श्री आर्यादुर्गा महात्म्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री आर्यादुर्गा महात्म्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९

श्री आर्यादुर्गा महात्म्य - अध्याय १

।। श्री आर्यादुर्गा महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय १ ।।
स्कंद पुराणांत गोकर्ण महात्म्यमध्ये उत्तरखंडात
" श्री आर्यादुर्गा महात्म्य " वर्णन केले आहे .

श्री गणेशायनमः ॥ श्रीसरस्वत्यैनमः ॥ श्री गुरुभ्योनमः ॥
ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धी यशसाधका ।
हेरंबा भक्त वरदायका । काव्यारंभीं तवचरणी ॥१॥
मग वंदिली वाग्देवता । संजीवनी ज्ञान सरिता ।
वीणाधारिणी विधि दुहिता । मयुरासना सरस्वती ॥२॥
गोकर्ण पुराणांतर्गत । उत्तर खंडविख्यात ।
त्यामाजीं रसाळ बहुन । आर्यादुर्गा महात्म्य एक ॥३॥
श्री आर्यादुर्गा देवीची कथा । त्यांत वर्णिली धीमंता ।
सूत सांगे ज्ञान दाता । राजा शतानिका प्रति ॥४॥
ऐकोनि शतानिकाची वाणी । परम हर्षला सूत मुनी ।
धन्य धन्य तुझी वाणी । जी भगवदप्रश्ने सादर ॥५॥
ऐकें अखंड चित्त देऊन । प्रकृति - पुरुष दोघेजण ।
नित्य दंपती असोन । शाश्वत अनुदिनी विलसती ॥६॥
अखिल चराचर सर्वत्र । त्या पासुनी घडलें विचित्र ।
पुरुष प्रकृतीशीं क्षण - मात्र । वियोग न घडे सर्वथा ॥७॥
एकरुपें करुन । दोघे वर्तती अनुदिन ।
त्यांच्या इच्छेने संपूर्ण । त्रैलोक्य जाहलें उत्पन्न ॥८॥
प्रकृती विना पुरुष न शोभे । पुरुषा विना प्रकृती न शोभे ।
राहूं न शके एकटा पुरुष । प्रकृती विना कदापीही ॥९॥
पुण्य श्लोका महाराजा । शत्रु मर्दना शतानिका ।
व्यापिले असे तिन्ही लोका । पुरुष सहायें प्रकृतीही ॥१०॥
विष्णू मायारुपी तेजस्विता । कैसी प्रगट झाली देवता ।
ही ऐशी कथा श्रवणितां । कल्याण होईल श्रवणिकांचें ॥११॥
एकेकाळीं प्रग्जोतिष नगरी । सिंधूद्वीप ऋषी संभवी ।
वेत्रावती स्त्री उदरीं । पुत्र झाला महा प्रतापी ॥१२॥
पुत्र शूर पराक्रमी । तया सामर्थे गदगदे भूमी ।
गाजला वृत्रासूर नामीं । प्राग्यजोतिष नगरांत ॥१३॥
तया बलवान शत्रुमर्दने स्थापियली । प्राग्यजोषि स्थळीं राजधानी ।
संपूर्ण भूंमंडळ जिंकोनी । चालता झाला स्वर्ग मार्गी ॥१४॥
जाउनी मेरु पर्वतावरी । तेथुनी जाता झाला स्वर्गावरी ।
करुनी चाल इंद्रावरी । जिंकियले तयासी ॥१५॥
करुनी युद्ध अग्री सवें । यम निरुती वरुणासवें ।
वायु कुबेरें रुद्रासवें । जिंकियलें सर्वांसी ॥१६॥
वृत्रासुरें स्वर्गं नगरी जिंकियली । सत्ता आपुली स्थापियली ।
करिता झाला महा बळी । कामें देवादि महर्षीचीं ॥१७॥
वृत्रासुर भयें देव - ऋषींनीं । जागा आपुली सोडुनी ।
गमन केलें सर्व मंडळीनी । ब्रह्मदेवाकडे सत्य लोकीं ॥१८॥
लीन होउनी ब्रह्मदेवाचे चरणीं । सांगते झाले आपुलीं गार्‍हाणी ।
वृत्रासुरें आम्हां सर्वां गांजुनीं । त्रास दिधला अतिशय ॥१९॥
आम्हां सर्वांचा तूं नाथ असतां । आम्हीं झालों अनाथ आतां ।
देऊनी आश्रय आम्हां समस्तां । रक्षी रक्षी देवाधिदेवा ॥२०॥
आम्ही आपुली जागा सोडुनी । असुरभयें काननी हिंडूनी ।
येते झाले जीव रक्षणी । ब्रह्मदेवा तुजलागीं ॥२१॥
ऐकूनि गार्‍हाणी तयांचीं । ब्रह्मदेवें पूजा केली नारायणाची ।
शंख , चक्र , गदा , पद्म हाती । ह्रदयीं शोभे श्री वत्स लांच्छन ॥२२॥
प्रार्थना करुनी श्रीविष्णूची । सांगितली करणी वृत्रासुराची ।
गांजिलें असे सर्व देवासी । रक्षी रक्षी तयांसी ॥२३॥
देवाधिदेव कमलनयन । वृत्रासुराची करणी ऐकून ।
अति रागें संतप्त होऊन । विचार करी वृत्रासुर मर्दनासी ॥२४॥
नेत्र गरागरा फिरवून । क्रोधें मुख भयंकर होऊन ।
त्यांतून प्रगटलें दिव्य तेज एक । बाहेर पडलें मुखांतून ॥२५॥
त्या नंतरें ब्रह्मादिदेव कपाळांतुनी । तैसेंचि तेज बाहेर येवोनी ।
सर्व तेजें एकवटोनी । तया प्रकाशें जग व्यापिलें ॥२६॥
ऐशा परी तेज एकवटलें । तयानें रुप आकारिलें ।
कन्यारुप हळु हळु दिसलें । आनंदित झाले सर्व देव ॥२७॥
शंभुतेजें मुख बनलें । यमातेजें केश विस्तारिले ।
विष्णू तेजें द्वौभुजा जाहले । स्तन जाहले चंद्र तेजें ॥२८॥
इन्द्र तेजें बनले पोट । वरुण तेजें जंघा आणि पौट ।
पृथ्वी तेजें कंबरट । पदें बनलीं ब्रह्म तेजें ॥२९॥
रवी तेजें पादांगुलें बनलीं । वसुतेजें हस्तांगुलें जाहलीं ।
कुबेर तेजें नासिका शोभलें । दंत पंक्ती बनल्या प्रजापती तेजें ॥३०॥
अग्नि तेजें नयने प्रकाशलीं द्वा सन्ध्यातेजें भुवया आकारिलीं ।
वायू तेजें कर्ण जहाले । सर्व देव ऋषी तेजें जाहली देवता ॥३१॥
तया देवीसी पाहून । भीतिग्रस्त देवादि समस्त जाण ।
हर्षले आनंदित होऊन । त्रैलोक्य आनंदित जहालें ॥३२॥
तया देवीस पाहतां होऊन प्रफुल्ल । रुद्र देवें दिला त्रिशूल ।
दिधलें विष्णूने चक्र उज्ज्वल । दिला ब्रह्मदेवे ब्रह्मदण्ड ॥३३॥
यमें दिधला दण्ड आकर्ष । वरुणें दिला आपुला पाश ।
वायूने दिलें धनुष्य । वज्र दिधलें इन्द्राने ॥३४॥
दिलें खडगास्त्र कालानें। शंख दिधला वरुणाने ।
हार आणि चूडामणी क्षीरसागराने । हिमालयें दिलें सिंहासन ॥३५॥
महाबली ऐरावतें घंटावाद्य दिलें । विश्वेदेवें मुकुट माळ केयूर दिले ।
सर्व देवें अमोल अलंकार दिले । दिलीं विपुल आयुधें ॥३६॥
अलंकारें मस्तकापासुनी पदकमलावरी आकाशमण्डळी अती शोभली ।
तियेनें गगन भेदी गर्जना केली । तेणें सर्व आकाश दुमदुमलें ॥३७॥
हलली पृथ्वी पर्वतादिक । तयागर्जने भ्याले भूतळी लोक ।
जय जयकार करुनी देवादिक । स्तुती करुं लागले तियेची ॥३८॥
आम्हां सर्वांची जननी तूं । स्वभावें आम्हां सर्वां व्यापिसी तूं ।
स्वाहा आणि स्वधाही अससी तूं । एकार क्रिया शक्ति अससी तूं ॥३९॥
असे भव्य कराल तूंची । श्री लक्ष्मी आणि पुष्टि असे तूंच ।
सरस्वती लज्जा कीर्ती ही तूंची । आम्हा सर्वांचा आनन्द असे तूंची ॥४०॥
प्रभा आणि श्रुति अससी तूं । दम इन्द्रिय निग्रह तूं ।
बुद्धी सिद्धी अससी तूं । तूंची असे अहंकाररुपी ॥४१॥
र्‍हीं बीज नि मधु नाशकर्ती तूं । ब्रह्मा विष्णु महेशी वास करणारी तूं ।
सर्वां व्यापक देवता तूं । वेद गर्भ दिती तूची असे ॥४२॥
येऊनी अशा सर्वांचे अंगातुनी । शक्ति संभवे रुप धरुनी ।
तुजशी जिंकू न शके कोणी। म्हणोनि तुझें नाम असे दुर्गादेवी ॥४३॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खण्डे
श्री आर्यादुर्गा महात्म्य
दुर्गा प्रादुर्भवो नाम प्रथमोध्यायः ।।

श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य अध्याय २

।। श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय २ ।।
श्री देवी दुर्गा होउनी उपजली । तिने अदभुत गर्जना केली ।
सर्व मण्डळी भयें थरारली । वृत्रासुर मनी दचकला ॥१॥
वृत्रासुर चालला गर्जना ऐकून । काय असें तें घ्यावया जाणून ।
देवीचें दिव्य रुप पाहून । चकित झाला ते समयी ॥२॥
सहस्त्र हात दिसले आकाशीं । व्यापिलें रुप दशदिशीं ।
जगीं प्रकाशलें दिव्य प्रकाशीं । ऐसें रुप पाहिलें वृत्रासुरें ॥३॥
युगांतर समयासी । अग्नी जैसा नाशकरी ।
तैशापरी वृत्रासुरे । चाल केली दुर्गेवरी ॥४॥
सांगता झाला शतनिका प्रति सूत । दुर्गादेवी वृत्तासुरे युद्ध अदभुत ।
सैन्य जहालें भयचकित । युद्ध समयीं तये स्थळीं ॥५॥
ऐशापरि युद्ध आरंभिले । दूर्गेने अति सैन्य संहारिलें ॥
शस्त्रास्त्रें युद्ध कडाडलें ॥ पर्जन्य पडला शस्त्रांचा ॥६॥
असुरास्त्रांचा चुरा करुन । अतिहर्षे हास्य करुन ।
तया हसें आकाश भरुन । सर्व भूमी गडाडली ॥७॥
तिच्या हसें मुखांतून । घोरमुखी बहुत देवी उदभवून ।
असुर सैन्या धरुन । खाऊं लागल्या चरचरां ॥८॥
सैन्य नाश झाल्याचें पाहून । सेनापती विहसें अवलोकून ।
मनी अती क्रुद्ध होऊन । तुटून पडला दुर्गादेवीवरी ॥९॥
भद्रकाली देवीने ऐसें जाणून । विहस्ताचें केश धरुन ।
सुदर्शन चक्र तयावरी चालवून । धडावेगळें केलें तया ॥१०॥
महापराक्रमी सेनापती मरतां । दुर्गादेवीने असें जाणतां ।
चतुरंग सैन्य हळु हळू कापतां । सर्व सैन्यासी मारिलें ॥११॥
सर्वा नंद कर्ती सर्व सैन्यातें मारुन । वृत्रासुरावरी गेली चाल करुन ।
ऐशा महादेवीला वृत्रासुरें पाहून । क्रुद्ध झाला तो ते समयीं ॥१२॥
ऐसें दृश्य तयें पाहिलें । वज्रा सम अस्त्र देवी वरी सोडिले ।
दुर्गेनेही तैसेंचि अस्त्र सोडिलें। वर्षाव केला बाणांचा ॥१३॥
दुर्गादेवीचे वृत्रासुराबरोबर । युद्ध चाललें महा भयंकर ।
तैसेंची राहिलें वर्ष शंभर । हरलें नाहीं कोणी ही ॥१४॥
अंती सर्व शक्ती एक वटून। वृत्रासुराच्या केशांसी धरुन ।
धरणीवरी तया पाडून । शूलें आणि खडगें मारिलें ॥१५॥
ऐशापरी वेत्रवती सुता मारिलें । शीर केलें धडावेगळें ।
तें वृत्त ब्रह्मादिदेवां कळलें । सर्व आले तये स्थळी ॥१६॥
तें दृश्य सर्वानी पाहिलें । आणि दुर्गा देवीची स्तुती करुं लागले ।
गुरु सम ब्रह्मदेवें सांगितलें । दुर्गादेवीसी तये वेळीं ॥१७॥
जय जय दुर्गे माय भवानी । तूचि अससी त्रिकाल ज्ञानी ।
तुझी निंदा न करी कोणी । रक्षणकर्ती तूं आम्हां ॥१८॥
आम्हां सर्वां हांके तूं आलीस धावून । राहे आतां हिमगिरी वरी जाऊन ।
शत श्रृंग पर्वतावरी वास करुन । मर्दन करी तिथलिया राक्षसांचें ॥१९॥
त्या हिमालय पर्वतावर । वास करतील क्रूर असूर ।
नाम तयाचें शुभ - निशुंभासुर । त्रास देतील सर्व लोकां ॥२०॥
महिषासुर नामक दैत्य । सर्वांसी दुःख देयील बहुत ।
तपोबलें होतील समर्थ । मदोन्मत्त दुरात्मे ॥२१॥
त्या सर्वांतें मृत्युरुपें । तूंचि वधिशील साक्षेपें ।
या कारणी सुखरुपें । राहे माते त्यास्थळीं ॥२२॥
ऐशा परी ब्रह्मदेवाची विनंती ऐकून । सांगती झाली दुर्गादेवी तिथें मी राहीन । ऐसें ब्रह्मदेवासीं सांगून । निघती झाली सर्व देवींसह ॥२३॥
मग तिथुनी शतश्रृंग पर्वती गेली । सर्व देवीं सह तिथें तप करुं लागली । ऐशापरी ती राहे ज्या स्थळीं । तयाचें नाम असे प्रसिद्ध अजश्रृंग ॥२४॥
पक्षराज गरुडें तेंचि अजश्रृंग शिखर । गोकर्णी न्यावया घेवुनी आपुल्या पाठीवर । उड्डाण करितां पक्ष राजेश्वर । शिखर पडलें सागरीं ॥२५॥
दुर्गा देवी अजश्रृंगावरी राहिल्यावरुन । नांव पडलें तियेसी आर्या जाण । मग म्हणूं लागले सर्वहिजन । श्री आर्या - दुर्गादेवी तियेसी ॥२६॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे
श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य
वृत्रासुर वधो नाम द्वितीयोध्यायः ।।

श्री आर्यादुर्गा महात्म्य अध्याय ३

 श्री आर्यादुर्गा महात्म्य "
अध्याय ३


म्हणे शतानिकाप्रति संवर्तक । महिषासुर नामें दैत्य एक ।
महा बलिष्ट असुनी प्रख्यात । राज्य करिता झाला शोणितपुरी ॥१॥
कैकवर्षे तपश्चर्या करुनी । ब्रह्म देवासि घेतला प्रसन्न करोनी ।
वर मिळविला तया कडूनी । देव गंधर्व मनुष्या हातीं मृत्यू न ये ॥२॥
घेउनी आपुल्या चतुरंग सैन्यासी । स्वारी करुनी तिन्ही लोकांसी ।
छळुनी देव गन्धर्व मनुष्यांसी । नाना परी त्रास देता झाला सर्वांसी ॥३॥
महिषासुर मन्त्री धूम्रकेतू नाम्नौ । फिरत असतां एकेदिनीं ।
तया भेटतां नारदमुनी । नमस्कार करिता झाला तयासी ॥४॥
विचारी नारदमुनीसी प्रश्न करुन । काय पाहिलें जगीं नवीन ।
सांगावें मजला आपण । सर्वज्ञानी नारदमुने ॥५॥
धूम्रकेतूसी सांगे नारदमुनी । महिषासुरासम जगीं नसे कोणी ।
तयाचे राज्यीं काय असे कमी । त्रैलोकीं शूर असे एक तोची ॥६॥
पुरुषार्थि महिषासुर असे जगतीं । त्रैलोक्य रक्षक तयासी म्हणती ।
इन्द्रादि लोकपाल त्याचे दासदासी । कोण विरोध करी तयासी ॥७॥
तया राज्यांतील नागरिक आम्हीं । म्हणोनी सांगतों तुज एक बातमी ।
पाहिलें असें रत्न एक मी । महिषा सुरासी योग्य तें ॥८॥
गोकर्ण क्षेत्राजवळी असती । आर्याद्विप नाम तया म्हणती ।
तया स्थळी जियेची वसती । तेंची स्त्री रत्न सुंदर असे ॥९॥
तियेचें आर्यादुर्गा नाम । वध केला वृत्रासुराचा जाण ।
ती म्हणे मजसम जगीं नसे कोण । ऐशा परी ती आहे जाण ॥१०॥
नारदाचें उत्तर ऐकून । गेला महिषासुराजवळी धांवून ।
धूम्रकेतूसी येतां पाहून । आनंद झाला महिषासुरासी ॥११॥
धुम्रकेतूचें वदन पाहून । तू काय पाहिलें असे नवीन ।
सांगावें मज कथन करुन । विचारता जाहला महिषासुर ॥१२॥
धूम्रकेतु सांगे कर जोडून। असे एक सुन्दर रत्न ।
ह्या सिंहासनासि दिसेल शोभून । सांगितलें असे नारद ऋषींनीं ॥१३॥
तयाचे ते बोल ऐकून । महिषासुर म्हणे धूम्रकेतु लागून ।
सांगावें मज स्पष्ट करुन । कैसें रत्न कुठें असे तें ॥१४॥
ऐकतां वृत्त विस्तारुन । म्हणे धूम्रकेतु लागून ।
तुवां तेथें त्वरित जावून । आणावें येथें तये सुन्दरीसी ॥१५॥
मजसाठीं तिकडे जाऊन । सत्वर यावें दुर्गेसी घेऊन ।
तिजसवें विवाह करुन । मी आनंदित होऊं इच्छितों ॥१६॥
म्हणें धूम्रकेतूसि जाण । चतुरंग सेना सवें घेऊन ।
शीघ्रची जावें न लागतां क्षण । आर्याद्वीपासीजाणपां ॥१७॥
सैन्य मोठें सवें घेऊन । मन्त्री धूम्रकेतू नीतिज्ञ ॥
आर्याद्वीपावरी जाऊन सैन्य ठेविलें समुद्र तिरीं ॥१८॥
आर्या द्वीपीं मग जाऊन ॥ रत्न जडित नजराणा घेऊन ।
आर्यादुर्गा देवीसमोर ठेऊन । नमस्कार केला तियेषी ॥१९॥
धूम्रकेतूनें नमस्कार करितां । देवी सांगे तया बैस आतां ।
ऐसें तियेचें वचन ऐकतां । उठूनीं बसला धूम्रकेतू ॥२०॥
तये स्थळीं स्वस्थ बैसून । तिजसी पाहतां न्याहाळून ।
महिषासुरासी योग्य असे असें मानून । हलविता जाहला आपुलें शिर ॥३१॥
देवीने धूम्रकेतूचें मस्तक पाहिलें । विचारती झाली तूं कोण कां येणें झालें । आणि आतां शिर कां हलविलें । सांग मजला तूं आतां ॥२२॥
करितां प्रश्न आर्यादुर्गेने । धूम्रकेतू सांगता झाला नम्रपणें ।
मी मंत्री धूम्रकेतू नामे । दानवेंद्र महिषासुराचा ॥२३॥
ज्याने भू लोक जिंकिलें । तैसेचि स्वर्गलोक जिंकिले ।
तयाने मज आज्ञापिलें । तुला घेउनी यायला ॥२४॥
तूंचि असे अती रुपवती । तुझी असे अती मनोहर दृष्टी ।
तुला पाहतां मम चित्ती । विचार आला तुजविषयीं ॥२५॥
तूंची सुंदर ऐसे पाहूनी । महिषासुरासी तूं योग्य असें मानूनी ।
तोचि तुजला योग्य असें येतां मनी । हललें मस्तक माझे ॥२६॥
तुझें नाम काय आणि कोण । तूंचि असे कुणा स्वाधिन ।
पुण्यराशी तूं वाटते जाण । सांग मजला सत्वर तूं ॥२७॥
महिषासुर जरी असे तेथें । तरी त्याचें मन असे येथें।।
यास्तव तूं यावें मज सवें तेथें । तया राजा पहावया ॥२८॥
ज्याची सेवा केली देव पत्नीनीं । तयाचे राजधानीं येऊनी ।
तयांचे ऐश्वर्य भोगावें तुम्ही । ऐसें वदतां देवी हंसली ॥२९॥
दुर्गादेवी म्हणें धूम्रकेतूसी । मी येईन त्याचे राजधानीसी ।
परी अटी असे एक येण्यासी । तें मान्य करणें भाग असे ॥३०॥
देवासुरादिकांनी केली मला मागणी । ते असे सुंदर बलिष्ट आणि सदगुणी ।
परी मम अट पुरी करुं शकले नाही कोणी । म्हणोनियां गेले परतोनी ॥३१॥
अट असे जो मज सवें युद्ध करुनी । जिंकेल मजला युद्धांत जो कोणी । तयाची होईन मी धर्म पत्नी । त्याचे बरोबरी येईन मी ॥३२॥
जरी मी यावें महिषासुराचे घरीं । तरीं त्याने यावें लढण्यासी मजबरोबरी । बोलावून आणावें त्यासी येथ सत्वरी । जावून सांगावें तूंची लवकरी ॥३३॥
क्रोधें धूम्रकेतू म्हणे आर्यादुर्गेसी । ऐसें न शोभे तुज स्त्रियेसी ।
तो असे महापराक्रमी जगतासी । तूंची स्त्री अबला अससी ॥३४॥
त्रैलोकीं तोची शस्त्र धारी जाण । अस्त्र विद्येंत ही सर्वांत निपुण ।
दिसे सर्वांत सुंदर रुपवान । तरी तूं वरावें त्यासी सत्वरीं जाण ॥३५॥
जरी तूं येत नसशील मजबरोबर । तरी केशांसी धरुनी नेईन सत्वर ।
ऐसें म्हणोनी पुढें जहाला झरझर । तिला ओढूनी न्यावयासी ॥३५॥
धूम्रकेतू पुढें होऊन । न्यावया तिला केशांसी धरुन ।
ऐसें दृश्य जवळून । देवीच्या दासीने पाहिलें ॥३७॥
तांबूल दायिनी दासीने पाहतां । तलवार घेतली आपुल्या हातां ।
वार केला उचलोनी त्वरितां । धडावेगळें केलें तया ॥३८॥
धूम्रकेतूसी दासीनें मारिलें । तें दृश्य भूतनाथानें पाहिलें ।
आणि त्याच्या सैन्यासी घेरुनी । धरिलें फडशा केला सर्व सैन्याचा ॥३९॥
भूतनाथा हातून जे कोणी निसटले । ते महिषासुराजवळी आले ।
त्यानीं वर्तमान सांगितले । यथासांग सर्वही ॥४०॥
धूम्रकेतु दुर्गेसी आणील म्हणून । पण घडलें दुसरेंचि वर्तमान ।
धुम्रकेतूसी मारल्याचें वृत्त ऐकून महिषासुर संतप्त जहाला मनी ॥४१॥
मग विचार करुनी आपुल्या मानसी । तयाने चंड -मुंड सेनापतींसी ।
सैन्य देऊनी त्यांच्या पाठीशीं आर्याद्वीपीं पाठविलें ॥४२॥
शस्त्रास्त्रें घेऊनि आपुल्या बरोबर । जाउनि चंड -मूंड आर्या द्वीपावर ।
आव्हान केलें युद्धासी आपुल्याबरोबर । तया आर्यादुर्गा देवीसी ॥४३॥
बहुमुख अलंकृत देवीने ते पाहून । अनेक हस्तीं विपुल शस्त्रास्त्रें घेऊन । त्याजबरोबरी प्रचंड युद्ध करुन । सर्व सैन्यासह तया दोघां मारिलें ॥४४॥
जे कोणी असुर पळुनि गेले । ते महिषासुराजवळी आले ।
त्यांनी तेथील वृत्त सांगितलें । जैसें घडलें तैसेंचि ॥४५॥
वृत्त कळतां क्रुद्ध होउनी महिषासुर । रथी महारथी यज्ञघ्न शुंभ -निशुंभासुर । निशढ शढबाल चतुर्मुख सत्वर । निघाले हविर्भागीं जे पोशिले ॥४६॥
सैन्यासह सर्व रथी महारथी । देवीने पाठविले यमपंथी ।
जे कोणी पळले दुष्टमती । महिषासुराजवळी धावूनी आले ॥४७॥
मग पाठविला रक्तासुर । आरंभिलें त्याने युद्ध गंभीर ।
बसतां वार रक्तासुरावर । रक्त सांडलें अतिशय ॥४८॥
रक्तबिंदू पासूनि बनले राक्षस । पाहुनि हंसली आर्यादुर्गा त्यांस ।
मुखांतुनि प्रगटली करितां हास्य । लंबोदर महाकाली त्या समयीं ॥४९॥
प्रगटतां तियेसी आज्ञा केली । करितां आज्ञा अग्नि जिव्हा महाकाली ।
उदभवित राक्षसापासीं जाऊं लागली । आणि सर्व राक्षसां गिळंकृत केलें ॥५०॥
महाबली रक्तासुराला । तीक्ष्ण खडगीं मारुनी टाकिला ।
प्राशुनी तयाच्या रक्ताला । रक्तासुराचा नाश केला ॥५१॥
हें वृत्त महिषासुरासी कळल्यावर । संतप्त झालें त्याचें शिर ।
ती देवी माझ्या हातूनि मरणार । ऐसें म्हणोनि ऊठिला ॥५२॥
ऐशापरि योजुनी महिषासुर । घेऊनि सर्व सैन्य बरोबर ।
चाल करुनि आला आर्याद्वीपावर । लढण्यासि आर्यादुर्गा देवी बरोबर ॥५३॥
बसलीं होती देवी आपुल्या सिंहासनावर । अंगावरी घालुनी सर्वहि अलंकार । कमलनयना बहुत सुंदर । आर्यादुर्गा देवी तयावेळीं ॥५४॥
महिषासुरें केलें अंगी कवचालंकार धारण । एके हातीं धनुष्य दुसरे हाती बाण । घेउनी बसला होता आपुल्या रथावरी जाण । तये वेळीं दिसे महिषासुराचें वज्र ठाण ॥५५॥
ऐसे परि हातीं धनुष्य बाण घेऊनि । आकर्ण परियंत बाण ओढुनी ।
तीक्ष्ण बाण सोडितसे हें देवीने पाहूनी । आपुल्या प्रखर बाणे मध्येंचि टाकी छेदून ॥५६॥
देवीस पाहुनी महिषासुर । बाण वर्षाव करी भयंकर ।
तये परि देवीनेहि असुरावर । सोडियले बाणवर्षाव अपार ॥५७॥
युद्ध शुरु झालें अती घोर । सोडुं लागला बाण देवीवर ।
मोडूनी ठाकले बाण चरचर । आर्यादुर्गेने तत्समयीं ॥५८॥
जीं जीं शस्त्रास्त्रें महिषासुर सोडी । तीं तीं सर्वही आर्यादुर्गा मोडी ।
ऐशापरी जाणुन युद्ध नाडी । रथ त्याचा मोडियला ॥५९॥
मग बैसला ऐरावत सम हत्तीवर । सोडूं लागला अस्त्रें अपरंपार ।
तीं सर्वही मोडूनी सत्वर । हतबल केला तयासी ॥६०॥
उड्डाण करुनी सिंहे क्रुर । उडी घेतली तया हत्तीवर ।
तीक्ष्ण दाढें फाडुनी सत्वर । मारुनी टाकिला धरणीवरी ॥६१॥
मग महिषासुर पायींच येतां । देवीने घेउनी त्रिशूल हातां ।
मारुनी टाकिला महिषासुरासी तत्वतां । सैन्य सर्वही मारिलें ॥६२॥
त्रैलोकीं भयदाता महिषासुर । आर्यादुर्गेने मारुनी टाकिल्यावर ।
आकाशांतुनी पुष्पवृष्टी करुन तिजवर । सर्वहि देवानी केली स्तुती तियेची ॥६३॥
ज्या ज्या कारणी उदभवली आर्यादुर्गा देवता। तेंतें सर्व ही कार्य संपलेंसे जाणतां।
आशीर्वाद देउनी समस्तां । गुप्त झाली ती सर्व देवींसह ॥६४॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे
श्री आर्यादुर्गा देवी महात्म्ये महिषसुरवधो नाम तृतियोध्याय: ।।

श्री आर्यादुर्गा महात्म्य अध्याय ४

।। श्री आर्यादुर्गा महात्म्य ।।
।। आर्यादुर्गा देवी - अध्याय ४ ।।

सर्व राक्षसांचा संहार करुन । आर्यादुर्गा देवी गुप्त होऊन ।
हें दृश्य सर्वांनी पाहून । आनंदले सर्व ऋषि -जन ॥१॥
उपरी सर्व देव -ऋषींनी । आर्यादुर्गेची प्रतिमा करोनी ।
यथाविधी मंत्रोच्चार करोनी । स्थापियली आर्याद्वीपावर ॥२॥
अकरा तीर्थे असती तेथ । नामें तयाचीं असती विख्यात ।
जे जे करिती स्नान तयांत । पावन होती तत्काळ ॥३॥
सर्व तीर्थात स्नान करोनि । पूजिली आर्यादुर्गा देवी सर्वांनी ।
मग गेले आपआपुल्या स्थानीं । निर्भयें सर्व देव -ऋषि जन आनंदुनी ॥४॥
वसुधारा तीर्थ तीर्थ गंगाधर । महिषतीर्थ आणि कालीधर ।
गौरीहद तीर्थ आणि कौमार । नाग तीर्थ आणि चामुंडा तीर्थ ॥५॥
वारुणा तीर्थ आणि वरुण तीर्थ । ऐशी असती तीर्थे दहा जाण ।
आणि असे एक तीर्थ महान । दुर्गा तीर्थ नामें मुख्य तें ॥६॥
दश तीर्थे सहस्त्र तीर्थांसमान । त्यांत शुद्धोदक दुर्गातीर्थ जाण ।
आणि तया तीर्थात करितां स्नान । होतील सर्वही पावन ॥७॥
जे करतील नित्य तीर्थांत स्नान । तैसेंचि दुर्गामहात्म्याचें पठण ।
शुद्ध अंतःकरणें करतील जाण । एक वर्षांत होइल देवी त्याला प्रसन्न ॥८॥
।। इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खंडे
श्री आर्यादुर्गा महात्म्ये चतुर्थोध्याय समाप्त ।।
।। श्री जगदंबा आर्यादुर्गार्पणमस्तु ।।
हें महात्म्य दामोदर प्रभु देसाई याने रचिलें ।
तें अनंत प्रभु देसाई याने यथामति परिशोधिलें ।
आणि तें भक्तजनांनी प्रेमें गायिलें ।
श्री जगदंबा श्री आर्यादुर्गा देवीचें ॥१॥
यांत काय न्युनाधिक असतां ।
भक्तगण नि वाचक तत्वतां ।
हंसक्षीर न्यायें निवडूनि घेतां ।
गोड मानून घेतील सकल जनता ॥२॥