शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

गुरु दक्षिणा भाग २

गुरु दक्षिणा

भाग २
आज दिनांक ३१ जुलै २०१६, आज वातावरण पूर्णपणे पावसाळी झाले आहे. कालपासुनच पाऊस अक्षरश: कोसळत होता. चिपळुण शहराच्या सखल भागात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. घनश्यामच्या मालकीचे परशुराम येथिल कोंकण रिसॉर्ट  कालपासुनच गजबजले होते. ठरल्याप्रमाणे १९९५ च्या परशुराम हायस्कूलच्या १०वीच्या वर्गातले ३५ पैकी ३३ विद्यार्थी कालच हजर झाले होते. त्यावेळच्या सहाध्यायांच्या बरोबरीने तेव्हा मुख्याद्यापक असलेले पेंडसे सर देखिल आपल्या नातवाला बरोबर घेऊन आवर्जुन आले होते. ते देखिल कोंकण रिसॉर्टवरच उतरले होते.
मानसी आपले पति डॉ. श्री माधवराव पाटील आणि मुलांसह आली होती. अतुलही पुण्याहून आपल्या पत्नीसह आला होता. अजयने आपली पत्नी मनालीसह दोन दिवस आधीच कोंकण रिसॉर्टवर मुक्काम ठोकला होता. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन त्याने आणि घनश्यामने मिळुन गेल्या दोन दिवसात फायनल केले होते. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सगळेजण हायस्कूलमध्ये त्यांच्या काळात असलेल्या शाळेच्या वेळेत पूर्णवेळ काढणार होते.
कोंकण रिसॉर्टच्या लॉनवर मोठा मांडव घातलेला होता. पावसापासुन संरक्षण व्हावे म्हणून वरती हिरव्या रंगाचे ट्रान्सपरंट पत्रे घातले होते. त्यामुळे मंडप तेथिल निसर्ग सौंदर्याशी अगदी मिसळुन गेला होता. आजुबाजुला गर्द हिरवाई होती जोडीला पावसाची बरसात सुरु होती. वातावरण एकदम कोंकणी होते. या मंडपातच चहा नाश्त्याची टेबल लावली होती. जमलेले सर्व वर्गमित्र आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते. सगळ्यांच्याच शारिरीक आणि सांपत्तीक स्थितीत खूपच फरक पडलेला होता.  हसत खेळत गप्पा मारत चहा नाश्ता झाल्यानंतर सर्वजण नियोजित कार्यक्रमासाठी परशुराम हायस्कूल कडे रवाना व्हायला सुरवात झाले.


*************

परशुराम हायस्कूल हे चिपळुण शहराच्या तसे एका बाजुलाच होते. एका छोट्याशा टेकडीवरील विस्तिर्ण आवारात ते पसरले होते. त्या टेकडीच्या माथ्यावरचा सर्व भाग हायस्कूलने व्यापला होता. शाळेत जाण्याकरीता वळणावळणाचा एक खास रस्ता तयार केलेला होता. जांभ्या दगडांच्या पाखाडीचा हा रस्ता आणि टेकडीच्या माथ्यावरची हायस्कूलची दोन मजली जांभ्या दगडांची इमारत लांबुन पाहीली खूप सुरेख दिसत असे. त्यातच कालपासुन तुफान पाऊस पडत असल्याने सर्व परिसर अगदी स्वच्छ दिसत होता. आजुबाजुच्या हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाल चूटुक रस्ता आणि लाल लाल दगडांची हायस्कूलची कावेने आणि चुन्याने रंगवलेली इमारत लोभसवाणी वाटत होती.
शाळेचे गेट नारळाच्या झावळ्यांनी आणि झेंडुच्या माळांनी सजविले होते. स्पीकरवर मंद आवाजात बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईचे सूर ऐकु येत होते. एकुणच सर्व वातावरण मंगलमय झाले होते. त्यातच कालपासुन मुसळधार पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतली होती आणि आकाशात सुर्यनारायणाने आपले दर्शन दिले होते. शाळेच्या आवारात सगळी लगबग सुरु होती. अजय, अतुल, मानसी आणि घनश्याम हे सर्व तयारी योग्य पद्धतीने झाली आहे का नाही याचा आढावा घेत होते. सर्व गोष्टींची खातरजमा करुन घेत होते.
बरोबर अकरा वाजता श्रीपती पवार यांनी शाळा भरण्याची घंटा वाजवली. श्रीपती पवार हे १९९५ मध्ये परशुराम हायस्कूल मध्ये शिपाई होते आणि तेच  त्यावेळी पहीली शाळा भरण्याची बेल वाजवत असत. पाच वर्षापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. सध्या ते आपल्या मुलाबरोबर पठाणकोट येथिल मिलिटरी कॅटोन्मेंट मध्ये रहातात. परंतु आजच्या कार्यक्रमाकरीता खास ते येथे आले होते. त्यांच्या बेल वाजवण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरवात झाली.
शाळेच्या गेटमध्ये हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक श्री आनंद लिमयेसर उभे होते. त्यांच्या बाजुलाच शाळेचा शिपाई चिन्मय गुलाबाच्या फुलांची करंडी घेऊन उभा होता. त्यावेळच्या शाळेच्या शिस्तीप्रमाणे सर्व माजी विद्यार्थी लाईनमध्ये शाळेत येण्याकरीता उभे होते. त्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचे लिमयेसर गुलाबाचे फुल देऊन स्वागत करीत होते. विद्यार्थ्यांच्या अगोदरच १९९५ साली दहावीच्या वर्गाला शिकवीणारे शिक्षक शाळेंत हजर झालेले होते. त्यांचेही स्वागत लिमये सरांनी पुष्पगुच्छ देऊन केले होते. सर्व माजी विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यावर त्यांना शाळेच्या साने गुरुजी सभागृहात जमा होण्याच्या सूचना देण्यांत आल्या.
आज साने गुरुजी सभागृह देखिल विशेष सजवले होते. व्यासपीठाच्या पाठीमागे सन १९९५ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे पहिले स्नेह संमेलन असा खास फ्लेक्स बोर्ड लावण्यांत आला होता. सर्व सभागृहाला विद्युत रोषणाई करण्यांत आली होती. सभागृहाच्या उजव्या कोप-यांत असणा-या साने गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला ताज्या सोनचाफ्याच्या फुलांचा हार घालण्यांत आला होता. त्याच प्रमाणे ज्यांच्या नांवाने हे हायस्कूल स्थापन करण्यांत आले होते त्या भगवान परशुरामांच्या हातात परशु धारण केलेल्या डाव्या कोप-यामध्ये स्थापन केलेल्या मूर्तीला देखिल खास  गेदेदार गुलाबाच्या फुलांचा भला मोठ्ठा हार घातला होता. त्या फुलांच्या सुगंधाचा घमघमाट  पूर्ण सभागृहात पसरला होता. सभागृहाच्या भिंतीवर हायस्कूलची स्थापना झाल्यापासुन दरवर्षी माध्यमिक शालांत परिक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांची छायाचित्र लावण्यांत आलेली होती. अर्थात शाळा जरी १९९० साली सुरु झाली असली तरी १० वीची पहिली बॅच १९९५ चीच होती. त्याच बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आज संपन्न होत होते.
सभागृहाच्या व्यासपीठावर १९९५ सालचे सर्व शिक्षक, त्यावेळचे मुख्याद्यापक श्री पेंडसेसर, सध्याचे मुख्याद्यापक श्री लिमयेसर, श्रीपती पवार, हायस्कूलच्या संचालक मंडळाचे सदस्य, सध्याचा शिक्षकवर्ग स्थानापन्न झाले होते. सर्वजण जागेवचर स्थानापन्न होताच मानसीने स्टेजवर असणारा माईक हातात घेतला आणि प्रथम स्वत:चा परिचय करुन दिला. मी डॉ. सौ. मानसी विजय नाईक, सध्या मी अलिबाग येथे माझे पती श्री विजय गजानन नाईक यांच्या जोडीने नाईक नर्सिंग होम चालवते. आज आपण याच हायस्कूल मधिल १९९५ सालच्या १०वीच्या वर्गातिल सर्व सहाध्यायी एकत्र जमलो आहोत. आपणा सर्वांचे स्वागत श्री लिमये सरांनी केलेच आहे. तरीही आपल्या ग्रुपतर्फे मी आपल्या सर्वांचे आपल्या शाळेंत स्वागत करीत आहे.
आजचा दिवस आपण आपले दैनंदीन आयुष्य विसरुन परत एकदा दहावीचे विद्यार्थी होऊया. म्हणूनच आपण सर्वजण शाळेची बेल होताच शाळेंत प्रवेश केला आहे. आपल्या शाळेच्या परंपरेप्रमाणे आता आपल्यापैकीच एक असणारी आणि सध्या गायक म्हणून टि.व्हीच्या अनेक चॅनेलवर झळकणारी आपली वर्गमैत्रीण उज्वला चिपळुणकर आपली पारंपारीक प्रार्थना सादर करणार आहे. आपण सर्वांनी विद्यार्थि म्हणून शांत चित्ताने उभे राहून ती प्रार्थना तिच्या सोबत मनातल्या मनांत म्हणूया. मी उज्वलाला विनंती करते की तिने स्टेजवर येऊन माईक आपल्या ताब्यांत घ्यावा. असे म्हणून माईक उज्वलाच्या हातात देऊन ती सर्व वर्गमित्रांच्यात जाऊन उभी राहीली.
उज्वलाने स्टेज वरील शिक्षकवर्गांला आदरपूर्वक नमस्कार करुन परशुराम हायस्कूल मध्ये दररोज प्रार्थना म्हणून म्हटले जाणारे वसंत बापट यांचे प्रसिद्ध गीत सादर करायला सुरवात केली. तिथे उपस्थित असणारे सर्वजण तिच्या सुराबरोबर ते गीत गुणगुणायला लागले.
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।१।।

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।२।।

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ।।३।।
प्रार्थना गायनाने सर्वजण एका वेगळ्याच विश्वात गेले. खरोखरच सर्व सहाध्यायी या प्रार्थनेने एकदम दहावीच्या वर्गातली मुले झाली. तेच सूत्र धरुन मानसीने परत कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. या प्रार्थनेनंतर ख-या अर्थाने संमेलनाला सुरवात झाली. मग मानसीने दुसरा माईक सभागृहातिल आपल्या सहाध्यायांकडे दिला व प्रत्येकाने आपापला सध्याच्या स्टेटस प्रमाणे परिचय करुन द्यावा म्हणून सुचवले.
माजी विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने आपला परिचय करुन दिला. त्यामुळे सर्वांनाच आपल्या वर्गबंधु-भगिनींचा वास्तविक परिचय झाला. आपले सहाध्यायी आज निरनिराळ्या क्षेत्रांत अग्रेसर असलेले ऐकुन प्रत्येकालाच धन्य वाटले. सर्व सहाध्यायांचा परिचय झाल्यानंतर परत मानसीने कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हातात घेतले. तिने अजय, अतुल आणि घनश्याम  मदतीसाठी स्टेजवर बोलावले. ते चौघेही फुलाच्या हारांच्या करंड्या आणि निरनिराळे बॉक्सेस घेऊन स्टेजवर हजर झाले. शाळेतिल शिपायाच्या मदतिने एका ताटात या चौघांनी बरोबर आणलेल्या वस्तु काढायला सुरवात केली.
आता मानसीने बोलायला सुरवात केली. आता आपल्या सर्व सहाध्यायांच्या वतीने आपण आपल्या गुरुजनांचा पुनर्परिचय करुन घेऊ आणि त्यांच्या बद्दलाची कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून त्यांना मानाची शाल आणि श्रीफळ अर्पण करुयात. मी अजयला विनंती करते की त्याने आपले मुख्याध्यापक श्री पेंडसेसर यांना आपली  कृतज्ञता म्हणून पुष्पहार, शाल, श्रीफळ अर्पण करावे तसेच त्यांना आपल्या या स्नेहसंमेलनाची आठवण म्हणून स्मृतिचिन्हही द्यावे. अजय त्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी केल्या व त्याने पेंडसेसरांना वाकुन नमस्कार केला तेव्हा पेंडसेसर आणि अजय या दोघांनाही आपल्या भावना आवरणे कठीण गेले. पेंडसे सरांनी अजयला अर्ध्यावरुनच वर उठवले व आपल्या मिठीत घेतले. दोघांनाही आपल्या डोळ्यांतील अश्रू आवरणे कठीण झाले. आणि मग त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला.
अजय १९९५ च्या बॅचचा टॉपर होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पेडसे सरांनी त्याला जास्तीत जास्त मदत करुन त्याच्या अंगातिल गुणांना प्रकट करण्याची संधी त्याला प्राप्त करुन दिली होती.
आता अतुलने माईक आपल्या हातात घेतला आणि मानसीला पेंडसे सरांच्या पत्नी सौ आकांक्षा पेंडसे यांचा सर्व सहाध्यायांच्या वतीने सत्कार करावा वर्असे सूचविले. सौ आकांक्षा पेंडसे मॅडम ह्या नुसत्या सरांच्या पत्नी म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या परिचयाच्या नव्हत्या तर त्यांच्या बरोबर सर्वांचे एक घरोब्याचे अनामिक नाते निर्माण झालेले होते. पेंडसे सर पुलंच्या चितळे मास्तरांप्रमाणेच आपल्या घरी विनामुल्य शिकवणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करायचे. त्या शिकवणीच्या वेळी ब-याचवेळा पेंडसे मॅडम या मुलांना गणित आणि सायन्स शिकवायच्या. कारण त्याही बी एस्सी फर्स्ट क्लास होत्या. एवढेच नाहीतर शिकवणीला येणा-या मुलांना त्या नेहमीच काहीतरी खाऊ द्यायच्याच.
मानसीने प्रथम पेंडसे मॅडमच्या गळ्यांत नाजुक बकुळीच्या फुलांचा हार घातला. त्यानंतर त्यांच्या हातात त्यांच्या गो-या रंगाला शोभेल अशी पैठणी आणि नारळ दिला. शेवटी पेढ्यांचा बॉक्स देऊन त्यांच्या वाकुन पाया पडली. तिलाही खूपच गहीवरुन आले परंतु तिने आणि पेंडसे मॅडम दोघांनीही मनाला आवर घातला.
अशाप्रकारे सर्व आजी आणि माजी गुरुजनांची कृतज्ञता व्यक्त करुन शेवटी घनश्यामच्या द्वारे श्री श्रीपती पवार यांचीही कृतज्ञता व्यक्त करण्यांत आली. परत एकदा मानसीने समारंभाचे सूत्रसंचालन आपल्या हातात घेतले. ती म्हणाली, तर माझ्या मित्र मैत्रिणींनो आता आपला वर्गबंधु घनश्याम आजच्या या आपल्या संमेलनाची संकल्पना कशी सूचली, ती प्रत्यक्षात कशी आणली आणि या संमेलनाच्या माध्यमातुन आपण काय करु शकतो या विषयी सविस्तर विवेचन करतिल.
त्यानंतर घनश्यामने स्टेजवर येऊन माईक आपल्या हातात घेतला. त्यानंतर त्याने अजय, अतुल आणि मानसी यांच्या सोबत आपण कसे भेटलो. बोलता बोलता या संमेलनाची कल्पना कशी पुढे आली. त्यानंतर व्हॉटस् अँप आणि फेसबुकच्या माध्यमातुन सगळ्यांशी संपर्क कसा झाला याचे सविस्तर कथन करुन शेवट आजचा समारंभ कसा आयोजित केला याचेही विवेचन केले. आता मुद्दा असा आहे की आपण सगळे क्लासमेट ब-याच वर्षांनी एकत्र आलो आहोत. त्या आपल्या एकत्र येण्याने आपल्याला काहीतरी भरीव करता येईल का? याचा आपल्याला विचार करायचा आहे. मी या शाळेचा नुसता माजी विद्यार्थीच नाहीतर मी शाळेचा एक संचालक देखिल आहे. आपण आपल्या विद्यार्थिदशेतल्या आठवणी परत अनुभवायच्या दृष्टीने एकत्र आलो आहोत. तो आनंद तर आपण घेत आहोत आणि परत परत घेत राहुया ही माझी मनापासुनची इच्छा आहे. त्या अर्थाने आजचे आपले हे पहिले संमेलन आहे. आपण असेच परत परत भेटत रहाणार आहोत.
आपले हे हायस्कूल सन १९९० मध्ये स्थापन झाले. सुरवातिला फक्त पाचवीचा वर्ग होता. त्यानंतर दरवर्षी एक एक वर्ग वाढत गेला. १९९५ साली दहावीची आपली पहीली बॅच माध्यमिक शालांत परिक्षेसाठी सज्ज झाली. दरम्यानच्या काळात भगवान परशुरामाच्या एका भक्ताने आपली सध्या ज्या टेकडीवर आपले हे हायस्कूल उभे आहे ती सर्व जमिन हायस्कूलला दान दिली. त्याच बरोबर इमारती साठी काही रोख रक्कमही दिली. त्या रक्कमेमध्ये लोकवर्गणीची भर घालुन ही इमारत तयार झाली आहे.
सध्याचे युग हे डिजीटल युग आहे. त्या दृष्टीने नवीन पिढीला त्याचे धडे शाळेंतुनच मिळायला हवेत. त्या करिता आपल्या हायस्कूलकडे सुसज्ज असे संगणकांचे संच अथवा लॅपटॉप हवे आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. आपण त्यात आपण आपला खारीचा वाटा उचलु शकतो काय? याचाही विचार आपण करुया. आपल्या हायस्कूल साठी, आपल्या पुढील पिढीसाठी आपण काहीतरी करायला पाहीजे. त्याकरीता आता आपण जेव्हा थोड्यावेळाने भोजनाकरीता एकत्र जमु तेव्हा यागोष्टीं संबधाने अनौपचारीक चर्चा करुया. आता आपण या सभागृहातिल कार्यक्रम स्थगित करुन आपल्या वर्गात एकत्र जमुया. आपल्या त्या वेळच्या बेंचवर बसुन थोडावेळ परत दहावीतले ते दिवस अनुभवुया. आता परत एकदा प्रार्थनेचा तास संपुन वर्गात जाण्याची बेल होईल. तेव्हा आता परत वर्गात भेटुया. प्रत्येकाने आपापले त्याकाळातले बेंच शोधुन त्यावर बसावे व पुन:प्रत्ययाचा आनंद घेऊया.
क्रमश: .....................
 जर ही कथा पुढे पाठवायची असेल तर नावासह पाठवावी.


**************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा