मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.


।।श्रीराम।।
मला भावलेले व्यक्तिमत्व:
विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
श्रीमंत पेशवे मार्ग,
श्रीवर्धन, जिल्हा- रायगड


            माझ्या आयुष्यात अनेक व्यक्ती आल्या आणि गेल्या. काही लक्षांत राहिल्या काही विस्मरणांत गेल्या. परंतु फारच थोड्या व्यक्ती अशा आहेत ज्यांनी मनांत कायमचे घर करुन ठेवले आहे. त्यातिलच एक व्यक्ती म्हणजे मेहेंदळे रावसाहेब. त्यांचे पूर्ण नांव आहे, विश्वनाथ विष्णू मेहेंदळे त्यांच्या परिचयाचे लोक त्यांना राजाभाऊ म्हणून ओळखत असत.
     त्याचे मूळगांव गणपतीपुळ्याजवळचे मालगुंड. हे गांव केशवसुतांचे गांव म्हणून प्रसिध्द आहे. सुरवातिला त्यांनी मालगुंड नजिक असणाऱ्या नांदिवडे येथे प्राथमिक शिक्षक किंवा त्याकाळातले शाळामास्तर म्हणून काम केले. त्यांनी त्याकाळात शिकवलेल्या त्यांच्या एका विद्यार्थ्याचीही माझी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची पोस्टखात्यात निवड झाली. त्याकाळात पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात जास्त पगार मिळत असे. असे म्हणतात त्याकाळी लोकांनी रिझर्व बँकेतली नोकरी सोडून पोस्टात नोकरी स्विकारली होती. पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाल्यानंतर त्याचे ट्रेनिंग आणि सुरवातिचे पोस्टींग देखिल गुजराथमध्ये झाले होते.
     माझी त्यांची पहिली भेट झाली गोरेगांवच्या पोस्टांत. मी नुकताच श्रीवर्धनहून माणगांव येथे लिव्ह रिझर्व पोस्टमन म्हणून रुजु झालो होतो. मला पहिलेच डेप्युटेशन गोरेगांवचे आले होते. त्यावेळी गोरेगांव येथे मेहेंदळे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते. डेप्यूटेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तेव्हा दैनंदिन भत्ता मिळत असे. मी तेव्हा माणगांव येथे नुकतीच खोली भाड्याने घेतली होती. त्यामुळे मी माणगांव गोरेगांव जाऊन येऊन करण्याचा विचार केला होता.
     मी गोरेगांव येथे हजर झाल्यावर त्याच दिवशी त्यांनी मला खडसावले होते. तुम्ही माणगांवला राहून गोरेगावचयेथे काम करणार आहात आणि भत्ताही घेणार आहात! तेव्हा मी कोणतेही सर्टिफिकेट देणार नाही. इथे रहायचे असेल तर त्याची सोय मी करु शकतो. पहिल्याच भेटीत त्यांनी दिलेला दम ऐकून मी खूपच घाबरलो होतो. कारण तेव्हा मला नोकरी लागुन जेमतेम सहा महिने झाले होते. परंतु नंतर त्यांचा परिचय झाला आणि त्यांचा सडेतोड स्वभाव हा  त्यांचा मुखवटा आहे हे लक्षांत आले. मेहेंदळे रावसाहेब कोणालाही कधीही मदतीला तत्पर असायचे. अनेकांचे आयुष्य त्यांनी मार्गी लावले आहे.

     त्यांचा माझा परिचय वाढला तो ते श्रीवर्धन पोस्टांत सब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यानंतर. त्यावेळी माझीही बदली परत श्रीवर्धनला झाली होती. तेव्हा माझी सर्व्हीस तिन वर्षे पूर्ण झाली होती. पोस्टाच्या नियमाप्रमाणे तिन वर्षे पूर्ण झाल्यावर प्रमोशन परिक्षा देता येत असे. मात्र त्या कर्मचाऱ्याला परमानंट अथवा क्वाझी परमानंट केलेले असणे गरजेचे होते. मेहेंदळे रावसाहेब हजर झाल्यावर त्यांनी माझी क्वाझी परमानंट केल्याची ऑर्डर काढली. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी परमानंटची ऑर्डर देखिल त्यांनीच काढली होती. जेव्हा प्रमोशन परिक्षा जाहिर झाली तेव्हा त्यांनी मला अभ्यास करण्याकरीता कामाच्या वेळेत सवलत तर दिलीच, त्याशिवाय त्यांनी मला असे सांगितले की,  त्याचे जिवश्च कंठश्च असणारे पेंडसे मास्तर महाड येथे प्रमोशन परिक्षेकरीता क्लास घेत आहेत तिकडे जा.
     त्या क्लासला जायचे म्हणजे महाड येथे रहाण्याची, जेवणाखाणाची सोय बघायला पाहिजे होती. याशिवाय जवळपास महिनाभर तेथे रहाण्याकरीता दामाजीपंतांची देखिल जरुरी होती. माझ्या या सगळ्या सबबी ऐकल्यावर त्यांनी माझी रहाण्याची, जेवणाची आणि पैशाची देखिल सोय केली. दुर्दैवाने मी त्यावेळी ती परिक्षा पास होऊ शकलो नाही. किंबहूना ते श्रीवर्धनला असे पर्यंत मी क्लार्क झालो नाही. परंतु या सर्व प्रसंगातुन त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन झाले. एखाद्याचे आयुष्य बनावे याकरीता त्यांच्या ठाई असणारी तळमळ दिसुन येत होती.
     ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते पेण येथे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आम्हाला करता आला नव्हता. ती इच्छा पूर्ण करण्याकरीता आम्ही जेव्हा दिवेआगर येथे श्री केमनाईक साहेबांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचाही सत्कार समारंभ करायचे ठरवले होते. हा समारंभ दिवेआगर येथे यज्ञेश्वर उर्फ भाऊ करमरकर यांचे मांडवात आयोजित केला होता. त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातिल त्यांच्या परिचयाचे अनेकजण हजर होते.


     ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेच वर्ष श्रीवर्धन येथेच रहात होते त्यामुळे त्यांच्याशी सतत संपर्क होता. ते नारायण पाखाडीत दादा टेमकर यांच्या घरात रहात होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर श्रीवर्धन येथे हळबे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून आले होते. त्यांना श्री शिवमहिम्न शिकायचे होते, माझेही अर्धे झालेले होते. तेव्हा आम्ही दोघे आणि आमच्या जोडीला मेहेंदळे साहेब देखिल मोरुतात्या उपाध्ये यांच्यकडे महिम्न शिकायला जायचो. तेव्हा दररोज संध्याकाळी आधी मेहेंदळे साहेबांकडे बैठक असायची त्यानंतर महिम्न. ते टेमकरांच्या घरांत रहात असताना अधिक महिना आला होतो. तेव्हा आम्ही (म्हणजे मी, माझी सौ., मेहेंदळे साहेब, मेहेंदळे बाई आणि सौ. गंद्रे) त्यांच्या घरी दासबोधाचे पारायण केले होते.
     कालांतराने मेहेंदळे बाई देखिल सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांनी आपला मुक्काम लोणेऱ्याला स्वत:च्या घरात हलवला. मी देखिल प्रमोशन होऊन दिवेआगर, वाळवटी आणि श्रीवर्धन येथे क्लार्क अथवा सबपोस्टमास्तर म्हणून काम केले होते. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मी माझी बदली गोरेगांव येथे करुन घेतली. तेव्हा परत आमचा मेहेंदळे साहेबांशी संपर्क झाला. त्यावेळी आम्ही मॉर्निंग वॉकला लोणेऱ्या पर्यंत जात असू. तेव्हा जाता येता कधीतरी त्यांची गाठ पडत असे. विशेष म्हणजे गोरेगांव येथे आम्ही आमचे बिऱ्हाड मेहेंदळे साहेब पूर्वी जेथे रहात असत त्या बबन मोने यांच्या घरांतच केले होते. मेहेंदळे साहेब जवळपास दररोजच गोरेगांव येथे येत असत त्यामुळे त्यांची रोजच भेट होत असे.
     केदारला लोणेरे येथिल बाटु मध्ये डिप्लोमा करीता प्रवेश घेतला होता. त्याचा डिप्लोमा पुरा झाल्यावर त्याचे कँपस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाले होते. ही गोष्ट मेहेंदळे साहेबांना समजली तेव्हा ते ताबडतोब माझ्या घरी आले आणि केदारला नोकरी न करता डिग्री पूर्ण कर असे निक्षुन सांगितले. त्यावर आम्ही गोलमाल बोलल्यावर, त्यांनी पैशाची अडचण आहे कां असे स्पष्ट विचारले. तेव्हा पैशाचा प्रश्न नाही आणि जरुर वाटली तर बँकेतुन लोन घेता येईल असे म्हटले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा विनय याच्याशी बातचित करुन एक प्रस्ताव माझे समोर ठेवला होता. त्यांनी मला केदारच्या डिग्री करीता लागणारे पैसे बँकेतुन न घेता ते देणार आहेत असे बजावले. त्यांनी विनयला असेही सांगितले होते की, मी जरी नसलो तरी केदारचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणारी रक्कम तो देईल. सुदैवाने मला त्यांच्याकडून पैसे घेण्याची वेळ आली नाही. परंतु त्यांनी ते असोत अथवा नसोत केदारच्या शिक्षणाकरीता लागणाऱ्या पैशाची तरतूद केली होती. ही गोष्ट त्यांचा मनाचा मोठेपणा आणि परोपकारी वृत्ती दाखवत होती.  अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना मदत केली होती.
     पुढे त्यांची पंचाहत्तरी गोरेगांव येथे आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी त्यांनी त्यांना अती प्रिय असणारा तंबाखु सोडला होता. त्याचप्रमाणे यापुढे अंगाला सोने लावणार नाही हा देखिल निर्धार त्यांनी केला होता. लोणेऱ्याला असताना मी अनेकदा पोस्टाच्या कामासंदर्भात त्यांचा सल्ला घ्यायला जात असे. गोरेगांवहून नंतर माझी बदली दासगांव येथे पोस्टमास्तर म्हणून झाली. ती बदली मी केवळ गोरेगांव येथुन जाऊन येउन करता येईल म्हणून मी स्विकारली होती. मला साहेब तिथे जाण्यापेक्षा दुसरे सेफ ऑफिस देतो म्हणून सांगत होते. त्याला कारण असे होते, दासगांवला पैशांची अफरातफर झालेली होती. त्यामुळे तेथे अगदी डोळ्यांत तेल घालुन काम करणे आवश्यक होते.  त्यावेळी मला मेहेंदळे साहेबांची खूपच मदत झाली. त्यावेळी मी दररोज लोणेरे येथे त्यांच्याकडे थांबुन दासगांव येथे दिवसभरांत झालेल्या सर्व घटनांबाबत मी त्यांच्याशी चर्चा करुन त्याचा सल्ला घेऊन काम करीत असे. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे मी दासगांवचे शिवधनुष्य पेलू शकलो.
     या ठिकाणी त्यांची एक आठवण आवर्जुन सांगाविशी वाटते. ते नियम आणि व्यवहार यांची सांगड घालुन काम करीत असत. ते श्रीवर्धन येथे कार्यरत असताना एका गावांत जवळपास साठ सत्तर आर्.डी. खात्यांची मुदत संपल्याने त्या लोकांना एका दिवशी रक्कम अदा करायची होती. त्या सर्व खातेदारांनी श्रीवर्धन येथे येण्याकरीताचा वेळ आणि पैसे खर्च करुन येण्याऐवजी त्यांना त्यांच्या गावात जाऊन रक्कम वाटप करण्याची योजना श्री मेहेंदळे साहेब यांनी केली होती. त्याकरीता आवश्यक असणाऱ्या तरतुदी त्यांनी केल्या आणि त्या खातेदारांना सर्व रक्कम त्यांच्या गावांत जाऊन अदा केली होती. या मध्ये कोणाचेही नुकसान नव्हते की फायदा. परंतु ही गोष्ट नियमाविरुध्द होती. या गोष्टीचा लेखी रिपोर्ट आमच्याचपैकी एकाने साहेबांना केला होता. या व्यवहारांत खातेदारांची सोय झाली परंतु मधल्या मधे मेहेंदळे साहेबांना खात्यामार्फत चौकशीला सामोरे जावे लागले त्यातुन त्यांना किरकोळ शिक्षा देखिल झाली होती.
     श्रीवर्धन पोस्टांत सन १९८० पासुन सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. हा कार्यक्रम ऑफिस स्टाफ आणि त्यांचे कुटूंबीय मिळून साजरा करतात. मेहेंदळे साहेब श्रीवर्धनला येण्यापूर्वी हा कार्यक्रम अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जात असे. मेहेंदळे साहेब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यावर पहिल्याच वर्षी सत्यनारायणाची पूजा साजरी करण्याचा विषय आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्वांना सांगितले, हा कार्यक्रम जर बंद करायचा असेल तर तुम्ही तसे करु शकता त्याकरीता मी परवानगी देत नाही असे जाहिर केले तरी चालेल. परंतु जर चालू ठेवायची असेल तर ती परत बंद करुन चालणार नाही. परंतु सर्वांनी ही परंपरा चालू ठेवायचीच असे सांगितले. त्यानंतर मात्र हा पूजेचा कार्यक्रम हा एक सोहळाच व्हायला लागला. परंपरेप्रमाणे आदल्या रात्री सर्व ऑफिस धुण्यापासुन पूजेच्या दिवशी रात्री भजनाची बारी होई पर्यंत सर्व स्टाफ मनापासुन भाग घेत असे. अशाप्रकारचे कार्यक्रम साजरा करण्याकरीता मॉनेटरची भूमिका महत्वाची असते. ती भूमिका मेहेंदळे साहेब तन, मन, धन खर्च करुन निभावायचे. त्यावेळी त्यांचा उत्साह एवढा असायचा की, जेवण तयार करण्याकरीता इंधन जमा करण्यापासुन ते भाजी, आमटी फोडणीला टाकेपर्यंत त्यांचा सहभाग असे. त्यांचा तो उत्साह पाहून सर्वांचाच उत्साह वाढत असे.
     अशा या जगमित्र असणाऱ्या मेहेंदळे साहेबांचे निधन झाल्याचा फोन त्यांची मुलगी वीणा हीने केला होता. त्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली वहावी असे ठरवले होते. हे लेखन ही त्यांना वाहिलेली माझी श्रध्दांजलीच आहे. ते माणूस म्हणून किती मोठे होते याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेलेच जाणतात. मालगुंड येथिल नारळाप्रमाणेच ते वरुन कठोर आणि अंतर्यामी मधाळ, स्निग्ध असे होते. त्यांना माझी ही आदरांजली!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा