समर्थ रामदास स्वामीकृत आरत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समर्थ रामदास स्वामीकृत आरत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ जुलै, २०१८

समर्थ रामदास स्वामीकृत गणपतीची आरती


।।समर्थ रामदास स्वामीकृत गणपतीची आरती।।


समर्थांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. त्या आपण नेहमीच म्हणतो. त्यातिल गणपतीची आरती प्रसिद्ध आहे. परंतु ती म्हणताना अनेकजण तिची तोडमोड करतात. माझ्या माहितीत अनेक जण संकटीच्या ऐवजी संकष्टी पावावे असे म्हणतात. ही गणपतीची आरती समर्थांनी रचली त्यावेली समर्थ मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तेथील पुजार्‍याला गणपतीची आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' या गणपतीच्या आरतीची रचना केली.
      सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥        
      सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
      जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
     श्री गणपती हा सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे, त्याच्या कृपाप्रसादाने विघ्नांची वार्ताही शिल्लक रहात नाही, तो सतत प्रेम पुरवत असतो. सर्वांगाने सुंदर असणाऱ्या गजाननाला शेंदूराची उटी लावलेली आहे. त्याच्या गळ्यांत मोत्याची माळ शोभत आहे. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
     रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
     हिरेजडीत मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥२॥
     जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
     ज्याने चंदनाची उटी लावलेली आहे, त्या गौरीच्या कुमाराच्या मस्तकावर रत्नखचित फरा(शिरपेच) शोभत आहे. त्याच्या मस्तकावर हिरेजडित मुकुट शोभुन दिसत आहे आणि ज्याच्या चरणामध्ये रुण झुण रुण झुण करणारे नुपुर आहेत ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
     माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले  ।।
     नागबंद सोंड-दोंद मिराविले  । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥३॥
     जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
     ज्याच्या मस्तकावर मुकुट आणि कानात मण्यांची कुंडले(कर्णभूषणे) आहेत, ज्याच्या सोंडेवर आणि दोंदावर शेंदूराचे लेपन केले आहे, ज्याच्या पोटावर नागाने फण्यासह वेटोळे घातले आहे, अशा त्या मोरयाचे विश्वरुप पाहीले आणि धन्य झालो. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
      चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
चतुर्भूज असणाऱ्या गणराजाच्या हांतांमध्ये पाश, अंकुश असुन एका हातात खाज्याचे सुरेख लाडू असून एकाहाताने तो आशिर्वाद देत आहे. अशा या गणराजाला सुवर्णाच्या ताटात लोणी साखर जो अर्पण करतो त्याची सर्व विघ्ने तो निवारण करतो. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥५॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
ऊंदराच्या वाहनावर आरुढ झालेल्या हे गणराया तुझ्या मस्तकावर छत्र चामरे मिरवित आहेत. या अशा स्वरुपातल्या हे गणराजा तू कलीयुगांत सगळ्यांकडे आनंदाने पहातोस आणि त्यांच्यावर प्रसन्न होतोस. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा  घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥६॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
मृदंगाच्या बोलावर आणि तालावर गणपती नाचत आहे. तो नाच त्याचे माता पिता कौतुकाने पहात आहेत. टाळ, मृदंग, वीणा याचे मधुर स्वर उमटत आहेत आणि त्या नादाच्या छंदावर गणपती नृत्य करीत आहे. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना।
              संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ ॥
     भक्तांचे अपराध पोटात घातल्या मुळे लंबोदर झालेल्या, ज्याने पिंताबर नेसले आहे, ज्याने नागबंध केलेला आहे, ज्याची सोंड सरळ असुन तो आपल्या भक्तांकडे तो वाकड्यानजरेने पहात नाही परंतु भक्ताकडे जर कोणी वाकड्या नजरेने पहात असेल त्याचा समाचार घेणारा म्हणून वक्रतुंड हे नांव पडलेला असा हा गणपती आहे. संकटात धावत येऊन रक्षण करावे  म्हणून हा रामाचा दास  त्या देवांचाही पूजनिय असणाऱ्या गजाननाची आतुरतेने वाट पहात आहे. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


समर्थ रामदास स्वामी कृत भगवान शंकराची आरती


।। श्रीराम ।।
।। समर्थ रामदास स्वामीकृत शंकराची आरती ।।


लवथवती विक्राळा ब्रह्मांडे माळा ही आरती समर्थांनी जेजुरी जवळील लवथवेश्वर मंदिरात रचली. त्या मंदिरात कोणी वस्तीला राहिले तर ती व्यक्ती जिवंत रहात नाही असा तेव्हा लोकांचा समज होता. समर्थ त्या मंदिरात वस्तीला राहिले आणि सकाळी  तेथे महादेवांची आरती करीत होते ती ही आरती आहे.
            भगवान शंकर हे रुद्र म्हणून प्रसिध्द आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय या विश्वाचे संचालन करण्याच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यापैकी ब्रह्मदेव यांच्याकडे उत्पत्ती, विष्णूंकडे पालन किंवा स्थिती ही जबाबदारी तर शंकरांकडे लय म्हणजेच संहार करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणूनच समर्थांनी शंकराच्या रौद्रस्वरुपाचे वर्णन या आरतीत केले आहे.
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

    ज्याच्या गळ्यांत विक्राळ स्वरुपातील ब्रह्मांडरुपी(एक सूर्यमाला म्हणजे एक ब्रह्मांड अशी ही संकल्पना आहे) नरमुंड माळा शोभत आहेत, ज्याचा कंठ समुद्रमंथनातुन निघालेल्या विषाचे प्राशन केल्यामुळे काळा झालेला आहे, ज्याच्या तिनही नेत्रामधुन ज्वाळा निघत आहेत, ज्याच्या मस्तकावर लावण्यसुंदर असणारी गंगा विराजमान आहे त्यामुळे तेथुन गंगेचे पाणी झुळु झुळु वहात आहे. ज्याचा रंग कापरा सारखा गोरा आहे अशा त्या शंकराचा जय जयकार असो. ।।१।।
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

कर्पूरगौर असणारा तो शंकर भोळेपणा करीता प्रसिध्द आहे. म्हणूनच त्याला रावणाने फसवुन त्याचे आत्मलिंग घेतले. त्याचे डोळे विशाल आहेत, ज्याची अर्धांगी पार्वती आहे, ज्याने फुलांच्या माळा धारण केल्या आहेत. ज्याने आपल्या सर्वांगावर चिता भस्माची उधळण केली आहे. ज्याचा कंठ रामनामाने शितल झाला आहे त्यामुळेच तो निलवर्ण झाला आहे. अशाप्रकारे उमावेल्हाळ शंकर शोभत आहे. ज्याचा रंग कापरा सारखा गोरा आहे त्या शंकराचा जय जयकार असो. ।।२।।
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ जे उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिध्द झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

    देव आणि दानव यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार त्यांनी सागराचे मंथन केले, त्यावेळी अचानक हलाहल नावाचे जहाल विष निर्माण झाले. ते स्विकारायला देव आणि दानवांपैकी कोणीच तयार झाले नाही तेव्हा भगवान शंकरांनी ते एखाद्या असुराप्रमाणे प्राशन केले. या प्रसंगावरुनच त्यांचे नीळकंठ हे नांव प्रसिध्द झाले. अशा त्या शंकरांचा ज्यांचा रंग कापरा सारखा गोरा आहे जय जयकार असो. ।।३।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥
जय देव जय देव० ॥ ४ ॥

ज्याने मदनाचा वध केला आहे, ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे, ज्याच्या गळ्यांत फणीवर नाग शोभत आहे. ते भगवान शंकर पंचमुखी आहेत. १) त्यांच्या पूर्वमुखाचे नांव तत्पुरुष असे असुन त्याचा रंग पिवळा आहे. तत्पुरुष वायुतत्वाचे अधिपती आहेत. २) त्यांचे दक्षिणमुखाचे नांव अघोर आहे. या मुखाचा रंग नीळा आहे, हे मुख अग्नीतत्वाचे अधिपती आहेत. अघोररुपी शिवशंकर भक्तांचे रक्षण करण्याकरीता त्याच्या दु:खाचे संहारकारी आहेत. ३) त्यांच्या उत्तरमुखाचे नांव आहे वामदेव. वामदेव विकारांचा नाश करतात. या मुखाचा वर्ण काळा आहे. हे मुख जलतत्वाचे अधिपती आहे. ४) त्यांच्या पश्चिममुखाचे नांव सद्योजात आहे. या मुखाचा रंग श्वेत आहे. हे मुख पृथ्वीतत्वाचे अधिपती आहे. ५) त्यांच्या उर्ध्वमुखाचे नांव आहे ईशान आहे. त्याचा रंग दूधासारखा आहे. हे मुख आकाश तत्वाचे अधिपती आहे. 
असे हे मुनीजनांना सुखकर असणारे भगवान पंंचानन मनमोहक भगवान शंकर सतत शतकोची रामायणाचे बीज असणारे रामनाम सतत उच्चारीत असतात. अशा या शंकराला रघुकुलाचे भूषण असणाऱ्या रामाचा दास अंतरंगात साठवुन ठेवीत आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।