मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.


।।श्रीराम।।
मला भावलेले व्यक्तिमत्व:
विश्वनाथ विष्णू तथा राजाभाऊ मेहेंदळे.
लेखक- अनिल अनंत वाकणकर,
श्रीमंत पेशवे मार्ग,
श्रीवर्धन, जिल्हा- रायगड


            माझ्या आयुष्यात अनेक व्यक्ती आल्या आणि गेल्या. काही लक्षांत राहिल्या काही विस्मरणांत गेल्या. परंतु फारच थोड्या व्यक्ती अशा आहेत ज्यांनी मनांत कायमचे घर करुन ठेवले आहे. त्यातिलच एक व्यक्ती म्हणजे मेहेंदळे रावसाहेब. त्यांचे पूर्ण नांव आहे, विश्वनाथ विष्णू मेहेंदळे त्यांच्या परिचयाचे लोक त्यांना राजाभाऊ म्हणून ओळखत असत.
     त्याचे मूळगांव गणपतीपुळ्याजवळचे मालगुंड. हे गांव केशवसुतांचे गांव म्हणून प्रसिध्द आहे. सुरवातिला त्यांनी मालगुंड नजिक असणाऱ्या नांदिवडे येथे प्राथमिक शिक्षक किंवा त्याकाळातले शाळामास्तर म्हणून काम केले. त्यांनी त्याकाळात शिकवलेल्या त्यांच्या एका विद्यार्थ्याचीही माझी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची पोस्टखात्यात निवड झाली. त्याकाळात पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात जास्त पगार मिळत असे. असे म्हणतात त्याकाळी लोकांनी रिझर्व बँकेतली नोकरी सोडून पोस्टात नोकरी स्विकारली होती. पोस्ट ऑफिसमध्ये निवड झाल्यानंतर त्याचे ट्रेनिंग आणि सुरवातिचे पोस्टींग देखिल गुजराथमध्ये झाले होते.
     माझी त्यांची पहिली भेट झाली गोरेगांवच्या पोस्टांत. मी नुकताच श्रीवर्धनहून माणगांव येथे लिव्ह रिझर्व पोस्टमन म्हणून रुजु झालो होतो. मला पहिलेच डेप्युटेशन गोरेगांवचे आले होते. त्यावेळी गोरेगांव येथे मेहेंदळे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते. डेप्यूटेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला तेव्हा दैनंदिन भत्ता मिळत असे. मी तेव्हा माणगांव येथे नुकतीच खोली भाड्याने घेतली होती. त्यामुळे मी माणगांव गोरेगांव जाऊन येऊन करण्याचा विचार केला होता.
     मी गोरेगांव येथे हजर झाल्यावर त्याच दिवशी त्यांनी मला खडसावले होते. तुम्ही माणगांवला राहून गोरेगावचयेथे काम करणार आहात आणि भत्ताही घेणार आहात! तेव्हा मी कोणतेही सर्टिफिकेट देणार नाही. इथे रहायचे असेल तर त्याची सोय मी करु शकतो. पहिल्याच भेटीत त्यांनी दिलेला दम ऐकून मी खूपच घाबरलो होतो. कारण तेव्हा मला नोकरी लागुन जेमतेम सहा महिने झाले होते. परंतु नंतर त्यांचा परिचय झाला आणि त्यांचा सडेतोड स्वभाव हा  त्यांचा मुखवटा आहे हे लक्षांत आले. मेहेंदळे रावसाहेब कोणालाही कधीही मदतीला तत्पर असायचे. अनेकांचे आयुष्य त्यांनी मार्गी लावले आहे.

     त्यांचा माझा परिचय वाढला तो ते श्रीवर्धन पोस्टांत सब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यानंतर. त्यावेळी माझीही बदली परत श्रीवर्धनला झाली होती. तेव्हा माझी सर्व्हीस तिन वर्षे पूर्ण झाली होती. पोस्टाच्या नियमाप्रमाणे तिन वर्षे पूर्ण झाल्यावर प्रमोशन परिक्षा देता येत असे. मात्र त्या कर्मचाऱ्याला परमानंट अथवा क्वाझी परमानंट केलेले असणे गरजेचे होते. मेहेंदळे रावसाहेब हजर झाल्यावर त्यांनी माझी क्वाझी परमानंट केल्याची ऑर्डर काढली. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी परमानंटची ऑर्डर देखिल त्यांनीच काढली होती. जेव्हा प्रमोशन परिक्षा जाहिर झाली तेव्हा त्यांनी मला अभ्यास करण्याकरीता कामाच्या वेळेत सवलत तर दिलीच, त्याशिवाय त्यांनी मला असे सांगितले की,  त्याचे जिवश्च कंठश्च असणारे पेंडसे मास्तर महाड येथे प्रमोशन परिक्षेकरीता क्लास घेत आहेत तिकडे जा.
     त्या क्लासला जायचे म्हणजे महाड येथे रहाण्याची, जेवणाखाणाची सोय बघायला पाहिजे होती. याशिवाय जवळपास महिनाभर तेथे रहाण्याकरीता दामाजीपंतांची देखिल जरुरी होती. माझ्या या सगळ्या सबबी ऐकल्यावर त्यांनी माझी रहाण्याची, जेवणाची आणि पैशाची देखिल सोय केली. दुर्दैवाने मी त्यावेळी ती परिक्षा पास होऊ शकलो नाही. किंबहूना ते श्रीवर्धनला असे पर्यंत मी क्लार्क झालो नाही. परंतु या सर्व प्रसंगातुन त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन झाले. एखाद्याचे आयुष्य बनावे याकरीता त्यांच्या ठाई असणारी तळमळ दिसुन येत होती.
     ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते पेण येथे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आम्हाला करता आला नव्हता. ती इच्छा पूर्ण करण्याकरीता आम्ही जेव्हा दिवेआगर येथे श्री केमनाईक साहेबांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचाही सत्कार समारंभ करायचे ठरवले होते. हा समारंभ दिवेआगर येथे यज्ञेश्वर उर्फ भाऊ करमरकर यांचे मांडवात आयोजित केला होता. त्यावेळी श्रीवर्धन तालुक्यातिल त्यांच्या परिचयाचे अनेकजण हजर होते.


     ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेच वर्ष श्रीवर्धन येथेच रहात होते त्यामुळे त्यांच्याशी सतत संपर्क होता. ते नारायण पाखाडीत दादा टेमकर यांच्या घरात रहात होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर श्रीवर्धन येथे हळबे रावसाहेब पोस्टमास्तर म्हणून आले होते. त्यांना श्री शिवमहिम्न शिकायचे होते, माझेही अर्धे झालेले होते. तेव्हा आम्ही दोघे आणि आमच्या जोडीला मेहेंदळे साहेब देखिल मोरुतात्या उपाध्ये यांच्यकडे महिम्न शिकायला जायचो. तेव्हा दररोज संध्याकाळी आधी मेहेंदळे साहेबांकडे बैठक असायची त्यानंतर महिम्न. ते टेमकरांच्या घरांत रहात असताना अधिक महिना आला होतो. तेव्हा आम्ही (म्हणजे मी, माझी सौ., मेहेंदळे साहेब, मेहेंदळे बाई आणि सौ. गंद्रे) त्यांच्या घरी दासबोधाचे पारायण केले होते.
     कालांतराने मेहेंदळे बाई देखिल सेवानिवृत्त झाल्या आणि त्यांनी आपला मुक्काम लोणेऱ्याला स्वत:च्या घरात हलवला. मी देखिल प्रमोशन होऊन दिवेआगर, वाळवटी आणि श्रीवर्धन येथे क्लार्क अथवा सबपोस्टमास्तर म्हणून काम केले होते. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने मी माझी बदली गोरेगांव येथे करुन घेतली. तेव्हा परत आमचा मेहेंदळे साहेबांशी संपर्क झाला. त्यावेळी आम्ही मॉर्निंग वॉकला लोणेऱ्या पर्यंत जात असू. तेव्हा जाता येता कधीतरी त्यांची गाठ पडत असे. विशेष म्हणजे गोरेगांव येथे आम्ही आमचे बिऱ्हाड मेहेंदळे साहेब पूर्वी जेथे रहात असत त्या बबन मोने यांच्या घरांतच केले होते. मेहेंदळे साहेब जवळपास दररोजच गोरेगांव येथे येत असत त्यामुळे त्यांची रोजच भेट होत असे.
     केदारला लोणेरे येथिल बाटु मध्ये डिप्लोमा करीता प्रवेश घेतला होता. त्याचा डिप्लोमा पुरा झाल्यावर त्याचे कँपस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाले होते. ही गोष्ट मेहेंदळे साहेबांना समजली तेव्हा ते ताबडतोब माझ्या घरी आले आणि केदारला नोकरी न करता डिग्री पूर्ण कर असे निक्षुन सांगितले. त्यावर आम्ही गोलमाल बोलल्यावर, त्यांनी पैशाची अडचण आहे कां असे स्पष्ट विचारले. तेव्हा पैशाचा प्रश्न नाही आणि जरुर वाटली तर बँकेतुन लोन घेता येईल असे म्हटले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा विनय याच्याशी बातचित करुन एक प्रस्ताव माझे समोर ठेवला होता. त्यांनी मला केदारच्या डिग्री करीता लागणारे पैसे बँकेतुन न घेता ते देणार आहेत असे बजावले. त्यांनी विनयला असेही सांगितले होते की, मी जरी नसलो तरी केदारचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणारी रक्कम तो देईल. सुदैवाने मला त्यांच्याकडून पैसे घेण्याची वेळ आली नाही. परंतु त्यांनी ते असोत अथवा नसोत केदारच्या शिक्षणाकरीता लागणाऱ्या पैशाची तरतूद केली होती. ही गोष्ट त्यांचा मनाचा मोठेपणा आणि परोपकारी वृत्ती दाखवत होती.  अशाच प्रकारे त्यांनी अनेकांना मदत केली होती.
     पुढे त्यांची पंचाहत्तरी गोरेगांव येथे आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी त्यांनी त्यांना अती प्रिय असणारा तंबाखु सोडला होता. त्याचप्रमाणे यापुढे अंगाला सोने लावणार नाही हा देखिल निर्धार त्यांनी केला होता. लोणेऱ्याला असताना मी अनेकदा पोस्टाच्या कामासंदर्भात त्यांचा सल्ला घ्यायला जात असे. गोरेगांवहून नंतर माझी बदली दासगांव येथे पोस्टमास्तर म्हणून झाली. ती बदली मी केवळ गोरेगांव येथुन जाऊन येउन करता येईल म्हणून मी स्विकारली होती. मला साहेब तिथे जाण्यापेक्षा दुसरे सेफ ऑफिस देतो म्हणून सांगत होते. त्याला कारण असे होते, दासगांवला पैशांची अफरातफर झालेली होती. त्यामुळे तेथे अगदी डोळ्यांत तेल घालुन काम करणे आवश्यक होते.  त्यावेळी मला मेहेंदळे साहेबांची खूपच मदत झाली. त्यावेळी मी दररोज लोणेरे येथे त्यांच्याकडे थांबुन दासगांव येथे दिवसभरांत झालेल्या सर्व घटनांबाबत मी त्यांच्याशी चर्चा करुन त्याचा सल्ला घेऊन काम करीत असे. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे मी दासगांवचे शिवधनुष्य पेलू शकलो.
     या ठिकाणी त्यांची एक आठवण आवर्जुन सांगाविशी वाटते. ते नियम आणि व्यवहार यांची सांगड घालुन काम करीत असत. ते श्रीवर्धन येथे कार्यरत असताना एका गावांत जवळपास साठ सत्तर आर्.डी. खात्यांची मुदत संपल्याने त्या लोकांना एका दिवशी रक्कम अदा करायची होती. त्या सर्व खातेदारांनी श्रीवर्धन येथे येण्याकरीताचा वेळ आणि पैसे खर्च करुन येण्याऐवजी त्यांना त्यांच्या गावात जाऊन रक्कम वाटप करण्याची योजना श्री मेहेंदळे साहेब यांनी केली होती. त्याकरीता आवश्यक असणाऱ्या तरतुदी त्यांनी केल्या आणि त्या खातेदारांना सर्व रक्कम त्यांच्या गावांत जाऊन अदा केली होती. या मध्ये कोणाचेही नुकसान नव्हते की फायदा. परंतु ही गोष्ट नियमाविरुध्द होती. या गोष्टीचा लेखी रिपोर्ट आमच्याचपैकी एकाने साहेबांना केला होता. या व्यवहारांत खातेदारांची सोय झाली परंतु मधल्या मधे मेहेंदळे साहेबांना खात्यामार्फत चौकशीला सामोरे जावे लागले त्यातुन त्यांना किरकोळ शिक्षा देखिल झाली होती.
     श्रीवर्धन पोस्टांत सन १९८० पासुन सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. हा कार्यक्रम ऑफिस स्टाफ आणि त्यांचे कुटूंबीय मिळून साजरा करतात. मेहेंदळे साहेब श्रीवर्धनला येण्यापूर्वी हा कार्यक्रम अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जात असे. मेहेंदळे साहेब पोस्टमास्तर म्हणून हजर झाल्यावर पहिल्याच वर्षी सत्यनारायणाची पूजा साजरी करण्याचा विषय आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सर्वांना सांगितले, हा कार्यक्रम जर बंद करायचा असेल तर तुम्ही तसे करु शकता त्याकरीता मी परवानगी देत नाही असे जाहिर केले तरी चालेल. परंतु जर चालू ठेवायची असेल तर ती परत बंद करुन चालणार नाही. परंतु सर्वांनी ही परंपरा चालू ठेवायचीच असे सांगितले. त्यानंतर मात्र हा पूजेचा कार्यक्रम हा एक सोहळाच व्हायला लागला. परंपरेप्रमाणे आदल्या रात्री सर्व ऑफिस धुण्यापासुन पूजेच्या दिवशी रात्री भजनाची बारी होई पर्यंत सर्व स्टाफ मनापासुन भाग घेत असे. अशाप्रकारचे कार्यक्रम साजरा करण्याकरीता मॉनेटरची भूमिका महत्वाची असते. ती भूमिका मेहेंदळे साहेब तन, मन, धन खर्च करुन निभावायचे. त्यावेळी त्यांचा उत्साह एवढा असायचा की, जेवण तयार करण्याकरीता इंधन जमा करण्यापासुन ते भाजी, आमटी फोडणीला टाकेपर्यंत त्यांचा सहभाग असे. त्यांचा तो उत्साह पाहून सर्वांचाच उत्साह वाढत असे.
     अशा या जगमित्र असणाऱ्या मेहेंदळे साहेबांचे निधन झाल्याचा फोन त्यांची मुलगी वीणा हीने केला होता. त्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रध्दांजली वहावी असे ठरवले होते. हे लेखन ही त्यांना वाहिलेली माझी श्रध्दांजलीच आहे. ते माणूस म्हणून किती मोठे होते याचा अनुभव त्यांचा सहवास लाभलेलेच जाणतात. मालगुंड येथिल नारळाप्रमाणेच ते वरुन कठोर आणि अंतर्यामी मधाळ, स्निग्ध असे होते. त्यांना माझी ही आदरांजली!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

जयंत जयराम उर्फ बंधू केमनाईक



मला भावलेल्या व्यक्ती
जयंत जयराम उर्फ बंधू केमनाईक



     मला भेटलेल्या आणि भावलेल्या व्यक्तीमत्वांचे चित्रण करायचा मी प्रयत्न करीत आहे. आज मी अशा एका व्यक्तीची माहिती सांगणार आहे, जिने आयुष्यभर कष्टच केले आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वागविले. ते आहेत माझे क्लार्कच्या नोकरीतले पहिले गुरु. त्याचे नांव आहे, जयंत जयराम केमनाईक. त्यांना संबोधन मात्र बंधू असे आहे. बंधू म्हणजे अर्थातच मोठा भाऊ. मोठ्याभावाला नेहमी कर्तव्यच करायचे असते. आपल्या लहान भावंडांची काळजी घेणे त्यांच्या अडीनडीला धाऊन जाणे हिच भूमिका त्यांनी कायम निभावली. त्याकरीता ती भावंडे रक्ताचीच असायची जरुरी नाही. त्यांना बंधू म्हणून मानणारी सर्वच त्यांची भावंडे होती.
     त्यांचे आतापर्यंतचे सर्व आयुष्य जबाबदाऱ्या सांभाळण्यातच गेले. आता कोठे चार सुखाचे समाधानाचे दिवस आले तेव्हा त्यांच्या प्रकृतीने दगा दिला आहे. त्यांनी आपले तन आणि मन पोस्टाच्या सेवेला वाहिलेले होते. त्यांच्या नोकरीची सुरवात बॉय मेसेंजर या पदाने झाली. त्याकाळात आलेल्या तारा(Telegrams) वाटपा करीता १६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांची नेमणूक करीत असत. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ते रेग्युलर पोस्टमन म्हणून काम करु लागले. त्याकाळात पोस्टात कामावर जाण्याकरीता परिक्षा वगैरे द्याव्या लागत नसत. कारण तेव्हा पोस्टात कामाला माणसेच मिळत नसत. आपल्या ओळखितील लोकांना पोस्टात चिकटवत असत.
     त्या काळांत पोस्टामध्ये व्हीलेज पोस्टमन म्हणून काही जागा असत. त्यांना आठवड्याची बीट असे. श्रीवर्धन येथे देखिल तेव्हा व्हीलेज पोस्टमनची पोस्ट होती. त्याची कामगीरी सोमवारी सुरु होत असे. सोमवारी मुख्यालयातुन आपली सर्व कामगिरी म्हणजेच पत्रे, मनीऑर्डर, रजी पत्रे इ. ताब्यात घेऊन त्याचप्रमाणे मनी ऑर्डर पेमेंट करीता लागणारी कॅश घेऊन व्हीलेज पोस्टमन निघत असे. पहिल्या दिवशी चालत चालत श्रीवर्धन दांडे येथिल तरीने कुरवडे, काळींजे, सायगाव पर्यंत पत्रे वगैर वाटत, पेमेंट करत, त्या त्या गावांमधिल पाठवायची पत्रे गोळा करत तो सायगांव येथे वस्ती करत असे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी निगडी, निवळा, गालसुर, बापवन, रानवली या गावांचे टपाल वाटुन व जमा करुन रानवली येथे वस्ती करीत असे. तिसऱ्या दिवशी  बुधवारी जसवली, भट्टीचा माळ येथिल टपाल वाटून व गोळा करुन तिन दिवसात केलेल्या कामगिरीचा हिशेब द्यायला श्रीवर्धन येथे येत असे. त्यानंतर गुरुवारी परत सोमवार प्रमाणेच सर्व कामगिरी ताब्यात घेऊन वाळवटी, आरावी, कोंडवीली, शेखाडी, चिखलप, शिरवणे, मामवली, गुळधे, या विभागातिल टपाल वितरण आणि जमा करणे ही कामगीरी शनिवार पर्यंत करुन हिशेब द्यायला शनिवारी श्रीवर्धनच्या पोस्टांत हजर होत असे. अशी ही सात दिवसांची व्हीलेज बीट देखिल बंधूनी बदली कामगार म्हणून केली होती.  पोस्टमनच्या नोकरी पुरेशी झाल्यावर त्यांनी मेल ओव्हरसिअरचे काम स्विकारले. हे काम म्हणजे मोठ्या जबाबदारीचे काम होते. शाखा डाकघरांची नियमित तपासणी करणे ही मुख्य जबाबदारी मेल ओव्हरसिअरची असायची. जर एखाद्या शाखा डाकपालाने काही गफला केला तर त्याची पहिली जबाबदारी मेल ओव्हरसिअरवर थोपवली जायची.
     त्याकाळात सर्व पत्रव्यवहार पोस्टानेच होई. कोणी जन्माला आले किंवा कोणी मरण पावले तर ती बातमी पत्रानेच समजायची. त्यामुळे पत्रांच्या वितरणावर पोस्ट खात्याची बारीक नजर असायची. एक आण्याला मिळणारे पोस्टकार्ड जर नियत काळापेक्षा उशिरा वितरीत झाल्याचे सिध्द झाले तर त्याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ कामावरुन निलंबित करण्यात येत असे. अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे अधिकार तेव्हा ओव्हरसिअरला देखिल असत.
     शाखा डाकपालांचे दैनंदिन हिशेब तपासणे, पोस्टाच्या बचत खात्यांच्या खातेदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटून त्यांच्या पासबुकांची तपासणी करणे आणि त्यात काही गफलत असेल तर तसा रिपोर्ट करुन योग्य ती कार्यवाही करणे, खेडोपाडी जाऊन तेथिल लेटर बॉक्स वेळेवर उघडले जातात का नाही ते तपासणे, शाखा डाकघरांतुन वितरणाला जाणाऱा कर्मचारी नियमितपणे खेडेगावांना भेट देतो की नाही हे तपासणे अशी अनेक जबाबदारीची कामे ओव्हरसिअरला करावी लागत असत. त्याच्या पोस्टचे नांव ओव्हरसिअर असले तरी तो वठवित असलेली भूमिका इन्स्पेक्टरचीच असायची. फार तर सब इन्स्पेक्टर म्हणूया. हे जबाबदारीचे काम बंधूंनी समर्थपणाने पेलले. या कामामध्ये रोजचा प्रवास, रोज नवे नांव, रोज वेगळे पाणी, वेगळे जेवण यामुळे प्रकृतीला हे त्रासदायक असायचे. याशिवाय दररोजचे टेन्शन एखादा गफला झाला आणि तो नजरेआड झाला तर पहिली कारवाई ओव्हरसिअरवर व्हायची.   
     मेल ओव्हरसिरची नोकरी बरेच दिवस केल्यावर त्यांनी क्लार्कची परिक्षा देण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली. परंतु घोडे इंग्रजीशी अडू लागले कारण त्यांचे शिक्षण कौटुंबीक परिस्थिती मुळे कमी झाले होते. त्यामुळे त्यांना इंग्रजीचा  बाऊ वाटत असे. पोस्टाच्या नियमाची सर्व पुस्तके त्या काळांत इंग्रजीतच असत. तेव्हा त्यांनी श्रीवर्धनचे चितळे मास्तर व्ही. सी. जोशी सरांकडे इंग्रजी शिकणे सुरु केले. त्यांना या कामात माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी श्रीवर्धन येथे असणारे पोस्टमास्तर वैद्य आणि कोल्हटकर यांनी मदत केली. आणि त्यांना क्लार्कची परिक्षा देण्यास मनाने आणि अभ्यासाने तयार केले. यामधिल वैद्यमास्तर हे श्रीवर्धन येथील पेशवे आळीतिलच होते. बंधू सांगायचे त्याप्रमाणे एखाद्या वकिलाला जसे सर्व कायदे मुखोद्गत असावेत तसे वैद्य मास्तरांचे पोस्टाचे नियम कोणत्या पुस्तकांत कोणत्या पानावर आहेत हे तोंड पाठ होते. अशा माणसाचे बंधूंना पाठबळ होते म्हटल्यावर बंधू क्लार्कच्या परिक्षेचे शिवधनुष्य पेलणार नाहीत असे होणारच नाही. अर्थातच बंधू पोस्टल क्लार्क झाले.
     काही वर्षे क्लार्कचे काम केल्यानंतर त्यांची बदली बोर्लीपंचतन येथे झाली. तेथे त्यांना भिसे साहेब पोस्टमास्तर होते. भिसेमास्तर शिस्तप्रिय आणि सर्व नियमांची जाण असणारे होते. बंधूदेखिल त्याच प्रवृत्तीचे होते त्यामुळे त्यांचे तेथे छान मेतकूट जुळले. नियमांच्या बारकाव्या वरुन त्यांचे आणि भिसे साहेबांचे कधी वाद होत असत. परंतु त्यातुन त्या नियमांचे नव्याने ज्ञान होत असे. तेथे अनेकवेळा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून स्वतंत्रपणाने काम करण्याचा अनुभव बंधूंना मिळाला, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
     त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम केले. त्यात बागमांडला हे त्यांचे अशाप्रकारचे पहिले ऑफिस. येथे त्यांचा स्वतंत्र संसार सुरु झाला. सुरवातिला गाडग्या मडक्यांच्या सहाय्याने सुरु केलेला संसार पुढे भरभराटीला आला. तिथपर्यंत माझा आणि त्यांचा परिचय नव्हता. मी पोस्टांत नोकरीला लागेपर्यंत पोस्टाशी देखिल संबध नव्हता. मी जेव्हा पोस्टमन म्हणून श्रीवर्धन येथे हजर झालो तेव्हा बंधूंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. ही त्यांची आणि माझी पहिली अप्रत्यक्ष भेट. त्यानंतर त्यांची बदली श्रीवर्धन येथे झाली तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर परिचय वाढत गेला. दरम्यान त्यांची दिवेआगर, म्हसळा येथे बदली झालेली होती. त्यानंतर मी जेव्हा क्लार्कची परिक्षा पास झालो तेव्हा माझे पहिले पोस्टींग दिवेआगर येथे झाले होते. त्यावेळी बंधू तिथे पोस्टमास्तर म्हणून काम पहात होते.
     दिवेआगरयेथे माझी प्रमोशनवर बदली झाली परंतु आर्थिक परिस्थिती खालावली कारण श्रीवर्धन येथे स्वत:च्या घरात रहात होतो. पोस्टमन म्हणून कपडे, जोडे, छत्री सर्व सरकारी मिळत असे. येथे त्याच्या उलट होते. पगार वाढला पस्तिस रुपये आणि खर्च वाढला दोनशे रुपये. कारण घरभाडे आणि इतर खर्च वाढला होता. तेव्हा मला बंधूनी खूप धीर दिला कारण तेही या परिस्थितीतुन गेले होते. त्यांनी दिवेआगर मध्ये अनेक माणसे जोडली होती, लोकाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. बंधूंनी त्यांच्या परिचयाचे आणि अगदी कुटूंबातिल एकच असल्यासारखे असणारे बाळ करमरकर उर्फ भाऊ यांच्याकडे मला रहायला जागा मिळवुन दिली. ते घर पोस्टाच्या अगदी जवळ होते. त्यानंतर करमरकर कुटूंबाचा परिचय खूप वाढला आणि आम्ही त्यांच्या कुटूंबातलेच एक झालो.
     केमनाईक, वाकणकर आणि करमरकर यांचे जणू एक कुटूंबच तेथे स्थापित झाले होते. तेथे आम्ही प्रथम जिलेबी तयार करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक वेळा आम्ही हा प्रयोग केला होता. इतके की, तेथिल दुकानदार प्रकाश दातार त्यांच्या दुकानात गेल्यावर  आम्हाला बरेच दिवसात जिलेबी झाली नाही कां? असे विचारायला लागले होते. आमच्या तिन कुटूंबाचा अनेकवेळी एकत्र जेवणाचा कार्यक्रम होई. त्याला कोणतेच कारण लागत नसे. आले मनांत की लगेचच अमलात आणले जाई.
     बंधूच्याकडे मी पोस्टाच्या कामा संदर्भात अनेक गोष्टी शिकलो. पोस्टाचे अहर्निशं सेवा महे हे ब्रीदवाक्य ते अक्षरश: जगत होते. वास्तविक दिवेआगर पोस्टाची वेळ सात वाजता सुरु होई, परंतु ते सकाळी साडेसहालाच तयार होऊन कामावर हजर झालेले असत. त्याला कारण होते तेथिल शाखा डाकघरांचे टपाल घेऊन जाणारी गाडी सकाळी साडे सहाला दिवेआगर गावात जायची आणि सात वाजता परत फिरुन  घेऊन जायची. या दिवेआगर गावात जाऊन परत येण्याच्या काळात बंधू शाखा डाकघराकडून आलेला हिशेब तपासुन त्यात काही गफलत असेल तर परत जाणाऱ्या टपालाबरोबर तसा निरोप द्यायचे.
            सध्या स्वच्छ भारत या योजनेला खूप प्रसिध्दी देण्यांत येत आहे. परंतु बंधू आपल्या कार्यालयात आणि त्याच्या परिसरात स्वच्छते बाबत खूप दक्ष असत. कागदाचा अगदी छोटासा कपटा जरी पडलेला त्यांना दिसला तरी ते तो स्वत: उचलुन डस्टबीनमध्ये टाकीत असत. त्यामुळे व्हायचे काय की, दुसरा कोणी ऑफिसमध्ये कचरा करताना कचरायचा. स्वत: साहेब कचरा उचलतायत हे बघितल्यावर सर्व स्टाफवर त्याचा परिणाम व्हायचा. त्यामुळे बंधू असलेल्या ऑफिसमध्ये सर्व चकाचक असायचे. याची दखल प्रशासकिय अधिकाऱ्यांनी देखिल घेतली होती. त्यांना दोनवेळा स्वच्छ कार्यालचाचा खास पुरस्कार मिळाला होता.
     कोणत्याही कार्यालयामध्ये जशी स्वच्छता, उत्तम प्रशासन आवश्यक असते त्याचप्रमाणे दररोज निर्माण होणारे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे देखिल अतिशय जरुरीचे असते. त्यामुळे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते त्वरीत मिळते. ठरावीक मुदतीनंतर पोस्ट ऑफिसमधिल रेकॉर्ड बाद होत असते त्याचे वेळीच डिस्पोजल करणे हे देखिल तितकेच महत्वाचे असते. हे काम करायला अनेकजण टाळाटाळ करीत असतात. नियमांची योग्य ज्ञान असेल ते सोपे असते. त्यामुळे नविन तयार होणाऱ्या रेकॉर्डला जागा तयार होत असते. हे सर्व काम बंधूच्या कार्यालयात अप टू डेट असायचे त्याबद्दल देखिल बंधूना प्रशासनाकडून पुरस्कार मिळाला होता. 
     पोस्ट खात्यात दर तिन वर्षांनी रिव्हीजन केस तयार करण्यांत येते. या रिव्हिजन केसचे महत्व स्टाफच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीन देखिल खूप असते. कारण या रिव्हिजन केस मधुनच त्या त्या पोस्टामधिल स्टाफची संख्या ठरत असते. असलेला स्टाफ टिकवणे देखिल फार जिकिरीचे असते. कर्मचारी करत असलेल्या प्रत्येक कामाकरीता एक टाईम फॅक्टर असतो. तो अगदी सेकंदात मोजला जातो. त्यामुळे अगदी डोळ्यांत तेल घालुन रिव्हीजन केस बनवावी लागते. ती बनविण्या करीता आवश्वक असणाऱ्या खुब्या बंधूनी मला दिवेआगर येथे त्यांच्या हाताखाली काम करीत असताना शिकवल्या.
     पोस्टामध्ये बऱ्याच वेळा स्टाफ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती असते. त्याला कारण ही रिव्हीजन केस योग्य दक्षता न घेता बनविली जाणे हे होऊ शकते. अनेक वेळा टाईम फॅक्टर प्रमाणे पूर्ण वेळ कर्मचारी बसत नसतो. तेव्हा असलेल्या कर्मचाऱ्यांनाचे ते जास्तिचे काम करावे लागते. अशा वेळी अशी कामे जास्तवेळ बसुन करावी लागतात. कधी कधी त्याकामाकरीता नियमात बसत असेल तर ओव्हरटाईम भत्ता मंजूर केला जातो. तो देखिल खूपच अल्प असतो. परंतु त्याला देखिल टाईम फॅक्टर मध्ये बसवुन मंजूर करावा लागतो. ती सुध्दा एक  कसरत असे. या दोन गोष्टी बंधूनी मला उत्तम पध्दतीने शिकवल्या होत्या. त्यामुळे मी नंतर श्रीवर्धन, गोरेगांव, दासगांव आणि पाली या ऑफिसच्या देखिल रिव्हीजन केसेसे बनवल्या होत्या. त्या मी तयार करु शकलो याला बंधूंचे योग्य मार्गदर्शन हे एकमेव कारण होते.
      अशाच प्रकारे पोस्टात एक किचकट काम असते ते म्हणजे, मयत माणसाच्या वारसांना मयताच्या नावावर असलेली रक्कम अदा करणे. यात दोन प्रकार असतात. वारस नेमलेला असेल तर आणि नसेल तर वेगळ्या पध्दतीने ही कागदपत्रे तयार करावी लागायची. आमच्यामधले अनेकजण अशा केसेस टाळायच्या किंवा टोलवायचा प्रयत्न करायचे. परंतु नियमांची योग्य जाण आणि व्यवहार यांचा समतोल साधुन अशा प्रकारच्या केसेस कशा हाताळायच्या यांचे प्रात्यक्षिक बंधूंनी माझ्याकडून करवुन घेतले. त्यामुळे भविष्यात मला अशा केसेस करताना अडचण आली नाही. विशेषत: मी जेव्हा दासगांवला बदलुन गेलो तेव्हा तेथे दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली होती. तेथे प्राथमिक शाळेतिल मुलांची १५-२० खाती अशा पध्दतीने बंद करायची होती. त्या प्रत्येक खात्यात अगदी किरकोळ रक्कम जमा होती. परंतु त्या केसेस सहा सात महिने नुसत्याच टोलवल्या जात होत्या. माझ्या दिवेआगर येथील अनुभवाच्या जोरावर मी त्या अगदी कमी कालावधित पूर्ण केल्या होत्या.
     बंधूच्याकडे तेव्हा अनेक प्रकारच्या पोस्टाच्या दैनंदिन व्यवहारात न लागणाऱ्या फॉर्मस् चा खजिना होता. त्यामध्ये डुप्लिकेट पासबुक, डुप्लिकेट बचतपत्र मिळवण्याचा अर्जाचा फॉर्म, वारस नेमणे, बदलणे या सारखे क्वचित लागणारे फॉर्म असायचे. अशा प्रकारचे जवळपास शंभर प्रकारचे तरी फॉर्म त्यांच्या जवळ होते. ते फॉर्मस त्यांनी नंतर माझ्या ताब्यात दिले होते. त्या अर्थाने मी बंधूचा पोस्ट ऑफिसमधिल वारस होतो. पुढे पालीला बदलुन गेल्यावर मी त्याचे एक पी.डी.एफ्. मध्ये हँडबुक तयार केले व ते सर्व पोस्टाच्या स्टाफला विनामूल्य उपलब्ध करुन दिले होते. या शिवाय याची सॉफ्ट कॉपी आजही नेटवर उपलब्ध आहे.   
     बंधूंच्या मार्गदर्शनाखाली मी पोस्टातील नियमांचे आणि निरनिराळ्या तक्त्यांचे माझ्या उपयोगाकरीता एक डायरी तयार केली होती. ती नंतर मी सार्वजनिक केली. त्या डायरीत पोस्टाच्या काऊंटरवर काम करताना किंवा सिंगल हँडेड पोस्टमास्तर म्हणून काम करताना चांगला उपयोग होत असे. त्याचे देखिल मी पोस्टल हँडबुक हे पुस्तक तयार केले. हे पुस्तक देखिल तेव्हा मी सर्वांना मोफत उपलब्ध करुन दिले होते. त्याची देखिल सॉफ्टकॉपी नेटवर उपलब्ध आहे.  त्या पाठिमागची मूळ कल्पना बंधूंचीच होती. अशा प्रकारे बंधूची छाया माझ्या पौष्टीक(पोस्टातील कामकाजात) जीवनार पडलेली आहे.
     दिवेआगर आणि बागमांडला हे त्यांचे घरच होते. त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे या दोन्ही गावांत असंख्य लोक होते. त्याला कारण ते नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असत. छोट्या पोस्टांत कॅश मॅनेजमेंट हा मोठा जिकिरीचा विषय असायचा. परंतु बंधूच्या लोकांशी असलेल्या घरगुती संबंधामुळे ते तो सहज सोडवायचे. त्याकाळात पोस्टामध्ये टारगेट हा विषय नसायचा, परंतु जेव्हा ग्रामिण डाक जिवन विमा हा नवीन सेवेचा प्रकार सुरु झाला तेव्हा त्याचे टारगेट देणे सुरु झाले. तेव्हा बंधूच्या मोठ्या भावाच्या भूमिकेची खूपच मदत झाली. आम्हाला तेव्हा कोणाच्याही घरी न जाता आमचे टारगेट पूर्ण करता यायचे. ते पोस्टाच्या बाहेरच्या बाकावर बसायचे तेव्हा तिथे अनेक जण यायचे त्यांची चौकशी करता करता ते उत्पन्न किती खर्च किती असे एखाद्याला सहज विचारायचे. त्यातुन शिल्ल्क रहाणारी रक्कम किती याचा हिशेब करुन त्याला पोस्टात खाते काढुन त्याला बचतीची सवय लावायचे. असे तेथे अनेकजण होते.
     अशा या माझ्या वडिल बंधूंना आणि पोस्टातील गुरुंना माझा मानाचा मुजरा. त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.  

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

शिवथर घळ सुंदरमठ एक अनुभव


।। श्रीराम ।।
शिवथर घळ सुंदरमठ एक अनुभव


अनिल अनंत वाकणकर,
श्रीमंत पेशवे मार्ग,
श्रीवर्धन, जिल्हा रायगड
            महाडाहून भोरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बारसगांव फाट्यावरुन आतमध्ये गेले की, सर्वत्र सृष्टीचा चमत्कार पहायला मिळतो. सगळीकडे हिरवे हिरवे डोंगर पसरलेले दिसतात. पावसाळ्यात गेल्यास त्या डोंगरावरुन अनेक धबधबे खाली पडताना दिसतात. आजुबाजुला भाताची, नाचणीची, वरीची हिरवीगार शेते या सौंदर्यात आणखिनच भर घालतात. बाकी कुठेही पाऊस नसला तरी शिवथरच्या परिसरात पावसाची हजेरी असतेच. या अशा निसर्गरम्य परिसरातच शिवथरची प्रसिध्द घळ आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या परिसराचे वैभव अवर्णनिय आहे. या अशा निसर्गरम्य परिसरात निवांत रहावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु प्रापंचीक माणसांना हे स्वप्नवत असते. दोन चार दिवस राहिले की, आपले घर संसार डोळ्यापुढे यायला लागतो.
     स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर मलाही हे स्वप्न खूणावत होते. त्यामुळे मी जेव्हा कोजागिरी पोर्णिमेच्या सुमारास शिवथर घळीत गेलो होतो तेव्हा मला तेथिल व्यवस्थापना करीता स्वयंसेवकांची जरुरी असल्याचे समजले. मला ती संधी वाटली म्हणून मी लगेचच आम्हा उभयतांच्या संमतीचा फॉर्म भरुन दिला. त्यानंतर लगेचच मे महिन्यात आम्हाला मासिक व्यवस्थापक म्हणून काम करण्याविषयी विचारले गेले. तेव्हा मी देखिल हो म्हटले. परंतु संकल्प आणि सिध्दी या मध्ये नियती असते हे माझ्या लक्षांतच आले नाही. काहीतरी प्रापंचिक अडचण आली आणि मी या संधीचा लाभ घेऊ शकलो नाही. त्यानंतर सुमारे पांच वर्षे अशीच शिवथर येथे रहाण्याचे स्वप्न बघण्यात गेली.
     परंतु यंदाच्या ऑगस्ट महिन्यात हा योग जुळून आला. दिनांक ३१ जुलै रोजीच शिवथरला जाण्याचे प्रस्थान ठेवले. महाड पर्यंत राज्य परिवहन बस, महाड पासुन बिरवाडी आणि त्यानंतर बिरवाडी बाग ते शिवथर घळ सहा आसनी रिक्षाने प्रवास करीत शिवथर घळीत दाखल झालो. सुंदरमठाच्या सुंदर प्रवेश द्वाराने आमचे स्वागत केले साक्षीला प्रपात होताच.



     घळीत दाखल झाल्यानंतर आम्हाला रहाण्यासाठी खोली देण्यांत आली. त्यावेळी घळीत प्रापंचिकांचा दासबोध अभ्यास वर्ग चालू होता. त्यामुळे तेथे जवळपास शंभर लोक मुक्कामाला होती. मी घळीत होतो त्या मुदतीत अतीवृष्टीने थैमान घातले होते. माझ्या वास्तव्याच्या काळात धबधब्याचा वेग आणि प्रवाह प्रचंड वाढला होता. गेली अनेक वर्षे मी या पवित्र ठिकाणी येत आहे. परंतु अशा प्रकारचे दृष्य पहाण्याचा योग कधी आला नव्हता.
     माझ्या दृष्टीने शिवथर घळ हे नुसते समर्थ स्थान म्हणून पवित्र नाही तर आणखी बरेच काही आहे. कारण मला प. पू. आक्का वेलणकर यांचेकडून याच घळीत अनुग्रह मिळाला होता. या पवित्र स्थानाला फार मोठा इतिहास आहे. समर्थकालिन इतिहास तर आहेच, त्याचबरोबर अनेक वर्षे दुर्लक्षित असणाऱ्या या स्थानाचा शोध घेऊन त्याचे परत सुंदरमठात रुपांतर करणे या संपूर्ण घटनांचा इतिहास पाहणे फार रोचक आहे.
     अतिशय दुर्गम असणारे हे स्थान शिवकालात चंद्रराव मोऱ्यांची जहागिर होती. त्या चंद्रराव मोऱ्यांना शिवाजी महाराजांनी पुनर्स्थापित केले होते. तेच मोरे परत शिरजोर होऊन शिवाजी महाराजां विरुध्द विजापुरच्या बादशहाकडे कागाळ्या करत होते. ते जावळी खोरे स्वराज्यात सामिल व्हावे या द़ृष्टीने पार्श्वभूमी तयार करावी म्हणून समर्थ शिवथर घळीत जवळपास दहा वर्षे वास्तव्यास होते.
     बारा वर्षे टाकळी येथे तपश्चर्या, बारा वर्षे देशाटन केल्यानंतर समर्थांनी कृष्णाकाठ ही आपली कर्मभूमी ठरवली होती. त्या कृष्णेच्या परिसरात चाफळ येथे प्रभु श्रीरामांचे मंदीर स्थापन करुन त्यांनी स्वराज्याला परमेश्वराचे अधिष्ठान प्राप्त करुन दिले होते. या साऱ्या अनुभवाचा फायदा आपल्या शिष्यांना आणि समाजाला  व्हावा म्हणून समर्थांनी दासबोधा सारख्या बहू आयामी ग्रंथाची निर्मिती करण्याचे ठरविले होते. त्याकरीता त्यांना निवांतपणा आणि एकांत पाहीजे होता. म्हणूनच कोणाचाही उपद्रव न होता निवांत लेखन करता यावे या उद्देशाने समर्थांनी शिवथर घळी सारख्या दुर्गम स्थानाची निवड केली होती.
     घनदाट आणि निबिड अशा झाडांनी वेढलेल्या या नैसर्गिक घळीच्या परिसरात अनेक हिंस्त्र श्वापदांचा वावर असे. घळीच्या तोंडावरच प्रचंड प्रपात पडत होता. असे विलक्षण स्थान असणाऱ्या या शिवथर घळीचे वर्णन समर्थांनी असे केले होते.


     हल्लीच्या काळातिल श्री राम वेळापुरे (संस्कृत दासबोधकार) यांनीही शिवथर घळीवर शिवकन्दराष्टकम् लिहिले आहे ते मला एका जुन्या सज्जनगड मासिकात वाचायला मिळाले ते येथे देत आहे. त्यांनी केलेल्या घळीच्या वर्णनामध्ये त्यांनी या स्थानाला महाराष्ट्र संजीवनी म्हटले आहे आणि ते खरेच आहे. शिवथर मध्ये राहून गेल्यानंतर माणूस रिचार्ज होतो. त्याला परत प्रापंचिक जिवन जगण्यासाठीची शिदोरी येथे प्राप्त होते.

     महाभारता सारखे मोठे काव्य लिहिताना महर्षी व्यासांना प्रश्न पडला होता की, याचे लेखन कोण करेल, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष विद्येची देवता गणपतीला लेखक होण्याची विनंती केली. तेव्हा त्याने लेखन करताना मी थांबणार नाही अशी अट घातली होती. दासबोधाचे लेखन करणारा लेखक देखिल तसाच महान होता. त्याची बुध्दी देखिल तितकीच तेजस्वी होती. समर्थांचा पट्टशिष्य कल्याण स्वामी समर्थांच्या बरोबर लेखक म्हणून आले होते. मात्र ते समर्थांच्या बरोबर न रहाता तेथुन जवळच असणाऱ्या नलावडे पठार येथे रहात असत त्या पठाराला सद्या रामदास पठार म्हणून ओळखले जाते. कल्याणस्वामी हे एकपाठी होते. तल्लख होते. याची प्रचिती आपल्याला पळणीटकर गुरुजी यांच्या समर्थ चरित्रातील डाळगप्पू या गोष्टीवरुन येते. ते दररोज सूर्योदयापूर्वी आपले आन्हीक उरकुन लेखनाकरीता घळीत हजर असत.
     या स्थानाला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी भेट दिलेली आहे. रायगड, प्रतापगडाच्या निर्मितीचे स्वप्न महाराजांनी येथेच पाहिले आहे. समर्थांच्या वास्तव्याच्या काळात शिवथर घळीत गणेशउत्सव साजरा होत असे. त्याबद्दल गिरिधर स्वामींच्या पुढील रचनेत आपल्याला उल्लेख सापडतो.
समर्थे सुंदरमठी गणपती केला । दोनी पुरुषे सिंदूरवर्ण अर्चिला ।।
सकळ प्रांतासी महोच्छाव दाविला ।  भाद्रपद मासा पर्यंत ।।
     समर्थांच्या जिवनाची मुख्य हरिकथा निरूपण| दुसरें तें राजकरण | तिसरें तें सावधपण| सर्वविषईं |||| चौथा अत्यंत साक्षप| फेडावे नाना आक्षप | अन्याये थोर अथवा अल्प| क्ष्मा करीत जावे |||| ही चतु:सूत्री होती. त्यामुळे नुसते दासबोधाचे लेखन हा समर्थांचा घळीत रहाण्याचा उद्देश नक्कीच नव्हता. समर्थांच्या शिवथर घळीतील वास्तव्याच्या काळांत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. त्याकरीता परमेश्वराचे अधिष्ठान समर्थांनी पुरवीले होते. केवळ एवढेच नाही, समर्थांच्या शिष्यवर्गाने या काळात गुप्तहेराची कामे केली होती. जावळी खोऱ्यात ज्या प्रतापगडावरती अफजल खानाला मारलं त्या प्रतापगडावर समर्थांचा मठ होता. तिथूनच पाच मैलावरती पारगाव खंडाळा येथे समर्थ रामदासांचा मठ होता. पसरणीला आणि महाबळेश्वरला समर्थ रामदासांचा मठ होता. महाबळेश्वरहून साताऱ्याला जाताना मेढा मधे लागतं, त्या मेढ्याला समर्थ रामदासांचा मठ होता. पाचगणीच्याखाली कण्हेरी नावाच गाव आहे तिथे समर्थ रामदासांचा मठ होता. कण्हेरीपासून दहा मैलावर शिरवळ आहे तिथे समर्थ रामदासांचा मठ होता. याचा पुरावा विजापुरचा सरदार निघाला आहे अशी ओव्यांची आद्याक्षरे असणारे समर्थांचे शिवाजीमहाराजांना लिहिलेले पत्र  आहे.



    त्याशिवाय समर्थांनी दासबोधातिल उत्तमपुरुष निरुपण या समासात अफजलखानाचे वर्णन तुंड हेंकाड कठोर वचनी| अखंड तोले साभिमानी | न्याय नीति अंतःकर्णीं| घेणार नाहीं |||| तऱ्हे सीघ्रकोपी सदा| कदापि न धरी मर्यादा |
राजकारण संवादा| मिळोंचि नेणें |||| ऐसें लौंद बेइमानी| कदापि सत्य नाहीं वचनीं |पापी अपस्मार जनीं| राक्षेस जाणावें |||| असे केले आहे. अशा बेईमानी राक्षसाशी समजुतदारपणा असणारच नाही. तेव्हा सावध राहून योग्यप्रकारे त्याचा मुकाबला करावा असे म्लेच दुर्जन उदंड| बहुतां दिसाचें माजलें बंड | याकार्णें अखंड| सावधान असावें || या ओवीत म्हटले आहे. त्याच समासात धर्मस्थापनेचे नर| ते ईश्वराचे अवतार | जाले आहेत पुढें होणार| देणें ईश्वराचें || असे शिवाजीमहाराजांचे वर्णन केलेले आपल्याला पहायला मिळते.
     असो हा झाला शिव-समर्थ कालीन शिवथरघळ सुंदरमठाचा इतिहास. आता आपण हल्लीचा इतिहास बघुया. शिव-समर्थांच्या निर्याणानंतर या स्थानाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. परंतु समर्थांचा इतिहास आणि त्यांचे वाङ्मय यांच्या शोधाचा ध्यास घेतलेल्या समर्थ ह्रदय नानासाहेब देव यांनी अनेक कागदपत्रांच्या सहाय्याने सध्याच्या शिवथर घळीचा शोध घेतला. त्याकाळात या स्थानाला गोसाव्याची घळई असे संबोधले जायचे.
     शिवथर घळीचा शोध संपल्यानंतर या स्थानाची सर्वसामान्य जनतेला, शिव-समर्थ भक्तांना ओळख करुन देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सन १९६० मध्ये भगवान श्रीधरस्वामींच्या हस्ते येथे समर्थांच्या आणि कल्याणस्वामींच्या मूर्तींची स्थापना करण्यांत आली. मूर्ती स्थापना झाल्यावर त्यांची दैनंदीन पूजा अर्चा करण्यांत मोठ्या अडचणी होत्या. कारण येथे येण्याकरीता पायवाटेशिवाय मार्ग नव्हता. आजुबाजुला किर्र जंगल, त्यामध्ये श्वापदे वावरत होती. वाटेत नदी होती. यातुन मार्ग काढुन समर्थभक्त नारायणबुवा पोतनिस आणि समर्थभक्त महादेव नारायण बेंद्रे यांनी दैनंदिन पूजेकरीता आणि नैवेद्याकरीता येथे रहायचे ठरविले. परंतु येथे रहाणे म्हणजे जिवावर उदार होण्यासारखेच होते. कारण येथे वाघोबा सारखे प्राणी खुलेआम फिरत होते. त्यावर उपाय म्हणून ते बांबुच्या सहाय्याने केलेल्या पिंजरावजा घरांत ते रहायचे आणि जंगली प्राणी खुले वावरायचे.

     अशा प्रकारे काही वर्षे गेल्यानंतर कै. मामा गांगल यांनी या स्थानाच्या कारभाराची जबाबदारी स्विकारली. त्यांनी अनेक समर्थ भक्तांशी संपर्क साधुन निरनिराळ्या व्रतांच्या उद्यापनाद्वारे खूप मोठा निधी जमा केला. सुरवातिला साध्या शेडमध्ये भक्तांची सोय करण्यांत येत असे. मामांच्या आणि त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने सध्या दिसत असलेले सुंदरमठाचे स्वरुप दिसत आहे. सध्या घळीत कल्याण मंडप, गजानन मंडप यासारखे मोठ्ठे हॉल, सुसज्ज स्वंयपाकघर, समर्थभक्तांना रहाण्यासाठी अनेक खोल्या उपलब्ध असतात.
     घळीत अनेक मोठे कार्यक्रम होतात. त्यात मुलांकरीता संस्कार वर्ग, प्रापंचिकांकरीता दासबोध अभ्यास वर्ग, प. पू. आक्का वेलणकर यांनी चालू केलेला दासबोधाचा सखोल अभ्यास या उपक्रमाचा सप्ताह असे मोठी उपस्थिती असलेले कार्यक्रम होतात. याशिवाय अनेक ग्रुप दासबोध पारायणाकरीता येत असतात. कधी कधी चारशे पाचशे माणसे देखिल वस्तीला असतात. याशिवाय दासबोध जन्मोत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
     दररोज पहाटे साडे पांचवाजता पक्षांच्या किलबिलाटात, मोरांच्या केकांच्या पार्श्वसंगिताच्या साथिने भूपाळ्या आणि काकड आरतीने येथिल दिवस सुरु होतो. त्यानंतर दिवसभरात पारायण, पूजन अर्चन इत्यादि अनेक कार्यक्रम चालू असतात. संध्याकाळी साडे सहावाजता सांप्रदायिक उपासना केली जा ते. यामध्ये समर्थांची करुणाष्टके, सवाया, निरनिराळी अष्टके, दासबोध-मनोबोध वाचन, आरती, रामनाम जप यांचा समावेश असतो. संध्याकाळच्या उपासनेची सांगता कल्याणकारी रामराया या प्रार्थनेने होते. या सर्व कार्यक्रमांत सहभागी झाल्याने मनाला समाधान मिळते. प्रपंच विसरायला होतो. त्यातच जर घळीमध्ये धबधब्याच्या रुद्रगंभिर आवाजाच्या साथीने ध्यानाला बसल्यास शरिराची आणि मनाची बॅटरी चांगली चार्ज होते.
     हल्लीच घळीत समर्थ चरित्राचे चित्ररुप प्रदर्शन लावलेले आहे. या प्रदर्शनात मोठी मोठी पुस्तके वाचुन जे समजणार नाही ते १५-२० मिनिटांत ही चित्रे आणि त्यांचे वर्णन करणारा थोडक्यांत मजकूर यांच्या सहाय्याने समजते. हे एक वेगळेच माध्यम आहे. हल्ली लोकांना पुस्तके वाचणे नको असते त्या ऐवजी हे माध्यम सोपे आहे. पूर्वी हे प्रदर्शन फिरते होते. जबलपुर येथील श्री सुरेश तोफखानेवाले यांनी या चित्रप्रदर्शनाची निर्मिती केली आहे. आपण हल्ली पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे थोडक्यांत एखाद्या प्रकल्पाची माहिती सादर करतो तसेच हे थोडेसे आहे. येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन आवर्जुन पहायलाच हवे.  
     शिवथर घळ येथील धबधबा हे आणखीन एक आकर्षणाचे केंद्र आहे. तरुणाईला येथील धबधबा भुरळ घालतो. सेल्फी घेणे, धबधब्याच्या पार्श्वभूमिवर फोटो घेणे याचे आकर्षण तर सर्वांनाच असते. त्यामुळे पावसाळ्यांत येथे भेट देणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते. अशा या पवित्रस्थानी सेवा करण्याच्या निमित्ताने आम्हा उभयतांना तेथे रहायची आणि तेथिल दिव्य अनुभव घेण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य होते.
     शिवथर घळीतील बहुसंख्येने असलेली माकडे हे येथिल खास वैशिष्ट आहे. येथे भेट देणारे पर्यटक त्यांना काहिना काही खायला घालतात. परंतु त्यांचे तेवढ्या अल्प खाण्याने समाधान होत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती माकडे पर्यटकांचे सामान पळवत असतात. परंतु त्यांनी माणसांना इजा केली आहे असे क्वचितच घडले असेल. मोठ्या संख्येने असुन देखिल ती माणसांना घाबरतात. असे जरी असले तरी ते शेवटी माणसाचे पूर्वज आहेत. त्यांच्याकडे बुध्दीचे देणे परमेश्वराने दिलेले आहे. याचा प्रत्यय मला एकदा आला. मी श्रीधर स्वामी सभागृहातिल चित्रप्रदर्शन उघडून बसलो होतो. तेव्हा चार पाच माकडे दारा पर्यंत आली म्हणून मी जिन्याला असलेली कोल्याप्सेबल ग्रील बंद केले. तर ती माकडे माझ्या नाकावर टिच्चून त्या ग्रील्समधुनच आपले अंग चोरुन जिन्यामध्ये दाखल झाली.
     आमच्या वास्तव्याच्या काळांत म्हणजे, श्रावण प्रदिपदे पासुन ते अगदी नारळी पोर्णिमे पर्यंत पावसाने नुसते थैमान घातले होते. दिवसभरात काही तासच पाऊस कमी व्हायचा. त्याकाळांत धबधब्याची निरनिराळी रुपे पहायला मिळाली. शिवथर घळीत येण्याचा मार्ग चालू असला तरी वरंधाघाट, महाबळेश्वर घाट, कशेडी घाट हे सर्व घाट बंद होते. महाड, रोहा, नागोठणे, चिपळुण, खेड, राजापुर या सर्व शहरांत पाण्याने थैमान घातले होते. त्यामुळे घळीत कोणतेही वाहन येत नव्हते.


     मला गणपती, समर्थांच्या आणि कल्याणस्वामी यांच्या मूर्तीची आणि मारुतिरायाच्या पूजेची जबाबदारी दिली होती. तर सौ. वर्षा काऊंटर मदत करत होती. आमच्या तेथिल वास्तव्याच्या काळांत वीज गायब होणे हे नित्याचे झाले होते. त्यामुळे उपासना करायला अथवा पूजा करायला बॅटरी किंवा मोबाईलच्या बॅटरीचे सहाय्य घ्यावे लागत असे. महाड बंद असल्याने पूजेकरीता फुले येणे बंद झाले होते. त्यामुळे घळीत उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीवर पूजा करावी लागत असे. भगवद्गीते भगवंतांनी म्हटले आहे,  पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । त्या प्रमाणे दुर्वा तुळशी तगरीची दोन चार फुले यांच्या सहाय्याने भागवावे लागत होते. तरीही त्या पूजेने समाधान मिळत होते. रोज पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि रुद्र यांचे पठण घळीतिल मंदिरात होत होते. पंच सूक्त पवमानाची संथा घेतल्यापासून ज्या ठिकाणी अनुग्रह घेतला तेथे त्याचे पठण करावे ही इच्छा होती, ती पुरी झाली. श्रावण शुध्द एकादशीच्या दिवशी पंचसूक्त पवमानाचे पठण समर्थांच्या समोर आणि जेथे अनुग्रह प्राप्त केला त्या स्थानी करता आले याचा खूपच आनंद झाला.

     रामदासी संप्रदायामध्ये मारुति उपासनेला फार महत्व आहे. समर्थ जिथे जिथे गेले तिथे त्यांनी शक्ती आणि बुध्दीच्या या देवतेची स्थापना केलेली आढळते. आमच्या या वास्तव्या दरम्यान श्रावणातिल तिसरा शनिवार आला होता. या दिवसाचे वैशिष्ट म्हणजे या दिवशी मारुती उपासना करण्याचा प्रघात गेली अनेक वर्षे चालू आहे. समर्थ स्थापित अकरा मारुती ज्या चाफळच्या परिसरात आहेत तेथे या उपासनेची सुरवात झाली आहे. एकावेळी एकाच दिवशी ही सामुहिक उपासना केली जाते. या उपासने मध्ये सर्वप्रथम गणेश वंदना, जय जय रघुवीर समर्थ हा गजर, तेरा वेळा समर्थ रामदासस्वामी विरचित मारुति स्तोत्राचे तेरा वेळा पठण, रामरक्षा, श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राच्या अकरा माळा जप, आरती, प्रसाद आणि कल्याणकरी रामराया या प्रार्थनेने सांगता असा क्रम असतो. योगायोगाने समर्थ वास्तव्याने पुनित असलेल्या स्थळी ही उपासना आम्हाला करता आली.
     शिवथर घळीत रहाण्याचा फायदा असा आहे, की  येथे कोणत्याही मोबाईलला नेटवर्क उपलब्ध नसते. त्यामुळे जगाच्या संपर्कापासुन दूर होतो. नो फेसबुक, नो व्हॉटस् अँप, नो ईमेल त्यामुळे कोणताही डिस्टर्ब नव्हता. एकंदरीत सुंदरमठातिल हे वास्तव्य आनंदाचे, उत्साहाचे आणि आत्मिक शक्ती वाढवणारे होते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

शुक्रवार, १९ जुलै, २०१९

हकिमबाबा

।।श्रीराम।।

मला भावलेले व्यक्तिमत्व:हकिमबाबा

          परवा सहज सायकलवर चक्कर मारायला बाहेर पडलो होतो. तेव्हा बुडन पाखाडी, सराई मोहल्ला, चौकर पाखाडी असा फिरत फिरत समुद्रावर गेलो होतो. त्यावेळी सराई मोहल्यातुन जाताना हकिमबाबांचा दवाखाना आणि दुकानाची जागा नजरेस पडली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटतात. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. काहीजण आपल्या ह्रदयांत कायमची घर करुन बसतात. हकिमबाबा हे एक त्यातलेच व्यक्तिमत्व आहे. त्यांना विसरावे म्हटले तरी विसरता येणार नाही.
मी पोस्टमन म्हणून काम करताना त्यांना अनेक वेळा भेटलो. सुरवातिल पत्र टाकण्यापुरता संबंध होता. नंतर नंतर ओळख वाढत गेली. सराई मोहल्याच्या नाक्यावर त्यांचे दुकान आणि दवाखाना होता. त्याकाळात पोस्टाने पत्रव्यवहार जास्त होत असत. त्यामुळे त्यांच्या दुकानात पोस्टकार्ड, अंतर्देशिय पत्र, पाकिटे, मनी ऑर्डर फॉर्म विक्रिला ठेवलेले असत. मी जेव्हा पत्र वाटायला त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते पोस्टातुन पोस्टाची स्टेशनरी(कार्ड, पाकिटे वगैरे) आणायला सांगत असत. कधी कधी अचानक आमची बीट बदलली जायची मग त्यांनी दिलेल्या पैश्यांची स्टेशनरी घेतली तरी लगेचच पोचवली जायची नाही. तरीही त्यांनी कधीही  अविश्वास दाखवला नाही. या व्यवहारातुन त्यांची ओळख वाढत गेली. सुरवातिला ते डॉक्टर आहेत हेच मला माहित नव्हते.
हकिमबाबा ही अतिशय धार्मिक व्यक्ती होती. तिन वेळचा त्यांचा नमाज कधी चुकला नाही. ते नियमितपणाने जशी अजमेर शरिफ येथे मनी ऑर्डर करायचे तशीच तुळजापुरला अथवा गाणगापुरला देखिल करायचे ते म्हणायचे मी कबीर पंथी आहे. त्यांनी नाशिक येथिल आयुर्वेद सेवा संघामध्ये आयुर्वेदाचे शिक्षण घेतले तर युनानी हकीमीचे शिक्षण उत्तर प्रदेशांत घेतले होते. एकुण जवळपास बारा वर्षे त्यांनी आयुर्वेद आणि युनानीचे शिक्षण घेतले होते.
त्यांच्याकडे शारंगधर संहितेची मूळ संस्कृत पोथी होती. त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे काढे, भस्मे, रसायने, प्राश बनवायचे फॉर्म्युले होते. पूर्वी हकिमबाबा अनेक प्रकारची औषधे स्वत: बनवत असत. परंतु बाजारात तयार आयुर्वेदिक औषधे मिळायला लागल्यापासून त्यांनी औषधे बनवणे सोडले होते. नाशिकच्या दाते वैद्यांच्या आठवणी ते नेहमी सांगत असत. माझे एक चुलत चुलत आजोबा कै. धोंडो वाकणकर हे देखिल वैद्य होते. त्यांच्या आठवणी देखिल ते सांगत असत.
त्यांच्याकडे अनेक प्रकारचे काढे, आसवे, च्यवनप्राश सारखे प्राश, निरनिराळ्या मात्रा उपलब्ध असत. त्यांच्याकडे दुपारी खेडेगावातल्या रुग्णांची गर्दी होत असे. त्या रुग्णांवर ते अतिशय अल्पदरात उपचार करित असत. जुन्या दिर्घकाल असणाऱ्या रोगांवर ते खात्रीने उपचार करीत असत. मी देखिल अनेक वेळा किरकोळ किरकोळ रोगांवर त्यांच्याकडून उपचार घेत असे. आपल्या घरांत सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तुंचा औषधी उपयोग ते सांगत असत. मला नेहमी तोड येण्याचा म्हणजेच छाले पडण्याचा त्रास होता. त्यावर त्यांनी त्याकाळी प्रत्येक घरी सहज उपलब्ध असणारे मायफळ उगाळुन लावायला सांगितले होते. त्याने मला ताबडतोब आराम पडत असे. त्यांनी सांगितलेला हा उपचार मी एका एम्. बी. बी. एस्. झालेल्या डॉक्टरांना देखिल सांगितला होता. विशेष म्हणजे त्या डॉक्टरांना त्या उपचाराचा लगेचच प्रत्यय देखिल आला होता.
हकिमबाबा जसे शरिरावरच्या रोगावर उपचार करित असत तसेच ते मानसिक रोगावर देखिल त्यांच्या पध्दतीने उपचार करीत असत. लोकांना हकिमबाबांना जादू टोणा करतात असे वाटायचे परंतु तो त्यांचा मानमिक उपचार असे. याबाबत मी त्यांच्याशी एकदा बोललो होतो. त्यावर त्यांनी सांगितले होते, ज्या रोग्याच्या मनात माझ्यावर करणी केली आहे, मला कुठलीतरी भूतबाधा झाली आहे असे ठाम बसले आहे. तो रोगी शरिरावर केलेल्या कोणत्याही  उपचाराने बरा होणार नाही. त्याला उपचार देखिल मानसिकच हवा. म्हणून ते त्या मानसिक रोगी असलेल्या रोग्याला उतारा वगैरे काढायला सांगत असत. त्यांच्या या उपचाराने आणि जोडीला आयुर्वेदिक औषधाने तो रोगी खडखडीत बरा होत असे.
या बाबतित मला माझ्या आतेभावाची गोष्ट आठवते तो प्राथमिक शिक्षक होता. या शिवाय खेडेगावांत पौराहित्यही करीत असे. त्याच्यावर अनेकांचा विश्वास होता. गुरुजींनी काही तोडगा सांगितला तर नक्की परिणाम होईल असा त्याच्या विषयी लोकांचा समज होता. एकदा मी त्याच्याकडे गेलो होतो. तेव्हा दोघीजणी सासवा सूना आल्या होत्या. त्या सासुचा  प्रश्न होता मुलाचे लग्न होऊन दोन वर्षे झाली तरी मुलबाळ काही नाही काहितरी तोडगा सांगा. त्यावर माझ्या भावाने त्यांना एका विड्याच्या पानावर हळदकुंकू, वगैरे साहित्य ठेवुन ठरावीक दिवशी तिन्हीसांजा ते पान मुलाने आणि सुनेने चव्हाट्यावर ठेवावे असे सांगितले.
त्या दोघीजणी निघुन गेल्यावर मी त्याला हे काय असे विचारले त्यावर त्याने सांगितले, अरे अनिल! या बाईचा मुलगा मुंबईत, आणि सून इथे गांवाला तेव्हा त्यांचे पोटपाणी पिकेलच कसे. परंतु मी जर असे सरळ सांगितले तर त्या बाईला पटणार नाही. परंतु आता मी सांगितलेला तोडगा पुरा करायला ती मुलाला गावाला बोलवेल त्यानंतर सुनेला आणि मुलाला  तो तोडगा पुरा करायसाठी एकत्र यावे लागेल हा असा माझा उपचार आहे. हकिमबाबा तरी काय वेगळे वागत होते. जसा रुग्ण तसा उपचार हे त्यांचे धोरण होते.
असे हे हकिमबाबा माझ्या कायम स्मरणात राहिलेले आहेत. माझ्या मनाचा एक कोपरा त्यांनी व्यापला आहे. पोस्टमन मधुन प्रमोशन झाल्यानंतर माझे श्रीवर्धन सुटले, त्यांचा संपर्कही तुटला. कधीतरी ते पैगंबरवासी झाल्याचे समजले. त्यांच्या दुकानावरुन जाताना हे सर्व आठवले. त्यांचे आता दुकान चालू दिसले परंतु दवाखाना मात्र बंद दिसला. त्यांच्या कडील शारंगधर संहितेतिल अनेक फॉर्म्युले मी लिहून घेतले होते. त्या वह्या कोणालातरी वाचायला दिल्या त्या त्याने परत केल्याच नाहित. त्यामुळे ती देखिल त्यांची आठवण आता शिल्लक नाही. त्यातल्या फॉर्म्युल्यावरुन मी आडुळशाचा काढा केला होता तो जवळपास दोन वर्षे आम्ही वापरत होतो.
अशा या हकिमबाबांना माझी ही आदरांजली.