सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस १५ वा.

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस १५ वा

            नाही! नाही! मी म्हणतोय ते खरंय!’ विलास तावातावाने म्हणाला.

     ह्यां! बुधवार विठोबाचाच. आपण आजींना विचारू याना! गणपती आणि विलास बोलत बोलत पडवीवर आले. बोलण्याच्या नादांत पाय धुवायचे विसरणारच होते. पण मधूने खूण केली. विलासच्या लक्षांत आले. दोघांनी पाय धुतले. मारूतीला नमस्कार केला. आजींना नमस्कार केला. सर्वांनाच नमस्कार करून दोघे बसले.

     आजी म्हणाल्या, कसला वाद चालला होता, विलास?’

     आजी! हे देव तरी किती हो! पण न भांडता वारांची वाटणी केली. ते प्रमुख देव कां? देवांत पण श्रेष्ठ कनिष्ठ असतं कां? आम्ही वारावाराचा देव कोणता ते बोलत होतो.विलास म्हणाला.

     आजी बोलल्या, मगं गाडी कुठे अडली?’

     गणपती म्हणाला, रविवार सूर्याचा! मी म्हणत होतो रामाचा. आणि देवीला मंगळवार शुक्रवार दोन वार कां? सोमवार शंकराचा वादच नाही. मी म्हणतो बुधवार कृष्णाचा तर हा म्हणतो नाही, बुधवार विठोबाचा, आता तुम्हीच सांगा खरं कुणाचं?’

     आजी म्हणाल्या, दोघांचेही खरे. कृष्णाचा जन्म बुधवारी. म्हणून बुधवार कृष्णाचा. पण तोच कृष्ण विठ्ठल रुपांत कलीयुगात अवतरला म्हणून बुधवार विठोबाचा.

     आजी!’ विलास म्हणाला, कृष्ण जसा विठ्ठल होऊन आला तसा रामाने का नांही दुसरे रूप घेतले? गुरूवार दत्तात्रयाचा. पण शनिवार शनीराजाचा की मारूतीचा?’

     जया म्हणाली, शनिवार, शनीदेवाचा!’

     मधुकर म्हणाला, आजी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवाची, वेग वेगळ्या पध्दतीने पूजा केली की, कोणत्या देवाची कृपा झाली म्हणून समजायचे? कां सगळेच देव सभा घेतात नी एकमताने कृपा करतात?’

     आजी म्हणाल्या, बाळांनो! तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दासबोधात आहेत. पावावया भगवंतातें | नाना पंथ नाना मतें | तया  देवाचें  स्वरूप  तें | कैसे आहें ||८-१-७||श्रीराम|| 

     भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याची कृपा व्हावी असे तर सर्वांनाच वाटते. पण अनेक पंथ अनेक मते. कोणाचा कोणाशी मेळ नाही. ज्याला जसा प्रत्यय आला. त्याला तसा देव आवडला. ज्याच्या त्याच्या भावनेतून कल्पनेतून नाना देव निर्माण झाले. समर्थांचे म्हणणे, कोणत्याच देवाला तुच्छ मानू नये. पण खरा देव कोणता? हे आधी ओळखले पाहिजे.

     सुधा! समर्थांनी किती सोप्या शब्दांत समजावले आहे पहा.....देव कोणासी म्हणावें | कैसें तयासी जाणावें | तेंचि बोलणें स्वभावें |ोलिजेल ||१६||श्रीराम||   जेणें केले चराचर | केले सृष्ट्यादि व्यापार | सर्वकर्ता निरंतर| ाम ज्याचें ||१७||श्रीराम||  

     विलास म्हणाला, रामाने रावणाचा नाश केला. तो अयोध्येचा आदर्श राजा झाला. त्याने काही ही सृष्टी रचली नाही. म्हणजे तो देव नाही कां?’

     गणपती म्हणाला, कृष्णाने व्दारका निर्मितीचे वेळी एका शक्तीची प्रार्थना केली. ती देवी की विश्वकर्मा? काय मंत्र म्हणाले कोणास ठाऊक? पण समुद्रात व्दारका शहर तयार झाले. म्हणजे कृष्ण सुध्दा देव नाही कां?’

     मधुकर म्हणाला, मारूती तर रामाचा दास. शक्ती देवता, बुध्दीमान म्हणून आपण त्याला मानतो. पण तो कृपा रामाकरवी करवतो. स्वत: काहीच करत नाही. मग तो देव कसा म्हणावा?’

     सुधा चुळबुळ करू लागली. आजी! शुक्रवार व्रत केले की धन धान्य सुबत्ता प्राप्त होते. आत्मज्ञान नाही. मग देवी पण खरी नाही कां? पैशाच्या, खोट्या, वैभवाच्या राशीवर बसवते तिला देव म्हणावे कां?’

     बाळांनो! तुमच्या शंका अगदी बरोबर आहेत. आजी म्हणाल्या, सामान्य माणसे इथेच गडबडतात. राम, कृष्ण दत्त, मारूती, विठोबा या दिव्य शक्तीच्या अवतार प्रतिमा. आज आपण त्या आदर्श पूजनीय अवतारी पुरुषांची, स्त्रियांची मूर्ती रूपाने पूजा करतो. जया समर्थ काय म्हणतात, तूच वाच. पदार्थवस्तु नासिवंत | हें तों अनुभवास येत | याकारणें भगवंत | पदार्थावेगळा ||८-१-४६||श्रीराम||

     आजी म्हणाल्या पाहिलतं! जगतील सर्व वस्तू नाहिशा होतात. अगदी आपला देहच काय अवतारी पुरुष सुध्दा नाश पावतात. त्यांना देव कसे म्हणावे? भगवंत त्याहून वेगळा आहे.

     आता गंमत अशी की, ज्या भगवंताच्या इच्छेने, स्फूर्णेतून विश्व उत्पन्न झाले त्याचे आकलन न झाल्याने तो आहे की नाही? ते तर्क सुरु झाले. भगवंताच्या पहिल्या स्फूर्णेला माया म्हणतात. तिने सर्व विश्व निर्माण केले म्हणावे तर ती भगवंताच्या आज्ञेत वागणारी, स्वतंत्र नाही.

     आणि मायेने निर्माण केलेले तर नाश पावते. म्हणून ज्ञानी माणसांचा विचार असा, सर्व मिथ्या येकसरें | उरलें तेंचि ब्रह्म खरें | ऐसीं वाक्यें शास्त्राधारें | बोलती  येक ||८-२-४३||श्रीराम||

     मधुकर म्हणाला, आजी! घर बांधताना वाळू, सिमेंट, दगड, विटा हे साहित्य वापरले. गडी, मजूर, गवंडी, सुतार यांनी श्रम घेतले. पण पैसा कोणाचा? पण पैसा कोणाचा? इनामदारांचा. इच्छा कोणाची? इनामदारांची. म्हणून घर नव्हे, हा मोठा वाडा कोणाचा? इनामदारांचा. वास्तविक यात इनामदारांनी काय केले? ते तर दूरच राहिले. तस्सेच ही माया ठेकेदार झाली.

     आजी म्हणाल्या, अगदी बरोब्बर!’ परमात्मा परमेश्वरु | सर्वकर्ता जो ईश्वरू| तयापासूनि विस्तारु | सकळ जाला ||८-३-१२||श्रीराम||

     सुधा म्हणाली, मग खरा देव कोण? हे जे सर्व दिसते ते जगत कोणी निर्माण केले? हा गोधळ माजायचे कारण काय?’

     आजी म्हणाल्या, मूळ परमेश्वर म्हणजे चैतन्य एकच. पण अज्ञानाने तो देहात रहातो म्हणून जीव म्हणतात. ज्ञान व अज्ञान अशा मिश्रीत मायेमुळे त्यालाच शिव म्हणतात. तो शिवस्वरूप भगवंत विश्वात रहातो. तेच ब्रह्म किंवा विश्वात्मा.

     विलास म्हणाला, देहापेक्षा जगत मोठे. म्हणून जीवापेक्षा शिव मोठा. मोठा म्हणजे व्यापक असे म्हणायला काय हरकत आहे?’

     आजी म्हणाल्या, बरोबर! त्या चैतन्यासच ज्ञान व शक्तीरूपास अनुसरून देव किंवा परमेश्वर म्हणतात. हे चैतन्य सर्वांत मोठे म्हणून परम + आत्मा = परमात्मा किंवा परम + ईश्वर = परमेश्वर म्हणतात.

     त्या परमात्म्याच्या ज्ञानमय अंगाला मूळपुरूष म्हणतात व शक्तीमय अंगाला मूळमाया म्हणतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू. तोच खरा देव, तोच खरा ईश्वर.

     मगाशी मधू म्हणाला नं, तोच दृष्टांत घेऊ या. मोठे इनामदार दूर असले तरी त्यांच्या इच्छेने व त्यांनी पुरविलेल्या पैशांनी हा वाडा बांधला.

     वाडा म्हणजे दृष्य विश्व. मोठे इनामदार म्हणजे परब्रह्म. त्यांची इच्छा म्हणजे मूळ माया. वाडा बांधला, पूर्ण झाला. त्यात माणसे राहू लागली. मुले खेळू लागली. दासबोध  वर्ग चालतो. तरी त्याचा इनामदारांना काहीही त्रास नाही. ते आहेत तस्सेच आहेत. त्याच जागी शांतपणे मुंबईत आहेत. पत्र, फोन निरोप यामुळे दूर असून सदैव वाड्यात असल्या सारखेच आहेत.

     मोठे इनामदार अधून मधून एखादे दिवशी येतात. काम झाले की जातात. तसा हा भगवंत अवतार घेतो. काम आटोपले की अवतार संपवतो. म्हणजे मूळ स्थानाला जातो. इनामदार जसे मुंबईला जातात तसे. मुंबई हे नांव समजण्यासाठी घेतले.

     आता कोणाला वाटेल; या आनंदपुरात इनामदारांचा वाडा बांधावा हे कां वाटले? याचे उत्तर इनामदारांशिवाय दुसऱ्या कोणालाच देता येणार नाही. केवळ त्यांच्या इच्छेनेच घडले इतकेच आपण म्हणू शकतो. त्यांना हा वाडा नको वाटला तर ते मोडून पाडून जमीनदोस्तही करतील.

     सुधा म्हणाली, आलं लक्षांत! मोठ्या इनामदारांचे जवळ अनेकांकडून कामे करून घेण्याची शक्ती आहे. आपण कल्पना करू या. मोठे इनामदार आराम खुर्चीत बसले आहेत. त्यांना एकाएकी आनंदपुरात वाडा बांधू असे वाटले. त्याबरोबर केव्हा कोठे कसे केवढे सारे विचार छान जुळले व आतल्या समाधानाने दिर्घ श्वास घेऊन हं. असे म्हणाले असतील.

     मधु म्हणाला, त्यालाच आपण म्हणू या. अहं ही स्फूर्णा परब्रह्माला झाली.

     तीच मूळ शक्ती म्हणजे मूळमाया. सुधा म्हणाली.

     गणपती म्हणाला, मग मी सांगतो. छोटे इनामदार काका मोठ्या इनामदार काकांच्या संमतीने प्रत्यक्ष काम करून घ्यायला आले.

     आजी म्हणाल्या, ते ब्रह्म म्हणजे इनामदारच. पण इच्छा परब्रह्माची म्हणजे मोठ्या इनामदारांची घेऊन आले म्हणून ईश्वर. तो ईश्वरच अनेक रूपांत भासतो. तेच हे दृष्य विश्व म्हणजे हा वाडा. सुधा ओव्या वाच. पंचभूतिक ब्रह्मगोळ| जेणें कळे हा प्रांजळ | दृश्य सांडून केवळ | वस्तुच पाविजे ||८-४-५७|| श्रीराम|| महाद्वार वोलांडावें | मग देवदर्शन घ्यावें | तैसें दृश्य हे सांडावें | जाणोनियां  ||८-४-५८|| श्रीराम||

     विलास म्हणाला, आता कळलं वाड्याचा मोठा दरवाजा ओलांडला की आम्ही आत्तापर्यत चौक, चारही पडव्या, खांब, मधले कारंजे हे पाहून यातच रमत होतो. नी खेळत होतो. आत्ता या दासबोधामुळे सरळ दिंडी दरवाज्यातून आत आलो की पाय धुवून पडवीवरच मारूतीरायासमोर येतो. तसेच भोवतालच्या विश्व पसाऱ्याला विसरून म्हणजे तिकडे न बघता आत काय बरं? हं. आठवले, सोहं सोहं हेच पहायचे असेच ना?’

     आजी म्हणाल्या, शाब्बास! बरंच लक्ष देऊन ऐकता हं. आता थोडी परिक्षा हं. मायेने दृष्य निर्माण केले. पाच जणांच्या मदतीने. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. जे जे कठीण व जड ती पृथ्वी. आत्ता येथे बसल्या बसल्याच पृथ्वी कशा कशा रुपात आहे बरं?’

     सुधा म्हणाली, हा वाडा, हे लाकडाचे खांब, ही सतरंजी, आणि आजी आपलं शरीर म्हणजे सुध्दा पृथ्वीच कां?’

     होय!’ आजी म्हणाल्या. आता जे जे मृदू आणि ओले ते आप. आता कोण सांगेल?

     मी सांगतो!’ विलास म्हणाला, डोणीतले पाणी, डोळ्यातले पाणी, तोंडातली लाळसुध्दा पाणीच. पावसाचे, नदीचे पाणी इतकेच काय नाना तऱ्हेची सरबते, बासुंदी, कढी सुध्दा आपच.

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या, जे जे गरम आणि प्रकाश युक्त ते तेज.

     आता जया म्हणाली, मी सांगते! सूर्य, अग्नी, होमातला, चुलीतला, स्टोहचा, अगदी समईतली ज्योत पण अग्नीच.

     छान!’ आजी म्हणाल्या, आता जीवंतपणा आणि हालचाल हे वायूचे लक्षण.

     मी सांगतो!’ गणपती म्हणाला, वारा सोसाट्याचा असो वा पंख्याचा, श्वास घेतो सोडतो तो पण वाराच. तोंडातली फुंकर तो पण वाराच.

     पोकळपणा आणि अवकाश हे आकाशाचे लक्षण. आजी म्हणाल्या.

     मधुकर म्हणाला, ज्या पोकळीत आपण वावरतो ते आकाशच. जमिनीत खड्डा खणला विहिर आड यातली पोकळी आकाशच.

     शाब्बास! सगळे पास हं. आता आपण दोन ओव्या लक्षांत ठेवू या. खोटें खऱ्यासारिखें भाविती | परी परीक्षवंत निवडिती |कां  कुरंगें  देखोन  भुलती|  मृगजळासी  ||८-५-६४||श्रीराम|| आतां असो हा दृष्टांत | बोलिला कळाया संकेत| म्हणौनि भूत आणि अनंत | येक नव्हेती ||८-५-६५||श्रीराम||

     विलासने शंका विचारली, कुरंगे म्हणजे काय?’

     सांगते!’ आजी म्हणाल्या, कुरंगे म्हणजे हरणे. सूर्य किरणांची हवा तापते. ही तापलेली हवा हलली की पाण्यासारखी वहाताना दिसते. त्याला हरणे भुलतात. लांब लांब पळत जातात. दमतात. त्या पाण्याच्या भासाला मृगजळ म्हणतात. हरणे फसतात. विलास फसेल कां? तो ओळखतो. हा भास आहे. तसा मायिक पसाऱ्याला जो जाणतो तो ज्ञानी. दृष्य पसारा खरा भासला तरी....

     तो नाशिवंत. विलासने वाक्या पूर्ण केले.

     आजी म्हणाल्या, म्हणून हे दृष्य ईश्वर नव्हे. अनंत नव्हे. ब्रह्म नव्हे.

     गणपती म्हणाला, आता समजलं, देह म्हणजे आत्मा नव्हे. ब्रह्म नव्हे. देह नाशिवंत. आत्मा शाश्वत.

     विलास म्हणाला, तो आत्मा म्हणजे देव नां? मग त्याचा वार कोणता?’

     मधुकर म्हणाला, विलास, पूजापाठा साठी आपण मानवांनीच मूर्ती कल्पिल्या. वारांची नांवे ठरवली. आता आत्मा हा मोठा देव. मग सगळेच वार त्याचे. वारच काय घेऊन बसलास, तूही त्याचाच, मीही त्याचाच. सगळे त्याचेच. तो सगळ्यांचा.

     आनंदच आनंद!!”

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा