शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

षड्रिपु निरूपण, समास सहावा-प्रपंच निरूपण

 

।। श्रीराम ।।

समर्थ रामदास स्वामी यांचे अपरिचीत वाङ्मय

षड्रिपु निरूपण

समास सहावा-प्रपंच निरूपण

     प्रपंच साहवा वैरी परत्र अंतरी दुरीं ।

     अवघा तोचि तो जाला तेणें देव दुरावला ।।१।।श्रीराम।।

     पदार्थी बैसली बुध्दि शुध्दि नाहीं परत्रिची ।

     प्रपंच शेवटी कैंचा गेल्या देहेच हातिंचा ।।२।।श्रीराम।।

     देव तो राहिला दूरीं ऐसा वैरी प्रपंच हा ।

     बाळत्वी छंद मायेचा खेळतां राहिला दुरीं ।।३।।श्रीराम।।

     लागला छंद पोरांचा क्षणक्षण चुकावितो ।

     सांगते माय मानेना लिहीना ना घरी असे ।।४।।श्रीराम।।

     हाणिती मारिती पोरें रडतो पडतो बहू ।

     सोशितो आपुल्या जीवें खेळासाठीं मुलांकडे ।।५।।श्रीराम।।

     काहींसा शाहणा जाला शिकवीला परोपरी ।

     लोभानें लग्नही केलें वोढला सासुऱ्याकडे ।।६।।श्रीराम।।

     नोवरी आवडे जीवीं नटावेंसें मनी उठे ।

     तारूण्य बाणतां अंगी कामलोभेंचि भूलला ।।७।।श्रीराम।।

     खेळ तो राहिला मागें काम तो पडिला पुढे ।

     मोहिला शक्तीनें प्राणी तीजवांचोनि नावडे ।।८।।श्रीराम।।

     उदंड जाहलीं पोरें खर्च तो वाढला पुढें ।

     उद्वेग लागला जीवा मेळवीतां मिळेचिना ।।९।।श्रीराम।।

     उदंड करंटा जाला हिंडे चहुंकडे फिरे ।

     प्रीति ते राहिली मागें अशक्त जाहला बहू ।।१०।।श्रीराम।।

     फिटेना रिण ते वाढे ताडातोडी चहूंकडे ।

     मिळेना अन्न ना वस्त्र वृध्दाप्ये खंगला बहु ।।११।।श्रीराम।।

     कष्टला शेवटां मेला गेला प्रपंच हातिंचा ।

     घातला मागुती जन्मा ऐसा वैरी प्रपंच हा ।।१२।।श्रीराम।।

     जन्मासि घातलें देवें काय येऊनि साधिलें ।

     भुलले चुकले देवा प्रपंच घातकी पहा ।।१३।।श्रीराम।।

     आधींच सर्व जाणावें काय येतें समागमें ।

     निर्वाणीं अंतिचा देवो काणी येकें चुकों नये ।।१४।।श्रीराम।।

     घर घांव ठाव माझा वाडे शेत मळे गुरें ।

     पुत्र कन्या वधू माझी सर्व सांडोनि चालिला ।।१५।।श्रीराम।।

     माझें माझें म्हणे वेडा स्वार्थबुध्दी बहूतसी ।

     सर्व सांडोनि गेला रे येकायेकीं उठोनियां ।।१६।।श्रीराम।।

     प्रपंचे भुलला प्राणी व्यर्थ आयुष्य वेंचलें ।

     देव ना धर्म कांही ऐसा हा साहवा रिपु ।।१७।।श्रीराम।।

     प्रपंचाकारणें कष्टी सर्वस्वें वेंचला जिवें ।

     कांहिच संचिले नाहीं शेवटीं हात झाडिला ।।१८।।श्रीराम।।

     अपेशीं सदाचा जाला मायाजळेंचि भूलला ।

     आपुलें मानिलें जें जें तें तें सर्वत्र राहिलें ।।१९।।श्रीराम।।

     जाहला खोत पापाचा सर्वांच पाप घेतलें ।

     यातना भोगणें लागे चुकला शाहणा कसा ।।२०।।श्रीराम।।

     आधींच जाणिजे सर्व विवेकी त्यास बोलिजे ।

     प्रपंच नाथिला वा रे वैरी हा सोडिला कसा ।।२१।।श्रीराम।।

     सर्वांसि योग साधना पुण्य उदंड पाहिजे ।

     सहस्त्रमाजिं तो एक ज्ञानवैराग्य नेटका ।।२२।।श्रीराम।।

     षड्रिपू जिंकिले जेणें तोचि ज्ञानी महाभला ।

     दिक्षेनें उध्दरी लोकां वैरागी तो उदासिनु ।।२३।।श्रीराम।।

     इति प्रपंच निरूपणं ।।श्रीराम।।

।। जय जय रघूवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा