मला भावलेल्या व्यक्ती
मला भेटलेल्या आणि
भावलेल्या व्यक्तीमत्वांचे चित्रण करायचा मी प्रयत्न करीत आहे. आज मी अशा एका
व्यक्तीची माहिती सांगणार आहे, जिने आयुष्यभर कष्टच केले आणि जबाबदाऱ्यांचे ओझे
वागविले. ते आहेत माझे क्लार्कच्या नोकरीतले पहिले गुरु. त्याचे नांव आहे, “जयंत जयराम केमनाईक”. त्यांना संबोधन मात्र बंधू असे आहे. बंधू
म्हणजे अर्थातच मोठा भाऊ. मोठ्याभावाला नेहमी कर्तव्यच करायचे असते. आपल्या लहान
भावंडांची काळजी घेणे त्यांच्या अडीनडीला धाऊन जाणे हिच भूमिका त्यांनी कायम
निभावली. त्याकरीता ती भावंडे रक्ताचीच असायची जरुरी नाही. त्यांना बंधू म्हणून
मानणारी सर्वच त्यांची भावंडे होती.
त्यांचे आतापर्यंतचे सर्व
आयुष्य जबाबदाऱ्या सांभाळण्यातच गेले. आता कोठे चार सुखाचे समाधानाचे दिवस आले
तेव्हा त्यांच्या प्रकृतीने दगा दिला आहे. त्यांनी आपले तन आणि मन पोस्टाच्या
सेवेला वाहिलेले होते. त्यांच्या नोकरीची सुरवात बॉय मेसेंजर या पदाने झाली.
त्याकाळात आलेल्या तारा(Telegrams) वाटपा करीता १६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांची
नेमणूक करीत असत. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ते रेग्युलर पोस्टमन म्हणून काम
करु लागले. त्याकाळात पोस्टात कामावर जाण्याकरीता परिक्षा वगैरे द्याव्या लागत
नसत. कारण तेव्हा पोस्टात कामाला माणसेच मिळत नसत. आपल्या ओळखितील लोकांना पोस्टात
चिकटवत असत.
त्या काळांत पोस्टामध्ये
व्हीलेज पोस्टमन म्हणून काही जागा असत. त्यांना आठवड्याची बीट असे. श्रीवर्धन येथे
देखिल तेव्हा व्हीलेज पोस्टमनची पोस्ट होती. त्याची कामगीरी सोमवारी सुरु होत असे.
सोमवारी मुख्यालयातुन आपली सर्व कामगिरी म्हणजेच पत्रे, मनीऑर्डर, रजी पत्रे इ.
ताब्यात घेऊन त्याचप्रमाणे मनी ऑर्डर पेमेंट करीता लागणारी कॅश घेऊन व्हीलेज
पोस्टमन निघत असे. पहिल्या दिवशी चालत चालत श्रीवर्धन दांडे येथिल तरीने कुरवडे,
काळींजे, सायगाव पर्यंत पत्रे वगैर वाटत, पेमेंट करत, त्या त्या गावांमधिल
पाठवायची पत्रे गोळा करत तो सायगांव येथे वस्ती करत असे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी
निगडी, निवळा, गालसुर, बापवन, रानवली या गावांचे टपाल वाटुन व जमा करुन रानवली
येथे वस्ती करीत असे. तिसऱ्या दिवशी
बुधवारी जसवली, भट्टीचा माळ येथिल टपाल वाटून व गोळा करुन तिन दिवसात
केलेल्या कामगिरीचा हिशेब द्यायला श्रीवर्धन येथे येत असे. त्यानंतर गुरुवारी परत
सोमवार प्रमाणेच सर्व कामगिरी ताब्यात घेऊन वाळवटी, आरावी, कोंडवीली, शेखाडी,
चिखलप, शिरवणे, मामवली, गुळधे, या विभागातिल टपाल वितरण आणि जमा करणे ही कामगीरी
शनिवार पर्यंत करुन हिशेब द्यायला शनिवारी श्रीवर्धनच्या पोस्टांत हजर होत असे.
अशी ही सात दिवसांची व्हीलेज बीट देखिल बंधूनी बदली कामगार म्हणून केली होती. पोस्टमनच्या
नोकरी पुरेशी झाल्यावर त्यांनी मेल ओव्हरसिअरचे काम स्विकारले. हे काम म्हणजे
मोठ्या जबाबदारीचे काम होते. शाखा डाकघरांची नियमित तपासणी करणे ही मुख्य जबाबदारी
मेल ओव्हरसिअरची असायची. जर एखाद्या शाखा डाकपालाने काही गफला केला तर त्याची
पहिली जबाबदारी मेल ओव्हरसिअरवर थोपवली जायची.
