शुक्रवार, २७ जुलै, २०१८

प.पू. सद्गुरु आक्कास्वामी वेलणकर


परमपूज्य गुरुदेवता
आशालता उर्फ आक्कास्वामी वेलणकर


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर:गुरु:साक्षात परब्रह्म तस्मैश्री गुरवे नम:।।



     माझ्या सद्गुरु प. पू. आशालता उर्फ आक्कास्वामी याचे अल्पचरित्र येथे देत आहे. मला शिवथर येथिल साधना सप्ताहात त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. 

     महाराष्ट्रातील जळगाव मध्ये २३ ऑक्टोबर १९२२ (कार्तिक वद्य ३ शके १८४४) रोजी दुपारी दोन वाजता प. पू. आशालता वेलणकर उर्फ आक्कास्वामी यांचा जन्म झाला. घरची आर्थिक ओढाताण त्यातच पित्याचे छत्र वयाच्या ९व्या वर्षीच हरपलेले अशा बिकट परिस्थितीत आक्कांनी आपले मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण स्वत: शिकवण्या करुन व शाळेत शिक्षक म्हणून काम करुन पूर्ण केले. त्यांना लगेचच अंबरनाथ येथे इंग्रजी शाळेत नोकरी लागली. श्रीमती विमलाताई रहाळकर ह्या आक्कांच्या जीवाभावाच्या मैत्रिण झाल्या.
     दोघींमध्ये नेहमी सद्गुरु प्राप्तीबद्दल चर्चा होत असे. आक्का फारच शीघ्रकोपी होत्या. स्पष्ट वक्तया होत्या. त्यांना शरण जाणे, अनुग्रह घेणे वगैरे गोष्टी मान्य नव्हत्या. त्यामुळेच इंदौरच्या परमपूज्य वंदनीय भागीरथीबाई वैद्य म्हणजेच जिजी महाराज ४-५ वेळा विमलाताईंच्या घरी आल्या होत्या, पण आक्कांनी एकदाही दर्शन घेतले नाही. त्या काहीना काही कारण सांगून टाळत असत. पण एका भाद्रपद वद्य एकादशीला जिजी महाराजांच्या सद्गुरुंच्या पुण्यतिथीला आक्काला घेऊनच जायचे असा चंग बांधूनच विमलाताईंनी इंदूरची तीन तिकीटे आरक्षित करुन आक्कांना तेथे येण्याबद्दलचे निक्षून सांगितले. तेव्हा त्यांना इंदौर येथे जाणे भाग पडले.
     इंदूरयेथिल तुकोगंजात जिजी महाराजांचा आश्रम होता. तेथे उत्सवाला खूप गर्दी झाली होती. रोज काकड आरती ते शेजारती कार्यक्रम होत असे. तेथे आक्का रमल्या पण गुरुदेवांना साधा नमस्कार सुध्दा केला नाही. शेवटी प्रसादाचे दिवशी गुरु महाराज स्वत: सर्वांना प्रसाद वाटणार होत्या. एकेक जण जाऊन चरण स्पर्श करत व प्रसाद घेऊन पुढे जात. आक्कांना ते एक मोठे धर्मसंकटच वाटले म्हणून त्या सर्वात शेवटी रांगेत रहाणयाचा प्रयत्न केला. तो सुवर्ण दिन आहे हे आक्कांना लक्षांत आले नाही पण सद्गुरुंच्या जवळ पोहोचताच गुरु महाराजांनी त्यांचा हात धरला व आशाताई जरा बसा असे म्हणताच आक्कांना आपले नाव कसे काय बरोबर घेतले? याचे नवल वाटले.  आक्कांच्या रागावर चर्चा झाली. गुरुदेवांनी काही नियम पाळायला सांगितले. आक्का गुरुंच्या चरणावर नतमस्तक झाल्या. घरी परतल्या त्यानंतर नियमांचे पालन सुरु झाले. त्यांनी क्रोधावर विजय मिळविला होता.
     पुढे आठच महिन्यांनी सन १९५७ मध्ये त्या स्वत:हून इंदूरला गेल्या व जिजी महाराजांचेकडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला. गुरुंच्याच उपदेशानुसार त्यांनी सर्वच संतांच्या तत्वज्ञानाचा व विशेषत: भागवताचा अभ्यास करुन प्रवचने व भागवत सप्ताह करण्यास सुरुवात केली. थोड्यात दिवसात म्हणजे ९ मार्च १९५८ रोजी आक्कांचे गुरुदेव पंचतत्वात विलीन झाले. परंतु त्यांचे मार्गदर्शन आक्कांना पुढे सदोदित होतच असे. आक्कांनी “दासबोध सखोल अभ्यास“ सुरु केला. त्यापूर्वी त्या प. दा. अ. च्या केंद्र प्रमुख होत्याच. भागवताचा सप्ताह, तसेच दासबोध, ज्ञानेश्वरी वरील प्रवचने व अभ्यासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला.
     अनेकांनी त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करुन घेतला. तसेच त्यांनी शेकडोंना प्रवचनकार तर तयार केलेच पण जवळपास किमान पन्नास तरी भागवतकार निर्माण केले. त्या सर्वांना वर्षातून एकदा आश्विन पोर्णिमा(कोजागिरी) ते पुढे आठ दिवस असा साधना सप्ताह शिवथर घळीत त्या घेत असत. असा एक भागवत सप्ताह सन १९९८ च्या शिवथर घळीतील साधना सप्ताह आटोपताच त्यांनी नांदेड येते ठरविला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती नरम-गरमच होती. म्हणून त्यांनी सकाळी एक तास प्रवचन करावे व दुपारी त्यांच्या पट्टशिष्या सौ लिलाताई गाडगीळ यांनी भागवताचे निरुपण करावे असा कार्यक्रम आखला गेला. सप्ताह सुरु झाला.
     अक्कांचा वाढदिवस त्याच सप्ताहात येत असल्याने शिष्यमंडळी अतिशय आनंदात होते पण, त्याच सप्ताहामध्येच धनत्रयोदशीला भगवान श्रीकृष्णाने आपल्य या लाडक्या भक्ताला आपल्याकडे बोलावुन घेतले. पुढील सर्व कार्यक्रम अंबरनाथ येथे जाले. तेथेच त्यांच्या मूर्लीधर मंदिरात त्यांची मूर्ती बसविण्यांत आली. अशा या आक्कांना त्रिवार वदन

शुक्रवार, २० जुलै, २०१८

मला समजलेला दासबोध

मला समजलेला दासबोध
दासबोधातिल सातव्या दशकातल्या दशक समासातिल अठराव्या ओवीचा मला समजलेला अर्थ येथे देत आहे. 

ऐसा सद्गुरु पूर्णपणीं| तुटे भेदाची कडसणी |

देहेंविण लोटांगणीं| तया प्रभूसी ||७-१-१८|| श्रीराम ||

       या ओवीचे महत्व फार मोठे आहे, कारण स्वत: समर्थानी या ओवीचे दासबोधातील स्थान आणि महत्व काय आहे हे आपल्या शिष्यांना विचारले होते. त्यावेळी तिथे हजर असणाऱ्या सर्व शिष्यमंडळीपैकी कोणीही त्या ओवीचे स्थान आणि महत्व सांगु शकले नाहित मात्र कल्याण स्वामींनी एकदाच ऐकलेली आणि लिहिलेली ही ओवी अचूकपणाने सांगितली होती. त्या प्रसंगावरुन आपण त्यांची तुलना महाभारताचे लेखन करणाऱ्या श्री गणेशाशी करु शकतो.
      या ओवीचा वाच्यार्थ असा आहे, मागिल सहा श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे असणाऱ्या, ज्यांच्या कृपेने शिष्याच्या मनात असलेल्या सर्व द्वंद्वांचा अडसर दूर होतो अशा सद्गुरुंस्वरुपातिल प्रभुला मी देहातित होऊन लोटांगण घालतो.
       सद्गुरु म्हणजे कोण हे सांगताना समर्थांनी दासबोधात आधा सद्गुरु कोण नसतो याची मोठी यादी दिली आहे. ते म्हणातात प्रापंचिक माणसाला अनेक प्रकारचे गुरु आपल्या आयुष्यांत भेटत असतात. निरनिराळ्या कौशल्याचे काम शिकविणारे गुरुच असतात. व्रतबंधाच्या वेळी गायत्रीमंत्र सांगणारा हा देखिल गुरुच असतो. जादूटोणा शिकविणारा गुरुच असतो. गायन, चित्रकला, हल्लीच्या काळाता संगणकावर काम शिकविणारा, विणकाम, भरतकाम, पशु पक्षी पालन करण्याकरीता लागणाऱ्या कौशल्याचे शिक्षण देणारा हे सगळे आपल्या परीने गुरुच असतात. हे सर्वजण जरी गुरु असले तरी जीवाला मोक्षप्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने यांचा काहीच उपयोग होत नाही.
       याशिवाय स्वत:ला गुरु म्हणविणारे भोंदू गुरु तर आडक्याचे तिन मिळतात असे समर्थ म्हणतात. अशाप्रकारचे गुरु आपल्या शिष्याला देहबुद्धीतुन बाहेर काढण्याऐवजी त्यात जास्त गुंतवत रहातात. हल्लीच गाजलेला करोडोंच्या संख्येने शिष्य असणारा रामरहिम असे नांव लावणारा गुरु तर शिष्यांना सात्विक बनायला शिकवण्याऐवजी त्यांच्या तामसी वृत्तीला खतपाणी घालणारा होता. कोणताही अध्यात्मिक गुरु कोणाही जीवाला काही अपाय व्हावा असे स्वप्नातदेखिल चिंतिणार नाही. अशाप्रकारचे असद्गुरु आपल्या शिष्यांना मुक्ती मिळवुन देण्या ऐवजी अधोगतीला नेण्याचेच मार्गदर्शन करतात. 
        तेव्हा या ओवित उल्लेख केलेला ऐसा या शब्दाला वर वर्णन केलेले गुरु पात्र ठरत नाहीत. समर्थांनी मागिल पांच ओव्यांमध्ये ज्यांचे वर्णन केले आहे अशा पूर्ण ज्ञानी असणाऱ्या ज्यांच्या कृपादृष्टीने आनंदाचा वर्षाव होतो, त्या अभूतपूर्व सुखाने सर्व सृष्टीच आनंदमय होऊन जाते. त्याला शरण गेलेल्या शिष्यांकरीता तो आनंदाचे उत्पत्तीस्थानच आहे, त्याच्या मार्गदर्शनामुळेच शिष्यांना सायुज्यमुक्ती मिळुन त्यांना कैवल्यपदाची प्राप्ती होते. त्यांच्या कृपेच्या जलाचा एखादा थेंब चोचीत पडावा म्हणून वाट पहाणाऱ्या मुमुक्षुरुपी चातकाला तो आपल्या कृपेचा करुणारुपी आकाशांतुन वर्षाव करीत असतो. तो सद्गुरु काळाचा नियंता आहे, भाविकांची माता आहे, भाविकांना संकटातुन सोडविणारा आहे. आपल्या शिष्यांचे भवार्णावात भरकटलेले तारु आपल्या बोधाने तो पैलपार करतो. तो विश्रांतीचे स्थान आहे, या भवसागरांतुन तारुन नेणारा तो एकमेव आधार आहे. तो सुखाचे माहेरघर आहे. अशा सद्गुरुंना या ओविंत वंदन केलेले आहे.
       प्रत्यक्ष सांबसदाशिवांनी सद्गुरुंचे वर्णन, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्। द्वन्द्वातीतंगगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् | एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् । भावातीतंत्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि || असे केले आहे. ऐसा सद्गुरु या शब्दात या श्लोकातील भाव देखिल आहे. सदगुरुंनी परमात्मस्वरुपाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे त्यांना या विश्वाचे पूर्ण ज्ञान अवगत असते. त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक हालचालीत या ज्ञानाचे दर्शन होते. म्हणूनच ते परमसुखद असतात. समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटले आहे त्यांच्या नुसत्या दर्शनाने किंवा त्यांच्या नुसत्या स्पर्श करण्याने सर्व शंका दूर होतात. सद्गुरुंच्या नुसत्या सहवासाने सर्वसामान्य मनुष्य चिंता मुक्त होतो. म्हणूनच त्यांना परम सुखद असे म्हटले आहे. सद्गुरु हे नेहमी ब्रह्मानंदात मग्न असतात. ज्याला कोणतीच चिंता नसते तो आनंदी असतो. सुखी असणे आणि आनंदी असणे यात फरक आहे. सुख हे सापेक्ष असते. सुख ही संकल्पना देहाशी संबंधीत असते. परंतु आनंद ही संकल्पना आत्म्याशी निगडीत असते. आपल्याकडे म्हण आहे मन चंगा तो काथवटमे गंगा. आनंद हा मनाला होतो. ब्रह्मानंद हा अत्युच्च पातळीवरचा आनंद आहे. खरा मी कोण आहे ते सापडल्याचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. माझे मूळ कोठे आहे, माझे अस्तित्व काय आहे याचा अनुभव आल्याचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद. तो आनंद म्हणजेच सद्गुरुचे स्वरुप. एका दिव्याने दुसरा दिवा लागला की जसा सर्वत्र प्रकाशच प्रकाश होतो तसाच ज्ञान प्रकाश सद्गुरुंच्या सहवासात मिळतो.
         द्वंद्व याचा अर्थ आहे शंका कुशंका. जो अज्ञानी असतो त्याला फार प्रश्न पडतात. किंवा ज्याच्याकडे अर्धवट ज्ञान आहे त्याला फार शंका येतात. सद्गुरु ही ज्ञानमूर्तीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे शंकेला वावच नाही. त्यांना ठामपणाने माहित आहे आपल्या जीवनाच लक्ष काय आहे. त्या लक्षाला साध्य करण्याकरीता आवश्वक असणारे खात्रीशिर ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणून सद्गुरु हे द्वंद्वातित असतात. म्हणूनच स्पष्टीकरण करावयाच्या ओवीत समर्थ म्हणतात तुटे भेदाची कडासणी। कडासणी म्हणडे अडसर तो अडसर सद्गुरुच्या बोधाने दूर होतो.
सद्गुरु हे आकाशासारखे सर्वत्र भरुन उरलेले आहेत. या विश्वात परब्रह्म म्हणजेच ज्ञान हे सर्वत्र भरलेले आहे. सद्गुरु हे त्या परब्रह्माचे स्वरुपच आहेत. समर्थ म्हणतात रिता ठाव या राघवेवीण नाही तसेच सद्गुरुंचे आहे. अहं ब्रह्मास्मि, अथवा सोSहं परब्रह्म ही जी महावाक्ये आहेत त्या सर्व महावाक्यांचे साध्य जे परब्रह्मात विलिन होणे ते साध्य म्हणजेच सद्गुरु आहेत. सद्गुरुंना शरण गेल्यावर ते त्या परब्रह्म स्वरुपाचा प्रत्यक्ष अनुभव देतात म्हणून त्यांना तत्वमस्यादिलक्षं असे म्हटले आहे.
        सद्गुरु हे साक्षीभूत असे असतात. ते विमल, अचल, एकच एक असे आहेत. सदगुरुतत्व हे एकच एक आहे त्याच्यावर कोणत्याही भौतिक गोष्टींचा परिणाम होत नाही. विश्वामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेकडे ते साक्षी भावाने पहातात. त्या कोणत्याही घटनेत ते गुंतून पडत नाहीत. ते भावातित असतात. संस्कृत मध्ये एक वचन आहे, सुख दुखं समे कृत्वा लाभा लाभौ जयजयौ या प्रमाणे सद्गुरुंवर सुख-दु:ख, नफ-तोटा, जय-पराजय या विकारांचा किंवा भावांचा परिणाम होत नाही. कारण ते या सर्वांकडे साक्षीभावाने पहात असतात. त्यांच्यावर त्रिगुणांचा देखिल परिणाम होत नाही. कारण आत्मज्ञान झालेले असल्यामुले त्यांची देहबुद्धी नष्ट झालेली असते आणि त्यांना परमेश्वराचे सत्य स्वरुपाचे ज्ञान झालेले असल्यामुळे अष्टधाप्रकृतीचा एक भाग असलेल्या त्रिगुणांचा परिणाम होण्यापलिकडे त्यांची अवस्था झालेली असते.
       अशा या सद्गुरु स्वरुपाला माझा वारंवार नमस्कार असो. ओवीमध्ये समर्थांनी देहवीण लोटांगणी असे म्हटले आहे. सद्गुरुंना अनन्य भावाने शरण जावे लागते. तेथे मीपणा, अहंकार, मोठेपणा या मीशी संबंधीत सर्व विकारांचा त्याग करावा लागतो. हे सर्व विकार देहबुद्धी प्रबल असल्याचे निदर्शक आहेत. स्वत:मधल्या खऱ्या मीला सद्गुरु चरणी अर्पण करणे म्हणजे देहेविण लोटांगण घालणे. लोटांगण घालणे म्हणजे पूर्णपणाने शरण जाणे. कोणत्याही उपाधीविना सद्गुरुंना शरण गेल्यावर त्या शिष्याची काळजी सद्गुरुंना लागते. अनन्य भावाने शरण आलेल्या शिष्याचे कल्याण करणे ही जबाबदारी सद्गुरु आपलीच समजतात.
        ओवीच्या शेवटच्या चरणांत लोटांगणी, तया प्रभुसी असे म्हटले आहे. सद्गुरु हा प्रभुस्वरुप आहे. किंबहूना जे परमेश्वर देऊ शकत नाही ते सद्गुरु सहज देतात. गुरुचरित्रामध्ये कथा आहे, संदिपक नावाचा शिष्य आपल्या गतजन्मीच्या पापांचे क्षालन व्हावे म्हणून दुर्धर रोग स्विकारलेल्या गुरुंची अनन्य भावाने सेवा करीत काशी क्षेत्री आपल्या रोगग्रस्त गुरुंसह रहात होता. तो करीत असलेल्या सेवेने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला त्याच्या गुरुभक्तीचे फळ म्हणून वर देऊ लागले तेव्हा त्याने भगवान विष्णूंना सांगितले की, "परमेश्वरा, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान, ऐश्वर्य आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही. म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या. कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो " प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, "खरे आहे. जो कोणी माता-पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे. तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो." असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले.
       म्हणूनच समर्थांनी सद्गुरुंना प्रभु असे संबोधुन त्याला देहबुद्धीचा त्याग करुन लोटांगण घालावे असे सांगितले आहे.

अनिल अनंत वाकणकर,श्रीवर्धन, जिल्हा रायगड.

बुधवार, १८ जुलै, २०१८

नरदेेहातील षट्चक्रे


नरदेेहातील षट्चक्रे 
    सर्व विश्वाला चालवणारी जी एक महाशक्ती ब्रह्मांडरूपाने स्थित आहे तीच पिंडरूपाने शरीरातही स्थित आहे. तिला 'कुंडलिनी' असेही म्हटले जाते. प्रत्येकाच्या शरीरात ही शक्ती सुषुप्तावस्थेत असते. पण जेव्हा ती जागृत होते तेव्हा मानवाला ती महामानव बनवते. ही शक्ती शरीरात साडेतीन कुंडले अर्थात वेटोळ्यांसहीत मुलाधार चक्राच्या खालच्या भागात अधोमुख स्थित असते. मानवी शरीरात इडा , पिंगला व सुषुम्ना अशा तीन नाड्या असतात. पैकी इडा ही डावी नाडी (श्वासनलिका) तर पिंगला उजवी नाडी असते. सुषुम्ना ही ह्या दोन्हींच्या मध्ये स्थित असून ती अत्यंत सूक्ष्म असते. कुंडलिनी जेव्हा आसन, प्राणायाम,बंध, मुद्रा इ. च्या अभ्यासाने जागृत होते तेव्हा ती शरीरातील सहा योगचक्रांचे भेदन करते. ह्या चक्रांना योगात कमळ असे म्हणतात. ह्या कमळांच्या पाकळ्यांवर गण म्हणजेच वर्ण असतात.
आता ती चक्रे कोणती, त्यांच्या पाकळ्या किती, शरीरातील त्यांचे स्थान, त्यांच्या अधिष्ठात्री देवता आणि त्यांच्या जागृतीने प्राप्त होणाऱ्या शक्ती / सिद्धी कोणत्या हे बघूया-
) मुलाधार चक्र (pelvie plexus) - ह्या चक्राची अधिष्ठात्री देवता 'गणेश' असून हे चार पाकळ्यांचे कमळ आहे. ह्याच्या चारी पाकळ्यांवर अनुक्रमे वं, शं, षं आणि सं हे चार गण असतात. शरीरात हे चक्र गुदास्थानापासून दोन बोटे वरती आणि लिंगस्थानापासून दोन बोटे खाली स्थित असते. ह्या चक्राच्या जागृतीने मनुष्याला कवित्व करण्याची क्षमता प्राप्त होते. तसेच आरोग्य, आनंद, वाक्यदक्षता इ. गुण प्राप्त होतात. ह्या चक्राचे बीज 'लं' हे आहे. ह्याचा रंग गणपतीच्या शरीराप्रमाणे रक्तवर्ण आहे. कुण्डलिनी शक्तीचा आधार असल्याने यास 'मुलाधार' असे म्हणतात.
) स्वाधिष्ठान चक्र (Hypogastric plexux) - ह्याचे स्थान मुलाधारचक्रापासून दोन बोटे वर असते. ह्या चक्राची अधिष्ठात्री देवता प्रजापती आहे. हे सहा पाकळ्यांचे कमळ आहे. ह्याच्या पाकळ्यांवर अनुक्रमे बं, भं, मं, यं, रं आणि लं हे गण असतात. ह्याचे बीज 'बं' आहे. ह्या चक्राच्या जागृतीने सृजन,पालन तसेच जीभेवर सरस्वती आरूढ होणे हे गुण प्राप्त होतात.
) मणिपूर चक्र (Epigastric plexus)- हे चक्र शरीरात नाभीस्थानी स्थित असते. ह्याची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. हे दहा पाकळ्यांचे कमळ असून त्यावर अनुक्रमे डं, ढं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं आणि फं हे दहा गण असतात. ह्याचे बीज 'रं' आहे. ह्या चक्राच्या जागृतीने शरीरातील सर्व नाडीसमूहांचे ज्ञान प्राप्त होते. तसेच पचनशक्ती वाढून अजीर्ण दूर होते.
) अनाहत चक्र (Cardiac plexus)- ह्याचे स्थान हृदयाजवळ असते. ह्याची अधिष्ठात्री देवता 'सदाशिव' आहे. तत्वबीज 'यं' आहे. हे बारा पाकळ्यांचे कमळ असून त्यावर अनुक्रमे कं ,खं,गं,घं,ङं,चं,छं,जं,झं,ञं,टं आणि ठं हे गण असतात. ह्या चक्राच्या जागृतीने ' अनाहत ' ध्वनी ऐकू येतो. तसेच प्रेम करण्याची सिद्धी प्राप्त होते. कविता सुचणे हा सुद्धा ह्याच चक्राच्या जागृतीचा गुण आहे.
) विशुद्ध चक्र (Carotid plexus)- हे चक्र कंठात स्थित असते. ह्याची अधिष्ठात्री देवता वायु आहे. ह्याचे तत्वबीज 'हं' आहे. हे चक्र सोळा पाकळ्यांचे असून त्यावर अनुक्रमे अ, , , , , , , , लृ,लृ, , , , , अं आणि अः हे सोळा गण असतात. ह्याच्या जागृतीने तहान- भुकेवर नियंत्रण प्राप्त होते. तसेच आरोग्य लाभते.
) आज्ञाचक्र (Medula plexus)- हे चक्र कपाळी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थित असते. ह्याचे तत्वबीज 'ओ३म्' आहे. अधिष्ठात्री देवता विष्णू आहे. हे दोन पाकळ्यांचे कमळ असून त्यावर हं आणि क्षं हे दोन गण असतात. वरील सर्व चक्रांच्या जागृतीने जे फळ प्राप्त होते ते सर्व ह्या एका चक्राच्या जागृतीने प्राप्त होते. ह्या स्थानावर मन आणि प्राण स्थिर झाल्यावर समाधी लागते.
ह्या सर्व चक्रांव्यतिरिक्त टाळूच्या वरती मस्तकात ' सहस्त्रार 'चक्र असते. त्याची अधिष्ठात्री देवता 'शिव' आहे. हे हजार पाकळ्यांचे कमळ आहे. ह्याच्या पाकळ्यांवर '' पासून 'क्ष' पर्यत सर्व गण असतात. ह्याचे तत्वबीज 'विसर्ग (ः) ' आहे. कुंडलिनीचे ह्या चक्राशी तादात्म्य पावणे म्हणजेच 'शिवाचे शक्तीशी मिलन' होणे होय.

मंगळवार, ३ जुलै, २०१८

समर्थ रामदास स्वामीकृत गणपतीची आरती


।।समर्थ रामदास स्वामीकृत गणपतीची आरती।।


समर्थांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. त्या आपण नेहमीच म्हणतो. त्यातिल गणपतीची आरती प्रसिद्ध आहे. परंतु ती म्हणताना अनेकजण तिची तोडमोड करतात. माझ्या माहितीत अनेक जण संकटीच्या ऐवजी संकष्टी पावावे असे म्हणतात. ही गणपतीची आरती समर्थांनी रचली त्यावेली समर्थ मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तेथील पुजार्‍याला गणपतीची आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' या गणपतीच्या आरतीची रचना केली.
      सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥        
      सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
      जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
     श्री गणपती हा सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे, त्याच्या कृपाप्रसादाने विघ्नांची वार्ताही शिल्लक रहात नाही, तो सतत प्रेम पुरवत असतो. सर्वांगाने सुंदर असणाऱ्या गजाननाला शेंदूराची उटी लावलेली आहे. त्याच्या गळ्यांत मोत्याची माळ शोभत आहे. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
     रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
     हिरेजडीत मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥२॥
     जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
     ज्याने चंदनाची उटी लावलेली आहे, त्या गौरीच्या कुमाराच्या मस्तकावर रत्नखचित फरा(शिरपेच) शोभत आहे. त्याच्या मस्तकावर हिरेजडित मुकुट शोभुन दिसत आहे आणि ज्याच्या चरणामध्ये रुण झुण रुण झुण करणारे नुपुर आहेत ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
     माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले  ।।
     नागबंद सोंड-दोंद मिराविले  । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥३॥
     जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
     ज्याच्या मस्तकावर मुकुट आणि कानात मण्यांची कुंडले(कर्णभूषणे) आहेत, ज्याच्या सोंडेवर आणि दोंदावर शेंदूराचे लेपन केले आहे, ज्याच्या पोटावर नागाने फण्यासह वेटोळे घातले आहे, अशा त्या मोरयाचे विश्वरुप पाहीले आणि धन्य झालो. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
      चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
चतुर्भूज असणाऱ्या गणराजाच्या हांतांमध्ये पाश, अंकुश असुन एका हातात खाज्याचे सुरेख लाडू असून एकाहाताने तो आशिर्वाद देत आहे. अशा या गणराजाला सुवर्णाच्या ताटात लोणी साखर जो अर्पण करतो त्याची सर्व विघ्ने तो निवारण करतो. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥५॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
ऊंदराच्या वाहनावर आरुढ झालेल्या हे गणराया तुझ्या मस्तकावर छत्र चामरे मिरवित आहेत. या अशा स्वरुपातल्या हे गणराजा तू कलीयुगांत सगळ्यांकडे आनंदाने पहातोस आणि त्यांच्यावर प्रसन्न होतोस. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा  घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥६॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
मृदंगाच्या बोलावर आणि तालावर गणपती नाचत आहे. तो नाच त्याचे माता पिता कौतुकाने पहात आहेत. टाळ, मृदंग, वीणा याचे मधुर स्वर उमटत आहेत आणि त्या नादाच्या छंदावर गणपती नृत्य करीत आहे. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना।
              संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ ॥
     भक्तांचे अपराध पोटात घातल्या मुळे लंबोदर झालेल्या, ज्याने पिंताबर नेसले आहे, ज्याने नागबंध केलेला आहे, ज्याची सोंड सरळ असुन तो आपल्या भक्तांकडे तो वाकड्यानजरेने पहात नाही परंतु भक्ताकडे जर कोणी वाकड्या नजरेने पहात असेल त्याचा समाचार घेणारा म्हणून वक्रतुंड हे नांव पडलेला असा हा गणपती आहे. संकटात धावत येऊन रक्षण करावे  म्हणून हा रामाचा दास  त्या देवांचाही पूजनिय असणाऱ्या गजाननाची आतुरतेने वाट पहात आहे. ज्याच्या दर्शनाने मनोकामना सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशा या मंगलमूर्ती गजाननाचा जय जयकार असो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।