।।श्रीराम।।
पडवीवरचा दासबोध
लेखिका- आशालता उर्फ आक्का वेलणकर.
दिवस १२ वा
आज विलासचा चेहरा पडलेला
दिसला. आजींनी सर्वांना वंदन केले. स्थानापन्न झाल्या. त्यांनी विचारले, ‘विलास! आज तुला बरं वाटत
नाही कां? काय होतंय?’
गणपती म्हणाला, ‘मी
सांगतो! तो त्याच्या बाबांवर रागावला आहे. त्याचे बाबा
त्याला स्कूटर घेऊन देत नाहीत.’
‘होय रे विलास, खरं कां हे?’ आजींनी प्रेमळपणाने विचारले.
आजी! बाबा म्हणाले, ‘तू अजून अज्ञानी आहेस. सज्ञान हो मग स्कूटर घेऊन
देतो. विलास खुलासा करू लागला. आजी, रोज मी दासबोध वर्गाला येतो. उन्हातलं हुंदडण
बंद झालं. आईशी हल्ली वादावादी करीत नाही. आईच म्हणाली तसं. तरी बाबा म्हणतात मी
सज्ञान नाही. आजी मी देह नाही. मी आत्मा आहे हे आता कळू लागल्यावरही, मी सज्ञानी नाही कां?’
आजी हसल्या, ‘येवढंच होय! हे बघं विलास
कायद्याच्या चौकटीतला सज्ञानी आणि अध्यात्मातला सज्ञानी यांत फरक आहे. वाहन
चालवण्यास, मतदान करण्यास, विवाहास कायद्याने वयाचे बंधन असते. त्या वयोमर्यादे नंतरच तुला कायदेशीर सज्ञानी म्हणतील. रागावू नको
बाबांच्यावर. त्यांनी तुझ्या हिताचेच सांगितलं आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडून
दंड, शिक्षा, नाच्चकी सगळच
थांबेल. असं कितीसं थांबावं लागेल? एक दोन वर्षच नं? आत्ता जातील दोन वर्ष.’
‘त्याच्या आत आपण दासबोध संपूर्ण अभ्यासून ज्ञानी
होऊ या. अज्ञानी सज्ञानी असे दोन प्रकार माणसांचे आढळतात. ज्यांना आत्मज्ञान झाले
नाही ते अज्ञानी. ज्यांना आत्मज्ञान झाले ते ज्ञानी म्हणजेच सज्ञानी. जरा मोठा
झालस की स्कूटरच काय मोटार सुध्दा चालवशील. या म्हातारीला लांबच्या राम मंदिरात
घेऊन जाशील होय नां?’
‘हे बघ! अज्ञानी काय
म्हणतो, हे सगलं जग जर डोळ्याला दिसतय तर ते खोटे कसे? तुला कळले नां, आता
खोटे म्हणजे काय ते?’
‘हो तर!’ उत्साहाने विलास
म्हणाला, ‘जरी आज हे जग म्हणजे सगळी सृष्टी, पशू, पक्षी,
तुम्ही, आम्ही, सजीव, वनस्पती, हालते बोलते दिसलो तरी त्यात बदल होणार. नाहीसे
होणार. जुने जाणार नवे येणार. म्हणून जग खोटे. आहे तस्से रहाणार नाही म्हणून खोटे.’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘पण
अज्ञानी पुन्हा आडरानात शिरतात. जर जग मिथ्या आहे, तर स्नान, संध्या, पूजन, भजन,
पोथी वाचन कां करायचे? म्हणून विचारतात.
ज्ञानी माणूस संयमशील
असतो. तो शांतपणे सांगतो. खरा देव पंचमहाभूतांच्या पलिकडे आहे. तरी सुध्दा ....’
‘आजी मी सांगतो पुढचं,’ मधुकर म्हणाला. ‘तरी
सुध्दा स्वत:ला पक्का अनुभव येईपर्यंत उपासना हवीच.’
आजी म्हणाल्या, ‘खरं आहे! पण त्यांत गुंतून न
पडता अंतरंगातून खरा देव शोधत रहावे. सुधाला ओवी दाखवली. सुधाने ओवी वाचली..’ सृष्टीपूर्वीं सृष्टि चालतां| सृष्टि आवघी संव्हारतां| शाश्वत देव तत्वता | आदिअंतीं||६-६-४८||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘मधुकर! आता आलं कां ध्यानात? जो सृष्टीपूर्वी होताच, आता आहे, पुढेही सृष्टी
नाश पावली तरी असणारच तोच खरा देव. तोच सत्य. तोच नारायण, तोच सत्यनारायण. हे
ज्ञान ज्याला पक्के होते तो ज्ञानी. म्हणजे सज्ञानी. कळलं कां विलास?’
‘पण हे एकाकी जमणार नाही. म्हणून समर्थ
म्हणतात....’ विलासने ओवी वाचली..... सगुणाचेनि आधारें
| निर्गुण
पाविजे निर्धारें | सारासारविचारें
| संतसंगें ||६-६-५५||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘आत्मज्ञानी
होण्याकरीता तिन गोष्टी पाहिजेत. सांगाल कोणी?’
गणपती म्हणाला, ‘सगुणाची उपासना, सारासार विवेक व सत्संग.’
त्याच्या पाठीवर शाबासकी
देत विलास म्हणाला, ‘बरोबर!’
आजी म्हणाल्या, ‘शब्दाने थोडेफार कळले की कांही माणसांना वाटते
आपण खूप ज्ञानी झालो. त्या अहंकाराने भजन, पूजन देवकृत्ये पूर्वी जी करीत असत ती
पण बंद पडतात. विलास मला सांग की एकदा संतांना शरण गेल्यावर त्यांची आज्ञा पाळायला
हवी की नको?’
‘हवी तर!’ विलास म्हणाला, ‘त्यांच ऐकायच नसेल तर शरण जायचंच कशाला?’
‘म्हणून समर्थ म्हणतात,’ आजी म्हणाल्या, ‘वाच
तूच.....’ गुरुचे वचन प्रतिपाळण | हें मुख्य परमार्थाचें लक्षण | वचनभंग करितां विलक्षण | सहजेंचि जालें ||६-७-१०|| श्रीराम||
‘छान!’ आजी म्हणाल्या, ‘जीवनातला उलटा सुलटा अनुभव येण्यापेक्षा आपले कोट
कल्याण करणाऱ्यावर दृढ विश्वास असावा. कारण....’ मी थोर वाटे मनीं | तो नव्हे ब्रह्मज्ञानी | विचार पाहतां देहाभिमानी | प्रत्यक्ष दिसे ||६-७-२५||श्रीराम||
सूर्याचे उगवणे मावळणे, सागराची भरती ओहटी,
पर्जन्य काळातील पाऊस इ. विश्वातील गोष्टी ज्या भगवंताच्या सत्तेने चालतात तोच
ह्या देहाचा मालक आहे. कर्ता भोक्ता तोच हा निश्चय पक्का असावा.
गणपतीने शंका विचारली, ‘तो कर्ता म्हणजे आपण कांहीच करायचे नाही कां?’
मधुकर म्हणाला,’ गणपती तुझ्या लक्षांत नाही आलं. भगवंत प्रत्यक्ष
काही करीत नाही. कार्य आपणच करायचे, पण त्याला स्मरून करायचे. यश अपयश त्याचे
हाती. आपण पोस्टमन जणू!
पत्रांचे,
धनादेशाचे वाटप केले की पोस्टमन स्वस्थ. असंच ना आजी?’
‘होय!’ आजी म्हणाल्या.
‘आजी! त्याला स्मरुन अभ्यास केला. पेपर
लिहिला पण नापास झालो तरी स्वस्थच रहायचे कां? दु:ख नाही मानायचे कां?’ गणपतीने विचारले.
सुधा
म्हणाली, ‘गणपती! मन लावून, त्याला स्मरून अभ्यास केला की नापास
होणारच नाही हा विश्वास हवा. कारण उत्तम उत्तरे लिहिण्याची बुध्दी तोच देतो. आजीने
सुधाला ओवी दाखवली.’ मी कर्ता
ऐसें म्हणसी | तेणें तूं कष्टी
होसी| राम कर्ता म्हणतां पावसी | येश कीर्ती प्रताप ||६-७-३६||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘कर्तृत्व आपल्याकडे घेतले की अहंकार
वाढतो. त्यामुळे आपण भगवंताला विसरतो. पण त्याचे अखंड स्मरण ठेवले तर? त्याची कृपा अनुभवास येते.’
विलासने
शंका विचारली. ‘त्याची
कृपा म्हणजे काय होते?’
आजींनी
खुलासा केला. ‘यथार्थ
ज्ञान होणे ही त्याची कृपा.’ मिथ्या साचासारिखें
देखिलें | परी तें पाहिजे विचारिलें | दृष्टि तरळतां
भासलें | तें साच
कैसें मानावें ||६-८-१३||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘विचारले म्हणजे विचार करावा. पिवळे
दिसते ते सगळेच सोने नसते. जगातील मायिक वस्तू खऱ्या अशा वाटतात. त्यांचा
नाशिवंतपणा लक्षांत घ्यावा. विलास तू ही ओवी वाच......’ दृष्टीसी
दिसे मनासी भासे |
तितुकें
काळांतरीं नासे | म्हणोनि दृश्यातीत असे | परब्रह्म तें ||६-८-४७||श्रीराम||
‘अशी ब्रह्माची खूण पटणे हीच कृपा. कृपा म्हणजे
पैशाचा पाऊस नव्हे. आजी म्हणाल्या, बाळांनो, जगांत जास्त गात कशाने होत असेल तर
पैशाने, मिळणारी सुखे माणसाला गर्तेत पाडतात. म्हणून विवेकाने काय करावे? जया ही ओवी वाच.....’ रायाचे सन्निध होतां | सहजचि लाभे श्रीमंतता | तैसा हा सत्संग धरितां | सद्वस्तु लाभे ||६-९-२०||श्रीराम||
‘सद्वस्तू म्हणजे परब्रह्म नां?’ जयाने विचारले.
आजी म्हणाल्या, ‘होय! व्यवहारात पण आपण
पाहतो, घरी कोणी परके येणारसे कळले की, घर कसे नीट नेटके आवरलेले स्वच्छ करतो.
शाळेंत मोठे साहेब येणार म्हणून कळले की, बाके धुण्यापासून स्वच्छता, जेथे
गबाळेपणा तेथे अव्यवस्थता. जेथे नेटकेपणा तेथे आनंदाचे मूळ परब्रह्म.’
‘राजाच्या संगतीत वैभव भोगायला मिळते. तसे
संतांच्या संगतीत खरे वैभव भोगायला मिळते.’
विलासने शंका विचारलीच, ‘राजाचे वैभव तरी कुठे शाश्वत असते? मग त्याच्या संगतीतले वैभव पण अशाश्वतच.’
आजी म्हणाल्या, ‘म्हणूनच ज्ञानाची,
विचारांची श्रीमंती ज्यांचे जवळ आहे, त्यांचीच संगती धरावी. म्हणजे अक्षय ठेवा, जे ब्रह्मज्ञान ते प्राप्त होते. हीच भगवंताची
कृपा.’
‘बाळांनो! समर्थांना केवढा
आत्मविश्वास आहे पहा!
ते म्हणतात,’ ये
गोष्टीस करी अनुमान | तो सिद्धचि पावेल पतन | मिथ्या वदे त्यास आण | उपासनेची ||६-९-३०||श्रीराम||
जया म्हणाली, ‘उपासनेची शपथ घेऊन बोलतात, सांगतात
त्या उपासनेने काय मिळते?’
‘सांगते!’ आजी म्हणाल्या, ‘समर्थांचेच शब्दांत ऐकू,’ जें बोलास आकळेना | बोलिल्याविणही कळेना | जयासी कल्पितां कल्पना| हिंपुटी होये ||६-१०-७||श्रीराम|| तें जाणावें परब्रह्म | जें वेदांचें गुह्य परम | धरितां संतसमागम | सर्वहि कळे ||६-१०-८||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘बाळांनो! वेद म्हणजे ज्ञान, ते परम गुह्य आहे.
संत संगतीत ते शुध्द ज्ञान ध्यानांत येते. वृत्ती समाधान पावते. पूर्ण समाधान हे
परब्रह्म स्वरूप असते.’
‘परब्रह्म नामक दिव्य शक्तीला आपण या
डोळ्यांनी पाहू शकत नाही. शब्दांनी कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच! समजावून देण्याचे साधन शब्दच. नको हो,
कशाला एवढेच खूणांनी समजू शकतो. बाकीचा व्यवहार शब्दातच चालतो. ते शब्द खुंटतात.
कल्पना चालत नाही. असे परब्रह्म संत संगतीत ध्यानांत येते. त्याचा अनुभव कसा
घ्यावा हे कळते.’
गणपती
म्हणाला, ‘आजी! आपल्या शरीरांत असणाऱ्या दिव्यत्वाचाच
अनुभव ना?
त्यालाच ज्ञान म्हणतात कां?’
‘होय! आता तूच वाच.’
दुजेविण अनुभव | हें बोलणेंचि तों वाव | याकारणें नाहीं ठाव | अनुभवासी ||६-१०-२९||श्रीराम|| अनुभवें त्रिपुटी उपजे | अद्वैतीं द्वैतचि लाजे| म्हणौनि बोलणें
साजे | अनुर्वाच्य
||६-१०-३०||श्रीराम||
आजी म्हणाल्या, ‘छान! हे बघा पपई गोड आहे की नाही हे केवळ
रंगावरून कळेल कां?’
विलास
म्हणाला, ‘नाही! पपई कापून एक फोड का होईना पण खाऊन
पहायला हवी. तरच कळेल गोड आहे की नाही!’
‘बरोबर!’ आजी म्हणाल्या, ‘हे स्वत:ला कळणे म्हणजे अनुभव. या अनुभवासाठी
पपई आणि खाणारा दोघे हवेतच. याला वेगळेपण म्हणतात. खाणारा तोच पपई किंवा पपई तोच
खाणारा असे असत नाही. आत्मस्वरुपाचा अनुभव आला की वेगळेपणा संपलाच.’
विलास
चटकन म्हणाला, ‘सोहं!
तोच मी, येथे अनुभव घ्यायला मी वेगळा रहात नाही. असंच नां!’
आजी म्हणाल्या, ‘अगदी बरोबर! अनुभव, ज्याचा अनुभव घ्यायचाय ती
वस्तू व अनुभव घेणारा या तीन गोष्टी वेगळ्या असतात. त्याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटीत
वेगळेपणा असतो. स्वरुपज्ञानात वेगळेपणा नाही.’
मधुकर
म्हणाला, ‘अनुभव
घेतो असे म्हणायला मी वेगळा रहात नाही. तो मी म्हणजेच परब्रह्म. असच म्हणायचं कां?’
आजी
म्हणाल्या, ‘होय! आणि ही एकरूपता आली की शब्दाने काय
सांगणार? ते
शब्दाने सागंता येत नाही म्हणून...’
सुधा
म्हणाली, ‘अनुर्वाच्य!
म्हणजे वाचेने बोलून सांगता येत नाही.’
गणपती
टाळी वाजवून म्हणाला, ‘आता या डोक्यात थोडस शिरलं.’
आजी
हसल्या, ‘विलास
ही ओवी वाच.’ तुज
वाटे हे जागृती | मज जाली अनुभवप्राप्ती | या नांव केवळ भ्रांती | फिटलीच नाहीं ||६-१०-५५||श्रीराम|| जागृती यापैलीकडे | तें सांगणें केवि घडे | जेथें धारणाचि
मोडे | विवेकाची ||५९||श्रीराम||
‘झोपेतून जागेपण व अज्ञानातून जागेपण
आलं ना ध्यानांत.’ आजी म्हणाल्या.
‘खरं जाग होण म्हणजे सज्ञान. माझ्या आलं
लक्षांत असं म्हटले की लक्षांत येणारा देहात्म बुध्दीतला मी शिल्लक राहिला.’
‘समजलं तरी आत अनूभवायचं. तोंडाने
बोलायचे नाही. आनंदात रहायचे. असेच नां?’ मधुकरने विचारले.
‘शाब्बास!’ आजी म्हणाल्या. ‘आज शब्दाने कळले. सतत अभ्यासाने अनुभव
आला की खरे ज्ञानी झालो. खुंटले. बोलणेच खुंटले. व्यवहात बोलायचे पण अंतरंगात
अनुसंधान कायम ठेवायचे. अखंड आनंदात रहायचे.’
विलास
म्हणाला, ‘जरा
अवघडच आहे आजी. जमेल का हो आम्हाला? म्हणजे मला जमेल का म्हणतो मी!’
आजी
म्हणाल्या, ‘दृढ
प्रयत्नाने काय जमत नाही? साधणारच! तेच साधावे म्हणून तर प्रार्थना.
कोणाची?’
सुधा
म्हणाली, ‘मारूती
रायाची. मी म्हणू कां मारुती स्तोत्र?’
सुधाने
“भीमरुपी
महारुद्र”
स्पष्ट आवाजात म्हटले.
“आजी! आता अथर्वशिर्ष आमचं पाठ झालं. आम्ही
आता हे स्तोत्र पाठ करू.’ विलास म्हणाला.
“करा! करा! असेच उमेदीने पुढे या!” आजी म्हणाल्या.
।। जय जय रघूवीर समर्थ ।।