त्याकाळात सर्व
पत्रव्यवहार पोस्टानेच होई. कोणी जन्माला आले किंवा कोणी मरण पावले तर ती बातमी
पत्रानेच समजायची. त्यामुळे पत्रांच्या वितरणावर पोस्ट खात्याची बारीक नजर असायची.
एक आण्याला मिळणारे पोस्टकार्ड जर नियत काळापेक्षा उशिरा वितरीत झाल्याचे सिध्द
झाले तर त्याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरुन निलंबित करण्यात
येत असे. अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे अधिकार तेव्हा ओव्हरसिअरला देखिल असत.
शाखा डाकपालांचे दैनंदिन
हिशेब तपासणे, पोस्टाच्या बचत खात्यांच्या खातेदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटून
त्यांच्या पासबुकांची तपासणी करणे आणि त्यात काही गफलत असेल तर तसा रिपोर्ट करुन
योग्य ती कार्यवाही करणे, खेडोपाडी जाऊन तेथिल लेटर बॉक्स वेळेवर उघडले जातात का
नाही ते तपासणे, शाखा डाकघरांतुन वितरणाला जाणाऱा कर्मचारी नियमितपणे खेडेगावांना
भेट देतो की नाही हे तपासणे अशी अनेक जबाबदारीची कामे ओव्हरसिअरला करावी लागत असत.
त्याच्या पोस्टचे नांव ओव्हरसिअर असले तरी तो वठवित असलेली भूमिका इन्स्पेक्टरचीच
असायची. फार तर सब इन्स्पेक्टर म्हणूया. हे जबाबदारीचे काम बंधूंनी समर्थपणाने
पेलले. या कामामध्ये रोजचा प्रवास, रोज नवे नांव, रोज वेगळे पाणी, वेगळे जेवण
यामुळे प्रकृतीला हे त्रासदायक असायचे. याशिवाय दररोजचे टेन्शन एखादा गफला झाला
आणि तो नजरेआड झाला तर पहिली कारवाई ओव्हरसिअरवर व्हायची.
मेल ओव्हरसिरची नोकरी बरेच
दिवस केल्यावर त्यांनी क्लार्कची परिक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली.
परंतु घोडे इंग्रजीशी अडू लागले कारण त्यांचे शिक्षण कौटुंबीक परिस्थिती मुळे कमी झाले होते. त्यामुळे
त्यांना इंग्रजीचा बाऊ वाटत असे.
पोस्टाच्या नियमाची सर्व पुस्तके त्या काळांत इंग्रजीतच असत. तेव्हा त्यांनी श्रीवर्धनचे चितळे मास्तर व्ही.
सी. जोशी सरांकडे इंग्रजी शिकणे सुरु केले. त्यांना या कामात माझ्या माहितीप्रमाणे
त्यावेळी श्रीवर्धन येथे असणारे पोस्टमास्तर वैद्य आणि कोल्हटकर यांनी मदत केली.
आणि त्यांना क्लार्कची परिक्षा देण्यास मनाने आणि अभ्यासाने तयार केले. यामधिल
वैद्यमास्तर हे श्रीवर्धन येथील पेशवे आळीतिलच होते. बंधू सांगायचे त्याप्रमाणे
एखाद्या वकिलाला जसे सर्व कायदे मुखोद्गत असावेत तसे वैद्य मास्तरांचे पोस्टाचे
नियम कोणत्या पुस्तकांत कोणत्या पानावर आहेत हे तोंड पाठ होते. अशा माणसाचे
बंधूंना पाठबळ होते म्हटल्यावर बंधू क्लार्कच्या परिक्षेचे शिवधनुष्य पेलणार नाहीत
असे होणारच नाही. अर्थातच बंधू पोस्टल क्लार्क झाले.
काही वर्षे क्लार्कचे काम
केल्यानंतर त्यांची बदली बोर्लीपंचतन येथे झाली. तेथे त्यांना भिसे साहेब पोस्टमास्तर
होते. भिसेमास्तर शिस्तप्रिय आणि सर्व नियमांची जाण असणारे होते. बंधूदेखिल त्याच
प्रवृत्तीचे होते त्यामुळे त्यांचे तेथे छान मेतकूट जुळले. नियमांच्या बारकाव्या वरुन
त्यांचे आणि भिसे साहेबांचे कधी वाद होत असत. परंतु त्यातुन त्या नियमांचे नव्याने
ज्ञान होत असे. तेथे अनेकवेळा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून स्वतंत्रपणाने काम
करण्याचा अनुभव बंधूंना मिळाला, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
त्यानंतर त्यांनी अनेक
वर्षे सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम केले. त्यात बागमांडला हे त्यांचे
अशाप्रकारचे पहिले ऑफिस. येथे त्यांचा स्वतंत्र संसार सुरु झाला. सुरवातिला
गाडग्या मडक्यांच्या सहाय्याने सुरु केलेला संसार पुढे भरभराटीला आला. तिथपर्यंत
माझा आणि त्यांचा परिचय नव्हता. मी पोस्टांत नोकरीला लागेपर्यंत पोस्टाशी देखिल
संबध नव्हता. मी जेव्हा पोस्टमन म्हणून श्रीवर्धन येथे हजर झालो तेव्हा बंधूंचा
मला अभिनंदनाचा फोन आला होता. ही त्यांची आणि माझी पहिली अप्रत्यक्ष भेट. त्यानंतर
त्यांची बदली श्रीवर्धन येथे झाली तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर
परिचय वाढत गेला. दरम्यान त्यांची दिवेआगर, म्हसळा येथे बदली झालेली होती. त्यानंतर
मी जेव्हा क्लार्कची परिक्षा पास झालो तेव्हा माझे पहिले पोस्टींग दिवेआगर येथे
झाले होते. त्यावेळी बंधू तिथे पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते.
दिवेआगरयेथे माझी
प्रमोशनवर बदली झाली परंतु आर्थिक परिस्थिती खालावली कारण श्रीवर्धन येथे स्वत:च्या घरात रहात होतो. पोस्टमन म्हणून कपडे, जोडे,
छत्री सर्व सरकारी मिळत असे. येथे त्याच्या उलट होते. पगार वाढला पस्तिस रुपये आणि
खर्च वाढला दोनशे रुपये. कारण घरभाडे आणि इतर खर्च वाढला होता. तेव्हा मला बंधूनी
खूप धीर दिला कारण तेही या परिस्थितीतुन गेले होते. त्यांनी दिवेआगर मध्ये अनेक
माणसे जोडली होती, लोकाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. बंधूंनी त्यांच्या
परिचयाचे आणि अगदी कुटूंबातिल एकच असल्यासारखे असणारे बाळ करमरकर उर्फ भाऊ
यांच्याकडे मला रहायला जागा मिळवुन दिली. ते घर पोस्टाच्या अगदी जवळ होते.
त्यानंतर करमरकर कुटूंबाचा परिचय खूप वाढला आणि आम्ही त्यांच्या कुटूंबातलेच एक
झालो.
केमनाईक, वाकणकर आणि
करमरकर यांचे जणू एक कुटूंबच तेथे स्थापित झाले होते. तेथे आम्ही प्रथम जिलेबी
तयार करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक वेळा आम्ही हा प्रयोग केला होता.
इतके की, तेथिल दुकानदार प्रकाश दातार त्यांच्या दुकानात गेल्यावर आम्हाला बरेच दिवसात जिलेबी झाली नाही कां? असे विचारायला लागले होते. आमच्या तिन कुटूंबाचा
अनेकवेळी एकत्र जेवणाचा कार्यक्रम होई. त्याला कोणतेच कारण लागत नसे. आले मनांत की
लगेचच अमलात आणले जाई.
बंधूच्याकडे मी पोस्टाच्या
कामा संदर्भात अनेक गोष्टी शिकलो. पोस्टाचे “अहर्निशं सेवा महे” हे ब्रीदवाक्य ते अक्षरश: जगत होते. वास्तविक दिवेआगर पोस्टाची वेळ सात
वाजता सुरु होई, परंतु ते सकाळी साडेसहालाच तयार होऊन कामावर हजर झालेले असत. त्याला
कारण होते तेथिल शाखा डाकघरांचे टपाल घेऊन जाणारी गाडी सकाळी साडे सहाला दिवेआगर
गावात जायची आणि सात वाजता परत फिरुन घेऊन जायची. या दिवेआगर गावात जाऊन परत
येण्याच्या काळात बंधू शाखा डाकघराकडून आलेला हिशेब तपासुन त्यात काही गफलत असेल
तर परत जाणाऱ्या टपालाबरोबर तसा निरोप द्यायचे.
सध्या स्वच्छ भारत या योजनेला खूप
प्रसिध्दी देण्यांत येत आहे. परंतु बंधू आपल्या कार्यालयात आणि त्याच्या परिसरात
स्वच्छते बाबत खूप दक्ष असत. कागदाचा अगदी छोटासा कपटा जरी पडलेला त्यांना दिसला
तरी ते तो स्वत:
उचलुन डस्टबीनमध्ये टाकीत असत. त्यामुळे व्हायचे काय की, दुसरा कोणी ऑफिसमध्ये
कचरा करताना कचरायचा. स्वत: साहेब कचरा उचलतायत हे बघितल्यावर सर्व स्टाफवर त्याचा
परिणाम व्हायचा. त्यामुळे बंधू असलेल्या ऑफिसमध्ये सर्व चकाचक असायचे. याची दखल
प्रशासकिय अधिकाऱ्यांनी देखिल घेतली होती. त्यांना दोनवेळा स्वच्छ कार्यालचाचा खास
पुरस्कार मिळाला होता.
कोणत्याही
कार्यालयामध्ये जशी स्वच्छता, उत्तम प्रशासन आवश्यक असते त्याचप्रमाणे दररोज
निर्माण होणारे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे देखिल अतिशय जरुरीचे असते. त्यामुळे
जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते त्वरीत मिळते. ठरावीक मुदतीनंतर पोस्ट ऑफिसमधिल
रेकॉर्ड बाद होत असते त्याचे वेळीच डिस्पोजल करणे हे देखिल तितकेच महत्वाचे असते.
हे काम करायला अनेकजण टाळाटाळ करीत असतात. नियमांची योग्य ज्ञान असेल ते सोपे
असते. त्यामुळे नविन तयार होणाऱ्या रेकॉर्डला जागा तयार होत असते. हे सर्व काम
बंधूच्या कार्यालयात अप टू डेट असायचे त्याबद्दल देखिल बंधूना प्रशासनाकडून पुरस्कार
मिळाला होता.
पोस्ट
खात्यात दर तिन वर्षांनी रिव्हीजन केस तयार करण्यांत येते. या रिव्हिजन केसचे
महत्व स्टाफच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीन देखिल खूप असते. कारण या रिव्हिजन
केस मधुनच त्या त्या पोस्टामधिल स्टाफची संख्या ठरत असते. असलेला स्टाफ टिकवणे
देखिल फार जिकिरीचे असते. कर्मचारी करत असलेल्या प्रत्येक कामाकरीता एक टाईम
फॅक्टर असतो. तो अगदी सेकंदात मोजला जातो. त्यामुळे अगदी डोळ्यांत तेल घालुन
रिव्हीजन केस बनवावी लागते. ती बनविण्या करीता आवश्वक असणाऱ्या खुब्या बंधूनी मला
दिवेआगर येथे त्यांच्या हाताखाली काम करीत असताना शिकवल्या.
पोस्टामध्ये
बऱ्याच वेळा स्टाफ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती असते. त्याला कारण ही रिव्हीजन
केस योग्य दक्षता न घेता बनविली जाणे हे होऊ शकते. अनेक वेळा टाईम फॅक्टर प्रमाणे पूर्ण
वेळ कर्मचारी बसत नसतो. तेव्हा असलेल्या कर्मचाऱ्यांनाचे ते जास्तिचे काम करावे
लागते. अशा वेळी अशी कामे जास्तवेळ बसुन करावी लागतात. कधी कधी त्याकामाकरीता
नियमात बसत असेल तर ओव्हरटाईम भत्ता मंजूर केला जातो. तो देखिल खूपच अल्प असतो.
परंतु त्याला देखिल टाईम फॅक्टर मध्ये बसवुन मंजूर करावा लागतो. ती सुध्दा एक कसरत
असे. या दोन गोष्टी बंधूनी मला उत्तम पध्दतीने शिकवल्या होत्या. त्यामुळे मी नंतर
श्रीवर्धन, गोरेगांव, दासगांव आणि पाली या ऑफिसच्या देखिल रिव्हीजन केसेसे बनवल्या
होत्या. त्या मी तयार करु शकलो याला बंधूंचे योग्य मार्गदर्शन हे एकमेव कारण होते.
अशाच प्रकारे पोस्टात एक किचकट काम असते ते
म्हणजे, मयत माणसाच्या वारसांना मयताच्या नावावर असलेली रक्कम अदा करणे. यात दोन
प्रकार असतात. वारस नेमलेला असेल तर आणि नसेल तर वेगळ्या पध्दतीने ही कागदपत्रे
तयार करावी लागायची. आमच्यामधले अनेकजण अशा केसेस टाळायच्या किंवा टोलवायचा
प्रयत्न करायचे. परंतु नियमांची योग्य जाण आणि व्यवहार यांचा समतोल साधुन अशा
प्रकारच्या केसेस कशा हाताळायच्या यांचे प्रात्यक्षिक बंधूंनी माझ्याकडून करवुन
घेतले. त्यामुळे भविष्यात मला अशा केसेस करताना अडचण आली नाही. विशेषत: मी जेव्हा दासगांवला बदलुन गेलो तेव्हा तेथे दरड
कोसळण्याची घटना नुकतीच घडली होती. तेथे प्राथमिक शाळेतिल मुलांची १५-२० खाती अशा
पध्दतीने बंद करायची होती. त्या प्रत्येक खात्यात अगदी किरकोळ रक्कम जमा होती.
परंतु त्या केसेस सहा सात महिने नुसत्याच टोलवल्या जात होत्या. माझ्या दिवेआगर
येथील अनुभवाच्या जोरावर मी त्या अगदी कमी कालावधित पूर्ण केल्या होत्या.
बंधूच्याकडे तेव्हा अनेक
प्रकारच्या पोस्टाच्या दैनंदिन व्यवहारात न लागणाऱ्या फॉर्मस् चा खजिना होता.
त्यामध्ये डुप्लिकेट पासबुक, डुप्लिकेट बचतपत्र मिळवण्याचा अर्जाचा फॉर्म, वारस
नेमणे, बदलणे या सारखे क्वचित लागणारे फॉर्म असायचे. अशा प्रकारचे जवळपास शंभर
प्रकारचे तरी फॉर्म त्यांच्या जवळ होते. ते फॉर्मस त्यांनी नंतर माझ्या ताब्यात
दिले होते. त्या अर्थाने मी बंधूचा पोस्ट ऑफिसमधिल वारस होतो. पुढे पालीला बदलुन
गेल्यावर मी त्याचे एक पी.डी.एफ्. मध्ये हँडबुक तयार केले व ते सर्व पोस्टाच्या
स्टाफला विनामूल्य उपलब्ध करुन दिले होते. या शिवाय याची सॉफ्ट कॉपी आजही नेटवर
उपलब्ध आहे.
बंधूंच्या मार्गदर्शनाखाली
मी पोस्टातील नियमांचे आणि निरनिराळ्या तक्त्यांचे माझ्या उपयोगाकरीता एक डायरी
तयार केली होती. ती नंतर मी सार्वजनिक केली. त्या डायरीत पोस्टाच्या काऊंटरवर काम
करताना किंवा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम करताना चांगला उपयोग होत असे. त्याचे
देखिल मी पोस्टल हँडबुक हे पुस्तक तयार केले. हे पुस्तक देखिल तेव्हा मी सर्वांना
मोफत उपलब्ध करुन दिले होते. त्याची देखिल सॉफ्टकॉपी नेटवर उपलब्ध आहे. त्या पाठिमागची मूळ कल्पना बंधूंचीच होती. अशा प्रकारे
बंधूची छाया माझ्या पौष्टीक(पोस्टातील कामकाजात) जीवनार पडलेली आहे.
दिवेआगर आणि बागमांडला हे
त्यांचे घरच होते. त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे या दोन्ही गावांत
असंख्य लोक होते. त्याला कारण ते नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असत. छोट्या
पोस्टांत कॅश मॅनेजमेंट हा मोठा जिकिरीचा विषय असायचा. परंतु बंधूच्या लोकांशी
असलेल्या घरगुती संबंधामुळे ते तो सहज सोडवायचे. त्याकाळात पोस्टामध्ये टारगेट हा
विषय नसायचा, परंतु जेव्हा ग्रामिण डाक जिवन विमा हा नवीन सेवेचा प्रकार सुरु झाला
तेव्हा त्याचे टारगेट देणे सुरु झाले. तेव्हा बंधूच्या मोठ्या भावाच्या भूमिकेची
खूपच मदत झाली. आम्हाला तेव्हा कोणाच्याही घरी न जाता आमचे टारगेट पूर्ण करता
यायचे. ते पोस्टाच्या बाहेरच्या बाकावर बसायचे तेव्हा तिथे अनेक जण यायचे त्यांची
चौकशी करता करता ते उत्पन्न किती खर्च किती असे एखाद्याला सहज विचारायचे. त्यातुन
शिल्ल्क रहाणारी रक्कम किती याचा हिशेब करुन त्याला पोस्टात खाते काढुन त्याला
बचतीची सवय लावायचे. असे तेथे अनेकजण होते.
अशा या माझ्या वडिल
बंधूंना आणि पोस्टातील गुरुंना माझा मानाचा मुजरा. त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो
ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा