।। श्रीराम ।।
।। समर्थ रामदास स्वामीकृत शंकराची आरती ।।
लवथवती
विक्राळा ब्रह्मांडे माळा ही आरती समर्थांनी जेजुरी जवळील लवथवेश्वर मंदिरात रचली.
त्या मंदिरात कोणी वस्तीला राहिले तर ती व्यक्ती जिवंत रहात नाही असा तेव्हा
लोकांचा समज होता. समर्थ त्या मंदिरात वस्तीला राहिले आणि सकाळी तेथे महादेवांची आरती
करीत होते ती ही आरती आहे.
भगवान शंकर हे रुद्र म्हणून प्रसिध्द
आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय या विश्वाचे संचालन
करण्याच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यापैकी ब्रह्मदेव यांच्याकडे उत्पत्ती, विष्णूंकडे पालन किंवा स्थिती ही
जबाबदारी तर शंकरांकडे लय म्हणजेच संहार करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणूनच
समर्थांनी शंकराच्या रौद्रस्वरुपाचे वर्णन या आरतीत केले आहे.
लवथवती
विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें
कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर
मस्तकीं बाळा ।
तेथुनियां
जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय
देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती
ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
ज्याच्या
गळ्यांत विक्राळ स्वरुपातील ब्रह्मांडरुपी(एक सूर्यमाला म्हणजे एक ब्रह्मांड अशी
ही संकल्पना आहे) नरमुंड माळा शोभत आहेत, ज्याचा
कंठ समुद्रमंथनातुन निघालेल्या विषाचे प्राशन केल्यामुळे काळा झालेला आहे, ज्याच्या तिनही नेत्रामधुन ज्वाळा निघत
आहेत, ज्याच्या मस्तकावर लावण्यसुंदर असणारी
गंगा विराजमान आहे त्यामुळे तेथुन गंगेचे पाणी झुळु झुळु वहात आहे. ज्याचा रंग
कापरा सारखा गोरा आहे अशा त्या शंकराचा जय जयकार असो. ।।१।।
कर्पूरगौरा
भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं
पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें
उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा
शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
कर्पूरगौर
असणारा तो शंकर भोळेपणा करीता प्रसिध्द आहे. म्हणूनच त्याला रावणाने फसवुन
त्याचे आत्मलिंग घेतले. त्याचे डोळे विशाल आहेत, ज्याची अर्धांगी पार्वती आहे, ज्याने
फुलांच्या माळा धारण केल्या आहेत. ज्याने आपल्या सर्वांगावर चिता भस्माची उधळण
केली आहे. ज्याचा कंठ रामनामाने शितल झाला आहे त्यामुळेच तो निलवर्ण झाला आहे.
अशाप्रकारे उमावेल्हाळ शंकर शोभत आहे. ज्याचा रंग कापरा सारखा गोरा आहे त्या शंकराचा
जय जयकार असो. ।।२।।
देवीं
दैत्यीं सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं
जें अवचित हळाहळ जे उठिलें ॥
तें
त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ
नाम प्रसिध्द झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
देव आणि दानव
यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार त्यांनी सागराचे मंथन केले, त्यावेळी अचानक हलाहल नावाचे जहाल विष
निर्माण झाले. ते स्विकारायला देव आणि दानवांपैकी कोणीच तयार झाले नाही तेव्हा
भगवान शंकरांनी ते एखाद्या असुराप्रमाणे प्राशन केले. या प्रसंगावरुनच त्यांचे नीळकंठ हे नांव प्रसिध्द झाले. अशा त्या शंकरांचा ज्यांचा रंग कापरा सारखा गोरा आहे जय
जयकार असो. ।।३।।
व्याघ्रांबर
फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन
मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें
बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक
रामदासा अंतरीं ॥
जय
देव जय देव० ॥ ४ ॥
ज्याने
मदनाचा वध केला आहे, ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे, ज्याच्या गळ्यांत फणीवर नाग शोभत आहे. ते भगवान शंकर पंचमुखी आहेत. १) त्यांच्या पूर्वमुखाचे नांव तत्पुरुष असे असुन त्याचा
रंग पिवळा आहे. तत्पुरुष वायुतत्वाचे अधिपती आहेत. २) त्यांचे दक्षिणमुखाचे नांव
अघोर आहे. या मुखाचा रंग नीळा आहे, हे
मुख अग्नीतत्वाचे अधिपती आहेत. अघोररुपी शिवशंकर भक्तांचे रक्षण करण्याकरीता
त्याच्या दु:खाचे संहारकारी आहेत. ३) त्यांच्या उत्तरमुखाचे नांव आहे वामदेव.
वामदेव विकारांचा नाश करतात. या मुखाचा वर्ण काळा आहे. हे मुख जलतत्वाचे अधिपती
आहे. ४) त्यांच्या पश्चिममुखाचे नांव सद्योजात आहे. या मुखाचा रंग श्वेत आहे. हे
मुख पृथ्वीतत्वाचे अधिपती आहे. ५) त्यांच्या उर्ध्वमुखाचे नांव आहे ईशान आहे.
त्याचा रंग दूधासारखा आहे. हे मुख आकाश तत्वाचे अधिपती आहे.
असे हे मुनीजनांना सुखकर असणारे भगवान पंंचानन मनमोहक भगवान शंकर सतत शतकोची रामायणाचे बीज असणारे
रामनाम सतत उच्चारीत असतात. अशा या शंकराला रघुकुलाचे भूषण असणाऱ्या रामाचा दास
अंतरंगात साठवुन ठेवीत आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा