, मेहताब महाल आणि तहनियात महाल अशी त्यांची नावे आहेत.
     आता आम्ही या राजवाड्याची शान असलेल्या खिलावत मुबारक नावाच्या दरबार हॉल मध्ये उभे होतो. दरबाराला अत्यंत आकर्षक अशा झुंबरांनी सजवलेले होते. या दरबारातील सिंहासनावर नबाब असफ जही बसत असत. या सिंहासनावर बसुन ते परदेशी पाहूण्यांना आणि महत्वाच्या व्यक्तींना भेटत असत. या महालाच्या चारही बाजुंनी फिरल्यावर त्याच्या सौदर्यांची कल्पना येते. सिंहासनाच्या मागिल बाजुला बेगमांना आणि स्त्रीयांना बसण्याची जागा आहे तेथिल खिडक्यांना पडदे लावलेले होते.
     या राजवाड्यात अनेक प्रकारच्या वस्तुंचे प्रदर्शन मांडलेले आहे. त्यामध्ये क्रोकरीचे निरनिराळे प्रकार पहायला मिळतात. अनेक आकाराच्या, कलाकुसरीच्या क्रोकरीच्या वस्तु एका मोठ्या दालनात सुबकपणाने मांडुन ठेवलेल्या होत्या.  दोन तिन दालनांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे आकर्षक फर्निचर मांडुन ठेवलेले होते. अस्सल जरीच्या कपड्यांचे देखिल प्रदर्शन तेथे पहायला मिळाले.
     या राजवाड्याचे आकर्षण म्हणजे नबाबांच्या सेवेत असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या गाड्यांचे आणि बग्गींचे प्रदर्शन. येथे जुन्या आणि नव्या दोन्हीप्रकारच्या गाड्यांचे नमुने पहायला मिळाले. एकुणच हा राजवाडा हा चांगल्या रितीने जतन केलेला आढळला. नबाबी ऐश्वर्याचा नमुना आपल्याला येथे पहायला मिळतो.
*******
     चाऊमहाला पॅलेसमधुन बाहेर पडल्यावर सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून आमच्या मिनी बसच्या चालकाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्युअर व्हेज असणाऱ्या धाबा कम हॉटेल मध्ये पोटपूजेकरीता गेलो. जेवणाची क्वालिटी चांगली होती. सहलीला सुरवात करण्यापूर्वी पिण्याकरीता मिनरल वॉटरच वापरायचे असे ठरविले होते. त्याप्रमाणे त्याच धाब्यावर पंधरा बाटल्यांचे दोन बॉक्सच खरेदी केले. पोटपूजा झाल्यावर आम्ही हैदराबाद दर्शनच्या दुसऱ्या आणि हैदराबादची शान असणाऱ्या “सालारजंग म्युझियमला” भेट द्यायला गेलो.
     सालारजंग म्युझीयम हे मुसी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर प्रशस्त जागेत असलेले भारतातिल प्रसिद्ध असणाऱ्या म्युझियमपैकी एक आहे. या मुझियममध्ये उत्कृष्ट पेंटींग, पॉटरी, क्रोकरी, घड्याळे, हस्तीदंती वस्तु, मोती, निरनिराळ्या प्रकारच्या तिजोऱ्या यांचे प्रदर्शन मांडलेले आहे.
     या संग्रहालयामध्ये निरनिराळया प्रकारची शस्त्रे देखिल प्रदर्शनाकरीता ठेवलेली होती. अनेक प्रकारच्या तलवारी तर मी प्रथमच बघत होतो. हस्तीदंत इतका आकर्षक असू शकतो हे येथिल वस्तु बघुन लक्षांत येते. या म्युझियम मधिल एक खास आकर्षण आहे ते म्हणजे तेथिल घड्याळ. या घड्याळाचे वैशिष्ट म्हणजे या घड्याळातुन दर तासाला ठोके पडतात आणि ते देण्याकरीता एक आकर्षक पोषाखातल्या माणसाची आकृती बाहेर येते आणि ती टोले देते. याच घड्याळात दर सेकंदाला जी टिक टिक होते ती करणारी देखिल एका माणसाची आकृती सतत लोहारा सारखे ठोके मारत असते.
     या घड्याळातुन दर तासाला दिले जाणारे ठोके पहाण्याकरीता तिथे सतत गर्दी झालेली दिसते. अनेक जण त्या क्षणांचा व्हीडीओ करुन घेत असतात. पूर्वी म्हणे या घड्याळात सध्या दिसत असलेल्या ठोके देणाऱ्या माणसा ऐवजी चिमणी येत असे. त्यामुळेच आम्ही सगळेजण ठोके द्यायला चिमणी येईल या अपेक्षेने बसलो होतो.  
     सालारजंग म्युझियम मनसोक्त पाहून झाल्यावर आम्ही सरळ हॉटेलवर आलो. रात्री आठच्या सुमारास हॉटेलच्याच कॅफेटेरीया मध्ये जेवणाकरीता गेलो. जेवण तिन कोर्स मध्ये होते. स्टार्टरला सुप, नंतर मुख्य जेवण आणि शेवटी आइसक्रिम अशी पद्धत होती. जेवणाची क्वांटिटी खूपच होती. त्यामुळे अन्न वाया जाण्याचा प्रमाण जास्त होते. ताटातल्या वाट्या काढुन दिल्या तरी वेटर त्या शेवटी उष्ट्या खरकट्या सोबतच नेत होते. त्यामुळे खूप वाईट वाटले. समर्थांचा उपदेश मानणारे आम्ही त्यांनी केलेल्या आपण येथेष्ट जेवणें| उरलें तें अन्न वाटणें | परंतु वाया दवडणें| हा धर्म नव्हे ||” या उपदेशा विरुद्ध येथे वागावे लागत होते. आता या हॉटेलमध्ये मुक्काम होता तिथपर्यंत अशाच पद्धतीने जेवण येणार होते. शेवटी आम्ही त्यावर तोडगा काढला. जेवणाची ताटेच कमी मागवायची. त्यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले.
     जेवण झाल्यावर थोडावेळ बदाम सातचा डाव झाला. त्याच्या जोडीला गप्पा चालूच होत्या. सुमारे साडेदहाच्या सुमारास सर्वजण एकमेकांना गुड नाईट करुन झोपायला गेलो. अशा तऱ्हेन सहलीचा पहिला दिवस संपला.

*******

हैदराबाद सहल प्रस्तावना


हैदराबाद सहल
प्रस्तावना

      "हैदराबाद सहल" हे माझे प्रवास करणारे दुसरे पुस्तक. पहिली सहल दिर्घ मुदतीची होती तर ही सहल जमतेम आठ दिवसाची होती. या प्रवासातले सहप्रवासी वेगळे होते. या सहलीचे वेळापत्रक आणि रेल्वे, विमान यांचे बुकींग आमचे आम्ही केले होते. मुक्कामाची आणि स्थानिक प्रवासाची सोय ट्रॅव्हेलिंग कंपनी मार्फत केली होती.
     हा माझा पहिलाच विमान प्रवास त्यामुळे त्यात उत्सुकता जास्त होती. हैदराबाद हे नबाबी शहर परंतु या शहराची एक वेगळीच शान आहे. येथे मंदिरे आहेत तशीच मसजिदही आहे. नबाबी राजवाडे, म्युझियम, गार्डन आहेत. रामोजीराव या द्रष्ट्या व्यक्तीविश्वामित्राने उभारलेले मयसभेसारखे रामोजी फिल्म सिटी ही मायावी  नगरी आहे. रामदासी परंपरा सांगणारा मठही येथे आहे.
     या सहलीत आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीशैलम् येथेही गेलो होतो. ज्या स्थानी शिवाजीमहाराजांसारख्या श्रीमंत योग्याला आपले शिरकमळ वहावेसे वाटले ती ही पवित्र जागा. तेव्हा दाट अरण्य होते. परंतु आता मात्र येथे बाजार झाला आहे असे वाटते.  भक्तांची भक्ती त्यांच्या भक्तिभावात न तोलता येथे नाण्यात तोलली जाते असे जाणवले. अर्थात सगळीकडे तोच प्रकार आहे. परंतु येथे तो जास्त जाणवला.
            तिसरे सहलीचे ठिकाण होते तिरुपती. तिरुपती संस्थान तर्फे भक्तांची उत्तम सोय होते. तिरुमाला पर्वत उत्तम विकसित केला आहे. परंतु येथेही भक्तीभावा पेक्षा बाजारीकरणच जास्त जाणवले. अर्थात भक्तांच्या प्रचंड संख्या हे त्याचे कारण असू शकेल. परंतु भक्तीभावाचे पारडे जरा हलके वाटले. तो माझा बघण्यातला दोष असू शकतो. एकंदरीत सहलीचा अनुभव चांगला होता त्यामुळे त्याबद्दल लिहावेसे वाटले. प्रयत्न केला आहे कितपत जमला हे वाचकच ठरवतिल.
अनिल अनंत वाकणकर