शुक्रवार, २७ जुलै, २०१८

प.पू. सद्गुरु आक्कास्वामी वेलणकर


परमपूज्य गुरुदेवता
आशालता उर्फ आक्कास्वामी वेलणकर


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:गुरु:साक्षात परब्रह्म तस्मैश्री गुरवे नम:।।



     माझ्या सद्गुरु प. पू. आशालता उर्फ आक्कास्वामी याचे अल्पचरित्र येथे देत आहे. मला शिवथर येथिल साधना सप्ताहात त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. 

     महाराष्ट्रातील जळगाव मध्ये २३ ऑक्टोबर १९२२ (कार्तिक वद्य ३ शके १८४४) रोजी दुपारी दोन वाजता प. पू. आशालता वेलणकर उर्फ आक्कास्वामी यांचा जन्म झाला. घरची आर्थिक ओढाताण त्यातच पित्याचे छत्र वयाच्या ९व्या वर्षीच हरपलेले अशा बिकट परिस्थितीत आक्कांनी आपले मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण स्वत: शिकवण्या करुन व शाळेत शिक्षक म्हणून काम करुन पूर्ण केले. त्यांना लगेचच अंबरनाथ येथे इंग्रजी शाळेत नोकरी लागली. श्रीमती विमलाताई रहाळकर ह्या आक्कांच्या जीवाभावाच्या मैत्रिण झाल्या.
     दोघींमध्ये नेहमी सद्गुरु प्राप्तीबद्दल चर्चा होत असे. आक्का फारच शीघ्रकोपी होत्या. स्पष्ट वक्तया होत्या. त्यांना शरण जाणे, अनुग्रह घेणे वगैरे गोष्टी मान्य नव्हत्या. त्यामुळेच इंदौरच्या परमपूज्य वंदनीय भागीरथीबाई वैद्य म्हणजेच जिजी महाराज ४-५ वेळा विमलाताईंच्या घरी आल्या होत्या, पण आक्कांनी एकदाही दर्शन घेतले नाही. त्या काहीना काही कारण सांगून टाळत असत. पण एका भाद्रपद वद्य एकादशीला जिजी महाराजांच्या सद्गुरुंच्या पुण्यतिथीला आक्काला घेऊनच जायचे असा चंग बांधूनच विमलाताईंनी इंदूरची तीन तिकीटे आरक्षित करुन आक्कांना तेथे येण्याबद्दलचे निक्षून सांगितले. तेव्हा त्यांना इंदौर येथे जाणे भाग पडले.
     इंदूरयेथिल तुकोगंजात जिजी महाराजांचा आश्रम होता. तेथे उत्सवाला खूप गर्दी झाली होती. रोज काकड आरती ते शेजारती कार्यक्रम होत असे. तेथे आक्का रमल्या पण गुरुदेवांना साधा नमस्कार सुध्दा केला नाही. शेवटी प्रसादाचे दिवशी गुरु महाराज स्वत: सर्वांना प्रसाद वाटणार होत्या. एकेक जण जाऊन चरण स्पर्श करत व प्रसाद घेऊन पुढे जात. आक्कांना ते एक मोठे धर्मसंकटच वाटले म्हणून त्या सर्वात शेवटी रांगेत रहाणयाचा प्रयत्न केला. तो सुवर्ण दिन आहे हे आक्कांना लक्षांत आले नाही पण सद्गुरुंच्या जवळ पोहोचताच गुरु महाराजांनी त्यांचा हात धरला व आशाताई जरा बसा असे म्हणताच आक्कांना आपले नाव कसे काय बरोबर घेतले? याचे नवल वाटले.  आक्कांच्या रागावर चर्चा झाली. गुरुदेवांनी काही नियम पाळायला सांगितले. आक्का गुरुंच्या चरणावर नतमस्तक झाल्या. घरी परतल्या त्यानंतर नियमांचे पालन सुरु झाले. त्यांनी क्रोधावर विजय मिळविला होता.
     पुढे आठच महिन्यांनी सन १९५७ मध्ये त्या स्वत:हून इंदूरला गेल्या व जिजी महाराजांचेकडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला. गुरुंच्याच उपदेशानुसार त्यांनी सर्वच संतांच्या तत्वज्ञानाचा व विशेषत: भागवताचा अभ्यास करुन प्रवचने व भागवत सप्ताह करण्यास सुरुवात केली. थोड्यात दिवसात म्हणजे ९ मार्च १९५८ रोजी आक्कांचे गुरुदेव पंचतत्वात विलीन झाले. परंतु त्यांचे मार्गदर्शन आक्कांना पुढे सदोदित होतच असे. आक्कांनी “दासबोध सखोल अभ्यास“ सुरु केला. त्यापूर्वी त्या प. दा. अ. च्या केंद्र प्रमुख होत्याच. भागवताचा सप्ताह, तसेच दासबोध, ज्ञानेश्वरी वरील प्रवचने व अभ्यासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला.
     अनेकांनी त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला. तसेच त्यांनी शेकडोंना प्रवचनकार तर तयार केलेच पण जवळपास किमान पन्नास तरी भागवतकार निर्माण केले. त्या सर्वांना वर्षातून एकदा आश्विन पोर्णिमा(कोजागिरी) ते पुढे आठ दिवस असा साधना सप्ताह शिवथर घळीत त्या घेत असत. असा एक भागवत सप्ताह सन १९९८ च्या शिवथर घळीतील साधना सप्ताह आटोपताच त्यांनी नांदेड येते ठरविला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती नरम-गरमच होती. म्हणून त्यांनी सकाळी एक तास प्रवचन करावे व दुपारी त्यांच्या पट्टशिष्या सौ लिलाताई गाडगीळ यांनी भागवताचे निरुपण करावे असा कार्यक्रम आखला गेला. सप्ताह सुरु झाला.
     अक्कांचा वाढदिवस त्याच सप्ताहात येत असल्याने शिष्यमंडळी अतिशय आनंदात होते पण, त्याच सप्ताहामध्येच धनत्रयोदशीला भगवान श्रीकृष्णाने आपल्य या लाडक्या भक्ताला आपल्याकडे बोलावुन घेतले. पुढील सर्व कार्यक्रम अंबरनाथ येथे जाले. तेथेच त्यांच्या मूर्लीधर मंदिरात त्यांची मूर्ती बसविण्यांत आली. अशा या आक्कांना त्रिवार वदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा