गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

श्री आर्यादुर्गा महात्म्य - अध्याय १

।। श्री आर्यादुर्गा महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय १ ।।
स्कंद पुराणांत गोकर्ण महात्म्यमध्ये उत्तरखंडात
" श्री आर्यादुर्गा महात्म्य " वर्णन केले आहे .

श्री गणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्री गुरुभ्योनमः ॥
ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धी यशसाधका ।
हेरंबा भक्त वरदायका । काव्यारंभीं तवचरणी ॥१॥
मग वंदिली वाग्देवता । संजीवनी ज्ञान सरिता ।
वीणाधारिणी विधि दुहिता । मयुरासना सरस्वती ॥२॥
गोकर्ण पुराणांतर्गत । उत्तर खंडविख्यात ।
त्यामाजीं रसाळ बहुन । आर्यादुर्गा महात्म्य एक ॥३॥
श्री आर्यादुर्गा देवीची कथा । त्यांत वर्णिली धीमंता ।
सूत सांगे ज्ञान दाता । राजा शतानिका प्रति ॥४॥
ऐकोनि शतानिकाची वाणी । परम हर्षला सूत मुनी ।
धन्य धन्य तुझी वाणी । जी भगवदप्रश्ने सादर ॥५॥
ऐकें अखंड चित्त देऊन । प्रकृति - पुरुष दोघेजण ।
नित्य दंपती असोन । शाश्वत अनुदिनी विलसती ॥६॥
अखिल चराचर सर्वत्र । त्या पासुनी घडलें विचित्र ।
पुरुष प्रकृतीशीं क्षण - मात्र । वियोग न घडे सर्वथा ॥७॥
एकरुपें करुन । दोघे वर्तती अनुदिन ।
त्यांच्या इच्छेने संपूर्ण । त्रैलोक्य जाहलें उत्पन्न ॥८॥
प्रकृती विना पुरुष न शोभे । पुरुषा विना प्रकृती न शोभे ।
राहूं न शके एकटा पुरुष । प्रकृती विना कदापीही ॥९॥
पुण्य श्लोका महाराजा । शत्रु मर्दना शतानिका ।
व्यापिले असे तिन्ही लोका । पुरुष सहायें प्रकृतीही ॥१०॥
विष्णू मायारुपी तेजस्विता । कैसी प्रगट झाली देवता ।
ही ऐशी कथा श्रवणितां । कल्याण होईल श्रवणिकांचें ॥११॥
एकेकाळीं प्रग्जोतिष नगरी । सिंधूद्वीप ऋषी संभवी ।
वेत्रावती स्त्री उदरीं । पुत्र झाला महा प्रतापी ॥१२॥
पुत्र शूर पराक्रमी । तया सामर्थे गदगदे भूमी ।
गाजला वृत्रासूर नामीं । प्राग्यजोतिष नगरांत ॥१३॥
तया बलवान शत्रुमर्दने स्थापियली । प्राग्यजोषि स्थळीं राजधानी ।
संपूर्ण भूंमंडळ जिंकोनी । चालता झाला स्वर्ग मार्गी ॥१४॥
जाउनी मेरु पर्वतावरी । तेथुनी जाता झाला स्वर्गावरी ।
करुनी चाल इंद्रावरी । जिंकियले तयासी ॥१५॥
करुनी युद्ध अग्री सवें । यम निरुती वरुणासवें ।
वायु कुबेरें रुद्रासवें । जिंकियलें सर्वांसी ॥१६॥
वृत्रासुरें स्वर्गं नगरी जिंकियली । सत्ता आपुली स्थापियली ।
करिता झाला महा बळी । कामें देवादि महर्षीचीं ॥१७॥
वृत्रासुर भयें देव - ऋषींनीं । जागा आपुली सोडुनी ।
गमन केलें सर्व मंडळीनी । ब्रह्मदेवाकडे सत्य लोकीं ॥१८॥
लीन होउनी ब्रह्मदेवाचे चरणीं । सांगते झाले आपुलीं गार्‍हाणी ।
वृत्रासुरें आम्हां सर्वां गांजुनीं । त्रास दिधला अतिशय ॥१९॥
आम्हां सर्वांचा तूं नाथ असतां । आम्हीं झालों अनाथ आतां ।
देऊनी आश्रय आम्हां समस्तां । रक्षी रक्षी देवाधिदेवा ॥२०॥
आम्ही आपुली जागा सोडुनी । असुरभयें काननी हिंडूनी ।
येते झाले जीव रक्षणी । ब्रह्मदेवा तुजलागीं ॥२१॥
ऐकूनि गार्‍हाणी तयांचीं । ब्रह्मदेवें पूजा केली नारायणाची ।
शंख , चक्र , गदा , पद्म हाती । ह्रदयीं शोभे श्री वत्स लांच्छन ॥२२॥
प्रार्थना करुनी श्रीविष्णूची । सांगितली करणी वृत्रासुराची ।
गांजिलें असे सर्व देवासी । रक्षी रक्षी तयांसी ॥२३॥
देवाधिदेव कमलनयन । वृत्रासुराची करणी ऐकून ।
अति रागें संतप्त होऊन । विचार करी वृत्रासुर मर्दनासी ॥२४॥
नेत्र गरागरा फिरवून । क्रोधें मुख भयंकर होऊन ।
त्यांतून प्रगटलें दिव्य तेज एक । बाहेर पडलें मुखांतून ॥२५॥
त्या नंतरें ब्रह्मादिदेव कपाळांतुनी । तैसेंचि तेज बाहेर येवोनी ।
सर्व तेजें एकवटोनी । तया प्रकाशें जग व्यापिलें ॥२६॥
ऐशा परी तेज एकवटलें । तयानें रुप आकारिलें ।
कन्यारुप हळु हळु दिसलें । आनंदित झाले सर्व देव ॥२७॥
शंभुतेजें मुख बनलें । यमातेजें केश विस्तारिले ।
विष्णू तेजें द्वौभुजा जाहले । स्तन जाहले चंद्र तेजें ॥२८॥
इन्द्र तेजें बनले पोट । वरुण तेजें जंघा आणि पौट ।
पृथ्वी तेजें कंबरट । पदें बनलीं ब्रह्म तेजें ॥२९॥
रवी तेजें पादांगुलें बनलीं । वसुतेजें हस्तांगुलें जाहलीं ।
कुबेर तेजें नासिका शोभलें । दंत पंक्ती बनल्या प्रजापती तेजें ॥३०॥
अग्नि तेजें नयने प्रकाशलीं द्वा सन्ध्यातेजें भुवया आकारिलीं ।
वायू तेजें कर्ण जहाले । सर्व देव ऋषी तेजें जाहली देवता ॥३१॥
तया देवीसी पाहून । भीतिग्रस्त देवादि समस्त जाण ।
हर्षले आनंदित होऊन । त्रैलोक्य आनंदित जहालें ॥३२॥
तया देवीस पाहतां होऊन प्रफुल्ल । रुद्र देवें दिला त्रिशूल ।
दिधलें विष्णूने चक्र उज्ज्वल । दिला ब्रह्मदेवे ब्रह्मदण्ड ॥३३॥
यमें दिधला दण्ड आकर्ष । वरुणें दिला आपुला पाश ।
वायूने दिलें धनुष्य । वज्र दिधलें इन्द्राने ॥३४॥
दिलें खडगास्त्र कालानें। शंख दिधला वरुणाने ।
हार आणि चूडामणी क्षीरसागराने । हिमालयें दिलें सिंहासन ॥३५॥
महाबली ऐरावतें घंटावाद्य दिलें । विश्वेदेवें मुकुट माळ केयूर दिले ।
सर्व देवें अमोल अलंकार दिले । दिलीं विपुल आयुधें ॥३६॥
अलंकारें मस्तकापासुनी पदकमलावरी आकाशमण्डळी अती शोभली ।
तियेनें गगन भेदी गर्जना केली । तेणें सर्व आकाश दुमदुमलें ॥३७॥
हलली पृथ्वी पर्वतादिक । तयागर्जने भ्याले भूतळी लोक ।
जय जयकार करुनी देवादिक । स्तुती करुं लागले तियेची ॥३८॥
आम्हां सर्वांची जननी तूं । स्वभावें आम्हां सर्वां व्यापिसी तूं ।
स्वाहा आणि स्वधाही अससी तूं । एकार क्रिया शक्ति अससी तूं ॥३९॥
असे भव्य कराल तूंची । श्री लक्ष्मी आणि पुष्टि असे तूंच ।
सरस्वती लज्जा कीर्ती ही तूंची । आम्हा सर्वांचा आनन्द असे तूंची ॥४०॥
प्रभा आणि श्रुति अससी तूं । दम इन्द्रिय निग्रह तूं ।
बुद्धी सिद्धी अससी तूं । तूंची असे अहंकाररुपी ॥४१॥
र्‍हीं बीज नि मधु नाशकर्ती तूं । ब्रह्मा विष्णु महेशी वास करणारी तूं ।
सर्वां व्यापक देवता तूं । वेद गर्भ दिती तूची असे ॥४२॥
येऊनी अशा सर्वांचे अंगातुनी । शक्ति संभवे रुप धरुनी ।
तुजशी जिंकू न शके कोणी। म्हणोनि तुझें नाम असे दुर्गादेवी ॥४३॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खण्डे
श्री आर्यादुर्गा महात्म्य
दुर्गा प्रादुर्भवो नाम प्रथमोध्यायः ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा