रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

पडवीवरचा दासबोध, दिवस १४ वा

 

।।श्रीराम।।

पडवीवरचा दासबोध

लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर

दिवस १४ वा

     आज शनिवार. मारूतीला नुसताच नमस्कार न करता स्थानापन्न होऊन सर्वांनी एकसुरांत, भीमरूपी महारूद्र स्तोत्र म्हटले. सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलले होते. किती लवकर आपले पाठ झाले. हाच भाव जणू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

     आजी म्हणाल्या, बाळांनो! असाच अभ्यास ध्येयाप्रत पोहोचे पर्यंत जर कायम ठेवला तर सगळेच एकदम ब्रह्मानंदातला आनंत लुटाल. वेद्विद व्हाल.

     वेद्विद् म्हणजे काय?’ विलासने विचारले.

     विद् म्हणजे जाणणे, आजी म्हणाल्या, वेद्विद म्हणजे वेदातले जाणणारे, असे व्हाल. वेद हे आपल्या सनातन धर्माचे आद्य ग्रंथ आहेत.

     मी सांगतो वेदांची नांवे, मधुकर म्हणाला, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वेद. एकूण ज्ञानाच्या गठ्यांचे चार भाग व्यासांनी केले. त्यांना वेदो व्यास: असे म्हणतो नां?’

     होय! पण मधू, या वेदांत कांही सामर्थ्य नाही असे म्हणणारे पण काही पढतमूर्ख समर्थांना आढळले. आजी म्हणाल्या, म्हणून समर्थांनी ठासून सांगितले. वेदा आंगीं सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे | म्हणौनि वेदीं  सामर्थ्य असे जन उधरावया ||७-६-२९||श्रीराम||

     मानव देहांतील जीवाला ब्रह्मज्ञान करून देण्याचे सामर्थ्य वेदात आहे. ब्रह्मज्ञानाने जीव मुक्त होतो. जया तू वाच पुढची ओवी. आजी म्हणाल्या. वेदशास्त्रपुराण | भाग्य जालियां श्रवण | तेणें होईजे पावन | हें बोलती साधु ||७-६-३१||श्रीराम||  

     आजी म्हणाल्या, साधू म्हणजे......

     विलासने त्यांचे वाक्य पूर्ण केले. साधू म्हणजे नुसते दाढी जटा वाढविलेले बैरागी नव्हेत. साधु म्हणजे संत, सज्जन, ब्रह्मानुभवी, समर्थांसारखे, ज्ञानेश्वर, एकनाथ, गोंदवलेकर महाराज यांच्या सारखे. ब्रह्मभेट साधून देतात त्यांना साधू म्हणतात.

     बरोबर!’ आजी म्हणाल्या, संतांचे म्हणणे असे की वेदाचा वरवर अभ्यास करून चालत नाही. त्यातला गूढार्थ कळायला हवा. तो जर पूर्ण कळाला नाही तर धड ना प्रपंच, ना धड परमार्थ अशी स्थिती होते.

     विलास म्हणाला, आम्हाला कुठे आहे प्रपंच?’

     आजी म्हणाल्या, बाळांनो! तूर्तास शाळा, घर, खेळ, अभ्यास हाच तुमचा प्रपंच. सध्या तुम्ही एकीने वागता, ओढीने येता, प्रेमाने दासबोधाचा अभ्यास करता. थोडे थोडे अध्यात्मिक शब्द पण कळू लागले आहेत. पुस्तकी ज्ञानापेक्षा जरा वेगळे ज्ञान वाढावे ही जिज्ञासा उत्पन्न होऊ लागली आहे.

     आता शाळा सुरू झाल्यावर देहात्म बुध्दीमुळे या स्वस्वरूपाचा म्हणजे ज्ञानाचा विसर पडला तर आपण पुन्हा खेळांत, खाऊत बुडू. ध्येय गाठायचे प्रयत्न अपुरे पडतील हीच बध्दता.

     आजी! पण... मधुकर म्हणाला, जर आम्ही या मिळवलेल्या सोहं ज्ञानाचा विसर पडू दिला नाही तर थोडे इतरांच्यातही मिसळू. थोडे खेळू. पण सतत अभ्यास करून ध्येय गाठू. म्हणजे आम्ही काय साधले म्हणायचे?’

     जीवनमुक्तता!’ आजी म्हणाल्या, सध्या विद्यार्थी दशेतली ही जीवनमुक्तताच. इतरांसारखे वावरलो तरी आत विस्मरण होऊ द्यायचे नाही. आपल्याला झालेल्या ज्ञानाचा गवगवापण करायचा नाही. शाळेतला व्यावहारीक ज्ञानाचा अभ्यास व सकाळ संध्याकाळ हा पारमार्थिक अभ्यास दोन्ही चालू ठेवलात की कृतार्थ व्हाल. जीवन सार्थकी लागेल.

     पण धोका कुठे आहे माहीत आहे? समर्थांनी ती धोक्याची जागा पण दाखवली आहे. मी वाचतो, गणपती म्हणाला. मुक्तपणाची  पोटीं  शिळा  |  बांधतां  जाईजे पाताळा | देहबुद्धीचा आगळा | स्वरूपीं न संटे ||७-६-५३||श्रीराम||

     छान!’ आजी म्हणाल्या, पोटाला दगड बांधून कधी कोणाला पोहता येईल कां?’

     नाही! तो बुडणारच. विलासने उत्तर दिले.

     तस्सेच! मी मुक्त. हा अहंकाराचा दगड जीवन सागरांत बुडवणारच. आजी म्हणाल्या, देहबुध्दीचा अडसर स्वस्वरुपाकडे जाऊ देत नाही. म्हणून काय करावे?’ तत्त्वज्ञाता परमशुद्ध | तयासी नाहीं मुक्त बद्ध | मुक्त  बद्ध  हा विनोद  |  मायागुणें  ||७-६-५६||श्रीराम||

     शुध्द ब्रह्मज्ञानी, बध्द मुक्त भेद मानीतच नाही. ही त्या मायेच्या गुणांची करामत आहे असे समजतो व ध्येयाला सोडत नाही.

     जया म्हणाली, पण आजी! आम्हाला हे कसे जमेल?’

     जमेल! जमेल!!’ आजी म्हणाल्या. सवे लावितां सवे पडे | सवे पडतां वस्तु आतुडे | नित्यानित्यविचारें  घडे  |  समाधान  ||७-७-१५||श्रीराम||

     मनाला जशी सवय लावावी तशी लागते. ब्रह्म चिंतनाची सवय लावली तर ब्रह्म साक्षात्कार होईलच. पण नित्य काय अनित्य काय हेही कळेल. त्यामुळे समाधान अखंड राहील. पण सध्या आपण कोणत्या स्थितीत आहोत? वाच विलास तू वाच. मनास कल्पायाची सवे | मनें कल्पिलें तें नव्हे | तेणें गुणें संदेह धांवे | मीपणाचेनि पंथें ||७-७-४३||श्रीराम||

     शाब्बास!’ आजी म्हणाल्या. मन जी जी कल्पना करील, ते ब्रह्म नव्हे. असं समजता समजता कल्पना खोटी ते पटते. मग मी पणाचा जोर वाढतो. संशयाचे भूत मानगुटीवर बसते. 

     विलास चटकन म्हणाला, भूत, प्रेत, समंधादि रोगव्याधी समस्तही ।

     हसत हसत आजी म्हणाल्या, ते खरंच! पण सारखातरी मारूतीरायांना त्रास कशाला द्या? मीपणाच घालवला की काम सोपे.

     गणपती म्हणाला, हो पण तो कसा घालवायचा?’

     आजींनी सुधाला ओवी वाचायला सांगितली. मीपण जाणोनि त्यागावे | ब्रह्म होऊन अनुभवावे | समाधान  ते  पावावे  |  निःसंगपणे   ||७-७-५२||श्रीराम||

            बघा!’ आजी म्हणाल्या, तीनच गोष्टी लक्षांत ठेवायच्या आहेत. १) मीपणा समजून घेऊ त्याचा त्याग करायचा. २) आपण ब्रह्मस्वरूप होऊन त्याचेशी तदाकार व्हायचे. ३) माझेपणाने कोणत्याही दृष्य वस्तूत अडकून पडायचे नाही.

     देहबुध्दी असते तोपर्यंत मीपणा असतो. भगवंत माझेकडून सारे काही करवून घेतो, अशी भावना पक्की झाली की जे समाधान मिळते ते उच्च कोटीतले असते. त्याकरीता समर्थ एक तोडगा सांगतात.

     तोडगा म्हणजे काय?’ विलास म्हणाला.

     तोडगा म्हणजे उपाय. ही ओवी वाच तू.आजी म्हणाल्या.

     विलासने ओवी वाचली. पदीहून चळों नये | करावें साधन उपाये | तरीच सांपडे सोये | अलिप्तपणाची ||७-७-५९||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, वा! वा! ब्रह्म स्वरूप हे आपले मूळचे पद. हे पक्के ध्यानांत ठेवले, की कशात न गुंतता, मीपणात न अडकता, अलिप्त कसे रहावे ही युक्ती कळते. ही युक्ती आत्मसात होण्यासाठी समर्थ म्हणतात, श्रवणें निश्चयो घडे | श्रवणें ममता मोडे | श्रवणें  अंतरीं  जडे  |  समाधान  ||७-८-४||श्रीराम||

     मी सांगतो अर्थ. विलास म्हणाला, समर्थ म्हणतात, नित्य श्रवण घडले, अध्यात्म ज्ञानाचे ग्रंथ वाचले, किंवा ऐकले तर निश्चय करण्याची शक्ती वाढते. निश्चय पक्का होतो. दृष्याबद्दलचा माझेपणा नाहीसा होतो. म्हणजे माझच पहा नां, हे मी पुस्तक माझंच आहे. मी कोणाला देणार नाही असे जे म्हणत होतो. ते श्रवणाने पटले की असे म्हणू नये. नित्य श्रवणाने अंतरंगात समाधान लाभते. मुख्य वैभवातले पहिले वैभव पूर्ण समाधान.

     आजी म्हणाल्या, समर्थांना श्रवणाचे महत्व फार पटले होते. खूप खूप फायदे श्रवणाने होतात. पण जर कां आळसं डोकावला तर?’ आळसाचें संरक्षण | परमार्थाची बुडवण | याकारणें श्रवण | केलेंचि  पाहिजे ||७-८-४९||श्रीराम||

     आळसाला थारा न देता खऱ्या अभ्यासकाने म्हणजे साधकाने पुन्हा पुन्हा आभ्यास करावा. स्वत: वाचावे किंवा ऐकावे. पण वाचलय एकदा, ऐकलय एकदा असे उडवून लाऊ नये. पुन्हा पुन्हा ऐकताना काहीतरी नवीन कळू लागते. त्याने समाधान वाढते. आणि होss कोठे कसा अभ्यास करावा. हे पण सांगायला समर्थ विसरले नाहीत. कोण बरं वाचेल?’

     सगळेच मी मी म्हणू लागले. विलास गणपती एकमेकांना ढकलू लागले. आजींनी सुधापासून अरिंग मिरिंग लवंगा तिरिंग मोजायला सुरवात केली. शेवटी मधुकर राहिला. त्याने ओवी वाचली. आत्मज्ञानी येकचित्त | तेणें पाहाणें अद्वैत | येकांत  स्थळीं  निवांत | समाधान ||७-९-२७||श्रीराम||   

     आजी म्हणाल्या, एकाग्र चित्त हे फार महत्वाचे. अभ्यासाचे पुस्तक सुध्दा एकांतात एकाग्र चित्ताने वाचले तर अभ्यास चांगला होतो. तसेच अध्यात्म ग्रंथांचे आहे.

     विलास म्हणाला, आजी! दासबोधाला पुस्तक कां नाही म्हणायचं? ग्रंथ आणि पुस्तक यात काय फरक आहे?’

     विलास तुझी शंका. तूच ओवी वाच. आजी म्हणाल्या. जेणें परमार्थ वाढे | आंगीं अनुताप चढे | भक्तिसाधन आवडे | त्या नाव ग्रंथ ||७-९-३०||श्रीराम||

     आजी म्हणाल्या, ग्रंथात करमणूक नसते. थट्टा विनोद नसतो. केवळ अद्यात्म ज्ञान प्रतिपादन केलेले असते. भक्ती मार्ग वाढीला लागेल, अशी साधना त्यात सांगितलेली असते. परोपकर वृत्ती वाढीस लागते, धैर्य उत्पन्न होते, चुका लक्षांत येतात, कृतकृत्यांचा पश्चाताप होतो हे ज्यांत अधिक करून सांगितलेले असते त्यांना ग्रंथ म्हणतात.    

     आणि बरं कां बाळांनो, एक लक्षांत ठेवू या. जितां नाहीं भगवद्भक्ती | मेल्यां कैंची होईल मुक्ती | असो जे जे जैसें करिती | ते ते पावती तैसें ||७-१०-२२||श्रीराम||

     जीवंतपणी भगवंताचे भजन पूजन केले नाही. पण उत्तम ठिकाणी, चांगल्या तीर्थाला, सुटीच्या वारी सकाळी, पलंगावर सर्व माणसे भोवताली असता मृत्यू आला म्हणजे तो जीव मुक्त झाला असे म्हणता येईल कां?’

     या मृत्यू लोकांत आपण ज्या ज्या भावनेने जे जे कर्म करू त्या त्या प्रमाणेच आपल्याला फळ मिळणार. म्हणून साधकाने नक्की काय करावे?’

     आजींचे बोट नक्की कोठे आहे, ते पाहून जयाने वाचायला सुरवात केली. जो ये ग्रंथींचा विवेक | विवंचूनि पाहे साधक | तयास  सांपडे  येक | निश्चय ज्ञानाचा ||७-१०-४५||श्रीराम|| 

     आजी! विवंचुनि म्हणजे विचार करून असेच नां?’ मग मी सांगतो अर्थ. विलास म्हणाला. या दासबोधात समर्थ म्हणतात हं. या दासबोधात जे जे विचार मांडले आहेत. त्यावर साधकाने नीट विचार करावा. विचाराअंती साधकाला नक्की कळेल की, आत्मज्ञान म्हणजेच स्वस्वरूप ज्ञान. समर्थांनी हे वारंवार पटवून दिले आहे.

     आजी म्हणाल्या, छान अर्थ सांगितलास. दासबोध मराठीत असला तरी संस्कृत ग्रंथात जे ज्ञान आहे ते सर्व या ग्रंथात आहे. ही ओवीच वाच नां.

     सुधाने ग्रंथ आपल्याकडे घेतला. कोणती वाचू?’ आजींनी बोटाने दाखवीले. प्राकृतें वेदांत कळे | सकळ शास्त्रीं पाहातां मिळे | आणी  समाधान  निवळे  |  अंतर्यामीं  ||७-१०-४७||श्रीराम||   

     आजी म्हणाल्या, बाळांनो! संस्कृत ग्रंथाचे आकलन व्हायला वेळ लागेल. शब्दांच्या अर्थाची उकल सहजी लक्षांत येणार नाही, म्हणून संतांनी आपल्यावर केवढे उपकार करून ठेवले आहेत. तरी आम्हाला कळत नाही म्हणणारे महाभाग आहेतच.

     ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीत सांगितला. त्या ग्रंथाचे नाव भावार्थ दीपिका. पण त्याला म्हणतो ज्ञानेश्वरी.

     त्याहीपेक्षा सोप्या रोजच्या बोली भाषेतील मराठीत समर्थांनी दासबोध ग्रंथ रचला. त्यांत काय नाही? थोरांच्या साठी पोरांच्या माठी खूप खूप विचार सांगितलेत. विशेष म्हणजे स्वत: प्रपंच केला नाही, तरी नेटका प्रपंच करतानाच परमार्थ कसा साधेल ते युक्ती युक्तीने सांगितले.

     गणपती म्हणाला, आणि आता आपण जे अभ्यासतो आहोत. मला आत्तापर्यंत वाटत होतं या दासबोधांत  मुलांच्या करीता काय असणार? मोठ्या माणसांनी वाचायचा ग्रंथ हा.

     मधुकर म्हणाला, भ्रमाचा भोपळा फुटला. आता आपण ग्रंथ अभ्यासून सोडून नाही द्यायचा. ते विचार आचरणांत आणायचे.

     मी पणाचा त्याग करायचा. विलास म्हणाला.

            ब्रह्मस्वरूपाशी तदाकार व्हायचं, सुधा म्हणाली.

     माझेपणाने कशात अडकायचे नाही. गणपती म्हणाला.

     दिवसाकाठी एकांतात एकाग्रचित्त थोडावेळ तरी भगवंताचे स्मरण करायचे. जया म्हणाली.

     केलेला निश्चय शेंडी तुटो की पारंबी तुटो बिघडवायचा नाही. मधुकर म्हणाला.

     शाब्बास!’ आजींनी टाळ्या वाजवल्या. सर्वांनाच आनंद झाला. सर्वजण एकदम म्हणाले. महारुद्र हनुमान की जय!”

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा