रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

भाऊबीज भाग १


भाऊबीज भाग १




आज भाऊबीजेचा दिवस आहे. सुकन्या हॉलमध्ये बसुन भाजी निवडत होती. जवळच छोटी वृंदा खेळण्यांबरोबर खेळत होती. तिच्यापेक्षा तिन वर्षांनी मोठा असलेला मदन अभ्यासाच्या टेबलवर बसुन अभ्यास करीत असल्याचे दाखवत होता. परंतु त्याचे लक्ष दाराची बेल कधी वाजते याकडे होते. सुकन्या देखिल हाताने भाजी निवडत असली तरी तिचे देखिल लक्ष सारखे दाराकडे जात होते. तिला चिडवीण्याकरीता मदन आईला म्हणाला, आई! सारखं दाराकडे बघुन मामा लवकर थोडाच येणार आहे?
तू गप्प बस रे बोक्या! मला सांगतोस आणि तू काय करतोयस? तू देखिल मामाचीच वाटच बघतोयस नां? तोंडाने ती जरी असे म्हणून मदनचे बोलणे उडवुन लावत असली तरी तिचे मन रंजीस आले होते. नेहमी बरोब्बर दहा वाजता हजर होणारा तिचा भाऊ आता बारा वाजले तरी अजुन त्याचा पत्ता नव्हता. तिला आता खूप काळजी वाटू लागली. आईची तब्येत ठिक असेल नां? बाबा कसे असतिल? अजयला रजा मिळाली असेल की नाही? कां बसला काही अपघात झाला? तिच्या भोवती नाना प्रश्न फेर धरुन उभे राहिले आणि तिची काळजी वाढु लागली. तेवढ्यांत छोट्या वृंदाने भोकाड पसरले. ते ऐकुन सुकन्या तिच्यावर ओरडली.
मदन देखिल पुस्तकातले तेच तेच वाचुन कंटाळला होता. आई वृंदावर चिडलेली बघुन मदन म्हणाला, आई! मामाचा राग तू वृंदावर काय काढतेस. ती कंटाळली आहे आणि आता मलाही भूक लागल्ये. मला जेवायला वाढ. सुकन्याला मदनचे म्हणणे पटले. वेळही खूप झाला होता त्यामुळे तिने मदनला जेवायला वाढले आणि वृंदाला भरवायला सुरवात केली. परंतु  तिचे त्यात लक्षच लागत नव्हते. आज मदनचे बाबा देखिल त्यांच्या बहिणीकडे दिप्तीकडे भाऊबीजेकरीता जळगांवला गेले होते.
बराच वेळ वाट बघुन सुकन्याने चार घास खाऊन घ्यावे असे ठरवले. त्या करीता तिने ताट घेऊन डायनिंग टेबलवर ठेवले. तेवढ्यांत दारावरची बेल वाजली. ती बेल वाजवण्याची पध्दत ऐकून तिला खात्री झाली की, ज्याची ती एवढ्या आतुरतेने वाट बघत होती तो तिचा लाडका भाऊ अजयच आला आहे. ती हॉलमध्ये दाखल होते नाही तोच मदनने उघडलेल्या दारातुन अजय आत मध्ये आला.
काय रे अजय! किती ऊशीर? आई बाबा कसे आहेत? तुला एवढा उशीर का झाला? सुकन्याने एका दमात विचारले.
हो! हो! अग ताई! एकावेळी किती प्रश्न विचारतेस? घरातली सगळी मस्त आहेत आणि उशीरा बद्दल म्हणशील तर रत्नागिरी ते पुणे रस्त्याची पार चाळण झाली आहे. इतके खड्डे बापरे! कमरेची पार वाट लागली आहे. त्यामुळेच गाडीला उशिर झाला त्यातच वाटेत एक अपघात झाला आहे. त्यामुळे काही अंतर वाहतूक अगदी मुंगीच्या पावलांनी चालू होती. तेव्हा मला सर्वांत प्रथम कढत कढत पाण्याने आंघोळ करायची आहे. ते देखिल तुझ्याकडून चांगले तेलाने मालिश करुन घेऊन. म्हणजे प्रवासाचा थकवा दूर होईल. वर्षातुन एकदाच बहिणाकडून मालिश करुन घ्यायचा चान्स असतो. जेवण झाल्यावर चांगली ताणून देणार आहे मी.
अजय बरोबर बोलता बोलता तिने एकीकडे चहाला आधण ठेवले आणि तेल कोमट करुन त्यात उटणे घातले. अजयचा चहा पिऊन झाल्यावर त्याने मदनला आणि वृंदाला बरोबर आणलेला खाऊ दिला. सुकन्याच्या हातात एक पिशवी देत तो बोलला. हे घे ताई! आईने खास तुला आवडतात म्हणून नारळाच्या वड्या दिल्यात. शिवाय आमसुले, मोदकाची पिठी, कोकम आगळ, कोकम सरबत काय काय दिलेय. मला पण माहित नाही. तुच बघ काय आहे ते. 
तेवढ्यात सुकन्याने रांगोळी काढुन पाट मांडला. अजयच्या हातातून पिशवी घेत ती म्हणाली, अरे! आईची माया आहे ती. त्यानंतर तिने अजयला पाटावर बसायला सांगितले.
अजय पाटावर बसुन ताईकडून बसच्या प्रवासाने जाम झालेली पाठ रगडुन घेऊ लागला. त्यानंतर कढत कढत पाण्याने आंघोळ झाल्यावर त्याचा प्रवासाचा शिण दूर झाला.

*******

अजयची आंघोळ करुन झाल्यावर सुकन्याने त्याला जेवायला वाढले आणि नंतर स्वत:ही जेवायला बसली.  सुकन्याचे जेवण चालू असताना अजय हात न धुता तिच्याबरोबर गप्पा मारीत होता. मधेच तो मदनला म्हणाला, काय रे मदन! फटाके वगैर आणले कां नाही?
नाही नां मामा! आई म्हणते फटाके नाही उडवायचे. तू सांग नां मामा! फटाके नसतील तर दिवाळीची काय मजा? मदने रुसलेल्या स्वरात आईची तक्रार केली.
अरे! तुझ्या आईचे पण बरोबर आहे. फटाक्यांनी मोठा आवाज होतो, आग लागते. आजुबाजुला कोणी आजारी असेल, तर त्याला देखिल फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो की नाही? तरीही तू म्हणतोस ते पण बरोबर आहे, फटाक्यांशिवाय दिवाळीची मजा नाही. अजयने दोघांचीही बाजू घेतली.
वाs रे वाs अजय! दोन्ही बाजुनी बोलतोयस! एकीकडे म्हणतोस फटाक्यांनी त्रास होतो आणि दुसरीकडे फटाक्यांशिवाय दिवाळी नाही असेही म्हणतोस! यातले खरे काय? आणि खोटे काय? सुकन्याने अजयला विचारले.
ताई तुझे म्हणणे बरोबर आहे, परंतु या छोट्या मदनला दिवाळीत फटाके उडवावे असे वाटणारच नां? आपल्या लहानपणी आपण किती फटाके फोडायचो ते आठवतेय नां? आपण असे करु आपण बिन आवाजाचे आणि कमी प्रदूषण करणारे फटाके आणूया! काsय मदन चालेल नां? अजयने मदनला विचारले.
होSS! चालेल मामा! मदनने ताबडतोब उत्तर दिले. मामा बाहेर लावलेला आकाश कंदील बघितलास कां?
हो बघितला नां! तो तू केलायस की काय? कोणी शिकवला? छानचं आहे! अजयने भाच्याचे कौतुक केले.
मामा! आमच्या मॅडमनी शाळेत शिकवला. आम्हाला हा प्रोजेक्ट होता. मदनने माहिती दिली.
अरे अजय! घरचे कसे आहेत सगळे? तुझी नोकरी काय म्हणते? आता परमानंट झाला असशिल नां? सुकन्याने काळजीने विचारले.
ताई! घरचे सगळे मजेत आहेत. माझी नोकरी देखिल व्यवस्थित चालू आहे. हल्लीच मला नोकरीत कायम केले आहे. आज मी खूप आनंदात आहे. तुला माहित आहे यंदा मला पहिला आणि चांगला घसघशीत बोनस मिळालाय. तेव्हा आता यावर्षी भाऊबीज जोरात साजरी करुया. मी तुला तू म्हणशिल ती साडी घेणार आहे.
मामा! मला पण पोलिसच इन्स्पेक्टरचा ड्रेस घ्यायचाय! तू मला प्रॉमिज केलेले आहेस. लक्षात आहे नां? मदनने मामाला आठवण करुन दिली.
हो! हो! नक्कीच! तुला पोलिस इन्स्पेक्टरचा ड्रेस आणि वृंदालापण चांगला ड्रेस घ्यायचाय. शिवाय तुझ्या आजी आणि आबांना पण कपडे घ्यायचेत. तेव्हा ताई आता आपण मार्केटला जाऊया आणि मदनला फटाके आणि सर्वांना कपडे खरेदी करुया. अजयने आपला पुढचा बेत सांगितला.
अरे! पण तुला आराम करायचा होता नां! प्रवासाने थकला आहेस थोडावेळ आराम कर मग जाऊ मार्केटला. सुकन्याने काळजीने त्याला सांगितले.
नको आता मी एकदम फ्रेश आहे. तू मार्केटला जायची तयारी कर. आपण लगेचच जाऊया म्हणजे संध्याकाळी ओवाळणीकरीता वेळवर घरी परत येऊ. अजयने पुढे होणाऱ्या उशिराची जाणिव दिली.

*******

      कसबापेठेतील ट्विंकल रेडीमेड आणि साडी सेंटरमध्ये आज बरीच गर्दी दिसत होती. आज भाऊबीज असल्याने बऱ्याच भगिनी आज खरेदीला बाहेर पडल्या होत्या. अजय सुकन्या, मदन आणि वृंदासह दुकानात शिरला तेव्हा प्रत्येक काऊंटरवर गर्दी होती म्हणून अजय मदनसह दुकानच्या मालकांशी गप्पा मारीत बसला.
काय साहेब! काय खरेदी करताय! शेटजींनी आपुलकीने विचारले.
काही नाही, आज भाऊबीज आहे नां! बहिणीला साडी आणि भाच्यांना कपडे घ्यायचे आहेत.
किती पर्यंत बजेट आहे, जरा भारीतली साडी दाखवायला सांगु काय? शेटजींनी विचारले.
मामा! मला पोलिस इन्स्पेक्टरचा ड्रेस पण घ्यायचाय लक्षात आहे नां? मधेच मदनने आपले घोड दामटलं.
हो! हो! तुला पोलिस इन्स्पेक्टरचा ड्रेस घ्यायचाय तरं! असे त्याने मदनला सांगितले आणि शेटजींना तो म्हणाला ताईसाठी हजारभर रुपयांपर्यंतची चांगली साडी तिला दाखवां आणि या आमच्या भाच्याकरीता पोलिस इन्स्पेक्टरचा चांगला ड्रेसही दाखवा.
बऱ्याच घासाघिशी नंतर सुकन्याची साडी फायनल करुन झाली त्यानंतर मदनकरीता पोलिस इन्स्पेक्टरचा ड्रेस आणि वृंदाकरीता फ्रॉक अशी खरेदी करुन झाली. ताई साडी नीट चेक करुन घे बरकां! नंतर व्याप नको, अजयने ताईला सुचविले.
त्यावर शेटनी साहेब चेक करायची काही जरुरी नाही साडी एकदम उत्तम आहे असे सांगितले. तेथे खूप गर्दी असल्याने सुकन्याने शेटजींच्या शब्दावर विश्वास ठेऊन तशीच साडी घेतली अजयने साडीचे ११५०, मदनच्या ड्रेसचे ७०० आणि वृंदाच्या फ्रॉकचे ५०० असे एकुण २३५० शेटजींना दिले. शेटजींनी त्यावर दिवाळी बोनस म्हणून १० टक्के सूट दिली. अशाप्रकारे अजयने आणखी थोडे कमी करुन २१०० रुपये पेड करुन बील घेतले. त्यानंतर ते दुकानातुन निघाले. जाता जाता वाटेत मदनच्या पसंतीने थोडे बिन आवाजाचे फटाके घेतले.
संध्याकाळी मदनने अजयमामाच्या सोबत फटाके उडवले. अजयने आकाशकंदीलातील लाईट आणि दिव्यांच्या माळा चालू केल्या. थोड्यावेळाने सुकन्याने अजयला ओवाळले अजयने मगाशी खरेदी केलेली साडी ओवाळणी म्हणून घातली. सुकन्याने देखिल अजयला आधीच आणून ठेवलेला शर्ट आणि पॅंटपीसचे पॅकेट दिले. अजयने सुकन्याला नमस्कार केला. त्यानंतर न सांगताच मदनने आईला आणि मामाला नमस्कार केला.

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा