।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर
दिवस ११ वा
मधुकर सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन आला होता.
मारुतीपुढे डबा ठेवून त्याने सर्वांनाच वंदन केले. आजी सगळ्यांना नमस्कार करून
जागेवर बसतात हे त्याने निरखून पाहिले होते.
‘आज विशेष,’ गणपतीने विचारले.
‘आमचेकडे आज सत्यनारायणाची पूजा झाली.’ मधू म्हणाला, ‘आईने
सर्वांना देण्याकरीता प्रसाद दिला. तो घेऊन आलो. दासबोध अभ्यासून झाला की वाटू
यां.’
आजींच्यासह सर्वांनी होकार
दिला.
‘आजी! मी आज
सुरुवातीपासून अगदी आरतीपर्यंत पूजा पाहिली. तोडांने आपण सत्यनारायण म्हणतो. पण बाबांनी
बाळकृष्णाची मूर्ती ताम्हणांत ठेवली होती. तोच नारायण कां? तोच तेवढा सत्य कां? बाकीचे देव कां असत्य?’
गणपती म्हणाला, ‘असे कसे म्हणतोस?
आमचेकडे सत्य विनायकाची पूजा झाली होती. म्हणजे विनायक पण सत्यच. मग शंकर नाही
सत्य कां? देवी सत्य नाही कां? सत्य मारूतीची पूजा कधी कोणी ऐकली आहे?’
त्यांना
थाबवून आजी म्हणाल्या, ‘किती किती प्रश्न हे? बाळांनो देवघरांत सर्वच मूर्ती आपण आपल्या आवडीप्रमाणे पुजतो. पण
समर्थ म्हणतात,’ ब्रह्मा
विष्णु आणि हर | त्यांसी निर्मिता तोचि थोर | तो वोळखावा परमेश्वर | नाना यत्नें ||६-१-१२||श्रीराम||
बाकीच्यांचा अनादर करू नये. खरा देव
जाणता येत नाही तोपर्यंत भक्तीभाव वाढीस लागेल ते जरूर करावे. आजींनी दासबोध उघडून
ओवीपाशी बोट ठेवले मात्र. आजींच्या हातातच दासबोध तरी जयाने वाचले. ..... जो
जाणेल भगवंत | तया नाव बोलिजे संत | जो शाश्वत आणि अशाश्वत | निवाडा करी ||६-१-१६||श्रीराम||
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘देवघरातल्या मूर्ती नीट जपल्या तर पिढ्यानु पिढ्या रहातात. नाहीतर एखादी मूर्ती
निर्माल्याबरोबर गायब होते.’
‘आमच्याकडचा नर्मदा गणपती असाच हरवला.’ मधुने पुष्टी दिली.
आजी म्हणाल्या, ‘मातीची मूर्ती, काचेची मूर्ती, फुटते. पाण्याने
खराब होते. त्यांना देवाच्या प्रतिमा मानू या. पण खरे देव नव्हेत. जो कायम टिकतो
तो खरा देव. त्याला ओळखणे ही खरी विद्या. बाकीच्या पोटभरू विद्या.’
पोटभरू शब्द उच्चारल्या
बरोबर सुधाने दासबोध हातात घेतला. येवं पोट भरायाची विद्या | तयेसी म्हणों नये सद्विद्या | सर्वव्यापक वस्तु सद्या| पाविजे तें ज्ञान ||६-१-२३||श्रीराम||
‘ठिक!’ आजी म्हणाल्या. ‘या शुध्द ज्ञानानेच म्हणजे आत्मज्ञानानेच
परब्रह्म शक्तीला ओळखायचे. ही कला संतापाशी शिकायची.’
‘गणपती! या पुढच्या ओव्या
तूच वाच.’ आजींनी त्याच्या हातात दासबोध दिला. गणपतीने खसा
खाकरला व वाचले..... जें शस्त्रें
तोडितां तुटेना | जें
पावकें जाळितां जळेना | कालवितां
कालवेना | आपेंकरूनी ||६-२-१६||श्रीराम|| जें वायोचेनि उडेना | जें पडेना ना झडेना | जें घडेना
ना दडेना | परब्रह्म तें ||६-२-१७||श्रीराम||
विलास म्हणाला, ‘मी अर्थ
सांगतो. जे शस्त्राने तुटत नाही. पावके.... पावके म्हणजे.’
आजींनी सुचवले, ‘पावक म्हणजे अग्नी.’
विलास म्हणाला, ‘हं बरोबर, जे अग्नीने जळत नाही. पाण्याने भिजत
नाही. वाऱ्याने उडून जात नाही. जे कधी पडत नाही. म्हणजे घरं पडतात, झाडे पडतात तसं
जे पडत नाही. झिजत नाही, जे कधी घडवल म्हणजे तयार केल जात नाही. जे लपून रहात नाही
त्याला परब्रह्म म्हणतात.’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘मनुष्य जेवढे पहातो ते सत्य खरे टिकावू समजतो.
उलट ही परब्रह्म शक्ती व्यापक, सर्वत्र
असलेली पण डोळ्यांनी दिसत नाही त्याला लोक जाणत नाहीत. यासाठी विवेक ही शक्ती
वाढवावी. विवेकाने, खोल चिंतनाने त्या परब्रह्मास ओळखावे. तसे साधले की, संसारीं पुंडावें चुकलें | देवां भक्तां ऐक्य जालें | मुख्य देवास वोळखिलें | सत्संगेंकरूनि ||६-२-४५||श्रीराम||
या संसारातील हिसका हिसकी, हेवे दावे, देणे घेणे
सारे काही चुकते. विराम पावते. विचार शांत होतात. देव व भक्त एकच होतात. आणि मुख्य
देव सापडल्याचा आनंद होतो.’
‘मधुकर! कळला आता खरा
नारायण?’ ही बघ ओवी समर्थ सांगतात.’
मधुने ओवी वाचली, .... अविनाश तें
ब्रह्म निर्गुण | नासे
तें माया सगुण | सगुण आणी निर्गुण | कालवलें ||६-३-६||श्रीराम||
“छान!” आजी म्हणाल्या, ‘जे कधी नाश पावत नाही ते परब्रह्म निर्गुण. व जी
नाश पावते ती माया सगुण. ती माया परब्रह्मातूनच निर्माण झाली. म्हणून तिच्यात दोन
अंगे एक निर्गुण आणि दुसरे सगुण. आपण सगळे दोन्हीच्या मिश्रणांत आहोत.’
गणपती म्हणाला, ‘म्हणून आपण त्या मिश्रणातले चांगले घ्यायचे व
वाईट ते टाकायचे असेच नां?’
‘उसातला रस घ्यायचा, चोयट्या टाकायच्या.’ विलास म्हणाला.
‘शहाळ्यातलं पाणी घ्यायचं, शहाळं टाकायचं,’ जया म्हणाली.
‘नारळातलं खोबरं घ्यायचं, करवंटी टाकायची.’ सुधा
म्हणाली.
आजी हसल्या, ‘अगदी बरोबर आहेत दृष्टांत. रस, पाणी, खोबरं घेतलं
की चोयट्या, शहाळं, करवंटी त्याज्य! असे आपण व्यवहारात
म्हणतो पण त्यातही परब्रह्म शक्ती असतेच. ही बघ ओवी. जया वाच.’ जें जें कांहीं
निर्माण जालें | तें तें आधींच ब्रह्में व्यापिलें | सर्व नाशतां उरलें | अविनाश ब्रह्म ||६-३-१८||श्रीराम||
‘म्हणजे आजी!’ जया म्हणाली, ‘विहिरीत बादली सोडली. तिच्या आतपण पाणी बाहेरपण
पाणी. बादलीवर ओढून घेतली तरी विहिरीत पाणी आहेच आहे.’
‘बरोबर! अगदी तस्संच!’ आजी म्हणाल्या. ‘विहिरीतलं
पाणी बादलीत. बादलीतलं पाणी घंघाळात. घंघाळातल लोटीत. लोटीतल पाणी वाटीत. तरी पण पाणी तेच.’
‘हे पाणी जसं चार पाच ठिकाणी विभागलं तसं
परब्रह्माचं काय झालं?’ विलासने शंका विचारली.
‘सांगते!’ आजी म्हणाल्या, ‘परब्रह्मातून स्पूर्ती रूपाने माया
निर्माण झाली. मायेने पोकळी म्हणजे आकाश व्यापले. हालचाल झाली. तो वायू उत्पन्न
झाला. वायूपासून अग्नी उत्पन्न झाला. अग्नी म्हणजे तेज. अग्नीपासून पाणी, पाण्याला
म्हणतात आप. पाण्यापासून पृथ्वी तयार झाली. पृथ्वीवर वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी,
मानव तयार झाले. खेळच खेळ मायेचा.’
‘या खेळात जो गुंतला तो म्हणतो कोहं आणि
विवेकी म्हणतो...’
सुधा
म्हणाली, ‘थांबा
आजी! ही
पहा ओवी’
... तत्वीं गुंतला म्हणे कोहं | विवेक पाहातां म्हणे सोहं | अनन्य होतां अहं सोहं | मावळलीं ||६-३-३५||श्रीराम।।
आजी
म्हणाल्या, ‘विलास
अनन्य भावाने कुणाला नमन करायचे? त्याने काय होते?’
‘सांगतो!’ विलास म्हणाला, ‘नुसत नमन नाही. शरण जायचं. त्यांच्या
वचनावर विश्वास ठेवायचा. कोणाच्या? संतांच्या. म्हणज आत्ता समर्थांच्या
वचनावर विश्वास ठेवून ऐकायचं. म्हणजे कोहं सोहं बंदच. कोहं म्हणजे मी कोण? आणि सोहं म्हणजे तो मीच. संत वचनामृताने
सर्वच मिटले. मी आत्मा.’
‘छान!’ आजींनी शाबासकी दिली. ‘आता थोडा खेळ हं!’ ब्रह्माच्या अगदी विरुध्द मायेची
लक्षणे आहेत. ‘मी
जे लक्षण सांगेन त्याच्या विरूध्दचे लक्षण बोटाने विचारेन त्यानेच सांगायचे. गोंधळ
करायचा नाही.’
सारे
नीट सावरून बसले. आजींचे बोट कोणाकडे येते इकडे लक्ष.
आजी- ब्रह्म निर्गुण.
विलास- माया सगुण.
आजी- ब्रह्म दिसेना, भासेना.
गणपती- माया दिसते, भासते भ्रम निर्माण करते.
आजी- ब्रह्म उपजेना, मरेना.
जया- माया उपजे, माया मरे म्हणजे नासे. नाश
पावते.
आजी- माया तूटे, विटे.
मधु- ब्रह्म तुटेना, विटेना.
आजी- माया विकारी सर्वकरी.
सुधा- ब्रह्म अविकारी, काहीच न करी. ‘
पण आजी एक विचारू? ब्रह्माच्या आज्ञेशिवाय माया काहीच
करू शकत नाही नां? म्हणजे सर्व काही करतो तो ब्रह्मच. आणि काहीच करत नाही हे तरी कसं
म्हणायचं?’
‘हिने खेळ मधेच थांबवला.’ विलासची तक्रार.
‘असू दे!’ आजी म्हणाल्या. ‘शंका मनात ठेवू नये. सुधा परब्रह्म
मायेला फक्त आज्ञाच देतो असे नव्हे तर शक्तीही पुरवतो. तिच्यावर सारे सोपवतो व आपण
अलिप्त रहातो. हे अलिप्तपण आपल्यात आले की आपण ज्ञानी झालो म्हणायचे! परब्रह्माला हे सहज जसते म्हणून त्याला
म्हणतात, ब्रह्म अलिप्त.’
आजींनी
विलासकडे पाहिले, विलास बोल, ब्रह्म अलिप्त.
विलास
चुळबुळ करू लागला. खट्टू झाला.
सुधा
म्हणाली- माया लिप्त.
विलास
मनातच लिप्त अलिप्त दोन तीन वेळा म्हणत राहीला.
आजी-
ब्रह्म थोर.
विलास-
माया लहान.
आजी-
माया प्रत्यक्ष.
मधुकर-
माया अप्रत्यक्ष.
आजी-
माया लक्ष.
गणपती-
ब्रह्म अलक्ष.
आजी-
माया अल्प.
सुधा-
ब्रह्म विशाल.
विलास
मध्येच म्हणाला. ‘सुधाला कसं चटकनं येतं. मग मीच का गांगरतो. आजी मी घेऊ कां खेळ.’
‘घे! घे!’ आजी म्हणाल्या.
विलास-
ब्रह्म कोमल.
गणपती-
माया कठीण.
विलास-
ब्रह्म अविनाशी.
मधुकर-
माया नासे.
विलास-
ब्रह्म घडे.
गणपतीने
त्याच्या मांडीवर एक चापटी मारली. विलासराव, ब्रह्म घडेना म्हणा. आता मी सांगतो,
माया घडे.
विलासने
त्याला चापटी मारत म्हटले, मी मुद्दामच उलटे सांगितले. म्हटल तुझं लक्ष आहे की
नाही?
आजी
हसल्या. सगळेच हसले.
आजी
म्हणाल्या, ‘बाळांनो! आपण नदीकाठी गेलो. काठावरच घाटाच्या
पायरीवर बसलो व नदीच्या पात्राकडे पाहिले की काय भास होतो?’
गणपती
म्हणाला, ‘पाण्यांत
झाडे उलटी दिसतात. पलीकडच्या काठावरची माणसे पण पाण्यांत उलटी दिसतात.’
मधुकर
म्हणाला, ‘इतक्या
उंचीवरचे आकाश पाण्यांत दिसत. पण ते तर पाण्यापासून कीती दूर अलिप्त दूर अंतरावर
असतं.’
आजी
म्हणाल्या, ‘तस्सांच
परमात्मा म्हणजे परब्रह्म, अगदी काय म्हणायचं विलास लिप्त की अलिप्त.’
कोण
माया की परब्रह्म? विलासने विचारले.
गणपती
म्हणाला, ‘आता
प्रश्न ब्रह्माचा चालला आहे. लक्ष कुठे आहे तुझं!’
विलास
म्हणाला, मी तेच घोकत होतो. लिप्त अलिप्त. ब्रह्म लिप्त, नाही नाही ब्रह्म अलिप्त.
माया लिप्त. पुन्हा सगळे हसले.
‘आजी हसू दे सगळ्यांना,’ मी एकटाच सागतो, ‘ब्रह्म अखंड, माया खंडीत. ब्रह्म पडेना
माया पडे. ब्रह्म विकारी, जीभ चावत, नाही नाही, ब्रह्म अविकारी माया विकारी.
ब्रह्म अरूप, माया रुपधारी. ब्रह्म निश्चळ, माया चंचळ. ब्रह्म अभंग, माया भंगते. आणखी आणखी...
आजी
म्हणाल्या, ‘खूप
सांगितलेस व छान सांगितलेस! संत महिमा अगाधच. आपल्याला येत नाही असं वाटतं. पण संतकृपा झाली की
बुध्दीला उजळा मिळतो, बुध्दी सूक्ष्म होते. ब्रह्म सूक्ष्म.’
विलास
म्हणाला- माया स्थूल.
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या, ‘आला लक्षांत संतांचा मोठेपणा! जगांत आत
बाहेर भरून असलेला परमात्मा ते प्रचितीला आणून देतात.’
‘पण आजी आत्ता तर दासबोध रूपाने समर्थ
आहेत. प्रचिती कोणती?’ विलासने विचारले.
‘नाही लक्षांत आलं?’ आजी म्हणाल्या, ‘बोलता बोलता मी सूक्ष्म म्हटल्याबरोबर
तुला स्थूल सूक्ष्म असे स्फुरले नां? ते आत्मप्रचितीच्याच प्रेरणेने.
बुध्दी विचारशील झाली की, योग्य तेच स्फुरते. बुध्दीची सूक्ष्मता मनाला खेचून
घेते. त्यामुळे मन स्वच्छ नी सुंदर बनते. या क्षणाला एवढी प्रचिती पुरे.’
‘जसा जसा अभ्यास वाढेल तसा तसा ज्ञानाचा
अनुभव येईल. अधिक अधिक येईल. मग आनंदच आनंद.’
आज
खेळातून आनंद मिळाला. आज प्रसाद विलासच वाटेल.
सगळ्यांनी
होकार दिला. प्रसाद वाटप झाले.
आजींनी
नमस्कार केला.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा