समर्थ रामदास स्वामी यांचे अपरिचीत साहित्य
षड्रिपु निरूपण
समास चौथा-मत्सर निरूपण
मद तो तिसरा शत्रु चौथा
मत्सर आइका ।
मत्सरें सत्य मानेना
सत्याचें लटकें करी ।।१।।श्रीराम।।
बऱ्याचें वोखटें सांगे मज
नाहीं म्हणोनियां ।
पैशुन्य नस्तेचि करणें
नसता कुंद लावणें ।।२।।श्रीराम।।
नस्ते नस्ते ढाल घेणें ऐसी
हे जाति मत्सरी ।
आपणु करंटा आहे समर्था
निंदितो सदा ।।३।।श्रीराम।।
आपणु टोणपा असे सर्वज्ञा न
मनी कदा ।
आपणु तामसी आहे पुण्यवंता
पडेचिना ।।४।।श्रीराम।।
आपण कुकर्मी प्राणी सत्कर्मासी उच्छेदितो ।
आपणु चोरटा आहे सकळां चोरटें
करी ।।५।।श्रीराम।।
आपणु भ्रष्टला आहे भल्याला
भ्रष्ट भावितो ।
आपण घातकी मोठा पराला
घातकी म्हणे ।।६।।श्रीराम।।
पोटींचा कपटी मोठा जनाला
कपटी म्हणे ।
आपणा भक्ति ठाकेना
हरिभक्ता उच्छदितो ।।७।।श्रीराम।।
आपणु नीच कुळींचा कुळवंत
मना न ये ।
आपणु ठायिंचा लंडी
रणशूरांसी हांसतो ।।८।।श्रीराम।।
आपणु भ्याड ठायींचा
धारिष्टा कर्कशू म्हणे ।
आपण वोंगळू आहे निर्मळा
कर्मठू म्हणे ।।९।।श्रीराम।।
आपणु लालुची मोठा
वैराग्याची उडावणी ।
करवेना देखवेना ही ऐसा तो
मत्सरू नरू ।।१०।।श्रीराम।।
आपणु कर्म भोगीतो पराला
कर्म लावितो ।
जें काही आपणा नाहीं तें
सर्व उडवीतसे ।।११।।श्रीराम।।
भांडे तोंडेंची तें वेडें
भकाध्या करिंते जनीं ।
अखंड जनांसी भांडे तंडे
तंडे उदंडसा ।।१२।।श्रीराम।।
धीट तोंडाळ तो प्राणी
कांही केल्या विटेचिना ।
लंड ते कोटिगा मोठा लाज
त्याला असेचिना ।।१३।।श्रीराम।।
मत्सरें भाग्यही गेलें
मत्सरें बुध्दी नासिली ।
भक्ती ना ज्ञान ना कांहीं
अरत्र परत्र नसे ।।१४।।श्रीराम।।
पाहता सौख्य तों नाहीं
लौंद लाताड उध्दटू ।
मत्सरे लाविलें वेढा
ज्याचे त्याला कळेचिना ।।श्रीराम।।
इति मत्सर निरूपणे ।।४।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा